Skip to main content

शृंगापत्ती

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 19/08/2016 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
शृंगापत्ती रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता. माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं. सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

वाचने 92930
प्रतिक्रिया 413

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

बोच कुणाला आहे?
अहो तुमच्या मित्राला बोच आहे, त्याला चार दिवस अस्वस्थ वाटलं असं तुम्हीच लिहिलं आहे ना! जर त्याला कसली बोच नसेल तर या लेखाला काय अर्थ राहातो? मग मूळ लेख आणि बहुतांश प्रतिसाद बादच होतात की.

In reply to by राजेश घासकडवी

मेडिकल एथिक्स नुसार हे डॉक्टरला उघड न करण्याचे बंधन आहे. पण अ‍ॅबॉशन चा इतिहास असणे यात असे काही नसल्याने अशी माहिती उघड केल्यास डॉक्टरच गुन्हेगार ठरेल. चंपाबाई / मोगा / जामोप्या/ हितेश राव यांनी पहिल्यांदा असे बेलगाम बेदरकार आरोप केले. त्यात कुठे आणि कसे हे विचारल्यावर सिद्ध करणे शक्य नाही. म्हणून "बोच असल्याबद्दल" लिहितात. म्हणून ते विचारले.

In reply to by सुबोध खरे

चंपाबाईंच्या प्रतिसादांत मला कुठचेच आरोप दिसत नाहीत. त्यांनी 'तुमच्या मित्राने बोच ठेवून घेऊ नये' असं म्हटलेलं आहे. त्यावर तुम्ही अचानक 'बोच आहेच कुणाला' असा प्रश्न विचारला आहे. असो. मला असं वाटतं आहे की या लेखापोटी तुम्ही अपसेट झालेला आहात. तसं करून घेण्याची गरज नाही असं मनापासून वाटतं. तुम्ही जो प्रश्न मांडलात त्याच्या अनेक वेगवेगळ्या पैलूंचा विचार करून मिपाकरांनी आपापली मतं मांडलेली आहेत. प्रत्येकच मत प्रत्येकाला पटायला हवं असं नाही. मात्र या चर्चेकडे थोडं त्रयस्थपणे एक चर्चा म्हणून पाहा, आणि वैयक्तिक घेऊ नका ही विनंती करतो. मला आणि बहुतांश इतर मिपाकरांना तुमच्याबद्दल आदरच आहे.

अहो साधा अनुभव आहे डॉक खरे यांचा ..त्यात इतका काय ...कुठेही त्यांनी नाव घेतला नाही त्यांना इतक्या अश्या कंमेंट चा कारण कांय

'ती' मुलगी आणि तिचा नवरा यांचा संसार सुखाने चाललाय! तुमच्या मित्राचे सदर कुटुंबाशी खरंच जवळचे संबंध असते तर लग्नापूर्वी हे नाते जुळवण्याच्या प्रक्रियेत तुमच्या मित्राचा सल्ला त्या कुटुंबाने घेतला असता. मात्र त्याला चारचौघांसारखं डायरेक्ट लग्नात जेवायलाच बोलावलंय. त्यामुळं तुमच्या मित्राचा सल्ला कितपत महत्त्वाचा आहे हे त्या कुटुंबाने यापूर्वीच दाखवून दिलंय. आता उगीच चहापाण्यापुरते संबंध असल्यानंतरही ह्या प्रसंगाबद्दल मित्राला टोचणी लागते आहे म्हणजे त्या कुटुंबाच्या संदर्भात त्याने स्वतःची प्रतिमा विनाकारण महत्त्वाची असल्याचा गैरसमज करुन घेतलेला दिसतोय. तुमच्या मित्राला काय वाटतंय याचा त्या कुटुंबाला काडीचाही फरक पडत नाहीये. मात्र निव्वळ आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आहोत या गैरसमजात त्याने विनाकारण संशयाची काडी घालू नये ही एक माफक अपेक्षा आहे.

In reply to by आजानुकर्ण

हे काहि पटले नाही. सर्व साधारणपणे मुलगा/ मुलगी बघायला जाताना फक्त जवळचे नातेवाईकच जातात. बहुसंख्य मित्रांना थेट लग्नालाच बोलावले जाते. निर्णय प्रक्रियेत या डॉक्टरांचा सहभाग नव्हता यात नवल नाही परंतु म्हणून त्यांना वाईटही वाटू नये हे पटत नाही. यात स्वतःची प्रतिमा मोठी करून घेण्याचा काय संबंध आहे. त्याने "संशयाची काडी" घालू नये. यात या डॉक्टरांनी काहीच केलेले नाही कि त्याने मित्राला मुलीबद्दल काही सांगितले आहे असेही नाही. एकदा लग्न "झाल्यावर" दुधात मिठाचा खडा घालण्याला काही अर्थ नाही हे त्यालाही समजते .

मला आणखीन एक प्रश्न पडतो तो म्हणजे ज्या पुरुषामुळे रुपालीला गर्भधारणा झाली होती त्याच्याबद्दल. या कथेत कोणालाच त्याची ओळख नाही. पण त्याचंही कदाचित दुसऱ्या मुलीशी लग्न होईल. मग तोही डिफेक्टिव्ह माल समजला जाईल का? बीज सोडणारा पुरुष नामानिराळा, आणि क्षेत्र असलेली स्त्रीच बदनाम हे अन्याय्य आहे.

In reply to by राजेश घासकडवी

बीज सोडलेल्या पुरुषाचे गर्भपात करणार्‍या डॉक्टरच्या ओळखीतल्या कुणाशी लग्न झालेले असेल आणि जर त्या मुलाला डॉक्टर ओळखत असतील तर कदाचित त्या डॉक्टरांना तशीच आपल्या मित्राला फसवल्याची भावना येइल. मला नाही वाटत इथे स्त्त्री आणी पुरुष या अर्थाने कुठे भेदभाव केलेला आहे. "व्हर्जिनिटी" या मुद्द्यावर फिरणारा नैतिक गोंधळ जरुर आहे पण त्यात स्त्री आणी पुरुष अशी विभागणी केलेली दिसत नाही. योगायोगाने किंवा अनुषंगाने म्हणा नैतिक गोंधळ घडवणारी व्यक्ती स्त्री आहे इतकेच. इथे फक्त स्त्रीच " डिफेक्टिव्ह माल " असते असे विधान कुठेही केलेले दिसत नाही.

मला हे प्रकार रुचत नाहीत, त्यात डोके थोडे तापट पडते, माझ्या मुलाने/मुलीने असे केल्यास मी काय करेल?? माझेच संस्कार कमी पडले म्हणून I shall get into my full dress, ask for forgiveness to my beloved country, constitution, god and force after which I shall eat up my standard issue Beretta .45 pistol. कोणाला बोल लावायला नको, अन कोणाचे अनैतिक वागणे जनरेशन गॅप किंवा लिबरल विचार, स्त्रीवाद, पुरुषाचे व्यक्तिस्वातंत्र्य नामक गोड़ मुलामे देऊन स्वतःही गिळायला नको.

खरे डॉक्टर, मला वाटतं की शृंगापत्तीतून सुटण्यासाठी तुमच्या डॉक्टर मित्राने सरळ रुपलीशी आपणहून संवाद साधावा. अर्थात तिच्या घरच्यांच्या नकळत. त्यावेळेस स्पष्ट करावे की मी माझ्या व्यावसायिक शपथेशी बांधील आहे म्हणून. आणि गप्प बसावे. रुपालीच्या सासऱ्याला फसवल्याची भावनाबिवना मनातून काढून टाकावी. या बदल्यात रुपालीकडून दोन वचनं अवश्य घ्यावीत. १. जर तिने तिची पार्श्वभूमी तिच्या घरच्यांना सांगितली, तर त्या डॉक्टरमित्राचं नाव कुठेही येत कामा नये. २. जर तिने तिची पार्श्वभूमी तिच्या घरच्यांना सांगितली, तर त्या डॉक्टरमित्राला या बदललेल्या परिस्थितीची कल्पना द्यावी. रुपाली कशीही असली तरी प्राप्त परिस्थितीत विवाह टिकवण्यास प्राधान्य द्यावे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले
गोपनीयताच पाळावी, नसत्या भानगडीत पडू नये. लेखावरून असे वाटते की डॉ. खरेंच्या मित्राला शृंगापत्तीतून (डिलेमा) बाहेर पडावयाचे आहे. गामा पैलवान ह्यांनी दिलेला सल्ला योग्य वाटतो, अनुभवाने व वयाने परिपक्व असलेल्या डॉक्टरांच्या मित्राला त्या मुलीशी संवाद साधायला अडचण येऊ नये.

प्रश्न फक्त योनिशुचितेचा नसून वृत्तीचा पण आहे. वयाप्रमाणे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे परंतु या केसमध्ये हे निव्वळ शारीरिक आकर्षण ठरेल. एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्याने त्या मुलाचा साधारण पगार आधीपासूनच माहित असेल. परिणामांची जाण असूनही तिने संबंध ठेवले आणि वेळ आल्यावर त्या मुलाला डच्चू देऊन टाकला. लग्नाआधी मूल नको म्हणून गर्भपात करून घेतला असं पण असू शकेल. कशावरून लग्नाकडे ती एक सुरक्षिततेचा उपाय म्हणून बघत नसेल? त्यामुळे तिने हे लग्नाआधी आधी नवऱ्याला सांगितले आहे का महत्वाचं आहे. लग्न झाल्यावर ती परत त्या आधीच्या मुलाकडे आकर्षित होणार नाही याची खात्री काय? नकळत होईना पण तिच्या मनात जर तुलना सुरु झाली आणि त्यातून तिला वाटायला लागले की आधीचा मुलगा नवऱ्यापेक्षा काही बाबतीत सरस आहे तर मग काय होईल?

एरवी संयमित आणि आधुनिक मतं असणार्‍या खरेकाकांचा हा लेख बघून खरं तर आश्चर्य वाटलं. पण नंतर स्पष्ट झालं की लेखातले विचार त्यांचे स्वत:चे नसून त्यांच्या मित्राचे आहेत. मला यात कुठेही फसवणूक वाटत नाही. रुपालीचे जे होते ते लग्नापूर्वी होते. लग्नानंतरही हे संबंध टिकून असते अथवा तो गर्भपात लग्नानंतरचा असता तर त्या घटनेला फसवणूक म्हणता आली असती. तसंही तेव्हा 'चुकून' गरोदर राहिली नसती तर तिचे लग्नापूर्वी कोणाशी आणि कसे संबंध होते हे कळण्याची काहिच शक्यता नव्हती. मला तर अशीच शक्यता जास्त वाटते की ती पुन्हा त्या आधीच्या मित्राकडे जाणं दूर, त्याचा विचारही करणार नाही. हे हवेत मारलेले तीर नसून अनेक जवळच्या मित्र-मैत्रिणींची उदाहरणे बघून बनलेलं मत आहे. अनेक वर्ष एकत्र (लग्न न करता एका घरात दोघेच) राहिलेल्या मुला-मुलींना नंतर वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करून सुखाचा संसार करताना बघतेय. अर्थात ८-१० वर्षांपूर्वी या उदाहरणांत मराठी मुलींचं प्रमाण खूप कमी होतं, आताचं माहिती नाही.

In reply to by स्मिता.

मला तर अशीच शक्यता जास्त वाटते की ती पुन्हा त्या आधीच्या मित्राकडे जाणं दूर, त्याचा विचारही करणार नाही
एकदम सहमत

लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवणे म्हणजे काहीतरी महापाप आहे असा एक (गैर)समज आपल्याकडे आहे. आणी असे संबंध ठेवण्याची संधी न मिळाल्याने राहिलेले (तथाकथित सज्जन) ठीगभर. लग्नापूर्वी पण ज्याला जी मजा करायची असेल ती त्याने बिनधास्त करावी. फक्त लग्न करण्यापूर्वी आपण काय काय मजा केलीय ते सर्व भावी नवऱ्याला / नवरीला सांगून टाकावे (विचारले नसेल तरीही). नाहीतर अचानक अशा गोष्टी बाहेरून समजतात आणी दोन कुटुंबाच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते.

या प्रकरणाची लग्नापूर्वी अअसुरक्षित शरीर संबंध ठेवलेले आहेत , यातून एसटीडी होउ शकतात. हेल्मेट प्रबोधन किती गरजेचे आहे हे लक्षात येते.

I admire the discussion on this thread. This kind of discussions is one of the reasons that i come to MiPa.

मला तर हा प्रकार इसापनीती का पंचतंत्रातल्या तत्सम "राजा के सर पे सिंग" ह्या कथेतल्या सारखा वाटला. स्वतःला माहीती असलेली रहस्ये इतरांना सांगणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. केवळ तुला म्हणुन सांगतो कुणाला सांगु नको अशी प्रस्तावना करुन बरीच रहस्ये मित्रमंडळीत ही उघड गुपिते ठरतात. इथेही हाच प्रकार झाला आहे. माणसाच्या सहजप्रवृत्तीने डॉ.मित्राने केवळ तुला म्हणुन सांगतो म्हणुन डॉ.खरेंना पोटात लाथा मारणारे रहस्य सांगितले डॉ.ने ते नाव गाव गोपनीय ठेवुन आपल्याला सांगितले. हे ही झाले नसते तर यदाकदाचित त्या डॉ मित्राने वा डॉ.खरेंनी उद्या आत्मचरित्र लिहिले असते तर त्यात व्यावसायिक नीतीमत्ता ह्या प्रकरणाखाली हे उदाहरण मांडले असते.

ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट झाले नसते तर बरे झाले असते असे वाटतय. कोणता तरी प्रतिसाद स्कोअर सेटलमेंट सारखा वाटतो. त्याचा राग येतो़ मग आपली बाजू जोरात मांडण्यासाठी आणखी नवीन माहिती सादर केली जाते. असो. या आभासी जिवनात न गुंतता वावरता आले व त्याचा उपयोग प्रत्यक्ष जिवनात करता आला तर काय मजा येईल नाही का?

In reply to by शाम भागवत

ते डॉ._______ आहेत हे स्पष्ट झाले नसते तर बरे झाले असते असे वाटतय.
+१...नॅऱोइंग डाउन फार सोपं झालंय... सगळ्या प्रतिसादालाच +१..

In reply to by शाम भागवत

ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट झाले नसते तर बरे झाले असते असे वाटतय. चुकीचे गृहीतक. वर कुणीतरी लिहिले आहे ते डॉक्टर किंवा त्यांचा मित्र मिसळपाव वर असेल तर या प्रश्नाचे ते उत्तर आहे. गुजराथी असल्याने मिसळपाव वर असण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे. कारण त्यांना जुजबीच मराठी येते. त्यांच्या मित्राबद्दल मला माहित नाही.

In reply to by सुबोध खरे

अहो मला तुमच्या बद्दल आदर आहे. तुमच्या नितीमत्तेबद्दल मला काडीचीही शंका नाही. मला इतकेच सुचवायचे होते की, मुद्दा मांडण्याच्या प्रयत्नात तुमच्या कडून जास्त जास्त तपशील बाहेर येतो आहे. तेव्हा तुम्हाला सावध करणे इतकाच त्या प्रतिक्रियेचा हेतू होता. बस्स इतकेच. उदा. एकदा ते डॉ. ५५+ चे आहेत. मग त्यानंतर कधीतरी साठीच्या जवळ आलेला माणूस लग्न बाह्य आणि लग्न पूर्व संबंध चूक आहेत असे मानणाऱ्या पिढीचा माणूस त्यानंतर ते गुजराथी आहेत. त्यानंतर मात्र मला राहवले नाही व मी ती प्रतिक्रिया दिली होती. असो.

लग्नापूर्वी शरीरसंबंध असणे ही गोष्ट आजच्या काळात नवीन किंवा आश्चर्यजनक नक्कीच नाहीये. तरीही आपल्या समाजात ती सहजपणे स्वीकारली जात नाही. मला वाटतं डॉक्टर साहेबांचे मित्र स्वभावाने जास्त भावनाप्रधान आहेत. कारण अशी माणसं प्रत्येक गोष्टीत खूपच इन्व्हॉल्व्ह होतात. इथे तर त्यांच्या जवळच्या मित्राच्या बाबतीत हे घडलं असल्याने आणि त्याची त्यांना पूर्वकल्पना असल्याने त्यांना अपराधी वाटत आहे. पण ते तर त्या मुलीला लग्नाच्या रिसेप्शनला भेटले, तोपर्यंत त्यांना कल्पनाही नव्हती, त्यामुळे ह्यात त्यांचा काहीच दोष नाही. ज्याप्रमाणे त्या मुलीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तसे त्यांनीही करावे. तसेच आपल्या व्यवसायाचं कारण देऊन मित्राकडे जाणं कमी करू शकतात.

या मुलीने जाणूनबुजून लग्नाआधी शरीरसंबंध ठेवले आहेत. ज्याच्याशी शरीरसंबंध ठेवले आहेत त्याच्याशी लग्न करायचे नाही कारण तो पैसेवाला नाही, हे देखील पक्के ठरलेले आहे. शरीरसंबंधातून गर्भधारणा झाल्यावर मूल नको म्हणून तिने गर्भपात करून घेतला व नंतर दुसर्‍याच मुलाशी लग्नही केले. ज्या डॉक्टरने गर्भपात केला त्याच्याच मित्राची ही सून झाली. आपल्या मित्राला सांगावे का नाही या संभ्रमात तो आहे. सांगितले तर रूग्णाच्या गोपनीयतेची शपथ मोडली जाते व नाही सांगितले तर मित्राची फसवणूक झालेली आहे व आपल्याला माहिती असून आपण मित्राला सांगितले नाही ही खंत मनात आहे. माझ्या दृष्टीने यात रूग्णाची गोपनीयता मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळात ही मुलगी रूग्ण नव्हतीच. तिला कोणताही आजार नव्हता. गर्भातील बाळात जन्मतःच गंभीर दोष असणे, बाळाचा जन्म आईसाठी धोकादायक असणे, बलात्कारातून गर्भधारणा होणे, आईवडीलांना असलेले रोग (उदा. एचआयव्ही) बाळामध्ये संक्रमित होण्याची शक्यता असणे असे गर्भपातासाठी कोणतेही सबळ कारण तिच्याकडे नव्हते. जरी गर्भपात हा कायदेशीर असला तरी सबळ कारणाशिवाय गर्भपात करणे हे निदान माझ्या दृष्टीने तरी एका जीवाची हत्या करण्यासारखेच आहे. या डॉक्टरला गोपनीयतेची शपथ मोडण्याची खंत वाटत होती. त्याऐवजी सबळ कारणाशिवाय गर्भपात करण्यात सहभागी झाल्याची खंत वाटायला हवी. ही मुलगी मुळात रूग्णच नसल्याने रूग्णाच्या गोपनीयतेची शपथ मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याने आपल्या मित्राची फसवणूक टाळण्याकरिता मित्राला सत्य सांगायला हवे होते. अर्थात, मुलीने मुलाला पूर्वकल्पना दिली असेल तर कोणालाच काही आक्षेप असण्याचे कारण नाही. ज्या मुलीला लग्नाआधी वेगळ्याच मुलाशी शरीरसंबंध ठेवायची सवय आहे व जिच्या दृष्टीने पैसा सर्वाधिक महत्वाचा आहे, ती मुलगी भविष्यात अशाच तर्‍हेचे संबंध दुसर्‍याशी संबंध ठेवण्याची बरीच शक्यता आहे. तिला अजून एखादा जास्त धनाढ्य भेटला तर आताच्या नवर्‍याला सोडून ती त्या धनाढ्याबरोबर जाण्याची देखील शक्यता आहे. माझ्या माहितीतल्या एकदोन मुलींनी (व मुलांनी सुद्धा) लग्नानंतर सुद्धा अशा तर्‍हेचे संबंध कायम ठेवलेले मला माहीत आहे. लग्नाआधी बराच काळ एका मुलाशी संबंध ठेवून त्याच्याशीच लग्न केलेल्या मुलीने लग्नानंतर मुलाच्याच मित्रांशी संबंध सुरू केल्याने त्यांचा घटस्फोट झाल्याचे एक अगदी जवळ्चे उदाहरण मला माहित आहे. अजून एका उदाहरणात एका मुलीने लग्नानंतर व एक मुलगी झाल्यानंतर लग्नापूर्वीच्या प्रियकराशी लग्न करण्याचे ठरवून नवर्‍याशी घटस्फोट घेऊन मुलीसकट पूर्वीच्या प्रियकराशी लग्न केले. यात मधल्यामध्ये तिच्या नवर्‍याची वाट लागली. आपल्या बायकोच्या लग्नाआधीच्या प्रकरणाची त्याला कल्पनाच नव्हती व संसार सुरू झाल्यावर २-३ वर्षातच बायकोने संसार मोडला व जाताना सुद्धा नवर्‍याला हुंड्यावरून छळ केल्याची तक्रार करण्याची धमकी देऊन घटस्फोटाची किंमत म्हणून ८५ हजार रूपये उकळले. मुलाची परिस्थिती अगदीच सामान्य होती (मुलीची घरची परिस्थिती सुद्धा सामान्यच होती). बिचार्‍याला स्वतःची अजिबात चूक नसताना बळजबरीने संसार मोडावा लागला व परवडत नसताना सुद्धा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यामुळे या विशिष्ट प्रकरणात ही मुलगी आताच्या नवर्‍याबरोबर कायम राहील ही शक्यता कमी वाटते. ही मुलगी लग्नानंतर काही काळाने मूळपदावर गेली तर तिच्या नवर्‍याला व त्याच्या घरच्यांना हे प्रकरण अत्यंत महागात जाईल. आपल्या डॉक्टर मित्राने सर्व इतिहास माहित असून सुद्धा आपल्याला अंधारात ठेवले हे जर त्या मित्राला समजले तर शेवटी या डॉक्टरवरच दोषारोप होतील. माझ्या दृष्टीने या डॉकटरने आपल्या मित्राल हा पूर्वोतिहास सांगून सावध करायला हवे होते.

In reply to by श्रीगुरुजी

Environmental clauses could include, by interpretation, drunkard husband, low-income group, large family etc. By and large, these explanations provide for two instances where continued pregnancy is assumed to constitute a grave injury to the mental health of the pregnant woman, namely where the pregnancy is alleged by a woman to have being caused by rape and second where the pregnancy occurs as a result of failure f any device by a married woman or her husband for purpose of limiting the number of children. फायनान्शियल रीजन ... मूल सांभाळण्याची नवरा बायकोची ( किंवा बॉय फ्रेंड गर्ल फ्रेंडची ) इच्छा नसणे, हेही वॅलिड रीजन आहे. प्रेग्नन्सी हा आजार नाही. प्रेग्नंंट स्त्री ही रुग्ण नाही, पण व्यावसायिक गोपनीयता त्यालाही लागू होते.

In reply to by आनंदी गोपाळ

रुग्ण नसताना अशा मुलीची सोनोग्राफी करणार्‍या, अन तिचे गर्भपाताचे ऑपरेशन करणार्‍या दोन्ही डॉक्टरांवर आजकालच्या फ्याशनप्रमाणे 'एफायार' दाखल करावा, अशी जोरदार मागणी नोंदवतो!


In reply to by आनंदी गोपाळ

रुग्ण नसताना अशा मुलीची सोनोग्राफी करणार्‍या, अन तिचे गर्भपाताचे ऑपरेशन करणार्‍या दोन्ही डॉक्टरांवर आजकालच्या फ्याशनप्रमाणे 'एफायार' दाखल करावा, अशी जोरदार मागणी नोंदवतो!
कसं सुचतं हो तुम्हाला हे असलं अकलेचे तारे तोडणं? याच फ्याशनपायी गर्भातील शेकडो मुलींचा जन्माआधीच गर्भपात करून देणार्‍या त्या सुदाम मुंडे नावाच्या डॉक्टरला आणि त्याच्या डॉक्टर बायडीला फ्याशनेबल लोकांनी पोलिसात एफायार दाखल करून तुरूंगात जायला लावलं! दोघेही बिचारे अजून तुरूंगात बसलेत. गर्भ मुलीचा असल्याने सोनोग्राफी करून गर्भपात करून देणार्‍या बर्‍याच डॉक्टरांना याच फ्याशनपायी त्रास होतोय!!

In reply to by श्रीगुरुजी

का उगाच फुगड्या घालताय ? गर्भ मुलीचा आहे याचे निदान करवुन तो गर्भपात करणे हा गुन्हा आहे. पण गर्भ आपणास ठेवायचा नाही ( लिंग निदान न करता ) ... असे ठरवुन एम टी पी केली की गुन्हा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

वर त्या चंपाबाईंनी सुद्धा लिहीलय की हो गुरुजी.. गरोदरपणा आजर नसतो, पण त्याची गोपनीयता पाळावी लागतेच की नाही? आणि गर्भपातासाठी बाळ जन्माला घालण्याची इच्छा नसणे हे ही सबळ कारण आहेच. तुम्हाला वाटत नसलं म्हणुन काय झालं? पोटात जीव आहे म्हणुन तो जन्माला घातलाच पाहिजे असं लॉजिक कसं लावता येईल? अनेकदा चुकुन प्रेग्ननसी रहाते, आधीच मुलं असताना आणि अजिबात औकाद नसताना असं जीवाला जन्म द्यायचं ठरवलं तर कसं व्हायचं!!

In reply to by पिलीयन रायडर

पोटात जीव आहे म्हणुन तो जन्माला घातलाच पाहिजे असं लॉजिक कसं लावता येईल? सहमत, गर्भपाता संबंधित असल्याच धार्मिक अन दलिंदर धारणा अन कायद्यांपाई, आयर्लंड मध्ये डॉक्टर सविता हलपन्नवार, ह्या तरुण दंतवैद्य स्त्रीचे २०१२ साली झालेले निधन एकदम डोळ्यासमोर तरळले!.असो :/

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गर्भपाता संबंधित असल्याच धार्मिक अन दलिंदर धारणा अन कायद्यांपाई, आयर्लंड मध्ये डॉक्टर सविता हलपन्नवार, ह्या तरुण दंतवैद्य स्त्रीचे २०१२ साली झालेले निधन एकदम डोळ्यासमोर तरळले!.असो :/
या स्त्रीला बाळंतपण झाल्यास जीवाला धोका आहे हे खूप पूर्वीच डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. बाळंतपणापूर्वीच किंवा बाळंत होत असताना स्त्री व बाळ अशा दोघांचाही मृत्यु होण्याची शक्यता होती. अशा प्रकरणात गर्भपात करण्यास हरकत नसावी. परंतु या विशिष्ट प्रकरणात अशी कोणतीच समस्या नव्हती. मूल नको असताना व गर्भधारणा होईल याची कल्पना असताना सुद्धा समजून उमजून असुरक्षित संबंध ठेवून ही मुलगी गर्भवती झाली आणि नंतर गर्भासंबंधी कोणतीच समस्या नसताना डॉक्टरकडे जाऊन गर्भपात केला. माझ्या दृष्टीने ही हत्या आहे.

In reply to by पिलीयन रायडर

माझा प्रतिसाद नीट वाचा. गरोदरपणा हा आजार नसतो हेच मी माझ्या प्रतिसादात लिहिलं आहे. या विशिष्ट मुलीच्या बाबतीत ही प्रेग्नन्सी चुकुन राहिली, आधीची मुलं होती व नवीन मुलाची औकाद नव्हती इ. गोष्टी अजिबात नव्हत्या. ज्याच्याशी अजिबात लग्न करायचे नाही हे ठरविलेले होते त्याच मुलाशी या मुलीने पूर्णपणे समजून उमजून लग्नाआधीच असुरक्षित शरीरसंबंध ठेवले होते. गर्भधारणा झाल्यावर गर्भात जन्मतःच दोष आहे, गर्भामुळे आईच्या जीवाला धोका आहे, बलात्कारामुळे गर्भधारणा झाली आहे इ. कोणतेही सबळ कारण गर्भपातासाठी नव्हते. गर्भधारणा होईल याची जाणीव असतानासुद्धा, आपल्याला मूल नको आहे, आपण ज्याच्याशी शरीरसंबंध ठेवत आहोत त्याच्याशी आपण लग्न करणार नाही हे पूर्णपणे ठरलेले असताना सुद्धा जाणूनबुजून असुरक्षित शरीरसंबंध ठेवणे व नंतर गर्भधारणा झाल्यावर कोणतेही सबळ कारण नसताना गर्भपात करणे हे माझ्या दृष्टीने हत्या करण्यासारखेच आहे. इतरांचे याबाबतीत पूर्ण वेगळे मत असू शकते. अमेरिकेसारख्या देशात गर्भवती महिलेचा खून केला किंवा ती एखाद्याच्या चुकीने अपघातात गेली तर आरोपीवर फक्त महिलेच्या खुनाचा आरोप न ठेवता महिला व तिच्या पोटातील गर्भ अशा दोन खुनांचा आरोप लावला जातो. अशा प्रकरणात न जन्मलेल्या गर्भाची सुद्धा हत्या केली असा कायदेशीर आरोप लावला जातो.

In reply to by श्रीगुरुजी

समजा त्या मुलीला फक्त तिच्या आनंदासाठी शरीरसंबंध ठेवायचे असतील आणि वापरलेले गर्भनिरोधक १००% सुरक्षित नसल्याने ही गर्भधारणा झाली असेल तर काय? मला वाटत नाही की ज्या व्यक्तिला मुल नको आहे ती व्यक्ति "चला असुरक्षित संबंध ठेवुया. झालो गरोदर तरी करुन घेऊन गर्भपात..हाकानाका" असं म्हणत असेल. ज्याला मुल नको असतं तो घ्यायची ती काळजी घेतोच, त्यातुनही गर्भ राहिल्यास गर्भपात करण्याचा एक पर्याय असतो. ज्याच्या सोबत लग्न करायचे नाही त्याच्या सोबत शरीरसंबंध ठेवले आणि त्यातुन जर गर्भधारणा झाली तरीही केवळ हत्या नको म्हणुन मुल जन्माला घालण्यासारखी मोठी गोष्ट करायची का? नको असलेले मुल जन्माला घालणे त्या बाळाच्याच दृष्टीने अवघड नाही का? जर एखादा वैद्यकीय मुद्दा असेल / बाळात काही दोष असेल तर मात्र हाच गर्भपात तत्त्वतः योग्य कसा होतो? अपंग, मतिमंद बाळांना मारलं तरी चालतं का म्हणजे? दुसरा मुद्दा, कुणी गर्भवती महिलेची हत्या करणं आणि गर्भपात ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जे बाळाला जन्म देणार आहेत, ज्यांना त्याचे आयुष्यभर पालनपोषण करायचे आहे, त्यांना गर्भपाताचा निर्णय घेण्याचा हक्क आहेच. फक्त हा निर्णय लिंगाधारित असु नये, हे मलाही मान्य आहेच.

In reply to by श्रीगुरुजी

बुट्टीत घालून नदीत सोडायला हवं होतं... मग गुर्जींच्या घरी ते आलं असतं व त्यानी ते संभाळंलं असतं. मग पोरगं मोठं झाल्यावर बोलणार.. मै रूपेय नहीं , गुर्जेय हूं !

In reply to by अनुप ढेरे

फिस्कन हसू आलं राव, पण ते कदाचित असेही म्हणाले असते. "यात मोदींची काही चूक नाही" ;)

In reply to by चंपाबाई

=))

In reply to by चंपाबाई

भारी प्रतिसाद!

माझ्या एक्स गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला त्याच्या बायकोच्या पूर्व इतिहासाबद्दल सांगावे कि नको कारण तो माझा जीवश्च कंठाश्च मित्र आहे..

In reply to by संदीप डांगे

तुमच्या जिवश्च कंठश्च मित्राला तुमच्या मैत्रिणींबद्दल माहिती नाही हेच मुळात अघटित वाटते. तो कदाचित जिवश्च कंठश्च नसावा. ;)

In reply to by वाल्मिक

पॉसिबिलिटीज आर अनलिमिटेड!!! =)) १. एक्सगर्लफ्रेंड ने आम्हाला वयाच्या चोविसाव्या वर्षी डिच केले. २. वयाच्या ३२ व्या वर्षी आम्हाला (कामानिमित्त) एक जबरदस्त मित्र भेटला. ३. त्याने त्याच्या (अरेंज्ड) लग्नाला बोलावले तेव्हा वधू आमची एक्सगफ्रे, होती. आता बोला...??? =)) =))

मला असं का वाटतंय कि या कथेत नायिका असल्यामुळे डॉक वर जास्त टीका झाली. म्हणजे जर मुली ऐवजी मुलगा असता ज्याने आपल्या मैत्रिणीला गर्भपातासाठी आणले असते आणि तो नंतर मित्राचा जावई म्हणून भेटला असता तर लोकांनी काय सल्ला दिला असता? कदाचित असे सांगितले असते का कि मित्राला सावध करा किंवा मित्राने पूर्ण चौकशी केली आहे कि नाही हे विचारा इत्यादी.. इथे बरयाच लोकांनी म्हंटले आहे कि त्यांच्या मुलांनी असे लग्न केले तर हरकत नाही. पण मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे कि समजा तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि ज्या मुलीचा तुम्ही गर्भपात केला आहे ती मुलगी तुमच्या मुलाने सून म्हणून तुम्हाला दाखवली तर तुम्ही डॉक्टर पेशंट गोपनीयतेचा विचार करून गप्प बसाल कि मुलाला तुमच्याकडे असलेली माहिती द्याल? डॉक्टरांच्या मित्राला जर ती मुलगी परत भेटली नसती तर प्रश्नच नव्हता. पण ती भेटली आणि काही नात्याने भेटली आहे. आता प्रॉब्लेम असा आहे अशा गोष्टी कायम लपून राहतातच असे नाही. त्यामुळे समजा उद्या हे त्या कुटुंबाला कळले तर काय? काही लोकांचा विश्वास आहे कि मुलीने हे सर्व मुलाला सांगितले असणार वगैरे.. तर त्या केसमध्ये मुलीने हे पण सांगितले असणार कि याच डॉक्टरांकडे मी गेले होते. मग किमान त्या मित्राच्या मुलाने तरी डॉक्टरांच्या मित्राला भेटून खात्री द्यायला हवी होती. I mean, its common sense.

In reply to by पद्माक्षी

काही लोकांचा विश्वास आहे कि मुलीने हे सर्व मुलाला सांगितले असणार वगैरे.. तर त्या केसमध्ये मुलीने हे पण सांगितले असणार कि याच डॉक्टरांकडे मी गेले होते. नॉट नेसेसरी. पण तुमच्या तर्कांची दिशा मात्र आवडली. तार्किकदृष्ट्या बोलायचे झाल्यास मुद्द्यात दम है :)

In reply to by मृत्युन्जय

हा ना.
मुद्दा हा आहे कि समजा तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि ज्या मुलीचा तुम्ही गर्भपात केला आहे ती मुलगी तुमच्या मुलाने सून म्हणून तुम्हाला दाखवली तर तुम्ही डॉक्टर पेशंट गोपनीयतेचा विचार करून गप्प बसाल कि मुलाला तुमच्याकडे असलेली माहिती द्याल?
हेच विचारतोय हैसियत का मामला म्हणून. घरची, आपली बाब येते तेंव्हा कुठली हैसियत अव्वल?

In reply to by मृत्युन्जय

मला तरी यात डॉक्टरांची काही चूक आहे असे वाटले नाही. सरळ साधा किस्सा आहे, रादर व्यावसायिक नीतिमत्ता हा मुद्दा मला काही फार महत्वाचा वाटला नाही या प्रसंगात. म्हणजे तसे काही बंधन नसते तरी एकदा लग्न होऊन गेल्यावर डॉक्टर आपल्या मित्राला काही सांगू शकले असते का ? नॉट शुअर..

कमाल आहे, सगळी लाज बघणं-यालाच असावी का ? एका मित्राची कुचंबणा (शृंगापत्ती शब्द आवडलेला आहे) एक केस स्टडी म्हणून स्वीकारायची ब-याच जणांची तयारी नाही. धागाकर्ता बुर्झ्वा आणि ज्या मुलीने लग्नाआधी स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवले ति स्वातंत्र्याची देवता. एक तर लेखकाने मांडलेल्या चौकटीतून घटनेबद्दल काथ्या कुटावा अन्यथा वास्तवातील पात्रे ओळखीची असतील तर दुसरी बाजू मांडावी. बाकी आत्याबाईच्या मिश्या ..... - डॉक्टरांच्या मुलाने/मुलीने लग्नाआधी संबंध ठेवले तर, - मुलगी ज्याच्यामुले गरोदर राहिली त्याच्याशी परत संबंध ठेवणारच नाही, - ज्या मुलामुळे गरोदर होती त्याला एड्स झाला असेल तर, - ज्याच्याशी लग्न झाले त्याच्यामुळे कुणी गर्भपात केला असेल तर, - मुलीचे एकाच मुलाशी संबध असतील का, - मुलीचा एकच गर्भपात झाला असेल का, हि मालिका अशी चालू राहिल्यास तारक मेहता का उलटा चष्मा पेक्षा लांब मालिका होईल. एक कल्पना ... समजा स्वत: ती मुलगी मिपावर आली तर काय म्हणेल/लिहील ? ब-याचश्या प्रतिसादांवरून असे वाटते कि कथेतली मुलगी योनिशुचीतेच्या अवास्तव कल्पनांच्या विरुध्ध बंड करून उठलेली नायिका आहे आणि आपल्या समाजात लग्न हि गोष्ट “संपूर्ण स्वतंत्र्याच्या” आड येत असल्यामुळे आऊटडेटेड झाली आही.

खरं सांगायचं तर खूप मनोरंजक धागा आणि चर्चा, मोबाईलवर असल्याने जास्त लिहू शकता नाही, पण ... असोच!!

महान शिक्षक आहे. ही थोड़ी बहुत सर्व सामान्य गोष्ट ठरत चालली आहे लग्नाआधी शरीर संबंध हे निरीक्षण भारतातलेच. म्हणजे एक अनुभव /ओढ/चढाओढ किंवा अपरिहार्यता इ सर्व परिस्थितित परिणति शरीर संबंधात होतेच, पण इतके गर्भवती होने पर्यंत फार कमी प्रमाण असावे असे वाटते, अहो पुढची पिढी हुशार नाहीं का! तर घासकडवींनी म्हटल्याप्रमाणे गर्भपात कराने साठी (जे काही अंशी पापच ठरते-जसे फक्त मजा करुन घेताना गर्भ धारण करायचा अन् मारायचा) धंदा करायचा, उगीच नैतिकता -मूल्यांकन काहीतरी बागूलबुवा उभा करायचा. नैतिक मूल्ये, आचरण हे व्यक्ति, धर्म,पंथ, जाती -पाती, रिति-रिवाज, देश-ठिकाने या दरम्यान बदलत रहातात, त्यात अडकून मैत्री -विश्वास याला तोड़ता पहाणे कष्टप्रद. मागच्या पिढीने ठरवले की गर्भपात नैतिक (वरिल गोष्टीतल) पण संबंध अनैतिक, काहीही. बरं हेच पाप करुन स्वतःची मुले मोठी करुन मोक्ष प्राप्तिची अपेक्षा करणे म्हणजे हिप्पोक्रसी!

लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. कुणी उत्तम विचार प्रवर्तक दिल्या. काहींनी नीट वाचन न करता दिल्या, कुणी भावनेच्या भरात दिल्या. जशा आहेत तशा त्या शिरसावंद्य. माझ्या मित्राला शृंगापत्ती केवळ लेखात लिहिली आहे एवढ्याच कारणाने झाली नाही तर त्याला हि चिंता वाटते कि उद्या हीच मुलगी (रुपाली) तिच्या घरचे गरोदर झाल्यावर "घरचे स्त्रीरोग तज्ञ" म्हणून माझ्याकडे परत घेऊन आले तर? व्यावसायिक नीतिमत्ता बाळगून तिच्या जुन्या गर्भपाता बद्दल गप्प राहायचे आणि केस पेपर मध्ये पहिल्यांदाच गरोदर ( प्रायमि ग्रॅव्हिडा) असे खोटे लिहायचे ? कि मित्राच्या कुटुंबाला सर्व खरे सांगायचे? (जर त्या मुलीने आपल्या गर्भपाताबद्दल घरी सांगितले नसेल तर)