आई मला पि.एस्.पी. हवाय, माझ्या सगळ्या फ्रेंड्स कडे आहे तो. ''ओन्ली आय डोन्ट हॅव इट". इति माझा ६ वर्षाचा मुलगा.
'अरे पण काही महिन्यांपुर्विच आपण तूला गेमबॉय घेतला ना, तो खेळ ना " इति मी
'अग आई गेमबॉय आता आउटटेड झाला, मला पि.एस्.पी. च हवा. त्यावर वेगळे गेम्स आहेत.' इति माझा ६ वर्षीय मुलगा.
इथे दुबईमधे शुक्रवार शनिवार हे जे सुट्टीचे वार असतात, तेव्हाच काय ते मुलांना एखाद्या क्लब ची वैगरे मेम्बरशीप घेउन बॅडमिंटन, टेनिस अथवा इतर तत्सम जे सोकॉल्ड साहेबी खेळ आहेत ते खेळायला घेउन जाउ शकतो. एरवी शाळा असतांना बाहेर कुठेही मैदानी खेळ खेळायला मुलांना जाता येत नाही. वेळच नसतो. मग काय दिवसभर सतत कारटुन्स बघणे किंवा कंप्युटर गेम्स, गेमबॉय,प्ले स्टेशन वैगरे वैगरे खेळणे. नाही म्हणायला बिल्डींग मधली मुले येतात घरी खेळायला पण एकत्र जमून ह्यांचे पुन्हा कंप्युटर गेम्स खेळणे चालते. परवा असाच मी माझा मुलगा व त्याचे बिल्डींग मधिल मित्र ह्यांचा एक खेळ बघत होते. हि मुले (सर्व मुले साधरणतः वयोगट ५-७ वर्षे) प्रत्येक जण कारटुन मधली एक एक कॅरॅकटर्स बनुन एकमेकांना खोटे खोटे बंदुकिने मारणे असा काहीतरी खेळ खेळत होते. तेव्हा मनात विचार आला आत्ताच्या मुलांचे खेळ, त्यांची करमणुकीची साधनं सगळं किति वेगळं आहे माझ्या बालपणापेक्षा.
माझे मन थेट भूतकाळात गेलं. ६ वर्षाची असतांना आम्ही कुठले खेळ खेळायचो? अर्थात सगळे मैदानी खेळ. आणि घरात बसुन खेळायचे असेल तर पत्ते वैगरे.
टेकनॉलॉजीचे आत्ताएव्हढे आक्रमण तेव्हा अर्थात झालेले नव्हते. मी ६ वर्षाची असतांना आमच्या नाशिकला साधा टेलिव्हि़जन देखिल आला नव्हता.तेव्हा पर्सनल कंप्युटर नावाची गोष्ट तर आस्तित्वातच नव्हती. मग आम्ही काय करायचो? आत्ताच्या मुलांना तर प्रश्नच पडेल कि टि.व्ही नाही, कंप्युटर नाही, पि.एस्.पी., गेमबॉय, प्ले स्टेशन तर फार फार दूरची गोष्ट मग आपले आई-वडिल बोअर कसे नाही व्हायचे? कारण आत्ताच्या मुलांना इतकी सारी करमणुकीची साधनं उपलब्ध असुनसुद्धा '''I am getting bored' हे वाक्य आपल्याला अनेक वेळा ऐकु येतं. पण वेळ घालविण्याचा आम्हाला कधी प्रॉब्लेम नाही आला. माझ्या डोळ्यासमोर माझे बालपण आले. आणि अचानक मन खुप नॉस्टॅलजीक वाटायला लागलं.
माझे बालपण गेले एकत्र कुटंबात, मला ३ काका. आजीचा हट्ट होता कि तीच्या चारही मुलांनी तीच्या जवळच राहिले पाहिजे. आणि म्हणुनच माझ्या आजी-आजोबांनी आपल्याच जागेत एक मोठी इमारत बांधली. प्रत्येक काकांचे घर एका मजल्यावर. धाकटे काका मात्र माझ्या आजीच्याच जुन्या घरी रहात. आजीचे बैठे घर होते ब-याच खोल्यांचे. आणि हे घर आणि आमची इमारत हे सगळे एकाच मोठ्या प्लॉट मधे होते. तशी जागा मोठी असल्याने आमच्या घरापुढे मोठ्ठ आवार, आणि आवारात एक विहिर देखिल होती. आजीच्या घरासमोर एक छानशी गच्ची, व तीच्यात एक झोपाळा. संध्याकाळी माझी आजी त्या झोपाळ्यावर हमखास बसायची. मग सर्व काका-काकु आजीला भेटायला संध्याकाळी त्या घरासमोरिल गच्चीत जमायचे, आणि मस्त गप्पा रंगायच्या. आंगणात सायली, जाई, जुई चे वेल, गुलाब, मोगरा अशी फुलांची झाडे होती, आवारात आंब्याची ३ मोठ्ठी झाडे, चिंच, विलायती चिंच, बुच असे मोठे वृक्ष. आंगण अनेक फळा -फुलांच्या झाडांनी भरलेले होतं.
संध्याकाळी आम्ही सर्व सख्खी आणि चुलत भांवंडे (एकुण आम्ही १२ भावंडे होतो), आणि आमचे इतर गल्लीतले मित्र-मैत्रीणी सर्व आमच्या आवारात जमायचो (मोठ्ठ आवार होतं ते), आणि अनेक खेळ खेळायचो. परदेशात रहाणा-या माझ्या मुलाला हे खेळ माहित देखिल नाहीत. लपंडाव, भोकांजा, डब्बा-ऐसपैस, रुमाल्-रुमाल, खांब खांब खांबोळी, आमच्या मुलींचा खेळ म्हणजे ठिक-या. धमाल करायचो आम्ही. शेवटी खेळून खेळून इतके दमलेले असायचो कि घरी जाउन हात्-पाय धुउन, जेवलो कि झोपलो.
मे महिन्यातील सुट्टी आणि दिवाळीतली सुट्टी म्हणजे आनंदाची पर्वणीच होती. प्रत्येकाचे आईकडील कोणी ना कोणी नातेवाईक म्हणजे आ़जी-आजोबा, मामे, मावस भावंड सुट्टीला नाशिकला येयचे. आणि वडिलांकडील नातेवाईक सगळ्यांचे कॉमन च होते, आत्या व आते भावंड देखिल येयचे आणि आम्ही सर्व चुलत भावंडं एकाच प्रिमायसेस मधे रहात असल्याने, प्रत्येकाच्या आईकडील नातेवाईक हे आमचे देखिल तितकेच जवळचे होते. मग काय सुट्टीत लहान मुलांची संख्या अजुन वाढायची. सगळे मिळुन पत्त्यांचे असंख्य खेळ खेळायचो. लहान वयातील मुले ७-८, ५-३-२, तर आम्ही लॅडीज, ३०४, बिझिक, बदाम सात, गुलाम चोर, चॅलेंज, नॉट एट होम, जजमेंट आणि असंख्य इतर पत्त्यांचे खेळ खेळायचो. आणि हळुच इतरांचे पत्ते बघणे, खुप बदमाशी करणे वैगरे चालायचे. खरंच किती सुंदर दिवस होते ते. सगळ्या चिंतातून मुक्त जीवन.
दिवाळीत मस्त किल्ला बांधायचो. नर्कचतुर्दशीच्या दिवशी सकाळी सर्वात पहिले फटाका कोण लावणार ह्यांत चढाओढ असायची. माझा मोठा भाऊ सर्वात हुशार, तो रात्री १२ वाजता पहिला फटाका लावुन मग झोपायचा. म्हणजे सर्वात पहिला फटाका मी लावला होता हे म्हणायला मोकळा. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांच्या लवंगी माळ आणि इलेक्ट्रीक माळेचा (फटाक्याचा आमच्या लहान पणीचा एक प्रकार) जो उरलेला स्टॉक असायचा त्याची एकत्र एक मोठ्ठी माळ गुंफायचो आणि मस्त एक ५-१० मिनिट चालणारी लड वाजायची. काय काय उद्योग करायचो आत्ता आठवून मजा येते.
संक्रांत हा असाच एक अजुन उत्साही सण आमच्या साठी. पतंग आणणे, मग बरवलीचा मांजा आणणे आणि गच्चीवरुन मनसोक्त पतंग उडविणे. आम्ही मुली फक्त आमच्या भावांना चिअरिंग करण्यासाठी गच्चीवर जात असु. आणि मांज्याचे रिळ पकडण्यासाठी. पतंगाचे पेच लागायचे. मग समोरच्या प्रतिस्पर्धी ग्रुपचा पतंग कटला की आम्ही जाम ओरडायचो. त्यांना चिड्वायचो. माझा चुलत भाऊ पतंग उडविण्यात तरबेज होता. कटलेला पतंग तो बरोबर आपल्या पतंगाला लटकवुन खाली आणायचा. दुस-याची कटलेली पतंग आपल्या गच्चीत अथवा आंगणात आली कि आनंद गगनात मावेनासा होयचा.
आम्ही तर मांजा पण घरी बनविण्याचा उपद्व्याप केला आहे. साबुदाणा, कोरफड, काचेची बारिक भुकटी आणि अजुन काय काय अनेक विचित्र पदार्थ एकत्र करुन एक लुद्दी बनवायचो आणि ती धाग्याला लावायचो.
संध्याकाळी मग तिळ्गुळ वाटण्याचा समारंभ, अनेक गावातील नातेवाईक, ओळ्खीची लोके तिळ्गुळ वाटायला घरी येयचे. माझ्या आजीच्या घरी सगळा गोतावळा जमायचा. आम्ही लहान असलो तरी नटण्या मुरड्ण्याची भारी हौस. आणि आम्हा मुलींना अगदी चिमुरड्या होतो तरि साडी नेसण्याची जाम हौस. तेव्हा 'कल्पना' साडी नावाची साडी मिळायची लहाम मुलींकरिता.. ती शिवलेली असायची म्हणजे अंगात एखाद्या फ्रॉक सारखी घालता येयची. आम्ही अगदी चिमुरड्या असतांना ती कल्पना साडी घालायचो. आणि तिळ्गुळ देण्यासाठी-घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी फिरायचो.
तसेच अजुनही स्मरणात रहाते ती होळीपोर्णिमा. कुठुन कुठुन लाकडे गोळा करुन आणायचो, गव-या आणायचो आणि मस्त होळी पेटवायचो. त्यात मग आम्ही कांदे, बटाटे देखिल घालायचो. त्या कांदे-बटाटयाची चव काय सही लागायची. आजही परदेशात आम्ही बार्बेक्यु केला कि मन थेट त्या आठवणीतल्या होळीपोर्णिमेत जाते आणि ते तिखट मीठ लावून खाल्लेले कांदे, बटाटे आठवतात.
आमच्या आंगणात खोबरेल कैरीचे झाड होते, त्याच्या कै-या कमी आंबट असतात आणि हि कैरी खायला खुप चवदार असते. आसपासच्या ब-याच टवाळ मुलांचा त्या कै-यांवर डोळा असायचा. चोरुन ते आंगणात शिरत आणि आमच्या झाडावर चढुन त्या कै-या काढत. आम्ही देखिल त्या झाडावर चढुन कित्येकदा कै-या खाल्या आहेत, त्याचप्रमाणे चिंचा पण तोडल्या आहेत. हिरव्यागार गारुसलेल्या चिंचा, किंवा चिंचेमधे ति़खट-मीठ घालुन त्याची बनवलेली गोळी अजुन जीभेवर त्याची चव आहे. एकदा जेट एअरवेज मधे आम्हाला मस्त रॅपरमधे घातलेली चींचगोळी दिली तेव्हा अशीच मला लहानपणची आठवण झाली. संध्याकाळी ब-याच वेळा आम्ही मुली तेलपोहे करुन खायचो. खास मुलींचा आवडता प्रकार.
ह्या आणि अशा बालपणातील अनेक आठवणी आहेत. कधी वाटतं माझ्या मुलाला परदेशात राहिल्याने ह्या सर्व खेळांची, सणांची आमच्या सारखी मजा नाही लुटता येत. घरी इतके नातेवाईक येणे , मजा करणे त्याला बिचा-याला त्याची इतकी कल्पना नाही.
मला आमचा पहिला-वहिला टि.व्ही देखिल आठवतो. Black & White होता. पण किती exciting आणि thrilling वाटलं होतं तो घरी आल्यावर. मग तो भला मोठ्ठा एन्टिना गच्चीवरती लावायला लागायचा. तरी आम्हाला टि.व्ही म्हणजे पाण्यातून बघावा असाच दिसायचा. अतिशय अस्पष्ट, त्यावर तारे चमकायचे. antenaa वर एखादा कावळा किंवा पक्षी बसला कि जे पाण्यातून दिसल्यासारखे चित्र दिसायचे तेही दिसेनासे व्हायचे. पण चिकाटी इतकी कि तरिही आम्ही टि.व्ही बघायचो. नंतर मग दिल्लीतल्या एशियाड नंतर मग नाशिकला छान transmission येवु लागले. आम्हाला प्रत्येक गोष्टीचे अप्रुप होते. आत्ताची मुले त्यांना सगळे अगदी जन्मल्यापासुन मिळते.. त्यांना कशाचेच अप्रुप वाटत नाही. त्यात काय ह्या गोष्टी असतातच. ह्या जगात अगदी आदी कालापासुनच असल्या पाहिजेत असाच त्यांचा समज.
त्याकाळातील दूरदर्शनवरिल कार्यक्रम हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. किती साधे, गोंडस कार्यक्रम होते ते. १३ भागात serial संपायच्या. Lucy Show, Different Strokes ह्या इंग्रजी मालिका आणि हमलोग, खानदान, एक कहानी, कथा सागर, मालगुडी डेज, ये जो है जिंदगी, पेईंग गेस्ट, सारख्या छान मालिका चालायच्या. रविवारी सकाळी दिसणारा तो जुन्या हिंदी गाण्यावरील कार्यक्रम 'रंगोली'.
तंत्रज्ञानात जे मैलाचे दगड ठरले त्याचे आम्ही साक्षिदार होतो. त्यातलाच एक व्हि.सी.आर देखिल. स्वतःचा व्हि.सी.आर घेण्याआधी आम्ही भाड्याने व्हि.सी.आर आणायचो. मग तो १ दिवसाकरिता आणलेला असल्याने मग अगदी जितके पिक्चर बघता येतिल तितके आम्ही बघुन घेयचो. ज्या काकांकडे व्हि.सी.आर आणला आहे त्यांच्याकडे मग सगळे जमुन दिवसभर पिक्चर बघणे चालायचे. नंतर प्रत्येकाने व्हि.सी.आर विकत घेतला. आता गंमत वाटते ते सर्व आठवुन. आता काय हजारो टि.व्ही चॅनेल्स, हजारो मालिका, आणि हजारो movie चॅनेल्स , आणि त्यामुळे कशाचेच काहिच वाटत नाही. आपल्या मुलांनातरी का दोष द्या?
रेडिओ ने देखिल माझ्या बालपणात अगदी महत्त्वाची भुमिका बजावली. १० वी १२ वीचा अभ्यास असो वा इंजिनीअरींग चे सबमिशन असो रेडिओ हा माझा अगदी जिवलग साथी होता. त्यावरिल बिनाका गितमाला आठवड्यातुन एकदाच असायची पण आम्ही ती आवर्जुन ऐकायचो. अमीन सयानीची ती टिपिकल बोलण्याची पद्धत आम्हाला त्याची मजा वाटायची. मग ''आपकी फर्माईश", 'बेला के फुल", "फौजी भाईयोंके लिये'' तबस्सुम, असे अनेक कार्यक्रम अजुनही आठवतात. माझी आजी ''आपली आवड'' हा रेडिओवरिल मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऐकायची. ती इतक्या मोठ्याने रेडिओ लावायची (कारण तीला वयोपरित्वे कमी ऐकु येयचे) कि तिच्या घरातील रेडिओ मला आमच्या घरी स्पष्ट ऐकु येयचा आणि किति तरी मराठी गाणी मला "आपली आवड" मुळे आणि खरंतर माझ्या आजीमुळे माहिती झाली.
कंप्युटर नावाची गोष्ट, माझा मुलगा अगदी १ वर्षाचा असल्यापासुन अगदी सराईतपणे वापरतो. १ वर्षाचा असतांना माझ्या मांडीवर बसुन तो पेंट ब्रश उघडणे, त्यात त्याला जमतील असे चित्र विचित्र आकार काढणे, वर्ड मधे टाइप करणे इत्यादी उद्योग अगदी सराईतपणे करायचा. त्याच्यासाठी ते एक फक्त खेळणे होते. पण विनोदाचा भाग म्हणजे हाच कंप्युटर मी कंप्युटर इंजिनीअरींग ला एडमिशन घेईपर्यत बघितला देखिल नव्हता. आमच्या पहिल्या वहिल्या कंप्युटर लॅब च्या प्रॅक्टीकलला आम्हाला आमच्या प्रोफेसर ने मुलांनो 'हा किबोर्ड बरका, आणि हा मॉनीटर' असे दाखविले होते. आताच्या मुलांना हसु येईल हे ऐकुन कदाचित. इंजिनीअरींग च्या प्रथम वर्षाला असतांना दोन ड्राइव्ह वाले कंप्युटर होते. म्हणजे हार्ड डिस्क नव्हती पि.सीज ना. वरच्या ड्राइव्ह वरती फ्लॉपी टाकुन कंप्युटर बुट करायचा आणि खालच्या ड्राइव्ह मधिल फ्लॉपी मधे डेटा सेव्ह करायचा असा आमचा उद्योग चालायचा. मग सेकंड इयरला असतांना हार्ड डिस्क वाले कंप्युटर आले. आणि अजुन एक गंमत म्हणजे मी इंजीनीअर झाल्यानंतर विंडोज ऑपरेटींग सिस्टम आली. माउस काय असते माहीत नव्हते इंजीनीअर होईपर्यन्त, आम्ही आपले DOS वरती काम करायचो.
अशा आणि अनेक बालपणीच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळुन गेल्या. पण खरंतर प्रत्येक पिढीत असा बदल होणारच.. त्यालाच तर जनरेशन गॅप म्हणतो आपण. कदाचित माझ्या आई-वडिलांना आम्ही लहान असतांना हेच वाटले असेल कि किती फरक आहे ह्यांच्या आणि आपल्या खेळांमधे, मनोरंजनाच्या प्रकारामधे.. प्रत्येक पिढीत नविन नविन तंत्रज्ञान हे येणारच आणि बदल हे घडणारच. माझ्या मुलालादेखिल त्याच्या बालपणीच्या अशाच अमुल्य आठवणी रहातील. रहावो.
वाचने
5249
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर आठवणी..
लेख आवडला म्हणुन धन्यवाद
मस्त
बालपणीच्य
धन्यवाद.
In reply to बालपणीच्य by पक्या
छान
+१
In reply to छान by विसोबा खेचर
+२
In reply to +१ by सहज
+३
In reply to +२ by दशानन
छान लेख
In reply to +३ by अवलिया
आठवणी छान लिहिलेल्या आहेत.
खुप छान
स्मॄती रंजन
मस्त
मस्त
धन्यवाद
जबरा...
मस्त लेख...
धन्यवाद
In reply to मस्त लेख... by मदनबाण
खुप छान
वर्षा,
धन्यवाद
आठवणींची सफर ...
खुप छान
स्मृतीरंजन आवडले
क्या बात
मस्त!
आभार