✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...

य
यनावाला यांनी
Mon, 02/19/2018 - 20:33  ·  लेख
लेख
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत. " ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्‍या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो? आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे. यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ? देवदर्शनाला जाणार्‍या तसेच दर्शन घेऊन परत येणार्‍या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ? कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्‍या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही. वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ? अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते. अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्‍नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे, "दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली. आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥ विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली. रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ? पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥" तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल. .................................................................................
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
82238 वाचन

💬 प्रतिसाद (247)

प्रतिक्रिया

निरीश्वरवाद्यांना वाटते ईश्वर

कंजूस
Mon, 02/19/2018 - 21:10 नवीन
निरीश्वरवाद्यांना वाटते ईश्वर ते स्वतःच आहेत त्यामुळे शिक्षा वगैरे प्रश्न येतच नाही.
  • Log in or register to post comments

ईश्वर म्हणत असेल: कुठं

सतिश गावडे
Mon, 02/19/2018 - 21:29 नवीन
ईश्वर म्हणत असेल: कुठं येड्यांच्या नादी लागून टाईमपास करतो भावा?
  • Log in or register to post comments

मागील जन्मी केलेल्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/19/2018 - 21:46 नवीन
मागील जन्मी केलेल्या पापांमुळे माणुस या जन्मी नास्तिक बनतो; आणि या जन्मी नास्तिक होऊन आस्तिक लोकांना सतत पिडण्याच्या पापाची फळे त्याला त्याच्या पुढच्या जन्मी मिळतात, असं आम्हाला... Image removed. या देवदुताने सांगितले आहे. पण, तरीही आम्हाला तुमच्या प्रचंड चिकाटीने चालवलेल्या कामाचे Image removed. प्रचंड कौतूक आहे, हे सुद्धा नमूद करत आहोत ! Image removed.Image removed. हघ्याहेवेसांनल.
  • Log in or register to post comments

तुमच्या आयडीला अत्रुप्त

प्रचेतस
Mon, 02/19/2018 - 22:39 नवीन
तुमच्या आयडीला अत्रुप्त आत्म्याने झपाटलेले दिसत आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मिपाच्या सगळ्याच आयड्यांना

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/19/2018 - 23:33 नवीन
मिपाच्या सगळ्याच आयड्यांना यनावालांनी झपाटले आहे आणि ते ती "झाडे" सोडायला अजाबात तयार नाहीत ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कधी कधी

नाखु
Tue, 02/20/2018 - 12:34 नवीन
झाडेच त्याच्या मागं मागं जाताना दिसत असतात. अता झाडाचं मूळ आणि ऋषींचे कूळ शोधू नये असं कुठेतरी वाचलंय. मुकाट्याने पायवाटेने चालत असलेल्या​ सामान्य जनतेतील एक क्षुल्लक पांथस्थ नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

निरीश्वरवाद्यांना ईश्वर

मार्मिक गोडसे
Mon, 02/19/2018 - 22:14 नवीन
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?..... त्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट त्याने त्याच्या भेकड भक्तांना दिले आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी .....
  • Log in or register to post comments

सर...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/19/2018 - 22:19 नवीन
वालावलकर सेठ, ईश्वर आपल्याला काय शिक्षा देणार ? तुम्हाला आणि माझ्यासहीत सर्व निरीश्वरवाद्यांना देव उकळत्या तेलाच्या कढ़ईत आपल्याला भज्यासारखे तळून काढतील. लक्षात ठेवा. ;) धन्स सर, तुम्ही माझ्यातला देवाचे खुळ काढल्याबद्दल. देवा तू असशील तर ना सर्व भाबड्या मिपकरांच्या खात्यात रात्रीतून एक एक कोटी जमा कर... लै कड़कीत आहेत बिचारे....;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चिकाटी ची शेकोटी

मारवा
Mon, 02/19/2018 - 22:25 नवीन
दोन्ही कडे पेटलेलीय ................. डोळ्यात धुर गेल्याने समोरुनच पेटल्याचा भास होत असावा. हलक्यात अजिबात न घेणे हे वेगळे सांगणे नलगे. असो बाकी यनावाला सर तुम्ही मेटाएथिक्स वाइज कसा विचार करत असणार याचे एक अकारण कुतुहल आहे तुमच्या लेखात एकसुरीपणा जाणवतो विरोधी आर्ग्युमेंट्स मध्ये व्हरायटी नाही याचे कारण तुम्ही मर्यादीत स्टॅन्ड्स वा पवित्रे हाताळलेले असावेत अशी शंका येते. बहुधा तुम्ही वाचल नसल्यास एक पुस्तक सुचवावेसे वाटते When Bad Things Happen to Good People- Harold Kushner फार रोचक आहे ,
  • Log in or register to post comments

छान आहे पुस्तक

झेन
Tue, 02/20/2018 - 10:11 नवीन
पुस्तक छान आहे पण चश्मा काढून वाचावे लागेल. काही लोक रीझल्ट आधी ठरवूनच रीसर्च करतात ईश्वर त्यांच काही करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

निरीश्वरवाद्यांना ईश्वर

क्रिप्ट
Tue, 02/20/2018 - 01:07 नवीन
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ---> केवळ विश्वास नाही म्हणून त्याने शिक्षा का करावी? उद्या यनावाला असे कोणी नाहीच असे केवळ म्हणले तर तुम्ही जाऊन त्याला शिक्षा कराल का? <<मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील>>> एखाद्या नास्तिकाने देवावर विश्वास ठेवला काय किंवा नाही ठेवला काय त्याने देवाला काहीच फरक पडत नाही. त्याची इच्छा एवढीच आहे की तुम्ही त्याच्या शोधासाठी स्वतःहून प्रयत्न करावेत. आणि तसे प्रयत्न करण्याची प्रेरणा तुम्हाला व्हावी म्हणूनच हे द्वंद्वयुक्त जग आहे. इथे सुख असेल तर दुःख देखील आहे. जोपर्यंत दुःखाचे चटके सोसायची तुमची तयारी आहे आणि ईश्वर प्राप्तीची इच्छा नाही तोपर्यंत तुम्ही सुख दुःख भोगत राहाल. ज्याक्षणी तुम्हाला या सुख दुःखाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते मला प्राप्त करायचे आहे अशी इच्छा, निर्धार होईल आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न कराल तेंव्हा शेवटी तो या मार्गावर भेटेलच. ज्या लोकांवर त्याचा विश्वास नाही केवळ त्यांची उत्सुकता शमवायला त्याने यावे असे का म्हणून? निरीश्वरवाद्यांनी असे काय केले आहे कि त्यांच्यासमोर तो उभा ठाकेल? त्याला जाणून घ्यायचे असेल तर त्याने स्वतः अथवा इतर संतांनी जे मार्ग सांगितले आहेत त्यावर चालून पाहावे. थोडी न थोडकी प्रचिती नक्कीच येईल. परंतु काहीच न करता निरीश्वरवाद्यांसमोर त्याने उभे ठाकावे हि अपेक्षाच चुकीची आहे. <<< नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही.>>> असे का? या सृष्टीचे काही नियम आहेत. त्यातला एक म्हणजे कार्यकारणभाव. त्यालाच कर्म असेही म्हणतात. कर्मसिद्धांत असे सांगतो कि आत्ता तुम्ही भोगत असलेले आयुष्य हे तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माचा परिपाक आहे. त्याचा तुमचा आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काही संबंध नाही. तुमचे कर्म चांगले असेल आणि तुम्ही ईश्वर मानत नसाल तरी तुमच्या कर्माचे फळ मिळेलच. पण तुम्ही आस्तिक असाल आणि अनेक वाईट कर्मे करून केवळ आस्तिकतेच्या नावाखाली त्यातून सुटून जाऊ पाहत असाल तर ती शुद्ध फसवणूक ठरेल. परंतु याला थोडेसे अपवाद असू शकतात. जर केलेले कर्म नकळतपणे झाले असेल किंवा केलेल्या कृत्याचा खूपच पश्चाताप झाला असेल आणि त्या कृत्यामुळे ओढवलेल्या संकटातून तरून जाण्यासाठी अत्यंत निर्मल मनाने तुम्ही ईश्र्वरभक्ती केलेली असेल तर कदाचित सुटूही शकाल. 'कर्मणे गहन: गती: असे कृष्णाने म्हणून ठेवले आहे. <<परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. >>> . तुम्हाला जर असे वाटत असेल कि घशाचा कॅंन्सर मुळे परमहंसांना एका सध्या माणसाला होतात तश्या वेदना होत असतील तर ते चुकीचे आहे. ते मनाच्या अश्या अवस्थेत जाऊन पोहोचले होते कि त्यांना झालेल्या शारीरिक व्याधीचा बऱ्याचदा जाण पण नसे. अशी माणसे शरीराच्या पलीकडे गेलेली असतात व त्यांना अश्या व्याधीमुळे कोणताही फरक पडत नसतो. <<<<देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे>>>>> खरे आहे. ह्या विश्वाचा कारभार कर्मसिद्धतांवर आहे आणि केलेली चांगली कर्मे फलद्रुप होतात. अश्या कर्मात देवाच्या उपासाऐवजी भुकेल्या माणसाला दिलेल्या जेवणाचा हि समावेश होतो. परंतु असे कर्म हि नकळतपणे केलेली ईश्वराची सेवाच आहे कारण ह्या जगात ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे.
  • Log in or register to post comments

निरीश्वरवाद्यांना ईश्वर

क्रिप्ट
Tue, 02/20/2018 - 01:11 नवीन
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ---> केवळ विश्वास नाही म्हणून त्याने शिक्षा का करावी? उद्या यनावाला असे कोणी नाहीच असे केवळ म्हणले तर तुम्ही जाऊन त्याला शिक्षा कराल का? मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील----- एखाद्या नास्तिकाने देवावर विश्वास ठेवला काय किंवा नाही ठेवला काय त्याने देवाला काहीच फरक पडत नाही. त्याची इच्छा एवढीच आहे की तुम्ही त्याच्या शोधासाठी स्वतःहून प्रयत्न करावेत. आणि तसे प्रयत्न करण्याची प्रेरणा तुम्हाला व्हावी म्हणूनच हे द्वंद्वयुक्त जग आहे. इथे सुख असेल तर दुःख देखील आहे. जोपर्यंत दुःखाचे चटके सोसायची तुमची तयारी आहे आणि ईश्वर प्राप्तीची इच्छा नाही तोपर्यंत तुम्ही सुख दुःख भोगत राहाल. ज्याक्षणी तुम्हाला या सुख दुःखाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते मला प्राप्त करायचे आहे अशी इच्छा, निर्धार होईल आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न कराल तेंव्हा शेवटी तो या मार्गावर भेटेलच. ज्या लोकांवर त्याचा विश्वास नाही केवळ त्यांची उत्सुकता शमवायला त्याने यावे असे का म्हणून? निरीश्वरवाद्यांनी असे काय केले आहे कि त्यांच्यासमोर तो उभा ठाकेल? त्याला जाणून घ्यायचे असेल तर त्याने स्वतः अथवा इतर संतांनी जे मार्ग सांगितले आहेत त्यावर चालून पाहावे. थोडी न थोडकी प्रचिती नक्कीच येईल. परंतु काहीच न करता निरीश्वरवाद्यांसमोर त्याने उभे ठाकावे हि अपेक्षाच चुकीची आहे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही.------ असे का? या सृष्टीचे काही नियम आहेत. त्यातला एक म्हणजे कार्यकारणभाव. त्यालाच कर्म असेही म्हणतात. कर्मसिद्धांत असे सांगतो कि आत्ता तुम्ही भोगत असलेले आयुष्य हे तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माचा परिपाक आहे. त्याचा तुमचा आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काही संबंध नाही. तुमचे कर्म चांगले असेल आणि तुम्ही ईश्वर मानत नसाल तरी तुमच्या कर्माचे फळ मिळेलच. पण तुम्ही आस्तिक असाल आणि अनेक वाईट कर्मे करून केवळ आस्तिकतेच्या नावाखाली त्यातून सुटून जाऊ पाहत असाल तर ती शुद्ध फसवणूक ठरेल. परंतु याला थोडेसे अपवाद असू शकतात. जर केलेले कर्म नकळतपणे झाले असेल किंवा केलेल्या कृत्याचा खूपच पश्चाताप झाला असेल आणि त्या कृत्यामुळे ओढवलेल्या संकटातून तरून जाण्यासाठी अत्यंत निर्मल मनाने तुम्ही ईश्र्वरभक्ती केलेली असेल तर कदाचित सुटूही शकाल. 'कर्मणे गहन: गती: असे कृष्णाने म्हणून ठेवले आहे. परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. ----- तुम्हाला जर असे वाटत असेल कि घशाचा कॅंन्सर मुळे परमहंसांना एका सध्या माणसाला होतात तश्या वेदना होत असतील तर ते चुकीचे आहे. ते मनाच्या अश्या अवस्थेत जाऊन पोहोचले होते कि त्यांना झालेल्या शारीरिक व्याधीचा बऱ्याचदा जाण पण नसे. अशी माणसे शरीराच्या पलीकडे गेलेली असतात व त्यांना अश्या व्याधीमुळे कोणताही फरक पडत नसतो. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे------ खरे आहे. ह्या विश्वाचा कारभार कर्मसिद्धतांवर आहे आणि केलेली चांगली कर्मे फलद्रुप होतात. अश्या कर्मात देवाच्या उपासाऐवजी भुकेल्या माणसाला दिलेल्या जेवणाचा हि समावेश होतो. परंतु असे कर्म हि नकळतपणे केलेली ईश्वराची सेवाच आहे कारण ह्या जगात ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे.
  • Log in or register to post comments

असं अधिकार वाणीने लिहीलेले

सतिश गावडे
Tue, 02/20/2018 - 07:46 नवीन
असं अधिकार वाणीने लिहीलेले वाचून तुम्ही "अवतारी" पुरुष असून नुकताच अवतार धारण केलेला असणार असे उगाचच वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट

नमस्कार करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/20/2018 - 08:49 नवीन
गुरु माऊलींनी परमेश्वराची वाट दाखवली आहे, नमस्कार करा. जय जय राम कृष्ण हारी, जय जय राम कृष्ण हारी. बाकी, धन्यासेठ, मला तुकडोजी महाराजांचं भजन मात्र आवडतं. सांगा मी काय करु, भक्ती करु का पोट भरु. आवडलं तर चहा पाजा आज. -दिलीप बिरुटे ( एक जालअवतारी महापुरुष)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नास्तिकांच्या अस्तित्वावर देवाचा

अनन्त अवधुत
Tue, 02/20/2018 - 04:14 नवीन
  • Log in or register to post comments

नास्तिकांच्या अस्तित्वावर देवाचा

अनन्त अवधुत
Tue, 02/20/2018 - 08:33 नवीन
विश्वास आहे. त्यांचे अस्तित्व त्याला मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

उत्तर तुम्हीच लिहीले आहे की

बांवरे
Tue, 02/20/2018 - 04:42 नवीन
उत्तर तुम्हीच लिहीले आहे की >> अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल.
  • Log in or register to post comments

हम्म

मूकवाचक
Tue, 02/20/2018 - 09:40 नवीन
आपण नास्तिक आहोत असे स्पष्टपणे सांगणार्‍या एका सदगृहस्थाने भगवान रमण महर्षींना चिरडीला आणण्यासाठी प्रश्न विचारला, "ईश्वर असतो का, ईश्वराचे अस्तित्व आपण सिद्ध करू शकाल काय?" महर्षींनी स्मितहास्य केले आणि त्यांनी उत्तर दिले, "ईश्वराची चिंता आपण कशाला करता आहात? त्याला त्याची चिंता वाहू द्या! हा प्रश्न ज्याला पडला आहे त्याच्या स्वरूपाचा शोध घ्या". तो नास्तिक बुचकळ्यात पडला. श्री रमणांनी त्याने "मी कोण आहे?" हे पुस्तक वाचावे अशी शिफारस केली. त्यामुळे जेमेतेम काही तास आश्रमाला भेट देण्याच्या हेतूने आलेल्या या आगंतुकाने तेथेच काही दिवस मुक्काम केला. शेवटी तो म्हणाला, "मी इथे येताना ईश्वराला नाकारणारा एक नास्तिक म्हणून आलो, आणि त्या वेळी मी सुखी होतो. आता मात्र स्वतःलाच "मी कोण आहे" असा प्रश्न केल्याने मी जाम गोंधळून गेलेलो आहे. मला वाटते आहे की आपली (मानसिक) स्थिती बिघडत चालली आहे आणि त्यामुळे मी नाखूश आहे" श्री रमणांनी त्याच्याकडे बघत स्मितहास्य केले आणि म्हणाले, "तुझा हा वैचारिक गोंधळ बिघडलेल्या मनस्थितीचे द्योतक नाही. आपल्याच अस्तित्वामागच्या सत्याकडे, स्वस्वरूपाकडे तू आजवर पूर्णपणे दुर्लक्ष करत आलेला आहेस. आता कुठे तू एक मूलगामी स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहेस, ज्यामुळे तू या (स्वस्वरूपाकडे) दुर्लक्ष करण्याच्या स्थितीपासून दुरावत चालला आहेस. त्यामुळे झालीच असेल तर एक सुधारणा झालेली आहे! (स्वस्वरूपाकडे) दुर्लक्ष करण्यापासून आत्ताचा वैचारिक गोंधळ, या गोंधळातून सुस्पष्टतेकडे, त्या बौद्धिक स्पष्टतेकडून प्रचितीकडे आणि प्रचितीकडून अंती ठामपणे (सच्चिदानंद) स्वरूपातच स्थित होउन राहणे - अशा चढत्या भाजणीनेच अध्यात्मिक साधनेची वाटचाल होत असते. मूळ स्त्रोतः http://realizedone.com/post/when-a-confessed-atheist-provocatively-asked...
  • Log in or register to post comments

साक्षीदार

चौकटराजा
Tue, 02/20/2018 - 10:02 नवीन
ईश्वर हा साक्षीदार - भक्ताच्या भाषेत "सर्वसाक्षी" आहे. व साक्षीदार हा त्रयस्थ असतो सबब त्याला दुसर्याला शासना करण्याचा अधिकार असेलच कसा ?
  • Log in or register to post comments

नास्तिक!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 02/20/2018 - 10:37 नवीन
जेवढे आस्तिक मंडळी देवाचं नाव घेत नस्तील किंवा लेख पाडत नस्तील, तेवढे, नास्तीक लोकं करतात अस वाटतंय :)
  • Log in or register to post comments

निरीश्वरवाद्यांना ईश्वर

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/20/2018 - 11:03 नवीन
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला कदाचित् निरीश्वरवाद्यांकडे लक्ष द्यावे इतकेही त्यांचे महत्व इश्वराला वाटत नसावे ! मात्र, यनावाला कळत नकळत ईश्वराची सतत इतकी आठवण काढत असतात की स्वर्गाच्या लाईनमध्ये त्यांचा नंबर सगळ्या आस्तिकांच्या पुढे असेल* असेच वाटते ! :) * : संदर्भ : कुठल्याश्या कथेत सांगितले आहेच ना की, "शिकारीची वाट पहात बेलाच्या झाडावर बसलेल्या एक पारधी केवळ वेळ घालवण्यासाठी बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला, ती झाडाखालच्या शंकराच्या पिंडीवर पडत राहिली आणि काही वेळाने शंकराने प्रसन्न होऊन पारध्याला दर्शन दिले."
  • Log in or register to post comments

* : संदर्भ : कुठल्याश्या कथेत

सतिश गावडे
Wed, 02/21/2018 - 11:16 नवीन
* : संदर्भ : कुठल्याश्या कथेत सांगितले आहेच ना की, "शिकारीची वाट पहात बेलाच्या झाडावर बसलेल्या एक पारधी केवळ वेळ घालवण्यासाठी बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला, ती झाडाखालच्या शंकराच्या पिंडीवर पडत राहिली आणि काही वेळाने शंकराने प्रसन्न होऊन पारध्याला दर्शन दिले."
शिवलीलामृत अध्याय २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

लागुंचा एक किस्सा आठवला.

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/20/2018 - 11:22 नवीन
लागुंचा एक किस्सा आठवला. त्यांच्या मुलाचा तन्वीर चा लोकल मधे वर्मी दगड लागून मृत्यू झाला. त्यांना काही कठोर सश्रद्धांनी सागितले," बघा तुम्ही देव मानीत नाही ना? देवाने तुम्हाला शिक्षा केली". लागू म्हणाले की मी त्याला मानीत नाही म्ह्णून तो माझ्या मुलाला शिक्षा करणार असेल तर तो देव कसला? राक्षस असला पाहिजे.
अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते.
यात बाबा आमटे राहिले की! या सगळ्या मंडळींच नास्तिक्य कुणाला खुपत नव्हत. ते देव न मानणारे असतील पण देवाला शत्रू मानणारे नव्हते. तसेच असंख्य लोक जे देवाला मानतात त्यांना दुखवणारे नव्हते.त्यांच्या श्रद्धेची टिंगल किंवा अवहेलना करणारे नव्हते.तसेच चिकित्सा करणारे ही नव्हते. बाबांना तर लोक देव न मानणारा देव माणूस म्हणायचे. अनेक सौम्य नास्तिक लोकांची साधारण भूमिका अशी असायची मी माझ्या पुरता देव मानीत नाही. तुम्हीही तो मानू नये असा माझा आग्रह नाही. तुम्ही तो मानत असल्यास तुमच्या भावनेचाही आदरच आहे. त्याला मानण्या न मानण्यामुळे आपल्या माणूस पणात कुठलीही बाधा येत नाही. अस्तिक व नास्तिक या केवळ सोयी साठी वापरलेल्या संज्ञा आहेत. ते काही वॊटर टाईट कंपार्टमेट नाही. मधे अज्ञेयवादाचा पट्टा मोठा आहे. शिवाय ही वर्गवारी चल आहे.परमेश्वर हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र आहे अशीही संकल्पना आहे. प्रथम तो निर्गुण निराकार. त्याची कल्पना करण सामान्यांना अवघड झाल. मग तो सगुण साकार झाला. तो ही पुरेनासा झाला मग भक्तवत्सल करुणा घन. सर्वगुण संपन्न सर्वशक्तीमान असणे परमेश्वराला भाग आहे नाही तर त्याला कुणी विचारणार नाही. असशील तू लै भारी पण मला त्याचा उपयोग नसेल तर? तुही भिकारी व मी ही भिकारी. बसू दोघे भीक मागत. असे झाले असते ना! त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या, द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं ममः देवदेवा || सगळी नाती चिकटवून टाकली इथे. विरोध भक्ती मधे देवाला शिव्या द्यायची परमीशन आहे. आमच्या गावाकडे लव्हाराचा शंकर्‍या व मुसलमानाचा पाप्या हे एकमेकांना घट्ट मैत्रीत आईबहिणी वरुन शिव्या द्यायचे. त्याच्या शिवाय मैत्रीच नात घट्ट झाल्याचे त्यांना वाटायच नाही. असो मुद्दा असा आहे की प्रत्येकाच्या देव या संकल्पना सुद्धा वेगळ्या आहेत. त्याला एकच पदर नाही. मानला तर देव नाही तर दगड असे म्हणणारे अनेक सश्रद्ध मी गावाकडे लहानपणी पाहिले आहेत. आजही शहरात पाहतो. मी व माझा देव हे विं श चौघुले संपादित पुस्तक जरुर वाचावे.
  • Log in or register to post comments

बाय द वे, विचारीन विचारीन म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/20/2018 - 11:35 नवीन
घाटपांडे साहेब, तुम्ही देवावर श्रद्धा ठेवता का म्हणजे त्याला मानता का ? हो किंवा नाही इतकेच सांगा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

तुमचा देवावर विश्वास आहे का?

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/20/2018 - 12:00 नवीन
तुमचा देवावर विश्वास आहे का? असा प्रश्न भल्याभल्यांना बुचकळयात, संभ्रमात, चिंतनात टाकतो. मग तुम्हाला कोणता देव अभिप्रेत आहे? अशा प्रतिप्रश्नाने उसंत मिळते अस मी ग्रंथ परिचयात म्हटले आहे. हो कि नाही? अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. माझ्या जगण्याच्या गरजेनुसार मेंदु ठरवतो. कधी मी नास्तिक तर कधी अस्तिक तर कधी अज्ञेयवादी असतो. हे एक उत्तर दुसर अस की माना मानू नका काही फरक पडत नाही. मूळात ती एक संकल्पना आहे म्हणजे मानवी मेंद्चा अविष्कार. मी कुठल्याही प्रतिमेत अडकत नाही. तसे अस्तिक म्हणजे सनातनी बुरसटलेला व नास्तिक म्हणजे रॅशनल सुधारक असेही मी मानत नाही. यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् | भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : || अर्थ जीवनात सुखेनैव जगावे. गरज पडल्यास कर्ज काढून तूपरोटी खावी. एकदा देहाची राख झाल्यावर परत कोण येणार आहे? अस मानतो. उद्या माझ्या मेंदुत जैवरासायनिक बदल झाले तर माझे म्हणणे बदलेलही. अर्थात ते कुणाचेही बदलेल. अगदी यनावालांचेही. निसर्ग नियम तुमच्या माझ्यासाठी वेगळे नाहीत. कुणाच्याही मेंदुत केमिकल लोच्या होउ शकतात. शिवाय प्रत्येक गोष्टीवर आपले काहीतरी मत असलेच पाहिजे असेही मी मानीत नाही. अनेक गोष्टी आपल्यासाठी अदखलपात्र असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमचे सर्वच प्रतिसाद खूप

प्रचेतस
Tue, 02/20/2018 - 12:01 नवीन
तुमचे सर्वच प्रतिसाद खूप आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

वरचा आणि हा, दोन्ही प्रतिसाद

बिटाकाका
Tue, 02/20/2018 - 12:16 नवीन
वरचा आणि हा, दोन्ही प्रतिसाद आवडले. ******************************************** प्रतिष्ठित नास्तिकांची नावे देताना असे अगणित प्रतिष्ठित आस्तिकही होऊन गेले आहेत हा मुद्दा सरळ सरळ बाजूला टाकला जातो. देव त्याची भक्ती केली नाही तर शिक्षा देतो हे जणूकाही सर्व आस्तिकांचे ब्रह्मवाक्य आहे अशा थाटात वरील लेख लिहिला गेला आहे असे मला वाटते. देव शिक्षा नाही तर न्याय करतो, देव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळे देतो असे मानणारे (चान्गली आणि वाईट कर्मे ठरवण्याचे सामर्थ्य ईश्वरात आहे असे मानण्यात काहीच गैर नसावे) आस्तिक लेखकाच्या खिजगिणतीतही नसतात त्यामुळे असे लेख नेहमी स्वतः तयार केलेल्या मुद्द्यांवर, एकांगी होतात असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हाहाहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/20/2018 - 12:24 नवीन
मला माहिती होतं तुम्ही हो किंवा नाही मधे उत्तर देनार नाहीत. एक मोठा वर्ग असा आहे की, जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर सृष्टीला मानतो. पण, मध्यस्थ, मंदिरं, बाबा-बुवा, दगड, देव, खडे, अंगठ्या, आकार उकार यांना मानत नाही. मला हे बरं वाटतं. या लोकांचा तान नसतो. ही मंडळी कोणालाही त्रास देत नाही. मला तुमचं मत समजलं आहे. तुम्ही हो आणि नाही मधे पक्के अडकलेले आहात.

उद्या माझ्या मेंदुत जैवरासायनिक बदल झाले तर माझे म्हणणे बदलेलही.

मान्य.

अर्थात ते कुणाचेही बदलेल.

हं. जीवनात संकटं. आली की मतं बदलतात, असं एक निरिक्षण आहे.

 

अगदी यनावालांचेही.

यनांचे आता मत कधीच बदलनार नाही, बदलूही नये असं माझं ठाम मत आहे. जालावर माझे दोन सर आदर्श आहेत, एक दैववादी जे आहे ते आहे असं मानणारे शरद सर, आणि कंप्लेट दैव नाकारणारे वालावलकरसेठ. बाकी, सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. एकदा भेटूया....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

यनांचे आता मत कधीच बदलनार

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/20/2018 - 12:34 नवीन
यनांचे आता मत कधीच बदलनार नाही, बदलूही नये असं माझं ठाम मत आहे
यनावालांचे मत कधीच बदलणार नाही हे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही. हा जो च आहे ना तो काही अढळ नाही. फार तर असे म्हणा की एकूण परिस्थितीचा विचार करता यनावालांचे मत बदलण्याची शक्यता कमी वाटते. आणि बदलूही नये हे तुमची इच्छा आहे ठाम मत नव्हे. एक प्रतिसाद अशा चर्चांमधे सारखा द्यावा लागतो. तो चिकटवतो आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... हा प्रतिसाद मिपावर दिला आहे कुठे तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त

चिर्कुट
Wed, 02/21/2018 - 16:59 नवीन
तुमचे सगळेच प्रतिसाद आवडले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर

arunjoshi123
Tue, 02/20/2018 - 13:32 नवीन
जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर सृष्टीला मानतो.
मंजे काय हे काही कळायला भाग नाही. -------------------- अवांतर - तांत्रिकदृश्ट्या अद्भूत हे विशेषण नास्तिकांनी वापरू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/20/2018 - 13:39 नवीन
मंजे काय हे काही कळायला भाग नाही. आपणास प्रतिसादातला काही भाग कळला नसेल तर आपण प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे, ही लम्र विनंती. मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत असा काही नियम नाही. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना

arunjoshi123
Tue, 02/20/2018 - 16:07 नवीन
मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत असा काही नियम आहे असं गृहित धरून मी प्रश्न विचारला नव्हता. परंतु त्याच वेळी सर्वच गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत आणि त्यांनी तद्नुसार वागायलाच पाहिजे इ इ कोणाची विचारसरणी असू शकते (जशी इथे यनावालांची आहे.) हे ही मला कळतं असा माझा समज आहे. शिवाय प्रत्येक गोष्ट कळावी अशी माझी जैविक रचना, बुद्धिमत्ता, अर्हता, आवश्यकता इ इ नाही हे देखिल मला कळतं असा माझा समज आहे. पण अर्थातच प्रा आणि डॉ लावल्यामुळं तुमच्या विधानाचा अर्थ काढायचा प्रयत्न करत होतो. ते अनावश्यक नि मूर्खपणाचं असलं तरी इन्स्टिंक्टिव आहे हो. बच्चे को गलती कि माफी दे दो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केव्हाच माफ केलंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/20/2018 - 16:44 नवीन
बच्चे को गलती कि माफी दे दो. आपले प्रतिसाद पाहता आपल्याला केव्हाच माफ केलंय आणि इग्नोरही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

आपण हा नियम सर्वत्र लावायची

arunjoshi123
Tue, 02/20/2018 - 21:08 नवीन
आपण हा नियम सर्वत्र लावायची समबुद्धी येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाऊ द्या ना सोडा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/20/2018 - 21:28 नवीन
ईश्वराने आम्हाला असंच वेडं बनवलंय. किती लोड घेणार काका सोडून द्या. आपले एकमेकांचे विचार नाय पटत सोडून द्यायचं. लै मनावर नै घ्यायचं. तुमचा वेंगी आवडला. चांगलं लेखन करता तुम्ही. बाकी काय चाललंय नवीन. :) उदगीरला मागच्या महिन्यात आलो होतो प्रचाराला. काय रस्ते आहेत राव. भेटलो असतो तिकडे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

बाकी मस्त. आमच्या उदगीरला

arunjoshi123
Wed, 02/21/2018 - 19:41 नवीन
बाकी मस्त. आमच्या उदगीरला कोण्या का निमित्ताने जाणारे लोक विशेष आवडतो. ( सध्याला मी पुण्यात राहतो.) ============== मी कै लोड इ नै घेतंय. नि समोरचेही घेत नसतात हे ही माहित आहे. गंमत म्हणून गपाट्या करायच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

-१

विकास
Tue, 02/20/2018 - 23:05 नवीन
एक दैववादी जे आहे ते आहे असं मानणारे शरद सर... माझी जरी व्यक्तिगत ओळख नसली तरी श्री. शरद यांच्या लेखनावरून ते "दैव"वादी आहेत असे अजिबात वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दैव वाद व देव वाद

चौकटराजा
Wed, 02/21/2018 - 07:17 नवीन
दैव वाद व देव वाद हे पूर्ण भिन्न आहेत असे मी ६५ वर्षाच्या अनुभवा नंतर ठाम पणे विधान करीत आहे. दैव याची माझी सोपी व्याख्या अशी की जे आपल्या हातात नाही असा सर्व गोष्टीचा आपल्यावर होणारा समुच्चय परिणाम. तुम्ही देवाचे अस्तित्व माना अगर नका मानू दैवाचे अस्तित्व तुम्हाला मान्य करावेच लागते कारण या जगात कोणीच परिपूर्ण कोणत्याच अर्थाने नाही. सबब पराधीनता यातून कोणाही माणसाचीच नवे तर एकूणच सर्वांची सुटका नाही. पराधीनता आली की दैव आलेच ! देवाचे तसे नाही. काहीतरी अचाट, अगम्य शक्ती आहे असे देवाचे स्वरूप मानणारे ही अनेक आहेत. पण जगाच्या कारभारात हेतूपूर्वक भाग घेणारा नियंता म्हणून देव अस्तित्वात आहे ही जी भक्त लोकांची धारणा आहे ती मान्य करता येत नाही. म्हणूनच तुम्ही देववादी असलात तर प्लासिबो म्हणून काही फायदे होत असतीलही पण देव वादी नसलात तर होणारे फायदे अधिक आहेत असा माझा तरी अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

प्रा. डॉ. दिलिप बिरुटे,

arunjoshi123
Tue, 02/20/2018 - 13:27 नवीन
प्रा. डॉ. दिलिप बिरुटे, तुम्हाला मी या ही पेक्षा एक सोपा प्रश्न विचारतो. फक्त हो किंवा नाही मधे उत्तर द्या. ============== प्रश्नः प्रा. डॉ. दिलिप बिरुटे, तुम्हाला प्रश्न विचारता येतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिक्षा?.....छे.....

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 02/20/2018 - 11:56 नवीन
उलट असली वांड मुले मला फार आवडतात... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

यनावाला , नमस्कार ....

खिलजि
Tue, 02/20/2018 - 12:44 नवीन
यनावाला , नमस्कार .... आस्तिक आणि नास्तिक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ... आस्तिक : जो युगानुयुगे एका दैवी शक्तीला सदैव सलाम करत आला आहे ... नास्तिक : जो हे सार थोतांड आहे आणि त्याचा स्वतःवर ठाम विश्वास आहे . ( इथे " कर्मयोग लागू होतो बरं का ) देव आहे कि नाही : मानलं तर हो आणि नाही तर नाही .. पण ह्या साऱ्या निर्थक गोष्टी आहेत .. कारण आपल्या धर्मात दोन्ही पक्षासाठी ( आस्तिक आणि नास्तिक ) ध्येय प्राप्तीच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत .. आस्तिक लोक , देवाला स्मरून कर्म करतात तर नास्तिक लोक स्वतःवर विश्वास ठेवून कर्म करतात .. कर्मयोग हीच खरी ईश्वरभक्ती आहे ... अंधश्रदधा ठेवून जर कोणी " असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी " असे जर कोणी म्हणत असेल तर त्याच्या पेकाटात लाथ मारानेच उचित ठरेल ... तुम्ही काय करता , कमावता आणि त्याचा व्यय कसा करता यावर ठरते ... माझा देवापेक्षा , हि जी आपल्या ऋषीमुनींनी स्तोत्रे लिहून ठेवली आहेत ना त्याच्यावर फार विश्वास आहे ... मी लहानपणापासून गणपती स्तोत्रे आणि नवग्रह स्तोत्र म्हणत आलो आहे .. आता सध्या त्याच्यासोबतच रुद्रपाठ नित्य चालू असतो .. त्यासाठी देवासमोर बसून राहत नाही .. मनातल्यामनात घोकत असतो .. त्यातून मला शांती मिळते आणि मला वाटत ,, प्रत्येकाला ती हवी असते .. अगदी नास्तिकाला सुध्दा ... तेव्हा शांतीची व्याख्या आणि त्याचे वाद , हाच खरा वादाचा विषय आहे ... इथे ईश्वराचे काहीही देणेघेणे नाही ... या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव , माणूस सोडला तर , सृष्टीचे नियम अगदी काटेकोरपणे पाळतो ... अगदी समुद्राला येणारी भरती ओहोटीसुध्द्धा ... असो .. स्तोत्रांबद्दल मी माझे अनुभव तुम्हाला सांगतो नवग्रह स्तोत्र फळ : "इति श्री वेदव्यास मुखोदगीतं यापठेतसुसमहितौ दिवावयादिवा रात्रौ विघनशांतीभविष्यति नरनारीनृपनाचं भावेददुस्वप्न नाशानं ऐश्वर्यं अतुलाम तेषां आरोग्यम पुष्टिवर्धनाम ग्रहनक्षत्रजा पिडांतस्कराग्नि समुद्भवाम ता सर्वा प्रशामम यान्ति व्यासो ब्रूट निसंशयह " माझे आतापर्यंतचे जीवनमान : १) मला एकही स्वप्न पडत नाही २) मला कसलेही भय वाटत नाही .. अगदी मृत्यूचेसुध्दा ३) कधी अडचणीत सापडलो तर मार्ग मिळण्यासाठी फार तिष्ठत बसावे लागत नाही ४) एक बंडखोर , आणि आगाऊ मुलगा , ज्याच्या भविष्याचा फार यक्ष प्रश्न बापासमोर उभा होता , तो आज संपूर्ण कुटुंबात एक चांगले उदाहरण बनला आहे .. माझ्या डॉक्टर बनण्यामागे एक अविश्वसनीय प्रवास होता .. ज्याची मलादेखील कल्पना नव्हती .. पण तो घडून आला .. आणि हे सांगण्यामागचे कारण हेच कि तो निदान माझ्याकडून तरी शक्य नव्हता .. मी एम एस सी झाल्यावर या सगळ्याला मूठमाती दिली होती .. पण ते व्हायचाच होते .. गाईड स्वतः मागे लागले आणि ते घडून आले .. नुसतंच डिग्री नाही बरं का .. चांगले बारा तेरा पेपर पब्लिश झालेत आणि तीन पेपरने तर अवॉर्ड मिळवलेत .. आता बोला .. आहे कि नाही या स्तोत्रांची कमाल .. तुम्हाला स्तोत्र फळ खोटे ठरवायचे आहे तर एकदम सोप्प काम आहे .. पण जर ते खरं ठरवायचं असेल तर ती ऋषीमुनींनी दिलेली संख्या पार पदवीच लागते .. ते करा म्हणजे हा वाद कायमचा मिटेल ... अहो सोप्पी गोष्ट आहे .. ऋषीमुनींना हे मनाचे खेळ फार आधीच समजले होते ... त्यांनी दिलेला हा अगाध ठेवा जातं होण्यासाठीच देव हि संकल्पना साकारली गेली ... निरीश्वरवादी आणि ईश्वरवादी हे सारे थोतांड आहे ... पण एक मात्र नक्की , हि शृष्टी एका अनामिक आणि अगाध दैवी शक्तीवर कार्यरत आहे आणि ते विज्ञानापलीकडचे आहे ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

नवग्रह फळ जरा चुकीचे टंकले म्हणून परत लिहीत आहे

खिलजि
Tue, 02/20/2018 - 12:48 नवीन
नवग्रह स्तोत्र फळ : "इति श्री वेदव्यास मुखोदगीतं यपठेतसुसमहितौ दिवावायदिवा रात्रौ विघनशांतीभविष्यति नरनारीनृपनाचं भवेददुस्वप्न नाशनं ऐश्वर्यं अतूलम तेषां आरोग्यम पुष्टिवर्धनम ग्रहनक्षत्रजा पिडांतस्कराग्नि समुद्भवाम ता सर्वा प्रशामम यान्ति व्यासो बृते निसंशयह "
  • Log in or register to post comments

निरीश्वरवाद्यांना ईश्वर

arunjoshi123
Tue, 02/20/2018 - 13:36 नवीन
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?
लॉजिकली हा प्रश्न अस्तिकांना आणि मूर्ख, इल्लॉजिकल नास्तिकांना पडू शकतो.
  • Log in or register to post comments

निरीश्वरवाद्यांना ईश्वर

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/20/2018 - 16:30 नवीन
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?
मध्यंतरी ईश्वर भेटला होता. त्याला मी हाच प्रश्न केला. तो म्हणाला," ते जरी मला मानत नसले तरी मी त्यांना मानतो. मी त्यांना शिक्षाही करत नाही व बक्शीस ही देत नाही." :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही

दीपक११७७
Tue, 02/20/2018 - 15:04 नवीन
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही
ईश्वराने मानवास ईश्वर आहे की नाही हे ठरवा किंवा केवळ ईश्वर प्रार्थना करा यासाठी पृथ्वीवर पाठवलेले नाही. चांगले वाईट भोग, भोगण्यास पाठवले आहे, परिणाम स्वरुप निरीश्वरवाद्यांना ईश्वराने शिक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही. असे मी म्हणल्यास
  • Log in or register to post comments

देतो ना. पण निरीश्वरवाद्यांना

आदूबाळ
Tue, 02/20/2018 - 17:19 नवीन
देतो ना. पण निरीश्वरवाद्यांना कळतच नई की ही देवाने दिलेली शिक्षा आहे.
  • Log in or register to post comments

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?

यश राज
Tue, 02/20/2018 - 17:29 नवीन
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही आणि आस्तिकांनाच ईश्वर शिक्षा करतो हीच मुळात निरीश्वरवाद्यांची सर्वात मोठी अंधश्रध्दा आहे. एनि वे फारच महा लोल लेख आहे.
  • Log in or register to post comments

बापरे

सुबोध खरे
Tue, 02/20/2018 - 17:30 नवीन
बापरे लोक एवढा गूढ आणि गहन विचार करतात? आणि एवढा त्याना वेळही असतो? आणि असा विचार करायला आवडतो? आमचे जीवन *शरद तळवलकर* आहे. काना मात्रा वेलांटी नसलेले सरळसोट. असला विचार सुचत नाही आणि सुचला तर झेपत नाही.
  • Log in or register to post comments

बापरे

सुबोध खरे
Tue, 02/20/2018 - 17:30 नवीन
बापरे लोक एवढा गूढ आणि गहन विचार करतात? आणि एवढा त्याना वेळही असतो? आणि असा विचार करायला आवडतो? आमचे जीवन *शरद तळवलकर* आहे. काना मात्रा वेलांटी नसलेले सरळसोट. असला विचार सुचत नाही आणि सुचला तर झेपत नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा