Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सिरुसेरि on Sun, 05/22/2016 - 19:58
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
सरदार दिठेरीकरांची गढी ---- भाग १ ---- कथा ---- काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी ----- भाग २ ----- कथा ------ काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी - भाग ३ ----- कथा ------ काल्पनीक -- पुढे चालु - रविकांतराव यांनी त्या हॉलच्या टोकाला असलेल्या एका उंच आसनावरील बैठकीकडे निर्देश केला आणी ते पुढील माहिती सांगु लागले . "या दिवाणखान्यामधे एकेकाळी न्यायदानाचे काम चालत असे . दिठेरी गाव आणी बाजुचा मुलुख इथल्या जनतेचे न्याय निवाडे इथे होत असत . खुद्द सरदार दिठेरीकर हे न्याय निवाड्याचे काम बघत असत . " सर्वजण कुतुहलाने त्या बैठकीकडे पाहु लागले . रविकांतराव काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष होते . दिवाणखान्यातील एका गवाक्षातुन दिसत असलेली तटबंदी खुणेने दाखवत रविकांतराव म्हणाले . "या मसनदीवरुन अनेक गुन्हेगारांना कडक शिक्षा केली गेली आहे .वेळप्रसंगी अनेक गुन्हेगारांचा कडेलोटही करण्यात आला आहे . तुम्हाला ती डाव्या हाताला जी तटबंदी दिसते आहे ,तेथील बुरुजावरुन या शिक्षेची अमलबजावणी केली जात असे. " रात्रीचे आठ वाजुन गेले होते . बाहेर सगळीकडे अंधार पडलेला होता . तरीही फिकट चांदण्यात ती दगडी तटबंदी उठुन दिसत होती . तेथुन होत असलेल्या कडेलोटाच्या नुसत्या कल्पनेनेच सर्व शहरी मंडळींच्या पोटात गोळा आला . "या तटबंदीच्या पलीकडीस बाजुस खोल दरी आहे . असे म्हणतात की , कडेलोट झालेल्या माणसाच्या किंकाळ्यांचे पडसाद पुढे कितीतरी दिवस आणी रात्री या दरीमधुन उमटत असत . आजही कधी आपण जर शांत वातावरणात त्या बुरुजापाशी रात्री जाउन उभे राहिलो तर आपल्याला ते पडसाद ऐकु येतील . अशा अनेकांच्या रक्त गोठवुन टाकतील अशा किंकाळ्यांचे पडसाद या खोल दरीने आपल्यामध्ये सामावुन घेतले आहेत . ते पडसाद मग असेच कधी कधी भुतकाळाच्या सीमारेखा ओलांडुन बाहेर पडतात ." "अहो काय सांगताय काय ? " एकजण चाचरत बोलला . सर्वांचेच चेहरे घाबरे झाले होते . त्यांना आता खरोखरच त्या किंकाळ्यांचे पडसाद कानावर येत होते . "मेलो , मेलो ... वाचवा .. वाचवा .. माफ करा.." असे आवाज त्यांना त्या दुरवरील दरीतुन ऐकु येत होते . "एवढेच नाही . तर आजही कधी कधी रात्रीच्या वेळी खुप जणांना त्या बुरुजांवर कोणत्यातरी अज्ञात सावल्यांची हालचाल दिसली आहे . जणु काही या सावल्या भुतकाळातुन उतरुन परत त्यांच्या मुळ जागी वावरत आहेत . वर्तमानाशी परत नाते जोडु पाहात आहेत ." रविकांतराव आपल्याच नादात सांगत होते . हे ऐकुन सर्वजण डोळे फाड्फाडुन त्या बुरुजाकडे पाहु लागले . अचानक त्यांना त्या बुरुजापाशी काही मानवी आकृत्यांची अंधुक हालचाल दिसु लागली . जणु काही तीन चार शिपाई मिळुन कुणा कडेलोटाची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला पोत्यात बांधत होते . नंतर त्या शिपायांनी ते पोते दरीत ढकलुन दिले . प्रवासी मंडळी आ वासुन हा प्रकार पाहातच राहिले. "मेलो , मेलो ... वाचवा .. वाचवा " परत सर्वांना जीवघेणी किंकाळी ऐकु आली . सर्वांचीच भीतीने वाचा बसली. आपल्या भीतीदायक बोलण्याने शहरी मंडळी घाबरली आहेत हे रविकांतराव यांच्या लक्षात आले . तेव्हा ते थोड्या मवाळ आवाजात , समजुतीच्या सुरात म्ह्णाले . "मंडळी तुम्ही सर्व़जण शहरातले , तुम्हाला या सर्व वंदंता , दंतकथा वाटत असतील . आमचे बोलणे तुम्हाला कदाचित अतीरंजीत वाटत असले तरी तुमच्या सुरक्षिततेसाठीच आम्ही सांगु की , तुम्ही या तटबंदीवर रात्रीच्या वेळी शक्यतो जाऊ नका . " "रात्रीच्याच वेळी काय आम्ही तर आता तिथे दिवसाही जाणार नाही ." शहरी पाहुणे मनात पुटपुटत होते . अचानक सर्वांना लांबवरुन कसल्यातरी गाण्याचे शब्द ऐकु आले . कोणीतरी अत्यंत विचीत्र , जीवघेण्या आवाजात गाणे म्हणत गढीबाहेरुन कुठेतरी जात होते . त्या किळसवाण्या भीतीदायक आवाजाने रात्रीच्या थंडीतही सर्वांच्या अंगावर काटा आला . कोण गात आहे , का गात आहे हे काहिच समजायला वाव नव्हता .गाण्याचे शब्दही भलतेच अर्थहिन होते . "नदीच्या पल्याड , दरीच्या अल्याड काळोख्या अंधारी , लपलं कोन रं कोन रं कोन रं , कोन रं कोन रं " " हे .. हे कोण .. कोण गाणं म्हणते आहे ? " एकाने कसाबसा धीर एकवटुन प्रश्न केला . रविकांतरावांचा चेहरा थोडा गंभीर झाला. सांगावे की न सांगावे असा मिनीटभर विचार करुन ते शेवटी बोलु लागले . "मंडळी , या गाण्यापाठीमागेही एक घटना , वदंता आहे . सुमारे शंभर वर्षांपुर्वी या गढीमधील सरदार विसाजीराव दिठेरीकर हे एकदा दिठेरीदेवीचे मंदिरातुन दर्शन घेउन गढीकडे येत असताना वाटेतील जंगलामध्ये त्यांच्यावर काही हितशत्रुंनी हल्ला केला . सरदार विसाजीराव हे त्या हल्ल्यामधे मारले गेले असे म्ह्णतात . पण त्यांचा मृतदेह खुप शोधुनही कधीच सापडला नाही . पुढे काही दिवसांनी ते हितशत्रुही एकामागुन एक असे अचानक मारले गेले ." "त्यानंतर अनेक वर्षांनी गावातील काही जणांनी सरदार विसाजीराव यांना गढीवरील बाहेरील तटबंदींवर चढताना पाहिले . ते त्या तटबंदींवर खुप विचित्रपणे आपले हात पाय लांब करुन चढत होते . त्यांचे सर्व शरीर , कपडे हे रक्ताने माखलेले होते . चेहरा तर कुठल्याही कोनामध्ये , अंशामध्ये फिरत होता . हा सर्व अमानवी प्रकार पाहुन खुपजणांना धक्काच बसला . ते वेडेच झाले . आजही असे बरेच जण वेड्यासारखे रात्री अपरात्री गढीच्या आजुबाजुला अर्थहिन गाणी म्हणत भटकत असतात . दिवसा हे लोक कुठे तरी रानात , दरी कपारींमध्ये दडलेले असतात . त्यांना आपल्या जीवाचीही पर्वा नसते. " "आपल्यालाही आज येताना यांतलाच एक वेडा भेटला होता . तरीच त्याने दरीत उडी मारली " पाहुण्यांनी एकमेकांकडे पाहात हळुच सांगितले . त्यांना आता त्या वेड्याच्या वागण्याचा उलगडा झाला होता . रविकांतरावांनी सर्वांना आता दिवाणखान्यातील दुसरीकडच्या गवाक्षात बोलावले . त्या गवाक्षातुन बाहेरील बगिचा दिसत होता . बागेच्या पुढेच एक प्रशस्त दगडी चौथरा होता . तिकडे बोट दाखवुन रविकांतराव सांगु लागले . "मंडळी , हा जो दगडी चौथरा आहे . तिथे अनेक गुन्हेगारांना अग्नीदंडाची शिक्षा दिली जात असे . या अपराध्यांना अग्नीमधुन चालत जावे लागत असे . अनेक अपराधी आगीचे चटके सहन न होऊन जोरजोरात आक्रोश करत असत ." परत सर्व पाहुणे घाबरुन त्या ठिकाणी पाहु लागले . त्यांच्या डोळ्यांसमोर परत आगीच्या ज्वाला नाचु लागल्या . कानावर त्या अपराध्यांचे आक्रोश येऊ लागले . भीतीने सर्वांनी डोळे मिटुन घेतले . कान झाकुन घेतले . पाहुण्यांची अवस्था ध्यानात येऊन रविकांतरावांनी परत सर्वांना समजुतीच्या सुरात सांगितले . "मंडळी , कधी कधी भुतकाळातील आवाजांचे , घटनांचे प्रतिध्वनी परत वर्तमानात घडत असल्याचे दिसुन येते . खरे खोटे कोण जाणतो ? तरीही आम्ही तुम्हाला तुमच्या सुरक्षिततेसाठी हेच सांगु की , तुम्ही रात्रीच्या वेळी हा चौथरा टाळावा ." सर्व मंडळींनी समजुतीने मान डोलावली . नसते धोके पत्करण्याची कुणाचीच तयारी नव्हती . अचानक गढीबाहेरुन दुरवरुन परत सर्वांच्या कानावर एक अर्थ न समजणारे गाणे ऐकु आले . सर्वांच्या अंगावर भीतीने काटा आला . कुणीतरी अमानवी , भीतीदायक आवाजात गात होते . " आगीच्या धगीत , वारयाच्या तोरयात रानच्या चाकोरी , चालतं कोन रं कोन रं कोन रं , कोन रं कोन रं " "असाच कोणीतरी वेडा बाहेर दरी कपारीतुन भटकत असेल . तोच गाणे गात आहे ." रविकांतरावांनी खुलासा केला . "तर मंडळी , आम्ही आता आपला जास्त वेळ घेत नाही . आमचीही तब्येत फारशी बरी नसते . तरीही परत आम्ही तुमच्या भल्यासाठिच सांगु इच्छितो की , या गढीमध्ये अनेक ठिकाणी , अगदी या दिवाणखान्यामध्येही अशा अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत की त्यांचे खरे खोटे आभास आजही घडत राहतात . कुणाला ते जाणवतात तर कुणाला नाही . " "हो सरदारसाहेब . आलं लक्षात . आम्ही रात्रीच्या वेळी आमची रुम सोडुन गढीमधे कुठेही फिरणार नाही ." एका प्रवाशाने रविकांतरावांचे वाक्य तत्परतेने पुर्ण केले . वर्गातल्या विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर शिक्षकांना जसा आनंद होतो , अगदी तसा आनंद रविकांतरावांच्या मुखावर आला . "ठिक आहे मंडळी . आपणांस भेटुन बरे वाटले . आता आम्ही आपली रजा घेतो . आम्हाला विश्राम कक्षात गेले पाहिजे " असे म्हणुन रविकांतराव शांतपणे हॉलच्या आतील भागातील जिना सावकाश चढुन विश्राम कक्षात निघुन गेले . जाताना सर्व प्रवाशांनी अदबीने ऊठुन त्यांना त्रिवार कुर्नीसात केला . रविकांतरावांच्या व्यक्तीमत्वाने , बोलण्याने सारेच भारावुन गेले होते . त्या भारावलेल्या अवस्थेतच सारेजण दिवाणखान्यात बसुन राहिले . पाच ते दहा मिनीटांत बाहेर गाडी थांबल्याचा आवाज ऐकु आला . गाडीमधुन उतरुन कारेकर घाईघाईने चालत दिवाणखान्यात आले . पाठीमागे त्यांचे मदतनीस व काही इतरजण उतरले . कारेकरांनी भराभरा खुलासा केला . "मंडळी , तुम्हाला इथे दिवाणखान्यामध्ये तासभर तिष्ठत राहावे लागले यांबद्दल माफ करा . मी दिठेरी गावातील केटरींग एजन्सीला डिनरची व्यवस्था सोपविली होती . त्यांच्यावर देखरेख करायला मी गावामध्ये गेलो होतो . ज्या माणसाला आज मी इथे आठ वाजता तुम्हाला गढीची माहिती देण्यासाठी बोलावले होते , त्याचा मी गावात असतानाच निरोप आला की तब्येत बरी नसल्याने आज तो येऊ शकत नाही . मी तुम्हाला हे कळवण्यासाठी गावातुन खुपदा फोन केला पण नेटवर्कमधे बिघाड असल्याने फोन लागु शकला नाही . तुमचे डिनर तयार आहे . आम्ही दहा मिनीटात ते सर्व्ह करु . आपण सर्वांनी डायनींग रुममध्ये जमावे . या गढीची माहिती उद्या तो माणुस तुम्हाला देइल . " सगळे प्रवासी हसत एकमेकांकडे पाहु लागले . एक ज्येष्ठ प्रवासी कारेकरांना हसतमुखाने म्हणाला . "काय कारेकर , तुम्ही आमची चेष्टा करता काय ? तुमचा तो खास माणुस अगदी ठरलेल्या वेळी आला . त्याची तब्येत बरी नसतानाही त्याने आम्हाला या गढीचा इतिहास ,सरदार दिठेरीकर घराण्याचा ईतिहास अगदी रंगवुन सांगितला . तेही इतके मनापासुन की या घटना जणु समोर घडत आहेत असाच आम्हाला भास झाला . आम्हाला माहिती सांगुन ते वरील मजल्यावर विश्राम कक्षात गेले . आम्हाला तुमचेही आभार मानले पाहिजेत . तुम्ही प्रत्यक्ष सरदार दिठेरीकर घराण्यातील वंशज रवीकांतराव दिठेरीकर यांनाच आमच्यासाठी बोलावले. तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे " कारेकर हे सर्व बोलणे ऐकुन गोंधळुन गेले . त्यांच्या कपाळावर आठ्या चढल्या . ते सर्वांना म्हणाले . "पण ..पण हे कसे शक्य आहे ? मी ज्यांना आठ वाजता बोलावले होते त्यांचे नाव प्राध्यापक देशमुख आहे . ते दिठेरी गावात राहतात . आणी दोन वर्षांपुर्वीच जीवनराज ट्रॅव्हल्सने सरदार दिठेरीकर कुटुंबाकडुन सर्व कायदेशीर बाबी पुर्ण करुन हि गढी विकत घेतली . गेली दोन वर्षे इथे रिनोव्हेशनचे काम चालु होते . तेव्हापासुन इथे फक्त वॉचमन आणी जीवनराज ट्रॅव्हल्समधले मदतनीस असतात . बाकी कोणी राहात नाही . सरदार दिठेरीकरांचे वंशज तर दोन वर्षांपुर्वीच हे गाव सोडुन निघुन गेले . आणी सरदार रवीकांतराव दिठेरीकर यांचा तर तीन वर्षांपुर्वीच देहांत झाला . " आता सगळे प्रवासी गोंधळले . तरीही त्यांना कारेकरांचे सांगणे पटत नव्हते . एकजण परत म्हणाला . "पण मग आम्हाला ज्यांनी माहिती दिली ते कोण होते ? त्यांनी किती चांगली माहिती दिली . त्या तसबिरीच बघाना . हे सिधोजीराव दिठेरीकर ... यांनी खुप मोहिमा गाजवल्या . ते गणोजीराव .. ते गोविंदराव .. अरेच्चा ..हे काय हा फोटो तर मगाशी दिसत नव्हता ? हा कुठुन आला ?" त्या भिंतींवरील तसबिरींकडे पाहताना तो एका तसबिरीकडे चकीत होउन बोट दाखवत होता . बाकीचेही सगळेजण ती तसबीर पाहुन आवाक झाले . कुणालाच काहि बोलता येईना . जी तसबीर तासाभरापुर्वी धुसर दिसत होती . ती आता चांगली स्पष्ट दिसत होती . त्या तसबिरीमध्ये प्रत्यक्ष सरदार रविकांतराव दिठेरीकर रुबाबात उभे होते . त्यांची करारी नजर जशी काही या मंडळींवरच रोखलेली होती . सर्वजण चकीत होउन तसेच उभे होते . सर्वांच्या हातापायातले बळच या धक्क्याने निघुन गेले होते . त्याचेवेळी दुरवरुन त्यांना एका गुढरम्य गाण्याचे बोल ऐकु येत होते . कुणीतरी थंड , आसुरी आवाजात गात होते . "हि कुनाची जादु रं , हि कुनाची माया रं खेळ ह्यो ठावं ना , खेळतं कोन रं कोन रं कोन रं , कोन रं कोन रं " --------------- क्रमशः --------------------- काल्पनीक ------------------
  • Log in or register to post comments
  • 4936 views

प्रतिक्रिया

Submitted by आतिवास on Sun, 05/22/2016 - 20:04

Permalink

रोचक कथानक आहे. वाचते आहे.

रोचक कथानक आहे. वाचते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by महामाया on Sun, 05/22/2016 - 20:52

Permalink

एकटाकी लेखन...

धाराप्रवाही लेखन, सुरवातीपासून मस्त मूड जमलाय... तो जपला देखील आहे... पुढील भागाबद्दल मनांत उत्सुकता आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 05/22/2016 - 21:19

Permalink

हा भागही आवडला.

हा भागही आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 05/22/2016 - 21:19

Permalink

हा भागही आवडला.

हा भागही आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Sun, 05/22/2016 - 21:41

Permalink

बापरे!!! मस्तं.

बापरे!!! मस्तं.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 05/22/2016 - 22:10

Permalink

भारी रंगवलंय!

भारी रंगवलंय!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 05/23/2016 - 01:15

Permalink

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Mon, 05/23/2016 - 08:53

Permalink

पकड घेत आहे.. आन्दो..

पकड घेत आहे.. आन्दो..
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 05/23/2016 - 09:07

Permalink

अत्यंत उत्कंठावर्धक...

अत्यंत उत्कंठावर्धक... पुभाप्र...
  • Log in or register to post comments

Submitted by नेत्रेश on Mon, 05/23/2016 - 10:34

Permalink

जबरदस्त

एकदम खीळउन ठेवणारे लिखाण पूभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Mon, 05/23/2016 - 11:49

Permalink

मस्तच...

आवडले.. फक्त ते मुधोजी, रघुजीच्या भाऊगर्दीत रवीकांत नाव खटकले... :)
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Tue, 05/24/2016 - 14:16

In reply to मस्तच... by ब़जरबट्टू

Permalink

रविकांतराव हे

रविकांतराव हे मुधोजी, रघुजीच्या तुलनेत अलिकडच्या काळातले आहेत . त्यामुळे त्यांचे नावही अलिकडच्या काळातले आहे . धन्यवाद .
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 05/23/2016 - 12:00

Permalink

मस्त चालू आहे

सगळं !! मिपा नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 05/23/2016 - 12:03

Permalink

वाचतेय.पुभाप्र

वाचतेय.पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Mon, 05/23/2016 - 14:37

Permalink

भन्नाट लिहिताय. पु.भा.प्र!

भन्नाट लिहिताय. पु.भा.प्र!
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Mon, 05/23/2016 - 17:16

Permalink

सर्वांचे खुप आभार .

सर्वांचे खुप आभार .
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 05/23/2016 - 17:18

Permalink

छान लिहित आहात. आवडतेय

छान लिहित आहात. आवडतेय शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 05/23/2016 - 17:32

Permalink

भारी येउदे पुढचा भाग

भारी येउदे पुढचा भाग
  • Log in or register to post comments

Submitted by abhajoshi14 on गुरुवार, 05/26/2016 - 13:03

Permalink

भारीच

अंगावर काटा आला वाचून...एकदम सु शी ची आठवण झाली. सुहास शिरवळकर
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 05/26/2016 - 18:37

Permalink

रंजक... :)

रंजक... :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on Fri, 06/10/2016 - 17:39

Permalink

पुढचा भाग कधी ?

पुढचा भाग कधी ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com