✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चोरी प्रकाशाची (१)

स
सस्नेह यांनी
Mon, 07/25/2016 - 15:04  ·  लेख
लेख
...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! , अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...! आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब. जलसंपत्तीप्रमाणेच वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आता संपत्ती म्हटली की चोरीचा धोका आला ! आणि ही संपत्ती काही कडीकुलुपात ठेवता येत नाही. तेव्हा हिचे संरक्षण म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. विजेची चोरी हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल फौजदारी केस आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो. तरीही याबद्दल एक प्रकारची बेफिकिरी दिसून येते. सर्वसाधारण पणे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा पूर्वेकडे हे प्रमाण जास्त आहे. काही प्रतिष्ठित उद्योगधंदेसुद्धा वीज-चोरीसारख्या अनिष्ट गोष्टी सर्रास करताना आढळले आहेत. वीज चोऱ्या पकडण्यासाठी खास पथके नियुक्त केलेली असतात. पूर्वेकडच्या भागात अशाच एका पथकाचे नियंत्रण करण्याची एकदा वेळ आली होती. तेव्हा विजेची चोरी करण्यात आणि ती पकडण्यातही किती कल्पकता असते हे बघायला मिळाले. त्यातले काही मजेदार किस्से. भाग बरेचदा अनोळखी असे. पोलिसांचे जसे खबरे असतात, तसे आमचेही. हे खबरे म्हणजे लोकल माहितगार व्यक्ती. त्या त्या भागातल्या वायरमन लोकांना सर्वसाधारणपणे चोऱ्यावाले ठाऊक असत. पण त्यांनी चोरी पकडली तर नंतर त्या भागात काम करणे जिकिरीचे होई. म्हणून ते प्रत्यक्ष भाग न घेता आम्हाला मार्ग दाखवत. पुढे चोरी पकडली तरी ते तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करणे फार तापदायक काम असे. डायरेक्ट मीटरमध्ये लुडबुड केलेली बरेचदा वरवर पाहणी करून दिसत नाही. मग मशीन लावून युनिटची तुलना केल्यावर फरक दिसे. त्यानंतर मीटर काढून सील करून त्यावर ग्राहक आणि साक्षीदाराची सही घेणे, ते व्यवस्थित सील करणे, तपासणीला पाठवणे, मग टेम्परिंग कन्फर्म झाल्यावर चोरीचा हिशेब काढणे इ. सोपस्कार होत. तत्पूर्वी ग्राहकाकडून अंदाजे फरकाची रक्कम भरून घ्यावी लागे. तिथेच मतभेद होत. वीज चोर काही केल्या सहकार्य करीत नसे. चोरी नेमकी कधीपासून सुरू होती, ते कळायला पुष्कळदा मार्ग नसे. मग कमीतकमी कालावधी म्हणजे सहा महिन्याच्या बिलाची फरक रक्कम काढून कोटेशन द्यायचे आणि रक्कम भरून घ्यायची. ही रक्कम ग्राहक काही केल्या मान्य करत नसे. ग्रामीण भागात दादागिरी. ‘चोरी बिरी काही नाही, बिल भरणार नाय, कनेक्शन बंद करू देणार नाय’ ही भाषा. मग पोलिसांची मदत घ्यावी लागे. हजार लफडी. एकदा एका घरात मीटरमध्ये गडबड आहे असे अनेक जणांकडून कळले होते. पण चेकिंगला गेले की घरमालकिणीला दुरूनच दिसे. मग ती पाळलेला कुत्रा मोकळा सोडे आणि आपण घरात जाऊन दार बंद करून बसे. कुत्रा वायरमन लोकांना कंपाउंडच्या आत येउच देत नसे. मग आमच्या वायरमनने एकदा गुंगीचे औषध घातलेले बिस्कीट आधीच कुत्र्याला चारले आणि मग मागील दाराने जाऊन चेकिंग केले. चोरी होतीच. मीटरमध्ये अंदाधुंद गडबड. मशीन लावायची गरजच पडली नाही. टेम्परिंग सरळ दिसत होते. सापडली ना चोरी न काय ? घरमालकीण कधी न ऐकलेल्या शिव्या देऊ लागली. पोलिसांचं नाव काढल्यावरच गप्प झाली. असाच आणखी एक किस्सा. बऱ्याच दिवसापासून ही केस सस्पेक्टेड होती. दुमजली घर. मीटर जिन्यात अत्यंत अडचणीच्या ठिकाणी. तिथे उजेड बेतास बात होता. मीटर बघायला दिवसासुद्धा टॉर्च वापरावा लागे. घरात बारा पंधरा माणसे. वर-खाली मिळून आठ-दहा खोल्या. आठ दहा ट्यूबलाईट्स, दोन फ्रीज, दोन टीव्ही,आणि इतर भरपूर वापर. पण बिल जेमतेम पन्नास युनिट्स. वायरमनला पक्की खात्री होती की चोरी आहे. पण मीटरच्या पारदर्शक कव्हरमधून टॉर्चच्या उजेडात काहीच संशयास्पद आढळत नव्हते. कुठे अन कशी गडबड केलीय तेच समजत नव्हते. बरं, जास्त तपास अन चिकित्सा करायचा प्रयत्न केला तर वायरमनचीच गचांडी धरली जाण्याची शक्यता. मागच्याप्रमाणेच आम्ही तिघे चौघे सस्पेक्टेड स्पॉटवर गेलो. जाताना दुसऱ्याच भागातल्या वायरमनला बरोबर घेतले होते. मोठा टॉर्च बरोबर नेला होता. अडचणीच्या चिंचोळ्या जिन्यात आमचे पथक खाटखुट करू लागताच घरातले अन शेजारचे दहा-पाच मेंबर गोळा झाले अन आमचे अंधारातील कृष्णकृत्य (?) टाचा उंचावून उत्सुकतेने पाहू लागले. नित्याप्रमाणे त्या भागातील नेहमीच्या वायरमनला पाचारण केले गेले. तो आल्यावर पहिले त्याची झाडाझडती. मग मुख्य काम सुरु झाले. चोरी ओळखण्याची हमखास पद्धत म्हणजे मीटरचा मेनस्विच बंद करायचा अन मग घरातील लाईट्स अन विजेची उपकरणे एकामागोमाग एक सुरु करायची. एक जरी सुरु झाले, तरी चोरी आहे, हे निश्चित झाले. त्याप्रमाणे वायरमनला मेनस्विच बंद करण्यास फर्मावले आणि ट्रायल घेतली. मेनस्विच बंद असूनही वरच्या मजल्याच्या अर्ध्या भागातील सर्व लाईट्स आणि उपकरणे सुरूच होती ! म्हणजे चोरी आहे हे नक्की झाले. आता कुठून अन कशी ते शोधल्याशिवाय पंचनामा कसा करणार ? आम्ही पाच जणांनी मिळून डोळ्यात तेल घालून सगळे वायरिंग तपासले. घरातील वायर अन वायर पिंजून काढली. मीटर खालून वरून तपासले. पण छे ! कुठेच काही गडबड दिसेना. आता काय करावे ? चक्कीत जाळ झाला ! मग खाली जाऊन आम्ही डोक्याला डोकी लावली. पलीकडच्या भागातून बोलावून आणलेल्या वायरमनमामांनी युगत लढवली. आम्हाला डोळा मारला आणि शेजारीच रहात असलेल्या घरमालकाच्या पुतण्याला हाक मारून गल्लीच्या कोपऱ्यावर घेऊन गेले. आम्ही पलीकडच्या गल्लीतल्या हॉटेलात च्यापाणी करत बसलो. इकडे पुतण्याला वायरमनने हॉटेलात नेऊन चहा पाजला आणि अघळपघळ गप्पा सोडल्या. चुलत्या-पुतण्यांचे काही बरे नव्हते, ही गोष्ट वायरमनमामांना ठाऊक होती. चहा पोटात गेल्यावर पुतण्या बोलता झाला. मीटरची मेख त्याला बरोब्बर माहिती होती. लगेच मामा परतून आले आणि आम्हाला फोन मारला. गेलो. परत बघे मंडळी जमा झाली. मामांनी खिशातून एक भक्कम चाकू काढला. मीटर अन भिंतीच्या मधल्या सापटीत टॉर्चचा झोत टाकला आणि चाकूचे पाते आत खुपसले. जsरा ताण दिला अन फट मोठी झाली. मग त्यांनी आम्हाला एकेकाला येऊन फटीत डोकवायला सांगितले. बघतो तर काय, त्या फटीतून एक केबल मीटरच्या बाहेरून थेट भिंतीत गेलेली दिसली. आमच्या खांबावरची केबल मीटरमध्ये जाण्यापूर्वीच तिला वाटा फुटल्या होत्या. भिंतीला बेमालूम आरपार भोक पाडले होते अन त्यातून ती केबल जिन्याच्या आधार-पाईपमध्ये अलगद शिरली होती ! आणि तिथून छुप-छुपके वरच्या अर्ध्या मजल्याला वीज पुरवत होती ! झाले. समोरच्या बघ्यांमधल्याच दोघांना पकडले आणि पंच बनवले. पंचनामा केला. मालकाची घाबरगुंडी उडालेली. त्याच्या सह्या घेतल्या. बिलाचे रेकॉर्ड काढून हिशेब केला आणि फरकाचे बिल काढून मालकाच्या हातात ठेवले. या प्रकाशाची किंमत काही हजारात गेली होती ! (क्रमशः )
  • प्रकाशाची चोरी (२)

Book traversal links for चोरी प्रकाशाची (१)

  • प्रकाशाची चोरी (२) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
34228 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

महावितरणचेही प्रीपेड मीटर्स

सस्नेह
Tue, 07/26/2016 - 10:54 नवीन
महावितरणचेही प्रीपेड मीटर्स आहेत. पण सध्या शॉर्टफॉल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि

भारी किस्से आहेत. पण

किसन शिंदे
Mon, 07/25/2016 - 23:21 नवीन
भारी किस्से आहेत. पण सरांप्रमाणेच आमचाही एमेसीबीवर राग आहे. अंदाजपंचे बील ठोकतात
  • Log in or register to post comments

चांगलंय. पण मुंब्र्यासारख्या

खटपट्या
Mon, 07/25/2016 - 23:35 नवीन
चांगलंय. पण मुंब्र्यासारख्या ठीकाणी वीज बील भरत नाहीत त्याचे काय करतात्/करणार? लै दादागीरी चालते तीकडे शांतीप्रीय लोकांची. आणि त्यांच्यामुळे आख्खे कळवा परीमंड्ळ बदनाम होउन र्‍हायले...
  • Log in or register to post comments

फक्त मुंब्रा नाही,भिवंडीतही

भिंगरी
Tue, 07/26/2016 - 00:21 नवीन
फक्त मुंब्रा नाही,भिवंडीतही हे प्रकार चालू आहेत.
  • Log in or register to post comments

झक्कास...भारी किस्से

मयुरा गुप्ते
Tue, 07/26/2016 - 01:44 नवीन
भारी किस्से आहेत.. मला नेहमीच प्रश्न पडत आलाय.. गल्ली-बोळात होणारे..वर्षभर होणारे उत्सव ह्यांना कोण विज पुरवठा करतं? १० दिवस, ९ दिवस, आठवडाभर चालणारे उत्सव तर मस्त आरामात पार पडताना दिसतात. त्यांना कोण व कशी परवानगी देतं? (विषयांतर वाटत असेल तऱ क्षमस्व) कोणाचाच कोणाला धाक नसतो हे तर माहिती आहेच, पण नेत्रदिपक रोषणाई पाहुन मन विष्षण होतं हे खरं. ह्या मंडळअंकडे अमुक इतकी विज वापरा बाबत परवाने असतात का? नाहितर ती सरळ सरळ चोरीच नाहि का? पुभाप्र.. --मयुरा.
  • Log in or register to post comments

उत्सवांसाठी तात्पुरता मीटर

खटपट्या
Tue, 07/26/2016 - 05:20 नवीन
उत्सवांसाठी तात्पुरता मीटर घ्यावा लागतो वीज मंडळाकडून. पण उत्सव मंडळे कुठून वीज घेतात ते आपण जाणतोच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरा गुप्ते

काही भागात एमेशिबिला गुंडाळून

कंजूस
Tue, 07/26/2016 - 05:16 नवीन
काही भागात एमेशिबिला गुंडाळून ठेवतात अजूनही.नगरसेवक,आमदार,खासदार यांना बोलावतात साधे विनातिकीट पकडले तरी. एका गावात घराघरात गणपतीचं डेकरेशन केलेले असते.चलचित्रे असतात.लाइट गेली की शिव्या देतात एमेशिबिला.सगळ्यांनी आकडे टाकून वीज घेतलेली.
  • Log in or register to post comments

भारी किस्से ! अश्या अनेक

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/26/2016 - 08:17 नवीन
भारी किस्से ! अश्या अनेक क्लुप्त्या करून लोक महाडिस्कॉमला चुना लावतात आणि "वीजगळती"मुळे वाढलेल्या दरांचा फटका इमाने इतबारे बिल भरणार्‍या प्रामाणिक ग्राहकांना सोसावा लागतो.
  • Log in or register to post comments

किस्से भारी आहेत.

आतिवास
Tue, 07/26/2016 - 08:33 नवीन
किस्से भारी आहेत. अजून सगळीकडचे जुने मीटर बदलले नाहीत वाटतं.
  • Log in or register to post comments

भारतात तीन लाख "कोटी"

सुबोध खरे
Tue, 07/26/2016 - 10:19 नवीन
भारतात तीन लाख "कोटी" रुपयांची बिले थकीत आहेत. म्हणजेच माणशी २४०० रुपये आणि घरटी १० हजार. हे पैसे "जर भरले गेले तर" "अच्छे दिन" फार दूर नाहीत. पूर्णपणे वाचावा असा सुंदर लेख. http://prashantkarhade.com/power-theft-in-india/
  • Log in or register to post comments

त्या पंधरा लाखातून कापून घ्या

संदीप डांगे
Tue, 07/26/2016 - 10:57 नवीन
त्या पंधरा लाखातून कापून घ्या, अच्छे दिनचाच प्रश्न असेल तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डांगे अण्णा

सुबोध खरे
Tue, 07/26/2016 - 11:23 नवीन
डांगे अण्णा "अच्छे दिन" वर मोदी साहेबांचीच मक्तेदारी आहे का? सामान्य माणसांनी जर विजेची बिले भरायला सुरुवात केली( आणि इतर नागरी कर्तव्ये) तर भारताचा विकास दूर नाही. विकास म्हणजे फक्त चार पैसे जास्त मिळवणे नव्हे विकासाला अच्छे दिन म्हणालो तर लगेच आपले १५ लाख आले का? तो लेख आपण नीट वाचून पहा एवढीच विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

धन्यवाद, डॉक,

सस्नेह
Tue, 07/26/2016 - 11:50 नवीन
अतिशय उत्तम लेख आहे. माझे एक वरिष्ठ सवलत मागणाऱ्या ग्राहकांना एक उदाहरण नेहमी देतात. 'तुम्ही मोबाईल वापरता, बिल आधी भरता. एस.टी/रेल्वेने प्रवास करता, तिकीट आधी काढता. वीज महिनाभर वापरता, त्याचे बिल पुढे पंधरा दिवसांनी येते, त्यातसुद्धा सवलत मागता ?' विजेच्या बाबतीत 'अतिपरिचयात अवज्ञा' असे निदान महाराष्ट्रात तरी चित्र दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुरक्षा ठेव

१.५ शहाणा
Wed, 07/27/2016 - 21:50 नवीन
आम्ही देयक महिन्या नंतर भरतो म्हणूनच महावितरण किमान एक महिन्याच्या वापर एवढी सुरक्षा ठेव घेते. रेल्वे तिकीट /भ्रमणध्वनी साठी ही सुरक्षा ठेव देत नाही , यात वितरण कंपनी काही उपकार करत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

fraud mhavitaran

DeepakMali
Tue, 07/26/2016 - 10:40 नवीन
मनमानी कारभार चालु आहे यांचा... कोणतेही नियंत्रण नाही की कसले तपासनी नाही.. मुळात यांना महाराष्ट्र मधे कोण स्पर्धक नाही याचाच गैर फ़ायदा घेतय... महावितरण
  • Log in or register to post comments

चोरी प्रकाशाची (१)

जयन्त बा शिम्पि
Tue, 07/26/2016 - 18:02 नवीन
मी गावी गेलो होतो , तेथे एका बाबाचा , सात दिवस एकाच जागी , उभे रहाण्याचा कार्यक्रम सुरु होता . मोट्ठा शामियाना, भरपूर लाईटिंग, मोठे फोकस, मात्र ह्या साठी , वीज पुरवठा ,माझ्याच घराजवळील , वीजेच्या खांबावरून , जाड जाड केबलचे आकडे टाकून , विना मीटर , सुरु होता. पुतण्याला विचारले कि हे असे उघड उघड कसे चालते ? ह्या वीज चोरीचे काय ? त्यावर त्याचे म्हणणे , " समोर दिसतो आहे ,त्या ट्रान्स्फोर्मरवर मीटर लावलेले आहे, त्याच्यावरून वीजपुरवठा केलेल्या सर्व घरांच्या बिलात , ह्या ज्यादा वापरलेल्या विजेची आकारणी केली जाईल. म्हणजे सार्वजनिक उपक्रमाचा असा प्रामाणिक ग्राहकांना फटका !
  • Log in or register to post comments

कठीण आहे.

सूड
Tue, 07/26/2016 - 19:10 नवीन
कठीण आहे.
  • Log in or register to post comments

अज्ञानात सुख असतेनाहो तै.

मितभाषी
Tue, 07/26/2016 - 20:23 नवीन
अज्ञानात सुख असतेनाहो तै. काहून आम्हाले म्हैती देउन रायल्य्त्र ओ तै
  • Log in or register to post comments

कूल

सस्नेह
Tue, 07/26/2016 - 20:57 नवीन
नको ते तपशील देत नाहीये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

एका वायरमने एका अडानी मुलीवर

मितभाषी
Tue, 07/26/2016 - 21:12 नवीन
एका वायरमने एका अडानी मुलीवर प्रेम केल.. त्याने तिला "एक लव्ह लेटर" दिल आनि त्या येडीने तिच्या बापाला दिल आनि म्हनाली.. आबाव "लाइट बील" आलय .
  • Log in or register to post comments

मस्त लेखमाला...

मुक्त विहारि
Tue, 07/26/2016 - 21:21 नवीन
क्रमशः असल्याने, पुभाप्र.
  • Log in or register to post comments

अर्रर्रर्र असं पण करतात लोक्स

रातराणी
Tue, 07/26/2016 - 23:57 नवीन
अर्रर्रर्र असं पण करतात लोक्स?
  • Log in or register to post comments

चांगला व माहितीपूर्ण लेख.

रुपी
Wed, 07/27/2016 - 00:11 नवीन
चांगला व माहितीपूर्ण लेख. आमच्या बिल्डींगमधल्या एका कुटुंबाने त्यांची केबल आमच्या मीटरमध्ये घुसवून ठेवल्यामुळे कित्येक महिने आम्हाला पाच-सहाशे रुपये जास्त बिल आले. उघडकीला आल्यावरही त्यांनी थोडीसुद्धा भरपाई दिली नाही. :(
  • Log in or register to post comments

व्वा!

निखिल निरगुडे
Wed, 07/27/2016 - 10:02 नवीन
मी पण ऊर्जा क्षेत्रात काम करत असल्याने वाचायला मजा आली...! पुढील भागाच्या प्रतीक्षेत. मिपा वर समदुःखी पण आहेत म्हणायचं तर!:)
  • Log in or register to post comments

MSEB

ससन्दीप
Wed, 07/27/2016 - 13:42 नवीन
ताई, वीजचोरी बद्दल जशी माहिती दिली तशीच आम्हा ग्राहकांच्या खिशातून एमएसइबी करत असलेल्या चोरीवर प्रकाश टाकाल जरा? मी वसईत राहतो आणि हे बिल्डींग्स काँम्प्लेक्स असल्याने इथे 'तारेवर आकडा टाकणे' वैगरे प्रकार होत नाही. पण अधून मधून वीज महामंडळ ७०-८०% ने वाढीव बील पाठवून सर्वांना 'शाॅक' देत असते. आठ दिवसांपुर्वी एका राजकिय पक्षाने बँनरबाजी करत मोर्चासुद्धा काढला होता. पण त्याने येत्या वीजबीलात काही चमत्कार घडेल अशी शक्यता फार कमी आहे. सोसायटीत एमएसइबीचा मीटर रिडींग घेणार्‍याने सुद्धा आमचे रिडींग जवळपास १०० युनिटने जास्त आले आहे असे (आॅफ द रेकाॅर्ड) सांगितले. नालासोपारा पुर्वेला अनधिकृत परप्रांतिय वस्तीमध्ये आकडा टाकून भरमसाठ वीज चोरी होते. कदाचित काहि कारणास्तव महामंडळाला तिथून वसूली आणि कारवाई करता येत नसल्याने जे लोक नियमितपणे वीजबील भरतात तिथून आपली नुकसान भरपाई करून घेतात. महिन्याची आर्थिक घडी बिघडविणार्‍या बिलाचे जाउद्या पण मेंदूचा 'फ्यूज' तेव्हा उडतो जेव्हा सोसायटीतील एखादी अमराठी व्यक्ति 'महाराष्ट्र' या शब्दावर जोर देत म्हणते "ये माराष्ट्र बोर्ड ना एक नम्बर का चोर है।" यावर कुठची भुमिका घ्यावी काय प्रत्युतर द्यावे ते कळत नाही.
  • Log in or register to post comments

नमस्कार !

सस्नेह
Wed, 07/27/2016 - 15:10 नवीन
आपले वीज बिल जास्त आले असे वाटले तर तुम्ही खालील चेक करू शकता. १. बिलावरील फोटोतील रीडिंग आणि घरातील मीटरचे रीडिंग पडताळून पाहणे. २. बिलावर सहा महिन्याची बिल हिस्ट्री असते त्यानुसार महिन्याचे अ‍ॅव्हरेज कन्झम्प्शन बरोबर आहे का ते पाहणे. ३. घरात कुठे लिकेज आहे का हे पाहणे. ४. त्या महिन्यात वीज दर वाढलेले आहेत का हे पाहणे. हे सगळे बरोबर असेल तर मीटरबद्दल तक्रार नोंदवू शकता. वर प्रतिसादातील मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केलेत तर घरबसल्या हे करू शकता. याउपरही समाधान झाले नाही तर बिलावर पत्ता असतो त्या कार्यालयात जाऊन सक्षम अधिकाऱ्यास भेटा. खालच्या कर्मचाऱ्यांना बरेचदा वस्तुस्थिती व्यवस्थित सांगता येत नाही अथवा अधिकार नसतात. महावितरण देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तथापि वाढत्या ग्राहक संख्येमुळे बरेचदा तक्रारींचे नियोजन वेळेत होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ससन्दीप

इतर परवानाधारक हवेत

१.५ शहाणा
Wed, 07/27/2016 - 21:31 नवीन
मुंबई वगळता महाराष्ट्रात महावितरण ही एकमेव वितरण कंपनी आहे.तिची एकाधिकारशाही कमी करण्यासाठी एकपेक्षा जास्त कंपन्यांना वितरण परवाना दिला पाहिजे. म्हणजे यांचे दर स्पर्धात्मक पातळीवर येतील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

३. घरात कुठे लिकेज आहे का हे

शलभ
Tue, 08/02/2016 - 01:10 नवीन
३. घरात कुठे लिकेज आहे का हे पाहणे.
हे कसं करायचं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अधिक्रुत वायरमन कडून तपासून

सस्नेह
Tue, 08/02/2016 - 10:17 नवीन
अधिकृत वायरमन कडून तपासून घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

घरातील लीकेज म्हणजे काय?

एस
Tue, 08/02/2016 - 11:42 नवीन
घरातील लीकेज म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वायर्स/ उपकरणे जुनी झालेली

सस्नेह
Tue, 08/02/2016 - 12:27 नवीन
वायर्स/ उपकरणे जुनी झालेली असतील किंवा अर्थिंग व्यवस्थित नसेल तर अशा प्रणालीमध्ये नॉर्मलपेक्षा जादा वीज खर्च होते. त्याला लीकेज समजतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सगळी उपकरणे बंद असताना देखील

चतुरंग
Tue, 08/02/2016 - 12:41 नवीन
विजेचं मीटर फिरतं त्याला साधारणपणे दोन कारणं असू शकतात. एकतर घरात स्टँडबाय मोडवरती असलेली बरीच उपकरणी वापरात आहेत किंवा/आणि विजेची गळती आहे. जेंव्हा आपण रिमोटवरती चालणारी साधने बंद करतो तेव्हा ती स्टँडबाय मोडवरती जातात. त्या अवस्थेत ती वीज खर्च करत असतात. त्याशिवाय खराब उपकरणे किंवा खराब/चुकीचे वायरिंग दोन्हीमुळे गळती होते. ही दुसर्‍याप्रकारची गळती धोकादायक ठरु शकते. उपकरणातले वायरिंग खराब झाले असेल तर विजेचा धक्का बसू शकतो. त्यामुळे गळती शोधणे आणि आटोक्यात आणणे गरजेचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

स्टँडबाय मोड वरती वीज खर्च

हेमन्त वाघे
Fri, 08/05/2016 - 07:55 नवीन
स्टँडबाय मोड वरती वीज खर्च - बरीच आधुनिक उपकरणे जसे कि LED TV , होम थिएटर ऍम्प्लिफायर , होम ऑटोमेशन ची उपकरणे स्टँडबाय मोड मध्ये अतिशय कमी वीज खर्च करतात , आणि ते बहुदा माहितीपत्रकात दिले असते . कारण अनेकदा परस्परावलंबी उपकरणे हे स्टॅन्डबी मोडे माधेयच ठेवावी लागतात .. तसेच काही उपकरणे आता 24 X 7 चालू ठेवावी लागतात , जसे कि वायफाय रूटर , NAS इ ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लिकेज पाहणे.

१.५ शहाणा
Tue, 08/02/2016 - 20:45 नवीन
घरातील सर्व दिवे होल्डर मधून काढायचे, सिलिग पंख्याची वायर सोडवावी .इतर उपकरणाची पिन काढून ठेवावी व सर्व बटणे सुरु करून मीटर bilinking होते का ते पाहावे.गरज भासल्यास परवानाधारक ठेकेदारा कडून घरातील वायारिग चे insulation resistancce तपासून घ्यावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

आजच्या म.टा. तील ही

मार्मिक गोडसे
Wed, 07/27/2016 - 18:47 नवीन
आजच्या म.टा. तील ही दिलासादायक बातमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ससन्दीप

१. बिलावरील फोटोतील रीडिंग

मार्मिक गोडसे
Wed, 07/27/2016 - 19:09 नवीन
१. बिलावरील फोटोतील रीडिंग आणि घरातील मीटरचे रीडिंग पडताळून पाहणे.
दोन वर्षापूर्वी घराचे असेच चुकीचे ज्यादा बिल आले होते, बिलावरील फोटोतील आकडे व वापरलेले युनीटमध्ये बराच फरक होता. तक्रार केल्यानंतर तासाभरात वीजमंडळाची माणसे आली, एका कोर्‍या कागदावर मीटर क्रमांक व मीटर रिडींग लिहून त्यावर आमची सही घेतली व मीटरसमोर तो कागद धरून फोटो काढला. पुढच्या महिन्याचे बिल फरक वजा करून आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

नावावरुन धागा कैतरी आध्यात्मिक आहे अस वाटलं

मारवा
Wed, 07/27/2016 - 14:08 नवीन
आत आल्यावर फारच भौतिक प्रश्नाला हात घातलेला दिसला. बाकी चोरीची एक मजा असते. जर पाकिटमारी गुन्हा असेल तर त्याची तक्रार करता येते. चोराला शिक्षा करता येते. मात्र समजा जर अधिकृतरीत्या कायदेशीररीत्या कायदा करुन कलम लावुन मग खिसा कापला तर तो कापु दिला नाही यासाठीच उलट शिक्षा होते. खासगी कंपन्याच्या स्ववापरासाठी च्या कॅप्टीव्ह पॉवर प्लान्ट ला एकीकडे वीज शुल्क लावण्याइतपत एमएसइबी कमाल करु शकते. दुसरीकडे फुकट पंप मिळाला हो चा जल्लोष आवाज वाढवतो. मजा आहे कायदेशीर पाकीटमारीची. शिवाय पाकीटमारांची फिलॉसॉफीपण असते. ती एक आणखीन गंमत
  • Log in or register to post comments

आउर आनदो :)

पियुशा
Wed, 07/27/2016 - 15:18 नवीन
आउर आनदो :)
  • Log in or register to post comments

कटियाबाज म्हणून एक

अनुप ढेरे
Wed, 07/27/2016 - 15:28 नवीन
कटियाबाज म्हणून एक डाकुमेंट्री कम सिनेमा आहे. उत्तर प्रदेशातल्या वीज चोरीबद्द्ल. त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

वेगळा विषय.

निर्धार
Wed, 07/27/2016 - 20:54 नवीन
अश्या चोरींची माहिती नव्हती. लवकर टाका पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

बाकी महावितरणाच्या ..

निर्धार
Wed, 07/27/2016 - 20:58 नवीन
बाकी महावितरणाच्या ऑनलाइन पेमेंट च्या सुविधेने रांगेची कटकट टळली.
  • Log in or register to post comments

पुण्यात अफलातून विजचोरी केली

युरेका
Fri, 07/29/2016 - 22:27 नवीन
पुण्यात अफलातून विजचोरी केली जाते
  • Log in or register to post comments

पुण्यात अफलातून विजचोरी केली

मार्मिक गोडसे
Fri, 07/29/2016 - 22:39 नवीन
पुण्यात अफलातून विजचोरी केली जाते
तुमचं बरय बाबा, तुम्ही काहीही म्हटले तरी तुमचे कपडे कोणीही काढू शकणार नाही.
  • Log in or register to post comments

अहो हे तर काहीच नाही पुणेकर अगदी

मारवा
Sat, 07/30/2016 - 19:40 नवीन
कुठल्याही थराला जाऊन कौतुक करु शकता हा एका स्वतंत्र धाग्याचा विषय आहे माझ्या आयुष्यात पुणेकराने पुण्याच्या कुठल्या गोष्टींची बढाई मारली. मी तर एका पुणेकराकडुन चक्क आमच्या पुण्याचे नाल्याची तारीफ या कानाने ऐकली आहे. मला तर ते ऐकुन " कौन कहता है नाला-ए-पुलु को बेअसर ? वैग्रे वाटुन तिथेच चाक हो गये. असो या गंभीर धाग्यावर उगा अवांतर नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

चक्कीत जाळ झाला!!! :)

जव्हेरगंज
Sat, 07/30/2016 - 18:55 नवीन
चक्कीत जाळ झाला!!! :)
  • Log in or register to post comments

चक्कीत जाळ ?

हेमन्त वाघे
Fri, 08/05/2016 - 08:29 नवीन
चक्कीत जाळ ? हा वाक्यप्रचार मी फार थोड्या वेळा वाचला या आहे - तर याचा अर्थ काई ?? हा चक्कीत चाळ असा पण वापरला जातो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

"चकचकीत जाळ"

संदीप डांगे
Fri, 08/05/2016 - 08:41 नवीन
"चकचकीत जाळ"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

हे पहा

हेमन्त वाघे
Fri, 08/05/2016 - 09:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

पुढील भागाच्या प्रतीक्षेत !

साधा मुलगा
Sat, 07/30/2016 - 20:14 नवीन
पुढील भागाच्या प्रतीक्षेत !
  • Log in or register to post comments

चोरी तर दोन्ही बाजूने चालली आहे.

गम्पत पाटील
Mon, 08/01/2016 - 22:36 नवीन
रिडर म्हणुन काम करतोय त्यामुळ मंडळाचा आणि लोकांचा धुमाकूळ रोजच बघतोय
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा