Skip to main content

न्यु जर्सी कट्टा - १९ जुन २०१६ - वृतांत

लेखक पिलीयन रायडर यांनी मंगळवार, 21/06/2016 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नशिबच थोर आहे! अमेरिकेत पाऊल ठेवलं आणि न्युयॉर्क कट्ट्याचा धागा! भारतात मी एकाच कट्ट्याला गेले होते, ते ही ३.५ मिनिटं. अनाहितात सुद्धा ऐनवळेस टांगारुपणा करण्यात मी फेमस आहे. हा कलंक धुवुन काढायची नामी संधी आली होती. जायचं हे नक्की होतंच. ते ही सहकुटुंब सहपरिवार! कट्ट्याच्या दिवशी सकाळी सकाळी नवरा आणि मुलाने भलताच कार्यक्रम काढला आणि फादर्स डे म्हणुन कुठेतरी उंडारायला गेले. टांगारुपणा घरातच आहे. परंपरा राखली बाप लेकांनी!! अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी एकदम "पंछी बनु उडती फिरुं मस्त गगनमे.." च झाले! ;) आणि ११ च्या कट्ट्याला १०.४० लाच जाऊन पोहचले. मग लक्षात आलं की आपल्याकडे कुणाचाही नंबर नाही. म्हणुन धाग्यावर प्रतिसाद देऊन ठेवला. पण कुणी तो वाचेल तरी का हा प्रश्नच होता. न्युपोर्ट मॉल mall मी ठरलेल्या ठिकाणी जाऊन जाणार्‍या येणार्‍यांना टक लावुन बघत बसले. कुणी तिथे थांबेचना. जरा कुणी रेंगाळलं की मी त्याच्या मागे मागे जाऊन बघायचे. बरं जाऊन "मिपा का?" असं तरी कसं विचारणार? मला तर सगळ्यांनी एकमेकांना कट्टा कॅन्सल करुन कळवलय आणि आपणंच इथे आलोय असं वाटायला लागलं. काय झालं होतं की "न्युपोर्ट मॉलचा एन्ट्रन्स" असं साधं ठिकाण ठरलं होतं. पण बारिकसा मुद्दा हा होता की मॉलला किमान १५ तरी एन्ट्रन्स आहेत! आणि स्टेशनसमोर म्हणलं तरी तिथे पाथ आणि लाईटरेल असे दोन स्टेशन आहेत. त्यातली पाथ वायली आणि लाईटरेल वायली हे सगळ्यांनाच माहिती नसेल हे कुणाच्या लक्षात नाही आलं. म्हणुन मग आले तर सगळे.. पण कुणीच कुणाला सापडेना! पण म्हणलं ना, माझं नशिबच थोर आहे! मला उत्सवमुर्ती काकाच दिसले! मी त्यांच्या मागे मागे निघाले खरी, पण त्यांना थांबवुन विचारावं कसं हे कळेना. शेवटी धीर एकवटुन "एक्काकाका का?" असं एका दमात विचारुन टाकलं. काकांना अर्थातच काहीच समजलं नाही. मग नीट "तुम्ही डॉ. सुहास म्हात्रे ना?" असं शिस्तीत विचारल्यावर काका हो म्हणाले आणि आपला पोपट झालेला नाही हे कळल्यावर बरं वाटलं! काकांकडे सगळ्यांचे नंबर असल्याने त्यांनी भराभरा फोन लावले आणि दोनच मिनिटात तिथे आम्ही ७-८ जण जमलो! एक्काकाका आपल्या पत्नी आणि मुलासहित न्युयॉर्कहुन तर राघव आपल्या कुटुंबासहित एडिसनहुन आले होते. damn (काय नाव आहे!) सात तास ड्राइव्ह करुन कट्ट्यासाठी आला होता आणि माझ्यासारखाच टेन्शन मध्ये मॉलमध्ये फिरत होता. =)) कट्ट्यासाठी "सात" तास एकट्याने ड्राइव्ह करुन आलेला मिपाच्या इतिहासातला हा एकमेव माणुस असेल. ह्याचा फोटो बॅनर म्हणुन ह्या वृतांताच्या वर लावुन द्यावा अशी कलामंडळाला विनंती!! न्युपोर्ट मॉल जवळच न्युपोर्ट ग्रीन म्हणुन बाग आहे. तिथे जायचे ठरले. एकमेकांशी ओळख करुन घेत, गप्पा मारत बागेत पोहचलो. लगेच मागुन "येडा अण्णा" (हे ही एक धन्य सदस्यनाम!) आणि मिहिर आले. एक्काकाकांच्या मुलाच्या ऑफिसातली एक कलिग तिच्या सर्व परिवारासहित आली. इथे मग तासभर एकमेकांच्या ओळखी, मिपाविषयक गप्पा, लोकसत्ता, अमेरिकेतील मराठी जनता, अमेरिकेतल्या मराठी मुलांची मराठी भाषा वगैरे अनेक विषयांवर भरपुर गप्पा झाल्या. राघव ह्यांनी बरीच वर्ष ह्याच भागात काढलेली असल्याने त्यांच्याकडुन पुष्कळच माहिती मिळाली. १२:३० च्या सुमारास मात्र भुका लागल्याने परत सगळी जनता मॉलमध्ये फुडकोर्ट कडे निघाली. kattaa डावीकडुन :- उभे - समस्त जर्सीमधले खादाडीचे अड्डे माहिती असलेले राघव, उत्सवमुर्ती एक्काकाका, भारतात फारसा न राहुनही उत्तम मराठी बोलणारा एक्काकाकांचा मुलगा सागर, अत्यंत शांत धीरगंभीर व्यक्तिमत्व आणि खोदुन खोदुन विचारल्यावर समजलं की खगोलशास्त्रात डार्क मॅटरवर पीएच्डी करणारा मिहिर, कट्ट्यासाठी सात तास ड्राइव्ह करुन आलेला damn, मिपा म्हणजे काय हे ही माहिती नसलेले पेंडसे काका, सदस्यनामाप्रमाणे अजिबात नसणारे येडा अण्णा बसलेले :- मिपाला सवत मानणार्‍या पण अधुन मधुन मिपा वाचक आणि राघव ह्यांच्या पत्नी- वृषाली, मी, काकांच्या पत्नी म्हात्रे काकु, मिपा वाचक पण सदस्य नसणार्‍या आपटे काकु, मिपा माहिती नसलेल्या पेंडसे काकु, मिपा वाचक पण सदस्य नसणारी-आपटेंची मुलगी-पेंडसेंची सुन-सुपर्णा! सोबत चिल्ले पिल्लेही होते. पण त्यांचे फोटो टाकत नाही. पोरं भलतीच गोड होती, उगा दृष्टावतील! मॉलला जाता जाता शिष्ट पुणेकर हा ज्वलंत विषय damn ने छेडला. लोक पुण्यावर फार जळतात हेच खरं. ;) ही आमची खादाडी!  ह्या इथेच आम्हाला साक्षात्कार झाला की damn हे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहेत!! आधी त्यांनी तिखट खाणं आरोग्याला हानिकारक असतं ह्यावर लहानसं प्रवचन दिलं. मग आता मॅक्सिकन पोळी भाजी कशी नीट ग्रिल केलेली नाही ह्यावर नाराजी (१३७व्यांदा) व्यक्त केली. मग आता कोणत्या साईडने खायला सुरवात करावी ह्यावर चिंतन केले. मग एक घास खाऊन पाहिला न पाहिला की बदलापुर मध्ये ऑरगॅनिक भाज्या मिळतील किंवा कसे ह्या विषयावर एक्काकाकांसोबत सपट महाचर्चा सुरु केली. काकांकडुन उत्तर मिळेना तर बाजुला पेंडसे काकांना पकडलं. काकांनी चक्क मदत करु शकतील अशा एकांचा पत्ता दिला. "इतकाच आता ह्याही ग्रुहस्थांच्या मागे लागलास तर ते घरी येऊन तुला भाज्या देऊन जातील रोज!" असंही एक्काकाकांनी त्याला टोलवला! मग तो ही मुद्दा संपला म्हणुन "सदस्यनाम" ह्या विषयावर चर्चा उतरली. तेव्हा महाराजांना लक्षात आलं की damn चा अर्थ damn u असा होतो. तोवर त्यांना ही चार रॅण्डम अक्षरं वाटत होती. मग सदस्यनाम कसे बदलायचे ह्यावर पुन्हा सपट महाचर्चा! मग अचानक त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांच जेवुन झालेलं आहे! "अरे हळु जेवा ना" "मागची दहा मिनिटं इतर कुणाचा आवाज येतोय का तुला? कमी बोल आणि खा." मग damn राव जेवायला बसले! तरी जेवता जेवता "उमा जेटली" कोण आहेत हा गहन प्रश्न त्यांना पडला होता! तर लीमाउजेट म्हणजे उमा जेटली नावाची कुणीही बाई नाही हे सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. =)) तरी त्यातुन सावरता सावरता "विपश्यना" हा मुद्दा चर्चेला घेतलाच त्यांनी. khane damn ने फायनली संधी दिली म्हणुन मग एक्काकाकांनाही बोलायला चान्स मिळाला ;) काकांनी त्यांच्या कामाबद्दल थोडक्यात पण फार मस्त माहिती दिली. त्यांचे वेगवेगळे अगदी बीजे मेडिकल पासुन ते डिफेन्स मध्ये अधिकारी म्हणुन आलेले अनुभव ऐकुन कट्ट्याला आल्याचं सार्थक झालं असं वाटलं! मिपावरच्या टर उडवणार्‍या प्रतिसादांना घाबरुन न लिहीण्याचा विषय निघाला तेव्हा काकांनी एक फार मस्त गोष्ट सांगितली. काका म्हणाले "मी मॅनेजमेंट्मध्ये काम करताना मला हे माहिती होतं की मी कधीच १००% लोकांना १००% वेळा समाधानी ठेवु शकत नाही. तेव्हा मी तेच करायचो जे मला योग्य वाटायचं. जर तुम्ही करत असलेली गोष्ट अनैतिक, अवैध आणि अस्वच्छ नसेल तर मग इतरांचा विचार करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटेल तेच करायचं!" काकांशी गप्पा मारता मारता असा तर कितीही वेळ गेला असता आणि तरीही गप्पा संपल्या नसत्या. पण अखेर जायची वेळ झालीच. एकमेकांचे नंबर घेऊन पुन्हा भेटु म्हणुन निरोप घेतला. कट्ट्याच्या निमित्ताने आपल्या आजुबाजुला किती लोक मिपा वाचत असतात हे जाणवलं! भारी वाटलं! असेच कट्टे होत राहोत! जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! (सगळ्यांनी आपल्या जवळचे फोटो आणि आपापले अनुभव नक्की अ‍ॅडवा! टंकाळा आला म्हणुन अजुनही रोमात राहिलात तर जनता माफ नही करेगी!)
लेखनविषय:

वाचने 36588
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

अरे माझ्या देवा आत्ता मला कळलं की तु एवढी का धुमसत होतीस ते. आणि माझ्या खवत येवुन तोफची डागलीस ते. आय माय स्वारी बरं का. बाकी छोटेखानी कट्टा होता, पण छान झाला. जे अमेरिकन कट्टेकरी वामा आहेत त्यांनी लिहतं व्हावे . खुप माहितीचा खजिना मिपावर येईल.

In reply to by सनईचौघडा

पिरा दिसायला वरणभात काकूछाप असेल असे वाटले नव्हते =))

सुंदर वृत्तांत! अगदी खुसखुशीत! आणि जबरा कट्टा! डॉ. साहेबांच्या पुढाकाराने बहार आणली म्हणायची. आणि फोटो झकासच! विशेषत: हजर सदस्यांचा फोटो बघून बरे वाटले. कट्टा चांगलाच रंगला. असेच कट्टे रंगत राहू देत आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवत राहू देत ही सदिच्छा! दुक्की पे दुक्की हो, या सत्ते पे सत्ता गौर से देखा जाये तो है बस कट्टे पे कट्टा, कोई फरक नही अलबत्ता, कोई फरक नही अलबत्ता

जब्राट जळ्जळ झालीये...इनोऐवजी इथे कट्टा करायलाच पैजे अता...बाकी वृत्तांत भन्नाअट आहे...लैच आव्डेश

जोरदार कट्टा एकदम. अर्थात एक्काकाकांसारखे संयोजक असल्यावर कट्टा रंगणार ह्याची खात्री होतीच. मिहिरला बघून आनंद झाला. त्याच्यासोबत पुस्तकविश्ववर नेहमी चर्चा होत असे. डार्क मॅटर आम्हाला समजेल असा एखादा लेख त्याने लिहावा अशी आग्रहाची विनंती

In reply to by प्रचेतस

झकास झालेला दिसतोय कट्टा. मिहिरना विनंती डार्क मॅटरवर् लिहाच्. विपश्यनेवर चर्चा झाली हा सुखद धक्का.

In reply to by विलासराव

ओ विलासराव, तुम्ही फारच ब्वा साधे. ते पुन्हा वाचा एकदा!

In reply to by धनंजय माने

नाय राव, आमचीच चूक झाली. :(( खरंच चर्चा झालेली आहे. कट्टा बेष्ट झालेला दिसतोय.

आरे वा, जोरात कट्टा. आमचा गाववाला राघव दिसतोय भौतेक. खादाड्या हुडकून काढणारच तो. मला फोटोत समोसा आन पावभाजी दिसली चक्क. आमरिकेतच केलाय ना कट्टा?

In reply to by अभ्या..

उसाचा रस आणी विड्याचं पान सुद्धा मिळतं, समोसा फारच सोपी गोष्ट आहे हो! काकांनी खाली जो जरनल स्क्वे. चा फोटो टाकलाय ना, त्या रस्त्यावर पानटपरी आहे. तिथे मी रात्री जोरजोरात "दिलके झरोके मे" का "बदनपे सितारे.." गाणं ऐकलय डोसा खाता खाता. समोर किराणामालाचं दुकान आहे पटेल ब्रदर्स नावाचं जिथे आपल्या भारतात जे मिळेल तेच सगळं मिळतं. स ग ळं! राघव ह्यांच्या पत्नीने तर हे ही सांगितलं की एडिसन मध्ये इतके भारतीय आहेत की अमेरिकन दिसला तर "फॉरेनर फॉरेनर" म्हणुन कौतुकाने लोक बघतात! ;)

In reply to by पिलीयन रायडर

सहमत. पूर्वी पानाच्या टपरीपाशी पान खाऊन थुंकणे हेही दिसले होते. आम्ही तो रस्ता शोधत होतो जिथे ही सगळी भारतीय दुकाने आहेत. रस्त्यावर कागदाचे बोळे पाहिले आणि हाच तो रस्ता असणार हे समजले. जर्सी स्वच्छ ठेवताना महापालिकेची त्रेधा उडत असणार. ;)

In reply to by पिलीयन रायडर

विश्वास बसत नसला तर हा घ्या रविवारी जर्सी सिटीत विकत घेतलेला पुरावा... ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गाय छाप अलावूड हाय काय अम्रिकेत? आणि राजेश चुना? लै दिवस अमेरिकेतील कुणाला तरी ईचारावा म्हणत होतो.

In reply to by अभ्या..

जर्सी सिटी व एडिसन मध्ये RMD चे पाकिटे आरामात रस्त्यावर दिसतात. http://www.royalpaan.com/ ही कॅनडा व अमेरिकेत पानाची दुकानाची chain आहे.

In reply to by जव्हेरगंज

म्याबी सोडला नाद अम्रिकेचा. परत मागायचे वांदे हो "पाव्हणं जरा चुना घ्या" म्हणून

In reply to by पिलीयन रायडर

पिरा न्यू जर्सी ला पोहोचलीस नं, आता बघ तू वरलक्ष्मी हल्दी कुमकुम, कोलू, विष्णू सस्त्रानाम, नवरात्री दांडिया, अष्टमी कन्यापुजन, झालंच तर श्री महालक्ष्मी व्रत, साईबाबा भजन ग्रूप, दिवाली पार्टी अशी सूपर बिझी होणार आहेस.

In reply to by अभ्या..

उसाचा रस आणी विड्याचं पान सुद्धा मिळतं, समोसा फारच सोपी गोष्ट आहे हो! काकांनी खाली जो जरनल स्क्वे. चा फोटो टाकलाय ना, त्या रस्त्यावर पानटपरी आहे. तिथे मी रात्री जोरजोरात "दिलके झरोके मे" का "बदनपे सितारे.." गाणं ऐकलय डोसा खाता खाता. समोर किराणामालाचं दुकान आहे पटेल ब्रदर्स नावाचं जिथे आपल्या भारतात जे मिळेल तेच सगळं मिळतं. स ग ळं! राघव ह्यांच्या पत्नीने तर हे ही सांगितलं की एडिसन मध्ये इतके भारतीय आहेत की अमेरिकन दिसला तर "फॉरेनर फॉरेनर" म्हणुन कौतुकाने लोक बघतात! ;)

In reply to by पिलीयन रायडर

समोर किराणामालाचं दुकान आहे पटेल ब्रदर्स नावाचं जिथे आपल्या भारतात जे मिळेल तेच सगळं मिळतं. स ग ळं!
तिथे गुजरात्यांवर हल्ले होतात म्हणे!!! फार गर्दी करून टाकलीये अमेरिकेत त्यांनी,
इतके भारतीय आहेत की अमेरिकन दिसला तर "फॉरेनर फॉरेनर" म्हणुन कौतुकाने लोक बघतात!
डोनाल्ड ट्रंप यांचेही हेच म्हणणे आहे, जसे महाराष्ट्रात आपल्याला परप्रांतीयांचा त्रास होतो,तसा तिकडे त्यांनाही होत असेल! रोजगार,नोकर्या इत्यादी गोष्टीमध्ये स्थानिक लोकांच्या हक्कावर गदा येतेय.ट्रंप निवडून आल्यावर भारतीयांचं काय खरं नाय बघा

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

पण अमेरिकाच मुळात इमिग्रंट्स ने बनवलेला देश आहे. आता कसे ओरडणार ते इमिग्रंट्स विरुद्ध? हो अर्थात ह्याही मुद्द्यावर चर्चा झाली की फेसबुकवर "Let's make New Jersey Andhrapradesh" वगैरे कमेंट्स दिसतात, ही किती चुकीची मनोवृत्ती आहे. आपण इथे सर्वांमध्ये मिसळुन रहाणे अपेक्षित आहे. ट्रंप आल्यावर नक्की काय होईल हे बघणे रोचक असेल..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वरच्या मजल्यावर पटेलिन काकू ब्युटी पार्लर चालवतात वाटतं. चांगलंय चांगलंय.

जोरदार वृत्तान्त! डॅमराव महान आहेत. हा धागा आत्ताच पाहिला. माझाही पिलीयन रायडर ह्या काकूच असतील असा समज झाला होता! ह्या जालाप्रमाणेच वास्तवातही युद्धासाठी सदैव तयारच असतात . एक्काकाका, राघव, येडा अण्णा ह्यांना भेटूनही मजा आली.

मस्त व्रुत्तांत. पुणेकरांच्या यशावर जळणारी जनता वाढत असलेने, इनोचा व्यापार वाढला आहे. त्यामुळे इनो बनवणारी कंपनी लवकरच पुणेकर मिपांचा सन्मान करेल. तो दिवस दूर नाहि. :):):)

In reply to by शान्तिप्रिय

पुणेकरांच्या स्वतःच्या यशाबद्दल भलत्याच कल्पना बुवा..... असो, एक साधा कट्टा पुण्यात कट्टा करायचा म्हटले तरी ३-३ धागे निघतात आणि अमेरिकावसी एका धाग्यात काम करतात. ७-७ तास ड्रायव्हिंग करून पण येतात. इथे पुणे-३०ला असलेल्या कट्ट्याला पुणे-२८ वाले येतात पण पुणे-३३ वाले मात्र अजिबात येत नाहीत. असो, पुण्यातल्या कट्ट्याला खूद्द पुणेकरच टांग मारत असतात, ह्यालाच पुणेरी यश, असे समजायचे.

In reply to by मुक्त विहारि

कट्ट्याला येणार अश्शी मोठ्ठी झैरात करून..."जो पर्यंत दुसरे कोणी काँटॅक्ट नंबर मागत नाही तो पर्यंत मी पण दुसर्याचा नंबर मागणार नाही...मग भले कट्ट्याच्या ठिकाणी जाउन कट्टा मिसला तरी चालेल" असा कट्टर पुणेरीपणा करून या ठिकाणी पिरातैंनी "अमेरिका अस्ली म्हणून काय झाले...पुणेकर जीथे जातील तिथे पुण्यात असल्यासारखेच वागतील" हे सोदाहरण दाखवून दिले आहे =))

In reply to by मुक्त विहारि

मुवि मागील पुणॅ कट्टा तर एका धाग्यात झालाय! डोंबोली कट्ट्यालाच वांझोटे धागे निघतात. हघ्या!

In reply to by शान्तिप्रिय

"मागील पुणॅ कट्टा तर एका धाग्यात झालाय!" ह्या अशा अपवादानेच " पुणे कट्ट्याला किमान ३ तरी धागे हवेतच." ह्या नियमाला पुष्टी मिळते. "डोंबोली कट्ट्यालाच वांझोटे धागे निघतात." एखादा असेलही असा.... पण "डोंबोली कट्ट्याला एक धागा पुरतो." हा नियम सिद्ध होतो.

मस्तं खुसखुशीत वृत्तांत, पिरा. माझी थोडीशी भर. इथे आलो आणि बराच वेळ मोकळा होता. तेव्हा जवळपास कोणी मिपाकर असल्यास कट्टा करायला किती मजा येईल असा विचार करून सहज म्हणून एक धागा टाकला आणि चारपाच दिवसांत मिपाकरांनी भरभरून प्रतिसाद दिले !... केवळ जवळपासहूनच नव्हे तर अगदी पश्चिम किनार्‍यावरील कॅलिफोर्नियासारख्या ४-५,००० किमी दूरवरूनसुद्धा आणि त्याच्या मधल्या अंतरावर असणार्‍या बोस्टन, मिडवेस्ट, टेक्सास, इ मधूनही ! खंड्प्राय अमेरिकेतील अंतरे पाहता या सर्वांना प्रत्यक्ष येणे जमणार नाही हे माहित होतेच. पण तरीही सर्वांनी ज्या ममतेने लिहिले त्याबद्दल त्यांचे अनेकानेक धन्यवाद ! न्यु जर्सीत राहणार्‍या राघव८२ व येडा अण्णा यांनी पुढाकार घेऊन न्यु यॉर्कला लागून असलेल्या जर्सी सिटीतला न्यु पोर्ट मॉल हे सर्वांना यायला सोईचे आणि गप्पा व खादाडीसाठी उत्तम ठिकाण नक्की केले. दिवसही पक्का झाला आणि वाट पाहणे सुरु झाले ! कट्याच्या दिवशी आलेली लोकसंख्या आणि त्यातील विविधता आश्चर्यकारक ठरली. 'सक्रिय सदस्य मिपाकर', 'वामा सदस्य मिपाकर', 'मिपा वाचणारे पण सदस्य नसणारे मिपाकर' आणि 'मिपाचे नावही माहीत नसलेली मराठी मंडळी' अश्या १४ मोठ्या मंडळींनी आणि ३ भावी मिपाकरांनी हजेरी लावून प्रचंड बहार आणली ! खास नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे damn हा मिपाकर मावळा "केवळ कट्ट्यासाठी" भल्या पहाटे घरातून निघून एकटा ७ तास चारचाकीचा घोडा उडवत वेळेअगोदर जागेवर पोहोचला होता ! आता बोला !! कट्ट्याचे ठिकाण आणि परिसर खरेच फार सुंदर होते. जर्सी सिटीचे (उंच इमारतींनी भरलेले) डाऊनटाऊन असलेल्या या विभागाला (मॅनहॅटनचा आद्य वॉल स्ट्रिट ह्डसन नदीपलिकडे या जागेच्या पूर्वेला आहे म्हणून) "पश्चिम वॉल स्ट्रिट" असे संबोधले जाते ते उगाच नाही हे पटले !  रुंद आखीवरेखीव रस्ते; निगा राखलेली मोठी झाडे व फुलझाडांनी सजवलेले पादचारी मार्ग आणि चौक; भव्य मॉल अशी सुंदर जागा निवडण्यात राघव८२ व येडा अण्णा यांनी कल्पकता दाखवली होती...  .  .  मॉलमध्ये थोडे पुढेमागे फिरून झाल्यावर पिरांनी आम्हाला गाठले आणि कारवाँ बनायला सुरुवात झाली. थोडी फोनाफोनी होऊन पुढच्या काही मिनीटांत एक एक करत बहुतेक सर्व मिपाकर जमा झाले. मॉलमधला पहिला फोटो...  गप्पा मारायला मॉलच्या मागेच असलेल्या न्युपोर्ट ग्रीन पार्कमधे सगळ्यानी प्रस्थान केले आणि तिथली तीन टेबले काबीज करून टाकली. ओळखीची फेरी झाल्यावर क्लासिक मिपाकट्टा पद्धतीप्रमाणे एकदम जुनी ओळख असल्याप्रमाणे गप्पा सुरू झाल्या. पिल्लू लोकांना खेळायला जवळच एक उद्यान होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना अजिबात त्रास दिला नाही ;) :)  अनेक विषयांचे चर्वण करता करता एकमेकाचे पाय ओढणे यांत बराच वेळ कसा गेला हे कळलेच नाही. केवळ पोटातले कावळे ऑस्ट्रिच इतके मोठे होऊन ओरडायला लागले तेव्हा नाईलाजाने मॉलच्या फूड कोर्टावर हल्ला करणे भाग पडले. तेथे भारतिय, चिनी, मेक्सिकन, अमेरिकन, इ अनेक प्रकारची रेस्तराँ होती...  तिथेही आम्ही चारपाच टेबले एकमेकाला जोडून फूड्कोर्ट मिपाच्या मालकीचे असल्यासारखे खाणे-बोलणे-हसणे हा कार्यक्रम चालूच ठेवला... आता गाड्यांत पेट्रोल पडत असल्याने जरा जास्तच चेवाने चर्चा होत होती :) याबद्दल जास्त वर्णन मूळ वृत्तांतात आले आहेच. शेवटी जड अंतःकरणाने एकमेकाचा निरोप घेऊन जो तो आपल्या गंतव्याकडे निघाला. आम्हीही खास भारतिय पदार्थांची खरेदी करण्यासाठी जर्सी सिटीच्या जर्नल स्क्वेअर स्टेशनच्या दिशेने मार्गस्थ झालो...  .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर वृत्तांत, डॉ. साहेब! आणि फोटो सुंदरच!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उशीरा रात्री गडबडीत प्रतिसाद लिहिला आणि एक फार फार महत्वाची गोष्ट लिहायची राहूनच गेली (चतुरंगसाहेब, क्षमस्व) :( ... ग्रीन पार्कमध्ये गप्पा मारत असताना चतुरंग यांचा फोन आला. कामासाठी त्यांना ४-५,००० किमी दूर पश्चिम किनार्‍यावर जावे लागले त्यामुळे त्यांचा कट्टा हुकला. पण तरीही त्यांनी तेथून फोन करून माझ्याशी आणि इतर तीन चार कट्टेकर्‍यांशी संवाद साधून चौकशी केली हे विशेष. अश्याच मिपाकरांच्या आपुलकीमुळे कट्ट्यांना अजूनच रंग चढतो ! धन्यवाद, चतुरंग साहेब !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून एक महत्वाची गोष्ट राहून गेली. ती म्हणजे प्रा.डॉ. यांना फोन करायचा. प्रा.डॉ. राग धरू नये.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि मला साहेब वगैरे नका म्हणू हो. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने सर्वथा मोठे आहात! मिपाकरांशी बोलून छान वाटले.कट्टा मिसला याचे वाईट वाटतेच आहे. केवळ फोनवरुन बोलण्यातच समाधान मानावे लागले, पापी पेट का सवाल है!:( बघूया प्रत्यक्ष भेटीचा योग कधी येतोय ते! (कट्टाप्रेमी)रंगा

मिपा माहीत नसूनसुद्धा पेंडसेकाका काकू आले म्हणजे फारच कौतुकास्पद आहे. तुमचा उत्साह पाहून ते आता वाचक लेखक होतीलच. शिवाय आय डीन्ना चेहरे रिलेट करता आले की वाचायला नक्कीच जास्त मजा येते.

फारच सुंदर वृत्तांत .तुम्ही अमेरिकेतील न्युपोर्ट मॉलचे एकदम पुण्याच्या आर डेक्कन नाहितर सेन्ट्रल मॉलमध्ये रुपांतर करुन टाकलंत .

सचित्र सविस्तर वृत्तांत आणि एक्का काकांचा उप वृत्तांत दोन्ही छान.

कट्टा जोरदार झालेला दिसतो आहे,मस्त वृत्तांत आणि फोटो.. स्वाती