✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

असा ही एक क्लायंट

स
स्वीट टॉकरीणबाई यांनी
Wed, 04/20/2016 - 20:06  ·  लेख
लेख
माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. बारा वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा कॉलेजला प्रवेश घेतला, D.C.A. केलं. वर्गामधली मुलं मुली मला आंटी म्हणायचे! नवीन शिक्षण संपल्यावर डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला. कोणत्याही नवीन उद्योगाप्रमाणेच हा देखील पडंत, धडपडंत, टक्केटोणपे खात, पुस्तकांपेक्षाही जास्त परिस्थितीकडून आणि गिर्‍हाइकांकडून शिकत शेवटी स्थिरावला. प्रत्येक उद्योगाची स्वतःची एक ठरलेली त्रिज्या असते. त्याच्या बाहेरचं गिर्‍हाइक त्याच्याकडे नियमितपणे येत नाही. एखाद्या पानवाल्याची अर्धा किलोमीटर असेल तर चांगल्या रेस्टॉरंटची शहरभर. जनरल छपाई करणार्यांची ही त्रिज्या तीन कि.मी. असते. एक दिवस मगरपट्ट्याहून एका कंपनीकडून विचारणा झाली. म्हणजे माझ्यापासून सतरा अठरा कि.मी. दूर. पूर्वीच्या अनुभवावरून मला माहीत होतं की इतक्या दूरच्या स्थळाबरोबर आपली पत्रिका जमणं शक्य नाही. मी दरपत्रक पाठवलं पण फारसा रस दाखविला नाही. तरी देखील त्यांनीच पाठपुरावा सुरू केला. एक तर कित्येक कंपन्यांची कामं म्हणजे ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय्’ अशी अवस्था असते. कामं मोठी असतात पण किमती अगदी पाडून मागतात, शिवाय पैसे मिळवण्यासाठी सारखं मागे लागावं लागतं ते वेगळंच. त्यातून ही कंपनी तुर्कस्थानातली. या कंपनीने काहीही आढेवेढे न घेता किमती मान्य केल्या. लगेचच माझ्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणली! “पैशाचा अजिबात प्रॉब्लेम नाही” ह्या वाक्याचा खरा अर्थ पूर्वानुभवावरून व्यवस्थित माहीत होता. बहुदा असं असेल की या कंपनीच्या आसपासच्या प्रिन्टर्सचे पैसे तरी यांनी दिले नसतील किंवा हे प्रचंड चिकित्सक असतील ज्यामुळे दुसरे कोणी यांचं काम करायला तयार नसेल. त्यामुळेच ते इतके लांब यायला तयार झाले असणार असा माझा कयास. ऑर्डर सोडवत नव्हती आणि घेववतही. शंभर टक्के अड्व्हान्स मागितला की ते देणार नाहीत आणि सुंठीवाचून खोकला जाईल अशा कल्पनेनी मी मागितला. आश्चर्य म्हणजे ते द्यायला तयार झाले! आता मला नाही म्हणण्याला काही कारणंच राहिलं नव्हतं. मला आठवण झाली की आमची बोट एकदा हॉन्गकॉन्गला गेलेली असताना मी घड्याळ्याच्या दुकानात गेले होते. एक महागातलं घड्याळ मी घ्यावं म्हणून विक्रेता फारच मागे लागला होता. माझी सुटका करून घ्यायला मी किंमत भन्नाट कमी करून मागितलं. तर तो द्यायला तयार झाला! मग घ्यावंच लागलं. फार दिवस चाललं नाही हे सांगायलाच नको. असो. ती ऑर्डर पूर्ण केली. थोड्या दिवसात दुसरी आली! मी पुन्हा शंभर टक्के अड्व्हान्स मागितला. पुन्हा त्यांनी दिला. होता होता कित्येक ऑर्डर्स झाल्या. मी जास्तच बेचैन. If something looks too good to be true, it usually is. यावर माझा विश्वास. मग त्यांच्या Procurement Manager ना त्यांच्या इतक्या दिलदार वृत्तीचं कारण विचारलं. त्यांच्या उत्तरानी मला फारच आश्चर्य वाटलं. केमिकल्स बनविणारी कंपनी होती. कंपनीचा मालक तुर्की. नाव यिल्दिग्लू. म्हणे त्यानी सांगून ठेवलं आहे की सर्व छपाईची कामं यांच्याचकडे करायची. क्वॉलिटीत तडजोड करायची नाही पण किंमतीत घासाघीस करायची नाही! यिल्दिग्लू! यिल्दिग्लू? कोण हा? आमचा आणि याचा काय संबंध? हा इतका फरिश्ता का बनलाय? मी आणि स्वीट टॉकर काहीतरी निमित्त काढून त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिससारखं ऑफिस. जमेल तितक्या लोकांना भेटलो. नाव ठेवण्यासारखं काहीच दिसलं नाही. यापुढे खाजवून खरूज काढायची नाही असं ठरवलं. या यिल्दिग्लूच्या काहीतरी गैरसमजामुळे आपल्याला बिझनेस मिळत असेल तर ठीकच आहे की. आपण त्यांना वाजवी किमती लावल्या म्हणजे झालं. सन १९९८ ते २००८ पर्यंत व्यवस्थित चाललं होतं. अचानक ऑर्डर येणं बंद झालं. फोन केल्यावर कळलं की ती कंपनी भारतातून काढता पाय घेत होती. आता मात्र या यिल्दिग्लूपुराणाचा छडा लावणंच जरूर होतं. नाहीतर डोक्यात किडा कायम वळवळंत राहिला असता. त्यांच्याकडून यिल्दिग्लूचा पत्ता घेऊन त्याला सविस्तर मेल पाठवून त्याच्या या निर्णयाचं कारण विचारलं. त्याच्या उत्तरानी कारण स्पष्ट झालं खरं पण आश्चर्य फारच वाटलं. मी नुकतीच डी.टी.पी. आणि छपाई सुरू केली होती तेव्हांचा प्रसंग. नवीन धंद्यांमध्ये मालकापासून झाडूवाल्यापर्यंत सगळे आपणच असतो. स्वीट टॉकर नुकताच बोटीवरून परत सुट्टीवर आला होता. मी आणि तो दुकानात बसलो होतो. गिर्‍हाइकांची वाट बघत. त्या सुरवातीच्या काळात दिवसाचा बराच वेळ हीच activity करण्यात जायचा. एक मनुष्य आला. मध्यपूर्व आशियाच्या लोकांसारखा चेहरा. समजायला अवघड असे इंग्रजी उच्चार. त्याच्या हातात चार कागद होते. ते त्याला टाइप करून मोठ्या फॉन्टमध्ये प्रिन्टाआऊट हवे होते. त्याच्या हातातले कागद म्हणजे संगणकावरचेच प्रिन्टआऊट वाटत होते. मी त्याला सुचवलं की सगळं पुन्हा टाइप करण्याऐवजी जर त्याची फाईल दिलीत तर अगदी स्वस्तात आणि लवकर काम होईल. मीच हे सुचवल्यामुळे त्याला फारच आश्चर्य वाटलं. हे चालू असताना स्वीट टॉकरनी ते पत्र नजरेखालून घातलं. त्यात त्याला व्याकरणाच्या बर्‍याच चुका आढळल्या. त्या सुधारून देण्याची आम्ही ऑफर दिली. त्यामुळे तो भलताच खूष झाला. दहा मिनिटात त्याचं काम झालं. त्यानी आमचं दोनदा कौतुक केल्यामुळे स्वीट टॉकरनी एक Quote टाकला. ‘It is disheartening that we are shocked by honesty but not by deceipt’. आम्ही हा प्रसंग विसरलो. पण तो विसरला नव्हता. तोच यिल्दिग्लू. यिल्दिग्लूनी भावनेच्या भरात निर्णय घेतला असेल देखील, पण दहा वर्षं तो पाळला याचं स्वीट टॉकरनी कौतुक केलं. दोनदा. मग मी त्याचाच quote थोडा बदलून त्याच्याचवर टाकला. ‘It is disheartening to see you shocked by his honesty.’
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
kathaa
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18098 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

भारीच की.

अभ्या..
Wed, 04/20/2016 - 20:15 नवीन
भारीच की.
  • Log in or register to post comments

मस्त

कविता१९७८
Wed, 04/20/2016 - 20:20 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

वाह... :)

मदनबाण
Wed, 04/20/2016 - 20:21 नवीन
वाह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- कुकुरुकुकुरुकुकुरुकु किक... ;) :- Kick 2
  • Log in or register to post comments

क्या बात है!! आणि मिपावर

एस
Wed, 04/20/2016 - 20:32 नवीन
क्या बात है!! आणि मिपावर स्वागत!
  • Log in or register to post comments

सुंदर अनुभव !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/20/2016 - 20:34 नवीन
सुंदर अनुभव ! मिपावर स्वागत ! जगच असं झालंय की कोणी फार चांगला वागत असला तर त्याच्याकडे एकतर संशयाने पाहिलं जातं किंवा तो बावळट आहे असं समजून फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जातो ! :(
  • Log in or register to post comments

क्या बात है

श्रीरंग_जोशी
Wed, 04/20/2016 - 20:34 नवीन
असं पण घडू शकतं :-) . खूप सकारात्मक अनुभव. मिपावर स्वागत. पुलेशु.
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव!

पैसा
Wed, 04/20/2016 - 20:37 नवीन
मस्त अनुभव! लिहिलंत पण छान!
  • Log in or register to post comments

मस्तच. मिपावर स्वागत.

मधुरा देशपांडे
Wed, 04/20/2016 - 20:44 नवीन
मस्तच. मिपावर स्वागत. मिपावर इथल्या प्रस्थापित आयडीशी मिळतेजुळते सदस्यनाम घेणारे बरेच डु आयडी आहेत. त्यामुळे क्षणभर तुमचे नाव बघून मला पहिली शंका डु आयडी आहे की काय अशीच आली. ;) लेख वाचल्यावर अर्थातच ती शंका खोटी आहे याची खात्री झाली.
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा..

जेपी
Wed, 04/20/2016 - 20:45 नवीन
मस्त किस्सा..
  • Log in or register to post comments

भारी किस्सा. लेखन आवडले.

रेवती
Wed, 04/20/2016 - 20:46 नवीन
भारी किस्सा. लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

टॉकरकाकू, मिपावर स्वागत..

पिंगू
Wed, 04/20/2016 - 20:48 नवीन
टॉकरकाकू, मिपावर स्वागत..
  • Log in or register to post comments

मिपावर स्वागत. :)

शलभ
Wed, 04/20/2016 - 21:12 नवीन
मिपावर स्वागत. :) मस्त लिहीलय. यिल्दिग्लू आवडला. चांगली आठवण ठेवली त्याने.
  • Log in or register to post comments

मस्त .

अभिजित - १
Wed, 04/20/2016 - 21:19 नवीन
मस्त .
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा! आणि मिपावर

आदूबाळ
Wed, 04/20/2016 - 21:34 नवीन
मस्त किस्सा! आणि मिपावर स्वागत! बोटीवरचे "तुमचे" अनुभव वाचायलाही आवडतील.
  • Log in or register to post comments

चांगला किस्सा ...

उगा काहितरीच
Wed, 04/20/2016 - 21:36 नवीन
चांगला किस्सा ...
  • Log in or register to post comments

नमस्कार

जव्हेरगंज
Wed, 04/20/2016 - 21:46 नवीन
नमस्कार
  • Log in or register to post comments

अनुभव लेखन आवडले आणि तुमचा

उल्का
Wed, 04/20/2016 - 21:50 नवीन
अनुभव लेखन आवडले आणि तुमचा आयडी सुद्धा! :)
  • Log in or register to post comments

सुंदर अनुभव!

स्वामी संकेतानंद
Wed, 04/20/2016 - 21:56 नवीन
सुंदर अनुभव!
  • Log in or register to post comments

मस्त आणि स्वागत....तुम्हीपण

टवाळ कार्टा
Wed, 04/20/2016 - 22:01 नवीन
मस्त आणि स्वागत....तुम्हीपण भारी ल्हिता :)
  • Log in or register to post comments

तुम्ही आयडी साॅलिड घेतलेला आहे.

बोका-ए-आझम
Wed, 04/20/2016 - 22:22 नवीन
आणि लेखही छान.
  • Log in or register to post comments

अनुभव आवडला.

आतिवास
Wed, 04/20/2016 - 22:24 नवीन
अनुभव आवडला. तुमच्या पोतडीतले आणखी अनुभव वाचायला आवडेल - आवडतील.
  • Log in or register to post comments

मस्त लेख

सुखीमाणूस
Wed, 04/20/2016 - 22:32 नवीन
छान लिहीला आहे.व्यवसाय करताना असे अनुभव म्हणजे जणु झुळुकच!!
  • Log in or register to post comments

झकास..

मराठी कथालेखक
Wed, 04/20/2016 - 23:53 नवीन
झकास..
  • Log in or register to post comments

यिल्दीग्लु आणि स्वीट टॉकरीण

वैभव जाधव
गुरुवार, 04/21/2016 - 00:12 नवीन
यिल्दीग्लु आणि स्वीट टॉकरीण बाई ही दोन्ही हटके नावं आणि पहिल्याचा हटके स्वभाव दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

तुम्हा दोघांचाही मामला फारच स्वीट आहे

अर्धवटराव
गुरुवार, 04/21/2016 - 02:43 नवीन
आणि समृद्ध देखील :)
  • Log in or register to post comments

त्रिज्ज्या आवडली.उगाच आपला

कंजूस
गुरुवार, 04/21/2016 - 06:12 नवीन
त्रिज्ज्या आवडली.उगाच आपला धंधा फार मोठा होईल ही गैरसमजूत न ठेवणं इत्यादी.चांगल्या मशीनची छपाई लगेच समजून येते.
  • Log in or register to post comments

मस्तं. :).

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/21/2016 - 06:47 नवीन
मस्तं. :). दोघांचही अनुभवविश्वं जब्बर दिसतयं.
  • Log in or register to post comments

मस्तच की!

चांदणे संदीप
गुरुवार, 04/21/2016 - 07:40 नवीन
छानच अनुभव! सुरेख लेखन! यिल्दिग्लू ला हाय सांगा आमचा! __/\__ Sandy
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे. मिपावर स्वागत

मृत्युन्जय
गुरुवार, 04/21/2016 - 08:45 नवीन
छान लिहिले आहे. मिपावर स्वागत
  • Log in or register to post comments

सहर्ष स्वागत

नाखु
गुरुवार, 04/21/2016 - 08:47 नवीन
आणि समृद्ध अनुभव विश्व असलेले मिपाकर दांपत्य म्हणून अभिमान वाटतो!! तिघांनाही कडक सलाम बोटीच्या सफरीची वाट पाहणारा नाखु
  • Log in or register to post comments

सुंदर अनुभव ! आवडेश....

शित्रेउमेश
गुरुवार, 04/21/2016 - 10:17 नवीन
सुंदर अनुभव ! आवडेश....
  • Log in or register to post comments

आय डी, स्वतःचा बिझिनेस असणं

असंका
गुरुवार, 04/21/2016 - 10:34 नवीन
आय डी, स्वतःचा बिझिनेस असणं आणि लेखन सगळंच आवडलं !! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आपला अनुभव आणी लेखनाची शैली

सुबोध खरे
गुरुवार, 04/21/2016 - 10:43 नवीन
आपला अनुभव आणी लेखनाची शैली सुरेख आहे. अजून अनुभव असतील तर ते वाचायला आवडतील. प्रामाणिकपणे व्यवसाय केल्याचे फळ नक्कीच मिळते. ( असा माझा हि अनुभव आहे. पण आपल्या ताजमहालाला वीट लावणे चूक ठरेल तेन्व्हातो पुन्हा केंव्हा तरी)
  • Log in or register to post comments

डॉक..

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 04/21/2016 - 15:07 नवीन
तुमची सेपरेट वीट... आय मीन जिलबी टाका की मग. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१०००

अजया
गुरुवार, 04/21/2016 - 15:57 नवीन
डाॅ खरेंशी सहमत. मिपावर स्वागत आणि छानशा सकारात्मक लेखाबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्ही छान लिहीता. अजुनही

पिलीयन रायडर
गुरुवार, 04/21/2016 - 10:48 नवीन
तुम्ही छान लिहीता. अजुनही अनुभव वाचायला आवडतील!
  • Log in or register to post comments

+१११

मोदक
गुरुवार, 04/21/2016 - 15:20 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

एकदम सुपर-स्वागत

Vasant Chavan
गुरुवार, 04/21/2016 - 14:12 नवीन
मिपावर आपले मनपुर्वक स्वागत्,आल्याबरोबर सिक्सर टाकला.छान.
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलय.

अपरिचित मी
गुरुवार, 04/21/2016 - 14:14 नवीन
यिल्दिग्लू आवडला
  • Log in or register to post comments

चाची ४२० मधला 'लक्ष्मी

मराठी कथालेखक
गुरुवार, 04/21/2016 - 14:16 नवीन
चाची ४२० मधला 'लक्ष्मी गोडबोले' आठवला :)
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय! मिपावर स्वागत!

यशोधरा
गुरुवार, 04/21/2016 - 14:19 नवीन
मस्त लिहिलंय! मिपावर स्वागत! :)
  • Log in or register to post comments

मस्त

सविता००१
गुरुवार, 04/21/2016 - 14:23 नवीन
मस्त लिहिलंय! मिपावर स्वागत! :)
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात.. मिपावर स्वागत.

टुकुल
गुरुवार, 04/21/2016 - 14:41 नवीन
मस्त सुरुवात.. मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments

सुंदर...पुभाप्र

सूड
गुरुवार, 04/21/2016 - 15:05 नवीन
सुंदर...पुभाप्र
  • Log in or register to post comments

चांगला अनुभव!!

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 04/21/2016 - 15:08 नवीन
दमदार सुरुवात केली आहे एस्टीबाईंनी... मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments

छान

मन१
गुरुवार, 04/21/2016 - 15:14 नवीन
मस्त अनुभव. सध्या शब्दांत. आवडला किस्सा. जालावर शोधलं तर यिल्दिग्लू नावाचं नै पण yildizoglu नावाचे काही प्रोफाइल्स साप्डताहेत तुर्की परिसरातले.
  • Log in or register to post comments

मस्त अनुभवकथन

शरभ
गुरुवार, 04/21/2016 - 15:17 नवीन
जर त्यांच नाव Yildizoglu (Yildızöğlu) असेल तर त्याचा उच्चार 'यिल्डीझोओलू' असा आहे. आणि त्याचा अर्थ 'Son of star' असा होइल. Yildiz = star(तारा) णि oglu = Son.
  • Log in or register to post comments

पावलो.

अकिलिज
गुरुवार, 04/21/2016 - 20:13 नवीन
दिवसातून असा एखादा लेख जरी पडला तरी मिसळपावावर आल्याचे समाधान मिळते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

स्वीट टॉकरीणबाई
गुरुवार, 04/21/2016 - 20:53 नवीन
सगळ्यांना, मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून कौतुक केलं आहे की मला संकोचल्यासारखं होत आहे. पुनश्च धन्यवाद!
  • Log in or register to post comments

स्वीट टॉकरीणबाई

इडली डोसा
गुरुवार, 04/21/2016 - 21:04 नवीन
तुम्ही स्वीट टॉकर याच्यां सारखेच भारी लिहिता. तुमचेपण बोटीवरचे अनुभव वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा