राजाची नियत
आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई.
एकदा फिरता फिरता एका गावात पोहचला. तहान लागली होती. दूर एक लहानसे घर दिसले. घरा भोवती ऊसाचा मोठा मळा होता. तिथे गेला. एक म्हातारी सामोरी आली. त्याने प्यायला पाणी मागितले. ती शेतात गेली. एक उस तोडला. उभ्या कांडक्यावर आडवा कोयता मारला. एक मोठा ग्लास भर रस निघाला. राजा बघतच राहिला! उसावर कोयता मारायचा अवकाश कि लगेच एवढा रस! रस पिऊन राजा तृप्त झाला. त्याने विचारले, ‘माई, हा काय जादूचा ऊस आहे का? इतका रस? ते ही फक्त कोयता मारताच!’
म्हातारी हसली. ‘राजाची कृपा. माझा राजा दयाळू आहे. त्याची नियत चांगली आहे. गरिबाला नडत नाही. दांडग्याना सोडत नाही. राजा नेक दिलाचा, तर उस लाख मोलाचा!’
ऐकून राजा प्रसन्न झाला खरा.... पण त्याच्या डोक्यात निराळे चक्र फिरू लागले. त्याला वाटले, जिथे इतके पिकते, तिथे तसेच सगळे विकते. यांच्यावर आता कर लावू. वरून साधीगरीब दिसणारी माणसं आतून गबरगंड असतात. ते काही नाही, यांच्या वरही नवा कर बसवायचा. जिथे आहे, तिथे आणखी वाढवायचा. त्याच विचारात त्याने म्हातारीला हुकुम सोडला, ‘माझी तहान काही भागली नाही. अजून रस दे.’
‘का नाही! घरचाच उस आहे!’ म्हणत म्हातारी उठली.मळ्यात गेली.
इकडे राजा कुणावर कसा नि किती कर बसवायचा, त्याची अंमलबजावणी कशी करायची, विरोध झाला तर कसा मोडून काढायचा, नवे उत्पन्न किती होईल, त्यात काय करायचे, नवे युद्ध करायचे का.... या लोकांना आपण फुकटच पोसले आजपर्यंत..... अनेक विचार येत होते.
बराच वेळ झाला, तरी रस घेऊन म्हातारी आली नाही. तो चालत तिच्या जवळ पोहचला. पाहतो, तर म्हातारीने दहा बारा उसाची कांडकी तोडली होती. सगळ्यावर सपासप कोयते मारून झाले होते. शेवटी तिने ऊस हाताने पिरगळायला सुरुवात केली. पण दोन पाच थेंबा पलीकडे रस काही पडेना. म्हातारी हैराण झाली. राजाला नवल वाटले, मघाशी तर रस रसरसून वहात होता. आत्ता लगेच काय झाले? त्याने म्हातारीला विचारले. म्हातारी थांबली. त्याच्या कडे पहात कष्टाने म्हणाली, ‘ कदाचित माझ्या राजाची नियत बदलली असेल. त्याच्या मनात खोट आली असेल!’
तिचे उत्तर ऐकून राजा चपापला. त्याच्या मनातले विचार त्याला भंडावू लागले. तो तिथून चालता झाला.
पुढे राजाने काय केले असेल?
'गोष्टी ऐकल्या त्या लिहिल्या' मधून
-शिवकन्या
वाचने
4334
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
..
व्हाट्सप करत आहे. खाली मिपाची
मस्त आहे, तुमच्यासारखे सशक्त
सुरेख
आवडली
अप्रतिम कथा
प्रामणिक प्रयत्न
In reply to अप्रतिम कथा by गामा पैलवान
धन्यवाद.
In reply to प्रामणिक प्रयत्न by नमकिन
:)
सर्व जाणत्या वाचकांचे आभार.
शेवटी तात्पर्य काय, "राजाने