✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लोकलपंची २.

अ
अलका सुहास जोशी यांनी
Sun, 09/04/2016 - 22:50  ·  लेख
लेख
लोकलपंचीच्या पहिल्या भागासाठी लिंक http://www.misalpav.com/node/37209 लोकलपंची २. पारसिक डोंगराचा कभिन्न अंधार कापत हिरव्यागार प्रदेशात लोकलसखू एकेकाळी शिरायची . ते नॉस्टेल्जीक दिवस आजही आठवतात . ठाणं एकदाचं उलथलं की "नवी पहा या ही दुनिया " असं निसर्गचित्रं रुळांच्या दुतर्फा उलगडत जायचं .गर्द हिरवा आसमंत लोकलसखीसाठी रुजामे अंथरायचा . डोंगरातल्या मुंब्रादेवीला टाटा करत सखू एक कुर्रेबाज वळण घ्यायची आणि गारव्यात डोंबीला शिरायची . फार नाही हो , फकस्त तीसेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट . ठाणं सोडलं की पाऊण गाडी रिकामीच असायची . रुईयाला सकाळचा कट्टा यथासांग आटोपून आमचा धन्य कंपू रीडिंग रूमला दाखल व्हायचा . तिथे आमच्यासारखी अती अभ्यासू मंडळी फारवेळ चालायची नाहीत . मामालोक लगेच वरात काढायचे . तशीच वरात उरकून अतिशय नाईलाजाने दुपारच्याला मी डोंबिवलीला घरी निघाले होते एक दिवस . माटुंग्याला स्लो कर्जत मिळाली . भरलेली . दिवस पावसाचे. हाडाचा लोकलप्रेमी, सीट भिजली असली तरी ती पुसून घेतो . मला चक्क भिजकी विंडोसीट मिळाली . ती शिस्तीत पुसून उभ्या जनतेला ठेंगा देत मी खिडकी धरली आणि तातडीने पेंगायला लागले. अचानक एक बारकं पोर माझ्या मांडीवर येऊन आदळलं . मी दचकून उठले. बघते तर एक हेंगाडी बाई बडबडायली . "जरा ले लू ना उसकू ,मेरा हात दुखता जी ." आता काय ? " आलिया भोगासी " म्हणत मी पोराला मांडीवर दत्तक घेतलं . बाहेर अजून गोदरेजची झाडी दिसत होती. 'वेळ आहे डोंबीला' , मी पुटपुटले , आणि पहाते तर काय ,पोरगं सगोत्र लागल्यासारखं लग्गेच डाराडूर झालेलं . गाडी अगदी मस्तमजेत ठेक्यात पळत होती. थंडगार वारं केसात एकदम घुसलं आणि मी जागी झाले . पोरग मांडीत शांत झोपलेलं . बाहेर हलका पाऊस . खाडीचा खारा ओला वास नाकात शिरला आणि मी पुरती भानावर आले. मुंब्रा आलं ? खाडीत खारफुटी आपलीच सावली बघत होती . रोज मी आसुसून ते पहायची . पण आज हे पोर मांडीवर , आई कुठाय याची ? मी सुधुर्बुधूर . काही सुचेना. झोपेच्या उत्तम अमलाखाली मी हेंगाडीचं रूप डोळ्यात साठवायला विसरले होते . आता ? पोरगं कसंबसं कमरेवर लोम्बकळत मी तिन्ही दरवाजे हिंडून आले . माझ्या दिव्य babyseating मुळे ते बिचारं कोकलायला लागलं . ओ sss बाई ,ओ sss बाई अशा करुण हाका मारत मीही प्रशस्त भोकाड पसरलं . या रडक्या जुगलबंदीस दाद म्हणून तिसऱ्या दारात दमून लवंडलेली एक लाकूडफाटावाली बाई उठली . एका मिन्टात तिला सिच्युएशन समजली . माझं बकोट पोरासकट धरून ती तरातरा निघाली . आडव्या बाकांवर सुख झालेल्या सगळ्या बायांना रट्टे घालत तिने उठवलं . त्यातच एक या बेंबट्याची हेंगाडी आऊस निघाली . आपले दात दाखवत ती हसताच फाटीवाल्या मावशीने तिला xxxx xxxx xxxx असे अनेकोत्तम आशीर्वाद घालायला सुरुवात केली , तोवर लोकलसखू डोम्बी स्टेशनात शिरायला लागली होती . मी घाईघाई करत उतरले . दरदरून फुटलेला घाम पुसत. मला बिन्धास सटकताना पाहून फाटीवाल्या मावशीने आवाज दिला . काय गं ए भवाने , तुझ्या xxxx xxxx !!!!!! लोकाची प्वार घिऊन झोपा काढतीस का गं फुकने ? आपल्या लाखोलीबरोबरच नेम धरून लाकडाची एक ढलपी तिने मला व्याज म्हणून गाडी सुटतासुटता पाठीत हाणली . या अलंकारिक अहेराला स्मरून मला स्वतःला बाळ होईतो ( उसन्या) मातृत्वाचा कोणताही प्रसंग मी ओढवून घेतला नाही . -------------------------------------------------------------------------------------- कट टू ........ एक ऑक्टोबर १९९१. मला आठवा महिना लागलेला. दोन दिवस सी एल टाकून फर्माईशी खादाडी करावी आणि आरामही , या उत्कृष्ट हेतूने मी डोंबीला आईकडे आले होते . सासर ठाण्याला . डॉक्टर ठाण्याला .डिलिव्हरी ठाण्याला . हे नक्की होत. पण एकदम पोटात दुखायला लागलं . सोसायटीतच डॉक्टर काकू . अनुभवी . त्या म्हणाल्या , या डिलिव्हरीपेन्स आहेत सुरु झालेल्या . पहिली वेळ आहे,हिला वेळ लागेल . तो परवलीचा शब्द मी ऐकला आणि फट्कन उठले . आत्ताच्या आत्ता मी ठाण्याला जाणार . दोघी हबकल्या . त्यांना अजिबात न जुमानता मी दार लावून कपडे बदलले. पर्स खांद्याला अडकवली . गर्जना केली, "इथे पाणी नाही , माझी डॉक्टर नाही, सो , इथे डिलिव्हरी नाही. मी ठाण्याला निघाले"' . आता मी कोणाच्या तीर्थरुपांना ऐकणार नाही हा जगद्विख्यात हट्टी स्वभाव . मी फुल्ल कॉन्फिडन्ट होते. लोकलने फारतर पाऊण तासात आपण ठाणा स्टेशनवर पोचणार. पहिली डिलिव्हरी निदान तीनेक तास काय होत नाही,सो बिन्धास! उतरले, आई आणि काकू मागे धावल्या. आई बिचारी हातात मावेल तितकी कॅश घेऊन माझ्या मागे पळत सुटली काकूंसह . ऑटो मिळाली. डोंबीचा खडा रेल्वेपूल एका दमात चढले , फास्ट लोकलची वेळ नव्हती, स्लो फलाट गाठला . आई- काकू उतरल्याचे पाहिले . लगेच माझी प्रिय सखी आलीच फलाटावर मला घ्यायला. उडी मारून जागा पकडली. दोघी भयंकर घाबरल्या होत्या. अज्ञानातल्या सुखात मी मश्गुल होते, गाडीत बायकांनी शिव्यांची लाखोली घालायला सुरुवात केली. आई अगदी बापुडवाणी होऊन गेली. गाडी वेगात लयीत पळत होती. वेळेत ठाणा आलं . बायकांनी एका दाराची खिंड लढवली. कोणालाही तिथून चढू उतरू दिले नाही. अस्मादिक आई - काकूसह उतरले. सखीला आनंदाने टाटा केला. वेळेवर ऍडमिट झाले आणि तासाभरात आई झालेसुद्धा. हे वेडं धाडस किती आचरटपणाच हे समजलं तेंव्हा पायाखालची जमीन सरकली होती . माझ्या इम्पल्सिव्ह वेडेपणाला सांभाळून घेणारी, कानकोंडी झालेली माझी आई आता नाही. लोकल आहे. अजून. आणि ती राहिलंही . मी आहे तोवर ती असणारच माझ्यासाठी, नक्की. ----------------------------------------------------------------------------------------

Book traversal links for लोकलपंची २.

  • ‹ लोकलपंची.
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक

प्रतिक्रिया द्या
7476 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

सुंदर आठवण आणि ते वेडं धाडस

भिंगरी
Sun, 09/04/2016 - 23:46 नवीन
सुंदर आठवण आणि ते वेडं धाडस
  • Log in or register to post comments

ओह! काय प्रतिक्रिया देऊ? खूप

संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 02:53 नवीन
ओह! काय प्रतिक्रिया देऊ? खूप सुंदर लिहिलंय. आवडलं. पुलेशु.
  • Log in or register to post comments

मस्त!

हुप्प्या
Mon, 09/05/2016 - 10:09 नवीन
खरे आहे. ३० वर्षापूर्वी मुंबईहून कल्याणकडे जाताना ठाणे ओलांडले की मुंब्र्याचे डोंगर फारच सुंदर दिसत. पावसाळ्यात तर एखाद्या हिलस्टेशनच्या तोडीची दृष्ये दिसत. मुंब्रा, दिवा ही सगळी स्टेशने निवांत असत. खाडीला भरती असली की दिवा डोंबिवली प्रवास समुद्राच्या काठाने होतो आहे की काय असे वाटायचे. आता सगळे गेले. मुंब्र्याच्या आसपासचा भाग सगळा झोपडपट्ट्यांनी बरबटला आहे. डोंगर, झाडे हरवली. कित्येक वर्षात लोकलमधे पाऊल टाकलेले नाही (तशीही पाऊल टाकण्याइतपत जागा लोकलमधे मिळणे कठिण होत चालले आहे असे ऐकले आहे!) बाकी तुमच्या आठवणी फारच आवडल्या. अनेक वर्षे ह्याच स्टेशनांत लोकलपंची केलेली असल्यामुळे जरा जास्तच!
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलय.. आवडल.

जेपी
Mon, 09/05/2016 - 19:32 नवीन
मस्त लिहीलय.. आवडल.
  • Log in or register to post comments

काय सुरेख लिहिलंय!

यशोधरा
Mon, 09/05/2016 - 19:46 नवीन
काय सुरेख लिहिलंय!
  • Log in or register to post comments

सुंदर लेख.

प्रचेतस
Mon, 09/05/2016 - 19:49 नवीन
सुंदर लेख.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

एस
Mon, 09/05/2016 - 21:30 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

मस्तच

Rahul D
Tue, 09/06/2016 - 00:49 नवीन
धन्यवाद लहानपणीचे दिवस आठवले.
  • Log in or register to post comments

=)) खूप सुंदर लिहिताय!

रातराणी
Tue, 09/06/2016 - 10:14 नवीन
=)) खूप सुंदर लिहिताय! पुभाप्र!
  • Log in or register to post comments

मस्त आवडले.

प्रमोद देर्देकर
Tue, 09/06/2016 - 10:29 नवीन
मस्त आवडले. बघ बघ यशोतै ( नि.गो.) खाडी अलिकडचे जग किती सुंदर असते ते. आणि तु दु दु चिडवतेस.
  • Log in or register to post comments

=))

यशोधरा
Tue, 09/06/2016 - 13:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

मस्तच!

बोका-ए-आझम
Tue, 09/06/2016 - 10:53 नवीन
लोकलचा लेडीज डबा म्हणजे अनेक ष्टो-यांची खाण. त्यातले काही gems आमच्यासमोर मांडल्याबद्दल धन्यवाद. बाकी मुंब्रा रेतीबंदराच्या कडेने रेल्वे जेव्हा जायची तेव्हा खाडी, रस्ता आणि धावणारी रेल्वे बघून ' मेरे सपनों की रानी कब आयेगी तू ' हे गाणं आठवल्याशिवाय राहायचं नाही.
  • Log in or register to post comments

मूळ लेखाला

नाखु
Tue, 09/06/2016 - 13:53 नवीन
मनापासून दाद... रच्याकाने, बोकोबा त्या गाण्याचा परिणाम स्वरूप शेवट काही झाला की नाही? राणी आली का नाही?.. पळा अता ...पळालेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मलापण,मलापण!!

अलका सुहास जोशी
Wed, 09/07/2016 - 11:46 नवीन
मलापण,मलापण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कसलं खल्लास लिहिलं आहेत!

स्वीट टॉकर
Tue, 09/06/2016 - 13:21 नवीन
कसलं खल्लास लिहिलं आहेत! मिपावर स्वागत! तुमच्या चिरंजीवांनी 'नेहमीप्रमाणेच छान' असं लिहिलं आहे त्या अर्थी तुमच्याकडे बरंच लिखाण तयार असणार. आम्हाला मेजवानी आहे. पुढच्या लेखांची वाट बघतो.
  • Log in or register to post comments

हा पण भाग मस्त....

मुक्त विहारि
Tue, 09/06/2016 - 14:05 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मस्त !

चिनार
Tue, 09/06/2016 - 14:17 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

दोन चांगलया

नाखु
Tue, 09/06/2016 - 14:26 नवीन
आठवणी.. पुलेशु
  • Log in or register to post comments

किती सुरेख लिहिलंय. मस्तं.

पद्मावति
Tue, 09/06/2016 - 14:29 नवीन
किती सुरेख लिहिलंय. मस्तं.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

पैसा
Tue, 09/06/2016 - 15:41 नवीन
जबरदस्त! दोन्ही प्रसंग अगदी कायमचे लक्षात रहाण्यासारखेच! म्हणून तुमचे चिरंजीव औरंगझेब का! =))
  • Log in or register to post comments

एक्सलंट ! एक्सलंट !

वेल्लाभट
Tue, 09/06/2016 - 15:59 नवीन
एक्सलंट ! एक्सलंट !
  • Log in or register to post comments

छान

चंपाबाई
Tue, 09/06/2016 - 22:35 नवीन
छान
  • Log in or register to post comments

मस्त.......

अमितसांगली
Wed, 09/07/2016 - 12:19 नवीन
मस्त.......
  • Log in or register to post comments

लय भारी

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 09/07/2016 - 12:33 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

अनेक आभार सर्वांचे! पुलेलौटा

अलका सुहास जोशी
Wed, 09/07/2016 - 12:38 नवीन
अनेक आभार सर्वांचे! पुलेलौटा (पुढील लेख लौकर टाकते.)
  • Log in or register to post comments

किती सुरेख लिहिलंय. भारी....

सुमेधा पिट्कर
Wed, 09/07/2016 - 15:02 नवीन
रोजचाच लोकल प्रवास असल्याने तर फारच मनापासुन पटल, दोन्ही प्रसंग अगदी कायमचे लक्षात रहाण्यासारखेच! पुलेलौटा(टाका)
  • Log in or register to post comments

ललित,

प्रसाद_१९८२
Wed, 09/07/2016 - 15:31 नवीन
आवडले, एकदम क्लास लिहिलेय.
  • Log in or register to post comments

फाटीवाल्या मावशीने आवाज दिला

जव्हेरगंज
Wed, 09/07/2016 - 20:03 नवीन
फाटीवाल्या मावशीने आवाज दिला . काय गं ए भवाने , तुझ्या xxxx xxxx !!!!!! लोकाची प्वार घिऊन झोपा काढतीस का गं फुकने ? आपल्या लाखोलीबरोबरच नेम धरून लाकडाची एक ढलपी तिने मला व्याज म्हणून गाडी सुटतासुटता पाठीत हाणली . या अलंकारिक अहेराला स्मरून मला स्वतःला बाळ होईतो ( उसन्या) मातृत्वाचा कोणताही प्रसंग मी ओढवून घेतला नाही . याकरता आमच्याकडून एक विशेष दंडवत _/\_ काय क ह र लिहीलंय!! मजा आ गया!
  • Log in or register to post comments

मस्त लिखाण!

बहुगुणी
गुरुवार, 09/08/2016 - 01:08 नवीन
लोकल चा हा डोंबिवली प्रवास काही वर्षे चाकाखालचा होता, त्यामुळे ओळखीच्या खुणा जाणवल्या. पाचच भागांत संपवणार का? आणखीही भरपूर लिहिण्यासारखं असणार तुमच्याकडे, आधिक भाग झाले तरी वाचक वाचतीलच. येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा