संपादकीय अग्रलेखः मिसळ की भेसळ
सर्व पात्रे काल्पनिक. (असे आपले म्हणायचे.)
संपादकत्व स्वीकारुन आम्हाला बरेच (म्हणजे २) दिवस झाले आहेत. पण एकही लेख आमच्या अनुमतीची वाट पाहत शेपूट हलवत बसलेला नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही ताडकन भानावर आलो. आणि ह्या पदात वाटते तितकी मजा नाही हे जाणून घेऊन संकेतस्थळाचे सदस्य लोकशाही मार्गाने आमच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करण्यापूर्वी आम्हाला संपादकपद मिळाल्याची निळसर सुगंधी आठवण लिहून ठेवायचे ठरवले.
या आठवणीचे ब्याकग्राऊंड तुम्हाला माहीतच असेल. किंवा नसले तर हा परिच्छेद वाचल्यावर माहीत होईल. मराठी संकेतस्थळांवरील आमच्या वावराला बरेच दिवस होऊन गेले होते. पण मराठी संकेतस्थळांवर आवश्यक तो मान आम्हाला मिळत नाही या कल्पनेने आम्ही प्रचंड बेचैन होतो. जग उलथापालथ करुन सोडण्याची क्षमता असणार्या आमच्या साहित्याला केवळ २ प्रतिसाद. आणि संजोप राव, विसोबा खेचर असल्या मूळच्या पुण्याबाहेरच्या मंडळींच्या लेखाला ८० प्रतिसाद येत असत. या काळात आमची पोटदुखीही थोडी बळावली होती. (परवाच्या गणेशचतुर्थीपासून ती बरी आहे.) पण या सर्वामागे संकेतस्थळांच्या संचालकांचे काही कुटील कारस्थान आहे हे सिद्ध करण्यास काही विदाचीही गरज नव्हती. अगदी सूर्यप्रकाशाएवढे ते सत्य होते. त्यामुळे प्रशासकत्व नाही तरी निदान उपसंपादकपदाची तरी जबाबदारी मिळावी या हेतूने सध्या ह्या खुर्च्या उबवणार्या लोकांवर मिळेल तिथून टीका करणे हे Dilbert Principle आम्ही भक्तिभावाने आचरत होतो. पण कुठे डाळ शिजेल तर शपथ. उगाच नंतर कोणी आमच्यावर काही फाजील आरोप करायला नको म्हणून आमची साईड 'सेफ' ठेवण्यासाठी आम्ही स्त्री सदस्यांना व्य.नि. तर नाहीच पण शिवाय त्याचे लेखन आवडूनही प्रतिसाद देण्याचे टाळत होतो.
पण एखादे बाबा जसे भक्तांच्या मनातल्या इच्छा ओळखतात आणि भक्ताने त्या व्यक्त करण्यापूर्वीच त्या पूर्ण करून टाकतात तसे प.पू. तात्यामहाराजांनी आम्हाला संपादक मंडळात स्थान दिले. (आम्ही त्यांना मादक द्रव्य तर सोडा -येथे सोडा म्हणजे सोडून द्या- अद्यापि चहादेखील पाजलेला नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. )
असो. मराठी भाषेला संपादकांची थोर परंपरा आहे. जांभेकर, भोपटकर, अत्रे, खाडिलकर, परुळेकर यांच्यासोबत आमचे नाव घेतले जाणार आणि आमचे गुरू सुमार केतकर यांच्या ग्लासात सोडा ओतण्याची संधी आपल्याला मिळणार ( आता येथे 'सोडा' चा अर्थ बदलला. जो तुम्हाला माहितीच आहे.) आणि चिंचवड स्टेशनच्या इतिहासात परवाचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार हे आम्हाला पुरते कळून चुकले आहे पण त्यासाठी एक झणझणीत अग्रलेख पाडणे आवश्यक आहे ही जाणीवही झाली आहे.
तेव्हा निळसर सुगंधी आठवणीऐवजी सादर आहे लोकसत्तेतून साभार परत आलेला आमचा अग्रलेख
"मिसळ आणि भेसळ"
“महाराष्ट्रातील बरेच लोक नाष्ट्याला मिसळ खातात. पुण्याला मिसळ मटकीची बनवतात तर मुंबईला वाटाण्याची. मिसळीचे तसे बरेच प्रकार आहेत त्यापैकी "कोल्हापुरी मिसळ" हा जहाल प्रकार खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. या मिसळीची खासियत म्हणजे याची तर्री फारच तिखट असते. त्या तर्रीला कट असा शब्द आहे. सेतुसमुद्रमचे निमित्त करून भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी भारतात जो थयथयाट चालवला आहे. त्यालाही कट हेच नाव देणे सयुक्तिक ठरेल. रामाचे नाव घेऊन त्यांनी चालवलेली रावणलीला अपेक्षितच आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडून तेथे थयथय नाचणार्यांमध्ये हेच लोक पुढे होते. आता १२३ कराराचा वार फुकट गेल्याने रामसेतूचा मुद्दा उपस्थित करून कॉंग्रेस सरकारला अडचणीत आणायचा त्यांचा डाव आहे. अडचणीत आलेली मांजर जशी गळा धरते तसा भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याच्या ह्या वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
मिसळीवर फरसाण टाकणे आवश्यक असते. नाही तर त्याला सॅंपल पाव म्हटले असते. पुण्यातील मिसळ कुरकुरीत तर मुंबईची मिसळ तिथल्या दमट हवामानामुळे मऊ पडलेली असते. फरसाण हा मूळचा गुजराती पदार्थ. मिसळीमध्ये केवळ शेव असून चालत नाही सोबत भावनगरी, गाठी, पापडी या सर्वांची साथ आवश्यक असते. मात्र ह्या फरसाणाची निर्मिती करणार्या गुजराती बंधूंमध्ये ह्या सर्वसमावेशकतेची जाणीव नष्ट होत आहे. विहिंप आणि नरेंद्र मोदींनी हिंदुत्त्वाची प्रयोगशाळा बनवलेल्या ह्या राज्यामध्ये नराधमांचा नंगानाच सुरु आहे. आणि त्यांना फूस आहे ती परदेशीय गुजराती धनिक बांडगुळांची.
मिसळीचा फरसाण बनवण्यासाठी फक्त बेसनपीठ, मीठ आणि मिरची असून चालत नाही. त्याला एकजीव करून नंतर तळण्यासाठी तेलही आवश्यक असते. इंदिरा गांधींनी अन्नटंचाईच्या काळात पामतेल आयातीचा निर्णय घेतला तेव्हा त्यावर टीका करणार्यांमध्ये जनसंघाच्या सोबत लालभाईही होते. सर्व देश सांभाळण्याची जबाबदारी साक्षात मार्क्सनेच आपल्या खांद्यावर दिली आहे असे या पक्षातील काही दुढ्ढाचार्यांना वाटते. पण लालभाईंना भारतापेक्षा चीनची काळजी जास्त आहे. आताही १२३ चे निमित्त करून सोनियांना अडचणीत आणण्याच्या भाजप आणि त्यांच्या पित्त्यांना मदत करण्याचे काम ही मंडळी करतच आहेत.
मिसळीसोबत पाव असणे गरजेचे असते. एका हाताने पाव तोडून तो सॅंपलमध्ये बुडवावा आणि चमच्याने फरसाण खावे असे काही मंडळी करतात. वास्तविक पाव हा परदेशी पदार्थ. "पाव खाल्ल्याने धर्म बाटतो" अशी आपल्या पूर्वसूरींची धार्मिक श्रद्धा. विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही. “धर्म ही अफूची गोळी आहे" असे मार्क्सने म्हटले आहे. पण भारतातील लालभाईंना मार्क्सशी काही देणेघेणे नसल्याने धर्मआंधळ्या जनसंघाच्या हातात हात घालून त्यांची वाटचाल सुरूच आहे. मागील निवडणुकीत सोनियांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यासमवेतच त्यांच्या धर्माचाही मुद्दा काही मंडळींनी उपस्थित केला होता. पण मतदारांनी त्यांना सणसणीत मुस्काटीत हाणून देखील ही मंडळी सुधारली नाहीत. शेवटी सोनियांनी पंतप्रधानपद नाकारुन एकाच फटक्यात दहा जणांना गार केले. या फटक्यामुळे बधीर झालेली काही मंडळी अद्यापही भानावर आलेली नाहीत. उमा भारती अजूनही केशवपन करण्यासाठी रोज वस्तर्याला धार करतात.
तात्यासाहेब अभ्यंकरांनी मिसळपाव हे संकेतस्थळ सुरू करून राष्ट्रीय एकात्मतेला मोठा हातभार लावला आहे. केवळ मराठी असण्याचा अभिमान आम्हाला कधीही नव्हता. ते काम बाळासाहेबांचे. शिवाय त्यांना माणूस मराठी असून चालत नाही. तो हिंदूही असला पाहिजे. त्यामुळे अविनाश भोसल्यांचे समर्थन करणार्या बाळासाहेबांनी दाऊद इब्राहिम मराठी असूनही त्याचे समर्थन का केले नाही हे आम्हाला माहीत आहे.
माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे. आणि मिसळपाव या सर्वासाठी उपयुक्त आहे.
मिसळपावाला आमच्या शुभेच्छा.
“
वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे.
वाचने
26383
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
खल्लास !!!
In reply to खल्लास !!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हाहा!!
शंभर नंबरी अग्रलेख
शैली मस्त साधली आहे
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by आजानुकर्ण
ह्यो खोटं बोलतूया....
In reply to ह्यो खोटं बोलतूया.... by सुरेखा पुणेकर
सुरेखाताई
In reply to सुरेखाताई by आजानुकर्ण
आरं बाबा
In reply to सुरेखाताई by आजानुकर्ण
बैठकीचीच ठेवा!
राजकीय सद्यस्थितीचे विवेचन..
सही
छानच
In reply to छानच by सहज
हा हा हा!!!
जबरदस्त
In reply to जबरदस्त by सन्जोप राव
बेरजेचं राजकारण!
लयी भारी !
सहीच..
मस्तच
आम्ही कर्माने मराठी.
"माणसाने
आभार
लेख मस्त
अग्रलेखांचा बादशाह!
In reply to अग्रलेखांचा बादशाह! by प्रमोद देव
घूटर घू
मस्तं रे!
मस्तच
लेख मस्तच आहे
वा वा
केतकरांचे भाकित
In reply to केतकरांचे भाकित by प्रकाश घाटपांडे
कसं बोललात राव...
खल्लास !
धर्म ही