Skip to main content

बाप्पाचा नैवेद्य - शाही खीर

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 13/09/2016 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पाचा नैवेद्यः शाही खीर . साहित्यः २ लीटर दूध १ वाटी भिजवून, भरडसर वाटलेले तांदूळ पाव वाटीपेक्षा जरा कमी खवा किसून घेणे पाऊण वाटी (किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त) साखर काजू, बदाम, पिस्ता काप अर्धा टीस्पून वेलचीपूड पाव टीस्पून जायफळपूड केशर . कृती: ही खीर मी मातीच्या भांड्यात बनवली आहे, मूळ पाककृतीत मातीच्या भांड्यात किंवा कुंडीत ही खीर बनवली जाते. प्रथम गॅसवर भांडे ठेवून त्यात दूध उकळायला ठेवावे. दुधाला उकळी आली की त्यात तांदळाचा रवा घालून सतत ढवळावे. तांदूळ शिजला की त्यात साखर घालून ढवळावे. खीर हळूहळू घट्ट होत आली की त्यात खवा मिक्स करून घ्यावा. खवा घातल्यावर पाचएक मिनिटे शिजवावे. त्यात सुकामेवा काप, वेलचीपूड, जायफळपूड व केशर मिक्स करावे. ही खीर रात्रभर मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यामुळे या खिरीला अप्रतिम चव येते :) . चांदीचा वर्ख लावून गार सर्व्ह करावी ही शाही खीर. . नोटः टीप : मातीच्या भांड्यात ही खीर बनवली तर चविष्ट लागते, पण मातीचे भांडे नसल्यास नेहमीच्या भांड्यात बनवली तरी चालेल. या खिरीची पाककृती माझ्या बहिणीच्या मुस्लीम मैत्रिणीची आहे, त्यांच्याकडे मातीच्या कुंडीत ही खीर बनवली जाते. त्यात ते केवडा इसेन्सही वापरतात, चालत असेल तर तुम्ही जरूर वापरा.

वाचने 21818
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

सुंदर दिसतेय! मातीच्या भांड्यात म्हणजे फिरनीसारखा प्रकार आहे का हा?

मस्त दिसतेय खिर. एक शंका-रात्रभर फ्रिजमध्येच ठेवायची ना?कारण बाहेर ठेवली तर खराब होईल.

आता तुझी मातीची भांडी बघून घ्यायचा फार मोह होतोय,पण माझ्याकडे एवढ्या माणसांत ती जपून वापरणेच अवघड आहे.

सानिका, खूप महिन्यानी तुझी रेसिपी पाहुन छान वाटल. मी तुझ्या पाककृती,फोटो,त्यातले चमचे सगळच मिस करत होते..एक प्रश्न आहे..मातीचे भांडे वापरल्यास; जरी ते स्वच्छ धुवून घेतले तरी खिरीला मातकट वास नाही येणार?

In reply to by रायनची आई

धन्यवाद रायनची आई :) मातीच्या भांड्यात केलेल्या पदार्थांची चव नेहमीपेक्षा सरसचं लागते अजिबात मातकट वास येत नाही उलट ती चव अतिशय चविष्ट लागते, बनवून बघा आवडेल तुम्हाला नक्की :)

In reply to by रायनची आई

जरी ते स्वच्छ धुवून घेतले तरी खिरीला मातकट वास नाही येणार? मातीचे भांडे स्वयंपाकात वापरण्याआधी त्याचे सिझनिंग केले जाते. म्हणजे नवे कोरे भांडे आणल्यावर, त्यात काठोकाठ पाणी भरुन, रात्रभर नुसते ठेवून द्यायचे. दुसर्‍या दिवशी सकाळी ते पाणी फेकून देऊन पुन्हा ताजे पाणी भरून ते चुलीवर ठेवून त्या पाण्याला उकळी आणायची. पाणी उकळल्यावर फेकून (पाणी फक्त) द्यायचे. आता ते भांडे स्वयंपाकात वापरायला तयार झाले आहे. त्यात शाही खिर, आमटी, भात काहीही बनवा, मातीचा वास येणार नाही. पण पदार्थाला उत्तम स्वाद येईल.

वाह

खीर मस्त एकदम शाही दिसते आहे. स्वाती

सुरेखच

ते मातीच्या वाडग्यात फिरनी देतात त्याची आठवण आली. मस्त टेस्ट असते. मुंबईत १० वर्षापूर्वी चाखली होती.

शाही खीर म्हणजे फिरनीच दिसते आहे. फक्त फिरनीत गुलाबजल वापरतात. बाकी पाककृती मस्तच दिसते आहे. करून पाहण्यात येईल.

मस्त. ह्या खिरीत खव्याऐवजी Condensed Milk घालून पण छान चव लागेल.

छान