Skip to main content

दैवी आवाजाचे गायक - येशुदास!

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 10/01/2018 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
Yesudas कट्टासेरी जोसेफ येशुदास अर्थात पद्मविभुषण डॉ. K. J. येशुदास यांचा आज ७८ वा वाढदिवस! पूर्वीच्या कोचीन प्रांतात म्हणजेच सध्याच्या केरळमधे १० जानेवारी १९४० रोजी एका ख्रिश्चन कुटूंबात येशुदास यांचा जन्म झाला.आपलं संगीतविषयक शिक्षण तिरुअनंतपुरमच्या स्वाती तिरुनाल संगीत महाविद्यालयातून पूर्ण करुन ६० च्या दशकात त्यांनी सिनेक्षेत्रासाठी गायला सुरुवात केली. मल्याळम सोबतच त्यांनी तमिळ,कन्नड,तेलुगू,मराठी,बंगाली,हिंदी,अरबी,रशियन अशा विविध भाषांमधून जवळपास ७०००० गाणी गायली आहेत.त्यांनी काही सिनेमांत पडद्यावर पाहुणा कलाकार म्हणूनही काम केलंय. येशुदास यांचा आवाज दैवी आहे हे केवळ त्यांच्या गोड,मुग्धमधूर आवाजासाठी म्हटलेलं नाही तर त्यांनी गायलेली भक्तीगीतं बर्‍याच लोकांसाठी खरोखरंच दैवी अनुभूती आणि मन:शांती देणारी ठरली आहेत.श्रीकृष्ण आणि अय्यप्पा या केरळच्या आवडत्या हिंदू दैवतांची अनेक प्रसिध्द भक्तीगीतं ही येशुदास यांनी गायली आहेत. शबरीमलैच्या अय्यप्पा मंदिराचे दरवाजे सायंकाळी बंद करण्यापूर्वी 'हरीवरसनम्' हे येशुदास यांच्या आवाजातील भजन दररोज ऐकवण्याचा नित्यक्रम बरीच वर्षे सुरु आहे.इतर अनेक गायकांनी हे भजन गायलेलं असूनही येशुदास यांचंच गाणं अधिकृतरित्या मंदिराकडून वाजवलं जातं.येशुदास यांची कर्नाटकातील कोल्लूर येथील मुकांबिका देवीवर खुप श्रध्दा आहे.इ.स. २००० पासून ते दरवर्षी त्यांचा वाढदिवस या मंदिरात गाणं गाऊनच साजरा करतात.केरळमधील बर्‍याचशा मंदिरांमधे केवळ हिंदूंनाच प्रवेश आहे.त्या पार्श्वभूमीवर येशुदास यांच्या दैवी आवाजानं केलेलं गारुड सगळे नियम शिथिल करुन अनेक वर्षं भक्तांना आनंद देत आलेलं आहे. देशात केरळ आणि विदेशात भारतीय सांगीतिक सांस्कृतीचं प्रतिक म्हणूनही त्यांना अोळखलं जातं. १४ नोव्हेंबर १९६१ रोजी त्यांनी आपलं पहिलं गाणं मल्याळम भाषेत "जाती भेदम् मत द्वेषम्" रेकॉर्ड केलं."अटेन्शन पेन्ने अटेन्शन" हे त्यांचं पहिलं गाजलेलं गाणं.मल्याळम नंतर त्यांनी सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत गायली आहेत. येशुदास यांची काही गाजलेली हिंदी गाणी १. जानेमन जानेमन तेरे दो नयन २. गोरी तेरा गाँव बडा प्यारा ३. आज से पहले आज से ज्यादा ४. जानम जानम ५. कहाँ से आये बदरा ६. जिद ना करो अब तो रुको ७. हो गोरीया रे ८. माना हो तुम बेहद हँसी ९. दिल के टुकडे टुकडे करके १०. तू जो मेरे सूर में ११. जब दीप जले आना १२. चाँद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा १३. सुरमयी अखियों में १४. का करु सजनी १५. मधुबन खुशबु देता है १६. सुनयना इन नजारों को तुम देखो १७. मोहब्बत बडे काम की चीज है १८. धीरे धीरे सुबह हुई १९. तुझे देखकर २०. खुशियाँ ही खुशियाँ हो २१. अो भवरे (येशुदास यांनी गायलेल्या काही तमिळ,मल्याळम,कन्नड,तेलुगू गाण्यांच्या लिंक्स नंतर प्रतिसादातून पेस्टवतो.) आमचे एक केरळी स्नेही म्हणतात,मनावरचा ताण हलका करायचा असेल तर एक उत्तम उपाय;हेडफोन लावून येशुदास यांची गाणी ऐकणं! दैवी कृपा असलेल्या या दैवी आवाजाच्या गायकाला दीर्घायुरारोग्य लाभो हीच ईशचरणी प्रार्थना.बाकी त्यांची गाणी चिरंतन आहेतच!

वाचने 13641
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

१.संगीतकार यशवंत देव यांनी येशुदास यांच्याकडून गाऊन घेतलेलं "शब्दमाळा पुरेशा न होती स्पर्श सारेच सांगून जातो" हे सुप्रसिध्द गीत https://m.youtube.com/watch?v=GXVzBI34h4E २. वेलीवरी उमले कळी (चित्रपट: माझा मुलगा. मूळ मल्याळम असणारा मराठीत डब झालेला हा एकमेव सिनेमा) https://youtu.be/JQ_52mi-TAg ३. वारा आला भेटायाला (नणंद भावजय) https://youtu.be/FDvfyxpe1bY ४. मायेची सावली (नणंद भावजय) https://youtu.be/rfdYbFlBAfg

In reply to by उपयोजक

मराठी गाण्यांसंदर्भात येसूदास यांचे नाव ऐकले नव्हते. या धाग्यामुळे ही माहिती मिळाली. धन्यवाद ! चारही गाणी ऐकली, क्लासिक आहेत ! गाण्यांचे शब्द देखील सुंदरच !

छान ओळख . येसुदास यांनी गायलेले , इलायराजा यांचे संगीत असलेले " सिंधु भैरवी " या चित्रपटातील "महागणपतीम मनसा स्मरामी " हे गाणे खुप आवडते आहे .

तमिळ दैवम् तंद वीडु https://youtu.be/zmfq3GsoSDU कल्याणत्ते नीला https://youtu.be/yDwDIlksjnA मलरे कुरिंजी मलरे https://youtu.be/x8A9ktuonKA मल्याळम सुप्रसिध्द हरिवरसनम् https://youtu.be/UyCW91AhqNQ प्रमादावानम् वींडुम् https://youtu.be/g7jN78z5A4M देवांगणंगल https://youtu.be/bIXcK4mNhzY तेलुगू नवरससुमा मालिका https://youtu.be/2CipBdbWaRk आकाश देसाना https://youtu.be/KDb67BTbvmY आ पुला रंगु https://youtu.be/Jt6r68D8bPA बंगाली पाथ हराबो बोले एबार https://youtu.be/OWtJrsfzN18 नाम शोकुंतलो तार https://youtu.be/UGDqsyR1TqY

आलाप या अमिताभ , ऋषीकेश मुखर्जी जोडीच्या चित्रपटातली येसुदास यांनी गायलेली "चांद अकेला " , "कोइ गाता मै सो जाता " , "माता सरस्वती शारदा" ही गाणीही खुप गाजली अहेत .

समयोचित सुरेख लेख ! या महान गायका बद्दल माहिती मिळाली ! त्यांनी गायलेली हिंदी गाणी माझी आवडती ! हॅप्पी बर्थडे, येशुदासजी !

इतर भाषेतली गाणी जास्त ऐकली नाहीयेत पण हिंदीतली जवळजवळ सर्व गाणी आवडतात. मागच्या सहा महिण्यांत सुरमयी अखियों में कमीतकमी दोन अडिचशे वेळा तरी पोराला झोपवायला वाजवले असेल. :-) इतर वेळी झोपताना किर्किर करणारं बाळ हे गाणं ऐकल की शांतपणे झोपी जातं. येसुदासांना शतायुष्य लाभो!

"ळ" मिसिंग आहे प्रत्येक गाण्यातून. मल्याळम मध्ये तर ळ हा उच्चार आहे मग असे का झाले असावे असा प्रश्न पडला आहे. बाकी वर चौथा कोनाडा यांनी म्हटल्याप्रमाणे...
चारही गाणी ऐकली, क्लासिक आहेत ! गाण्यांचे शब्द देखील सुंदरच !
Sandy

येशुदास यांचे 'का करू सजनी' अत्यंत आवडीच्या गाण्यांपैकी एक आहे.

के जे येसुदास यांचे " वाथापि गणपतिम भजेहम" हे मुत्थुस्वामी दीक्षितार रचित भजन देखील अतिशय सुन्दर आहे. नेट वर अनेक व्हर्जन्स उपलब्ध आहेत त्यापैकी एक अगदी अद्वितीय आहे

मस्त लेख...तुझे देखकर बर्याच वेळेसैकले आहे.

येशुदास माझे अत्यंत आवडते गायक आहेत. वरील यादीत नसलेले पण तितकेच नितांतसुंदर असलेले एक गाणे इथे देत आहे. आनंद महल नावाचा एक चित्रपट येणार होता त्यात हे गाणे असणार होते. या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले पण नंतर काही कारणाने (नक्की कोणत्या ते माहित नाही) तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तरीही येशुदासांच्या आवाजातील हे गाणे आपल्याला आस्वाद घ्यायला मिळाले हे चांगलेच झाले. शास्त्रीय संगीतातील मला काही म्हणजे काहीही कळत नाही. कुठला राग आहे कुणास ठाऊक पण या गाण्यात जो कुठला राग आहे तो फारच सुंदर आहे.

एका दुपारी घरी असताना टीव्हीवर चॅनल बदलताना Asianet हा चॅनल चुकून लागला आणि हा कार्यक्रम लाईव्ह सुरु होता. येसूदास आणि सोनू एका स्टेजवर काय करत आहेत म्हणून थांबलो आणि माझी लॉटरीच लागली. साक्षात अमृतानुभव! Sandy