Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by किसन शिंदे on Mon, 07/25/2016 - 18:47
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
जीवनमान
बहुरूपी ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून ऐतिहासिक संदर्भांशी आणि घटनांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. पहाट सरत आली होती. पुर्वेला झुंजूमुंजू झालं. दुरवर कुठेतरी टाळांच्या मंजुळ स्वरात वासुदेवाचं गाणं सुरू होतं. कोंबडं आरवलं तशी गोजाई आपल्या गोधडीत उठून बसली. रात्रभर आपल्या धन्याचा विचार करता करता झोप केव्हा लागली तिचं तिलाही कळालं नाही. मग स्वप्नात पण त्याचाच गुलजार मुखडा तिला दिसत राह्यला. तिचा धनी स्वराज्यात महाराजांच्या सेवेला होता. त्या राजावर आणि त्याच्या स्वराज्यावर अख्खा जीव ओवाळून टाकणारा होता. म्हातारं अजून अंथरूनातच होतं. म्हातारीही उठली तसं तिनं जात्यावर धान दळायला घेतलं. गोंडा फुटला दिसाचा जसं जास्वंदीचं फूल माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल धान दळता म्हातारीच्या गोड आवाजात ओव्या सुरू झाल्या. भोवताली असलेल्या झाडांवर पाखरांचा किलबिलाट सुरू झाला होता. शिमग्याची होळी पेटूनही अजून बर्‍यापैकी थंडी होती. अंगाला बोचणार्‍या गार वार्‍याची तमा न बाळगता तपेलं घेवून डोळे चोळत चोळत गोजाईही दुध काढायला गोठ्यात गेली. गाय पिळण्याआधी गोठ्यातलं शेण काढताना रात्री पडलेल्या स्वप्नाच्या तंद्रीत ती हरवून गेली. ''ह्ये दान पावलं, दान पावलं गा.....कोल्हापूरच्या अंबाबाईला'' ''ह्ये दान पावलं, दान पावलं गा.....पंढरपूरच्या ईठूबाला'' ''ह्ये दान पावलं, दान पावलं गा.....जेजूरीच्या खंडेरायाला'' दारासमोर वासुदेवाचा टाळ वाजू लागला.. "दान दे माये, आई अंबाबाई तुझं कल्याण करील." "माझ्या शिवबाच्या राज्यात तुझं घर सुखाने भरून जाईल." आवाज ऐकून क्षणभर गोजाई चमकली. तो आवाज फार ओळखीचा, कानात नेहमी रूंजी घालणारा वाटत होता. म्हातारीनं सुपात धान घेतलं न ती दरवाज्यात येवून उभी राह्यली. तोपर्यंत गोठ्यातून गोजाईही अंगणाकडे धावली. धावत येणार्या गोजाईला पाहत चेहर्यावर मिष्किल भाव असणार्या त्या वासूदेवाने हातातली झोळी म्हातारीसमोर धरली. लटपटत्या हाताने म्हातारी सुपातलं धान झोळीत टाकण्यात मग्न झाली. तोवर तिथे पोचलेल्या गोजाईने डोईवरचा पदर सारखा करून खाली वाकत वासूदेवाच्या पायांना स्पर्श केला. वासूदेवाला पाहतानाच तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली आणि नजरेत खट्याळ भाव उमटले. वासूदेव मात्र गालातल्या गालात हसत होता. मग सावकाश डोईवरचा मोरपंखी टोप काढून त्याने तो गोजाईकडे दिला. हातातली झोळी एका बाजूला ठेवली आणि म्हातारीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. "अरं..अरं, माह्या पाया का पडतूस लेकरा?"म्हातारीनं दोन्ही हातांनी धरत त्याला वर उठवलं. नीट निरखून पाहताच म्हातारीच्या चेहर्यावर आनंद पसरला. हर्षोल्लासाने म्हातार्याला ओरडून म्हातारी म्हणाली "अवो! अईकलं का? उटा आता. बघा, माव्हं लेकरू किती दिसांनी घरला परतलंय." गोजाई माय-लेकराचा हा आनंदसोहळा पाहत बाजूला गुमान उभी होती आणि आनंदाने तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळत होते. बर्याच दिवसांनी तिचं कुंकू घरी परतत होतं. घरातल्या सगळ्यांना अतीव आनंद झाला होता. म्हातारीला तर त्याला कुठं ठेवू न कुठं नको असं झालं होतं. "आज कशी काय आमची आटवन आली म्हनं.?" रात्री बहिर्जीच्या कुशीत शिरता शिरता गोजाई लाडीकपणे तक्रारीच्या सुरात बोलली. "आजंच का म्हनं." "आमाला रोजच तुमची आटवन येत असती, पर तुज्याशी लगीन लागायच्या आदीच माजं या सोराज्याशी लगीन लागल्यालं हाय!" "ते तसं लागलं का असंना, पर कवातरी यखांद्या येळेला घरलाबी येत जावा की. हे आसं कितेक दिस याचंच न्हाई म्हनल्यावर कसं व्हायाचं?" आताशा गोजाऊ थोड्या दु:खी स्वरातच बोलू लागली होती. आणि तिच्या बोलण्यातली आर्तता कळून मग बहिर्जी महाराजांनी गाजवलेल्या पराक्रमाविषयी तिला सांगू लागला. "परतापगडाच्या पायथ्याला त्या अफजुल्याला धुळीला मिळवला तवा आमा समद्यांच्या मनावरचं लई मोट्टं ओझं उतरलं बग." "अफजुल्या धुळीला मिळाला. त्यानं आनलेलं अमाप घोडदळ, हत्तीदळ, बाडबिछायत हे समदं सोराज्याची धन झाली." "पर या समद्यात त्याच्या बेट्याला फाजल खानाला मातुर पळून जान्यात येस आलं." "बर या यवढ्या मोठ्या अवघाड कामगिरीनंतर आराम करत बसतील तर ते राजं कसलं. दुसर्याद दिसापासून त्यांनी आदीलशाहीतले गडकोट किल्ले सोराज्यात सामील करून घ्याची मोहीम उघाडली." विस्फारल्या नेत्रांनी आपल्या धन्याच्या तोंडून महाराजांचा पराक्रम ऐकताना गोजाई फार आश्चर्यचकीत झाली होती. मग महाराजांनी प्रतापगड जिंकल्यानंतर तिथून पुढचे सलग काही दिवस आदिलशाहीतल्या बहूसंख्य गड-किल्ल्यांवर चढाई करत ते स्वराज्यात सामील करून घेतले. त्यानंतर करवीरच्या अंबाबाईचा आशिर्वाद घेत फारशी लढाई न करता पन्हाळ्यासारखा बलाढ्य किल्लाही ताब्यात घेतला. अत्यंत रोमहर्षकपणे आणि अभिमानाने या सगळ्या गोष्टी आपल्या बायकोला सांगताना बहिर्जी पुढे बोलू लागला. "आता काही दिसांनी चैत लागंल, तवा पाडव्याला जरा घरला जाऊन ये आसं महाराजांनी फरमावलं तवा लगोलग इकडं आलो." शेवटचे दोन चार शब्द ओझरते कानावर पडले तेव्हा गोजाई गाढ झोपी गेली होती अन् तिच्याकडे पाहून मंद स्मित करत बहिर्जीही झोपायच्या तयारीला लागला खरा, पण पूर्वेकडून हरकार्यांनी आणलेली गुप्त खबर त्याला काही केल्या झोपू देत नव्हती. ******************************************************************* निष्पर्ण झाडांना पालवी देऊन चैत्र सरला होता. वैशाखातलं ऊन मी म्हणत होतं. ऊन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेलं सिद्दी जौहरचं सारं सैन्य शिवाजी लवकर पकडला जावा म्हणून अल्लाकडे दुवा मागत होतं. आणि त्याला कारणही तसंच होतं. पन्हाळ्याला वेढा घालून बरेच दिवस होत आले होते, पण तरीही तो बदमाश सिवा काही शरण यायचं नाव घेत नव्हता. केवढी ती त्याची चिकाटी !! त्यात स्वतः सिद्दी जौहर म्हणजे या खुदा !! अतिशय कडक शिस्तीचा माणूस. सैन्यातली बेशिस्ती त्याला बिलकुल खपत नसे हे त्याच्या सैन्याला चांगलं ठाऊक होतं, त्यामुळे सिवा कधी पकडला जातोय याची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. स्वतःच्या सामर्थ्यावर प्रचंड विश्वास असणारा आणि हट्टाला पेटलेला सिद्दी जौहर सिवाला गर्देस मिळवून विजापुरी दरबारात बड्या बेगमेसमोर घेतलेली कसम पूर्ण करणार होता. "शहाजीके उस बदतमीज लडकेको पकडकर जिंदा या मुर्दा पेश करूंगा राणीसाहेबाकी खिदमतमें." मुख्य शामियान्यात सिद्दीसह, रूस्तम-ए-जमाँ, सिद्दी मसूद, फाझल खान विचारमग्न स्थितीत बसले होते. त्यातला फाझल खान हा अफझल खानाचा मुलगा. महाराजांच्या खानावरील हल्ल्याच्या वेळी त्याला कसबसं पळून जाण्यात यश मिळालं होतं. बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सिद्दीसोबत तो परत आला होता. आपल्या सैन्यात असलेल्या तोफा लांब पल्ल्याच्या नाहीत हे सिद्दी जाणून होता, म्हणून टोपीकर इंग्रजांना गुप्तपणे खलिता पाठवून त्यांची मदत त्याने मागितली होती आणि त्याच खलित्याचे आलेले सकारात्मक उत्तर पाहून सगळ्यांना आनंद झाला होता. दहा हजारांच्या प्रचंड सैन्यानिशी सिद्दीने घातलेला वेढा शिवाजीला काही फोडता यायचा नाही. करकचून आवळलेल्या वेढ्याने गडावर पोचणारी रसदही बंद झाली होती आणि गडावर शिल्लक असलेल्या रसदेवर शिवाजी काही फार दिवस टिकू शकणार नाही. एक ना एक दिवस त्याला सिद्दीसमोर शरण यावेच लागेल अशी अटकळ बांधून दगाबाज टोपीकर इंग्रज महाराजांना दिलेले वचन मोडून सिद्दी जौहरला मदत करायला तयार झाले होते. "अल्ला-हु-अकबर!! ऐ खुदावंत बादशाह, परवरदिगार आपकी हर मुरादे पुरी करेगा." कडक पहारे असणार्‍या त्या शामियान्याबाहेर झोळी घेतलेला एक फकीर मोठ्याने ओरडत होता. आवाजाने दचकलेल्या सिद्दीने त्या फकीराला आत घेऊन येण्याची आपल्या हशमाला आज्ञा दिली. "कौऽऽन हो तूम? कही सिवाके हेजीब तो नही..?" डोळ्यात सुरमा घातलेली सिद्दीची वेधक नजर त्या फकीरावर रोखली गेली. "तौबा! तौबा!! जहापनाह, हमने तो आजतक उस सिवा के बच्चे को देखा तक नही. हम कहासे उसके हेजीब होंगे?" "तो फिर कौन हो तूम?" "आपने शायद हमें पहचाना नहीं" "ख्वाजा हजरत सय्यद बाबाके दरगाहपर रहते है, और वहीपर आपसे मुलाकात हुई थी." "अच्छा...अच्छा. याद आया." थोडावेळ विचारात पडलेला सिद्दी अचानक काही आठवून तडक आपल्या आसनावरून उठता झाला. जवळ येऊन त्याने त्या फकीराच्या उजव्या हाताचे चुंबन घेतले. फकीरानेही त्याच्यासोबत शामियान्यातल्या इतरांना आळीपाळीने आशिर्वाद दिला. "बाबा, इतने दूर यहा कैसे आ गये आप?" "हम फकीर है बेटा. एक जगह नही रूका करते. तुमे यहाँ आगाह करने आये थे." "........." "नही समझे? तो सुनो !!" "वो सिवा तुम समझते हो उतना सीधा नही है. बहोतसी काली जादुए उसे आती है. पलमें यहाँ दिखे तो दुसरे पल गायब होकर और कही दिखे." "किसी भी आदमी का रूप लेकर सामने आ सकता है." "बडा मायावी है. उससे बचके रहना" "बाकी अल्ला आपको हमेशा बरकत दे." फकिराच्या या वाक्यांनी शामियान्यातल्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खुद्द सिद्दीचा चेहराही फकीराच्या या आगाह करण्याने पडला. इंग्रजांनी पाठवलेल्या मदतीच्या खलित्याने मिळालेल्या आनंदावर फकिराने सांगितलेल्या वाक्यांनी विरजन पडले. जो तो एकमेकांच्या चेहर्‍याकडे पाहू लागला आणि इकडे तो फकिर जसा आला तसाच निघूनही गेला. खबर कानोकानी पोचायला वेळ लागला नाही आणि कडक पहार्‍याच्या सिद्दीच्या आदिलशाही सैन्यात वेगवेगळ्या चर्चांनी जोर पकडला आणि पुढे काय होणार याची धास्ती प्रत्येकाला लागली. पश्चिमेला सूर्य अस्ताला चालला होता. दिवस आणि रात्रीला दुभागणार्‍या त्या कातरवेळी संपूर्ण छावणीत एक भकासपण भरून राह्यले. ...आणि कोकीळेची एक गुढ शिळ आसपासच्या रानात घुमू लागली. क्रमश:
  • Log in or register to post comments
  • 11706 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वच्छंदी_मनोज on Tue, 07/26/2016 - 12:15

Permalink

जबरी

अत्यंत समयोचीत मुहुर्तावर म्हणजेच पावनखिंडीच्या संग्रामाच्याच महीन्यात मस्त मालीका आलीय. उत्तम सुर पकडला आहे लिखाण सुंदर जमले आहे. ऐतीहासीक अभिनिवेशाने भारून न जाता पुढचे भाग यावेत ही अपेक्षा. लवकरात लवकर पुढचा भाग टाकावा.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 07/26/2016 - 12:23

In reply to जबरी by स्वच्छंदी_मनोज

Permalink

//ऐतीहासीक अभिनिवेशाने भारून

//ऐतीहासीक अभिनिवेशाने भारून न जाता पुढचे भाग यावेत ही अपेक्षा./// का बरं ? लिहिण्याची पद्धत पाहिली तर ते इतिहास लिहीत आहेत असे वाटत नाही. हा अभिनिवेश काढला तर कहाणी सपक होईल...मला वाटते ते जे लिहित आहेत तो बाज उत्तम आहे. फार मोठ्या चुका असतील तर त्या मात्र दुरुस्त कराव्यात पण नाहीतर उत्तम लेखन चालू आहे हे निश्चित....
  • Log in or register to post comments

Submitted by स्वच्छंदी_मनोज on Tue, 07/26/2016 - 12:37

In reply to //ऐतीहासीक अभिनिवेशाने भारून by जयंत कुलकर्णी

Permalink

अर्रर्र

च्च...जयंतराव..माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतलात किंवा चुकीचा अर्थ निघतोय बहुतेक.. मला म्हणायचे होते की ऐतीहासीक बाज संभाळताना अती अभिनिवेशाने एकांगी लिखाण होऊ नये. देवत्व वगैरे न देता तत्कालीन सामाजीक परीस्थीतीचे दर्शन होऊदे.. बाकी किसन रावांनी लिखाणाचा उत्तम सुर पकडला आहे हे मी म्हटलेच आहे... धन्यवाद.
  • Log in or register to post comments
Profile picture for user एकनाथ जाधव

Submitted by एकनाथ जाधव on Tue, 07/26/2016 - 12:19

Permalink

पुभाप्र

पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 07/26/2016 - 12:19

Permalink

आता एखादं समर्पक चित्र येऊ

आता एखादं समर्पक चित्र येऊ द्या वरती. साडेतीनशे वर्षे मागे नेलं झटक्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Tue, 07/26/2016 - 12:45

In reply to आता एखादं समर्पक चित्र येऊ by कंजूस

Permalink

आमचा चित्रकार सध्या गडबडीत

आमचा चित्रकार सध्या गडबडीत आहे. ;) निवांत झाला की देईलच एखादं छानसं चित्र.
  • Log in or register to post comments

Submitted by जगप्रवासी on Tue, 07/26/2016 - 12:30

Permalink

जबरा सुरुवात, पुढचा भाग लवकर येऊ द्या

जबरा सुरुवात, पुढचा भाग लवकर येऊ द्या
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Tue, 07/26/2016 - 12:35

Permalink

सुरेख चित्रण केलय.उत्सुकता

सुरेख चित्रण केलय.उत्सुकता वाढलिये.पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Tue, 07/26/2016 - 12:35

Permalink

सुरेख चित्रण केलय.उत्सुकता

सुरेख चित्रण केलय.उत्सुकता वाढलिये.पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Tue, 07/26/2016 - 12:38

Permalink

सुरेख चित्रण केलय.उत्सुकता

सुरेख चित्रण केलय.उत्सुकता वाढलिये.पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 07/26/2016 - 12:42

In reply to सुरेख चित्रण केलय.उत्सुकता by इशा१२३

Permalink

एक . दोन . तीन.

एक . दोन . तीन.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Tue, 07/26/2016 - 13:10

In reply to सुरेख चित्रण केलय.उत्सुकता by इशा१२३

Permalink

१ प्लस

सहम्त
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 07/26/2016 - 13:19

Permalink

वा वा. किसनदेव प्रकटले..

वा वा. किसनदेव प्रकटले.. येऊ द्या पटापट भाग.
  • Log in or register to post comments

Submitted by शित्रेउमेश on Tue, 07/26/2016 - 14:09

Permalink

जबरदस्त सुरुवात....

जबरदस्त सुरुवात....
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Tue, 07/26/2016 - 21:21

Permalink

पु.भा.प्र.

पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 07/26/2016 - 21:40

Permalink

मस्त

पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Tue, 07/26/2016 - 23:42

Permalink

मस्त सुरुवात! पु भा प्र.

मस्त सुरुवात! पु भा प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 07/28/2016 - 23:50

Permalink

आज वाचली!!!

आज वाचली!!! जबर जमलीय शैली. येऊद्या!!
  • Log in or register to post comments

Submitted by रंगासेठ on Fri, 07/29/2016 - 15:40

Permalink

मस्त जमलीय

सुरुवात एकदम मस्त झाली आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. बहिर्जी नाईकांबद्दल आणखी जास्त माहिती कुठे मिळेल? एक पुस्तक/ चित्रपट बनू शकेल नक्कीच एवढं कार्य आहे त्यांचं.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Fri, 07/29/2016 - 17:08

In reply to मस्त जमलीय by रंगासेठ

Permalink

दुर्दैवाने बहिर्जी

दुर्दैवाने बहिर्जी नाईकांबद्दल फारसं कुठे वाचायला मिळत नाही. पण भालजी पेंढारकरांनी 'मोहित्यांची मंजुळा' या चित्रपटात थोड्या प्रमाणात, तर 'गनिमी कावा' हा संपूर्ण चित्रपट त्यांच्या कार्यावर काढला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रंगासेठ on Fri, 07/29/2016 - 17:25

In reply to दुर्दैवाने बहिर्जी by किसन शिंदे

Permalink

धन्यवाद

धन्यवाद, अशा अनेक अल्प माहिती असलेल्या नायकांनी स्वराज्य स्थापलं, आणि व्रुद्धिंगत केलं. __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Fri, 07/29/2016 - 17:55

Permalink

किस्ना

अरे किस्ना, अरे कान्हा मनरंजन मोहना छान लिहिताय मालक.
  • Log in or register to post comments

Submitted by सानझरी on Mon, 08/22/2016 - 17:51

Permalink

चांगलाय लेख.गोंडा फुटला

चांगलाय लेख. गोंडा फुटला दिसाचा जसं जास्वंदीचं फूल माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल या ओळी विशेष आवडल्या. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 08/22/2016 - 22:54

In reply to चांगलाय लेख.गोंडा फुटला by सानझरी

Permalink

शांताबाई शेळके

शांताबाई शेळके
  • Log in or register to post comments

Submitted by सानझरी on Tue, 08/23/2016 - 13:39

In reply to शांताबाई शेळके by किसन शिंदे

Permalink

शांताबाई शेळकेंची कविता आहे

शांताबाई शेळकेंची कविता आहे हे माहित नव्हतं. गुगल केल्यावर हि पूर्ण कविता सापडली. http://www.aathavanitli-gani.com/Song/Gonda_Phutala_Disacha गोंडा फुटला दिसाचा जसं जास्वंदीचं फूल माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल माय माय म्हणताना सय माउलीची आली माउलीच्या मागं मला, दादा, तुझीच साउली देह नांदतो सासरी मन माहेरा निघालं माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल भाऊ माझा तालेवार बारा बैल दावणीला उभा पाठीशी सावळा, काय उणं बहिणीला ? सार्‍या गावाहून चढं असं धनंतर कूळ माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल माझं मागणं ते किती, तुझं देणं भारंभार माझी चोळीची रे आशा, तुझा जरीचा पदर झोपडीला या आधार, दादा, तुझं रे राऊळ माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Mon, 08/22/2016 - 18:19

Permalink

आवडली होती.

कथा आवडली होती. पुढील भाग कधी?
  • Log in or register to post comments

Submitted by जावई on Mon, 08/22/2016 - 19:14

Permalink

येऊ द्या....

लय जबर लिवलय.
  • Log in or register to post comments

Submitted by निओ on Tue, 08/23/2016 - 01:48

Permalink

मस्त लिहिताय..

पु भा प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by साहेब.. on Tue, 08/23/2016 - 15:59

Permalink

पु भा प्र.

दमदार सुरुवात आणि रोचक कथानक !
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com