आपण एवढे उद्धट का?
['या सार्वजनिक सणांचे करायचे तरी काय' ह्यावर एक प्रतिक्रिया दिल्यानंतर आणि इतरांच्या वाचल्यानंतर काही विचार मनात आले तेव्हा लक्षात आले की हा थोडा general विषय होतो आहे. म्हणून हे नवीन लिखाण.]
माझ्या स्वतःच्या आणि इतर जवळचे मित्र व आप्तेष्ट ह्यांच्या परदेशातील विविध अनुभवावरून असे दिसते की आपण भारतीय लोक एकूणच सामाजिक व्यवहारात दुसऱ्यांशी उर्मटपणे किंवा उद्धटपणे वागतो, आपल्यात बऱ्याचदा किमान सौजन्याचासुद्धा अभाव असतो. हे असे का? असे काय झाले की ज्यामुळे आपण भारतीय असे 'वैशिष्ठ्यपूर्ण' बनलो? मी कुणी अभ्यासू, सामाजिक शास्त्रज्ञ, वगैरे नाही. मला पडलेल्या प्रश्नाचा मागोवा scientifically कसा घ्यावा मला माहीत नाही. म्हणून हे पोस्ट.
माझ्या मते दोन कारणे संभवतात; एक, आपल्या समाजात समता हे तत्व कधीच नव्हते. त्यास जातीभेद हे बहुधा प्रमुख कारण असावे. जातीच्या उतरंडीत कुणीतरी माझ्या वर असतो, कुणीतरी खाली. बरोबर कुणी नाही. त्यामुळे मी लांगुलचालन करतो किंवा उर्मटपणाने वागतो. दुसरा माझ्यासमान आहे, त्याला माझ्याइतकेच हक्क आहेत, हे आमच्या रक्तातच शिरलेले नाही. ह्याची उदाहरणे द्यायची गरज नाही इतक्या संख्येने ती आपल्याला दिसतात. शिकली सवरलेली माणसे असंस्कृतपणे वागतात, आणि भारतात असेच वागायला हवे असे ते मानतात. दुकानात चार कस्टमर्स पुढे असतानाही मध्ये घुसून आपणास हव्या असलेल्या गोष्टींची मोठ्या आवाजात ऑर्डर देणे, रांगेत घुसणे, कुणी आपल्यापुढे (आपल्या दृष्टीने) जरा हळू गाडी चालवत असेल तर त्याला 'तुम्हारे बाप का रास्ता है क्या' विचारणे, आजूबाजूला कुणी आहे नाही हे न बघता थुंकणे, इ. गोष्टी सामान्य आहेत. एकदा You Tube वर कुणीतरी रफी साहेबांची त्याला आवडणारी गाणी टाकली आणि त्यांची थोडीशी माहिती दिली होती. त्यात रफीच्या जन्मतारखेत एक चूक झाली; 1924 चे 1942 झाले. तर एकाने comment काय टाकावी? 'अबे, तू क्या दो पेग पिया था क्या?' आपण इतके असहिष्णू व असभ्यपणे वागतो. आपण ईशान्य भारतातील लोकांना त्यांच्या दिसण्यावरून हिणवतो. कारण उच्च नीचता भाव आपल्यात भिनलेला आहे.
शहरीकरण: लहान गावात ह्या उद्धटपणाला आपसूकच मर्यादा पडतात. सगळेजण एकमेकास ओळखतात. बँकेत काउंटरवरील माणूस मला संध्याकाळी बाजारात नाहीतर सिनेमागृहात भेटतो. आम्ही नावाने एकमेकाला ओळखतो. त्यामुळे उद्धटपणाला किंवा अरेरावीला एक स्वाभाविक मर्यादा पडते. शहरात तसे होत नाही. मी कुणावरही जोरजोरात ओरडू शकतो, भांडण करू शकतो. शहरी जीवनात ताणतणावही खूप अधिक असतात ज्यांचा परिणाम क्षुल्लक गोष्टींवरून वाद आणि भांडणात होतो. ज्यांनी मुंबईतील लोकल गाडीतून बऱ्यापैकी प्रवास केला आहे त्यांना हा मुद्दा लगेच पटेल. आणि हे शहरीकरण वाढतच जाणार आहे. आणि त्याबरोबर आपला उद्धटपणाही. कारण हे शहरीकरण कसे झाले पाहिजे, माणसे इतक्या दाटीवाटीने राहत असताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, ती सर्व घडी कशी घालायला हवी, ह्याबद्दल कोणताही विचार कुठल्याही पातळीवर झाला असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. आता तो होणेही दुरापास्त आहे. सिस्टीम जेवढी जास्त बिघडते तेवढी ती रुळावर आणणे कठीण होऊन बसते. मी माझ्या मुंबईतील, आणि काही प्रमाणात अन्य शहरातील, अनुभवावरून हे विधान करतोय. आणि शिवाय, सुधारणेची काही गरज आहे हे मान्य करणे ही पहिली पायरी असते. तीच जर कुणालाही चढायची नसेल तर पुढे बोलणे बंद.
काही उदाहरणे:
1) रस्त्यावरील वाहतूक: ह्याची एवढी दुर्दशा झाली आहे की काही बोलणे व्यर्थ ठरावे. वाहतूक सुरळीत असण्यासाठी जे जे म्हणून घटक असतात त्यातील एकही धड नाही. वाहतुकीचे नियम, ड्रायव्हर्स चे प्रशिक्षण, सिग्नल सिस्टीम, रोड मार्किंग्स...कुठलाही एलिमेंट घ्या. आपली सरधोपट पद्धत म्हणजे 'प्रॉब्लेम आहे? मग अधिक पोलीस तैनात करा' ही आहे. एक साधा प्रश्न विचारा की कोणत्याही सिग्नलला चार पाच ट्रॅफिक पोलीस कशासाठी हवेत? तेच पोलीस अन्य जास्त महत्त्वाच्या कामाला लावता येणार नाहीत? (आज परिस्थिती अशी आहे की पोलीस नसतील तर कुणीही कुठलाही सिग्नल पाळणार नाही! पण ते कारण नव्हे, परिणाम आहे.) पण हा प्रश्न आपले ट्रॅफिक पोलीस कमिशनर विचारीत नाहीत. ते आपली तीन वर्ष ड्युटी करतात आणि बदली झाली की जातात दुसरीकडे. ह्यातून वाढीला काय लागते तर उद्धटपणा, अरेरावीची वृत्ती, नियम मोडण्याची प्रवृत्ती, प्रसंगी हिंसाचार.
2) जवळपास 1965-70 पर्यंत मुंबईत बस स्टॉपवर लोक रांग लावून बसमद्धे चढायचे. आता आम्ही बस आली की तिच्यावर हल्लाच करतो. हे थांबवणे सहज शक्य होते. बेस्टने फक्त एवढेच करायचे होते की एक जाहिरात द्यायची; रांग नसेल तेथे बस थांबणार नाही. आणि नाही थांबवायची बस जर स्टॉपवर रांग नाही दिसली तर. पण हे तेव्हा नाही केले आणि आता करणे अशक्य आहे.
3) पाश्चिमात्य देशांत, निदान मी हे इंग्लंड मध्ये तरी पहिले आहे, तेही आज नव्हे तर 30 वर्षांपूर्वी, अगदी पोस्ट ऑफिस सारख्या ठिकाणीसुद्धा common queue multiple service windows ही पद्धत असते. आपल्याकडे हे अजूनही अपवादानेच दिसते. का? आपल्याला करता येणार नाही? मुंबईतील रेल्वे स्थानकावर तिकिटाच्या रांगेत उभे असताना अचानक एक खिडकी बंद झाल्यानंतर (उदा, भोजनासाठी) लोक ज्या रीतीने दुसऱ्या खिडकीवर धावतात ते ज्यांनी अनुभवले आहे त्यांना त्यातला त्रास कळेल. पण रेल्वेला त्याचे काय होय? ही बेपर्वा वृत्ती - वि डोन्ट केअर - मग सर्व लोकांत उतरते.
4) सर्वात महत्त्वाचे, शहरात आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशा रीतीने वर्तणूक ठेवण्याबद्दलचे नियम घालून देणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले. परिणामी, शहरे म्हणजे फक्त अवाढव्य वाढलेली खेडी असेच त्याचे रूप झाले. राहणे शहरात, मानसिकता मात्र खेडूतांची ह्या विरोधाचा जो काही परिणाम झाला तो आपणा सर्वांना दिसतोच आहे. शहरे कशी असावीत ह्याच्या सुस्पष्ट कल्पना जर राज्यकर्त्यांना असत्या आणि त्या त्यांनी अंमलात आणल्या असत्या तर ह्या भारतीय मानसिकतेला, जी मुळात असमानतेवर आधारलेली आहे, बऱ्याच प्रमाणात मुरड पडली असती. त्यायोगे सर्व समाज हळूहळू सुधारला असता. ती संधी आपण गमावली. सत्तर वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता एकूण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्येचे प्रमाण, ही दोन्ही प्रचंड वाढली आहेत. त्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट वाढली आहे ती म्हणजे, राजकीय पक्षांचा / नेत्यांचा बेजबाबदारपणा. हे सर्व फार घातक रसायन (potent combination) आहे ज्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. नव्हे, तसे ते होतातच आहेत, फक्त लहान प्रमाणात. उदा. भारतात दर वर्षी एक दीड लाख लोक रस्ते अपघातात मरतात. लोकसंख्येचा विचार केला तरी हे प्रमाण फार जास्त आहे. इतर देशात ह्याच्यावर अतिशय गंभीरपणे विचार झाला असता. आपल्याकडे '80% अपघात हे मानवी चुकांमुळे होतात' असे निष्कर्ष काढले की काम भागते.
मुद्दा असा आहे की कमीतकमी संघर्षाशिवाय माणसे आपापले व्यवहार करतील अशा सिस्टिम्स आखून दिल्या नाहीत व त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली नाही तर हम करेसो कायदा ही वृत्ती, अरेरावी, उद्धटपणा, मग्रुरी, ह्या गोष्टी वाढतच जाणार.
नाहीतर, आपली असमानतेवर आधारलेली भारतीय मनोवृत्ती आणि त्यात अस्ताव्यस्त शहरीकरणाची फोडणी, म्हणजे 'आधीच मर्कट तशातही मद्य प्याला' अशी गट व्हायची. नव्हे, झालीच आहे. कालचा दही हंडीचा शिमगा दुसरे काय दर्शवितो?
असो. हे माझे विचार झाले. तुम्हाला काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा: हा: हा:
कळकळ उत्तम मांडली आहे.
?
अतुल्य भारत!!
उर्मटपणावर लेख आहे
१००% सहमत
आपल्याकडची गोस्ट
अगदी सहमत
तुमच्या विचारांशी सहमत.
सेम.
भारत देश महान नव्हे युद्धमान
अतिशय सहमत
खरच सुंदर धागा.
+११
काही मुद्दे आपण लक्षात घेतले
पूर्णपणे सहमत,
हे जर रोज व्हायला लागले तर
किंचित असहमत.
या विशिष्ठ वाक्याशी नम्रपणे असहमत
थोडे वेगळे
...
आदिवासी
सहमत
@ चंपाबाई....
राहींशी सहमत, मागास
ह्यानंतर कधीही सार्वजनिक
गणपती उत्सव "संपल्यावर"
तुमची उदाहरणे माझ्या
सहमत
परवडण्याचा मुद्दा असा की हे
पुढचे टार्गेट हेलिकॉप्टरच,
;)
सहमत
सहमत.अगदी योग्य
राहींच्या मूळ प्रतिसादाशी
लोकसंख्या
हे कितपत खरे आहे, कळत नाही
माझा अनुभव - Private Sector मधला
काही विशिष्ट समाजाचे /भाषेचे
प्रत्येक गोष्टीशी झगडा
जोपर्यंत माझा मोठेपणा माझ्या
+१ एका वाक्यात उत्तरे द्या!!
घरट्यातील जे पिल्लू अन्नासाठी
चर्चा
:-)) खरयं
त्या मुलाला पश्चात्ताप होत
101% सहमत
१०००००% सहमत.
...
बरं मग?