लघुकथा - थांब!
ब्लॉग दुवा हा
नेहमीचीच गर्दीची वेळ होती.८:५२ ची बदलापूर यायला काही क्षण बाकी होते. महेश ब्रिजवरून धावत धावत येत होता, आपल्या नेहमीच्या डब्याशी पोचण्यासाठी गर्दीतून वाट काढत होता. तो नेहमीच्या जागी जाऊन पोचला आणि उभा राहिला. आज गर्दी जरा जास्तच होती. महेशने मोबाईल बघितला आणि खिशात टाकला. पाकिट, चावी चेक केलं आणि बॅग पुढे घेऊन तयार झाला. ८:५२ ची लोकल आली. चढण्यासाठी एकच झुंबड उडाली. ’अंदर जाओ’, ’अरे काय करतोयस यार माझा पाय आहे’, ’उतरू द्या उतरू द्या!’ सगळा कल्लोळ झाला. महेशला कुणीतरी धक्का देऊन मागे लोटलं. चढणं भयानक कठीण होतं, लटकायलाही जागा नव्हती. बरीच खटपट करून शेवटी पुढच्या गाडीने जाऊ म्हणत तो मागे झाला. इतक्यात गाडी सुटली. लोकं चढतच होती, लटकत होती. तेवढ्यात ’अरे माझं घड्याळ!!’ असं कुणीतरी ओरडलं. महेशने गाडीकडे बघितलं. डब्याबाहेर लटकलेल्या एका मुलाचं घड्याळ खाली पडलं होतं. तो मुलगा हात करत होता, पण गाडीने वेग घेतला होता. काही क्षणातच गाडी आणि तो मुलगाही नजरेच्या टप्प्याबाहेर गेला. एकदा त्या घड्याळाकडे, एकदा आजूबाजूच्या लोकांकडे काही क्षण बघत महेशने विचार केला. ’कशाला एवढी घाई करायची मी म्हणतो’, बाजूचे एक काका म्हणाले. ’आं? हो. हो ना! काय आता बोलणार...’, असं म्हणून त्याने अजून जरा विचार केला आणि घड्याळ आपल्या बॅगमधे ठेवलं.
महेशला त्या डब्यात लटकणा-या मुलाबद्दल खूप वाईट वाटायला लागलं. रात्री घरी गेल्यावर त्याने बॅगेतून ते घड्याळ काढलं. काळा पट्टा, सोनेरी बक्कल, घड्याळ सुरेख होतं. त्याचं लक्ष डायलकडे गेलं. पांढ-या डायलवर बदाम काढून त्यात महेश सुषमा अशी नावं लिहिलेली होती. महेश हसला. ’बघितलंस का? किती रोमॅंटिक गिफ़्ट्स देतात बायका प्रियकरांना किंवा नव-यांना?’, महेश त्याच्या बायकोला, मनिषाला म्हणाला. त्याने तिला आत जाऊन घड्याळ दाखवलं आणि तिला चिडवत म्हणाला, ’बघ! या महेशवर किती प्रेम असेल त्याच्या बायकोचं’. ’ए गप रे! पण खरंच, तिने मोठ्या प्रेमाने दिलं असेल ना हे घड्याळ?’, ’काय करणारयस तू आता याचं?’, ’बघतो पुन्हा दिसला तर तिथे उद्या. देईन त्याला परत.’ ’देच देच. त्याला पण वाईट वाटत असेल अत्ता खूप ना?’ ... दोघे बोलत होते.
दुस-या दिवशी त्याच वेळेच्या सुमारास महेश प्लॅटफ़ॉर्मवर पोचला. इकडे तिकडे बघत तो ’त्या’ महेशला शोधू लागला. चालत्या गाडीत, तेही लांबवरून बघितलेला चेहराही त्याला फार धूसर आठवत होता. काय करावं अशा विवंचनेत जात त्याने आजूबाजूच्या लोकांना विचारायला सुरुवात केली. ’हे घड्याळ तुमचं आहे?’ ’काल गाडीतून पडलं होतं’ ’भाईसाब, घडी आपका है?’ ’यहां महेश कौन है महेश?, उसका घडी मेरेपास है’. ८:५२ आली. तोच डबा, तशीच गर्दी. महेशने डब्यातही ओरडून विचारून बघितलं, ’अरे इथे महेश आहे का कुणी? त्याचं घड्याळ माझ्याकडे आहे’ इतक्या गर्दीत कुणाला काही ऐकूही येत नव्हतं, आणि त्या महेशला शोधण्यात रसही नव्हता. गाडी तशीच धडधडत नजरेआड गेली.
महेशने कालसारखंच ते घड्याळ बॅगमधे टाकलं. आणि नेहमीप्रमाणे घरी गेला. रात्री जेवताना पेपर वाचता वाचता एका बातमीकडे महेशचं लक्ष गेलं. ’ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू’ महेशने बातमी वाचायला सुरुवात केली. तरूणाचं नाव होतं ’महेश मुकादम’. महेशचा घास हातातच थांबला. पटकन हात धुवत त्याने बॅगेतून ते घड्याळ काढलं. बदाम, महेश, सुषमा, घड्याळातली वेळ; ९. बातमीत पुढे लिहिलेली अपघाताची वेळही तीच; रात्री ९. घड्याळ बंद पडलं होतं. त्या रात्री दोनही वेळा थांबल्या, त्या एक घड्याळातली, आणि एक महेश मुकादमची. सगळ्या गोष्टींचा ताळमेळ लागला आणि महेश अतिशय सुन्न झाला. त्याने मनिषालाही ही गोष्ट सांगितली, तिलाही कसंनुसं झालं. ’त्याला लोकांनी आत जायला जागा दिली असती तर वाचला असता यार!’, महेश. ’अरे कशाला जिवाशी खेळायचं पण? एवढं काही होतं का चार मिनिटांनी’, मनिषा म्हणाली. महेश काहीच म्हणाला नाही, बराच वेळ तो हात करणारा मुलगा आणि ते घड्याळ त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं.
असाच एक दिवस महेश गाडीची वाट बघत उभा होता. ८:५२ आली. तोबा गर्दी. आज महेशला लवकर घरी जायचं होतं. मुलीचा वाढदिवस होता. तिला केक न्यायचा होता, कारने फिरायला न्यायचं होतं. महेश बॅग पुढे घेत गाडीच्या दिशेने सरसावला. आत शिरायला जागाच नव्हती. बरीच खटपट करून शेवटी महेश मागे सरला. गाडी निघून गेली. महेशने घड्याळाकडे बघितलं. इतक्यात त्याला बाजूला उभ्या असलेल्या एका प्रवाशाने विचारलं, ’भाऊ, एक विचारू का? नाही म्हणजे सहज विचारतो, ते तुम्ही हातावर दोन दोन घड्याळं का घातलीयत?’ महेश दोन सेकंद थांबला. आणि मग म्हणाला, ’हे जे चालू घड्याळ आहे ते मला सांगतं, ’धाव’, आणि हे जे बंद पडलेलं घड्याळ आहे ते मला सांगतं, ’थांब’.
दोनही घड्याळात त्या वेळी एकच वेळ होती, ९:००.
- अपूर्व ओक
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगली आहे कथा.
थांबायला सांगणार घड्याळ घ्यायला हव प्रत्येकाने
खरंय राव. :(
... दुर्दैव...
+111
ध्वायचं
मस्त आहे !
वाईट वाटतं. :(
वा ! छान कथा...
कथा आवडली
कथा आवडेश.
????विचार करायला लावणारी कथा.
कथा आवडली.
..
कथा आवडली. फार छान सांगितलंय.
छान आहे कथा.
बाकि ओके
मला वाटते...
....
गोष्ट आवडली! +१
गोष्ट आवडली.
कथा आवडली.असंच डोंबिवली
छान!कथा आवडली
सकारात्मक शेवट...
आवडली
छान
कथा आवडली
कौतुकाबद्दल सगळ्यांचे अनेक
जवळजवळ याच प्रकारे लोकलखाली
छान कथा
सुरेख लिहिलय
आपल्या कडील लोकलला गाडी चालू