Skip to main content

कसे करावे?

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 26/07/2016 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, थोडी मदत हवी आहे. ............... म्हणजे कसं आहे की गेले ५ रात्री मला एकाच स्वरुपाचे स्वप्न रोज रात्री पडत आहे. त्या स्वप्नात मी ऑफीसला निघालेलो असतो नेहमेप्रमाणे बाईकवरुन. विजापूर रोडवरुन मला जावे लागते. अचानक एका स्पीडब्रेकरपाशी एक मोठी कंटेनर ट्रक मागच्या बाजुने माझ्या गाडीला उडवते. मी बाजूला उडून पडतो. आणि अचानक सारे शांत झालेले असते. लोक चर्चा करत असतात पण मला काहीही एकू येत नाही. कुणीतरी मला उचलते, मी टोटली डॅमेज झालेला असतो. हात पाय वगैरे निर्जीव दिसतात (हे मला दिसत असते थर्ड पार्टीसारखे) नंतरही काही कळत नाही. लोक बडबड करत असतातच पण आवाज काहीच नाही. नंतर माझी डेड बॉडी अ‍ॅम्ब्युलन्सटाइप गाडीतून कुठेतरी नेतात. दोनदा मी इथेच स्वप्नातून जागा झालो. तीन वेळा मला हेच दिसते पण त्यानंतर घरही (माझे नाही, आई वडीलांचे) दिसते. तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात. रस्ता पण अगदी सुरळीत वाहात असतो. मात्र जिथे अ‍ॅक्सीडेंट झाला तो स्पॉट मात्र घराजवळ दिसतो. अ‍ॅक्चुअली ते अंतर लांब आहे. तो एरीयापण अगदी काहीच न घडल्याप्रमाणे चालू असतो. ह्यानंतर मात्र मला जाग येते. आणि जवळपास सगळे आठवते. ह्यावर विचार करता काहीच संगती लागली नाही पण नियमितपणे हे स्वप्न पडतेय एवढे मात्र खरे. ................ आता एक विचार मात्र डोक्यात घोळतोय. मी तर एकटा राहतोय सध्या. म्हणजे आईवडील त्यांच्या घरी राहतात पण मी बिझी असतो म्हणून ते सारखे फोन करायचे टाळतात आणि मी तर संपर्काच्या बाबतीत दिवाच आहे. त्यांची माझी महिनामहिना भेट होत नाही. उद्या समजा माझ्याबाबतीत बरेवाईट काही घडलेच तर मी काय पूर्वतयारी करुन ठेवावी? म्हणजे माझ्या पॉलिस्या, गुंतवणूकी ह्याबाबत नॉमिनी सध्या आईच आहे पण त्यांना जास्त माहीती नाहीये ह्याबद्दल. माझी बँक खाती, लहान कर्जे, कस्टमरांकडून राहिलेल्या उधार्‍या ह्याबद्दल मला एकट्यालाच माहीती आहे. त्याचे कसे होईल? माझी स्वतःच्या व्यवसायातील काही आर्थिक गोष्टी असतील त्या सांभाळायची माझ्या घरच्यांची बिल्कुल शक्यता नाही तेंव्हा ह्याबाबतीत कसे करावे? मुख्य म्हणजे मी नसताना ह्या गोष्टींचा विचार कशाला करायचा असेही डोक्यात येते पण आपणांमुळे आपल्या घरच्यांना आपल्यानंतर काही त्रास होऊ नये आणि झाला तर फायदाच व्हावा तोही विनात्रास अशी भावना आहे. तर अशा पध्दतीचा इन्फरेमेशन बॅकप कसा ठेवावा? माझे व्यवहार काही फार मोठे नसले तरी एखाद्या सीए अथवा व्यवसायबंधूची मदत कशा पध्दतीने घ्यावी? बँकेचे आकाउंटस, त्यांचे पासवर्डस वगैरे डिट्टेल्स अगदी विश्वासातल्या म्हणजे वडीलांकडे अथवा आईकडे द्यावेत काय? मी ते बर्‍याचदा चेंज करत राहतो. त्याचे कसे व्हावे? काही आर्टीस्टिक प्रॉपर्टी म्हणजे चित्रे, पेन्टींग अशांची व्हॅल्युएशन माझ्यानंतर कुणी करेल त्याला आधीच लीगली राईटस देता येतील काय? विल म्हणजे म्हातारपणातच करता येते का? त्याची काही टर्म्स वगैरे असतात काय? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी काही ऑनलाइन अकाउंटस असतात उदा.: गुगलचे पर्सनल, हपिसचे, मिपाचे अशा अकाउंंटवरची वैय्क्तिक माहीती माझ्याबरोबरच संपून जावी असे काही सेटिंग असते काय? कितीही प्रायव्हसी ठेवली तरी ते अ‍ॅक्सेसिबल असतात असे ऐकलेय पण माझ्या माहीतीची माहीती मला माहीत असणार्‍या व्यक्तींना व्हावी असे वाटत नाही तेंव्हा कसे करावे? . काही उपयुक्त सल्ला मिळाल्यास मी आपला आभारी राहीन. आगाऊ धन्यवाद.

वाचने 32399
प्रतिक्रिया 143

प्रतिक्रिया

महत्त्वाचा प्रश्न आहे. मला एक HDFC Life चे "Little book of legacy" म्हणुन डॉक्युमेंट असते ते माहित आहे. PDF फाईल असते. त्यात आपली माहिती जमा करून ठेऊ शकतो. प्रिंट घेऊ शकतो. अगदी तिच फाईल नाही पण त्यासारखी माहिती तयार करुन ठेऊ शकतो. http://www.hdfclife.com/campaigns/HDFCLife-Little-Book-of-Legacy.pdf --- कानडा

In reply to by कानडा

कानडा भाउ, अगदी सहमत. HDFC Life चे "Little book of legacy"अतिशय उपयुक्त आहे. मी त्याच धर्तीवर माहिती एकत्र केली आहे आणि त्यात थोडेफार बदल केलेत.

१) मृत्यूपत्र कधीही करता येते. उलट मी सुचवेन आत्ता केलेस तरी चालेल. त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या आणि शक्यतो एका डॉक्टरची (तुझी तपासणी केली आहे आणि सगळे नीट आहे अशा उल्लेखासह) सही आणि शिक्का. २) तुझा एक वेगळा मेल आयडी काढून ठेव त्या मेलवर शक्य ते सगळे डिटेल्स सुटसुटीतपणे पाठव / साठवून ठेव. ३) व्यावसायीक व्यवहार शक्य असेल तर गुगल शीटवर नेता येतात का बघ आणि तुझ्या अत्यंत विश्वासातल्या व्यक्तीला कधीही आवश्यकता भासल्यास या शीटचा अ‍ॅक्सेस मिळेल असे बघ. म्हणजे तुझे नेहमीचे मेल अकाऊंट आणि वरती उल्लेखलेला वेगळा मेल आयडी यांमध्ये ही शीट अ‍ॅक्सेसेबल असेल आणि गरज भासल्यास वरचा मेल आयडी अ‍ॅक्सेसणारी व्यक्ती ती शीट मिळवू शकेल. बाकी प्रश्नांबददल पास.

In reply to by मोदक

२. आणि ३. बद्दल. कितीही विश्वासू वाटणार्या आणि मोठ्या का होईना, पण ऑनलाईन थर्ड पार्टी कंपनीकडे अशी माहिती पाठवून तिथे सेव्ह करण्याबद्दल तीव्र शंका आहे. अशा गोष्टी दोनतीन बॅकपसहित विश्वासू व्यक्तीच्या ताब्यात पेनड्राईव्ह, हार्डकॉपी, मेमरीकार्ड वगैरे फिजिकल रुपात दिली तर जास्त बरं नाही का?

In reply to by गवि

२. आणि ३. बद्दल. कितीही विश्वासू वाटणार्या आणि मोठ्या का होईना, पण ऑनलाईन थर्ड पार्टी कंपनीकडे अशी माहिती पाठवून तिथे सेव्ह करण्याबद्दल तीव्र शंका आहे. मुद्दा बरोबर आहे पण बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार्‍या कंपन्यांचा डेटा गुगलकडे पडला असताना जास्तीतजास्त दोन पाच कोटींमध्ये व्यवहार* जावू शकणार्‍या आपल्यासारख्यांच्या नादाला गुगल कशाला लागेल असा विचार आहे. अशा गोष्टी दोनतीन बॅकपसहित विश्वासू व्यक्तीच्या ताब्यात पेनड्राईव्ह, हार्डकॉपी, मेमरीकार्ड वगैरे फिजिकल रुपात दिली तर जास्त बरं नाही का? पॉलिसी बदलली, देणेकर्‍यांची रक्कम बदलली अशा प्रत्येकवेळी बॅकप अपडेट करणे त्रासदायक आहे असे वाटते. ************************* *हा दोन पाच कोटींचा हिशेब "पुण्यामुंबईतील एक घर + टर्म इन्शुअरन्स" असा काढला आहे. अभ्याकडे किती पैसे पडून आहेत मला माहिती नाही. :p

In reply to by मोदक

हम्म. हार्ड ड्राइव्हवर अपडेट करीत राहणे जरा अवघडच आहे. नोकरीत नियमितता तर असते. व्यवसायात तेही नाही. . आणि मला हाणू नकात मोदकराव. कोटी सोडा, आकडा लाखात गेला तरी लै झाले. तोही पडून नसतो कधीच.

In reply to by मोदक

बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार्‍या कंपन्यांचा डेटा गुगलकडे पडला असताना जास्तीतजास्त दोन पाच कोटींमध्ये व्यवहार* जावू शकणार्‍या आपल्यासारख्यांच्या नादाला गुगल कशाला लागेल असा विचार आहे.
गूगल नाहीच चोरणार. फक्त डेटालीक्स होतात तेव्हा घाऊकच होतात. असे चोरटे मोठ्या संख्येने पण प्रत्येकाची तुलनेत किरकोळ माहिती अशासाठीही चोरतात. आणि अशावेळी गूगल फुकट वापरकर्त्यांना "अर्र सॉरी"खेरीज काही देणं लागत नाही.

५ रात्री तसंच स्वप्न पडतंय असं आपल्याला अनेकदा वाटतं पण खरंतर एकाच लेटेस्ट रात्री पडलेली काही स्वप्नं बॅकवर्ड मेमरीतून रिपीट होऊन आल्यासारखी भासतात. जनरली तेच स्वप्न खरोखर पुन्हा परत पडण्याची शक्यता कमी असते. जर एके रात्री पडलं आणि त्या सकाळी उठून तपशील लिहून ठेवला आणि मग परत पुढच्या एखाद्या रात्री रिपीट झालं तर खात्री करता येते. अर्थात हे अवांतर असलं तरी रोचक वाटतं म्हणून लिहीलं. अविश्वसनीय वाटतं पण बर्याचदा तसंच असतं.

In reply to by गवि

गविराज, अ‍ॅक्चुअली स्वप्नांच्या बाबतीत मी दुर्दैवीच. माझी झोप मुडद्यासारखी. वर्षातून एखाद दोन वेळी काहीतरी पाहिल्यासारखे वाटते. बाकी नाहीच. मात्र कोण जाणे ह्या स्वरुपाचे (जवळपास) स्वप्न दोन महिन्यापूर्वी पडलेले आणि मलाही पूर्ण आठवत होते. नंतर मात्र नाही. आता सलग हे होतंय. मला लिहुन ठेवावसं वाटलं नाही पण सलग स्वप्नातले साम्य आणी क्रम हा अगदी सेम होता आणि इव्हन त्याचा पडायचा कालावधीसुध्दा. कारण प्रत्येक वेळी मी जागा झालो त्यावेळेस साधारण ६ ते ६.३० वाजलेले आहेत.

च्यायला काय वाट्टेल ते विचार करायलयस अभ्या. अस काय होत नसतय रे आणि हेल्मेट घालतोस की तु तर काळजी करु नये. (अजुन बरीच वर्षे तुला इथ बॅनर, सजावटी वगैरे करायच्या आहेत). पुढचा विषय मात्र महत्वाचा आहे म्हणजे त्यासाठी अपघाती म्रुत्यु होण्याची गरज नाही. आपले आर्थीक व्यवहार, पॉलिस्या, गुंतवणूकी या बाबत आपल्या शिवय घरातील एका तरी माणसाला माहीत आसणे आवश्यक आहे. म्हणजे आत्ता लगेच सांगुन नाही ठेवले तरी सगळे एकत्र लिहुन फाइल वगैरे बनवून ठेवली पाहीजे. (अशी फाइल बनवावी असे अनेक वर्षे मी ठरवत आहे). जाणकार लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

In reply to by राजाभाउ

करायचे तर भरपूर आहे राजाभाऊ, पण..... असो.. फाईल करायची आणी घरी वडीलांकडे द्यायची आयडीया सध्या करणेबल आहे.

विल करायला वयाचं काही बंधन नाही. विल खरंतर करूनच ठेवावं. एखाद्या चांगल्या वकीलाकडे सल्ला मागता येईल. ट्रस्टी म्हणून एखाद्या विश्वासू मित्र/ नातेवाईकाचे नाव देता येते.

लोक बॅकअप बद्दल उपाय सुचवत आहेतच, स्वप्नाचं म्हणशील तर एखादवेळेस रुपकात्मक असेल. तुला जरी तिथे तू दिसत असलास तरी दुसर्‍या कोण्या व्यक्तीच्या बाबतीत होणार असलेली गोष्ट तुला दिसत असेल. फार विचार नको करु!!

अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर... अभ्यासेठ, विल बिल काय करायचं ते करून ठेवा. पण, स्वप्नाचं काही खरं नसतं. आमच्या काळात माझ्या स्वप्नात माधुरी दिक्षीत रोज यायची पण प्रत्यक्षात आयुष्यात त्याचा काही उपयोग झाला नाही. बाकी, चर्चा विषय आणि प्रतिसाद माहितीपूर्ण होत आहेत. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडा ,माझ्याही स्वप्नात माधुरी दीक्षित यायची. ती मला म्हणायची मी तुझ्याशी लग्न करायचे वचन देते. तिने ते काहीसे पाळले राव ! एका दिक्षित आडनावाच्या मुलीशी माझे लग्न झाले. तेवढंच ...... काय ?

In reply to by चौकटराजा

माझ्या आत्ता लक्षात येतय की माधुरीने आपल्या सगळ्यांनाच गंडवलय. तिने मला पण लग्नाचे वचन दिले होते. जाउदे.... ह्या जन्मी नाही जमले.... पण मी काही अजून आशा सोडली नाही.... पुढच्या जन्मी परत प्रयत्न करेनच. पैजारबुवा,

In reply to by अभ्या..

अबे हट, जुने ते सोनेच असते. आपला पहिला क्रश मधुबाला, नंतर नुतन, आणि मग माधुरी दिक्षीत. माधुरी नंतर कोणतीच हिरविन आवडली नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

>>>>नुतन चंदन सा बदन की छोड दो आंचल? वा वा! तेव्हा निरागस होतात बहुतेक ;)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आजपासून पैजारबुवांना 'जानी दुष्मन' हा किताब देण्यात येत आहे.

In reply to by एस

तर दोस्त म्हणणार बाबा , नूतन साठी तरी रांगेत घेतलं त्यांनी हे काय कमी बाकी दोन्हींबद्दल नाही पण साधना (नैनोंमे) आणि नंदा (लिखा है तेरी) खास आहेत आणि राहतील्ही. पैजारबुवांचे धन्यवाद नूसानं नाखु

In reply to by नाखु

पहिली, दुसरी अन आखरी... माधुरीच...!

असे मानतात की स्वप्नात एखादी घटना ज्या व्यक्तीच्या संदर्भात घडलेली दिसते ती सोडून अन्य व्यक्तीच्या बाबतीत ती घडू शकते. स्वप्नात पाहिलेल्या व्यक्तीस धोका नसतो. अर्थात धोका असो वा नसो, आर्थिक बाबतीत पूर्वनियोजन हे कधीही महत्त्वाचेच.

एकूणच् असा विचार आपण सर्वांनी करून ठेवणे हिताचे आहेच..स्वप्ने पडोत किंवा न पडोत. सर्व तयारी करून मग कांहीच होणार नाही या आत्मविश्वासाने रहावे. बाकी आपण मिळवलेली माणसे हीच कमाई. किती सांभाळू म्हणले तरी पैशाची कांही खात्री नसते. ( हे आपलं माझं मत.) या स्वप्नाचे मूळ या लेखात म्हटल्याप्रमाणे तुला पूर्वी झालेल्या अपघातामधे असू शकेल. तज्ञ सांगू शकतील, आणि समुपदेशनाने/ औषधाने त्याची चिंता/ भीती (असेलच तर) काढून टाकता येईल. वर सांगितलेल्या कुठल्यातरी प्रकारे डेटा साठवून दोन जवळच्या व्यक्तिन्ना त्याबद्दल सांगून ठेवणे पुरेसे आहे. ..आणि हो, तुला शंभर वर्षांहून जास्त आयुष्य मिळण्यासाठी शुभेच्छा!

In reply to by खेडूत

या स्वप्नाचे मूळ या लेखात म्हटल्याप्रमाणे तुला पूर्वी झालेल्या अपघातामधे असू शकेल.
हे बरोबर वाटतेय. पण तो अपघात वॉल्व्होचा होता. बाईकवर आजअखेर मला बरेच छोटेमोठे अपघात झालेले आहेत. पण मोठ्या अपघातानंतर माझे ड्रायव्हिंग टोटलच बदलले. बाईक चालवायचा अ‍ॅटिट्युडच बदलला. भीती किंवा धसका म्हणून नाही तर स्वतः प्रयत्नपूर्वक बदलले. शुभेच्छांबद्दल धन्यवाद आहेतच सार्‍यांना.

सर्व आर्थिक माहिती डायरी मधे नोंदवावी , ती डायरी अपडेट करत रहावी. घरी आर्थिक पारदर्शकता असावी. म्हणजे देण्या- घेण्याचे व्यवहार , कर्जे , गुंतवणूक, पॉलिसीज याची माहिती पत्नी , आई - वडील यांना असावी. अचानक गचकल्यास काय करावे हे एका जवळच्या मित्रास , भावास माहिती असावे. नॉमिनेशन : सर्व प्रॉपर्टी , बँक , पॉलिसी यांना नॉमिनेशन असावे. नॉमिनेशन असतील तर बँकचे पासवर्डस ची गरज नाही , मॅन्युअली डिटेल्स बघता येतात. याची फाईल बनवून घरी किंवा बँक लॉकर मधे ठेवावी. सर्व कागदपत्रे स्कॅन करून एका ठिकाणी अपलोड करावीत . म्हणजे गहाळ होण्याचा प्रश्न येत नाही. देण्या- घेण्याचे व्यवहार याबद्दल लोक १००% फसवतात याचा वडिलांच्या निधनानंतर अनुभव आहे.एकाही महाभागाने उधार घेतलेले पैसे स्वतःहून आणून दिले नव्हते . डायरी आणि चेकने व्यवहार या सवयीमुळे ते रीकव्हर करता आले============================================================== स्वप्ने रीपीट का होतात? त्याचे काही अर्थ असतात का ? याबद्दल डॉक्टर अधिक सांगू शकतील. फारच स्वप्ने पडली तर म्हातार्‍या संन्यासाला सोबतीला बोलाव :)

ते स्वप्ना ही एक साउथ इन्डीयन नटी आहे पण..... जाउ दे राव ...आपण ड्रीम्स विषयी बोलू. मी स्वप्नांच्या बाबतीत एकदम भाग्यवान माणूस आहे. प्रत्यक्षातील काश्मीर पेक्षा रम्य काश्मीर मी स्वप्नात पाहिले आहे. स्वप्नात सचिन तेंडूलकर , राज ठाकरे, मोहन जोशी यांच्या शी गप्पा ठोकल्या आहेत. मदनमोहनची गीते स्वप्नात ऐकताना बॅक्ड्रोप होता कसबा पेठेतील एक जुन्या वाड्याचा, ओपी नय्यर ची एकसे एक गाणी अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजच्च्या शेतात ऐकली स्वप्नात. आमच्या फॅक्टरीतील मार्केटिंग जी एम व सर्व्हीस जी एम चे कडाक्याचे भांडण पाहिले स्वप्नात. धोमचे चे धरण फुटले पण पाणी माझ्या पायाला लागताच ओसरू लागले हे सारे स्वप्नात. मला ८० टक्के रात्रीत स्वप्न पडते. पुन्हा नवी पटकथा घेऊन तीच तीच थीम स्वप्नात येते. हे माझ्या बाबतीत अनेक वेळा घडले आहे. उदा धोम धरणाच्या पाण्याच्या लोंढ्याची ती कथा सारोळा पूल पुणे सातारा रोड व अमृतांजन पाटी खण्डाळा इथेही घडली आहे. यावरून एक दिसते ते असे की मनी वसे ते स्वप्नी दिसे हे खरेच आहे. मला पोहायला येत नाही. प्रवासाची जबरा आवड आहे. गप्पा छाटण्याचा नाद आहे. स्वभाव संघर्ष करणारा आहे. वाई शिरवळ मावळ या परिसरात मी वाढलो आहे. या गोष्टी वरील उदाहरणात दिसून येतील. आता अशी काही संगति तुझ्या बाबतीत लागते का ते पहा मित्रा.

In reply to by चौकटराजा

रोजचे तेच लाइफ आणि तोच विचार याने असे होत असेल असे माझ्या मित्राचे मत आहे. अशी संगती लावायला हरकत नाही चौराकाका.

रोचक वाटतंय मलाही नवीन घरी शिफ्ट झाल्यापासून अलार्म लावल्यासारखी रात्री २ ते २:३० च्या दरम्यान जाग येतेच येते, आधीच्या घरी असे कधीच व्हायचे नाही

In reply to by सूड

ते पंच पंच उषःकाले म्हणजे घड्याळात अ‍ॅक्चुअली कधी? स्पावड्याला स्वप्ने लेअरमध्ये पडतात. ;) बाकी धसका स्वप्ने हा इंटरेस्टिंग सबजेक्ट आहे सूडक्या. मला दोन तीनदा आहे आण्भव. एकदम भिंतीच्या कडेवरुन पडतोय किंवा टोटल बॅलन्स्च गेलाय असे धसक्याने जागे होणे.

In reply to by अभ्या..

टोटल बॅलन्स्च गेलाय असे धसक्याने जागे होणे
हे बर्याचदा अनुभवले आहे...पण आपोआप थांबले काही वर्षांनी

इन्शाला/माशाल्ला स्वप्नाने (रात्री अथवा झोपेतली) तुला जागे केलंय.धागा काढून पुचकण्याअगोदर सर्व विचारी मिपाकरांना कामाला लावलं आहेस याबद्दल तुला आणि स्वप्नाला धन्यवाद.तुझं काहीही होवो पण इतरांचे भले खचितच करतो आहेस.धन्यवाद. तुला लवकरच भेटेन.

अभ्या तुला उदंड आयुष्य लाभो. माझ्या बाबतीत मी माझ्या बायकोला आणि आई वडिलांना माझ्या गुंतवणुकी बद्दल, येणे आणि देण्याबद्दल सर्वकाही सांगितलेले आहे. त्यात काही बदल झाला तर तो मी लगेच तिघांना अपडेट करतो. पण वर सांगितलेली लिहून ठेवण्याची कल्पना पण चांगली आहे. म्हणजे समजा माझ्या पश्र्चात आई वडिल आणि बायको यांच्यात काही गैरसमज झाले तर ते दुर होण्यास त्या मुळे मदत होईल. तसाही प्रत्येक ठिकाणी नॉमिनी नेमलाच आहे शिवाय घर देखिल दोघांच्या नावावर आहे. पैजारबुवा,

एखादा विश्वासु / खात्रीचा / माहितीतला / भरवशाचा फायनानशिअल कंस्ल्टंट / अ‍ॅडवायसर नेमा . आणी तुमची सगळी आर्थिक गुंतवणुक त्याच्याकडच्या फोलिओमध्ये हस्तांतरीत करा . व तुमच्या कुटुंबियांना त्याची माहिती द्या . फायनानशिअल कंस्ल्टंट / अ‍ॅडवायसर - उदाहरणार्थ - रिलायन्स मनी , मोतीलाल ओस्वाल

प्रकरण गंभीर हाय!! सतत एकच स्वप्न पडतयं म्हटल्यावं कायतरी काळंबेरं हाय रे!!! एक काम कर म्हसोबाला कोंबडं काप,सगळं ठीक होईल बघ!!!

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

सहमत आहे, पण कोंबडं अमावस्येला कापायचं असतं!! तरच स्वप्नबाधा कमी होईल

In reply to by भोळा भाबडा

स्वप्नाला काहीही अर्थ नसतो. उगाच त्यामुळे आपण मनात सुप्त भीती बाळगणे सोडून द्या. १९८२ साली गणित सोडलं तरीही आजतागायत मला गणिताची परीक्षा दोन दिवसांनी आहे आणि मला पोर्शनहि माहित नाही अशी स्वप्ने पडतात. आणि हेच स्वप्न मला गेली दोन दशके मधून मधून पडत आली आहेत. याचे काय कारण आहे? तसे पाहायला गेलो तर बारावी पर्यंत मला गणितात विशेष योग्यतेने प्रथम श्रेणी(distinction) मिळते आले आहे. टि म वि च्या चार परीक्षाहि विशेष योग्यतेने प्रथम श्रेणी(distinction)मध्येच पास झालो होतो. तेव्हा गणिताबद्दलची सुप्त भीती मनात असेल हाही तर्क फोल ठरतो. बाकी आपले इच्छापत्र(will) करून ठेवणे आवश्यक आहे. आपले सर्व व्यवहार पारदर्शक असावेत. लग्नापूर्वी माझ्या सर्व गुंतवणुकीत वडिलांना वारसदार ठेवले होते लग्नानंतर बायको आणि आता बायको ५० % आणि दोन्ही मुले २५ % प्रत्येकी. बँकेतील सर्वच्या सर्व खाती, घरे बायकोबरोबर एकत्र नावाने आहेत. त्यांची पूर्ण माहिती बायको आणि दोन्ही मुलांना आहे.

In reply to by सुबोध खरे

फक्त आयुर्विमा माझ्या "एकट्याचा" काढलेला आहे. ( त्यात वारसदार म्हणून बायको ५०% आणि मुले २५ % प्रत्येकी)

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब एवढ्या मोकळेपणामुळे मला आता वाटायला लागलंय की डायबेटीस ची ट्रीटमेम्ट व तपासणी तुमच्याकडूनच घ्यावी. ते बाकीचे एम्डी नुसते मुके असतात. ( कदाचित डिसपेन्सरी मधले खरे ही तसेच असू शकतील मजबूरी हाय... एका तासात किमान १५ पेशंट तरी आटपायला हवे. )

In reply to by सुबोध खरे

मला गणिताची परीक्षा दोन दिवसांनी आहे आणि मला पोर्शनहि माहित नाही अशी स्वप्ने पडतात. आणि हेच स्वप्न मला गेली दोन दशके मधून मधून पडत आली आहेत. याचे काय कारण आहे?
सेम पिंच. :) २००३ ला इंजिनीअरींग पासआऊट होवूनसुद्धा मलापण अशीच स्वप्नं पडतात. मजेशीर गोष्ट म्हणजे विषयपण सारखे बदलत असतात.

टॅक्स सेविंगसाठी म्हणून खुप साऱ्या इन्व्हटमेंट्स केल्या आहेत त्या मुळे हा प्रश्न खूप दिवसापासून भेडसावत आहे. एका जवळच्या नातेवाईकांच्या अकस्मात मृत्यू मळे त्यांच्या कमी शिक्षण असणाऱ्या बायकोला किती समस्यांना त्यांना सामोरी जावा लागला हे खूप जवळून पहिले, वारसदार मानून बायकोचेच नाव होते पण सर्व कागतपत्रे वेळीच न मिळाल्याने एवढी इन्व्हेस्टमेंट करूनही मिळवा तसा परतावा त्यांना मिळाला नाही.(आणि जो मिळाला तो बाकीच्या नातेवाईकांनी वाटून खाल्ला.) घोर कलयुग आहे त्या मुळे आताच आपल्या वारसदारांना प्रत्येक इन्व्हटमेंट्सची कल्पना आणि जमेल तेवढे कागत पात्रांच्या प्रति देऊन ठेवण्यातच आपले भले आहे.

होतं असं कधीकधी अभ्या , जास्त लक्ष द्यायचे नाही . काळाच्यापटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका ! आपल्या असण्याने किंव्वा नसण्याने काही अडुन रहाणार नाहीये ! असो. बाकी मी काय म्हणतो अभ्या - एकदा सातार्‍यात ये , आपण गडावर जाऊन येवु ! आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें । मूळ तुटें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥ २८ ॥

अभ्यासेठ ,बिल्कुल घाबरु नका ,अशी स्वप्न वगैरे प्रत्यक्षात येत नसतात.स्वप्न हा आपल्याच मनात दडलेल्या गोष्टीचा अविष्कार आहे.बाकी आईवडीलांना आपले अकाउंटची माहीती ,पासवर्डस सांगण्यात गैर काही नाही.मृत्युपत्रही कधीही करता येते.त्याबाबतीत मात्र वकीलांचा सल्ला घ्या.

खालील गोष्टी करु शकता: १. दर ३ महिन्यांनी सगळ्या गुंतवणुकींचा आणि पासवर्ड्स चा तपशील असणारा कागद, तारीख घालुन, बंद लिफाफ्यात घरच्यांना द्यायचा. त्यात काय आहे याची माहिती द्यायची. दुसरा लिफाफा दिल्यानंतर पहिला फाडुन नाही टाकायचा फक्त तो वेगळ्या ठिकाणी ठेउन द्यायचा. याचे कारण तुमचे बदलते पासवर्डस. असे ३ -४ लिफाफे जमल्यावर तुमच्या घरच्यांकडे तुमचे आलटुन पालटुन वापरायचे सगळे पासवर्ड आपोआप मिळतील. तळटीपः लग्न झालेले असल्यास आधी पासवर्ड्स बदला. असेही जुने पासवर्डस एव्हाना कडेवर १ - २ बबडु - छबडु बाळगायला लागले असतील. कधी भेटलात तर बबडु - छबडु " मामा " म्हणुन तुमच्या गळ्यातही पडतील. त्यामुळे ते पासवर्ड्स बायकोच्या ताब्यात देण्याची चुक नका करु. बायको का प्राणी प्रचंड हुषार असतो तस्मात कोडवर्ड मध्ये लिहिलेले तुमचे जुने पासवरड्स " त " वरुन "ताकभात" करुन ओळखले जातील. २. सर्व बँक अकाउंट आणि विमा पॉलिसीज मध्य नॉमिनी लावुन घ्या. ३. सर्व बँकांमध्ये / इतर आस्थापनांमध्ये तुम्ही तुमच्या नॉमिनेशन बद्दल काय तरतुदी केल्या आहेत आणि तुमच्यानंतर ते पैसे तुमच्या वारसांना / नातेवाईकांना मिळण्यासाठी त्यांना काय करावे लागेल हे लिहुन काढा. शक्यतो ते सर्व फोर्म घरी आणुन ठेवा. ४. मृत्युपत्र कधीही करता येते. तो फार किचकट प्रकारही नसतो. एखादा वकील मित्र गाठा आणी एक साक्षीदार घ्या. मृत्युपत्रात खाजगी माहिती / पासवर्ड देउन नयेत. ५. कर्जे घेतली / दिली असतील तर जी परस्पर सेट ऑफ होतील अशी काही असतील तर लिहुन ठेवा. ६. सर्व कागदपत्रे (गाडी, घर, खाजगी इत्यादी) डिजीटल स्वरुपात घेउन एका पेन ड्राइव्ह वर घरच्यांकडे ठेउन द्या. ७. सर्व किल्ल्यांचा एक जुडगा घरच्यांकडे देउन ठेवा. लॉकर असेल तर त्याचाही यात समावेश असु द्यात. ८. सर्व महत्वाचे फोन नंबर्स एका ठिकाणी लिहुन तो कागद घरच्यांकडे देउन ठेवा. ९. टर्म इन्स्युरन्स काढुन ठेवा. लग्न झालेले नसल्यास स्वतःच्या वार्षिक प्राप्तीच्या किमान ५ पट आणि झालेले असल्यास १० पट असणे उत्तम. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे: १०. मानसोपचारतज्ञांकडे जाउन औषधे घ्या. मी हे उपरोधाने, कुत्स्तितपणे अथवा चेष्टेने म्हणत नसुन गंभीरपणे म्हणतो आहे. एकच स्वप्न सलग पाच दिवस पडणे, त्यातही ते दु:खद असणे आणी त्याची वेळ ठरलेली असणे हे कुठेतारी तुमच्या मानसिक तणावाचे लक्षण आहे. याच्यावर वेळेवर औषधोपचार होणे फार गरजेचे आहे. स्पष्ट बोलतो पण तुम्ही तुमच्या घरच्यांची फायनान्शियली सोय लावालही पण जर खरोखर या मानसिक तणावामुळे तुमचे काही बरे वाईट झाले (मी स्पष्ट बोलतो आहे त्याबद्दल आधीच माफी मागतो) तर त्याचा मानसिक धक्का तुमच्या घरच्यांना जो बसेल त्यामुळे तुम्ही त्यांचे आयुष्य ५ -१० वर्षांनी कमी कराल. अकस्मात मृत्युने मयत सुटतो पण घरचे कायमस्वरुपी मानसिक द्रूष्ट्या खचतात त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे हे टाळा.

In reply to by मृत्युन्जय

बरेच चांगले माहितीपूर्ण, उपयुक्त प्रतिसाद येत आहेत हे पाहून बरे वाटले. ते यासाठी की धाग्याचे शिर्षक आणि अभ्यादादाचे नाव बघून माझी पाच सहा उत्तरे ठरलेली जी मी नंतर गिळली! ;) तरी सहज गंमत म्हणून सांगतो, १) करूच नये, हे उत्तम! २) जमेल तसे करावे! ३) मागचा पुढचा विचार न करता, बिनधास्त करावे! ४) व्यनितून सांगतो! ५) प्रतिप्रश्न - पण काय कसे करावे? बाकी अभ्यादादा, स्वप्नाच म्हणाल तर ते "स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत....." किंवा गेलाबाजार, "सपने उन्ही के पूरे होते है...." हे घोकायच की स्वप्न पडायची बंद होतात. मला तर अजूनही कधी स्वप्न पडलच तर त्यात, 'मी कुठेतरी पायी किंवा सायकलवर चाललोय आणि अचानक, एक रूपयाचा ठोकळा सापडतो, अजून जरा पुढे दोन रू. चा, पुढे पाचचा, मग पुन्हा रॅण्डमली कुठलाही सापडत जातो. पुढे कुठेतरी एकदम दोन-तीन सापडतात. आणि ही सापडलेली चिल्लर कुठे ठेवावी म्हणून मी स्वप्नातून बाहेर पडतो व अर्धवट झोपेत इकडे तिकडे जागा शोधू लागतो. lol =)) चिल माडी! Sandy

In reply to by मृत्युन्जय

प्रतिसाद खूप आवडला मृत्युंजया, राग मानायचे कारणच नाही, तू म्हणा कि आदूबाळा. हे जे काही सांगतील ते अनुभवाचेच. फटकळ पणा त्यात काय मानायचा. उलट मोठमोठे डॉक सीए सीएस फुकटात सल्ला देताहेत तो फायदा पाहायचा. एनी वे, मृत्युन्जयाने दिलेले वरचे सर्व पर्याय जवळपास केलेत, मानसोपचाराची काहीतरी सोय करायलाच हवी. म्हणजे खरच तसं काही असलं तर वेळेवर निपटून जाईल. धन्यवाद सुबोध सर, मृत्यो आणि आदूबाळ.

In reply to by मृत्युन्जय

उत्तम प्रतिसाद! इच्छापत्र (काहींना मृत्युपत्र हा शब्द आवडत नाही) कधीही करता येते. त्यात आपल्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तेचा उल्लेख हवा. मला घरासंदर्भात एक प्रश्न आहे. घर आपल्या नावावर असताना आणि सोसायटी फॉर्म झालेली असताना कायदेशीर कटकटी होऊ नयेत म्हणुन काय काय करणे आवश्यक असते? म्हणजे मी आणि नवरा गचकल्यावर उद्या माझ्या मुलाला डायरेक्ट घर मिळणार की त्यासाठी काही तरतुदी आहेत? दुसरे असे की माझी क्ष मालमत्ता मला केवळ माझ्या मुलाच्या नावे करायची आहे आणि त्यावर दुसर्‍या कुणीही हक्क दाखवु नये अशी माझी इच्छा आहे. तर केवळ त्याला नॉमिनी करुन हे काम होईल का? की आणखी काही डिक्लेरेशन आवश्यक आहे?

In reply to by पिलीयन रायडर

हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुले-- मूल एक असेल तर ते एकटे, दोन किंवा अधिक असतील तर विभागून आई बापाच्या संपत्तीचे कायदेशीर वारसदार ठरतात. नॉमिनी हे केवळ विश्वस्त असतात आणि मूल सज्ञान होईपर्यंत ती संपत्ती नॉमिनीकडे विश्वस्त म्हणून असते. परंतु आपण "सुदृढ मनस्थितीत" (sound mind) (यासाठी एखादा डॉक्टर जो वरील वैद्यकीय प्रमाणपत्र देईल त्याला साक्षीदारही करा) असताना आपले इच्छापत्र करून जर ते रजिस्टर करून ठेवलेत तर तो सर्वात सबळ असा पुरावा मानला जातो. त्यातून या इच्छापत्रात आपली मुले हीच वारसदार (natural heir) असतील तर त्यात सहसा कोणत्याही कटकटी येत नाहीत.

In reply to by पिलीयन रायडर

थोडेफार धन / गुंतवणुक गाठीला असलेल्या लोकांसाठी इच्छापत्र (लिव्हिंग विल) ही आवश्यक गोष्ट आहे यात वाद नाही. मात्र ते खाली दिलेल्या इतर सोप्या पर्यायांना भक्कम कायदेशीर सोबत म्हणून असावे, एकुलता एक पर्याय म्हणुन नव्हे. ++++++ "संस्थांच्या कार्यामध्ये" आणि "हाऊसिंग सोसायटी, बँक, शेअर्स, म्युचुअल फंड्स, इ मधिल गुंतवणूकीच्या वारसहक्कांसाठी" "नॉमिनी" या शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. संस्थांच्या कार्यासंबंधी नॉमिनेशन : १. नॉमिनी म्हणजे एकाद्या गैरहजर असणार्‍या व्यक्तीच्या जागी त्याच्या पदाचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी नेमलेली दुसरी व्यक्ती (A person or entity who is requested or named to act for another, such as an agent or trustee). २. त्या दोन्ही व्यक्तींपेक्षा वरिष्ठ पदावर असलेली व त्या दोघांनाही जबाबदार असलेल्या पदावरची व्यक्तीच (relevant authority) अशी नेमणूक करू / रद्द करू शकते. ही प्रक्रिया संस्थेच्या मान्यप्राप्त लेखी व्यवहाराने होते व सर्व संबंधिताना त्याची प्रत जाते. गुंतवणूकीसंदर्भातले नॉमिनेशन : १. हा नॉमिनी म्हणजे मूळ मालकीहक्क असलेल्या व्यक्तीच्या (खातेदाराच्या) मृत्युनंतर त्याच्या गुंतवणूकीची विल्हेवाट लावण्याचा हक्क असणारी / वारसदार व्यक्ती असते (A potential successor to another's rights under a contract). अश्या नॉमिनीचे नाव केवळ वारस म्हणून दफ्तरदाखल राहते. मूळ मालक जिवंत असताना गुंतवणूकीसंबंधी काहीही कृती करण्याचे हक्क या नॉमिनीला नसतात. पण मूळ मालकाच्या मृत्युनंतर, त्याचे मृत्युपत्र सादर केल्यावर, इतर कोणतेही पुरावे न लागता, नॉमिनीकडे हक्कांचे सुलभ व पूर्ण हस्तांतरण होते, हा फार मोठा फायदा होतो. २. अश्या नॉमिनीची नेमणूक केवळ गुंतवणूकीचा मूळ मालकच (उदा : "हाऊसिंग सोसायटीच्या शेअर सर्टीफिकेटवर", "शेअर अथवा म्युचुअल फंड अकाऊंटवर" अथवा "बँक अकाउंटवर" नाव असणारी/र्‍या व्यक्ती) करू शकतो. एकाच मालमत्तेवर एकापेक्षा जास्त व्यक्तींचे नाव असल्यास त्या सर्व व्यक्तींची यासाठी संमती लागते. ३. अश्या नॉमिनी प्रक्रियेसाठी हाऊसिंग सोसायटी कडे एक "मॉडेल बाय लॉ" प्रमाणित अर्ज भरून दिला की काम होते. बँक, शेअर/म्युचुअल फंड कंपन्या यांच्या अकाउंट उघडण्याच्या अर्जात एक भाग (सेक्शन) असतो व तेथे संबंधीत (मूळ व नॉमिनी) व्यक्तींच्या सह्या (काही ठिकाणी फोटोसह) केले की नॉमिनीची नोंद होते. सुरुवातीस ही नोंद केली नसल्यास ती नॉमिनी अर्ज स्वतंत्रपणे भरून नंतर केव्हाही करता येते. मूळ मालक जिवंत असताना गुंतवणूकीत फेरफार करण्याच्या हक्कांसंबंधी नॉमिनेशन : १. हाऊसिंग सोसायटीच्यासंदर्भात अश्या हक्कांचा स्पष्ट उल्लेख असलेली रजिस्टर्ड पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी लागते. २. सर्व बँकांमध्ये आणि बहुतेक इतर आर्थिक गुंतवणूंसाठी मूळ खाते उघडणार्‍या अर्जात "लेटर ऑफ ऑथॉरिटी" व /किंवा "पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी" असे दोन सेक्शन्स असतात. तेथे सह्या व जरूर असल्यास फोटोची नोंद करून मूळ मालक हे हक्क इतर व्यक्तीला देऊ शकतो. ही कृती खाते उघडताना अथवा नंतर केव्हाही करता येते. हे हक्क नंतर केव्हाही परत घेता येतात. ३. "लेटर ऑफ ऑथॉरिटी" व "पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी" हक्क असलेल्या व्यक्तीला, मूळ मालक जिवंत असताना, सर्वसाधारणपणे, अकाउंट बंद करण्याचा हक्क सोडून इतर सर्व हक्क (चेकवर सह्या करणे, पैसे जमा करणे/काढणे, फिक्स्ड डिपॉझिट्स ठेवणे/कॅश करणे, इ) असतात. या हक्कांत गुंतवणूकीच्या संस्थेप्रमाणे थोडेफार फरक असू शकतात. मूळ गुंतवणूकदारच्या मृत्युनंतर गुंतवणूकीचे हक्क हस्तांतरीत होण्याचा क्रम १. संयुक्त खाते असल्यास --> दुसरी जिवंत खातेदार व्यक्ती २. संयुक्त खाते नसल्यास अथवा सर्व खातेदारांचा एकत्र मृत्यु झाल्यास (उदा : अपघात) --> नॉमिनी ३. खातेदाराचा (किंवा सर्व संयुक्त खातेदारांचा एकत्र) मृत्यु व नॉमिनी नाही अश्या परिस्थितीत --> जो कोणी एक वा अनेक जण कायदेशीर वारस असल्याचे सिद्ध करू शकतील ते सर्व. मृत्युपत्र असणे केव्हाही फायदेशीरच असते. मात्र, वारसांमध्ये झगडे झाल्यास मृत्युपत्रही कोर्टाकडून मान्यताप्राप्त (प्रोबेट) करून घेणे भाग पडते. ही व वरचा मुद्दा ३ मधली प्रक्रिया फार किचकट, वेळखाऊ व दु:खदायक असते... ती संयुक्त खाते व नॉमिनी या सहजसाध्य (केवळ सह्या व फोटोने होणार्‍या) सोयी वापरून टाळता येते. वरच्या विवरणांत सर्वसामान्य व्यवस्था दिलेली आहे. दर गुंतवणूक कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यात फरक असू शकतात. आपल्या कंपनीच्या अधिकार्‍यांशी संवाद करून मगच स्वतःला मान्य तो पर्याय निवडणे योग्य होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मृत्युपत्रातील / इच्छापत्रातील मालमत्तेच्या वाटणीसंबंधी काही सर्वसाधारण धोपट नियम... १. मृत्युपत्र करणार्‍याला पूर्वजांकडून वारसाने मिळालेली मालमत्ता : हीची सर्व वारसांमधे समान विभागणी करावी लागते. यात मृत्युपत्र करणार्‍याला ढवळाढवळ करता येत नाही. २. मृत्युपत्र करणार्‍याने स्वकष्टाने कमावलेली मालमत्ता : हीची विभागणी कशी करावी हा सर्वस्वी मृत्युपत्र करणार्‍याचा हक्क असतो. (यातही बहुदा पत्नीच्या निर्वाहाची व्यवस्था नाकारण्याची मुभा नसावी असा माझा अंदाज आहे.) या आणि माझ्या वरच्या प्रतिसादात मिपावरचे कायदातज्ञ सुधारणा आणि/अथवा भर घालतीलच.