आठवणीतला घरचा मेवा -१
एकाने ऑफीसमध्ये फुटाणे घेऊन आला होता, चार वाजता खायला. ते विकत आणलेले नव्हते हे स्पष्ट दिसत होते . कोठून भाजून आणले रे ? मी विचारले. सासुरवाडीकडून आलेत , तो म्हणाला . अर्थातच मला पूर्वी कधीतरी आईने केलेल्या अगदी तशाच फुटण्याची आठवण आली . हरभरे, हळद , मीठ घालून रात्री आई हरभरे भिजवायची . सकाळी त्यातले पाणी काढून दुरडीत नितळत ठेवायची . मग थोडे सुकवून चार वाजता पिशवीत बांधून ते भट्टीत भाजायला द्यायची , कोणीच भट्टीत घेऊन जायला मिळाले नाही तर सरळ तव्यावर भाजून घ्यायची . डबाभर फुटाणे तयार , फुटण्याच्या बरोबरीने शेंगदाणे पण खारवले जायचे . आठवडी बाजारातून चिरमुरे आणलेले असायचे . असाच वर्षभराच्या पोहे करण्याचा पण एक कार्यक्रम असायचा . त्यासाठी भात (शिजवलेला नव्हे, तांदळाचे कोंडयासहित दाणे ) भिजवले जायचे . ते हे असेच सकाळी दुरडीत निथळूवुन भट्टीत दिले जायचे . कच्चे का भाजके हे त्या भट्टीवाल्याला बरोबर सांगितले जायचे . कच्चे असतील तर कांदे पोह्यासाठी डब्यात साठवले जात . जे भिजवल्यावर त्याचा लगदा होत नसे तर थोडा वेळच लागे भिजायला . पण पोहे अगदी मस्त सुटे सुटे , आताच्या पोह्यांना थोडे जास्त भिजवले कि लगदा होतो . भाजक्या पोह्यांना मात्र धोतरात बांधून आपटले जाई , त्यातील रेती निघण्यासाठी . राहिलेली कुनगुटं काढून मग चिवडा असायचा . दिवाळीला असेच भात भिजवून , भट्टीत भाजलेल्या पोह्याचा चिवडा असे . ह्यातलं काहीही मूठ मूठ भर खाता येई . पण मूठभरच मिळत एकावेळी .
ह्या फुटाण्यांनी माझ्या आठवणी चांगल्याच उकलल्या आणि आई काय काय बनवायची ते आठवायला लागले . उन्हाळ्यात तर खाण्याची रेलचेल असे . फेब्रुवारी मार्च पासून उन्हाळी कामे चालू व्हायची .त्यात खपली गहू भिजवून ठेवले जात . आता बाजारात ४०० रुपयाचे ५ किलो खपली गहू येतात . असो . खपली गहूच का तर त्याचा कोंडा कमी निघतो म्हणून . तीन चार भिजवायचे . रोज पाणी काढायचे . नंतर चीक काढायचा .इथपर्यंत हे सर्व प्रकरण वासाने नको व्हायचे . घरभर तो आंबूस वास येत राही . चीक काढून तो पातेल्यात ठेवला जाई . चीक काढणे हे प्रकरण फार किचकट असे . ते गहू पाट्यावर उपसून त्याला फोलार फोलार वाटायचे जेणेकरून कोंडा वरती राहील व आतला चीक बाहेर येईल. पुन्हा ते वाटलेलं मिश्रण मोदकपात्रात (स्टीलची चाळणी ) घेऊन त्यावर पाणी ओतून गहू थोडे किवचायचे. राहिलेला कोंडा नीट सुखवून ठेवायचा . त्याच्याही नंतर कोंड्याच्या पापड्या करत कमीत कमी पायलीभर(पाच किलो) गहू भिजवले जातच. निदान अर्धा दिवस हा चीक काढायला लागेच . मग तो चीक निवळायला ठेवला जाई पूर्ण रात्रभर . सकाळी वरचे सर्व पाणी काढून जेवढे सत्व शिल्लक राहील तेवढेच पाणी उकळायला ठेवे. पाणी उकळले कि मीठ टाकून तो चीक हळूहळू ओतणे . नंतर मात्र सुगरणीचा कस लागे . सर्वात अवघड काम म्हणजे चीक हाटणे . अजिबात गाठी झाल्या नाही पाहिजेत . आई घामाघूम होऊन जाई . चीक व्यवस्थित शिजला तर ठीक नाहीतर कुरडयांचे तुकडे पडतात . जास्त घट्ट झाला तर कुरडया पाडायला खूपच जड जाते . नंतर पाटावर धोतर किंवा प्लास्टिक शीट टाकून कुरडया पाडणे . सर्वात मजा वाटीत घेऊन शिजलेला चीक आणि शेंगा खाणे .स्वर्गीय सुख असते ते. आताही त्याची चव तोंडात रेंगाळतीय . तो पाट , खाट जे काय असेल ते उन्हात ठेवून वाळवणे . त्यासाठी राखण बसायचेच म्हणजे दिवसभर हळूहळू सुखत चाललेली कुरडई खाणे . अरे हो , खरवड राहिलीच कि , पातेले रिकामे झाल्यावर खाली राहिलेल्या खरवडीचे सांडगे ते बिनधास्त खाता येत .
तांदळाचे तळणीचे सांडगे , ज्वारीच्या पापड्या , सालपापड्या केल्या जात . कोंड्याच्या पापड्या , उपवासाच्या पापड्या, मुळ्याच्या ताकात घातलेल्या शेंगा असे बरेच काही बनवून ठेवले जाई . पापडाच्या पिठाच्या गोळ्या खायला पण खूप मज्जा येते . टाळ्याला पीठ चिकटले पण त्याची चव ,अहाहा ! ह्या सर्व पिठाची उस्तवार आई घरीच करे . कुरडया , तांदळाचे सांडगे तळूनच खावे लागतात मात्र भातवड्या , पापड्या , पापड मात्र निखाऱ्यावर भाजून शेंगा बरोबर खाता येत
तिखटाचे सांडग्याचे पीठ पण बनवले कि त्या पिठात कांदा , कोथिंबीर घातले कि झाले डांगर . ते हि भाकरीबरोबर झकासच लागे . पूर्ण उन्हाळाभर आंबे , जांभळ ,करवंद, आणि कलिंगड यांची रेलचेल असायची . आजी आंब्याचा हाराच घेई आणि प्रत्येकाला मोजून दोन दोन देई . मग तो चोखून खायचा . एक तासभर वेळ मजेत जायचा.उन्हाळी काकड्या तर खाण्यात अक्षरशः सुख होते . उन्हाळ्यात त्या थंड गार काकड्या फोडी करून मीठ टाकून आजी देई .
रताळं भाजून खाण्यात जी मजा आहे ती उकडून किंवा अजून त्यांचे नाना प्रकार , तेल तूप घालून खाण्यात अजिबात नाही .
ह्याच दिवसात डाळी केल्या जात, त्यांचा एक मोठा कार्यक्रमच असायचा . तुरी भिजवून तुरीची डाळ , हरभरे भिजवून हरभऱ्याची डाळ केली जाई . सकाळी सुखत घालून त्या बरोबर सुखल्याचा एक अंदाज घेऊन त्याची डाळ केली जाई नाहीतर डाळ अगदी अर्धगोल तुकडे पडत नाहीत . त्याला काहीतरी शब्द आहे पण तो आता आठवेना त्याचा कोंडा काडून बारीक झालेला डाळगा राही . तुरीच्या डाळग्याचे शेन्गोळे बनवले जाई . हरभऱ्याची डाळ भिजवून आंब्याची चटणी , पन्हे ... काय काय आठवू ? काकीच्या माहेरातून फणस यायचे . फणस कापताना त्याचा घमघमीत वास नाकात बसतो अक्षरशः . काय काय आठवू?
तांदळाची अमृतफळ , तांदळाच्या आंबोळ्या , मेतुंडा असले बरेच काही उन्हाळयात केले जायचे . लग्न सराई असल्याने कोणाच्या ना कोणाच्या घरी लाडू चिवडा केलेला असेच. मागरणीला पाठवणी म्हणून केलेल्या सजुऱ्या (साठोऱ्या ). रोज नाव्ही कोणाची ना कोणाची शिदोरी देऊन जाई . मज्जा असायची नुसती .
हे झाले उन्हाळ्यातले , पावसाळा चालू झाला कि अजून काय काय पदार्थ असायचे ते पुढच्या भागात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भारी लिहिलंय. वाचून भूक लागली
शेंगदाणे मंद गॅसवर भाजायचे
कमाल आहे नाही पूर्वी च्या
खरय
गव्हाच्या सत्वाचा चीक आठवला.
छान लेख आहे!
अगदी
फार मस्त लेख!!
पीठाचे शेंगदाणे
ह्या पाककृती यायला हव्यात
भाताचे सांडगे
गव्हाचा चिकात दुध व साखर
दाद
भातवड्या कशा बनवायच्या ?
ह्या सालपापड्या वाळवायला
हो शेवयांवरही लिहायचे आहे ,
1.सांडगे घालायचे म्हणजे काय ?
फारच मस्तं लेख.
धन्यवाद .
मस्तं लेख ! लहाणपणीच्या अनेक
सांडगे सुखवावे लागतात , ते
धन्यवाद
त्याला काहीतरी शब्द आहे पण तो
नाही, हरभरे डाळ करायला तयार
सही लिहिले आहे भाऊ.
भाऊ नाही ओ मी, ताई आहे
मला वाटले हा सापवाल्या जॅक
सापवाला जॅक, भारी नाव आहे
लेखा बद्दल काहीच नाही आणि आय
अत्यंत चविष्ट लेख !
सुंदर लेख ! यातल्या अनेक
खूप छान!
पापड कुरड्या फेण्या .....
मेवा
मस्त लेख! खरंच खूप आठवणी
2.दुरडी, हारा म्हणजे काय ?
मस्त लेख