Skip to main content

दिवाळी अंक २०१६

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 28/10/2016 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत. आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे. इथे तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल, त्यातींल आवडलेल्या साहित्याबद्दल लिहा, ही विनंती. मी सुरुवात करते. ह्या वर्षी खूप अंक विकत घेतले नाहीत, किंमती खूपच वाढल्यात. हंसचा अंक ३००/- रुपयांना आहे! लोकसत्ताचा अंक घेतलाय आणि खूप आवडलाय. संग्रही ठेवण्यासारखा आहे. भटकंतींवरचे लेख, देशोदेशींच्या "ट्रंप" मानसिकतेच्या नेत्यांबद्द्लचे लेख, काही कंपन्यांच्या कार्य संस्कृतीवरचे लेख, नेताजींच्या फाईल्ससंबधित लेख. त्या शिवाय शेक्स्पिअरचा शोध हा माधव वझेंचा लेख, शैलेंद्र आणि त्याच्या तीसरी कसमबद्दलचा लेख, गिरिश कुबेर ह्यांच्या पुतिन युगावरील आगामी पुस्तकातील काही भाग, अजूनही काही लेख... आणि अर्थात वार्षिक राशिभविष्य! त्याशिवाय डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक अतिशय सुरेख आहे, खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/ तसंच अजून एक अक्षरनामा म्हणून अजून एक ऑनलाईन अंक आला आहे - http://www.aksharnama.com/client/diwali_2016 मेहता ग्रंथजगतचाही दिवाळी अंक आजच घरी येऊन पोचलाय, त्याबद्दल वाचल्यावर. तोवर तुम्हीही आपल्या आवडत्या अंकांबद्दल आणि त्यातील साहित्याबद्दल लिहा.

वाचने 35119
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

पुण्यातील मिपाकर 'पुणे मराठी ग्रंथालय' इथे दिवाळी अंकांसाठी सभासदत्व घेऊ शकतात. साधनाचा दिवाळी अंक ऑनलाईन उपलब्ध आहे http://www.weeklysadhana.com/saptahik.php

मिपाकर आदूबाळ ह्यांची दिवाळी अंकातील एक कथा - http://www.aisiakshare.com/node/5586 मिपा दिवाळी अंकातील आदूबाळ ह्यांचे लेखन वाचायची उत्सुकता आहे!

In reply to by यशोधरा

आदूबाळच्या प्रतिभेला सलाम. दुसरे जुने मिपाकर, धनंजय यांची कथाही अत्यंत वाचनीय आहे. या लेखनाला किंवा सादरीकरणाला 'कथा' म्हणणं ही भाषेची मर्यादा आहे. धनंजयने पदोपदी दुभंगत, वाचकाच्या मनाप्रमाणे आकार घेणारी कथा लिहिलेली आहे. ती एक कथा नसून दर काही शब्दांनंतर फाटे फुटत शेकडो कथा बनतात. प्रत्येक कथा तीनचार वाक्यांचीच, पण एका प्रेमाच्या नात्याची वेगवेगळी विधिलिखितं सांगणारी. अशी कथा आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शक्य नाही. म्हणून त्या माध्यमाचा पूर्ण वापर करून घेणारी ठरते. http://aisiakshare.com/node/5593

पुलंच्या ' माझे खाद्यजीवन ' या अजरामर लेखाचं अतुल परचुरेंनी केलेलं अभिवाचन जरुर ऐका. चांगलं केलंय. https://youtu.be/8tr52LU0Xog

In reply to by बोका-ए-आझम

डिजिटलचा अंक जबरद्स्त झालाय. कंटेंट रीच म्हणता येईल. उत्तम साहित्य, वैविध्य. वाचायला बसलो तर सोडवणार नाही इतक्या रसाळ भाषेत घेतेलेला आढावा. मस्त एकदम. ह्याची पीडीएफ करुन ठेवलीच पाहिजे संग्रही.

पाहण्यात असे आले आहे की, आजकाल म्हणजे गेल्या दहा एक किंबहूना कमी किंवा जास्त - वेळेची फुटपट्टी (की वर्षपट्टी ??) कमी जास्त होवू शकते - वर्षात ग्लोबलायझेशनमुळे जग संकूचीत झाले आहे. भारतातील - महाराष्ट्रातील अनेक जण/ जणी परदेशात जावून आले किंवा तेथे स्थायिक झालेले आहेत. अशा अस्थायी किंवा एनआरआय लोकांचे लेख फार मोठ्या प्रमाणात दीवाळी अंक, साप्ताहीक पुरवण्या, संकेतस्थळे आदींवर दिसत आहेत. हे लेख म्हणजे साधारणः परदेशवारी, तेथील एखादे ठिकाण, जाण्ययेण्यातील त्रास किंवा सुविधा, तेथील आधूनिक वातावरण, खाद्यपदार्थ, अनुवादीत किंवा रूपांतरीत कथा कादंबर्‍या, तिकडे कसे गोग्गोड आदींभोवती रेंगाळत राहते. किंबहूना माझे म्हणणे असे आहे की एखाद्या अंकात (तो कुठलाही असेल तरी) वरील प्रमाणांचे लेख जास्त प्रमाणात व साहित्य या अर्थाने कमी असे आहे. म्हणण्याचा विपर्यास नसावा. तसेच वरील म्हणणे मिपाच्या अंकास धरून नाही! आजकाल ( पुन्हा तेच वेळेचे प्रमाण घ्या) पुस्तकांचा खप वाढल्याचे एखाद्या एजन्सीच्या सर्वेक्षणात लक्षात आले आहे. ती पुस्तके कोणती तर स्पर्धापरीक्षा, स्वभाव-वर्तवणूक- यशस्वी कसे व्हावे आदी आदी. यात साहित्याशी संबंधीत कितीक पुस्तके होती? याच चालीवर वरील लेख असावेत/ किंवा वर्गवारी वाचावी असे मला वाटते. वरील वक्तव्याचा अर्थाअर्थानेही लेखीकेने लिहीलेल्या धाग्याशी संबंध नाही पण मला वाटले ते दीवाळी अंकांच्या संदर्भाने आले आहे.

पूर्वी धनंजयचा अंक वाचायचो. लेखकही अत्यंत दर्जेदार असायचे. हल्ली मात्र वाचनीयता जरा घसरल्यासारखी वाटते.

In reply to by प्रचेतस

यंदा कथांचा दर्जा अजिबात राखला गेलेला नाहीये. रहस्यकथा, भयकथा, युद्धकथा, शिकारकथा - या तुलनेने उपेक्षित मानल्या गेलेल्या कथाप्रकाराला प्रतिष्ठा धनंजयने मिळवून दिली हे खरं आहे, पण पूर्वपुण्याईवर किती दिवस ते दर्ज्याशी तडजोड करत राहणार आहेत हा खरा प्रश्न आहे.

प्रतिसादांशी सहमत.इंग्रजी माध्यमांच्या शालेय शिक्षणाने मराठी लेखन मुळातच यथातथा होत चालले आहे.पुलंच्या लिखाणाला कितीदा उकळी काढणार आहेत? त्या साठ-सत्तरच्या दशकांतले समाजजीवन नव्वदीतच बदलले. १ )इंटरनेटच्या प्रसाराने किंचिंत लेखकही त्यांचे लेखन लगेचच कुठेतरी लिहून टाकतात, दिवाळी अंकासाठी पाठवू म्हणून ठेवत नाहीत. २ )कलाकारांच्या मुलाखतीही टिव्हिवर अगोदरच उचितवेळी प्रसारित होऊन जातात. ३)पाककृतींत नवीन काही राहिले नसून नेहमीच्याच कृती कलाकार (= सिलेब्रिटी ) कशा बिघडवतात हे पाहाण्यास अधिक मजा येते. थोडक्यात जे काही थोडंफार चांगलं करमणूक करणारं साहित्य आहे त्यास अगोदरच गळती लागते.रोजच दिवाळी सुरू असते. *बरेचजण आता मोबाइलवरून प्रतिसाद लिहू लागले आहेत त्यामध्ये शुद्धलेखनाच्या चुका संपादन बटण नसल्याने काढता येत नाहीत. ही सोय पुनश्च मिपाने सुरू करावी.

डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/ धन्यवाद यशोधरा. तुम्ही लिंक दिल्याने अंक वाचला. आदिवासी संस्कृतीचा आणि भारतीय मुस्लिम खाद्यसंस्कृतीवरचा मोहसिनाजींचा लेख विशेष वाचनीय.

महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक आज हातात आलाय. मराठी ग्रंथालयाने १३४ अंक वाचनासाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. बालविभागात २२ अंक वाचनासाठी उपलब्ध आहेत. दुष्काळ आणि महराष्ट्राची जलसंपत्ती हा विभाग वाचनीय असेलसे वाटते आहे. श्रीकांत बोजेवार, हर्ष भोगले इत्यांदिचे लेखन दिसते आहे. वाचून झाला की आवडलेल्या लेखांविषयी लिहीन.

सुषमा स्वराज आणि हिलरी क्लिंटन यांचा परिचय, हर्ष भोगले यांचा आपल्या नसलेल्या क्रीडासंस्कृतीचं परखड विश्लेषण करणारा लेख, श्रीकांत बोजेवार यांचा बाॅलिवूडमध्ये २००० ते २०१५ या १५ वर्षांत आलेल्या बदलांवरचा लेख, मराठवाड्यावरचे विजय दिवाण आणि रवी कोरडे यांचे लेख - हे चांगले लेख. प्रकाश बाळ आणि आनंद पाटील यांचे अनुक्रमे युरोपमधील निर्वासित आणि शेक्सपिअरचा प्रभाव यांच्याबद्दल लेख आहे. त्यातला प्रकाश बाळांचा लेख अप्रतिम आहे. जागतिकीकरण आणि आर्थिक स्थलांतर आणि त्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारे बदल यांचा परस्परांशी असलेला संबंध त्यांनी छान उलगडून दाखवलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

हिलरीवरचा लेख ओके वाटला. लढा इथला संपत नाही - सुरेखा दळवी ह्यांनी जंगले आणि आदिवासी लोकांचे हक्क व समस्या ह्यावर लिहिलेला लेख सुरेख. सुषमा स्वराज ह्यांच्यावरचाही लेख चाम्गला आहे. एक सत्यकथा - सपनोंकी सरहद नहीं होती वाचून फार अस्वस्थ वाटते. बाकी अजून वाचतेय.

वाचतेय.डिजिटल दिवाळीचे काही लेख छान तर काही बाळबोध वाटले.विशेषतः स्वतः सायली राजाध्यक्ष यांचा चहावरचा लेख.मिपाभाषेत जिलबी पाडली आहे! शुभांगी गोखले यांचे सुरेख अभिवाचन अचानक त्रोटकपणे संपले आहे. लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!

In reply to by अजया

लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!
अग्गागा! म्हणजे आता तुला त्यातील काही आवडले नाही तर माझे दात उपटशील तर! =))

हो मग! पुण्याला फेरी आहेच पुस्तकं आणि अंक घेण्यासाठी.लगेहाथ ..

In reply to by अजया

व्हा हो, पण त्याआधी पुण्याला नाक न मुरडण्याची सवय लावा ब्वॉ नाकाला =)) येल्कम! :)

नाक मुरडण्याचे सर्वाधिकार राखून ठेवले आहेत. काय ते मेलं पुणं.फ्लॅट शोध मोहिमेतच प्रदुषणाने घसा धरला ,डोळे लाल झाले =))) फार अवांतर झाले गो ;)

In reply to by विंजिनेर

किस्त्रिममधले श्यामसुंदर मुळे, ह मो मराठे, मकरंद करंदीकर, डॉ. माणिक खेर ह्यांचे लेख मला आवडले. बराचसा अंक वाचायचा बाकी राहिला. पुन्हा आणेन. ही किस्त्रिम दिवाळी अंक २०१६ ची अनुक्रमणिका.

In reply to by यशोधरा

कविता विभागातः प्रवीण दवणे आदित्य दवणे एकाच तिकिटात दोन धमाल बालनाट्ये! ------- कथा विभाग कसा आहे?

In reply to by आदूबाळ

ओहो! बालराजांचं देखील काव्यसृष्टीत आगमन? हे म्हणजे मराठी सारस्वताच्या अंगणात पडलेलं शरदाचं सुंदर चांदणं! आता प्रवीणसुत(?) आणि दस्तुरखुद्द संमेलनाध्यक्ष प्रवीण मिळून मराठी भाषेला सुंदर सुंदर कवितांची फुलं अर्पण करतील. मित्रांनो, आपलं आयुष्य सुद्धा असंच असतं कि नाही, म्हणजे बघा नाती बहरतात ती मनाच्या हिरव्यागार......... :P :P

दिवाळी अंक वाचायला वेळ लागतो तो दिवाळीत मिळत नाही. थोडं थांबा आणि महिन्याने धागा येईल वरती. एक विशेष गोष्ट म्हणजे मायबोलीचा दिवाळी अंक दोन वर्ष निघाला नाही हे फार विचित्र वाटतं.

अजुन वेगवेगळ्या लिंक्स इथे पोस्ट करता आल्या तर उत्तम होइल....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

सकाळचा दिवाळी अंक आला आहे आज. साप्ताहिक सकाळ नव्हे. काहीच खास नाही. काही पाने सेलेब्रिटींनी आपापल्या जोडेदाराला प्रपोझ कसे केले, काही पाने सामान्य वाचकांनी एकमेकांना प्रपोझ कसे केले आणि उरलेली पाने नांदेड सिटी व अन्य बांधकामे पुण्याच्या सौंदर्यात (?!) कशी भर घालती झाली आहेत त्यावर. काही ३-४ पाने प्रेमकविता आहेत म्हणे. अजून वाचल्या नाहीत. अंक नाही वाचला तरी चालेल.

In reply to by यशोधरा

अगाई! (डोले झाकून अश्रू ढाळणारी स्मायली) एकेकाळी रविवार सकाळ दिवाळी अंकात इतर भारतीय भाषांतल्या कथांचे अनुवाद असत. भीष्म सहानी, मंटो, जयकांतन वगैरे नावं त्यातूनच समजली. ये कहां आ गये हम!

In reply to by आदूबाळ

तो अंक बंद झाला, हे आमच्या पेपर काकांनी सांगितले. ऐकून शॉक बसला, खरेच :(

आता यायला लागलेत, काही दिवाळी अंक मागच्या आठवड्यात प्रकाशित झाले. ते बुकगंगा कडे यायला आणखीन काही दिवस लागले. तेंव्हा आता दिवाळी झाल्यावरच बोलावू. वरील चर्चेवरुन लोकसत्ता आणि डिजीटल दिवाळी अंक चांगला दिसतोय. अक्षर, अंतर्नाद, इत्यादी, कथाश्री कुणी वाचलेय का? कसे आहेत? सध्यातरी लोकसत्ता आणि आवाज (आवाज हा हवाच) बोलवनार. युनिक फीचर्सने माझी कथा त्यांच्या दिवाळी अंकात प्रकाशित केल्याने युनिक फीचर्सचे चारही दिवाळी अंक आणि प्रकाश आमटे चे प्रकाशवाटा हे पुस्तक बुकगंगावरुन बोलावलेय. अजून पोहचायचे आहेत.

कालनिर्णय दिवाळी अम्क वाचत आहे, ग्रॅहम बेलने केलेली संशोधन श्रेय घेण्यासाठी केलेली लबाडी यावर एक चांगला लेख आहे , बाकी अम्क अजूनतरी वाचला नाही. घरच्या अंकातले उरलले प्रवेश साकारत आहे (लेकीला शाळेला सुट्टी आहे,आणि मी हाफीसात आहे)

यावेळी धनंजयचा अंक अगदी फसलाय. अगदी भिकार रहस्यकथा आहेत, अनुवाद तर अगदी पोरकट झालेत सगळे.

उत्तम अनुवाद , युनिक फीचर्स चा महा अनुभव आणि लोकमत दीपोत्सव छान आहेत. विशेष करून लोकमत दीपोत्सव. बाकी लोकसत्ता ,मटा, नेहमीप्रमाणे दर्जा राखून आहेत. पुरुष स्पंदन चांगला झालाय. ऋतुरंगही ठीक. बाकी वाचून कळवतो. चांगले 20-25 अंक आणले आहेत हळू हळू भर टाकतो

हे पेपरवाले जशी ऑनलाईन आवृत्ती काढतात रोजच्या अंकाची तशी दिवाळी अंकाची काढत नाहीत का? असल्यास लिंका देणे ज्याने वाचल्यात त्याने. कृपा होईल.

In reply to by अभ्या..

भावा, आमचाबी हाय ई-अंक. फुरसतीत वाचण्यासारखा. http://www.evivek.com/DiwaliAnk2016. (ई-अंकात रूपांतर (कन्व्हर्जन) करताना काही त्रुटी (उदा. 'द्ध'ऐवजी 'ध्द') राहून जातात, त्या चालवून घ्या.) या अंकातली माझी शिफारस - आर्थिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी 'मेक इन इंडिया' - प्रा.डॉ. ज्येष्ठराज जोशी आणि प्रा.डॉ. मिलिंद सोहोनी यांची मुलाखत माझी आनंदयात्रा - शशिकांत सावंत (खास वाचनवेड्यांसाठी) मुक्त-विमुक्त बंदिश - रेणू दांडेकर - शांतीनिकेतनवरचा लेख गगनविहार - डॉ. बाळ फोंडके - इस्रोची वाटचाल भेटवा विठ्ठलाला - विद्याधर ताठे - पंढरपूर विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी (सर्वांसाठी) खुलं व्हावं, यासाठी साने गुरुजींनी दिलेल्या लढ्यावर प्रदीर्घ लेख अशोकायण - अरुणचंद्र पाठक - सम्राट अशोकावर लेख. विज्ञानवादी भविष्यवेत्ता - रमेश पतंगे - ऑलविन टॉफलरवर लेख. तसा छापील अंकही आहे... ४८० पानांचा, जाडजूड.

In reply to by यशोधरा

ई-अंक म्हणजे छापील अंकाची पीडीएफ नाही. त्यामुळे ई-अंकात जाहिराती, रेखाचित्रं नाहीत. तसंच, कविता अजून अपलोड केलेल्या नाहीत. फक्त महत्त्वाचे लेख, कथा, मुलाखत, परिसंवाद इ. अपलोड केले आहेत. त्यातलेच काही 'माझी शिफारस' म्हणून वर दिले आहेत.

न्या.चपळगांवकर यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय साम्जीक योगदान्,तत्कालीन घटनांवर परिणाम करणारे निर्णय्,आणि स्वभावाचे,तत्वांचे पैलु उलगडून दाखविणारा लेख आहे.अर्थात वाचनीय आणि दखलपात्र आहे.मला आवडलेला भाग. "१९४८ मध्ये भाषण करताना सरदार म्हणतात या देशात आपला देश म्हणून राहिलेल्या मुस्लीमांनी फक्त हा देश आमचा आहे असे म्हणून चालणार नाही तर तसे सिद्ध करावे लागेल्,जेंव्हा पाकिस्तानने काश्मीरात हिंदुवर हल्ला करून हत्याकांड केला त्याचा जोरदार निषेध का केला नाही. एकदा इ़कडे राहिल्यावर निष्ठा इकडेच पाहिजेत.दोन घोड्यांवर स्वार होऊन चालणार नाही आणि त्याला भविष्यही नाही" जमल्यास किमान या उतार्याचीतरी पीडीएफ टाक्ण्याचा प्रयत्न करतो अर्थात त्यांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांनाही चांगले खडे बोल सुनावले आहेत. दिवाळी अंक वाचक नाखु

रेषेवरची अक्षरेचा अंक गेली काही वर्षे निघतो आहे तो दिसला नाही. मात्र यंदा दिवाळी अंकांची परिक्षणं करणार आहेत असं दिसतंय ल्क्ष ठेवायला हवं इथे

मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक, खास काही नाही. bridges of madison county चा अनुवाद मेहता तर्फे प्रकाशित होतोय, त्याचा काही भाग ह्या अंकात आहे. अनुवाद फारसा पकड घेत नाहीये.. नाही आवडला इतका. बाकी अंक ठीकच. दिप्ती नवलने लिहिलेल्या द मॅड तिबेटीयन ह्या पुस्तकाच्या काही भागाचा अनुवाद बरा आहे. मूळ पुस्तक वाचावयास हवे असे वाटले. कविताही आहेत पण अजून वाचल्या नाहीत. तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... असे वाचले, मग नंतरच वाचू असे ठरवलेय.

In reply to by यशोधरा

तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... अकु आता दिवाळी अंकांतूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध करायला लागले? चांगली प्रगति आहे!!

दिवाळी अंक यायला लागले आहेत. वाचून काही वाटलं तर लिहीन. तो पर्यंत केवळ पोच. धाग्यावर लक्ष ठेवून आहे. ( सो ही पोच) \ -दिलीप बिरुटे

उपलब्ध इअंकांमध्ये - साधनाच्या अंकातली मराठा आंदोलनावरची डॉ. कसबेंची मुलाखत चांगली आहे. विनय हर्डीकरांचा शरद जोशींवरचा लेख पसरट आहे, पण काही मुद्दे लक्षात घेण्याजोगे आहेत. साधनाच्या युवा अंकातल्या मोनिका लेविन्स्कीच्या भाषणाचा अनुवाद उत्तम. मूळ भाषण - https://www.ted.com/talks/monica_lewinsky_the_price_of_shame?language=en 'मौज' मधला नरेंद्र चपळगावकरांचा नेहरू आणि पटेलांवरचा लेख माहितीपूर्ण आणि संतुलित वाटला.

In reply to by यशोधरा

'मौज' मधला रवींद्र अभ्यंकरांचा गोनिदांवरचा लेख सुरेख आहे. नरेंद्र चपळगावकर पास. विनया जंगले यांचा फुलपाखरे विषयावरच लेख सुरेख माहितीपूर्ण. इतर नामावली चांगलीच आहे. आशा बगे, अनिल अवचट, इरावती कर्णिक, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, गोविंद तळवलकर. यशवंत मनोहर, लक्ष्मिकांत तांबोळी... उफ्फ.. टंकाळा आला. लेख छान आहेत, पण अंकाची मांडणी विस्कळीत वाटली. तरीही वाचनीय.

In reply to by सस्नेह

ते संजोपराव उर्फ़ जालावरचे रावसाहेब जे लेखक आहे त्यांना मौज या दिवाळी अंकाचं विनाकारण कौतुक करायची सवय आहे, आपली अभिरूची कशी उच्च आहे, वगैरे तो प्रकार असतो. त्यांचं लेखन वाचून अंक खरेदी करू नका. आपली आवड़ पाहुन दिवाळी अंक खरेदी करावा असे सुचवीन. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by विशाखा पाटील

मनापासून आभार! डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या भाषणांचे संपादित अंश मिळाले तेथे. ह्या लिंका मी ज्ञानब्रह्मापुढे आहुतीच्या तयारीनं उभा …तर ती जगण्याशी प्रतारणा ठरेल! मी महासमन्वयाचा लहानसा दुवा

आपल्या स्वातीताईचा लेख काही संस्करण करून माझी सहेली ह्या दिवाळी अंकात आला आहे. खाली मूळ लेखाची लिंक दिली आहे, अभिनंदन स्वातीताई! http://www.misalpav.com/node/30637