Skip to main content

आपण एवढे उद्धट का?

लेखक रविकिरण फडके यांनी शुक्रवार, 26/08/2016 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
['या सार्वजनिक सणांचे करायचे तरी काय' ह्यावर एक प्रतिक्रिया दिल्यानंतर आणि इतरांच्या वाचल्यानंतर काही विचार मनात आले तेव्हा लक्षात आले की हा थोडा general विषय होतो आहे. म्हणून हे नवीन लिखाण.] माझ्या स्वतःच्या आणि इतर जवळचे मित्र व आप्तेष्ट ह्यांच्या परदेशातील विविध अनुभवावरून असे दिसते की आपण भारतीय लोक एकूणच सामाजिक व्यवहारात दुसऱ्यांशी उर्मटपणे किंवा उद्धटपणे वागतो, आपल्यात बऱ्याचदा किमान सौजन्याचासुद्धा अभाव असतो. हे असे का? असे काय झाले की ज्यामुळे आपण भारतीय असे 'वैशिष्ठ्यपूर्ण' बनलो? मी कुणी अभ्यासू, सामाजिक शास्त्रज्ञ, वगैरे नाही. मला पडलेल्या प्रश्नाचा मागोवा scientifically कसा घ्यावा मला माहीत नाही. म्हणून हे पोस्ट. माझ्या मते दोन कारणे संभवतात; एक, आपल्या समाजात समता हे तत्व कधीच नव्हते. त्यास जातीभेद हे बहुधा प्रमुख कारण असावे. जातीच्या उतरंडीत कुणीतरी माझ्या वर असतो, कुणीतरी खाली. बरोबर कुणी नाही. त्यामुळे मी लांगुलचालन करतो किंवा उर्मटपणाने वागतो. दुसरा माझ्यासमान आहे, त्याला माझ्याइतकेच हक्क आहेत, हे आमच्या रक्तातच शिरलेले नाही. ह्याची उदाहरणे द्यायची गरज नाही इतक्या संख्येने ती आपल्याला दिसतात. शिकली सवरलेली माणसे असंस्कृतपणे वागतात, आणि भारतात असेच वागायला हवे असे ते मानतात. दुकानात चार कस्टमर्स पुढे असतानाही मध्ये घुसून आपणास हव्या असलेल्या गोष्टींची मोठ्या आवाजात ऑर्डर देणे, रांगेत घुसणे, कुणी आपल्यापुढे (आपल्या दृष्टीने) जरा हळू गाडी चालवत असेल तर त्याला 'तुम्हारे बाप का रास्ता है क्या' विचारणे, आजूबाजूला कुणी आहे नाही हे न बघता थुंकणे, इ. गोष्टी सामान्य आहेत. एकदा You Tube वर कुणीतरी रफी साहेबांची त्याला आवडणारी गाणी टाकली आणि त्यांची थोडीशी माहिती दिली होती. त्यात रफीच्या जन्मतारखेत एक चूक झाली; 1924 चे 1942 झाले. तर एकाने comment काय टाकावी? 'अबे, तू क्या दो पेग पिया था क्या?' आपण इतके असहिष्णू व असभ्यपणे वागतो. आपण ईशान्य भारतातील लोकांना त्यांच्या दिसण्यावरून हिणवतो. कारण उच्च नीचता भाव आपल्यात भिनलेला आहे. शहरीकरण: लहान गावात ह्या उद्धटपणाला आपसूकच मर्यादा पडतात. सगळेजण एकमेकास ओळखतात. बँकेत काउंटरवरील माणूस मला संध्याकाळी बाजारात नाहीतर सिनेमागृहात भेटतो. आम्ही नावाने एकमेकाला ओळखतो. त्यामुळे उद्धटपणाला किंवा अरेरावीला एक स्वाभाविक मर्यादा पडते. शहरात तसे होत नाही. मी कुणावरही जोरजोरात ओरडू शकतो, भांडण करू शकतो. शहरी जीवनात ताणतणावही खूप अधिक असतात ज्यांचा परिणाम क्षुल्लक गोष्टींवरून वाद आणि भांडणात होतो. ज्यांनी मुंबईतील लोकल गाडीतून बऱ्यापैकी प्रवास केला आहे त्यांना हा मुद्दा लगेच पटेल. आणि हे शहरीकरण वाढतच जाणार आहे. आणि त्याबरोबर आपला उद्धटपणाही. कारण हे शहरीकरण कसे झाले पाहिजे, माणसे इतक्या दाटीवाटीने राहत असताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, ती सर्व घडी कशी घालायला हवी, ह्याबद्दल कोणताही विचार कुठल्याही पातळीवर झाला असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. आता तो होणेही दुरापास्त आहे. सिस्टीम जेवढी जास्त बिघडते तेवढी ती रुळावर आणणे कठीण होऊन बसते. मी माझ्या मुंबईतील, आणि काही प्रमाणात अन्य शहरातील, अनुभवावरून हे विधान करतोय. आणि शिवाय, सुधारणेची काही गरज आहे हे मान्य करणे ही पहिली पायरी असते. तीच जर कुणालाही चढायची नसेल तर पुढे बोलणे बंद. काही उदाहरणे: 1) रस्त्यावरील वाहतूक: ह्याची एवढी दुर्दशा झाली आहे की काही बोलणे व्यर्थ ठरावे. वाहतूक सुरळीत असण्यासाठी जे जे म्हणून घटक असतात त्यातील एकही धड नाही. वाहतुकीचे नियम, ड्रायव्हर्स चे प्रशिक्षण, सिग्नल सिस्टीम, रोड मार्किंग्स...कुठलाही एलिमेंट घ्या. आपली सरधोपट पद्धत म्हणजे 'प्रॉब्लेम आहे? मग अधिक पोलीस तैनात करा' ही आहे. एक साधा प्रश्न विचारा की कोणत्याही सिग्नलला चार पाच ट्रॅफिक पोलीस कशासाठी हवेत? तेच पोलीस अन्य जास्त महत्त्वाच्या कामाला लावता येणार नाहीत? (आज परिस्थिती अशी आहे की पोलीस नसतील तर कुणीही कुठलाही सिग्नल पाळणार नाही! पण ते कारण नव्हे, परिणाम आहे.) पण हा प्रश्न आपले ट्रॅफिक पोलीस कमिशनर विचारीत नाहीत. ते आपली तीन वर्ष ड्युटी करतात आणि बदली झाली की जातात दुसरीकडे. ह्यातून वाढीला काय लागते तर उद्धटपणा, अरेरावीची वृत्ती, नियम मोडण्याची प्रवृत्ती, प्रसंगी हिंसाचार. 2) जवळपास 1965-70 पर्यंत मुंबईत बस स्टॉपवर लोक रांग लावून बसमद्धे चढायचे. आता आम्ही बस आली की तिच्यावर हल्लाच करतो. हे थांबवणे सहज शक्य होते. बेस्टने फक्त एवढेच करायचे होते की एक जाहिरात द्यायची; रांग नसेल तेथे बस थांबणार नाही. आणि नाही थांबवायची बस जर स्टॉपवर रांग नाही दिसली तर. पण हे तेव्हा नाही केले आणि आता करणे अशक्य आहे. 3) पाश्चिमात्य देशांत, निदान मी हे इंग्लंड मध्ये तरी पहिले आहे, तेही आज नव्हे तर 30 वर्षांपूर्वी, अगदी पोस्ट ऑफिस सारख्या ठिकाणीसुद्धा common queue multiple service windows ही पद्धत असते. आपल्याकडे हे अजूनही अपवादानेच दिसते. का? आपल्याला करता येणार नाही? मुंबईतील रेल्वे स्थानकावर तिकिटाच्या रांगेत उभे असताना अचानक एक खिडकी बंद झाल्यानंतर (उदा, भोजनासाठी) लोक ज्या रीतीने दुसऱ्या खिडकीवर धावतात ते ज्यांनी अनुभवले आहे त्यांना त्यातला त्रास कळेल. पण रेल्वेला त्याचे काय होय? ही बेपर्वा वृत्ती - वि डोन्ट केअर - मग सर्व लोकांत उतरते. 4) सर्वात महत्त्वाचे, शहरात आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशा रीतीने वर्तणूक ठेवण्याबद्दलचे नियम घालून देणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले. परिणामी, शहरे म्हणजे फक्त अवाढव्य वाढलेली खेडी असेच त्याचे रूप झाले. राहणे शहरात, मानसिकता मात्र खेडूतांची ह्या विरोधाचा जो काही परिणाम झाला तो आपणा सर्वांना दिसतोच आहे. शहरे कशी असावीत ह्याच्या सुस्पष्ट कल्पना जर राज्यकर्त्यांना असत्या आणि त्या त्यांनी अंमलात आणल्या असत्या तर ह्या भारतीय मानसिकतेला, जी मुळात असमानतेवर आधारलेली आहे, बऱ्याच प्रमाणात मुरड पडली असती. त्यायोगे सर्व समाज हळूहळू सुधारला असता. ती संधी आपण गमावली. सत्तर वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता एकूण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्येचे प्रमाण, ही दोन्ही प्रचंड वाढली आहेत. त्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट वाढली आहे ती म्हणजे, राजकीय पक्षांचा / नेत्यांचा बेजबाबदारपणा. हे सर्व फार घातक रसायन (potent combination) आहे ज्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. नव्हे, तसे ते होतातच आहेत, फक्त लहान प्रमाणात. उदा. भारतात दर वर्षी एक दीड लाख लोक रस्ते अपघातात मरतात. लोकसंख्येचा विचार केला तरी हे प्रमाण फार जास्त आहे. इतर देशात ह्याच्यावर अतिशय गंभीरपणे विचार झाला असता. आपल्याकडे '80% अपघात हे मानवी चुकांमुळे होतात' असे निष्कर्ष काढले की काम भागते. मुद्दा असा आहे की कमीतकमी संघर्षाशिवाय माणसे आपापले व्यवहार करतील अशा सिस्टिम्स आखून दिल्या नाहीत व त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली नाही तर हम करेसो कायदा ही वृत्ती, अरेरावी, उद्धटपणा, मग्रुरी, ह्या गोष्टी वाढतच जाणार. नाहीतर, आपली असमानतेवर आधारलेली भारतीय मनोवृत्ती आणि त्यात अस्ताव्यस्त शहरीकरणाची फोडणी, म्हणजे 'आधीच मर्कट तशातही मद्य प्याला' अशी गट व्हायची. नव्हे, झालीच आहे. कालचा दही हंडीचा शिमगा दुसरे काय दर्शवितो? असो. हे माझे विचार झाले. तुम्हाला काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.

वाचने 21454
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

In reply to by राही

अजिबात पटले नाही.... आदिवासी लोक निसर्गाच्या अधिक क जवळ असतात व ते शिस्तबद्ध जीवन जगतात. सगळ्या नात्यांचा ते आदर करतात.

In reply to by चंपाबाई

मला आदिम म्हणजे प्रिमिटिव आणि ट्राय्बल म्हणजे टोळ्यांनी राहाणारे भटके विमुक्त असा अर्थ अपेक्षित होता. हे लोक आधुनिक संस्कृतीच्या आदिम टप्प्यावर असतात आणि बाहेरचा समाज जितक्या सहजपणे आधुनिकतेला, शहरीकरणाला सामोरा जाऊ शकतो तितक्या सहजतेने हा टोळ्यांचा समाज ते स्वीकारू शकत नाही. आपला भारतीय समाज थोडासा असाच आहे असे म्हणायचे होते.

In reply to by चंपाबाई

मनोरंजक प्रतिसाद....

In reply to by राही

राहींशी सहमत, मागास माणसांच्या अवतीभवती अचानक ध्यानीमनी नसतांना, त्यांचे त्यात काहीही कॉण्ट्रीबुशन नसतांना प्रगत व आधुनिक व्यवस्था उभी राहिली की काय होतं ह्याचं उदाहरण म्हणजे भारतीय समाज. लहानपणी मी आमच्या खेड्यात एकदा बसमधे चढत होतो, तेव्हा वय १०-१२ वर्षे स्वत:चा विचार स्वतः करायला लागायचे. रांगेत चढावे, गर्दी करु नये असे शाळेत शिकवलेले तत्व पाळत होतो. वडील माझ्यावर ओरडले, अरे मागे उभा राहशील तर गाडीत जायला मिळणार नाही, घुस आत जोरात. तेव्हा वडील, ती जनता ह्या सगळ्यांबद्दल एक विचित्र भावना दाटून आली. नंतर थोडं मोठं झाल्यावर विचार केला, जाउ द्या ते लोक अशिक्षित, गावठी होते. गेल्या वर्षी माझी बायको दोन मुलांना घेऊन एकटीच ठाण्याला गेली नाशिकहून, येतांना खोपट बसस्थानकावरुन बस होती, पूर्ण रिजर्वेशनची बस होती. सर्वांच्या सीट्स बुक्ड होत्या. तरीही लोकांनी प्रचंड हल्लकल्लोळ करुन घाईघाईने आत चढायला सुरुवात केली, कारण काय तर बस दिड तास उशिरा आली होती. जणू ह्यांनी घाई केल्याने तो दिड तास भरुन निघणार होता. ह्या धावपळीत माझ्या मोठ्या मुलाचा जबडा पायर्‍यावर आपटला. हे सगळे ऐकुन माझा पारा पारच चढला, तीला सांगितले ह्यानंतर कधीही सार्वजनिक वाहनाने मुलांना घेऊन प्रवास करायचा नाही. ही सर्व माणसे सुशिक्षित, सुसंस्कारी, मध्यमवर्गीय होती, पण रानटीपणात गावठी लोकांपेक्षा चार पावलं पुढे. आता तिसरा किस्सा, विमानातला. वर काही प्रतिक्रियांमधे आलंय तसंच अनुभवलं. तिन्ही किश्शांमधल्या पब्लिकच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अंतर असले तरी वागण्यात एकसमानता आहे. कारण ही सर्व जनता एकच जिन्नस आहे. आ, सा, शै ही सगळी वरवरची पुटं आहेत. खर्‍या अर्थाने आपण सिविक सेन्सवाले नैच. एखादी व्यवस्था उभारण्यात ज्यांच्या पिढ्यांपिढ्या गेल्यात, ती लोकं नीटपणे त्या व्य्वस्थेचा उपभेग घेत सुधारणा करत राहतात. आपल्याकडे भस्सकन आधुनिकता आली आहे. तीचं प्रयोजन, आवश्यकता, मार्गदर्शन हे काहीही समजून न घेता वापर सुरु झाला, त्यामुळे जुन्याच मानसिकता नव्या गोष्टींवर लादल्या जात आहेत व गोंधळ होतोय.

In reply to by संदीप डांगे

ह्यानंतर कधीही सार्वजनिक वाहनाने मुलांना घेऊन प्रवास करायचा नाही. डांगे अण्णा हे आपल्याला परवडते म्हणून शक्य आहे. चिपळूणहुन मुंबईत येण्यासाठी मी पॅसेंजरचे तिकीट काढले ते होते ३८ रुपये माणशी( आम्ही चौघे होते) . त्याच वेळेस मागुन नेत्रावती एक्स्प्रेस येणार हि घोषणा झाली. म्हंणून मी हि तिकिटे रद्द करून १७० रुपये भरून स्लिपरचे तिकीट काढले. येणाऱ्या पॅसेंजरमध्ये तोबा गर्दी होती त्यात चिपळूण स्टेशननवरील अजून गर्दी चढली. मी तिच्या मागून येणार्या नेत्रावती एक्स्प्रेसच्या स्लीपर मध्ये आरामात झोपून वर पॅसेंजरच्या एक तास अगोदर आलो. मला त्यासाठी १७० x ४= ६८० रुपये + रद्द करण्यासाठी माणशी २० प्रमाणे ८० रुपये = ७६० रुपये इतका चार्ज पडला बहुसंख्य माणसे हे ५२८ रुपये( चार माणसांना) परवडत नाही म्हणून असे मेंढरांसारखे प्रवास करतात हि दुःखद वस्तुस्थिती आहे. बाकी रिझरव्हेशन असेल तरी आपल्या जागेवर कोणी बसला तर त्याला उठवायला होणारी कटकट टाळण्यासाठी लोक अगोदर जागेवर बसून घ्या असेच म्हणतात. ठाण्याला आपण रेल्वे गाडीत चढण्यासाठी गेलात तर आपल्या जागेवर कोणी बसून आला नाही ना या भीतीने माणसाना आपल्या जागेवर बसेपर्यंत मनात धाकधूक असते. हे सर्व केवळ लोकसंख्या आणि पायाभूत सुविधा यातील व्यस्त होत जाणाऱ्या प्रमाणामुळे आहे. गणपती उत्सव "संपल्यावर" कोकणात जाणाऱ्या बसमध्ये माणूस शोधावा लागतो. तेंव्हा चालक आणि वाहक सोडून कोणत्याही सीटवर बसायला जागा मिळते. अशा वेळेस हि परिस्थिती होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

गणपती उत्सव "संपल्यावर" कोकणात जाणाऱ्या बसमध्ये माणूस शोधावा लागतो. तेंव्हा चालक आणि वाहक सोडून कोणत्याही सीटवर बसायला जागा मिळते.:-)) ho kharay he.

In reply to by सुबोध खरे

तुमची उदाहरणे माझ्या मुद्द्याशी विसंगत आहेत, एसटी असो वा शिवनेरी कि विमान लोकांची वागणूक समान असते, परवडण्याचा मुद्दा असा की हे चैन परवडावी म्हणून भयंकर मेहनत केली आहे, बहुसंख्य लोक ती करू इच्छित नाहीत म्हणून आहे तिथेच किड्यामुंग्यांसारखे जगतात,

In reply to by संदीप डांगे

परवडण्याचा मुद्दा असा की हे चैन परवडावी म्हणून भयंकर मेहनत केली आहे
बहुधा खाजगी वाहनाने प्रवास करावा व तो परवडावा म्हणून आपण मेहनत घेतली, ती सफल झाली. अभिनंदन. रस्त्यावरील ट्रॅफिक आणि त्यात भयंकर प्रकारे गाड्या हाकणारे वाहक वारंवार भेटू लागले कि काय करणार ? अजून भयंकर मेहनत करून खाजगी रस्ते बांधणार, हेलिकॉप्टर घेणार कि किड्यामुंग्यांसारखे जगायला सुरुवात करणार ? असो, शुभेच्छा! [बाकी धाग्याचे शीर्षक/विषय भयंकर आवडले आहे] http://economictimes.indiatimes.com/magazines/panache/indians-have-high…

In reply to by संदीप डांगे

अरे काय या २० व्या शतकातील टेक्नोलोजीमधे विचार करताय... पुढचे टार्गेट - टेलेपोर्टेशन....(स्टार ट्रेक)

In reply to by राही

सहमत आसन क्रमांक ठरलेला आहे, प्रत्येकाला जागा मिळणार आहे हे माहीत असुन एसटी पकडायला धावतात तसे धावतात, जसे काय विमान यांना घेतल्याशिवाय निघून जाणार आहे. तसेच बसायची आंणि मग सामान कोंबाकोंबीची घाइ करतात. हीच गोष्ट उतरताना - विमान जमीनीला लागल्या लागल्या पट्टे उघडून आपापल्या बॅगा काढायची घाइ. कधी कधी विमानाचे दरवाजे उघडायला अर्धा तास लागतो तरी तेवढे वेळ हातात बॅग घेउन उभे रहाणार. एवढी घाइ करुन कुठे जाणार माहीत नाही.

In reply to by राही

राहींच्या मूळ प्रतिसादाशी सहमत. आम्ही मलेशियाला फिरायला गेलो असतांना आमची खूप कष्ट करून जगणारी गाईड आमच्या बस चालकाला मदत होईल म्हणून काहीबाही विकत होती. त्या वस्तू बस चालकानेच आणल्या होत्या. ही गाईड फक्त त्या वस्तू बसमध्ये विकत होती. यात काहीच वावगे नाही. किंमती साधारण रु. 300 पासून पुढे होत्या. ती म्हणत होती की काहीतरी घ्या म्हणजे तुम्हाला या सहलीची आठवण राहील. आमच्या मागच्या सीटवरच्या काकू मराठीत म्हणाल्या "हिच्या काय बापाचं जातंय सांगायला काहीतरी घ्या म्हणून." तिला हे कळलं नाहीच पण अशा विचारांमधून आपली मूळ वृत्ती दिसून येते. कुणालाही आदर न देणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. माझी बायको ज्या शाळेत लहान मुलांना शिकवते त्या शाळेत केजीमध्ये शिकणाऱ्या 2-3 मुलांच्या पालकांनी तक्रार केली की मुलं घरी टॅब आणि मोबाईल खूप वापरतात. शिक्षकांनी त्यांना या वस्तू वापरण्याच्या सवयींपासून परावृत्त केले पाहिजे आणि मुलांना ही शिस्त शिक्षकांनीच लावली पाहिजे असा त्या पालकांचा आग्रह होता. मुलं शाळेत 2-3 तास असतात. मुलांना या वस्तू पालकच देतात. मग पालकांची काहीच जबाबदारी नाही का? सगळं शिक्षकांवर ढकलून पालकांना काय फक्त व्हॉट्सएपवर टाईमपास करायचा असतो का? त्या पालकांनी बायकोशी या मुद्द्यावर हुज्जत घातली. मी बायकोला (अर्थात गमतीनं) म्हटलं मुलांना तुम्ही असं शिकवा की हातात बापाने किंवा आईने टॅब किंवा मोबाईल दिला की सरळ त्यांच्याच कपाळावर आदळेल अशा रीतीने नेम धरून जोरात मारून फेकायचा. मग ही बिनडोक तक्रार आपोआप बंद होईल. :-) काही पालक इतके तावातावाने भांडतात म्हणे शाळेत की जणू शाळेनेच त्यांच्या मुलांचं संपूर्ण संगोपन करावं असा त्यांचा हट्ट असतो. अर्थात सगळेच असे नसतात. नम्रपणे बोलणारे, समस्या समजून घेणारे आणि आपल्या परीने प्रयत्न करणारे पालकदेखील असतातच.

लोकसंख्या अवाच्या सवा वाढल्याचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मर्यादित सेवासुविधा असतील तर त्या आपल्यालाच मिळाव्यात म्हणून लोक आक्रमक बनतात. पण नम्रपणा, सौजन्य ह्यांना दुबळेपणा मानण्याकडे आपला कल असतो. औद्धत्य, कर्कश्शपणा, अरेरावी म्हणजे आपण कुणीतरी आहोत असे सिद्ध करणे असे लोकांना वाटते. माझ्या अनुभवानुसार ही वृत्ती उत्तर भारतात प्रकर्षाने जाणवते. पण हळूहळू सगळीकडेच हे दिसू लागले आहे. सौजन्य हे वंगणाप्रमाणे असते. दोन वस्तूतील घर्षण कमी करुन ते सौम्य करते असे शिकवले गेले आहे पण आज ते कुणी मनावर घेत नाही.

In reply to by हुप्प्या

केनिया मध्ये आत्यंतिक गरिबी आहे सुविधा सोडा, बऱ्याच लोका ना दिवसेंदिवस बरेसे खायला मिळत नाही मी बघितलेली सर्व माणसे polite होती, वर्कर कॅटॅगरीतली सुद्धा नैरोबी मध्ये ट्राफिक जाम मध्ये सुद्धा कुणीही भांडणे, honking, पुढे घुसणे इ इ प्रकार करत नव्हते हे फक्त परदेशी लोकांशी नाही, तर आपापसात वागताना सुद्धा हे सर्वसामान्य माणसाविषयी झाले, गुंडगिरी काय तिथेही आहेच त्यामुळे ,अभाव , हे कितपत driving कारण आहे, कल्पना नाही

लायकी/गुणवत्ता नसताना, जे लोक वरच्या पदावर पोहोचतात , ते उद्धट असल्याचे माझे निरीक्षण आहे . उत्तर भारतीय मंडळी मध्ये उद्धटपणा जास्तच , या मताशी पूर्ण सहमत . काही विशिष्ट समाजाचे /भाषेचे लोक उद्धट असतात (टक्केवारी कमी जास्त असू शकेल ), पण असतात .

In reply to by टिके

काही विशिष्ट समाजाचे /भाषेचे लोक उद्धट असतात (टक्केवारी कमी जास्त असू शकेल ), पण असतात .
याचीच वाट पाहत होतो.

आज्काल प्रत्येक गोष्ट झगडुनच मिळवावी लागतेय. शिवाय सार्वजनीक ठिकाणी रहदारीशी झगडा, ऑफिसमध्ये स्पर्धा, शिक्षणात स्पर्धा, त्यामुळे आपण एखादी गोष्ट मिळवली की ती गोष्ट आपल्यासाठीच बनवली असल्याचा दुराभिमान येतोय. मग काय, मी मानेल तसा वागणार तुम्ही कोण विचारणारे? असा अनुभव येत जातो.

जोपर्यंत माझा मोठेपणा माझ्या न्यूसंस व्हॅल्यूच्या समप्रमाणात ठरतो, तोपर्यंत आपला उर्मटपणा संपणार नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

घरट्यातील जे पिल्लू अन्नासाठी जास्त जोरात ओरडते त्या पिल्लाला सर्वात जास्त भरवले जाते. तस काही म्हणायचे आहे का? :)

नुकताच आलेला गुजरातेतला अनुभव. कार मधून प्रवास करत होतो. आमच्या एक वयस्कर नातेवाईक बाई गाडी चालवत होत्या. सोसायटी बाहेर आल्याक्षणी, एक बाईकस्वार चुकीच्या दिशेने जोरात आला. आमची टक्कर थोडक्यांत चुकली. आम्ही काही बोलायच्या आंत, तोच या बाईंना, "इडियट लेडी' अशी पदवी देऊन गेला. बाईंचा संताप अनावर झाला. त्यांनी मला म्हटलं, 'अशा माणसाला काय उत्तर देणार ?' मी सुचवलं, अत्यंत सौम्य आवाजात, त्याला 'थँक यू' म्हणावे. अशानेच तो ओशाळण्याची शक्यता आहे.

In reply to by तिमा

त्या मुलाला पश्चात्ताप होत असेल असं बोलल्याबद्दल. क्षणिक रागात असं बोललं जातं, खंत आयुष्यभर रहाते. गाडी चालवतानाची चुक कुणाची त्याचा काही संबंध नाही याच्याशी. आपल्या तोंडून काही वाईट गेलं की बोच रहातेच.

लेख उत्कृष्ट लिहिलाय. आणि लेखातील प्रत्येक शब्दाशी 101% सहमत. आणि मला 102% खात्री आहे पुढच्या 100 वर्षात तरी यात बदल होणार नाही. उलट हा उद्दामपणा वाढतच जाणार आहे.

बाकी इथे उपस्थित झालेले बहुतेक सगळे मुद्दे मान्य असल्यानं मी वेगळं काही लिहायची आवश्यकता वाटत नाही.
बहुसंख्य मिपाकर सहमत असलेला (कमीत कमी विरोधी मतप्रदर्शन असलेला) हा एकच धागा असावा काय?
डॉ. खरे साहेबांचं म्हणणं पण पटण्यासारखं आहे. (बर्याच वेळेस त्यांची मतं पटतात ब्वॉ आपल्याला.)

मला उर्मटपणा आवडतो. माझा उद्दाम असा आyaDeehee होता.

In reply to by चंपाबाई

बरं मग?

समाजात उद्धटपणाची जागा सद्भावनेने घेतली की काय होतं हे या मुंबईतील घटनेसंदर्भात वाचण्यासारखं आहे. त्यातला मुस्लीम प्रवासी हिंदू रिक्शावाल्याबद्दल गौरवोद्गार काढतांना म्हणतो: The reason for hatred is not that only negativity prevails... but that easily only negativity sells... So unless "We" the people buy it positivity is not gonna sell.

१००० वर्षाच्या गुलामगिरी चा परिणाम असावा बहुदा, पण कुठल्याही नात्यात, संवादात, interaction मधे आपण आधी एक Hierarchy तयार करतो. त्यामुळे बरोबरीच्या नात्याने संवाद होऊच शकत नाही. एक जण 'सांगतो' आणी दुसरा 'ऐकतो' हेच संवादाचं स्वरूप असतं. त्यातून उद्धटपणा चा उगम होतो. वेगळं मत मांडणार्याला 'गप्प' करणे हे वादाचं / चर्चेचं मूळ उद्देश्य असतं.

In reply to by संदीप डांगे

चांगला मुद्दा आहे. बाकीच्या देशांविषयी माहीती नाही आणी आपल्या देशाविषयी सुद्धा हे अभ्यासपूर्ण मत वगैरे नाहीये. माझ्या परीनं व्यक्त केलेला एक अंदाज आहे.

धाग्याची शंभरी आजच व्हावी म्हणून दोन वाईड बॉल देतो. हा 99 वा

आणि हा 100 वा. अभिनंदन

ह्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळाला ह्याचा आनंद वाटला. आनंद दोन कारणांनी; बऱ्याच जणांना ह्या विषयाबद्दल अगत्य आहे ह्याचा, आणि प्राप्त परिस्थितीत सकारात्मक बदल होईल अशी आशा वाटणाऱयांची संख्या नगण्य नाही, म्हणूनही. ह्यातील relevant अशा प्रतिसादांचे ढोबळ विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की एकंदरीत जनमताचे प्रतिबिंबच ह्यात पडलेले आहे. आजूबाजूला माणसे बोलताना आपण ऐकतो, त्यांची मते वाचकांच्या पत्रव्यवहारातून वाचतो, तर कधी टीव्हीवर ती व्यक्त होताना दिसतात, ती अशाच स्वरूपाची असतात. [प्रतिसादांची संख्या एकूण मिपाकरांच्या तुलनेत कमी, आणि लोकसंख्येच्या मानाने तर नगण्यच, शिवाय उपस्थित केलेला प्रश्नच loaded होता. त्यामुळे हा काही संख्याशास्त्राच्या दृष्टीने स्वीकारार्ह (statistically valid) सर्व्हे नव्हे, हा disclaimer आधीच देऊन ठेवतो!] टक्केवारीत बोलायचे झाल्यास, 'काही प्रॉब्लेम नाहीच आहे' असे दोन अडीच टक्के लोकांना वाटते. (म्हणजे सुधारणेचा प्रश्नच निकालात निघाला.) दहा ते पंधरा टक्के लोक आशावादी आहेत, त्यांना सुधारणा शक्य आहे आणि होईल असे वाटते. जवळपास ३५-४० टक्के लोक असे मानतात की स्वयंशिस्त हाच एक इलाज आहे, नुसते इतरांकडून अपेक्षा ठेवून काही होणार नाही. वीस ते पंचवीस टक्के लोक अशा मताचे आहेत की अतिशय वेगाने झालेले बदल हे समस्येचे मूळ कारण होत. तर दहा टक्के लोकांना वाटते की सिस्टिम काय आहे ह्याबद्दलचे अज्ञान किंवा चुकीची अंमलबजावणी ही समस्या आहे. १५-२० टक्के लोकांच्या मते हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे (आणि म्हणून त्यात बदल होणार नाही). एक महत्वाचा मुद्दा पुढे आला आहे तो म्हणजे, समाजाच्या काही घटकांकडे असलेले उपद्रवमूल्य, सौजन्य ह्या मूल्याच्या पूर्ण विरोधी काम करते. ही सर्वच मते ग्राह्य आहेत. पण पुढे काय? मी लेखात म्हटले होते, 'शहरीकरण कसे झाले पाहिजे, माणसे इतक्या दाटीवाटीने राहत असताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, ती घडी कशी घालायला हवी, ह्याबद्दल कोणताही विचार झाला नाही'. ​हा विचार म्हणजे मला नेमके काय अभिप्रेत होते? ह्याचा खुलासा मी तेथे केला नव्हता कारण मग लेख फारच वाढला असता. तुमच्या परवानगीने मी तो ​खुलासा वेगळ्या लेखात करू इच्छितो. त्याचा केंद्रबिंदू असेल व्यवस्था विचार (System थिंकिंग). सर्व प्रतिसादांबद्दल आभार.

In reply to by रविकिरण फडके

​हा विचार म्हणजे मला नेमके काय अभिप्रेत होते? ह्याचा खुलासा मी तेथे केला नव्हता कारण मग लेख फारच वाढला असता. तुमच्या परवानगीने मी तो ​खुलासा वेगळ्या लेखात करू इच्छितो. त्याचा केंद्रबिंदू असेल व्यवस्था विचार
जरूर लिहा आणि लवकरात लवकर. लेखातली कळकळ पोचली. प्रतिक्रिया आवडल्या. आपण भारतीय उद्धट आहोत हे किमान मिपावर तरी सर्वांना मान्य झालं हे ही नसे थोडके.

In reply to by अंतरा आनंद

मराठी भाषा आणि भाषक रांगडे आहेत, उद्धट नाहीत. हा मूळ स्वभाव झाला. आधुनिकतेच्या काळांत कांही प्रमाणात उद्धटपणा डोकाऊ लागला असेलही. पण मुळात रांगडे असल्याकारणाने अनेकांना तो उद्धटपणा वाटतो. आता आपण जगात सर्वत्र वास करू लागल्यानंतर (केल्याने देशाटन.......) आपल्याला आपल्यातीलच उणीवा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. हे अर्थातच प्रगतीचे पहिले पाऊल आहे. समाजसुधारणेला आपण आपल्या पुढच्या पिढीपासून सुरुवात करावी आणि त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला. निदान सुशिक्षित समाज तरी बदलत जाईल. सामाजिक जबाबदारीचे भान त्या समाजाला येईल. सरकारनेही वाढत्या गरजांनुसार सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे म्हणजे ह्या बदलू इच्छिणार्‍या समाजाला वैफल्य येणार नाही. मी माझ्या पुढच्या पिढीला सुधारण्यास १९९० पासूनच सुरुवात केली आहे.

आपल्याच डोळ्यातलं मुसळ शोधू पहाणारा आणि एका महत्वाच्या समस्येला धीटपणे भीडणारा (आणि शतकी :-) ) धागा काढल्याबद्दल अभिनंदन! 'व्य्वस्था विचार' काय असावा ते विशद करणारा दुसरा धागा जरूर काढा.

जरूर लिहा. वाट पाहात आहोत, (आणि प्रतिसादासाठी लेखणी कळफलक सरसावून बसलो आहोत.)

In reply to by संदीप डांगे

अहो वर्गातला हुशार, पहील्या बाकावर बसणारा मुलगा असा दंगा करू लागला तर आमच्या सारख्या मवाली लोकांना इन्फीरीयारीटी कॉम्प्लेक्स येतो...

In reply to by खटपट्या

खरच चुकला डॉयलॉग तुमचा विरुपाजी. "चल ए येडी हळद, चल निघ. ते उर्मट बिर्मट घरात शिकवायचे जाऊन. निघ आता" हा डॉयलॉग येत नाही काय तुम्हाला?

In reply to by अभ्या..

नाय वो. लग्न झाल्यापास्नं उर्मटपना बंद झाला बगा. समोरची पार्टी डांबीस नीगाली. अभ्याभौ लग्न करु नका कदीच :(