इंग्रजी व्यायामशाळा
मराठी-इंग्रजी शब्दकोष असं सांगतो की ‘व्यायामशाळा’ याचा समानार्थी इंग्रजी शब्द आहे ‘जिम्नॅशियम’. मात्र बोली भाषेत ह्या दोन्हीमध्ये फारच तफावत आहे.
पूर्वी व्यायामशाळा असायच्या. व्यायामशाळा म्हणजे जिथे दंड, जोर, बैठका, मुद्गल, डंब-बेल्स आणि तत्सम उचलण्याची वजने हे मुख्य व्यायामप्रकार. थोडक्यात म्हणजे गुरुत्वाकर्षणाविरुद्ध सगळे व्यायाम. सिंगल बार, डबल बार, शिवाय जागा असली तर आखाडा आणि मलखांब. चपला बूट बाहेर काढायचे. व्यायाम अनवाणी करायचा.
लॉकर्स वगैरे नाहीत. काढलेले कपडे अडकवायला भिंतींवर खिळे. बहुतेक जण बनियनवर व्यायाम करायचे. काही उघडबंबही असायचे आणि त्यात कोणालाही काही गैर वाटत नसे. सगळा माहोल पुरुषी. मध्यवर्ती ठिकाणी मारुतीरायाची फोटोफ्रेम. त्याला नित्यनेमानी फुलं वाहिली जात आणि उदबत्ती लावली जाई. बहुतेक व्यायामपटु आल्याआल्या मारुतीरायांना नमस्कार करून व्यायाम सुरू करायचे.
मासिक फी अतिशय माफक असायची. “अमक्या अमक्या रुपयांत इतके इंच/किलो कमी करून देऊ” (मागोमाग *Conditions Apply) अशा वल्गना अजून आस्तित्वात आलेल्या नव्हत्या.
तेव्हां जिम्नॅशियम्स फक्त पंचतारांकित हॉटेलांमध्ये दिसायच्या. आम जनतेचा त्यांच्याशी संबंधच नव्हता. यात विविध प्रकारची यंत्रं असायची. जागच्या जागीच चालणं, धावणं, सायकल चालवणं, वेगवेगळ्या अंशात हॅन्डल्स ओढून वा ढकलून शरीरातल्या वेगवेगळ्या स्नायुगटांना नेमका व्यायाम देणारी यंत्र, भिंतींवर छोटस्सं डोकं, अगदी खपाटीला गेलेलं पोट, पण बाकी शरीरभर पीळदार स्नायूंचा अतिरेक असलेल्या नीग्रो नाहीतर गोर्या महाकाय व्यायामपटूंचे फोटो लावलेले, दिवे म्हणजे पिवळा उजेड देणारे बल्ब नसून ट्यूबलाइट्स, पावलांना मसाज देणारी यंत्रं, स्टीम बाथ! सगळंच स्वप्नवत्! सामान्य मनुष्य इकडे वळण्याचा प्रश्नच नव्हता.
अशा वातावरणात तळवलकर बंधूंनी मुंबईच्या सिटीलाईट थियेटरजवळ पहिली जिम्नॅशियम उघडली! आमच्या घरून शिवाजी पार्ककडे जाण्याच्या अगदी रस्त्यावर. मला आणि मित्रमंडळींना खेळाची आणि व्यायामाची आवड होतीच. त्यामुळे शरीरयष्टीही बरी होती. आम्ही सगळे जण आशाळभूतपणे त्या नवनवीन मशीन्सकडे काचेतून पहायचो. व्यायामशाळेच्या तुलनेत सभासद वर्गणी कैच्या कै महाग! परवडण्याचा प्रश्नच नव्हता.
अविनाश तळवलकर तिथे असायचा. भक्कम शरीरयष्टी आणि छाप पडेल असं व्यक्तिमत्व. खूप लोक चौकशीला यायचे. तो आलेल्या प्रत्येकाला माहिती द्यायचा, या मशीन्समुळे व्यायामाच्या गुणवत्तेत कसा आणि का फरक पडतो तो समजवायचा. लोक त्याने भारावून जायचे खरे, पण प्रत्यक्षात सभासदत्व घ्यायचे नाहीत. किमतीच्या बाबतीत व्यायामशाळांशी स्पर्धा करणं अवघडंच होतं. असे कित्येक महिने गेले.
आम्ही मात्र जातायेता कित्येक वेळा तिथे डोकावून आमचे डोळे शेकून घ्यायचो.
एक दिवस अविनाशनी आम्हाला आत बोलावलं अन् विचारलं. “काय, इथे व्यायाम करायला आवडेल का?” आमच्या उत्तराची वाट न बघता आम्हाला वेगवेगळ्या मशीन्सची माहिती द्यायला लागला.
काही माकडं जशी खायला वेळ नसला की हाती लागलेले खाद्यपदार्थ भसाभसा गालात कोंबून ठेवतात नंतर खाण्यासाठी, तसं मी “इथे कोणाच्या बापाला परवडणार आहे?” हा जिभेवर असलेला प्रतिप्रश्न बाजूला सरकवून गालात ठेवून दिला आणि तो देत असलेली माहिती ऐकायला लागलो.
सगळ्या जिमची माहिती मिळाल्यानंतरच आमच्या सांपत्तिक दुर्बलतेची बातमी त्याला द्यावी असं मी ठरवलं. मात्र अविनाशनी ती संधीच दिली नाही. त्यानी आम्हाला एक ऑफर दिली.
“तुम्ही इथे रोज संध्याकाळी फुकट व्यायाम करू शकता. कसा करायचा ते मी शिकवीन. मात्र किमान एक तास तरी व्यायाम करायचाच. वर प्रत्येकाला रोज एक मिल्क शेक मिळेल!”
च्यायला, आंधळ्यानी मागितला एकही नाही, तरी मिळाले डायरेक्ट दोन डोळे!
मृग सोन्याचा जगी असंभव । तरिहि तयाला भुलले राघव ।।
पण आम्ही नाही.
मध्यमवर्गीय विचारांमध्ये आश्वासक असं एक स्थैर्य असतं. ‘कोणतीही गोष्ट फुकट मिळंत नाही आणि जर का मिळालीच तर भविष्यात त्याची अवाच्या सवा किंमत मोजावी लागते.’ हा तो विचार.
त्यामुळे लगेच आमचा पुढचा प्रश्न. “आम्हालाच का बरं देणार?” माझी कल्पना अशी की आधीच चमकंत असलेल्या या यंत्रांना रोज आणखी चमकवून ठेवायचं असेल, किंवा कॉलेजांमध्ये जाऊन जाहिरातीची पत्रकं वाटायची वगैरे अशी कामं असतील. पण अविनाशनी एक अनपेक्षित प्रस्ताव ठेवला.
आम्ही व्यायाम करंत असताना जे कोणी जिम बघायला येतील त्यांना आम्ही आमचे अनुभव सांगायचे! आम्ही ‘व्यायामशाळां’मध्ये व्यायाम करतंच होतो. त्यात आणि यात काय फरक वाटतो ते सांगायचं. काहीही खोटेपणा नसल्यामुळे आम्ही लगेचंच राजी झालो.
आम्हाला ते व्यायामप्रकार मनापासून आवडायचे. जिम पाहायला येणार्या प्रत्येकाला ठरल्याप्रमाणे आम्ही त्याबद्दल सांगायचो. त्यातून मी गप्पिष्ट असल्यामुळे वाहावत जाऊन जरा अतीच वर्णन करायचो. लगेचंच अविनाशनी मला झापलं!
तेव्हां त्यानी मला एक interesting वाक्य ऐकवलं. “सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.”
त्यानी मला सगळ्यांसमोर झापल्यामुळे मी खट्टू झालो खरा, पण बिझनेसची जरूर असूनदेखील अविनाशनी खरं बोलण्यावर इतका आग्रह धरला याचं मला अतिशय कौतुक वाटलं.
आम्ही पाच सात महिने व्यायाम केला, माहिती दिली अन् रोज मिल्क शेक प्यायलो. हळुहळु लोकांचा राबता वाढला. गर्दी वाढल्यावर आमचं तिथे जाणं बंद झालं. त्यानंतर आयुष्यात माझा तळवलकर जिमशी संबंध आला नाही. पुढे ‘तळवलकर जिम’ हा ब्रॅण्ड सशक्तपणे वाढला हे सगळ्यांना माहीतच आहे.
‘इन्स्टंटका जमाना है भाई’ असं जरी म्हटलं जात असलं तरी उपयुक्त सर्विस जर आपण लोकांना दिली आणि तातडीच्या नफ्याकडे आकर्षित न होता सचोटीनी धंदा केला तर कालांतराने तो देखील खूप यशस्वी होऊ शकतो हा तळवलकर जिम, चितळे बंधू वगैरेंचा अनुभव आपल्यासारख्यांसाठी आश्वासकच आहे हे नक्की.
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणे हटके लिखाण.
+१
+१
+१
सहीच.... तळवलकर्स हिस्ट्री
आवडेश
नेहमीप्रमाणेच जबरदस्त.
छान लेख...
+१००००
मस्त लेख..आवडेश..
एक नंबर
ह्म्म !!
खुसखुशीत लेख, आवडला!
व्यावहारीक चतुर तळवलकर...
तळवलकरांनी उच्चभ्रू वर्गात
आपण अशा उद्योजकांचा आदर्श
सुंदर अनुभव ! मोजक्या मराठी
"सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.”१००% सत्य :) कारण, सत्यात थोडीशी भर घातली की त्याचे अर्धसत्य बनते आणि भरीचा अतिरेक केला की त्याचे असत्य बनायला वेळ लागत नाही.+१०००
तळवळकर जीम मधे प्रवेश घ्यावा
१००% सहमत. मागच्या २
एकदा व्यायामशाळेत गेलो की
:)
सर्वजण,
:) नेहमीप्रमाणे छान लेख!
लेख आवडला!
मनापासून लिहिले आहे....
लेख खूप आवडला
लेख आवडला
हायब्रिड सायकल्स बसवून त्यांपासून वीज निर्माण करता आली तर ...
आमच्या आवडत्या मालिकेतला हा
लेख खूप आवडला सर, प्रचंड
लेख नेहमीप्रमाणे छान..
लेख आवडला.
मस्त लेख!
तळवळकरांची तळमळ भावली आणी
+१११११
+ १११११
छान!
लेख आवडला..
लेख आवडला..
लेख आवडला.
लेख आवडला....
जरूर द्या की!
लेख आवडला. मला नेहमीच धंद्यात