✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सैराट आन सैराटच

अ
अभ्या.. यांनी
गुरुवार, 05/05/2016 - 15:37  ·  लेख
लेख
रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला. एकच फाइट वातावरण टाइटचे फ्लेक्स, तीनचाकी सायकलच्या बक्षीसाची अनाउंसमेन्ट, लोकल बिली बाउंडिंगला मॅचमधूनच घरी हाकलत नेणारी आजी, प्रिन्स लिहिलेली नंबरप्लेट, पितळी पिस्तुलाची चावी आणी पुढं तलवारीची नंबरप्लेट असलेली बुलेट वाजवित युवानेते आगमन केले आणि आमच्या हितलीच स्टोरी असल्याची खात्री पटली. म्याचमध्ये गरज असताना आपला हिरो पाणी हापसत हिरवीनीसमोर नजर लावून बसलेला. दिसायला देखणंय लका. पिक्चरपुरती बॉडी कमी केलीय म्हणा पण तब्येत केली तर हाय मटेरिअल हिरोचे. शेवटच्या ओव्हरीत मॅच जिकून देतय आणि बक्षीस घेतय गावचे भाग्यविधाते आणि सर्वेसर्वा पाटलांकडून. हापसताना जिच्यावर नजर लावली ती हेचीच पोरगी. अजून तर झलक नाही आली. पण स्कॉर्पिओतून उतरताना दिसलीच. मजबूत लका काम पण डोळे काय म्हणतोस. अगागागागा. पाटलाची लैच लाडकी लेक आर्ची बुलेट घेऊन कॉलेजात येतीय. हिरीत पवायलेल्या पोरांना नीट बाहेर हाकलून स्वतः पोरीना घेऊन उतरायचा थाट अंगात. तिच्याबी मनात हे कोळ्याचं परश्या भरतंय. परश्याच्या डोक्यात तर आर्ची सोडून काहीच नाही, नुसतं नाव ऐकलं तिचं तरी गडी सैराट सुटतोया. परश्याचे जिगर दोस्त म्हनावं तर दोनच. लंगडा प्रदीप आन गॅरेजवाला सल्ल्या. त्येंनी भरीस पाडून चिट्ठ्या बिठ्या प्रकरण होतंय. आता दोन्ही साइडनी ओके असतयच तवा लीड आटोम्याटीक आर्चीकडंच. शेतातल्या, फोनवरच्या गप्पातून जातीय फुलत ही स्टोरी. आर्चीच्या भावाच्या म्हणजे प्रिन्स च्या बड्डे पार्टीला हे तिघं जातेत झिंगाट नाचायला. काय राव थेटरातला जल्लोष. पोलीसानी दांडके मारुन पब्लिक पडद्यासमोरुन हाकललं तवा कुठं थांबलेला पिक्चर सुरु झाला. आर्चीच्या घरामागं एका बेसावध क्षणी दोघांना आर्चीचा बाप बघतो. कुत्र्यासारखा मार खाउन तिघे परत येतेत. प्रशांतरावांची उचलाबांगडी नीट करमाळ्याला. हिकडं रितीरिवाजापरमाणं आर्चीला बघायला पाव्हणे आलेलेच. परिस्थितीचा अंदाज घेऊन आर्ची करमाळ्याला परश्याला भेटायला येती. तिथे काय सपोर्ट मिळत नसल्याने पळ काढतेत. पाटलाची माणसं जीव खाउन मागं असतेतच. परंड्याला पोलिसांकच्या तावडीत सापडून परत आणले जातेत. पोलीस स्टेशनात परश्या आणि त्याचा मित्रांवर रेप आणि किडनॅपचा चार्ज बसतोय हे कळाताच आर्चीला बापाचा मनसुबा कळतो. स्टेटमेंट फाडून बाहेर पडताच इकडे पाटलाकडून परश्याला जबरी मारहाण होत असती. जिगरीची आर्ची तेथून परश्याला घेऊन पळ काढती. खिशात पैसे नाही. कोन ओळखीचे नाही आशा अवस्थेत हैदराबादला पोचलेल्या दोघांवर यायची ती संकटे येतेतच. एकमेकाच्या साथीने निस्तरत एका भल्या बाईची पडती गाठ. फाटका का हुईना पण आसरा मिळतो. आक्खं आयुष्य थाटात काढलेल्या आर्चीला हे असलं गरीबीचं जगणं पेलवणं तर अवघड होतय पण ती मागं हटत नाही. कष्टात वाढलेल्या परश्याला ही असली जिंदगी सवयीची असली तरी आर्चीसारखा निखारा पेलवत नाही. बिनलग्नाचा सुरु झालेला संसार भांड्याला भांडे वाजवतोच. बारक्या सारक्यावरुन वाढलेल्या भांडणात आर्ची बापाच्या घराकडे परत यायला निघती. प्रवासात जाणवती ती संसारातल्या साथीची आन विश्वासाची किंमत. हिकडे गळ्याला फास लावून घ्यायला निघालेला परश्या थांबतो आन आर्ची परत येती. एकेक दिवस सरतो आन दोघांचे दिवसबी पालटतेत. डोश्याच्या गाडीपासून चांगली नोकरी मिळवणार्‍या परश्यासोबत आर्ची पण नोकरीत प्रमोशन मिळवीत जाते. कायदेशीर लग्न बिग्न केलेल्या ह्या दोघांत पिल्लू आकाशचे बी आगमन होते. हैद्राबादेत थाटात आक्टीव्हावर नवर्‍याला आणि मुलाला घेउन फिरणारी आर्ची सगळ्यात जास्त शिट्ट्या खाउन जातीया राव. . आता म्हणताल आक्खी स्टोरीच टाकली का देवा, तर पिक्चरमध्ये भावला हाच प्रामाणिकपणा. कुठंबी आडमाप नाही की काय हातचं राखलेलं नाही. स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अगदी १०० मार्काने बोर्ड फाडून पास ओ आमचा नागराज. अशी रियल्ल स्टोरी की भिडलीच पाह्यजे. आता कायजणांना नाय झेपली. नसंना का. अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्‍यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग... आन स्टोरी सांगताना जगावी तरी कीती ह्या माणसांनी? ती आर्ची, लका वर्गात परश्याला बघाया पळत येता येता थांबती तव्हा बघायचा चेहरा. काय असती हूरहूर, काय ती नजर. लाख रिटेक मारावे बॉलीवूडने पन अशी नजर आणावी. च्यालेंज है भौ. सजणाची स्वारी आली म्हणताना आलेली लाज, परत फिरती परश्याकडं तवा आलेली समज सगळं कसं आपल्या डोळ्यानं बोलती राव आर्ची. परश्या बी तसलच. कुठंच हिरोगिरी न दाखवता भिडतय मनाला. डोश्याच्या गाडीवर सराइतपणे वर हात टेकून डोसे मारणं असू दे की निर्दयी मार खाउन आलेला बावरलेपणा. सगळा कसा अस्सल. परशाच्या जानी दोस्त प्रदीप. लंगडं हाय पण दिमाग का दिमाग. आर्चीनंतर सगळ्यात जास्तीच्या शिट्ट्या घेतल्या की गड्याने. सल्ल्या बी परफेक्ट. गावागावात सापडतेत असले दिलदार जिगरयार. होतेत...... अगदी असल्या स्टोर्‍या प्रत्येक गावात होतेत. वय असतं ते. मार खाउन कुणी गप्प बसतं नायतर गाव सोडतं, कुणी जीवलगाचा हात धरुन पैलतीरी लागतं. प्रत्येक आर्ची परश्याच्या नशीबात येणारी स्टोरी हाय ओ. याड लागलेल्यांची स्टोरी सांगीतली मन लावून तवा तर कुठं समद्याना याड लागलं. ते म्हणतेत ना. जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय. आता ही सैराट स्टोरी कशी होतीया दिसतीच हाय ना.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
59588 वाचन

💬 प्रतिसाद (219)

प्रतिक्रिया

लआ लाऊ लौ लाऊ लअ‍ॅ ब्वऑब्वॉ

वपाडाव
Fri, 06/10/2016 - 10:34 नवीन
करेक्ट.. इथे (पुणॅ-मुंबैत) वाढलेल्यांना हा जवळचा वाटत ब नसेलही... पण लहान गावातुन/शहरातुन इथे आलेली मुले थेटरात गर्द्या करत आहेत. म्हणुन त्या सिनुमाला शहरात इतका रिस्पाँस मिळत होता. फ्यांड्री तर मी मझ्या इन-लॉ समवेत पाहिला. झोप्ले होते दोघेही. अगम्य भाव होते त्यांच्य चेहर्‍यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सैराट अन फ्याण्ड्री - येट नाट शीन

वपाडाव
Mon, 06/13/2016 - 17:15 नवीन
धिस इज नाट एक्स्पेक्टेड फ्राम यु बटमण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शहरातले लोक असे नव्हे तर

शैलेन्द्र
Fri, 06/17/2016 - 14:36 नवीन
शहरातले लोक असे नव्हे तर ज्यांच आता ग्रामीण भागात काहीच मूळ राहिलेलं नाही त्यांना हा चित्रपट नाही आवडला, दुसरं निरीक्षण म्हणजे कोकणातल्या लोकांचा या प्रकारच्या संस्कृतीशी परिचय नसल्याने त्यांनाही नाही आवडला, सैराट हे कॅप्सूल नसलेलं कडवट औषध आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म. हे शक्य असावे.

अभ्या..
Fri, 06/17/2016 - 14:47 नवीन
हम्म. हे शक्य असावे. इथेच जाणवले मला ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

रोचक

प्रसाद गोडबोले
Fri, 06/17/2016 - 15:06 नवीन
सैराटने काय घोडे मारले?
ती आर्चि आणि परश्या बसलेले घोडे जिवंत आहे की मेले कि पाटलानं मारलं हे आता तपासुन पहायला पाहिजे !! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छे छे. मी इन जनरल म्हटले आहे.

अप्पा जोगळेकर
Fri, 05/06/2016 - 00:39 नवीन
छे छे. मी इन जनरल म्हटले आहे. तुम्हाला उद्देशून नाही. कदाचित तुम्ही दिलेल्या उपप्रतिसादाला स्पा ने जे उत्तर दिले त्यावर कमेंटल्यामुळे तुम्हाला तसे वाटले असेल. तरी एक डाव माफी करावी. आणि त्या इन जनरल चा माझ्याकडे विदा वगैरे नाही. पण एकंदरच 'बालगंधर्व' चित्रपटाचा होता तसाच कंठाळी प्रचार वाटला. बस इतकेच. बाकी प्रत्येकाची भक्ती निरनिराळी. त्याचा आदर आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

बरे झाले बालगंधर्वचा उल्लेख

तर्राट जोकर
Fri, 05/06/2016 - 00:50 नवीन
बरे झाले बालगंधर्वचा उल्लेख केला ते. तो प्रचार कंठाळी वाटण्याचं कारण कदाचित नटरंग हा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर नव्या दिग्दर्शकाचा दुसरा चित्रपट म्हणून हाईप झाली म्हणून असेल. असंच फॅन्ड्रीमुळे सैराटचे झाले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सैराटची पद्धतशीरपणे

मृत्युन्जय
Fri, 05/06/2016 - 11:38 नवीन
सैराटची पद्धतशीरपणे प्रसिद्धी चालवली आहे मालक. हा जातीपातीचा मुद्दा देखील त्या प्रसिद्धीचा भाग असावा अशी शंका यायला लागली आहे कारण टाइमपास प्रदर्शित झाला तेव्हा असल्या काही चर्चा झाल्या नव्हत्या. फँड्रीच्या वेळेसही नाही. मग आताच कसा मुहुर्त साधला? असो. चित्रपट प्रसिद्धीचा एक भाग म्हणुन सोडुन द्यावे. अन्यथा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच त्याची एवढी हवा व्हावी हे न समजण्यासारखे आहे. खानत्रयींपैकी एखाद्याचा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी जशी हवा निर्माण होते त्यापेक्षा जास्त हवा निर्माण केली गेली. तशी तगडी स्टारकास्ट असली असती तर गोष्ट वेगली. तसे नसल्याने चित्रपटाची इतकी जास्त हवा आकलनाच्यापलीकडे आहे. त्यामुळेच मार्केटिंग जबरदस्त केले आहे असे म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

झी तर्फे तसे अधिकृत माहिती न

तर्राट जोकर
Fri, 05/06/2016 - 15:10 नवीन
झी तर्फे तसे अधिकृत माहिती न आल्या मुळे विशिष्ट जातींचा मुद्दा सोशल मिडियावर कुणी आणला ह्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. निगेटीव पब्लिसिटी हा आजकालचा फंडा आहेच. ब्रिगेडी तत्सम लोकांना पैसे देऊन विरोधी प्रतिक्रिया द्यायला लावून चित्रपटाबद्दल चर्चा घडवून आणणे हे जाणून बुजून केल्याचे अंदाज आपण लावू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

वर अभ्या आणि तत्सम मंडळींनी

स्पा
Fri, 05/06/2016 - 07:24 नवीन
वर अभ्या आणि तत्सम मंडळींनी ती काढलेलिच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सोनवणी आजोबा का पेटलेत

खटपट्या
Fri, 05/06/2016 - 02:53 नवीन
सोनवणी आजोबा का पेटलेत
त्यांचं सोडा हो. त्यांचा लेख मी वाचला. नागराजने कींवा अन्य कोणीही हा सिनेमा जातीपातीच्या विरोधात आहे किंवा नाही असा काहीच प्रचार केला नाही. पण ते लेखात प्रत्येक प्रसंग आणि शेवट जातीशी रीलेट करु पहात आहेत. का ते कळत नाही. चित्रपटामधे बटबटीत जातसंघर्षाचे प्रसंग असतील अशा आशेला तडा गेलाय बहुतेक... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अगदी अगदी. =))

तर्राट जोकर
Fri, 05/06/2016 - 03:03 नवीन
अगदी अगदी. =)) हवं ते मटरेल मिळालं नसेल कदाचित. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

थोरांचे चरणस्पर्श झालेत

वैभव जाधव
गुरुवार, 05/05/2016 - 22:06 नवीन
थोरांचे चरणस्पर्श झालेत धाग्याला. २०० करणार! अभ्या आता तू पार्टी द्याची. ;)
  • Log in or register to post comments

माज

५० फक्त
Fri, 05/06/2016 - 01:17 नवीन
अभ्या, लै भारी लिहिलंस रे...तुला मला जास्तच जवळचा पिच्चर... पुर्वार्ध - माज आणि माज, पैशाचा,सत्तेचा आणि तारुण्याचा माज अतिशय व्यवस्थितपणे दाखवला आहे नायिकेनं पेश्श्ल - मी कुटं म्हणलं आवडलं नाय असं.. उत्तरार्ध - हल्ली जे हिंदित डब केलेले सौथ इंडियन चित्रपट असतात ना त्याच पावलावर आणि बराच लांबवलेला लक्षवेधी भुमिका - हैदराबादेत भेटलेली मराठी अम्मा शेवट - लैच फसलेला, दोन चार वर्षे दुनियेत टक्के टोणपे खाल्लेली पोरं आपल्या जिवावर उठलेल्यांवर डिंकाच्या लाडवासाठी विश्वास ठेवतील हे पटत नाही.. भारी मेकप - पोरीचा बाप आधीचा आणि नंतरचा सभेतला.. काही प्रश्न - शेवटी आनिचं काय झालं ? बुलेट बटण स्टार्ट असताना किका का मारतेत सगळे जण ? हिरो हिरोइन रेल्वेत चढतेत कशी? परश्या एवढी वर्षे घरी कॉटॅक्ट करतो का नाही ?
  • Log in or register to post comments

थेटरच वातावरण नीट कळलं. छान

वीणा३
Fri, 05/06/2016 - 01:23 नवीन
थेटरच वातावरण नीट कळलं. छान लिहिलंय मला गाणी youtube वर बघून सगळी आवडली, कॅमेरा वर्क मस्तच झालंय. पण शेवट वाईट आहे हे ऐकल्यावर मी मूवी बघणं शक्य नहिये.
  • Log in or register to post comments

जबरी!

फारएन्ड
Fri, 05/06/2016 - 04:42 नवीन
जबरी लिहीले आहे. सैराट च्या मी वाचलेल्या रिव्यू/परीक्षण्/समीक्षण जे काय असेल त्या सर्वात हे जास्त आवडले. आता पिक्चर पाहताना यातील वर्णने आठवतील :). पिक्चर पाहायचा आहेच, आता इंटरेस्ट आणखीनच वाढला. फक्त एकच सांगतो - ज्यांना नसेल आवडला त्यांना न आवडू दे. त्यातल्या अनेकांचे चष्मे असतील. पण सर्वांचेच नसतात, काहींना नाहीच आवडत. जाउदे. त्यांना एकाच गटात ढकलू नका.
  • Log in or register to post comments

मस्त मनापासुन लिहिलय

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 05/06/2016 - 11:08 नवीन
अभ्या भाऊ सांगतायत म्हणजे नक्की चांगला असेल सिनेमा. दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात पाहिला जाईल. तो पर्यंत थेटर मध्ये नाचणार्या पब्लिकचा हा सिनेमा पाहून झाला असेल. पैजारबुवा
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Fri, 05/06/2016 - 12:46 नवीन
मी पण त्याचीच वाट पाहतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मी कालच बघितला...

संजय पाटिल
Fri, 05/06/2016 - 11:25 नवीन
मी कालच बघितला... मला तर आवडला. अगदी सामाजीक संदेश, कथा मुल्य.. वगैरे गोष्टी डोक्यात न घेता बघा. आजकालच्या इतर मराठी चित्रपटांपेक्षा कितीतरी भारी...
  • Log in or register to post comments

मी बघणार आाहे

स्वधर्म
Fri, 05/06/2016 - 11:57 नवीन
पण अाता त्याची इतकी प्रसिध्दी, चर्चा इ. झालीय की कोर्या मनाने पहाता येणार नाही. जातीयता इ मुळे गढूळ झालंय सगळं. अांम्ही शाळेत असताना एक दूजे के लिए अाला होता. तसा निखळ बघता येणार नाही ह्याचं दु:ख अाहे खरं, पण बघणार नक्की.
  • Log in or register to post comments

उत्तम परीक्षण. चित्रपट समोर

बाळ सप्रे
Fri, 05/06/2016 - 11:59 नवीन
उत्तम परीक्षण. चित्रपट समोर उभा राहीला. चित्रपट बघण्याची उत्कंठा वाढ्ली.
पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग...
म्हणून
झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय?
हे मात्र पटत नाही. चित्रपटगृहात उभं राहून अगदी पडद्यासमोर जाउन पोलिसांना बोलवावं लागावं इतका गोंधळ हे एक समाज म्हणून लाजिरवाणच आहे! आणि एक दोन ठीकाणी झालेल्या घटनांवरून स्फूर्ती घेउन सगळीकडे होत असेल तर चिंताजनकही आहे. आणि ह्या घटना म्हणजे चित्रपट/ गाण्यांच यश वगैरे आहे असं म्हणणं तर उथळपणाचा कहर आहे..
  • Log in or register to post comments

झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय ?

बबन ताम्बे
Fri, 05/06/2016 - 12:35 नवीन
आजच्या तरुणाईचा तो हक्क आहे. काय करणार. कुणीच आवरू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हक्क???

टवाळ कार्टा
Fri, 05/06/2016 - 12:50 नवीन
हक्क???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

हो मग ?

बबन ताम्बे
Fri, 05/06/2016 - 14:56 नवीन
त्यांना तो हक्कच वाटतो !! नाचणा-या तरुणाईला विरोध करून पहा काय होते ते. अगदी लग्नाच्या मिरवणूकीत बँजोवाल्याला पण फटके पडतात त्याने ते म्हणसतोवर आवडते गाणे वाजवले नाही तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

mumbai madhye adyap

सतीश कुडतरकर
Fri, 05/06/2016 - 14:22 नवीन
mumbai madhye adyap nachnyachi baatmi naahi.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मुंब्ईवाल्याना कोण विचारतो

कंजूस
Fri, 05/06/2016 - 16:03 नवीन
मुंब्ईवाल्याना कोण विचारतो.नाचा म्हणावं लालबागच्या राजासमोर कुणी अडवलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

एक नंबर

वैदेही बेलवलकर
Fri, 05/06/2016 - 12:19 नवीन
एक नंबर लिवलंय अभ्या दादा. पहिल्याच दिशी थेटरात बघितल्यापासून सैराट व्हाया झालंय. उद्याच्याला परत एक डाव बघायला जाणार हाय. खरं हे सैराटचं भूत मानेवरून उतरायला काय तयार नाय हाय बग.
  • Log in or register to post comments

सहमत. सैराटचं हे भूत उतरत

स्मिता_१३
Fri, 06/10/2016 - 11:26 नवीन
सहमत. सैराटचं हे भूत उतरत नाहिये. डोक्यातलं विचारांचं काहुरही कमी होत नाहीयें. या निमित्ताने अवती भवतीच्या भरडल्या चिरडल्ल्या गेलेल्या कहाण्या आणि कुटुंबं परत एकदा डोक्यात घुमताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदेही बेलवलकर

वरती डॉक म्हणाले त्याला सहमत

ईश्वरसर्वसाक्षी
Fri, 05/06/2016 - 14:06 नवीन
वरती डॉक म्हणाले त्याला सहमत "ज्याना आवडला नाही हा त्यांचा चोईस आणि ज्यांना तो आवडला ती त्यांची अभिरुची. त्याबद्दल एकमेकांवर टीका करावी असे मला वाटत नाही. " मि तरी टि.व्ही. वर आला तरी बघणार नाहि. 'सदमा' हा पहिल्यांदा पाहिला तेव्हाच पुर्ण पाहिला होता त्याचा शेवट त्यानंतर कधिहि बघितला नाहि उगा त्रास होतो.
  • Log in or register to post comments

खुप छान लिहीलं आहे. कालच

शिद
Fri, 05/06/2016 - 15:15 नवीन
खुप छान लिहीलं आहे. कालच सैराट सिनेमा पाहीला व आज लेख वाचताना सगळा सिनेमा जश्याच्यातसा डोळ्यासमोर उभा राहीला. "वास्तववादी" मराठी चित्रपट सगळ्यांनी एकदा जरुर पहा.
  • Log in or register to post comments

सिनेमातलं वास्तव, इकडे वाद

वैभव जाधव
Fri, 05/06/2016 - 19:21 नवीन
सिनेमातलं वास्तव, इकडे वाद आणि वादी! एक टेम्पो आणा रे च्यायला.... समद्यास्नी घालू आनि न्हिऊ तकडं हिरीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

बास बास पटलं शेठ. हेच आणि

इष्टुर फाकडा
Fri, 05/06/2016 - 19:50 नवीन
बास बास पटलं शेठ. हेच आणि असंच वाटतंय ट्रेलर बघून. 'आताच बया का' मधल्या आर्चीबद्दल सुद्धा हेच म्हणायचंय. लोकांना 'शेवट असा का केला' हा प्रोब्लेम असणं मज्जेशीर आहे. तुम्हाला हवंय ते देणं आणि तुम्हाला सिनेमावर विचार करायला लावणं यात फरक आहे. तुम्हाला हवंय ते दिल्यानंतर तुमचे विचार बंद होतात आणि कलाकृती खालावते हे माझे मत. नागराज म्हणूनच महत्वाचा आहे कारण प्रेक्षकांना 'काय बघायचं' याचं 'वळण' लावण्याची क्षमता त्याच्यात आहे ! त्याच्यात त्याच्या ष्टोरीशी प्रामाणिक राहूनसुद्धा प्रेक्षकांना खेचण्याची ताकद आहे, ती तशीच राहावी. प्रत्येकाची आवड असते हि गोष्ट खरीच पण फक्त चान चान देणारे बाकीचे सिनेमे आहेतच कि. नागराज चे यश, 'हि माझी गोष्ट आहे आणि ती दाखवली कि प्रेक्षक मिळतात' हे दाखवून देण्यात आहे.
  • Log in or register to post comments

अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन

सांजसंध्या
Sat, 05/07/2016 - 02:50 नवीन
अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. >>> क्या बात !
  • Log in or register to post comments

च्या मायला

एक एकटा एकटाच
Sat, 05/07/2016 - 06:18 नवीन
च्या मायला बघायलाच लागेल बहुतेक अभ्या....... लेखा सोबत एक टिकट पण दयायचस ना :-)
  • Log in or register to post comments

अभ्याभौ, जब्राट लिहीलंय!

उगा काहितरीच
Sat, 05/07/2016 - 08:45 नवीन
अभ्याभौ, जब्राट लिहीलंय! आत्तापर्यंत काही पाहिला नाही पण तुमचा लेख वाचून पहायला हवा असं वाटतंय . रच्याकने सगळी चर्चा वाचून मला एक प्रश्न पडलां, चित्रपटाला चित्रपट म्हणून का नाही बघू शकत आपण ? जस्ट करमणूकीचे साधन आहे पहा २-३ तास ऐंजॉय करा अन् द्या ना सोडून ! उगाच त्यात जातीपाती, लैच वास्तव आहे, लैच उथळ आहे , लैच खोल आहे. कशाला??? नसेल पहायचा तर नाही पहायचा एवढं काय त्यात ?
  • Log in or register to post comments

मलाही आवडला सैराट. शेवट कसा

अंतरा आनंद
Sat, 05/07/2016 - 08:55 नवीन
मलाही आवडला सैराट. शेवट कसा असावा, कोणत्या भागाला किती महत्व द्यावं हे सांगणारे महान आहेत. कोणतीही कलाकृती बघताना ती प्रेक्षकाला गुंगवून ठेवते, पडद्यावरचं वास्तव वाटायला लावते हे महत्वाचं. त्या दृष्टीने सैराट कित्येक मराठीच काय, बॉलिवुडपटांपेक्षादेखील सरस आहे. खरंतर त्या अर्थानं चित्रपटात जातीसंघर्ष नाही. मला सर्वात जाणवली ती नायिकेमध्ये असणारी धमक. आणि सर्व फिल्मभर तीच आहे. भलेही बिन्धास हिरॉईन्स याआधी दाखवल्या गेल्या असतील, पण त्या बेगडी वाटाव्या अशी ट्रिटमेंट दिलेली असते. वास्तवाची जाणिव असणारा हिरो आणि ती नसूनही वास्तवाला धिटाईने पुढे जाणारी ही नायिका म्हणजे लाजवाब आहे. स्त्री आणि पुरुष या जातींनी परस्परांची समजली जाणारी स्वभाव वैशिष्ट्ये आपल्यात मुरवली की होणारी जादू अतिशय सुंदरपणे सिनेमात चित्रीत झाली आहे. आपल्या जाणिवांशी प्रामाणिक रहाताना आलेल्या प्रसंगाला निडरपणे तोंड देणारी नायिका आणि प्रसंगी पुरुषपणा जागा झाला तरी कोमलपणा जपणारा नायक याचा जबरदस्त कॉम्बो यात आहे. शेवटही एखादा प्रसंग अंगावर न येताही अस्वस्थ करुन सोडणारा कसा होऊ शकतो याचा नमुना. बहुतेक दोन्ही बाजूच्या जातीयवाद्यांना मसाला न मिळाल्याने ते फारच निराश झालेले दिसतायत. ऐनवेळेला जायचं ठरवल्याने मी हा सिनेमा कधी नव्हे तो स्टॉलमधे बसून पाहिला. आजूबाजूच्या गर्दीचा चेहरा बघून आपल्याला काही धड बघता येणार नाही असं वाटलेलं. परंतू सुरुवातीच्या प्रेमप्रसंगातला शिट्यांचा गजर सोडता कोणत्याही आक्षेपार्ह कॉमेंट ऐकू आल्या नाहीत. उत्तरार्धात तर अतिशय शांतता होती. शेवटीही लोकं शांतपणे बाहेर पडत होते. समीक्षकांपेक्षा आम पब्लिक जास्त शहाणं असल्याचं हे चित्र या चित्रपटाच्या निमित्तानं दिसलं, ते सुखद होतं.
  • Log in or register to post comments

व्वा! आवडला प्रतिसाद.

तर्राट जोकर
Sat, 05/07/2016 - 11:22 नवीन
व्वा! आवडला प्रतिसाद. शब्दाशब्दाशी सहमत. मलाही हेच लिहायचं होते पण इतकं सुंदर जमले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद

सुंदर प्रतिसाद अंतरा.अभ्याचे

अजया
Sat, 05/07/2016 - 18:20 नवीन
सुंदर प्रतिसाद अंतरा.अभ्याचे परीक्षणही मनापासून आलेलं जाणवतंय. बघायला न मिळाल्याचे वाईट वाटत होते.पण आता सर्व परीक्षणं आणि चर्चा वाचून कदाचित जास्त उमगेल चित्रपट असं वाटतंय.पहिल्यांदाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

एक नंबर भारी प्रतिसाद. खूप

बॅटमॅन
Tue, 05/10/2016 - 01:15 नवीन
एक नंबर भारी प्रतिसाद. खूप आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद

अत्यंत घीसापीट्या ह्या स्टोरी

मानसी१
Sat, 05/07/2016 - 11:49 नवीन
अत्यंत घीसापीट्या ह्या स्टोरी मधे आवडण्या सारखे काय आहे ते मुळीच कळले नाही. हीरो हीरवणीच्या प्रेमाला घरुन विरोध, पळुन जाउन लग्न, व त्या नतंर बापांनी घातलेला खोडा. जात मधे आणायची अजीबात गरज नव्हती. दुख्खी एन्ड नविन म्हणावा तर तसेही नाही. अगदी कयामत से कयामत तक पासुन आत्ता आलेल्या रामलीला मधे तसाच अंत आहे. त्यामुळे ह्या पिक्चर ला पास.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/07/2016 - 11:51 नवीन
खरंय, अभ्याला कालपासून म्हणतोय चित्रपटात आवडण्यासारखं काय आहे ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानसी१

खरंच आहे डॉक, आवडण्यासारखं

तर्राट जोकर
Sat, 05/07/2016 - 12:11 नवीन
खरंच आहे डॉक, आवडण्यासारखं काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा खरा परतिसाद! :)

चांदणे संदीप
Sat, 05/07/2016 - 19:57 नवीन
माझ्यासारख्या अजून(ही) न पाहिलेल्यांचे पैसे वाचविण्यासाठी आलेला! =)) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानसी१

अभ्या तुझे लिखाण वाचून

बॅटमॅन
Sat, 05/07/2016 - 12:01 नवीन
अभ्या तुझे लिखाण वाचून उत्सुकता चाळवली गेलीय. अता पहावा लागेलसे दिसतेय.
  • Log in or register to post comments

सहमत

आतिवास
Sat, 05/07/2016 - 20:13 नवीन
सैराटमय लेखन आहे. फॅन्ड्री पाहताना नागराज यांचं वेगळेपण जाणवलं होतं. जानेवारी १६ मध्ये पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सैराट दाखवणार होते, पण रद्द झालं. या फेस्टिवलमध्ये चित्रपट क्षेत्रातली अनेक मंडळी सहज दिसतात आणि प्रेक्षकांशी बोलतात देखील. तेंव्हा नागराज यांच्य़ाशी सैराटबद्दल बोलायची संधी मिळाली होती. फॅन्ड्रीच्या यशानंतरही हा माणूस जमिनीवर आहे याची झलक तेंव्हा दिसली होती. सैराट पाहायचा तर आहेच, कधी योग येतोय ते बघायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जातीयता की पुरुषप्रधानता ?

तर्राट जोकर
Sat, 05/07/2016 - 20:17 नवीन
एक अनुभव चिटकव्तोय इथं. https://www.facebook.com/raj.asrondkar/posts/10205881532349729 जातीयता की पुरुषप्रधानता ? मला माझ्या घराजवळचं अलिकडचंच एक उदाहरण माहितीय. समाजातलंच प्रेमप्रकरण आहे. दोघेही बौध्द. मुलीच्या घरातून विरोध. मुलगा चांगला शिकलेला, चांगली नोकरी, चांगला पगार, स्वत:चं घरदार. विरोधाचं काही कारण नव्हतं. तरीही मुलीच्या बापाने व भावांनी मिळून दोघांना मारहाण केली. पोलिसांतही तक्रारी झाल्या. काही काळ गेला. दोघांना मूल झालं. एक दिवस मुलगी तिच्या माहेरघराजवळच्या दुकानात आली असता, तिच्या बापाने व भावांनी मिळून तिला लाथाबुक्क्यांनी मारली. विशेष म्हणजे, मुलीच्या भावाचं दरम्यानच्या काळात आंतरजातीय लग्न झालं होतं. पण त्याचा बहिणीवरचा राग गेला नव्हता. यात एकच कारण दिसतं. मुलीने मर्जीने लग्न केलेलं कुटुंबांच्या पचनी पडत नाही. हा पुरुषप्रधान माज आहे. दुसरं काही नाही. अशा घटनांचं आकलन नेमकं कसं करायला हवं ? कारण सैराट पाहून काढली जाणारी अनुमानं इथे लागू होत नाहीत. - राज असरोंडकर
  • Log in or register to post comments

शेवटी एकदाचा सैराट पाहिला.

रातराणी
Sun, 05/08/2016 - 12:10 नवीन
शेवटी एकदाचा सैराट पाहिला. नागराजचा फॅन्ड्री पाहिला नाहीये त्यामुळे पाटी कोरी होती. एवढी हवा झालीये सैराटची की चुकून एखाद परीक्षण वाचून स्टोरी आधीच कळली तर चीडचीड व्हायला नको म्हणून सक्तीचा सोशल मीडिया संन्यास घेतला आणि त्याचं चीज़ झालं! गाणी ऐकून आधीच वेड लागलेलं. कित्तीतरी दिवसांनी टाळ्या शीट्टीची मजा अनुभवली. सैराट तुम्ही पाहू शकतचं नाही. तो फक्त अनुभव करायचा आहे. एक एक फ्रेम एक एक अँगल असा सफाईदार आहे की जीव ओवाळून टाकावा. आर्ची आणि परश्या तर नंबर १ आहेतचं पण सगळीच्या सगळी कास्ट् इतकी तगडी आहे की कुणीही कुठेही अनावश्यक वाटत नाही. इतक्या बारीक बारीक गोष्टी टिपल्यात की मला काही वेळ स्वतःला सांगाव लागत होतं की आपण फक्त पिक्चर बघतोय. हे सगळं पडद्यावर आहे फक्त. गावातले वातावरण गजब कहर घेतलं आहे. पाटलाचं रानातल घर असंच असत अगदी सेम टू सेम. विहीरीत मुलं अशीच सूर मारून पोहतात. मित्राच्या प्रेमप्रकरणात मदत करणारे प्रदीप आणि सल्या असेच असतात. आर्चीला चिठ्ठी दिल्यावर तिच्या मागं पुढं करत मुद्दाम चिठ्ठी शब्द येईल असे बोलणारे, परश्याला मार पडल्यावर गप घरी जायचं सोडून पुन्हा त्याच्याशी बोलायला गेलेले अनेक सल्या याची देही याची डोळा पाहिलेत. जेवढी यांची मैत्री सच्ची दाखवली आहे तेवढीच आर्चीची न तिच्या मैत्रिणीची. प्रत्येक ग्रुप मधे एखादी अशी बंडखोर मुलगी असते आणि हिच्यामुळे आपण गोत्यात येऊ या टेन्शनखाली असणारी आनि असतीचं असती. वर्गात ओळख करून देताना काय आवडतं हे सांगताना मैत्रीनीला कोपरानी ढोसुन अजून काय ग असं विचारन, एखाद्या कमी मार्क वाल्या मुलाने मला वाचायला आवडत म्हणून सांगितलं की पिकलेला हशा आणि सगळ्यात हाईट म्हणजे आम्ही शाळेत खो खो खेळायचो तेव्हा आजुबाजुला घुटमळनारे अनेक होतकरू परश्या त्यानिमित्त डोळ्यासमोर येऊन गेले. ;) त्या वयात होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी इतक्या अस्सल दाखवल्यात की अनेक आर्ची आणि परश्या त्यांचा भूतकाळ पुन्हा जगले असतील. प्रेमी युगुलांचा फोनवर बोलताना हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जेवला का! तोही प्रसंग इतक्या खूबीने रंगवलाय की कुठेही शब्दबंबाळपणा न करता कळत जात की झालं आता ह्यांची विकेट गुल! आर्ची फुल ऑन बंडखोर आहे. पहिल्या भागात जेवढी आहे तेवढीच दुसऱ्या भागात. उगीच आता केलंय तर निस्तरायला पाहिजे म्हणून ती परश्याबरोबर रहात नाही. भांडण झाल्यावर आता मी घरी कशी जाऊ मला काय म्हणतील हा असला रडुबाइपणा करत न बसता तिच्यात पुन्हा परत जाण्याची धमक आहे. तीच्यातल्या "ती"ला ती पूर्ण चित्रपटात एकही क्षण गमावत नाही. तिच्या मनाने कौल दिल्यावरचं ती परश्याकडे परत जाते. आणि खऱ्या अर्थाने दोघे एकमेकांना समजून घेऊ लागतात! अनोळखी शहरात बसस्टॉपवर वाट पहात असताना माय सेफ्टी माय रेस्पॉन्सिबिलिटीचा झळकणारा बोर्ड अनेक शब्दांचे काम करून जातो. मी तर म्हणेन पूर्ण चित्रपटचं हा डोळे आणि कान सजग ठेऊनचं बघा. प्रेम कहाण्या काय कमी पाहिल्या असतील का आजपर्यंत पण कधीही हीरो हिरोइन आपल्या मातीतले नाही वाटले. इथले आर्ची आणि परश्या हे वेगळे वाटतंचं नाहीत. सदा न कदा मार खाणारा परश्या आणि त्याला सोडवत बसणारी आर्ची पाहून खरोखर एक क्षण म्हणावस वाटलं मॅन अप परश्या! पण पळून गेल्यावर तोच परश्या डोशाच्या गाडीवर काम करायला सुरवात करतो. रात्री घरी आल्यावर आर्ची तू कामाला जात जाऊ नको म्हणती तेव्हा असं दुसर्याच्या जिवावर जगणं बर दिसत का म्हणतो तेव्हा ओठावर आलेलं मॅन अप आतच रहात आणि नागराजने ज्या प्रकारे हे सेंसिबल केरक्टर डेवलप केलंय त्याला मी कोपरापासून दंडवत घातला! कमाल! लिहायला गेलं तर या पिक्चरची एकूण एक फ्रेम शब्दात मांडण्याएवढी सुरेख आहे! क्रीमच्या बिस्कीटा तल नुसतं क्रीम खाणारा छोटा मुलगा, बंड करून पळून आलेली, जीवावर उठलेले असूनही वडील किती चांगले आहेत हे सांगणारी आर्ची, पाहुणे पहायला आल्यावर विचारा की असं सांगताना पाटलांचा नरम झालेला आवाज, वाकळ शिवत बसलेली आजी, याचं आजीचा अजून एक शॉट आहे माशा मारल्याची ऍक्शन केल्याचा नक्की नमस्कार करतायत की माशा मारतायत हे न कळणारा पण मी खलास झाले तिथे. आजोबा गेल्यानंतर उतार वयात चिडचिड करणारी आणि तेव्हा असेच हातवारे करणारी आजी समोर आली आणि मी म्हणलं अरे काय हे! मला तर शंका आली की नागराज हा माणूस हजार डोळ्यांनी बघतो का काय माणसं! ज्यांनी कुणी अजून पाहिला नसेल त्यांनी फक्त एका गोष्टीसाठी बघा हा पिक्चर. खरेपणा. सच्चेपणा. काहीही खोटं मुलामा लावलेलं नाहीये यात. सुरवातीपासून ते शेवटापर्यंत फक्त आणि फक्त जे खरं आहे तेच दाखवलंय कोणताही आव न आणता. इथे थियेटरमधे झिन्गाट गाणं दोनदा लावल. एकदा खास नाचन्यासाठी आणि एकदा बघण्यासाठी. तसं तर आता पारायण झाली या गाण्याची पण त्या वातावरणात ते ऐकण्याची मजा काही औरच! पब्लिक फुल ऑन नाचल. शिट्ट्या वाजल्या. पण खरं सांगू तक्रार करावीशी किंवा ऑकवर्ड अजिबात नाही वाटलं. आमच्या इथलं पब्लिक काही लहान नव्हतं. सोमवार ते शुक्रवार मान मोडून पाट्या टाकून येणारे सगळे इंजिनेर लोक. त्यांना गणपती डान्स नाचताना बघून झकास वाटलं. असं पण व्हायलाच हवं ना कधी कधी. हा उथळपणा आहे असं म्हणतील म्हणणारे पण काही क्षण का होईना खांद्यावरचं समजुतीचं, समाजाच, बंधनाचं जोखड उतरून ठेऊन पाय थिरकले नाही तर तुम्ही मेले आहात! शेवटाबद्दल काही लिहणार नाही. पिक्चरमधे शेवटी काही संगीत नाही फक्त मूक आक्रोश आहे आणि तो तसाच आत आत टोचत जातो. बधीर करून सोडतो. त्याला शब्दात मांडण केवळ अशक्य आहे. टोटल रेस्पेक्ट फॉर नागराज!
  • Log in or register to post comments

+१

ब़जरबट्टू
Mon, 05/09/2016 - 16:49 नवीन
मस्त परीक्षण . आवडले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

+१०००००......................

NiluMP
Mon, 05/09/2016 - 21:36 नवीन
+१०००००..........................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

जबरदस्त

चाणक्य
Wed, 05/11/2016 - 16:42 नवीन
जबरदस्त प्रतिसाद रातराणी. एकच नंबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा