✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पहिली फ्लाइट . . . . . . जरा हटके

स
स्वीट टॉकरीणबाई यांनी
गुरुवार, 04/28/2016 - 10:13  ·  लेख
लेख
माझी मुलगी पुनव कमर्शियल पायलटचं शिक्षण घ्यायला मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यांच्या कोर्सच्या दरम्यान कुठलीशी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी मिळते. तशी तिला मिळाली. बरोबर शिकणारे इतर विद्यार्थी एकमेकांबरोबर प्रवासी म्हणून बसायला उत्सुक असतातच. पण तिनं ठरवलं होतं की तिची पहिली पॅसेंजर बनण्याचा मान तिच्या आईला (म्हणजे मला) द्यायचा. मलाही तिच्या ह्या निर्णयाचं कौतुक वाटलं. (मुली लहानपणीच घरातनं बाहेर पडल्या की त्यांच्या बद्दल वाटणारी काळजी आणि कौतुक, दोन्ही जरा निष्कारण अतीच असतं.) तिच्या क्रिसमसच्या सुट्टीत मी तिला भेटायला जाणारच होते. त्याप्रमाणे गेले. आम्ही तिच्या फ्लाईंग क्लबवर पोहोचलो आणि तिथल्या विमानांचा छोटा आकार बघून मी चरकलेच ! वारा नाममात्र होता तरी सगळी विमानं बांधून ठेवली होती आणि जागच्या जागीच हलत डुलत होती ! विमान हे दळणवळणाचं सगळ्यात सुरक्षित साधन असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं ती विमानंच वेगळी! इतक्या छोट्या विमानात बसण्याची माझी पहिलीच वेळ. पहिली आणि शेवटची. मी तिथल्या तिथे ठरवून टाकलं. असं म्हणतात सौंदर्य सापेक्ष आहे. खरं तर प्रत्येक गोष्टच सापेक्ष आहे. ज्या विमानांचे पुनवनं पाठवलेले फोटो मी कौतुकानं बघत असे, ती प्रत्यक्षात बघितल्यावर आकारानं मला आपल्या गावाकडच्या जत्रेच्या स्टुडिओत फोटो काढायला बनवलेली असतात तेवढी छोटी वाटली! पण चेहर्यावर भीती दाखवून चालणार नव्हतं. मी एक स्मितहास्य चिकटवलं आणि पुनवच्या मागोमाग नाखुषीनीच जायला लागले. विमान नेण्याआधी पायलटला कागदी घोडे नाचवावे लागतात. त्यात काहीतरी अडचण आली. शिवाय भयानक उकडत होतं. पुनवची चिडचिड झाली. मला आशेचा किरण दिसला! “अगं आज जाऊ दे. पुन्हा कधीतरी येऊ.” “छे छे! मी खूप दिवसांपूर्वीच बुक केलंय विमान. मिळणार कसं नाही बघतेच.” प्रत्येक स्त्रीला आपले हक्क स्वतःच मिळवावे लागतात. ते सहजासहजी मिळत नाहीत हे मी तिला नेहमीच शिकवत आले होते. ते उगीच शिकवलं असं क्षणभर वाटलं. पण मग स्वतःचीच लाज वाटली. शेवटी एकदाचं विमान मिळालं आणि आम्ही दोघी आत बसलो. “एखादी चक्कर मारू आणि लगेच लँड करू.” मी. चिकाटी माझ्या स्वभावातच आहे. “हॅह! दोन तासांकरता घेतलंय प्लेन.” पुनव. “दोन तास???” माझा आवाज मलाच ओळखला नाही. लगेच खाकरून सावरून घेतलं. खर्जात बोल, खर्जात बोल – स्वतःला बजावलं. स्त्रीहक्कांचा अतिरेक झालेला होता. “लांब भटकून येऊ. आणि कसलं हॉरिबल उकडतंय! पाच हजार फुटांवर बघ कसं थंड वाटतं ते.” पुनव. “ऑ!!!” मी विचार करण्याआधीच तोंडातून बाहेरच पडलं. उद्गारवाचक चिन्हांसकट. लांब? उंच? पाच हजार फूट? पाच हजार फुटांवर जायचं असेल तेव्हां मी माझी जाईन की महाबळेश्वरला. तो विचार आला आणि आठवलं की घाटात आमची गाडी गरम झाली म्हणून ‘आ’ वासून उभी ठेवायला लागली होती. विमानाचं इंजिन तर गाडीहून लहान वाटत होतं. कसं होणार! वर स्वीट टॉकर फोनवर म्हणणार, “तुला पुनवबरोबर भटकायला मिळतंय ना? यू आर सो लकी!” डोकं आणि काळीज यांच्यात वाद सुरू! “कशालाही न घाबरणारी तू, तुझी अशी अवस्था कशी झाली?” “ही एवढीशी मुलगी, तिची प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटी – अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी, ट्रेकिंग, स्वयंपाक, कपडे खरेदी, ड्रायव्हिंग - सगळ्यांमध्ये माझादेखील सहभाग असायचा. कधी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष. माझा अनुभव तिच्याहून प्रत्येक बाबतीत जास्त होता. ती देखील निर्णय घेताना माझ्या नाहीतर तिच्या बाबाच्या मताचा विचार करायची. आता ‘कॉकपिट’मध्ये तर माझा अजिबात उपयोग नाही. वर बर्यापैकी वजनच. आणि इथे तिनं घेतलेल्या निर्णयांवर आमच्या दोघींचे जीव अवलंबून! एकोणीस वर्षाची तर आहे. घेता येतील तिला अचूक निर्णय?” “तिच्या शिक्षकांनी तिला विमानाची पूर्ण जबाबदारी दिली आहे, ती तिची तयारी बघूनच ना?” “पाश्चात्त्य देशातल्या शिक्षकांचं काय? सोळा वर्षांपुढील मुलं म्हणजे मोठीच समजतात इकडे!” “प्रश्न वयाचा नाहीये. जरी विद्यार्थी तीस वर्षांचा असला तरी त्याची व्यवस्थित तयारी झाल्याशिवाय त्याला एकटा कधीच सोडत नाहीत. त्यातून पॅसेंजर घेऊन तर नाहीच नाही.” उफ्फ !! मन चिंती ते वैरी न चिंती! नशीब, पुनवचे ‘प्री-फ्लाइट चेक्स’ चालले होते. माझी घालमेल तिला लक्षातच आली नाही. माझी सीट बरीच खाली होती त्यामुळे मला बाहेरचं नीट दिसत नव्हतं. पण मला त्यात अजिबात रस नव्हता. कधी एकदा फ्लाइट सुखरूपपणे संपते याच्याचकडे डोळे लागलेले. टेक ऑफ करण्याआधीच! “आई, तू रिलॅक्स हो आणि मजा बघ.” “हो. हो. अगदी रिलॅक्स्ड आहे.” प्रश्न संपण्याआधीच उत्तर देऊन मोकळी झाले! मग लक्षात आलं, तिनं प्रश्न विचारलाच नव्हता. विधान केलं होतं. माझ्याही डोक्याला हेडफोन लावले होते. कंट्रोल टॉवरमधला ऑस्ट्रेलियन त्याच्या अगम्य इंग्रजीत काहीतरी बोलला. त्यात मला ‘गो, डिपार्ट किंवा बायबाय’ असे माहितीतले शब्द काहीच ऐकू आले नाहीत. पण पुनव म्हणाली, “ओके मॉम, लेट्स गो!” काहीतरी होऊन आमची फ्लाइट रद्द होण्याची उरलीसुरली आशा मावळली. विमान रनवेवर धावायला लागलं. भरपूर आवाज आणि थरथराट! आवंढा गिळायचा प्रयत्न केला; पण शक्य नव्हतं. तोंडाला भयंकर कोरड पडली होती. आता उडेल, मग उडेल, टेक ऑफच होई ना! दोघींचं मिळून वजन विमानाला फार तर नसेल झालं? मान न वळवता डोळ्यांच्या कोपर्‍यातून पुनवकडे बघितलं. ती आरामात होती. बहुदा माझाच वेळेचा आणि अंतराचा अंदाज चुकला असावा. शेवटी उडालं एकदाचं. तशी मी पटकन् सावरते. माझा श्वास चालू झाला, सीटमध्यी रुतलेली नखं बाहेर आली, पोटातला गोळा देखील कमी झाल्यासारखं वाटलं. अचानक विमान माझ्या बाजूला कललं! आता मात्र मी चटकन् मान वळवून पुनवकडे बघितलं. ती शांतच होती. तिनीच वळवलं असावं. आता मला माझ्या खिडकीतून नको तितकं दिसायला लागलं! माझ्या बाजूचं दार जर उघडलं तर मी सरळ खालीच की! समोर बघितलं तर क्षितिज तिरपं ताकडं. परमेश्वरा!! “आई, आपलं घर दिसतंय?” “कुठे आहे?” तोंडातून प्रश्न बाहेर पडला अन् लगेचच मूर्खपणाचा पश्चात्ताप झाला. मला नीट दिसावं म्हणून विमान आणखी तिरपं! मी खिडकीकडे तोंड करून डोळे घट्ट मिटून घेतले. नखं पुन्हा सीटमध्ये रुतली. “हो! हो! दिसलं दिसलं.” “केवढंस्सं दिसतंय ना! तरी आपण फक्त एक हजार फुटांवर आहोत.” पुनव. “तरीच मला दरदरून घाम फुटला आहे. नाही का? थंड तर पाच हजार फुटांवर वाटणार आहे!” असा विचार माझ्या डोक्यात आला आणि माझ्या विनोदाचं मलाच हसू आलं. मी डोळे उघडून पुनवकडे बघितलं. शांतपणे विमान चालवत होती. व्हील हलक्या हातात धरून बारीक बारीक अ‍ॅडजस्टमेंट्स हातांनी आणि पायांनी सहजपणे करत होती, मला अजिबात न कळणार्‍या इंग्रजीत कंट्रोल टॉवरबरोबर संभाषण करंत होती. मी तिच्याकडे पाहातिये हे लक्षात आल्यावर माझ्याकडे बघून हसली. दिव्याचं बटण दाबावं आणि अंधार खाडकन् नाहिसा व्हावा तशी माझी भीती गायब झाली. माझं मन क्षणात सोळा वर्षं मागे गेलं. पुनवच्या शाळेचा पहिला दिवस संपला होता. तिला घरी नेत होते. मी उजवीकडे होते. व्हीलवर. ती छोटुकली डावीकडे. नेहमी बडबडणारी आता मात्र काही बोलत नव्हती. तिच्या बालमनात काय चाललं असेल असा विचार मी करंत होते. आईनं एकदम अनोळखी लोकांत सोडलं म्हणून रागावली असेल का? का घाबरली असेल? मी तिच्या डोक्यावरून हात फिरवल्यावर माझ्याकडे बघून खुदकन् हसली होती. आजही आम्ही तशाच बसलो होतो. पण आज व्हील डावीकडे होतं. तिच्या हातात. मात्र हे व्हील माझ्यापेक्षा खूपच जास्त जबाबदारीचं होतं. हे हाताळायला जास्त कौशल्याची तर जरूर होतीच पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे, जर का चूक झाली तर त्याचे परिणाम जबरी असणार होते. पण त्याला तिची तयारी होती. माझ्या पाखराच्या पंखात बळ आलं होतं आणि हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. मी थांबवण्याआधीच दोन अश्रू खळकन् निखळलेच! ओठ घट्ट मिटून आवंढा गिळला. तिला दिसू नये म्हणून मी खिडकीतून बाहेर बघायला लागले. आता पाच हजार फुटांवरच काय, जर ती व्हीलवर असेल तर पाचही खंडांवर जायला मी तयार होते!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
विनोद
समाज
kathaa
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
16722 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

क्या बात हैं

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/28/2016 - 10:28 नवीन
हा अभिमानाचा प्रसंग आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या कन्येला खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मस्त

संजय पाटिल
गुरुवार, 04/28/2016 - 10:31 नवीन
हसता हसता एकदम काळजाला भिडनारं...
  • Log in or register to post comments

किती प्रचंड सुंदर लिहीलय!!!!!

पिलीयन रायडर
गुरुवार, 04/28/2016 - 10:32 नवीन
किती प्रचंड सुंदर लिहीलय!!!!! माझा मुलगा कविता म्हणण्याच्या स्पर्धेत पहिला आला तर मी दिवसभर आनंदात तरंगत होते!! तुमची मुलगी विमान चालवतेय हे बघताना तुम्हाला किती किती अभिमान वाटला असेल?!!!! फार फार आवडला हा लेख! आणि हो.. पुनव नावही खुप गोड आहे!
  • Log in or register to post comments

+१.

एस
गुरुवार, 04/28/2016 - 10:43 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मस्तच लिहिलंय, नात्याचे बंध

अभ्या..
गुरुवार, 04/28/2016 - 10:38 नवीन
मस्तच लिहिलंय, नात्याचे बंध खरच अनेकपदरी. मनापासून लिहिलेले मनाला भावतातच.
  • Log in or register to post comments

छान. खूपच छान.

आदूबाळ
गुरुवार, 04/28/2016 - 10:50 नवीन
छान. खूपच छान.
  • Log in or register to post comments

...

mugdhagode
गुरुवार, 04/28/2016 - 11:00 नवीन
हे खरे आहे की स्वप्न ?
  • Log in or register to post comments

कसलं सुरेख लिहिलंयत !!!!

वेल्लाभट
गुरुवार, 04/28/2016 - 11:01 नवीन
बापरे. इतकं सुरेख लिहिलंय हे तुम्ही की तुम्हालाही कल्पना नसावी. मनातले भाव, मधेमधे स्वत:शी केलेले संवाद, पुनवशी झालेले संवाद, सगळं इतक्या नाजुकपणे गुंफलंयत की धागा वाचता वाचता मलाही हवेत असल्यासारखं वाटत होतं. निव्वळ अप्रतिम. बाकी तुमच्या मनातल्या भावनांबद्दल काय बोलावं कळत नाही. पण तुम्हाला काय वाटलं असेल क्ल्पना करायचा प्रयत्न करतो. पुनवला आणि तुम्हालाही अशा अनेक भरार्‍यांसाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

खरच..

ब़जरबट्टू
गुरुवार, 04/28/2016 - 13:38 नवीन
निव्वळ अप्रतिम लिहिलेय... खुशखुशीत तरी शेवटी डोळ्याच्या कडा ओल्यावल्याच.. पुलेशु...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

+१ काय सुरेख लिहीलंय...!

खेडूत
गुरुवार, 04/28/2016 - 13:56 नवीन
+१ काय सुरेख लिहीलंय...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

सुरेख लिहीलंय...! +१११११

मोदक
Fri, 04/29/2016 - 12:06 नवीन
सुरेख लिहीलंय...! +१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

काय हिंदोळे....!!

असंका
गुरुवार, 04/28/2016 - 11:02 नवीन
काय हिंदोळे....!! जबरदस्त! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर लिहिलंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/28/2016 - 11:05 नवीन
भावनिक चलबिचल डोळ्यासमोर उभी राहीली. सुरेख शब्दचित्रण. मधेच असलेला खुसखुशीतपणा आवडलाच. जियो. कधी कधी प्रतिसादातही काहीच लिहु नये असं. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
गुरुवार, 04/28/2016 - 11:38 नवीन
उत्कृष्ट लेखन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अप्रतिम सुंदर अभिव्यक्ती !

सस्नेह
गुरुवार, 04/28/2016 - 11:16 नवीन
आई आणि लेक यांच्या भूमिकांची अदलाबदल किती नेमक्या शब्दात उतरवली आहे !
  • Log in or register to post comments

+१

क्रेझी
गुरुवार, 04/28/2016 - 12:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अप्रतिम !!!

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 04/28/2016 - 11:22 नवीन
अप्रतिम !!!
  • Log in or register to post comments

खूप सुंदर, सहज, मनाला भिडणारं

पूर्वाविवेक
गुरुवार, 04/28/2016 - 11:35 नवीन
खूप सुंदर, सहज, मनाला भिडणारं लेखन. एकाच वेळी किती अनुभव घेतलेत तुम्ही! अभिमान, कौतुक, भीती, कुतूहल, अविश्वास-विश्वास अश्या सगळ्याच भावनांची सरमिसळ झालीय. पुनवला जीवनातील अनेक भरार्‍यांसाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मस्त

मी-सौरभ
गुरुवार, 04/28/2016 - 11:37 नवीन
आवडल्या गेले आहे
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

विटेकर
गुरुवार, 04/28/2016 - 11:46 नवीन
काय झकास लिहिलय ! पण अजून लिहा की , ५००० फूटावर गार वाटले की नाही ?
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट अनुभव.

गवि
गुरुवार, 04/28/2016 - 11:50 नवीन
उत्कृष्ट अनुभव. त्यांनाही इथे लिहायला सांगा ना अनुभव.
  • Log in or register to post comments

साधे सोपे सरळ तरी मस्त :)

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/28/2016 - 12:07 नवीन
साधे सोपे सरळ तरी मस्त :)
  • Log in or register to post comments

छान.

शरभ
गुरुवार, 04/28/2016 - 12:11 नवीन
अगदी मस्त अनुभवकथन. सुरेख लिहीलय. शरभ
  • Log in or register to post comments

अप्रतिम , पहिले तुमची उडालेली

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 04/28/2016 - 12:18 नवीन
अप्रतिम , पहिले तुमची उडालेली त्रेधातिरपिट आणि त्यातुन निर्माण झालेला विनोदी लेख नंतर हळवा करुन गेला. आणि पुनवला जीवनातील अनेक भरार्‍यांसाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

तुमची लिखाणाची शैली सुरेख आहे

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 04/28/2016 - 12:22 नवीन
तुमची लिखाणाची शैली सुरेख आहे. प्रत्यक्ष तुम्ही घेतलेला अनुभव वाचकालाही अनुभवायला लावता!
  • Log in or register to post comments

खुमासदार शैली आणि

नपा
गुरुवार, 04/28/2016 - 12:32 नवीन
दोघींसाठी अभिमानादास्पद हवाई अनुभव.....अप्रतिम
  • Log in or register to post comments

सुंदर मनोगत ! खुसखुशीत भाषेत

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/28/2016 - 12:37 नवीन
सुंदर मनोगत ! खुसखुशीत भाषेत हृद्य प्रसंग सांगण्याची विरळ हातोटी आहे तुमच्याकडे ! लिहीत रहा. अजून काही वाचायला नक्की आवडेल.
  • Log in or register to post comments

सुंदर अनुभव!!

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 04/28/2016 - 12:43 नवीन
आई मुलीचे नाते हळुच पायलट आणि प्रवासी मध्ये बदलत गेलेले बघुन मजा वाटली. बाकी शेवट एकदम जबरदस्त जमलाय. तुमच्या कन्येला पुढील करीयर साठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

मस्त लेख आणि विमानाची इतकी

क्रेझी
गुरुवार, 04/28/2016 - 12:51 नवीन
मस्त लेख आणि विमानाची इतकी जबरदस्त सफर घडवून आणल्याबद्दल आभार :) असेच अजुन अनुभव लिहीत रहा :)
  • Log in or register to post comments

लेख अतिशय आवडला

विवेक ठाकूर
गुरुवार, 04/28/2016 - 13:03 नवीन
वेगळा अनुभव आणि सुरेख मांडणी.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखन आणि 'पुनव' हे

नीलमोहर
गुरुवार, 04/28/2016 - 13:09 नवीन
अप्रतिम लेखन आणि 'पुनव' हे नावही किती सुरेख !!
  • Log in or register to post comments

प्रतिसादांना प्रतिसाद

स्वीट टॉकरीणबाई
गुरुवार, 04/28/2016 - 13:32 नवीन
सर्वजण, फार फार धन्यवाद. माझ्याकडून आणि पुनवकडून सुद्धा. पिलियन रायडर – अभिमान वाटला यात शंकाच नाही. मात्र ती ‘पायलट झाली’ या पेक्षा सुद्धा तिनी शाळेत असतानाच “मी पायलट होणार” असं निक्षून सांगितलं आणि ते कधी बदललं नाही याचा अभिमान वाटला. पौर्णिमेचा जन्म म्हणून नाव ‘पुनव’. मुग्धागोडेताई – खरे. ती आता ‘गो एअर’ कंपनीत पायलट आहे. वेल्लाभट – “बापरे. इतकं सुरेख लिहिलंय हे तुम्ही की तुम्हालाही कल्पना नसावी.” तुमच्या या कौतुक करण्याच्या हटके शब्दप्रयोगावर मी आणि स्वीट टॉकर खूप हसलो. तुम्हाला नाही. तुमच्याबरोबर हसलो. वेगळ्या शब्दांनी भावना पोहोचविल्यात! डॉ. बिरुटे सर – मग आम्हाला कळणार कसं की तुम्हाला आवडलं आहे ते! सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अतीव सुंदर लेखन. अप्रतिम.

मधुरा देशपांडे
गुरुवार, 04/28/2016 - 13:42 नवीन
अतीव सुंदर लेखन. अप्रतिम.
  • Log in or register to post comments

सुंदर आणि मनाला भिडणारा अनुभव

अंतरा आनंद
गुरुवार, 04/28/2016 - 13:43 नवीन
सुंदर आणि मनाला भिडणारा अनुभव नेमक्या शब्दात. नुकतीच दहावीची परिक्षा दिलेली माझी मुलगी हल्लीच ट्रेनने एकटी जायला लागली. जी काही दिवसांपूर्वी क्लास ते घरापर्यंतचा पाच मिनिटांचा रस्ताही मोबाईलवर माझ्याशी बोलत कापायची, तिने काल मला फोनही न करता गूगल मॅप्सच्या मदतीनं जाण्याचं ठिकाणं शोधलं. त्यामुळे तुमची आधीची तगमग आणि नंतरचं डोळ्यातलं पाणी नीटच समजलं. शेवटी माझ्याही डोळ्यात पाणी आलं. तुमची पूनव अशीच नवनवीन क्षितिजं गाठू दे या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

प्रचंड सुंदर लिहिल आहेत.

त्रिवेणी
गुरुवार, 04/28/2016 - 13:49 नवीन
प्रचंड सुंदर लिहिल आहेत. मला आयुष्यात ज्या थोड्या गोष्टींची भीती वाटते त्यात विमान आहे. पुढच्या महिन्यात पहिल्यांदा विमनाने प्रवास करणार आहे(जाहिरात) त्याचे टेंशन टिकट बुक केल्या दिवसापासून आलय मला.
  • Log in or register to post comments

अप्रतीम लेखन!!

पद्मावति
गुरुवार, 04/28/2016 - 14:02 नवीन
अप्रतीम लेखन!!
  • Log in or register to post comments

खुपच छान...

स्वप्नज
गुरुवार, 04/28/2016 - 14:11 नवीन
खुपच छान...
  • Log in or register to post comments

जबराच ....

भम्पक
गुरुवार, 04/28/2016 - 14:15 नवीन
अहो हसवता काय ....मनातल्या खळ बळीत आम्हालाही शरीक करून घेता काय आणि शेवटी राहिलेली कसर म्हणून वर रडवता काय....hats ऑफ तुमच्या लेखनशैलीला....
  • Log in or register to post comments

सुंदर... अगदी तुफान विनोदी

विजय पुरोहित
गुरुवार, 04/28/2016 - 14:32 नवीन
सुंदर... अगदी तुफान विनोदी लिहिलंय. पण शेवटी हसता हसता एकदम काळजाला स्पर्शून गेलं...
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख

दिपक.कुवेत
गुरुवार, 04/28/2016 - 14:33 नवीन
जब्राट अनुभव आणि लेखन सुद्धा. खुप दिवसांनी निखळ लेख वाचला.
  • Log in or register to post comments

आवडल!!!!!!!!!!

अनिरुद्ध प्रभू
गुरुवार, 04/28/2016 - 14:42 नवीन
सुरेख अनुभव..........तेवढीच अप्रतिम मांडणी..
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर

रिम झिम
गुरुवार, 04/28/2016 - 14:45 नवीन
अतिशय सुंदर...
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय...

वैभव जाधव
गुरुवार, 04/28/2016 - 14:56 नवीन
छान लिहिलंय...
  • Log in or register to post comments

खूप छान :)

सुजल
गुरुवार, 04/28/2016 - 15:01 नवीन
खूप छान :)
  • Log in or register to post comments

वाह... खुप सुंदर लिहिलंय.

सतिश गावडे
गुरुवार, 04/28/2016 - 15:17 नवीन
वाह... खुप सुंदर लिहिलंय. शेवट खुप हळवा केला आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतीम लेखन. हसता हसता

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 04/28/2016 - 15:17 नवीन
अप्रतीम लेखन. हसता हसता डोळ्यात पाणी आले.
  • Log in or register to post comments

+१ ... जब्बरदस्त लिहिलंय !!

होकाका
गुरुवार, 04/28/2016 - 23:40 नवीन
+१ ... जब्बरदस्त लिहिलंय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

अप्रतिम लिहिलंय.हे तुम्ही आधी

अजया
गुरुवार, 04/28/2016 - 15:47 नवीन
अप्रतिम लिहिलंय.हे तुम्ही आधी फेसबुक लिहिलं होतं का? मी यापूर्वी हे वाचलंय.
  • Log in or register to post comments

झक्कास!

उल्का
गुरुवार, 04/28/2016 - 16:13 नवीन
अभिमान, भीती, कौतुक अशा भावनंचे 'विनोदी' कोलाज मस्तच! अगदी डोळ्यांसमोर उभा केलात तो प्रसंग. माझी लेकही आता मोठी झाल्यामुळे शेवटचा भाग अगदी पटला.
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!!

स्मिता चौगुले
गुरुवार, 04/28/2016 - 17:03 नवीन
अप्रतिम !!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा