✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

परसाकडून पॉटीकडे

स
स्वामी संकेतानंद यांनी
Sun, 02/12/2017 - 12:34  ·  लेख
लेख
मल, मलविसर्जन ही संकल्पना आपल्याकडे एकंदर थेट उल्लेख न करण्याजोगी मानली जात असावी. त्यामुळे विष्ठा किंवा मल या शब्दांशी संबंधित जे बोलींतले शब्द आहेत त्यांचा प्रयोग असभ्य मानला जाऊन सभ्य लोकांत, चारचौघांत, भद्र भाषेत त्यासंदर्भात सांगायचे झाले तर ती क्रिया जिथे केली जाते त्या स्थानाचा उल्लेख करण्याची पद्धत पडली असावी. कालांतराने त्या जागेला दिलेले नावच विष्ठेला समानार्थी म्हणून रूढ झाले. पण गंमत अशी की एकदा तो शब्द जनमानसात रूढ झाला की त्याला अशिष्ट समजले जाऊन त्या जागी नवा शब्द वापरण्यात येऊ लागला. परसाकडं हा शब्द ग्रामीण भागात भरपूर वापरण्यात येतो. डॉक्टर पेशंटला 'परसाकडं कशी होते?' असा प्रश्न विचारतात, तेव्हा तो शब्द विष्ठेला समानार्थी असतो. पण या शब्दाकडे पाहिले तर सहज लक्षात येते, आपल्याला परसाकडे( घरामागे, वाडीत) जायचे आहे म्हणजे मलविसर्जन करून यायचे आहे असे हा शब्द सुचवतो. पूर्वी घरामागे वाडीत किंवा शेतात जाऊन यायचे त्यामुळे परसाकडे जाणे म्हणजे मलविसर्जन करायला जाणे हा प्रयोग प्रचलित झाला. हळूहळू परसाकडं हा शब्द विष्ठेला समानार्थी झाला. 'परसाकडं लागली', 'परसाकडं होत नाही', असे बोलण्याचालण्यात येऊ लागले. याचप्रमाणे तुलनेने जरा सभ्य वा सोज्वळ समजला जाणारा संडास हा शब्दही आता विष्ठेला समानार्थी समजला जात असला तरी त्याचाही मूळ अर्थ मलविसर्जन करण्याची जागा, शौचकूप, असाच होत होता. संडासाचाही मूळ अर्थ लोपला जाऊन नवा अर्थ रूढ झाला. हिंदीत वापरण्यात येणाऱ्या टट्टी या शब्दाची कथापण अगदी अशीच आहे. टट्टी म्हणजे तागाच्या जाड्याभरड्या कापडापासून बनलेली ताटी! 'टट्टी की आड में शिकार खेलना' म्हणजेच ताटीआडून शिकार करणे(- लपूनछपून काम करणे) या म्हणीत टट्टी चा हा अर्थ दिसून येतो, तसेच 'धोखे की टट्टी' म्हणजे छद्म आवरण इथेही टट्टी म्हणजे ताटी. तर पूर्वी सर्वत्र ताटीचा आडोसा मलविसर्जनास वापरला जायचा. ( आडोशावरून आठवले, मराठीतही 'आडोशाला जाणे' हा प्रयोग मी ऐकलाय.) त्यावरून कालांतराने टट्टी हा शब्द विष्ठेसाठी वापरण्यात येऊ लागला.' अबे तेरा मुंह है या टट्टी?' वगैरे प्रयोगात टट्टी शब्द शौचकूप या अर्थाने येतो आणि ' हर काम में टट्टी कर के आ जाता है!' इथे विष्ठा या अर्थाने येतो. उर्दूचा प्रभाव असलेल्या भागात पाखाना हा शब्दही असाच विष्ठेला समानार्थी होऊन गेलाय. पाखाना हा शब्द मूलतः टॉयलेट, वॉशरूम या अर्थाने होता(फारसी 'पा' म्हणजे पाय.). पाखाना आणि त्याचा अपभ्रंश होऊन तयार झालेले इतर शब्द म्हणजे पैखाना, पखाना, पायखाना हे सगळे शब्द आता नुसतेच वॉशरूम या अर्थाने वापरण्यात येत नाहीत तर विष्ठा या अर्थानेसुद्धा वापरण्यात येतात. टट्टी, पैखाना, परसाकडं या शब्दांवर गावंढळ, ग्राम्य चा शिक्का बसल्यावर नव्यानेच आलेल्या 'संडास' चा स्वीकार आपण केला. शहरांतून हा शब्द ग्रामीण भागातसुद्धा झिरपला. नंतर इंग्रजीची तोंडओळख झाल्यानंतर 'लॅटरिन' हा शब्द सुशिक्षित जनता वापरू लागली. इंग्रजी लॅटरिन चा खरा अर्थ आहे शौचकूप पूर्वी 'संडास लागली, लॅटरिन जातो' अशी वाक्यरचना केली जायची ती कालांतराने 'लॅटरिन लागली' अशी होऊ लागली. 'लॅटरिन'सुद्धा विष्ठेला समानार्थी झाला. त्यानंतर शब्द आला 'पॉटी'. पॉटी शब्द मला नव्वदोत्तरी जागतिकीकरणाने दिलेला शब्द वाटतो. शहरी, इंग्रजी माध्यमात बऱ्यापैकी रुळलेल्या नवमध्यमवर्गाला पॉटीने बराच आधार दिला. तर, ही पॉटी म्हणजे 'चेम्बरपॉट'चं लघुरूप!( लघु/दीर्घशंकेचे शमन करायला वापरण्यात येणारे भांडे म्हणजे चेम्बरपॉट.) मुख्यत्वे लहान मुलांना 'ट्रेन' करायला जे पॉट वापरत त्याला पॉटी म्हणण्यात येऊ लागले. भारतात हा शब्द आला तो विष्ठा या अर्थानेच. लहान मुलांचा तर पॉटी हा विशेष आवडता शब्द बनला. लॅटरिन कठीण आहे आणि पोरांना संडाससारखे 'देसी' शब्द कसे शिकवावेत या शहरी नवमध्यमवर्गात नकळत रुजलेल्या मानसिकतेतून पॉटी हा शब्द आपल्या मुलांसोबत 'कम्युनिकेट करताना' फ्रिक्वेंटली वापरण्यात येऊ लागला. मग हा शब्द 'मुलासंगे मॉमीस खास लागला' आणि तिच्याही तोंडी बसला. पॉटी म्हणत लहानाची मोठी झालेली पिढी आता मोठेपणीही इन्फॉर्मल संभाषणात लॅटरिनऐवजी पॉटी प्रिफर करते. हिंदी पट्ट्यात टट्टीपासून सुरु झालेला, पाखान्यापासून सुरु झालेला प्रवास आता पॉटीपर्यंत येऊन पोचलाय. मराठी मुलखातही परसाकडंन सुरु झालेला प्रवास पॉटीपर्यंत पोचलाय. जय जागतिकीकरण! पण पॉटीनंतर काय? आफ्टर पॉटी, व्हॉट? जेव्हा पॉटी शब्द अतिशय कॉमन होईल, ग्रामीण भागातही वापरला जाऊ लागेल, तेव्हा तो शब्द ग्राम्य मानला जाईल. तोपर्यंत कदाचित मलविसर्जनासाठी एखादे नवे तंत्र आलेले असेल. समजा ते तंत्र व्हॅक्युम टॉयलेट असेल तर कदाचित कालांतराने विष्ठेला व्हॅक्युम म्हणणे रूढ होईल. सुलभ संस्थेने तयार केलेली शौचालये सर्वत्र दिसू लागल्याने 'सार्वजनिक शौचालय'ला 'सुलभ' हे नाव रूढ होताना आपण बघत आहोतच. त्यामुळे उद्या घरोघरी व्हॅक्युम शौचालय आलीत आणि आबालवृद्ध ती वापरू लागलीत तर व्हॅक्युम हा शब्द विष्ठेला समानार्थी म्हणून रूढ होणे फार अवघड नाही. किंवा समजा उद्या मंडारीन चिनी भाषा जागतिक भाषा बनली तर मंडारीनमध्ये असलेला शब्द आपल्याकडे लोकप्रिय होऊन तो लॅटरिन किंवा पॉटीची जागा घेईल. विष्ठेच्या समानार्थी शब्दांचा प्रवास पॉटीनंतरही सुरूच राहील, थांबणार नाही. लोकांसाठी ही हवीहवीशी हगवण आहे. - स्वामी संकेतानंद तळटीप:- लेखाचा मुख्य विषय नव्हता म्हणून उल्लेख केला नाही, पण 'एक/दोन नंबर ला जाणे' असा प्रयोग सुरुवातीला व्हायचा. आता त्याबरोबरीनेच 'दोन नंबर लागली' 'एक नंबर लागली' असा प्रयोग केला जातो. म्हणजेच इथेही दोन नंबर विष्ठेला समानार्थी शब्द बनलाय. झालाय. हा प्रवासही पॉटीप्रमाणे प्रवेगात झालाय.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
15849 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

डबा टाकणे, नदीकाठी तुळस लावून

सूड
Mon, 02/13/2017 - 11:57 नवीन
डबा टाकणे, नदीकाठी तुळस लावून येणे, ससे पकडायला जाणे, वाघ पकडायला जाणे, शिकारीला जाणे, असे विविध पाठभेद ऐकले आहेत.
  • Log in or register to post comments

डान्स करुन येतो, पाकीस्तानला

अभ्या..
Mon, 02/13/2017 - 12:01 नवीन
डान्स करुन येतो, पाकीस्तानला जाऊन येतो, वडे टाकून येतो आदि हॉस्टेलात प्रचलित संबोधने होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आणि पुण्यातले लोक ज्याप्रमाणे

सूड
Mon, 02/13/2017 - 12:02 नवीन
आणि पुण्यातले लोक ज्याप्रमाणे पौड कशासोबत खातात हे माहित नसलेल्या माणसाला 'पौडावरनं आलाय का?' असं विचारतात त्याप्रमाणे आम्ही आदिजोशींचा लेख वाचून 'पाचवी खोली कुठंय' असं विचारायला सुरुवात केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आयटीतला नवा शब्दः डिप्लॉयमेंट

पुंबा
Mon, 02/13/2017 - 18:16 नवीन
आयटीतला नवा शब्दः डिप्लॉयमेंट करून येणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

__/\__

सूड
Mon, 02/13/2017 - 18:25 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

अरारारा मेलो मेलो =)) =))

बॅटमॅन
Mon, 02/13/2017 - 22:56 नवीन
अरारारा मेलो मेलो =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

"ऐन शिकारीला कुत्रं पॉटीकडे"

अनुप ढेरे
Mon, 02/13/2017 - 14:01 नवीन
"ऐन शिकारीला कुत्रं पॉटीकडे" अशी नवी म्हण बनायला हवी.
  • Log in or register to post comments

समुद्रकिनाय्राला विसरलात काय?

कंजूस
Mon, 02/13/2017 - 19:25 नवीन
समुद्रकिनाय्राला विसरलात काय? " all unclaimed spaces are open toilets in india", " a walk on seashore here is a exercise in sidestepping turds." हे लोनली प्लॅनिट पुस्तकातून. "शौचालय ज्याच्या घरी लक्ष्मी तेथे वास करी."- अलिबाग परिसर. "शहरातले लोक जिथे बघायला जातात तिथे आम्ही xxxला जातो"- किनारपट्टीचे लोक. सरकारने कितीही जाहिरात करो गाववाले त्यांचा हक्क सोडणार नाहीत.
  • Log in or register to post comments

हग डे

ट्रेड मार्क
Mon, 02/13/2017 - 22:28 नवीन
हग डे चे औचित्य साधून लेख प्रकाशित केलाय :)
  • Log in or register to post comments

बायदवे पाकिस्तानला जाऊन येतो

बॅटमॅन
Mon, 02/13/2017 - 22:56 नवीन
बायदवे पाकिस्तानला जाऊन येतो हा खास राष्ट्रभक्त शब्दप्रयोग कुणी कुणी ऐकलाय इथे? आजकाल जे ऊठसूट पाकिस्तानला पाठवतात त्याचा ह्याच्याशी काही संबंध असेल का? या अर्थामुळे एका हिंदी लेखकाची "कितने पाकिस्तान" नामक कथा नक्की कशाबद्दल असेल असा लहानपणी कोणे एके काळी प्रश्न पडला होता.
  • Log in or register to post comments

१. पाकिस्तान इज अ बॅsssssड

संदीप डांगे
Tue, 02/14/2017 - 00:20 नवीन
१. पाकिस्तान इज अ बॅsssssड प्लेस... २. टू शीट इज अ बॅssssड थिंग.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पो टाकायला चाल्लो... असं पण

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/13/2017 - 23:25 नवीन
पो टाकायला चाल्लो... असं पण म्हनतेत ना कै कै जनं!
  • Log in or register to post comments

म्हैस-रेड्याइतका मोठ्ठा सडा

सूड
Tue, 02/14/2017 - 08:12 नवीन
म्हैस-रेड्याइतका मोठ्ठा सडा घालणारे म्हणत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

म्हैस-रेड्याइतका मोठ्ठा सडा

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/22/2017 - 12:00 नवीन
म्हैस-रेड्याइतका मोठ्ठा सडा घालणारे म्हणत असावेत.
>>> सुडक्याच्या मनात डबडं! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@डांगे साहेब,

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/14/2017 - 08:23 नवीन
@डांगे साहेब, गोदरी हा भौगोलिक, किंवा क्रियात्मक वैशिष्ट्य दाखवणारा शब्द आहे. A Place designated for pooping ह्या अर्थाने. गावची गोदरी ही लिंगानुरूप असते. म्हणजे वऱ्हाडीत सांगता 'बायामानसाची गोदरी' जर 'उत्तरेला' असली तर ब्वा लोकांची 'दक्षिणेला' असेल. त्यातही गावातली प्रेमी जोडपी आपापल्या घरून डबे घेऊन निघत अन एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जात. लोकांना वाटे हागायला गेलीत पोरगा पोरगी आपापल्या गोदरीत, पण पोरगा पोरगी आपापल्या गोदरीतून गावाला वळसा घालत एखाद्या पानदीत इलुईलु करताना सापडत अन हलकल्लोळ होत असे. अश्या काही रम्य बालपणीच्या (जोडप्यांना पकडल्याच्या) आठवणी आहेत. वऱ्हाडी मध्ये टिपिकल रांगडेपण कायम अध्याहृत असते. सायकल/ऑटो रिक्षा मध्ये बसल्यावर भाऊ 'जेवन्या'/ 'हगोड्या' हाताले पलटसान म्हणणे अतिशय नॉर्मल आहे आजही. शौचास गेला कोणी तर 'झाडं लाव्याले जायल हाय' म्हणले जाते किंवा 'जेवन्याहातचं हगोड्या हाती ठेव्याले जायल हाय' म्हणतात. @अभ्या अर्बन डिक्शनरी टाईप पाकिस्तान, डान्सिंग प्रमाणे आम्ही एक मस्त प्रकार ऐकला होता, हागायला गेला कोणी का तो 'महापालिकेला गोल्ड टॅक्स' द्यायला गेलाय असं ऐकलंय. एका प्रसंगी 'सोनखत वाटायला गेलाय' असंही ऐकलंय. थेट वऱ्हाडीत 'पवटे टाकाला जायल हाय' पण ऐकलंय =))
  • Log in or register to post comments

याक नंबर जिल्बी

अॅस्ट्रोनाट विनय
Tue, 02/14/2017 - 11:33 नवीन
==))) हा हा हा ग जब . लय हाग्सलो. काय ही अघाण्ट निरीक्षणबुद्धी बादवे जिलबी टाकायला चाललो असंपण आईकलय मुतायला जातांना फॉरेनला चाललो अन हगायला जातांना पाकिस्तानला चाललो असं म्हणायचा सुद्धा प्रादेशिक भेद आहे. सार्वजनिक मुतारीत घुसताना विटकर आणायले चालला का बे अशी प्रेमळ हाक कुणीतरी कुणालातरी दिल्याचं स्मरतं.
  • Log in or register to post comments

विटकर आणायले चालला का बे

अभ्या..
Tue, 02/14/2017 - 14:30 नवीन
विटकर आणायले चालला का बे
ह्याला धार्मिक संबंध आहे. काही धार्मिक रुढीनुसार मूत्रांचे थेंब तसेच विसर्जनवयवावर राहू देणे निषिध्द समजले जाते. ते टिपण्यासाठी विटेचे तुकडे सार्वजनिक मूत्रालयाच्या ठिकाणी ठेवलेले असतात असे ऐकीवात आहे. तसे तुकडे दिसलेलेही आहेत. ती विटकर आणायचा संदर्भ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय

हे फक्त मुस्लिमांमध्ये आढळते.

पुंबा
Tue, 02/14/2017 - 17:18 नवीन
हे फक्त मुस्लिमांमध्ये आढळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सहज कुतूहल, १ नंबर आणि २ नंबर

सचिन काळे
Tue, 02/14/2017 - 16:25 नवीन
सहज कुतूहल, १ नंबर आणि २ नंबर शब्दप्रयोग कसे निर्माण झाले असावेत? ह्यामागे काही इतिहास असू शकेल का?
  • Log in or register to post comments

कदाचीत पुणे रेल्वे स्टेशनवर निर्माण झाले असावेत ..

बबन ताम्बे
Tue, 02/14/2017 - 17:47 नवीन
म्हणजे एक नंबर प्लॅटफॉर्मवर मुताचा वास आणि दोन नंबरवर सडा पडलेला :-) आता जरा ब-यापैकी स्वछ्ता असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन काळे

हा! हा!! हा!!!

सचिन काळे
Wed, 02/15/2017 - 07:14 नवीन
हा! हा!! हा!!!
  • Log in or register to post comments

मोर?

चाणक्य
गुरुवार, 02/16/2017 - 07:13 नवीन
हे सगळं ठीक आहे हो, पण संडासला बसलेल्या माणसाला 'मोर' का म्हणतात हे मला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे. मोर ?? का पण ???
  • Log in or register to post comments

मोर?

योगी९००
गुरुवार, 02/16/2017 - 08:18 नवीन
मोर? कधी ऐकले नाही. पण उघड्यावर बसणार्‍या माणसाला सारखे सारखे पुढे सरकायला लागते असे ऐकीवात आहे. "म्होरं व्हा म्होरं.." असे सारखे लहान मुलाला सांगावे लागत असेल म्हणून मोर शब्द आला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

..

कवितानागेश
Tue, 02/21/2017 - 20:44 नवीन
बहुधा पार्श्वभाग उघडा टाकुन 'पिसारा' वर घेतलेला प्राणी/ पक्षी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा