लोकलपंची २.
लोकलपंचीच्या पहिल्या भागासाठी लिंक http://www.misalpav.com/node/37209
लोकलपंची २.
पारसिक डोंगराचा कभिन्न अंधार कापत हिरव्यागार प्रदेशात लोकलसखू एकेकाळी शिरायची . ते नॉस्टेल्जीक दिवस आजही आठवतात . ठाणं एकदाचं उलथलं की "नवी पहा या ही दुनिया " असं निसर्गचित्रं रुळांच्या दुतर्फा उलगडत जायचं .गर्द हिरवा आसमंत लोकलसखीसाठी रुजामे अंथरायचा . डोंगरातल्या मुंब्रादेवीला टाटा करत सखू एक कुर्रेबाज वळण घ्यायची आणि गारव्यात डोंबीला शिरायची . फार नाही हो , फकस्त तीसेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट . ठाणं सोडलं की पाऊण गाडी रिकामीच असायची .
रुईयाला सकाळचा कट्टा यथासांग आटोपून आमचा धन्य कंपू रीडिंग रूमला दाखल व्हायचा . तिथे आमच्यासारखी अती अभ्यासू मंडळी फारवेळ चालायची नाहीत . मामालोक लगेच वरात काढायचे . तशीच वरात उरकून अतिशय नाईलाजाने दुपारच्याला मी डोंबिवलीला घरी निघाले होते एक दिवस . माटुंग्याला स्लो कर्जत मिळाली . भरलेली . दिवस पावसाचे. हाडाचा लोकलप्रेमी, सीट भिजली असली तरी ती पुसून घेतो . मला चक्क भिजकी विंडोसीट मिळाली . ती शिस्तीत पुसून उभ्या जनतेला ठेंगा देत मी खिडकी धरली आणि तातडीने पेंगायला लागले. अचानक एक बारकं पोर माझ्या मांडीवर येऊन आदळलं . मी दचकून उठले. बघते तर एक हेंगाडी बाई बडबडायली . "जरा ले लू ना उसकू ,मेरा हात दुखता जी ." आता काय ? " आलिया भोगासी " म्हणत मी पोराला मांडीवर दत्तक घेतलं . बाहेर अजून गोदरेजची झाडी दिसत होती. 'वेळ आहे डोंबीला' , मी पुटपुटले , आणि पहाते तर काय ,पोरगं सगोत्र लागल्यासारखं लग्गेच डाराडूर झालेलं . गाडी अगदी मस्तमजेत ठेक्यात पळत होती.
थंडगार वारं केसात एकदम घुसलं आणि मी जागी झाले . पोरग मांडीत शांत झोपलेलं . बाहेर हलका पाऊस . खाडीचा खारा ओला वास नाकात शिरला आणि मी पुरती भानावर आले. मुंब्रा आलं ? खाडीत खारफुटी आपलीच सावली बघत होती . रोज मी आसुसून ते पहायची . पण आज हे पोर मांडीवर , आई कुठाय याची ? मी सुधुर्बुधूर . काही सुचेना. झोपेच्या उत्तम अमलाखाली मी हेंगाडीचं रूप डोळ्यात साठवायला विसरले होते . आता ? पोरगं कसंबसं कमरेवर लोम्बकळत मी तिन्ही दरवाजे हिंडून आले . माझ्या दिव्य babyseating मुळे ते बिचारं कोकलायला लागलं . ओ sss बाई ,ओ sss बाई अशा करुण हाका मारत मीही प्रशस्त भोकाड पसरलं . या रडक्या जुगलबंदीस दाद म्हणून तिसऱ्या दारात दमून लवंडलेली एक लाकूडफाटावाली बाई उठली . एका मिन्टात तिला सिच्युएशन समजली . माझं बकोट पोरासकट धरून ती तरातरा निघाली . आडव्या बाकांवर सुख झालेल्या सगळ्या बायांना रट्टे घालत तिने उठवलं . त्यातच एक या बेंबट्याची हेंगाडी आऊस निघाली . आपले दात दाखवत ती हसताच फाटीवाल्या मावशीने तिला xxxx xxxx xxxx असे अनेकोत्तम आशीर्वाद घालायला सुरुवात केली , तोवर लोकलसखू डोम्बी स्टेशनात शिरायला लागली होती . मी घाईघाई करत उतरले . दरदरून फुटलेला घाम पुसत. मला बिन्धास सटकताना पाहून फाटीवाल्या मावशीने आवाज दिला . काय गं ए भवाने , तुझ्या xxxx xxxx !!!!!! लोकाची प्वार घिऊन झोपा काढतीस का गं फुकने ? आपल्या लाखोलीबरोबरच नेम धरून लाकडाची एक ढलपी तिने मला व्याज म्हणून गाडी सुटतासुटता पाठीत हाणली . या अलंकारिक अहेराला स्मरून मला स्वतःला बाळ होईतो ( उसन्या) मातृत्वाचा कोणताही प्रसंग मी ओढवून घेतला नाही .
--------------------------------------------------------------------------------------
कट टू ........
एक ऑक्टोबर १९९१. मला आठवा महिना लागलेला. दोन दिवस सी एल टाकून फर्माईशी खादाडी करावी आणि आरामही , या उत्कृष्ट हेतूने मी डोंबीला आईकडे आले होते . सासर ठाण्याला . डॉक्टर ठाण्याला .डिलिव्हरी ठाण्याला . हे नक्की होत. पण एकदम पोटात दुखायला लागलं . सोसायटीतच डॉक्टर काकू . अनुभवी . त्या म्हणाल्या , या डिलिव्हरीपेन्स आहेत सुरु झालेल्या . पहिली वेळ आहे,हिला वेळ लागेल . तो परवलीचा शब्द मी ऐकला आणि फट्कन उठले . आत्ताच्या आत्ता मी ठाण्याला जाणार . दोघी हबकल्या . त्यांना अजिबात न जुमानता मी दार लावून कपडे बदलले. पर्स खांद्याला अडकवली . गर्जना केली, "इथे पाणी नाही , माझी डॉक्टर नाही, सो , इथे डिलिव्हरी नाही. मी ठाण्याला निघाले"' . आता मी कोणाच्या तीर्थरुपांना ऐकणार नाही हा जगद्विख्यात हट्टी स्वभाव . मी फुल्ल कॉन्फिडन्ट होते. लोकलने फारतर पाऊण तासात आपण ठाणा स्टेशनवर पोचणार. पहिली डिलिव्हरी निदान तीनेक तास काय होत नाही,सो बिन्धास! उतरले, आई आणि काकू मागे धावल्या. आई बिचारी हातात मावेल तितकी कॅश घेऊन माझ्या मागे पळत सुटली काकूंसह . ऑटो मिळाली. डोंबीचा खडा रेल्वेपूल एका दमात चढले , फास्ट लोकलची वेळ नव्हती, स्लो फलाट गाठला . आई- काकू उतरल्याचे पाहिले . लगेच माझी प्रिय सखी आलीच फलाटावर मला घ्यायला. उडी मारून जागा पकडली. दोघी भयंकर घाबरल्या होत्या. अज्ञानातल्या सुखात मी मश्गुल होते, गाडीत बायकांनी शिव्यांची लाखोली घालायला सुरुवात केली. आई अगदी बापुडवाणी होऊन गेली. गाडी वेगात लयीत पळत होती. वेळेत ठाणा आलं . बायकांनी एका दाराची खिंड लढवली. कोणालाही तिथून चढू उतरू दिले नाही. अस्मादिक आई - काकूसह उतरले. सखीला आनंदाने टाटा केला. वेळेवर ऍडमिट झाले आणि तासाभरात आई झालेसुद्धा.
हे वेडं धाडस किती आचरटपणाच हे समजलं तेंव्हा पायाखालची जमीन सरकली होती . माझ्या इम्पल्सिव्ह वेडेपणाला सांभाळून घेणारी, कानकोंडी झालेली माझी आई आता नाही. लोकल आहे. अजून. आणि ती राहिलंही . मी आहे तोवर ती असणारच माझ्यासाठी, नक्की.
----------------------------------------------------------------------------------------
Book traversal links for लोकलपंची २.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
सुंदर आठवण आणि ते वेडं धाडस
ओह! काय प्रतिक्रिया देऊ? खूप
मस्त!
मस्त लिहीलय.. आवडल.
काय सुरेख लिहिलंय!
सुंदर लेख.
अप्रतिम!
मस्तच
=)) खूप सुंदर लिहिताय!
मस्त आवडले.
=))
मस्तच!
मूळ लेखाला
मलापण,मलापण!!
कसलं खल्लास लिहिलं आहेत!
हा पण भाग मस्त....
मस्त !
दोन चांगलया
किती सुरेख लिहिलंय. मस्तं.
जबरदस्त!
एक्सलंट ! एक्सलंट !
छान
मस्त.......
लय भारी
अनेक आभार सर्वांचे! पुलेलौटा
किती सुरेख लिहिलंय. भारी....
ललित,
फाटीवाल्या मावशीने आवाज दिला
फाटीवाल्या मावशीने आवाज दिला . काय गं ए भवाने , तुझ्या xxxx xxxx !!!!!! लोकाची प्वार घिऊन झोपा काढतीस का गं फुकने ? आपल्या लाखोलीबरोबरच नेम धरून लाकडाची एक ढलपी तिने मला व्याज म्हणून गाडी सुटतासुटता पाठीत हाणली . या अलंकारिक अहेराला स्मरून मला स्वतःला बाळ होईतो ( उसन्या) मातृत्वाचा कोणताही प्रसंग मी ओढवून घेतला नाही .याकरता आमच्याकडून एक विशेष दंडवत _/\_ काय क ह र लिहीलंय!! मजा आ गया!मस्त लिखाण!