Skip to main content

तुझ्या ऊन्हाचं कौतुक..

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 26/02/2017 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या ऊन्हाचं कौतुक किती करावं करावं माप पदरी सुखाचं किती भरावं भरावं बघ तुळशीला आल्या मखमालीच्या मंजिर्या चिऊताईच्या दातांनी किती खुडावं खुडावं खिडकीच्या गजावर झुले डांगराचा वेल बोटभर आधारानं वर चढावं चढावं नंदी बसलेला दारी गळी लेणं घुंगराचं येताजाता भक्तीभावे तिथं नमावं नमावं झुल्यावर लेकरांची किलबिल चारीठाव सांज सरता सयेने पाय वळावं वळावं पुण्य कुठल्या जन्माचं आज फळुनिया आलं भरलेल्या गोकुळात दिस सरावं सरावं
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 11445
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

अप्रतिम सुरेख रचना!

कविता आवडली मस्तच आहे, तुमच्या बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही .. अतूट काही... आणि आताची हि कविता स्त्रीत्वातील भारतीयता दाखवते. नको वाटते.. या कवितेतील स्त्री मागत असलेला 'खुला पैलतीर' कवितेची पार्श्वभूमी नाही सांगितली तर स्त्री मुक्ततावादी वाटेल पण कवितेतील 'खुला पैलतीर' अर्थ पारंपारीक भारतीय संकल्पनेतील मुक्ति मागणारा वाटतो. प्राची अश्विनी यांच्या कविता स्त्रीयांच्या नवीन पिढी पेक्षा एखाद पिढी आधीच्या स्त्रीची भावना रेखाटतात की भारतीय स्त्रीयांची नवी पिढीही या कवितांप्रमाणे विचार करते असा एक प्रश्न सहजच मनात येऊन गेला.

In reply to by माहितगार

धन्यवाद. पण बापरे , असा विचार केला नव्हता. कदाचित तुमचं म्हणणं बरोबरही असेल.

सुन्दर रचना ! फक्त " किलबिल" च्या जोडीला "चारीठाव" हा शब्द (जो चौरस व पोटभर जेवणाच्या सन्दर्भात वापरतात) थोडा खटकला.

In reply to by अनन्त्_यात्री

चारीठाव सर्वसाधारण पणे आहाराच्या संदर्भाने वापरला जात असला तरी 'चारीठाव' म्हणजे दिवसातून चार वेळा खाणे अशा अर्थाने येतो का ? म्हणजे चारीठाव या शब्दाचा मूळ अर्थ दिवसाच्या चार वेळा असा असावा असे आता पर्यंत समजत आलो होतो. ऑनलाईन डिक्शनर्‍यांमध्ये हा शब्द मिळाला नाही कुणि छापील शब्दकोशातून सांगू शकेल का ?

In reply to by माहितगार

गूगलले असता चारीठाव हा शब्द चारवेळा, चार दिशा, चौरस आहार, असाही वापरात येऊ लागल्याचे दिसते आहे. मोल्सवर्थातली नोंद मात्र 'चार ही ठाव' (Even the four, the very four, the main or preeminent four, dishes,--भात, भाजी, वरण, पोळी) A term for a decent, comfortable, or respectably-furnished feast or meal:--as disting. from घड्याळ टिपरूं &c. A poor meal--mere bread and a chili. अशी मिळाली संदर्भ

भरलेल्या गोकुळाचे सुरेख वर्णन, आवडले! Sandy

किती सुंदर! डांगराचा वेल म्हणजे काय?

फार सुंदर आहे सगळं. पण हे कुठेतरी हरवत चाललय हे ही खरे. बाकी माहितगार - होय, लिहिताना नव्याची उत्सुकता उमटते, पण जुने लोभसवाणे खुणावत राहते.

__/\__

In reply to by संजय क्षीरसागर

हे एकदम बरोबर आहे झुल्यावर लेकरांची किलबिल चारीठाव सांज सरता सयेने पाय वळावं वळावं चारीठाव म्हणजे सतत असा अर्थ होतो.

मस्त मस्त मस्त. बहिणाईंची आठवण झाली. असं काही वाचल्यावर मग त्यावर आणखी काही नकोच असे वाटते..

प्रत्येक स्त्रीचं स्वप्न ... कदाचित पुरुषांचंही.