Skip to main content

अठ्ठावीस लक्ष रुपये

लेखक यनावाला यांनी शनिवार, 04/11/2017 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
अठ्ठावीस लक्ष रुपये .......यनावाला "पैशांचा पाऊस ! भोंदू बाबाने व्यावसायिकाला अठ्ठावीस लाख रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी पुणे म.टा.(31-01-2017) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:- मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत. त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "अडथळे आहेत. ते दूर झाल्याशिवाय कुंभातून धन येणार नाही. पूजा करावी लागेल. " अशी बतावणी करून चाळीस हजार रुपये घेतले. त्यानंतर सागरनाथ कुंभ घेऊन आला. त्यांतून शंभर रुपयांच्या कांही नोटा पाडून दाखविल्या. अधिक नोटा पडेनात. "तुमच्यावर कोणी करणी केली आहे. आता स्मशानात जाऊन मोठा विधी करायला हवा. त्यासाठी बारा लाख रु.लागतील. मग नोटांचा पाऊसच पडेल." अशी आशा दाखवली. "पैसे न दिल्यास बारा भूतांचा कोप होईल" .अशी भीतीही घातली. वैद्यांनी मुदत ठेवी मोडून १२ लाख रु.दिले. त्यानंतर सागरनाथने आणखी पाच लाख रु.मागितले. वैद्यांनी तीही रक्कम सुपूर्द केली. नंतर मंदार वैद्यांना सागरनाथच्या मुलाचा फोन आला. "करणी वडिलांवर उलटली आहे. ती परत उलटविण्यासाठी १० लाख रु.पाठवावे. नाहीतर वडिलांचा मृत्यू होईल. मग त्यांचे प्रेत आणून मी ते तुमच्या दारासमोर टाकीन. " वैद्य घाबरले. त्यांनी दहा लाख रु.पाठविले. कांही दिवसांनी आणखी पैशांची मागणी आली. इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा. मग त्यांनी बुवाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी सागरनाथ मीठानाथ परमार आणि चंदुलाल सागरनाथ परमार यांच्यावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास चालू आहे. ....या प्रकरणावरून काय दिसते ? मंदार वैद्य हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला २८लाख रु. दिले. त्याअर्थी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे मंदार वैद्य बुद्धिमान आहेत. त्यांचे वय ४७ वर्षे आहे. म्हणजे ते अनुभवी आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे २८ लक्ष रुपये एक फडतूस, ढोंगी बाबा लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या बुवाने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. वैद्य यांनी त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार केला नाही. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे. असे घडण्याचे कारण काय ? यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे देव-धर्म आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर मंदार वैद्य यांची असलेली श्रद्धा. अपरंपार श्रद्धेविना असे घडणे असंभवनीय आहे. श्रद्धा ही एक मनोभावना आहे. मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते. बुद्धीपेक्षा मन प्रबळ बनते. बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धीची विचारक्षमता नष्ट होते. मेंदूवर श्रद्धेचे नियंत्रण येते. त्यामुळे सर्व निर्णय श्रद्धे अनुसार होतात. विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात. मग व्यवहारज्ञान, क्षमता, बुद्धिमत्ता, अनुभव यांचा कांही उपयोग होत नाही. श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:- १) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.) ३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.) प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते. आपण इतकी वर्षे, अनेक धार्मिक कार्ये निष्ठापूर्वक केली आहेत. आता देव माझ्यावर कृपा करणार. तो कुणाच्या रूपाने, कसा -कधी येईल हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे निश्चित. तो येणार. मला कृपाप्रसाद देणार. असे त्यांना मनोमन वाटत होते. ते देवाची प्रतीक्षा करीत होते. वैद्य अनेक बुवा-बाबांना भेटत होते. शेवटी सागरनाथबाबा न बोलावता, त्यांच्या घरी आला. कांही न विचारता , "तुम्हांला अक्षय धनाचा कुंभ देतो." असे आपण होऊन म्हणाला. वैद्यांना क्षणैक साक्षात्कार झाला असावा की या बाबाला देवानेच पाठविले आहे. त्याने नऊ हजार रु. मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. पुढे तो वारंवार पैसे मागू लागला. वैद्यांना वाटले देव आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहतो आहे. आपण कमी पडता नये. देवाच्या कसोटीला उतरलेच पाहिजे. या विचाराने ते पैसे देत राहिले. त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? देव आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. देवाने पाठविलेला हा बाबा मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार. शेवटी २८ लाख रुपये गेले तरी काहीच चांगले घडले नाही. हे ध्यानी आल्यावर ते श्रद्धेच्या ग्लानीतून थोडे बाहेर आले. "म्हणजे बुवा-बाबा श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे अंनिसवाले सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी. मग त्यांनी सागरनाथबाबा वि्रुद्ध पोलीसांत तक्रार दिली. पोलीसांनी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. पुढे काय झाले याची बातमी अद्याप वाचली नाही. नेहमीप्रमाणे पोलीसतपास चालू असेल. व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले. भोंदूबाबाने मागितले तेवढे पैसे त्या्ला दिले. शेवटी माणूस म्हणजे त्याचा मेंदू. तो मेंदू श्रद्धाभावनेच्या आहारी गेला म्हणजे अशी फसवणूक होणारच. याची अनेक उदाहरणे आहेत. श्रद्धाळू लोकांचा निरुपाय असतो. श्रद्धेपुढे त्यांचा मेंदू हतबल होतो. श्रद्धेच्या गुंगीतून बाहेर आल्यावर "मी त्या बाबाला इतके पैसे दिले तरी कसे? " याचे आश्चर्य स्वत: वैद्यांनाच वाटले असेल. श्रद्धेची झिंग ही अशी असते. श्रद्धाळूंची फसवणूक होणे अपरिहार्य असते. त्यावर एकच उपाय तो म्हणजे श्रद्धेचे प्रयत्‍नपूर्वक विसर्जन करणे. श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे. मंदार वैद्यांनी भोंदूबाबावर श्रद्धा ठेवली म्हणजे त्यांनी आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण टाकली. म्हणजे त्यांच्या बुद्धीचे नियंत्रण बाबाकडे गेले. त्यामुळे तो बुवा सांगेल ते सत्य मानून वैद्य त्याच्या आज्ञा पाळत गेले. दासाला स्वामीच्या आज्ञा पाळाव्याच लागतात. मग फसवणूक अटळ असते. महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकात छापून आलेली ही सत्य घटना आहे. श्रद्धावंतांनी यावर स्वबुद्धीने विचार करावा. "आमचे महाराज अशी बुवाबाजी करणारे नव्हेतच." अशा भ्रमात राहू नये. ******************************************************************************

वाचने 48960
प्रतिक्रिया 138

प्रतिक्रिया

एखाद्या माणसाला तू फारच जाडा आहेस म्हणालात तर तो वजन कमी करण्याची शक्यता शून्य आहे कारण माणूस नकारात्मक मनोवृत्ती स्वीकारतो. अर्थात मूळ हेतू केवळ त्या माणसाला दूषणेच द्यायची असतील तर गोष्ट वेगळी. पण जर समाज प्रबोधन करायचे असेल तर टीका टोकाची असून चालत नाही. आपण सडेतोड वागतो याचा दुराभिमान बाळगण्यापेक्षा अतिश्रद्धावान लोकांना त्यांच्या अतिरेकाची हळुवारपणे जाणिव करून दिल्यास जास्त फायदा होईल असे वाटते.

एखाद्या माणसाला तू फारच जाडा आहेस म्हणालात तर तो वजन कमी करण्याची शक्यता शून्य आहे कारण माणूस नकारात्मक मनोवृत्ती स्वीकारतो. अर्थात मूळ हेतू केवळ त्या माणसाला दूषणेच द्यायची असतील तर गोष्ट वेगळी. पण जर समाज प्रबोधन करायचे असेल तर टीका टोकाची असून चालत नाही. आपण सडेतोड वागतो याचा दुराभिमान बाळगण्यापेक्षा अतिश्रद्धावान लोकांना त्यांच्या अतिरेकाची हळुवारपणे जाणिव करून दिल्यास जास्त फायदा होईल असे वाटते.

तजो,
यनावाला कुठलीतरी जालीम नस दाबत आहेत ज्यामुळे सगळे तळमळत आहेत.
त्याचं काये की यनावालांची अंधश्रद्धा केवळ देवाधार्मापुरतीच मर्यादित आहे. तिला व्यापक स्वरूप मिळंत नाही म्हणून आम्ही सगळे आस्तिक तळमळत आहोत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्याचं काये की यनावालांची अंधश्रद्धा केवळ देवाधार्मापुरतीच मर्यादित आहे. तिला व्यापक स्वरूप मिळंत नाही म्हणून आम्ही सगळे आस्तिक तळमळत आहोत. गामा जी, एक समजले नाही...देवधर्म ही संकल्पना व्यापक नाही असे आपले मत आहे का?...आणि जर व्यापक आहे तर देव-धर्मापुरत "मर्यादित" कसे असू शकेल?

गापै, पळपुटी कारणे आहेत ही. स्वतःची हतबलता लपवण्याची. आत कुठेतरी हे सर्व चुकीचे आहे हे जाणवते पण सोडवत नाही म्हणून तळमळ होते. बोले तो एक पैर इधर, एक पैर उधर और बीच में..... ज्याची श्रद्धा अपरंपार त्याला असल्या हजार लेखांनी काही भोकं नाही पडायची.

श्री वैद्य यांचे वैयक्तिक नुकसान झाले असे त्याना वाटत असेल तर मला त्याचे दु: ख आहे. त्याना आपण एक साधूला २८ लाखाची " दक्शिणा" दिल्याची श्रद्धापूर्वक सार्थकता वाटत असेल तर मला अत्यानंद आहे. शेवटी सूज्ञपणा वा मूर्खपणा या परिणामसापेक्ष गोष्टी आहेत तशा त्या दृष्टीकोन सापेक्षही .

In reply to by चौकटराजा

स्मशानात मोठा विधी करावयाचा आहे, कोणीतरी करणी केल्यामुळे धन मिळणे थांबले आहे ,करणी उलटली व 10 लाख न दिल्यास प्रेत आणून दारात टाकू अशी आश्वासने आणि धमक्या देऊन पैसे घेणारी व्यक्ती साधू कशी ? साधू या पदवीचे काही निकष असतात का ? माझ्यामते तरी स्वतः दारिद्र्यात जीवन जगत असताना शिवाजीमहाराजांनी आपणहून पाठवलेला नजराणा ज्यांनी आम्ही विठ्ठलाचे भक्त या धनाची आम्हाला जरुरी नाही असे म्हणत परत पाठवून दिला ते संत तुकाराम यांना साधू म्हणता येऊ शकेल ..... संत तुकाराम , एकनाथ, ज्ञानेश्वर , नामदेव यापैकी कुणीही अमुक पूजा करा देव तुम्हाला संपत्ती देईल असे कुणाला सांगितल्याची कथा आजवर वाचनात आलेली नाही किंवा इतके द्रव्य मला द्या मीच ती पूज / विधी संपन्न करतो त्यानंतर तुम्हाला भरपूर धन मिळेल असे सांगितल्याची कथाही कधी ऐकली नाही

In reply to by nishapari

यनावालांच्या मते संत तुकाराम , एकनाथ, ज्ञानेश्वर , नामदेव हे सर्व नास्तिक असणार. घटनेत तसं लिहिलं आहे असा त्यांना अर्थ निघत असणार. ================= आणि हे संत धार्मिक होते हे त्यांना माहित असेल तर यनावालांची विशेषणमाला त्यांना लागू आहेच!

In reply to by arunjoshi123

धार्मिक व आध्यात्मिक, यात आपण करू पाहत असलेली, सरमिसळ पाहून मला वाईट वाटले. संतांचे कार्य आध्यात्मिक.... ज्ञानदेवांना शुद्धीप्रत्रक मागणारे धार्मिक ठेकेदार... यानावाल्यांच्या संयत भाषेला, असं जिंगोइस्टिक उत्तर पाहून निराशा वाटली. असो बाकी चालू द्या..

In reply to by arunjoshi123

संत परंपरा विशाल होण्यासाठी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सर्व संतानी व्यक्ती आणि ईश्वर यामधील मध्यस्थ आणि कर्मकांड नाकारले. व्यक्ती ईश्वराशी सरळ जोडू शकते त्यासाठी मध्यस्थ वा कर्मकांडाची गरज नाही हा नवीन विचार त्याकाळात रुजवला आणि एकाही संताला तत्कालीन समाजव्यवस्थेने सहज स्वीकारले नाही. ज्ञानदेवांना अवघ्या १९ व्या वर्षी समाधी घ्यावी लागली तर तुकोबाचा मृत्यू संशयास्पद राहिला आहे. यातील काही संतांना तर धर्म मानणाऱ्या व्यक्तींनी धर्मविरोधी म्हणून नाकारलेही होते. देवभोळेपणाचा गैरफायदा घेतल्याचे आजही अनेक उदाहरण सापडतील. आसाराम बापू किंवा राम-रहीम ही तर आत्ताची उदाहरणे! त्यांच्या मागे जाणारी जनता श्रद्धावान होती हे नाकारता येत नाही. घोळ केला तो मध्यस्थाने ...म्हणजे आसाराम बापू आणि राम-रहीम सारख्या व्यक्तीने. ...आणि माध्यम वापरले ते लोकांची श्रद्धा! आसाराम बापू आणि राम-रहीम या मध्यस्थांवर विश्वास ठेवून आणि ईश्वरावरील श्रद्धेचा वापर होऊन जनता फसल्या गेली. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवून पुढचे पाउल टाकावे यासाठी तरी चिकित्सा आवश्यक ठरते. जशी विश्वासाची चिकित्सा आवश्यक, तशी श्रद्धेची! वरील नमूद लेखात मांत्रिकाने श्रद्धेचा गैरवापर केला हे नक्की! हा लेखाचा एक गाभा म्हणून बघण्यास हरकत नसावी. दुसरी बाजू श्री. मंदार यांची... ते पूर्वीही सश्रद्ध होते आणि या घटनेनंतरही कदाचित सश्रद्ध राहतील. पण एक व्यक्ती म्हणून श्री. मंदार यांचा विचार केल्यास त्यांची पूर्वीची श्रद्धा आणि या घटनेनंतरची श्रद्धा सारखीच असेल काय?! श्री. मंदार यांचा श्रद्धा सोबत लोभ या दोन्ही भावना होत्या हे नाकारता येत नाही! शिवाय चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आणि चुकीच्या कारणासाठी, हे पण जाणवत आहे.

मुळात अंधश्रद्धा असं काही नाही. असते ती फक्त श्रद्धा. एखाद्या गोष्टीच्या असण्याविषयी, सत्यतेविषयी असलेला विश्वास ज्याला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही म्हणजे श्रद्धा. अंधश्रद्धा हा शब्द चळवळींनी (बहुतेक अंनिसने. नक्की माहिती नाही) जन्माला घातल्या. दैनंदिन जीवनातील, देव विषयक निरुपद्रवी (काही वेळा उपयुक्तही) श्रद्धांसाठी त्यांनी श्रद्धा हा शब्द तसाच ठेवला. तर समाजघातक, हानिकारक श्रद्धेसाठी अंधश्रद्धा हा नवा शब्द जन्माला आला. डॉ. दाभोलकरांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेली पुस्तके वाचली तर या "अंधश्रद्धा" किती भीषण होत्या याची कल्पना येते. अंनिसने याला बराच आळा घातला. कुणी कितीही नाक मुरडले तरी अंनिसने खुप चांगले काम केले आहे या बाबतीत. आता राहिला प्रश्न श्रद्धेचा. श्रद्धा माणसासाठी सहाय्यकारीही असू शकते. देवविषयक श्रद्धा तर बहुतेक वेळा असतेच. देव माझ्या पाठीशी आहे ही कल्पनाही माणसाला संकटाला सामोरे जायला बळ देते. कुणाचा स्वतःवर विश्वास असतो तर कुणाचा देवावर. अशा श्रद्धेला कुणी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र ही श्रद्धा जेव्हा लाउडस्पीकरने बोलू लागते, रस्त्यावर मंडप घालून रहदारीला अडथळा निर्माण करते, ढोल बडवते किंवा कानठळ्या फोडणारे आवाज करणारे फटाके फोडते त्याला कुणी आक्षेप घेतला तर त्यात गैर काहीच नाही. काही लोक श्रद्धेला आक्षेप घेतला की चवताळून उठतात. "तुम्हाला आम्हीच दिसतो किंवा आमचेच दिसते, ते किंवा त्यांचे दिसत नाही" असा आक्षेप हे लोक घेतात. या आक्षेपातच या चिडण्यामागील उत्तर दडलेले आहे. श्रद्धेला विरोध हा व्यक्तिगत न घेता एका विशिष्ट समूहाला विरोध म्हणून घेतला जातो. या व्यक्तींच्या अस्तित्वाविषयी कल्पनांमध्ये (आयडेंटिटी) या समूहांचा एक घटक असण्याचाही समावेश असतो. त्यामुळे एखाद्या समुहाच्या प्रथांना विरोध हा आपल्याच अस्तित्वाला विरोध समजला जातो आणि मग टोकाचा प्रतिसाद येतो.

In reply to by mayu4u

संतुलित आणि नीरक्षीर प्रतिसाद देणार्या धनाजीराव यांचे अभिनंदन सगळ्यांसारखे आपले ही मातीचे पाय आहेत पण ते लपविण्यासाठी अट्टाहास न करणारा सश्रद्ध डोळस नाखु

In reply to by सतिश गावडे

उत्तम प्रतिसाद.
काही लोक श्रद्धेला आक्षेप घेतला की चवताळून उठतात. "तुम्हाला आम्हीच दिसतो किंवा आमचेच दिसते, ते किंवा त्यांचे दिसत नाही" असा आक्षेप हे लोक घेतात.
अबसॉल्यूट श्रद्धेला अनक्वालिफाइड आक्षेप (यनावाला टाईप) घेतला तर मी चवताळून उठतो. नास्तिकतेच्या १०० गोष्टी न पाहता श्रद्धेवर सरसकट टिका योग्य नाही.

In reply to by सतिश गावडे

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक नक्की कसा ठरवायचा? आताच माझ्या कडे एक ५५ वर्षांच्या बाई आल्या होत्या स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्ण आहेत. चौथ्या स्टेजला पोहोचून जेवढे उपलब्ध आहेत तेवढे उपचार टाटा रुग्णालयात झाले आहेत. यजमान रेल्वेत असल्याने ३२ लाख रुपये खर्च रेल्वेने दिला आहे. रोग सर्वत्र पसरला आहे. पोटात छातीत पाणी झालं आहे. आयुर्वेदिक उपचार करुन पाहू या श्रद्धेने त्या माझ्या मित्राकडे उपचारासाठी गेल्या आहेत.त्याने सद्य स्थिती काय आहे यासाठी सोनोग्राफीसाठी त्यांना माझ्याकडे पाठवलं आहे. (या आयुर्वेदाचार्याला आपली क्षमता आणि मर्यादा माहित आहे). आम्ही दोघेही त्यांचा उपचार सवलतीत करत आहोत. आता प्रश्न असा आहे कि अशा "श्रद्धेने" आलेल्या बाईंना सडेतोडपणे सांगायचे का कि हि तुमची श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. कि आपण "प्रयत्न करू" म्हणून त्यांचे काय जे दोन चार महिने शिल्लक आहेत ते ( खोट्या का होईना) आशेवर पण आनंदात जातील याचा विचार करायचा. हे उपचार काही फुकट किंवा स्वस्त नाहीत. आणि त्याचा उपयोग होणार नाही हे त्यांच्या ३० वर्षाच्या मुलाला मी आणि माझ्या मित्राने सांगितले आहे.

In reply to by सुबोध खरे

आता प्रश्न असा आहे कि अशा "श्रद्धेने" आलेल्या बाईंना सडेतोडपणे सांगायचे का कि हि तुमची श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे.
यावर गावडे यांचे मत अत्यंत संतुलित आहे. ----------------- यनावालांचे मते बहुधा वैज्ञानिक सत्य लपवले तर ... ते चूक असावे.

In reply to by सतिश गावडे

कोणीही या जगात पूर्ण चिकित्सावादी नाही की पूर्ण श्रद्धावादी. यस धिस इज बेसिक. श्रद्धा हा प्रत्यक्ष जीवनात घेतलेला शॉर्टकट असतो. काही वेळेस तो अनुभवावर आधारित असतो काही वेळेस स्वकल्पनेवर. चिकित्सा त्यामानाचे कष्टाची व वेळखाउ प्रक्रिया आहे. आपण एखाद्या डॉ. कडे जातो ते कुणाच्या तरी संदर्भाने. ही झाली श्रद्धा . आपण ज्याने आपल्याला विशिष्ट डॉ कडे जायला सांगितले आहे हा याचा खालील प्रमाणे अभ्यास करून निर्णय घेतला तर ती चिकित्सा. १. त्या माणसाला डॉ. कडून काही कमिशन मिळत असेल का .२. तो त्याचा नातेवाईक आहे का? ३.त्याला आलेल्या अनुभवांची जंत्री व संबधित अनुमाने यात काही संबंध आहे का? ४. डॉ ची पदवी खरी आहे का.......... वगैरे. श्रद्धा व चिकित्सा या मनाच्या प्रवासाच्या दोन पध्दती आहेत त्याचा देव, धर्म, सुडो सायन्सेस, नितीमत्ता, तत्वज्ञान याशी निश्चित असा काही संबंध नाही.

In reply to by सतिश गावडे

विश्वास-श्रद्धा-निष्ठा माणसाच्या मेंदूत बुद्धीचा उगम होतो. मानवी बुद्धीचे निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, कल्पनाशक्ती, इत्यादि नऊ घटक आहेत. बुद्धी अमूर्त आहे. तिला वस्तुरूप अस्तित्व नाही. तसेच मेंदूत काम-क्रोध-मद-मत्सर-मोह-दंभ, प्रेम,आनंद, दु:ख अशा अनेक भावनाही उद्भवतात. श्रद्धा हीसुद्धा एक भावना आहे. या सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे. मन अमूर्त आहे. मनाला वस्तुरूप अस्तित्व नाही. पण माणसाच्या ठिकाणी भावनांचे आविष्कार दिसतात. दु:ख झाले की माणूस खिन्न होतो. प्रसंगी रडतो. आनंद झाला की हसतो. या आविष्कारांवरून भावना ओळखता येतात. बुद्धी आणि मन यांचा उद्भव मेंदूत होतो. मेंदू मूर्त आहे. त्याला वस्तुरूप अस्तित्व आहे. जी गोष्ट खरी नाही, तिचा त्याग करणे आवश्यक आहे, हे बुद्धीला कळते पण भावनेला ती सोडवत नाही. अशी गोष्ट भावनेच्या प्रभावामुळे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. थोडक्यात म्हणजे जिची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला कोणत्याही प्रकारे पटत नाही, पटविता येत नाही ती गोष्ट पूर्वग्रहांमुळे केवळ भावनेच्या आधारे खरी मानण्याची तर्कविहीन मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय. "देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. बुद्धीला पटत नसता भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे. विश्वास आणि श्रद्धा यांच्यांशी अर्थ साधर्म्य असलेला "निष्ठा" असा एक शब्द आहे. .विश्वास आणि श्रद्धा यांचा संबंध माणसाच्या विचारांशी आहे तर निष्ठेचा संबंध आचाराशी आहे. (या तीन शब्दांचे अर्थ स्पष्ट करण्य़ासाठी स्वतंत्र लेख लिहिला आहे. तो कधीतरी इथे देईन)

In reply to by यनावाला

या सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे इथेच तर सगळं स्पष्टीकरण फसलं. एखाद्या मानवाला मेंदू, फुफ्फुसं, हृदय ईई अवयव असतात तसं मन कुठे असतं हे कोणी दाखवू शकेल काय? मनाला वस्तुरूप अस्तित्व नसतं म्हणताय पण तरी ते मानायचं मग आत्म्यालाही वस्तुरूप अस्तित्व नसतं मग आत्मा का नाही मानायचा? सगळ्या मानवी भावना लिहिल्यात आणि श्रद्धा ही पण एक भावना आहे म्हणताय, मग सगळ्या माणसांत सगळ्या भावना सारख्याच प्रमाणात असाव्यात हा अट्टाहास का? एखादी व्यक्ती जशी सतत चिडकी असते तर काही आनंदी असतात. तसंच काही व्यक्ती श्रद्धाळू असतात हे का मान्य होत नाही? या सर्व भावना सतत कमी जास्त होत असतात. एखादी श्रद्धाळू व्यक्ती काही कारणाने अश्रद्ध होऊ शकते आणि उलटही होऊ शकतं. भलेभले डॉक्टर सुद्धा एखाद्या क्रिटिकल पेशंटसाठी सर्व प्रयत्न करून झाल्यावर आता सर्व देवाच्या हातात आहे म्हणतात. अश्या पेशंटचे आयुष्यभर देवाला नावं ठेवणारे वडील सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा देवापुढे हात जोडताना दिसतात. वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे अतिशय अडचणीत असताना देव माझ्या पाठीशी आहे ही भावनाच कित्येकांना विपरीत परिस्थितीतून तारून नेते. माझ्याकडे माझे स्वतःचे असे काही अनुभव आहेत की जे कुठल्याही स्पष्टीकरणापलीकडचे आहेत. दुर्दैवाने त्यावेळेला कॅमेरा असण्याएवढी ऐपत नसल्याने तुम्ही ज्याला प्रूफ मानाल असं काही नाहीये. पण अनुभव म्हणून सांगू शकतो. आणि हो त्यातले काही अनुभव जसे प्रूफ न दाखवता येण्यासारखे आहेत तसेच काही (सोय असती तर) प्रूफ दाखवता आले असते असे आहेत. वर तुम्ही ज्याचे उदाहरण दिले आहे त्यातला बाबा म्हणजे एक भामटा आहे आणि त्याला फासलेला एक लोभी मूर्ख मनुष्य आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे त्याने माणसावर श्रद्धा ठेवली आहे देवावर नव्हे. नेहमीप्रमाणे या प्रतिसादाला तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा नाही पण निदान वाचाल तरी अशी अपेक्षा ठेवतो.

In reply to by यनावाला

"देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? जिथे विश्वास असतो तिथे श्रद्धेची आवश्यकता नाही.... हे वाक्य खूप आवडले. जी गोष्ट सिद्ध झाली तिथे विश्वास असू शकतो...

In reply to by सतिश गावडे

यनावाला म्हणतातच श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक म्हणजे एक शब्द दोन अक्षरी आहे तर दुसरा चार अक्षरी. मला गंमत वाटते कि मराठीत आपण अंधश्रद्धा म्हणतो पण हिंदीत त्याला अंधविश्वास म्हणतात. श्रद्धा हा शब्द खर तर हिंदीत देखील आहेच की! दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप." "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात" आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे. [आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते. परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे') आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे. तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

In reply to by प्रकाश घाटपांडे

मराठीत आपण अंधश्रद्धा म्हणतो पण हिंदीत त्याला अंधविश्वास म्हणतात. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही पूर्णत: सहमत. छान मांडणी केली आहे...चिकित्सा अतिशय महत्त्वाची आहे...

In reply to by प्रकाश घाटपांडे

श्रद्धा - अंधश्रद्धा वगैरे पसार्‍याबद्दल नो कमेण्ट्स. त्या घोळात शिरायचच नाहि. वर कुठेतरी भावना, तर्कबुद्धी वगैरे भानगडी वाचल्या. त्याबद्दल एक अवांतर... मानवी जीवनात, किंबहुना कुठल्याही जीवंतपणात, भावनेचा रोल तर्कबुद्धी, चिकीत्सा वगैरे भानगडींपेक्षा फार मोठा आणि सखोल आहे. आपलं आजपर्यंतचं सर्व्हायव्हलच मुळी भावना नामक सिस्टीममुळे झालय. पुढेही यात बदल होण्याचे चान्सेस शुण्य आहेत. जीवनाचा एक यःकश्चीत भाग जाणिवेच्या कक्षेत येतो आणि त्यापेक्षाही लहान भाग तर्कबुद्धीच्या परिघात येतो. जीवन एक अखंड साखळी आहे. त्यातल्या एक-दोन लिंक्स तर्कबुद्धीच्या कक्षेत येतात. त्या लिंक्सच्या अलिकडे-पलिकडे जीवन नावाची ऑर्गेनीक प्रोसेस अत्यंत ऑर्गनाइज्ड पद्धतीने चाललेली असते व ती भावनेनेच सपोर्टेड असते. तर्कबुद्धीला उगाच स्ट्रेच करुन भावनांना दुय्यम समजणं म्हणजे नळाची तोटी फिरवणे तहान लागण्यापेक्षा जास्त महत्वाचं मानण्यासारखं झालं. भावना विश्व (इन्क्लुडींग श्रद्धा) हे जगण्याचं मेकॅनीझम आहे व तर्कबुद्धी जगण्यातली चैन आहे. समाजसुधारणेच्या नावाखाली आपला इगो गोंजारताना आपण ज्या फांदीवर बसलो आहोत तिच्यावरच कुठाराघात करणारी शेखचिल्ली वृत्ती फायद्याची तर नाहिच, प्रसंगी नुकसान करणारी आहे. असो.

In reply to by अर्धवटराव

तर्कबुद्धीला उगाच स्ट्रेच करुन भावनांना दुय्यम समजणं म्हणजे नळाची तोटी फिरवणे तहान लागण्यापेक्षा जास्त महत्वाचं मानण्यासारखं झालं.
:) विवेचब आवडले.म्हणून तर आयक्यू बरोबर ईक्यू देखील तितकाच महत्वाचा आहे

In reply to by अर्धवटराव

भावना विश्व (इन्क्लुडींग श्रद्धा) हे जगण्याचं मेकॅनीझम आहे व तर्कबुद्धी जगण्यातली चैन आहे. वाह ! जोरदार टाळ्या !!!

इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा.
बोंबला!! माझ्या मते, हा मुर्खपणा अधिक आहे अंधश्रद्धेपेक्षा.

असे असु शकेलं का, हा प्रकार बुआ-बाजीचा नसुन बुआ आड लपलेला money laundering आणि तत्सम व्यवहार असेलं, वचन पुर्तता होत नाही म्हणंटल्या वर बुआ-बाजीची केस टाकली असणार...... कारण रक्कम मोठी आहे आणि इतकी रक्कम हाताळणारा मुर्ख असेल असे वाटत नाही

In reply to by दीपक११७७

मी हेच टायपायला घेतले होते तेवढ्यात तुमचा प्रतिसाद पडला. मला सुद्धा याचीच जास्त शक्यता वाटते आहे.

In reply to by विशुमित

श्रद्धाळू लोक हवाला व्यवहार करतात असं वैद्य या माणसाबद्दल वाचून यनावाला तसंही म्हणतील. काय सांगावं. ====================== त्यांनी लेखात उभा केलेला पायस बिझनेसमॅन मूळात तसा नाहीच.

In reply to by विशुमित

एकमत झाले आपले

In reply to by चांदणे संदीप

हा हा. बेकार लोकांचे स्फूर्तिस्थान ठरू शकतात.

यनावाला, तुम्हांस पुनर्जन्म मान्य आहे का? सुमारे पन्नास वर्षांपूर्वी विज्ञानवादी पुनर्जन्म हे थोतांड मानंत असंत. मात्र आज डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी पुनर्जन्मावर अनेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. मग पुनर्जन्म खरा मानणं ही श्रद्धा की अंधश्रद्धा? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नाही. पुनर्जन्मावर माझा तिळमात्र विश्वास नाही. प्रत्येक सजीवाचा एकच जन्म असतो. पहिला आणि शेवटचा तोच. पूर्वजन्म नाही. पुनर्जन्म नाही. ...यनावाला

In reply to by यनावाला

यनावाला, तुमचा पुनर्जन्मावर तिळमात्र विश्वास नाही ते तुमचं वैयक्तिक मत झालं. मात्र इतरांनी असा शोध घेतलेला आहे. डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी पुनर्जन्माच्या प्रकरणांवर प्रत्यक्ष माहिती जमवली आहे. त्यांनी त्यावर अनेक पुस्तकं लिहिली. त्यापैकी एक पुस्तक हे आहे : https://www.amazon.co.uk/Children-Remember-Previous-Question-Reincarnat… मग पुनर्जन्म ही वस्तुनिष्ठ घटना का माणू नये? आ.न., -गा.पै.

In reply to by अनन्त्_यात्री

अनन्त्_यात्री, घटना स्वयंसिद्ध असली तरी दिसली पाहिजे ना. उद्या सूर्योदय झाला तरी मी डोळे झाकून तो उगवलाच नाही अशी बतावणी करू शकतो ना? मग लोकांना स्वयंसिद्ध घटना वस्तुनिष्ठपणे मला पटवून द्यावी लागेल. यनावाला यांचा स्वयंसिद्ध घटनेवर विश्वास नाही. म्हणून हा खटाटोप. आ.न., -गा.पै.

लेखातल्या काही गोष्टी पाटल्या काही नाही. मला हि केस "३ लाखाची गादी" किंवा ते काही लाखाचं "इच्छा पूर्ती यंत्र ", किंवा एमवे टाईप चेन मार्केटिंग मधली वाटली. सगळं असताना सुद्धा मोहापायी माणूस फसत जातो त्याचं उदाहरण वाटलं. कमीत कमी कष्टात / पैशात जास्तीत जास्त फायदा घेणं या विचारामागे "श्रद्धा / अंधश्रद्धा" पेक्षा "मोह/ हाव /भीती " आहे असं वाटतं. एमवे टाईप चेन मार्केटिंग मध्ये एवढ्या पैशांना (कितीतरी जास्त पैशांना ) फसलेली लोक जगभर सापडतील.

In reply to by वीणा३

कधी भुरळ तर कधी अज्ञात कारणामुळे मती कुंठीत होते. माझ्या अंनिस तल्याच मित्राला एका भामट्याने फोन वरुन एटीएम कार्डाविषयी माहिती विचारुन घोळात घेउन त्याच्याकडून पिन काढून घेतला होता. आता याने वर्तमान पत्रात याविषयी अनेक बातम्या वाचल्या होत्या, मी स्वतः त्याला अनेकदा अशा गोष्टींपासून सावध रहा असे सांगितले होते. काही काळानंतर तो भानावर आल्यावर नंतर बँकेत जाउन कार्ड ब्लॉक केले.

इथे यनावाला आणि अनेक वाचकांनी माझे त्यांना विचारलेले प्रश्न दुरुद्देशप्रेरित आहेत असा अर्थ काढला आहे. आपल्या नास्तिकत्वासाठी आणि पुरोगामीत्वासाठी अनेक शुभेच्छा. व्यक्तिकेंद्रित आरोपांवर धागा केंद्रित झाल्यामुळे माझा रामराम.

मृत मुलाला जिवंत करण्याचा प्रयत्न, १० दिवसांपासून मृतदेह चर्चमध्ये कुणीतरी वरील बातमीचा उपयोग करुन किरिस्ताव कसे अंधश्रद्धाळू असतात असा एखादा उपदेशात्मक / विडंबनात्मक लेख पाडा रे ! अगदी यनावाला स्टाईलमधे. म्हणजे लेखकाचे नाव वाचले नाही तर लेख यनावाला साहेबांचाच वाटला पाहिजे. बघूया कोण उचलतो हे शिवधनुष्य ! (सॉरी, सॉरी क्रॉस !)

In reply to by धर्मराजमुटके

नक्कीच असा लेख वाचायला आवडेल! बातमीतील शेवटचे वाक्य - अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी नागपाडा पोलिसांकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे, रोचक वाटले! लगे रहो, अंनिस.

यनावाला सर, कितीही टोकाचा बुध्दीप्रामाण्यवादी असला, तरी मानवप्राणी पूर्णपणे अश्रध्द असणे अश्यक्य अाहे, हे मला अाता पटू लागलेले अाहे. त्याचे अगदी चांगले स्पष्टीकरण थोड्याशा वेगळ्याच विषयासंबंधी वाचताना मला मिळाले. युवाल हरारी यांचे होमो सेपियन्स हे पुस्तक तुंम्ही जरूर वाचा असे सुचवतो. त्यात मानवाने उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर जी हनुमानउडी मारली, त्याविषयी एक अख्खे प्रकरण अाहे. त्याचे नांव अाहे: इंटर सब्जेक्टीव रियालिटी. त्याचा थोडक्यात गोषवारा असा, की मानवांत परस्पर सापेक्ष वस्तुस्थिती (reality) निर्माण करण्याची क्षमता जेव्हा अाली, तेंव्हा मानवाने इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रचंड मोठी हनुमानउडी मारली. या रियालिटीवर अनेक मानवांचा विश्वास बसू शकला व त्याचमुळे मानव प्रचंड मोठ्या संखेने सहकार्य करू शकला व इतर एकेकट्या प्रचंड मोठ्या प्राण्यांवरही अधिकार गाजवू शकला, उत्क्रांतीच्या प्रवाहात तग धरू शकला. उदा. चिंपांझी एकमेकांशी ‘मी उद्या तुला केळे देतो, त्यामुळे अात्ता मला तू मदत कर’ या प्रकारे भविष्यातील शक्यतेवर विश्वास ठेऊन परस्पर व्यवहार करू शकत नाहीत, पण माणूस मात्र करू शकतो. खरे तर ‘उद्या मिळणारे केळे’ ही absolute वस्तुस्थिती नाही, ती केवळ या दोन माणसांमधील सब्जेक्टीव्ह रियालिटी अाहे, पण ती काम करते. मानवी व्यवहार त्यावर हजारो वर्षे चालत अाले अाहेत. त्यामुळे मानवाला एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी ती गोष्ट अाज अात्ता प्रत्यक्षात समोर अस्तित्वात असायची गरज नसते. त्याचमुळे व्यवहारात ही श्रध्दा असतेच. पैसे हे याचे उत्तम उदाहरण अाहे. जरी भारताच्या रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरची नोटेवर छापील सही असली, तरी कोणीही ते मूल्य मागण्यासाठी त्यांच्याकडे जात नाही. त्या अर्थाने ती नोट प्रत्यक्ष प्रमाणाने सिध्द न होता केवळ सर्वजण त्यावर विश्वास ठेवत असल्याने काम करते. दुसरे म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वत: सिध्द केल्याखेरीज वापरणारच नाही, असे अापण जगूच शकत नाही. याकरता प्रत्येक गोष्टीची चिकीत्सा करावी लागेल, व ते केवळ अशक्य अाहे. या जीवनपध्दतीत श्रध्देचे संपूर्ण उच्चाटन होणे शक्य नाही. फक्त घातक, फसवणूक करणार्या गोष्टींवर विश्वास ठेवणे टाळता येऊ शकेल, तेही प्रत्येकाला सर्व वेळेस नाही. अापण सांगितलेली वरील गोष्ट ही अशा फसवणूकीचे एक उदाहरण अाहे. त्यात देवाचा, अार्थिक माॅडेल्सचा किंवा विज्ञानाचाही (उदा. डीडीटी किंवा रासायनिक खते वापरण्यामागे असलेली श्रध्दा) वापर होऊ शकला असता.

In reply to by स्वधर्म

कितीही टोकाचा बुध्दीप्रामाण्यवादी असला, तरी मानवप्राणी पूर्णपणे अश्रध्द असणे अश्यक्य अाहे, हे मला अाता पटू लागलेले अाहे. अता मी माझ्या प्रतिसादात जे म्हटले आहे ना ते तुम्हाला उमगलेले दिसतेय. पण मी पुढे म्हणतो देव धर्म अस्तिक नास्तिक ईई शीच श्रद्धा व चिकित्सा यांचा सम्बन्ध आहे असे नाही तर या दोन मार्गानी आपले सारे आयुष्य व्यापलेले आहे. त्या दोन मानसिक प्रवासाच्या अवस्था आहेत. चिकित्सा हरघडी करून आयुष्य क्रमणे शक्य नसल्याने श्रद्धा ( कल्पनेने साकारलेली म्हणा हवंतर ) विश्वास ( अनुभवाने साकारलेला म्हणा हवंतर ) यांचा वापर करावाच लागतो. मी तो करतो व त्यामुळे आयुष्यात क्वचितच पस्तावाची पाळी आलेला असा माझा मी उल्लेख करू शकतो. नो लाईफ इज फ्री फ्रॉम गॅम्बल !!

In reply to by स्वधर्म

स्वधर्म सहमत आहे. आमचे मित्र राजीव साने यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ऐवजी अंधश्रद्धा निवारण समिती असा शब्दप्रयोग सुचवला होता.

१) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.) ३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.) तुम्ही केलेले वर्गीकरण आवडले. काही संमिश्र भावना या श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्हीतून निर्माण होतात. आमच्या एका मैत्रिणीच्या वडिलांचे अकाली निधन झाले. भाऊ नसल्याकारणाने तिने अग्नी द्यावा असे आम्हा मित्र-मैत्रिणींचे मत होते. त्याला तिची तयारीही होती पण शेवटच्या क्षणी नातेवाइकांनी 'मुलीने अंत्यसंस्कार केल्यास वडिलांच्या आत्म्यास शांती लाभणार नाही आणि त्यास तू जबाबदार असशील. शिवाय "आपल्या" समाजात मुली/स्त्रिया स्मशानात जात नसतात' म्हणून तिला त्यापासून रोखलं. खरतर तीचे वडील तिच्या आणि त्या गावातील सर्व लोकांच्या मानाने वैचारिक दृष्ट्या पुढारलेले होते. ज्यागावात १० वी होणे मुलींसाठी उच्च शिक्षण होते आणि लग्नाची तयारी होते त्यावेळेस त्यांनी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी मुलीला पाठवले. कदाचित काका अधिक जगले असते तर त्यांनी शेवटची इच्छा म्हणून मुलीकडून अंत्यसंस्कार करवून घेण्याची व्यक्त केली असती. "आत्माशांती' चा उल्लेख करून अंत्यसंस्कार करू न देणाऱ्या किती नातेवाइकांनी नंतर 'मदत' केली हे ही अनुभवले. मुलाने एखादी बाब केली तर योग्य आणि मुलीने केली तर ती अयोग्य ही पारंपारिक विचारसरणी एखाद्याला सरणावर नेतानाही कायम असावी हे खचितच मनाला त्रासदायक आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या 'आत्म्याचे' माहिती नाही पण जिवंत माणसाला मात्र नंतर मरेपर्यंत रुखरुख लागून राहते! भयोद्भव श्रद्धेमुळेही अनेक व्यक्ती बदल्याण्यास कचरतात आणि योग्य निर्णय होऊ शकत नाहीत. तुमचा लेख आणि वर्गीकरण आवडले.

In reply to by Duishen

भयोद्भव श्रद्धेमुळेही अनेक व्यक्ती बदल्याण्यास कचरतात आणि योग्य निर्णय होऊ शकत नाहीत.>>> ==>> या वाक्याने यानावालांचा लेख सार्थकी लागला. बाकी या धाग्यावर तुमच्या एन्ट्रीने यानावालांचा रानरेट चांगलाच वाढला आहे.

Duishen,
गामा जी, एक समजले नाही...देवधर्म ही संकल्पना व्यापक नाही असे आपले मत आहे का?...आणि जर व्यापक आहे तर देव-धर्मापुरत "मर्यादित" कसे असू शकेल?
चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर प्रश्नांतच दडलेलं आहे. धर्म ही संकल्पना अतिशय व्यापक आहे. सृष्टीच्या कुठल्याही अंगाकडे लक्ष देऊन बघितलं तर त्यास धर्म आहेच. त्यामुळे यनावाला ज्याला अंधश्रद्धा म्हणतात त्यादेखील सर्व सृष्टीत कमीअधिक प्रमाणावर उपस्थित आहेत. अशा अंधश्रद्धा जेव्हा उपासनेचं रूप घेऊन येतात तेव्हा त्यातून बुवाबाजीचं प्रस्थ वाढतं. त्यामुळे यनावाला जे बुवाबाजीच्या विरोधात रान उठवतात ते योग्यंच आहे. मात्र असं करतांना अंधश्रद्धा आणि खरीखुरी उपासना यांत रेघ मारायला विसरतात. यावर उपाय म्हणजे यनावाला यांनी इतर क्षेत्रांतल्या अंधश्रद्धा व सत्ये हुडकून त्यांच्यामध्ये रेघ मारायचा सराव करणे हा होय. यनावालांच्या प्रयत्नांस व्यापक स्वरूप यावं हा माझा आग्रह अशा अर्थी आहे. जरी धर्म व्यापक व सर्वस्पर्शी असला तरी उपासना (= अध्यात्मिक साधना) प्रत्येक व्यक्तीपुरती मर्यादित आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मुद्दा पुन्हा त्याच बाबींकडे येतो आहे देव-धर्म या व्यापक (आणि सर्वस्पर्शी) संकल्पना आहेत तर इतर कुठलेही क्षेत्र घेतले तर ते या संकल्पनांपासून मुक्त असू शकणार नाही. त्यामुळे एखादी रेष मारून ते विभाजन करणे खूप अवघड. काही बाबी या सार्वकालिक आणि सर्व जागांवर चूक असू शकतात; उदा: स्त्री-पुरुष भेदाभेद, जात, धर्म, प्रादेशिकता, राष्ट्रवाद यावरून भेदाभेद तर बऱ्याच बाबी ह्या बरोबर किंवा चूक यांच्या सीमा रेषेवर असतात... याची तर भरपूर उदाहरणे आहेत...यावर चर्चाही होत आहेत. धर्मासोबत असणाऱ्या कर्मकांडांचा भाग असेल तर चर्चा, वाद, प्रतिवाद टाळता न येण्यासारखे! पण अध्यात्म म्हणून स्वत:पुरते ठेवले तर त्याचा इतरांना त्रास होणार नाही हे नक्की.

In reply to by Duishen

एक साधा सरळ विचार आहे, तो सांगतो आम्हाला शिकवलेला. जो गुरू आपले फोटो स्वतः विकतो, मी देव आहे असे उच्चरवाने सांगतो, येता जाता चमत्कार करतो , आणि पैसे घेऊन अनुग्रह/समाधान देतो, तो गुरू नव्हे. अश्या माणसाकडे एखादी सिद्धी, जुगाड किंवा गेलाबाजार हातचलाखी आहे असे समजून जावे. ज्यांना अध्यात्म खरेच समजले आहे अशी माणसे अत्यंत प्रसिद्धीपरांगमुख, बऱ्याच वेळेस जवळजवळ माणुसघाणे म्हणता येईल इतकी अंतर्मुख असतात, अश्या माणसांना शोधणे फार कठीण असते, क्वचितच एखादे संत ईश्वरेच्छा म्हणून लोकसंग्रहाच्या वाट्याला जातात. बाकी कर्मकांड हा ईश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग नव्हे याबद्दल सगळ्या संतांचे एकमत आहे, पण याचा अर्थ कर्मकांडात शक्ती नाहीच असे नाही. अर्थात तो या लेखाचा विषय नाही म्हणून यावर मतप्रदर्शन टाळतो. पण व्यवहाराचे नियम काळाप्रमाणे बदलत असतात, आणि ते तसे बदलले पाहीजेतच याबद्दल दुमत नसावे. शेवटी आपल्याला चांगला समाज बनायचे आहे.
काही बाबी या सार्वकालिक आणि सर्व जागांवर चूक असू शकतात; उदा: स्त्री-पुरुष भेदाभेद, जात, धर्म, प्रादेशिकता, राष्ट्रवाद यावरून भेदाभेद
जगात सार्वकालिक चूक आणि बरोबर काहीही नसते, आपण एक समाज म्हणून उत्क्रांत होत आहोत. तुम्ही ज्या गोष्टी मांडल्यात त्या जेमतेम 100 वर्षांपूर्वी बरोबर मानल्या जात होत्या. कशावरून यामध्ये आजच्या काही गोष्टी वाढणार नाहीत? उदा.मांसाहार. (किंवा शाकाहार) त्यामुळे आपला परीघ खूप छोटा आहे आणि आपण आपल्या काळाचे अपत्य आहोत एव्हढी जाणीव ठेवणे पुरेसे आहे.

In reply to by आनन्दा

जो गुरू आपले ...तो गुरू नव्हे. या मताशी सहमत! ज्यांना अध्यात्म खरेच समजले आहे ...अश्या माणसांना शोधणे फार कठीण असते या मताशीही सहमत! बाकी कर्मकांड हा ईश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग नव्हे.. मला असं वाटत की अध्यात्मात कर्मकांड नसावे आणि धर्मात कर्मकांड आहे. अध्यात्मात साधना असते. तीन भरतीय महनीय व्यक्तींची उदाहरणे घेऊ.. १. महावीर जैन २. गौतम बुद्ध ३. शंकराचार्य या तीनही व्यक्तींनी साधनेतून मिळवले ते एक एक व्यक्ती म्हणून मिळवले आहे. तिथे जमावही नव्हता किंवा कर्मकांडही नाही. सर्वच सामान्य (संसारिक) माणसाला असे एकटे राहून शक्य नाही म्हणून त्यांनी आपापले संघही तयार केले. पण त्यात कर्मकांड घुसले... जर कर्मकांड वजा केले तर आस्तिक किंवा धार्मिक म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींचाच अधिक फायदा आहे असे मला वाटते... पण जेंव्हा कर्मकांड म्हणजेच धर्म अशी व्याख्या होऊ लागते तेंव्हा प्रगतीचा मार्ग खुंटतो असे माझे मत आहे. आणि आजच्या काळात स्पर्धात्मक कर्मकांड वाढत आहे असे माझे निरीक्षण आहे. जगात सार्वकालिक चूक आणि बरोबर काहीही नसते, आपण एक समाज म्हणून उत्क्रांत होत आहोत. समाज म्हणून उत्क्रांत होत आहोत... अंशत: मान्य कारण उत्क्रांतीचे पैलू /पातळ्या विविध आहोत. उदा: ज्या काळात सतीप्रथा होती त्याचकाळात इतर जातीत विधवा पुनर्विवाह सामान्य होते. याचा अर्थ ज्या पुण्यात रमाबाई सती गेल्या त्याच पुण्यात इतर जातीतील विधवा महिलांचे पुनर्विवाह करण्याची परंपरा होती. याचा अर्थ काही समाज उत्क्रांत होता काही समाज प्रतिष्ठित असूनही उत्कांत नव्हता असे जाणवते... म्हणून भेदाभेद करणे हे धार्मिक लक्षण / सामाजिक / पारंपारिक लक्षण काळाच्या कसोट्यांवर अयोग्यच आहे. असो. या विषयावर कधी एखादा धागा आल्यास सविस्तर बोलू! श्री. मंदार यांच्या उदाहरणातही अध्यात्म तर नक्कीच नव्हते! श्रद्धा, विश्वास, लोभ या सर्वांचा तो परिपाक आहे. विश्वास ठेवायचा की नाही याचा माणसे सतत विचार करतात पण श्रद्धा ठेवायची की नाही हा सतत विचार केल्या जात नाही. श्री, मंदार यांच्या उदाहरणात लोभामुळे श्रद्धा निर्माण झाली असे वाटत नाही कारण तसे असते तर त्यांची श्रद्धा सतत बदलती राहिली असती... पण इथे श्रद्धेतून लोभ निर्माण झाला असे जाणवते.. श्रद्धा आहेच पण या श्रद्धेच्या माध्यमातून आपण अधिकचे आर्थिक फायदे मिळवू शकतो असा तो लोभ निर्माण झाला असणार!

जो गुरू आपले फोटो स्वतः विकतो, मी देव आहे असे उच्चरवाने सांगतो, येता जाता चमत्कार करतो , आणि पैसे घेऊन अनुग्रह/समाधान देतो, तो गुरू नव्हे. अश्या माणसाकडे एखादी सिद्धी, जुगाड किंवा गेलाबाजार हातचलाखी आहे असे समजून जावे.
छ्या छ्या, असं कसं? प्रायनावालीय तर्काप्रमाणे "भारतात हजारो विद्यार्थी सरकारी मान्यता नसलेल्या पण तसे खोटे भासवणार्‍या, सरकारी नोकरी मिळण्यास निरुपयुक्त शैक्षणिक संस्थांतून शिकून आपली वर्षे, पैसे वाया घालवतात" म्हणून शिक्षण ही संकल्पना समाजविघातक ठरते. सबब लोकांनी आपापल्या प्राध्यापकपदाच्या नोकर्‍या सोडून दिल्या पाहिजेत.

Duishen,
त्यामुळे एखादी रेष मारून ते विभाजन करणे खूप अवघड.
नेमक्या याच कारणासाठी साधना आवश्यक आहे. मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो. खरा कोण आणि खोटा कोण हे ओळखता आलंच पाहिजे. आ.न., गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला वाटल यासाठी चिकित्सा आवश्यक आहे. मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो. खरा वैज्ञानिक कोण व छद्मवैज्ञानिक कोण हे ओळखता आलच पाहिजे

In reply to by प्रकाश घाटपांडे

खरा वैज्ञानिक कोण व छद्मवैज्ञानिक कोण हे ओळखता आलच पाहिजे +१०० छद्मवैज्ञानिकी म्हणजे वैज्ञानिक बुरख्याआडची बुवाबाजीच !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टर सुहास म्हात्रे, आता एक सांगायला हरकत नाही की विज्ञान ( = सायन्स) आणि स्याद्विज्ञान ( = सुडोसायन्स) यांच्यात निश्चित सीमारेषा नाही. तात्विक सीमाप्रश्न गेले निदान शतकभर तरी वैज्ञानिक आणि तत्त्ववेत्त्यांना छळंत आला आहे. यानुसार विज्ञान (science), अविज्ञान (non science), स्याद्विज्ञान (pseudo science), तत्त्वज्ञान (philosophy), परस्परसंबंधविज्ञान (religion), अधिभौतिकी (metaphysics) या सर्वांत सुस्पष्ट सीमारेषा नाही. मात्र असं असलं तरी प्रयोग करून निष्कर्ष काढावेत हे जवळजवळ सर्वमान्य आहे. सांगायचा मुद्दा काये की कोणी वैज्ञानिक असो वा अध्यात्मिक साधक असो, स्वत:शी कितपत प्रामाणिक आहे हे महत्त्वाचं. आ.न., -गा.पै.

सायंटॉलॉजी रेफ, टॉम क्रूझ... या धर्माला काय म्हणणार ?? छडमविज्ञान ? की श्रद्धा ???

तथाकथित श्रद्धाळूंच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा लेख. मुळात मंदार वैद्य नामक व्यक्ती कारखानदार आहे. 28 लाख रुपये देण्याइतपत तो आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. या माणसाला हिशेब कळतो, तसे पैसा कसा कमवायचा तेही उत्तम कळते. अक्षय धनाचा कुंभ देणारा सागरनाथ नावाचा बुवा त्या बदल्यात सुरुवातीला 9 हजार रुपये मागत होता, त्याच वेळी मंदार वैद्यांना प्रश्न पडायला हवे होते. ते म्हणजे अक्षय धनाचा कुंभ आहे तर या बुवाने तो स्वतःसाठीच का वापरला नाही, दुसरे म्हणजे 9 हजार रुपये हवे होते, तर वैद्यांनी त्याला त्या कुंभातून तू हवे तेवढे काढून घे आणि जमले तर मलाही दे, असं तरी म्हणायला हवं होतं. कारण वैद्य व्यावसायिक आहेत. फायद्याचं त्याला कळतं. उगाच कारखानदार झाला नसता. बरं 28 लाख रुपये गमावल्यानंतर श्रद्धेच्या धुंदीतून वैद्यबुवा बाहेर आले... कमाल आहे, इतका आंधळा कारभार करणारा हा माणूस कारखानदार म्हणून कसा टिकला हेच कळत नाही.. मला वाटतं, वैद्यांपेक्षा सागरनाथ जर कारखानदार असता तर त्याने वैद्यांपेक्षा चांगला व्यवसाय केला असता... असो, यनावाला यांनी श्रद्धा आणि विश्वास याचं उत्तम विश्लेषण केलं आहे... त्याबद्दल त्यांना 100 पैकी 100...

खरे साहेब यांचि प्रतिक्रिया वाचुन आश्च् र्य वातले . यनावाला सर तुम्हि लिहित रहा. आम्हाला तरि तुमचे मत बरोबर वाट्ते आहे.