Skip to main content

पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय?

लेखक अमृता_जोशी यांनी सोमवार, 04/04/2016 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर बील करण्यासाठी मी काऊन्तर वर आले तर तेथेच स्टार बझारच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात खालील जाहिराती पहिल्या ad ad हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे' "क्या हुआ म्याडम?" "मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?" "आं? चेष्टा करताय काय म्याडम?" "नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?" "ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही' "ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?" "याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते." "ती म्हणजे कोण?" "ही फोटोतली बाई" "हो, पण ती आहे कोण?" "अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा." "कशावरून?" आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला. "सांगाना कशावरून ती अडाणी आहे?" "काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात." "वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले. "ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला. "काय दिसतंय या फोटोत?" "त्या मोडेलचे कपडे वैगेरे." "तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत." "का भांडताय?" "कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे." "मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. " "ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे." "ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला. घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 40404
प्रतिक्रिया 200

प्रतिक्रिया

In reply to by गरिब चिमणा

त्यात एवढं चिडायला काय झालं, साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे. पंजाबी सलवार कुर्तावाल्या जरा आणखी स्मार्ट व जीन्स टॉपवाल्या एकदम फक्कड (अकलेने)
@ गरीब चिमणा, आपला एका धाग्यावरील एक प्रतिसाद आपले चिडणे दर्शवतो. अन्यायाप्रती संवेदनशीलता हा सहज मनुष्य स्वभाव आहे आणि 'संयम बाळगा पण सहन करु नका' अशा अर्थाची एक इंग्रजी भाषेतील म्हण आहे. आपल्याच त्या जुन्या प्रतिसादातील काही शब्दात फेरफार करुनही या धागा विषयात अभिप्रेत खुपणे काय असते आणि तीच खुपसणी आपण अट्टाहासाने कशी पुढे दामटता आहात हे दाखवून देऊ शकतो पण तुर्तास असू देतो कारण आपले वरील वाक्यही काही शब्दांचा फेरफार उदाहरण म्हणून केला तर पुरेसे ठरावे. त्यात एवढं चिडायला काय झालं, साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे. पंजाबी सलवार कुर्तावाल्या जरा आणखी स्मार्ट व जीन्स टॉपवाल्या एकदम फक्कड (अकलेने) याच वाक्यात या एवजी त्या कपड्यांच्या नावांची अदला बदल केली तर सहज होऊ शकेल पण त्यामुळे या किंवा त्या गटातील स्त्रिया दुखावल्या जाउ शकतात, मुलतः माणसाच्या अंगावरच्या कपड्यांचा त्याच्या बुद्धीमत्तेशी संबंधच काय ? आपण मांडत असलेला संबंध सरळ सरळ एक तर्कदोष आहे किंवा कसे ? आपल्या वाक्यातून होणारा हल्ला व्यक्तिगत नसला तरी सरसकटीकरण करणारा आहे - (सरसकटीकरणाच्या खास वैशिष्ट्यासाठी आपण मिपावर ओळखले जाऊ इच्छिता किंवा कसे हा वेगळ्या अभ्यासाचा मुद्दा ठरावा)-पण मुख्य म्हणजे आपल्या वाक्यातील तर्कदोष व्यक्तीलक्ष्य तर्कदोषाच्या जवळ असणाराच आहे किंवा कसे ते खाली वाचून तुम्हीच ठरवा. सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो. एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.[३] उदाहरणे " महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते." " तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही." "डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?" "तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही." "सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"
त्यात एवढं चिडायला काय झालं, साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे. पंजाबी सलवार कुर्तावाल्या जरा आणखी स्मार्ट व जीन्स टॉपवाल्या एकदम फक्कड (अकलेने)
हे वाक्य मी जरासे बदलून टाकतो त्यात एवढं चिडायला काय झालं, अबकड वैशिष्ट्याचे पुरुष जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे. कखगघवाला जरा आणखी स्मार्ट व हळक्षज्ञवाला एकदम फक्कड (अकलेने) इथे अबकड-कखगघ-हळक्षज्ञ या शब्दांच्या एवजी अनेक पद्धतीचे शब्द वापरता येतात दुसर्‍यांना सांस्कृतीक कारणावरुन कमी लेखू इच्छित मंडळी हेच करत असतात, असे करणारी मंडळी कधी रेसीस्ट असतात, कधी जातीयवादी असतात, कधी धर्मांध असतात, कधी सांस्कृतीक कारणावरुन द्वेष-विषमता जोपासणारी असतात; अजुन जर लक्षात आले नसेल तर आपल्या खरडफळ्यावर संपादक मंडळाच्या अनुमतीने अबकड-कखगघ-हळक्षज्ञ शब्दांमध्ये बदल करुन उदाहरणांचा गठ्ठा टाकतो, हवे अवश्य कळवावे. आपली पूर्ण अर्ग्युमेंट सांस्कृतीक कारणावरुन द्वेषमुलक स्वरुपाची ठरते किंवा कसे हे आपले वाक्य रिव्हिजीट करुन पहावे.
...साडीचा अपमान करायचा नाही पण ते लांब पातळ कापड अंगाला गुंडाळने मला मध्ययुगीन व बुरसटलेल्या विचारांचे वाटते ,तसच धोतर व बंडी घालणारे पुरुष ही त्याच कॅटॅगरीतले. साडी हे स्त्रीच्या गुलामगिरीचे लक्षण आहे,आदिम मानसिकतेतून हिंदूंनि लादलेली गुलामगिरी ,बर्याच बायका साडीचे समर्थन करताना दिसतात इथे याचा अर्थ आपल्याला बुद्धी व स्वातंत्र्य नकोच हेच त्यांनी मान्य केलेले दिसते.
१) आपण सरळ सरळ अपमान करताय आणि मग अपमान करायचा नाही म्हणून सारवा सारव करताय काय ते एक नक्की ठरवावे. २) आपण संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करत आहात किंवा कसे. धार्मीक विश्वासांचे लोक संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करत असतील तर त्यांची गल्लत उघडपाडली पाहीजे उलटपक्षी तुम्ही स्वतःच संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करताना दिसत आहात. पोषाख ही सांस्कृतीक गोष्ट आहे त्याचा धर्माशी अर्थाअर्थी संबंधच काय ? ३) (पुरोगामी लोकांनी पुढील वाक्यासाठी मला माफ करावे-नाईलाजाने लिहितो आहे) माणसाच्या विचारांचे पुरोगामीत्व अथवा बुरसटलेपण कपड्यांच्या लांबीवरुन ठरते यात काय पॉईंट आहे, या निष्कर्षाने सर्व पुरोगामी लोकांच्या सभा अंडरवेअर आणि बिकीनी घालून व्हावयास हव्यात. ४) नऊवारी आण धोतर असो वा गोलसाडीचे विवीध प्रकार असोत तेही अत्यंत सुंदर आणि रुबाबदार दिसू शकतातच. आणि पाश्चात्य पोषाख गबाळे दिसत असल्याची छायाचित्रे हवी असतील तर देतो. इतपत गबाळी देतो की तुम्ही सुद्धा गबाळी असल्याचे अ‍ॅग्री कराल त्या शिवाय मागच्या वर्षातील सर्वात गबाळा पोषाख केलेली व्यक्ती अशी नॉमीनेशन्स पाश्चात्य पोषाख करणार्‍यांचीही होतात. आपण शोधता का इतरांना शोधून देऊ देत ? ५) बुरखा आणि बुरखा समकक्ष डोक्यावरुन पदराचा आग्रह एवढ्या आणि एवढ्याच मर्यादे पर्यंत स्त्रीच्या गुलामगिरीचा पोषाखाशी संबंध येतो. कंपेअर्ड टू बुरखा नऊवारी आणि गोलसाडी खूप अधिक स्वातंत्र्य देत असत, कारनी लांबच्या पल्ल्याचा प्रवास करताना नैसर्गीक विधी करण्याची वेळ आली आणि आसपास सार्वजनिक शौचालय नसेल तर आमेरीकत पंचाईत होते- अलिकडे जे एन यु - कन्हैय्याची स्टोरी ऐकली असेल यावर अधिक भाष्य हवे असेल तर सांगा आपल्या खरडफळ्यावर करतो- आपल्याकडील नऊवारी आणि धोतर हा पोषाख अगदी घोड्यावर बसणे त्या शिवाय स्त्रीयांना पळण्याची वेळ येवो का घोड्यावर बसण्याची वेळ येवो नऊवारी हा त्या काळासाठी अत्यंत चांगला पोषाख होता. साडी असो का पंजाबी भारतीय पोषाख प्रकारात बुरखा न घालता ओढणी अथवा पदर कुणासमोर केव्हा, किती, कसे घ्यायचे ह्याचे बर्‍यापैकी स्वातंत्र्य असावे. त्यामुळे बुरख्यापेक्षा साडी हि नेहमीच आधूनिक आणि तरीही सुरक्षीत होती.

In reply to by माहितगार

@ गरीब चिमणा जिन्स आणि टि शर्ट घालणार्‍या पाश्चात्य देशातील काही -आधुनिक विचारांच्या सुद्धा - स्त्रीया शरीराच्या काही अवयवांचे आकार कमी व्हावेत म्हणून सुद्धा शल्यचिकित्सा करतात कारण त्यांना त्यांच्या कपड्यातून होणारे अवयवांचे प्रदर्शन खुपते -पहाणार्‍यांना खुपत नसले तरीही- संदर्भ शोधून घेता का इतरांना मदत करु देत- त्या मानाने भारतीय स्त्री पोषाख स्त्रीला अधिक स्वातंत्र्य देतो. याचा अर्थ उलटाही नाही की मी जिन्स अथवा स्कर्टला चुकिचे मानतो केवळ एकाला चांगले म्हणून दुसर्‍याला वाईट ठरवणे अप्रशस्त आहे याकडे आपले लक्ष वेधावयाचे आहे असो.

आमरीकेतील एका प्रसिद्ध विद्यापिठाच्या स्थापने मागे पोशाखावरुन केलेल्या अवमानाचा का कायसा संबंध असल्याचा किस्सा मागे केव्हातरी वाचल्याचे अंधूकसे आठवते.

In reply to by माहितगार

हो स्टनफोर्ड बद्दल वाचला होता असा किस्सा. खर खोट माहीत नाही. ह्यांच्या (https://www.truthorfiction.com/stanford/) मते ती अफवा होती.

लेख पटला असे म्हणणार नाही. पण लेखिकेची तळमळ चुकीचे नाही. मला वाटते समाजात जवळ्पास पोशाखावरूनच पात्रता ठरवली जाते. कल्पना करा, जर मी इन्फी मध्ये इण्ट्रव्हुला उन्हाळ्यात बरा पडतो म्हणून पायघोळ चोळणा व सुती शर्ट किवां गुंठामंत्री स्टाऎल पांढरा शर्ट व पायजामा घालुन गेलो, तरी फक्त बुद्धीमत्तेवरुन मला घेतील ? का शेवटी याला ड्रेसिंग सेन्स नाही असेच म्हणतील ? जवळ जवळ समाजात तुम्ही काय घातलेय यावरूनच तुमची पात्रता ठरवली जाते. भर उन्हाळ्यात सुट घालून व आतुन चिंब घामाजलेल्या नवरदेवाला बघुन पण मला हाच इच्चार येतो. फर्क तो पडता ही भैय्या.. :) इथे मला तरी ते प्रातिनिधिक उदाहरण वाटले, पोशाखावरून मला तरी दुस-या चित्रातील स्त्री खानदानी, थोडा आधुनिकतेचा गंध नसलेली वाटली. अश्या स्त्रिया या आधुनिक पध्दतीला दचकणारच.. त्यात शिक्षणापेक्षा किंव्हा पात्रतेपेक्षा ते कार्ड वापरायला त्यांचे बिचकणे अधोरेखित केलेय असे मला वाटते..

In reply to by ब़जरबट्टू

मुलाखत आणि लग्न दोन्ही स्पेशल गोष्टी आहेत. त्यांचा वेगळा प्रोटोकॉल/ड्रेस कोड असतो. पण अडाणीपणाचा ड्रेस कोड साडी का असावा, हा इथे प्रश्न आहे.

In reply to by ब़जरबट्टू

या फोटोमध्ये असलेल्या काकूंबद्दल तुम्ही असच मत बनवाल. SudhaMurthy Sudha Murthy completed a BE in Electrical Engineering from the B.V.B. College of Engineering & Technology, standing first in her class and receiving a gold medal from the Chief Minister of Karnataka. Murthy completed M.E. in Computer Science from the Indian Institute of Science, standing first in her class and receiving a gold medal from the Indian Institute of Engineers.[11] Murthy became the first female engineer hired at India's largest auto manufacturer TATA Engineering and Locomotive Company (TELCO). Murthy joined the company as a Development Engineer in Pune and then worked in Mumbai & Jamshedpur as well

In reply to by कपिलमुनी

दादा, तुम्ही हा फ़ोटो सुधा मूर्ती माहित नसलेल्या १० लोकांना दाखवा, मला नाही वाटत फक्त त्यांच्या पोशाखाकडे पाहून कुणी त्या ख-या कोण आहे हे ओळखु शकेल..मला तरी वाटते, त्यांना मस्त मध्यमवर्गीय आजीच म्हणतिल ते आणि इथेच मुद्दा बरोबर ठरेल. इथे सुधाजींचा साधेपणा आहे, आणी तो त्यांचा मोठेपणा आहे. . हे उदाहरण प्रातिनिधिक नाही..

In reply to by ब़जरबट्टू

सुधा मूर्ती माहित नसलेल्या १० लोकांना दाखवा, मला नाही वाटत फक्त त्यांच्या पोशाखाकडे पाहून कुणी त्या ख-या कोण आहे हे ओळखु शकेल..

In reply to by ब़जरबट्टू

मला वाटते समाजात जवळ्पास पोशाखावरूनच पात्रता ठरवली जाते. कल्पना करा, जर मी इन्फी मध्ये इण्ट्रव्हुला उन्हाळ्यात बरा पडतो म्हणून पायघोळ चोळणा व सुती शर्ट किवां गुंठामंत्री स्टाऎल पांढरा शर्ट व पायजामा घालुन गेलो, तरी फक्त बुद्धीमत्तेवरुन मला घेतील ?
ड्रेसींग सेन्स, शिस्तीची गरज म्हणुन असलेले युनिफॉर्म, कस्टमरशी श्रोताभिमुखता म्हणून अथवा व्यवसायाची गरज म्हणुन असलेले युनिफॉर्म आणि पात्रता यांची गल्लत केली जाऊ शकत नाही. अलिकडेच मर्चंट नेव्ही बद्द्लची लेख मालीका झाली मर्चंट नेव्ही मधला चीफ इंजीअर इतर कामगारांप्रमाणेच कळकट्ट पोषाखात दिसला म्हणून त्याची पात्रता ठरु शकत नाही. बर्‍याच कंपन्यांमध्ये कामगार ते मॅनेजींग डायरेक्टर एकसारखा युनिफॉर्म असतो तेथे कामगारासारखाच पोषाख आहे म्हणून मॅनेजींग डायरेक्टरची पात्रता कमी होत नाही. इंटरव्ह्यु मध्ये बायोडाटाव्र कॉन्व्हेंटचे नाव पाहून कँडीडेटची इंग्रजी न तपासता मी एका कँडीडेट ला घेतले आणि फसलो, म्हणजे इंटरव्हयु घेणार्‍याने उलटपक्षी -जिथे कस्टमर रिलेशन चा संबंध येतो अथवा किमान स्वरुपाचा पोषाख करणे म्हणजे अगदीच अंडरवेअरवर येत नाही आहे हे पहाणे ठिक- पेहरावावरुन पात्रता ठरवण्याच्या भानगडीत ऑदरवाईज इंटरव्ह्यू घेणार्‍याने पडू नये. त्याच्या पेहरावावरुन आपण अत्यंत एबल कँडीडेट नाकारत असू शकतो. खासकरुन काही क्षमता या उच्चकोटीच्या असू शकतात एखादी व्यक्ती चांगली तंत्रज्ञ/संशोधक/ऑडीटर असू शकते पण पोषाख अजागळ अथवा बावळटासारखा करेल पण त्यावरुन व्यक्तीची पात्रता ठरत नाही. थोरले बाजीराव पेशवे उत्कृष्ट योद्धा होते हे ते धोतर घालत म्हणून त्यांची पात्रता कमी होत नाही, शिवाजी महाराजांचा पोषाख आजच्या काळासारखा नाही पण त्यांच्या अनेक गोष्टी आजही आदर्श आहेत. नानासाहेब फडणवीसांकडे अथवा चाणक्या कडे वेगवेगळ्या बुद्धीमत्ता होत्या ज्यांचा त्यांच्या पोषाखाशी काहीही संबंध नव्हता. केवळ लंगोटी धारण करणारे समर्थ रामदास दासबोध ग्रंथ लिहून गेले, महात्मा गांधी पंचा घालत. पोषाखावरुन पात्रता ठरवण्याचा आधुनिक कालीन कॉर्पोरेट प्रयत्न हा कास्ट एवजी क्लास सिस्टीमच्या स्वरुपात विषमतेचे अप्रत्यक्ष समर्थन करु इच्छित तर नाही ना अशी अशी शंका न राहणे अधिक सयुक्तीक नसेल किंवा कसे.

In reply to by माहितगार

माहितगारजी, आपण इथे आदर्शवादाबद्दल बोलत आहात असे वाटते. शिवाजी महाराज, चाणक्य, फडणवीस त्या त्या काळाप्रमाणे त्यांच्या दर्जाप्रमाणे पोशाख करत असतील ना? त्यांच्या पोशाखाचा आजच्या संस्कृतीशी संबंध कुणी करनार नाही. रामदासांप्रमाणे वेष धारण करणार्‍या हजारो सन्याशांना आजही भारतात त्यांच्या पात्रतेविषयी कोनतीच शंका व्यक्त न करता मान मिळतो. पोशाखावरुन पात्रता ठरवणे ही सार्वत्रिक प्रवृत्ती आहे, तिला स्थळ, काळ, कॉर्पोरेट की झोपडपट्टी अशा संदर्भाने बघणे योग्य वाटत नाही. पोशाखावरुन पात्रता ठरवू नये असे लहानपणापासून आपण ऐकत आलोय. होतंय कायम त्याच्या उलट. जे आहे ते आहे. प्रस्तुत पोस्टर्स कडे बघितले तर तो समाजमनाचा आरसा आहे. जाहिरात बनवनारे व बघनारे एकाच विचाराचे आहेत. इथे काहींनी जाहिरातीबद्दल आक्षेप घेतले त्यात मीही आहेच. पण थोडा विचार केल्यावर असे लक्षात आले की प्रत्यक्ष जीवनात आपण वेगळे काय करत असतो. रंग, भूषा, भाषा, शरीररचना, तोंडावळा ह्यावरुन आपण नैसर्गिकरित्या तरी एक ढोबळ मत बनवतोच बनवतो. अर्थात स्पष्टीकरण झाले की आपले गैरसमज दुर होतात. टाइपकास्ट, प्रतिमा-साचा आपल्या मनात असतोच. खाली जे पैसाताईंनी इस्रोच्या महिलांचे फोटो दिलेत. खोटं नाही सांगत पण जेव्हा केव्हा पहिल्यांदा ते फोटो बघितले होते तेव्हा थोडे खटकले होतेच. ते खटकणे नैसर्गिकपणे येते, नंतर आपण त्यावर तर्क लावून निर्णय घेऊन भूमिका बदलतो. आता प्रश्न आहे की अशा परिस्थितीत अमृता यांनी घेतलेली भूमिका चुकीची की बरोबर. तर माझ्यामते ती बरोबरच आहे. कारण आपण आदर्शवाद हाच आपला आदर्श ठेवला पाहिजे. माध्यमांचा जनमानसावर प्रभाव असतोच, त्यात जे दिसतं तेच खरं व योग्य असं मानलं जातं. वरच्या पोस्टरांमधले चित्र व भावना खर्‍या वा योग्य नाहीत, त्यांचा तसाच प्रसार होऊ देत राहणे आदर्श सामाजिक परिस्थितीसाठी योग्य नाही. कोणत्याही स्त्री-पुरुषाचे पोशाखावरुन प्रतिमा बनवू नये हे जे नेहमी सांगितले जाते तेच आपल्या वागणूकीत जास्तीत जास्त आणत राहणे हे सुजाण नागरिक म्हनून, माणुसकी म्हणून आवश्यक आहे असे वाटते.

In reply to by माहितगार

मग असे म्हणुया का, का समाज शेवटी तुमच्या पेहारावावरूनच तुमचा कालखंड, पात्रता, तुमची टेकसेव्ही कुवत ओळखतो. मी दिलेले इन्फी मुलाखातचे उदाहरण चुकीचे कसे ? शेवटी तुम्ही कपडे बघूनच सगळे ठरवताय ना ? शर्ट-सुट - चालतो, मग पांढरा स्वच्छ पायजामा का नाही ? भारतासारख्या उष्ण प्रदेशात, उसगावासारखे जोडे घालायचे काय कारण ? किती तरी लोक माझ्या पाहण्यात आहे, जे शेवटी टेबलाखाली जोडे काढून ठेवतात, पायाला घाम यांच्या येतो, आणि नाकाला सगळ्यांच्या.. :) पण शेवटी आपणच तो पोशाख ठरवलाय. चपला घालुन आलो तर मी गावंढळ ठरतो ...

In reply to by ब़जरबट्टू

मग पांढरा स्वच्छ पायजामा का नाही ?
इतरांचे माहित नाही, मला व्यक्तिशः चालतो, पोषाखावरुन मी इतरांची संधी नाकारतो असा जेव्हा विचार करतो तेव्हा मी नाण्याची एकच बाजू बघत असतो, मी समान संधी न देताच व्यक्ति पोषाखावरुन नाकारली आणि व्यक्ती उत्तम असेल तर मी माझ्या आस्थापनेलाही एक चांगला माणूस मिळण्यापासून दूर ठेवले आहे. नाही म्हणताना आपण समोरच्याच व्यक्तिला नाही स्वतःलाही नाही म्हणत असतो. नाही म्हणून मी स्वतःची संधी दवडण्यापुर्वी दोनदा विचार करेन. अनावश्यक गोष्टीवरुन भेदाभेद करण्याची स्विकारण्याची सवय झाली की त्याला अंत नाही, मी भाषा,प्रांत,धर्म,जात,वर्ण,सुरुपता असे अनेक अनावश्यक क्रायटेरीआ लावू शकतो. सगळीकडे मानसिकता एकसारखी आहे. या संकुचित मानसिकताम्च्या वर मी स्वतःस नेऊ शकतो का हे माझ्या स्वतःसाठी आव्हान आहे.

लेखिकेनं दोन्ही जोडल्यामुळे अनर्थ झाला आहे. पहिलीचा अर्थ, पतीनं पैसे भरलेले असले की पत्नीला खरेदी सोपी आहे. त्याचा मॉडेलच्या ड्रेसशी संबंध नाही (आणि ती जाहिरात मराठीत आहे!) आणि दुसरीचा अर्थ (जी इंग्रजीमधे आहे!) कमीतकमी शिकलेली स्त्री सुद्धा ते वापरु शकते. So easy even she can use it' . कमीत कमी शिकलेली जाहिरातीत कशी दाखवणार ? म्हणून त्यांनी कामवाल्याबाई सदृष स्त्री दाखवली आहे. याचा अर्थ `साडी नेसणारी अडाणी असते' असा कदापी होत नाही. `साडी नेसणारी अडाणी असते' हा लेखिकेच्या मनातला अर्थ आहे. आणि तो तिथल्या मॅनेजरनं (दुर्दैवानं ) लेखिकेला हवा तसाच काढला आहे. थोडक्यात, लेखिकेनं (किंवा मॅनेजरनं) साध्या अर्थाचा विपर्यास केला आहे. इतक्या साध्याश्या गोष्टीसाठी `साडी अस्मिता' जागृत होणं म्हणजे फारच झालं !

In reply to by विवेक ठाकूर

एकंदरीत काय तर हा असा पोशाख फक्त कामवाल्या (शहरात) बायाच करतात असे म्हणणे आहे तुमचे. ती बाई कमीत कमी शिकलेली आहे हे दाखवण्याचा एकमेव मार्ग तिला पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाख घालणे हा आहे का?

In reply to by अमृता_जोशी

कमीत कमी शिकलेली आहे हे दाखवण्याचा एकमेव मार्ग तिला पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाख घालणे हा आहे का? हाच तर प्रॉब्लेम आहे ना!! आणि आपलेच लोक ते सहज स्वीकारतात. मध्यंतरी 'बा बहू और बेबी' नामक मालिकेत काही समारंभाखातर नऊवारी नेसलेल्या बाईचा उल्लेख, "वो देखो हमारी कामवाली जैसी साडी पहनी है" असा केला होता. आता नऊवारी नेसणार्‍या आज्या पणज्या मोलकरणी होत्या का?

In reply to by अमृता_जोशी

आणि `साडी नेसलेली म्हणजे अडाणी' हा तुमच्या मनातला अर्थ नाही का ? तुम्ही डायरेक्ट `पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय'? इतकं भारी टायटल का दिलंय ? तसंच बघायचं झालं तर पहिल्या जाहिरातीबद्दल एखाद्या कमावत्या स्त्रीचा आर्थिक स्वाभिमान दुखावू शकतो ! थोडक्यात, इतकं सिरियस व्हायचं कारण नाही .

In reply to by विवेक ठाकूर

काका.. मनातला अर्थ कुठुन आला? तिथे लिहीलय ना की "even she can use it". ह्याचा सरळ अर्थ हिला पण येतंय पहा.. असा होत नाही का? शिवाय त्यांनी विचारलं की तिथल्या मॅनेजरला की बाबा असं का? तर त्याच्याही तोंडचं वाक्य हेच आहे की त्या मॉडेलचे कपडे वगैरे वरुन ती अडाणी आहे असं वाटतय..

In reply to by पिलीयन रायडर

याचा अर्थ कमीतकमी शिकलेली सुद्धा ते कार्ड वापरू शकते इतकाच मर्यादित आहे . पण लेखिकेनं साडी नेसलेली म्हणजे अडाणी असा उलट अर्थ काढलायं, तो मनाचा आहे . शिवाय अशी कमेंट पंजाबी ड्रेसवालीला का नाही ? असा अनाठायी मुद्दा काढलायं ते वाचलं का ? तद्वत लेखाचं शीर्षक पुरेसं बोलकं आहेच .

In reply to by विवेक ठाकूर

याचा अर्थ कमीतकमी शिकलेली सुद्धा ते कार्ड वापरू शकते इतकाच मर्यादित आहे. पण लेखिकेनं साडी नेसलेली म्हणजे अडाणी असा उलट अर्थ काढलायं, तो मनाचा आहे . शिवाय अशी कमेंट पंजाबी ड्रेसवालीला का नाही ? असा अनाठायी मुद्दा काढलायं ते वाचलं का ?
पण प्रश्न तसाच आहे; ती "कमीतकमी" शिकलेली आहे, हे कश्यावरून?

In reply to by अमृता_जोशी

ती "कमीतकमी" शिकलेली आहे, हे कश्यावरून? So easy even she can use it असं जाहिरातीतच म्हटलंय. तुम्ही पारंपारिक वेशातली स्त्री अडाणी असते असा सरसकट अर्थ काढल्यानं तुम्हाला त्रास होतोयं. सरळ विचार करुन पाहा : `कमीतकमी टेक्नो सॅवी स्त्री सुद्धा ते कार्ड वापरू शकते' इतका मर्यादित अर्थ जाहिरातदाराला अपेक्षित आहे. तुम्ही त्याही पुढे जाऊन मॅनेजरला म्हटलंय : So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत." याचा अर्थ तुम्हाला So easy विषयी काहीही देणंघेणं नाही. तुमचा फोकस मॉडेलनं काय कपडे घातलेत यावर आहे. आणि तुम्हाला वाटतंय की साडी नेसलेली अडाणी तर पंजाबी ड्रेसवाली हुशार कशी ?

In reply to by विवेक ठाकूर

`कमीतकमी टेक्नो सॅवी स्त्री सुद्धा ते कार्ड वापरू शकते' इतका मर्यादित अर्थ जाहिरातदाराला अपेक्षित आहे. \ जे ब्बात !

In reply to by ब़जरबट्टू

असं बघा पुर्वीच्या मराठी पिच्चरामधे, हीरोला आधी गावंढळ म्हणुन लेंगा सदरा किंवा साधा वरुन घालायच्या शर्टात दाखवायचे मग तो हीरो शहरात (मुंबै) जावुन टी-शर्ट आणी बेल्बॉट्म घातली की शहरी किंवा इस्मार्ट वगैरे वगैरे. असपण महाराष्ट्रीयतेरांची मान-सिक-ता बदलणे सोपे नाही.

In reply to by अमृता_जोशी

कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का? जर सगळे व्यवसाय महत्वाचे आहेत असं आपण म्हणत असू तर एखाद्या बाईचा पेहराव कामवाल्या बाईसारखा दाखवलाय असं पाहिल्यावर राग का यायला पाहिजे? इतर व्यवसायांप्रमाणे तोही एक व्यवसाय आहे. शहरांमध्ये तर अत्यंत आवश्यक व्यवसाय म्हणायला हरकत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

इवन शी कॅन युज ह्यावर आक्षेप आहे. तिचा पेहराव आणि ते वाक्य दोहोंचा मिळून अर्थ काय ह्यावर आक्षेप आहे.

In reply to by तर्राट जोकर

पण फक्त वाक्याला. पेहरावाला नाही. Even she can use it चा माझ्या मते अर्थ - स्त्रिया सुद्धा वापरु शकतात असा आहे. म्हणजे स्त्रिया by default tech challenged असतात असं गृहीत धरलेलं आहे. माझा आक्षेप त्याला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

हा ही मुद्दा चांगला आहे. त्यांचं डेमोग्राफिक्स हे स्टिरिओटाईप्स वर आधारीत आहे. टेक सॅव्ही नसलेल्या ग्रुप ला पण सोपं असं दाखवायचं असेल तर आजी आजोबा वगैरे गृप पण चालू शकतो.

In reply to by बोका-ए-आझम

कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का?
अजिबात नाही, पण ती नेहमी मराठीच असली पाहिजे का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे.

In reply to by सूड

हे तुम्हाला मान्य आहे तर मग ती नेहमी मराठीच असली पाहिजे का हा प्रश्नच उद्भवत नाही. आणि समजा कोणी तशा हेतूने दाखवत असेल तर त्यावर react होऊन अशा लोकांना जास्त महत्व देण्यात काय अर्थ आहे?

In reply to by बोका-ए-आझम

कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का?
हो..
जर सगळे व्यवसाय महत्वाचे आहेत असं आपण म्हणत असू तर एखाद्या बाईचा पेहराव कामवाल्या बाईसारखा दाखवलाय असं पाहिल्यावर राग का यायला पाहिजे?
सगळे व्यवसाय समान दर्जाचे/प्रतिष्ठेचे आहेत हे मी मानत नाही; महत्वाचे आहेत एवढे मान्य. कितीही समान आहे म्हटले तरी मोलकरीण आणि पंतप्रधान यांच्यात किंचितसा फरक असतोच..

In reply to by अमृता_जोशी

सगळे व्यवसाय समान दर्जाचे/प्रतिष्ठेचे आहेत हे मी मानत नाही; महत्वाचे आहेत एवढे मान्य. कितीही समान आहे म्हटले तरी मोलकरीण आणि पंतप्रधान यांच्यात किंचितसा फरक असतोच..
काय फरक आहे? देशाला दोन्हीची गरज आहे. तुम्ही मिळणाऱ्या पगारावरून म्हणत असाल तर पंतप्रधान काही देशातले highest paid person नाहीत. मग दर्जा कमी असं जे तुम्ही म्हणत असाल तर ते कशावरून? कामाचा दर्जा ठरवण्याचे तुमचे निकष काय आहेत?

In reply to by बोका-ए-आझम

त्या कामातून मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा हीच त्या कामाचा दर्जा ठरवते. (अर्थात; मोलकरणीला जर पंतप्रधान इतकी प्रतिष्ठा मिळाली तर माझे मतपरिवर्तन होईल.)

In reply to by अमृता_जोशी

ही आर्थिक प्राप्तीशी थोड्याफार प्रमाणात निगडीत असतेच आणि त्यात मागणी आणि पुरवठ्याचं गणितही येतं. जेव्हा घरकाम करणाऱ्यांची संख्या ही त्याला असलेल्या मागणीपेक्षा कमी होईल तेव्हा त्याला तुम्ही म्हणताय तशी सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. याचा अर्थ सामाजिक प्रतिष्ठा ही सापेक्ष आहे. म्हणजेच ती मानणं किंवा न मानणं हे आपल्या हातात आहे. तुम्हाला तुमच्या या गृहीतकामुळे तो फोटो पाहून राग आला. त्यामुळे ज्यांनी ती जाहिरात बनवलेली आहे त्यांचा त्याच्यामागचा दृष्टिकोन समजल्याशिवाय त्यांच्यावर चिडणं चुकीचं आहे असं माझं मत आहे. कृपया व्यक्तिगत घेऊ नये.

In reply to by बोका-ए-आझम

कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का? हो, भारतात तर आहेच आहे. पण जाहिरातीत दाखवलेली बाई कामवाली आहे, हे कसे ठरवले ?

In reply to by ब़जरबट्टू

भारतात मानला जातो. आणि त्या स्त्रीला कामवाली बाई मी नाही, लेखिका समजताहेत. त्यावरूनच राग आला ना त्यांना.

In reply to by विवेक ठाकूर

विठांशी यावेळी सहमत. दोन वेगवेगळ्या जाहिराती आहेत. मॉडेलने काय कपडे घालावे वा काय नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य जाहिरात बनविणार्‍याला आहेच. झालेच तर साडी हा काही फक्त महाराष्ट्रातील पारंपारिक पेहराव नाहिये. अनेक राज्यातील स्त्रियांचा तो पारंपारिक पेहराव आहे.

In reply to by विवेक ठाकूर

अडाणी बाई हा प्रकार दाखवणे म्हणजे माझ्या मते चांगले नाही. Targeted जाहिरात असती तर त्यांत काही चुकीचे वाटत नाही. पण जाहीररित्या कुणाला अडाणी, लट्ठ इत्यादी इत्यादी दाखवणे बहुतेक करून जाहिरात वाले टाळतात. जाहिरातीचा प्रमुख उद्येश जर जास्त ग्राहकांना प्राप्त करणे आहे तर त्या कामात हि जाहिरात असफल ठरली आहे. मी तरी त्यांची वस्तू विकत घेणार नाही.

कपड्यावरून पात्रता ठरवता येत नाही. तसे कपडे घातलेली सर्व माणसे अडाणीठरवणे योग्य नाही हे मान्य. पण याचा व्यत्यासदेखिल खरा ठरवून जाहीरातदाराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करणं अमान्य. जाहीरातीत देखिल छोटिशी का होइना आपली एक कथा असते पात्र असतात, तसच त्यात जाहिरातदाराने एक अडाणी बाइचं पात्र घेतलं आणी तिला तसे कपडे घालायला दिले आणि सांगितलं की हिला देखिल कळलं तर त्यात काय गैर आहे. असं म्हणायला लागलात तर सर्व चित्रपट , मालिकांना आरोपी करता येइल.

In reply to by बाळ सप्रे

असं म्हणायला लागलात तर सर्व चित्रपट , मालिकांना आरोपी करता येइल
पण मालिकेत फक्त अडाणी बायकाच साडी परिधान करतात असे दाखवले तरंच तसे म्हणता येईल.

कपडे सोडून इतर इखादी जरी गोष्ट या जाहिरातीत अशी असती जिच्यावरून असे वाटावे की हि बाई अडाणी किंवा मोलकरीण आहे तरी समजू शकले असते; पण फक्त महाराष्ट्रीयन पोशाख घालून उभी केलेली बाई अडाणी/गांवढल/मोलकरीण आहे असे वाटत नाही.
असं म्हणायला लागलात तर सर्व चित्रपट , मालिकांना आरोपी करता येइल.
चित्रपट/मालिकांमध्ये आणि छापील जाहिरातींमध्ये फरक असतो.

In reply to by अमृता_जोशी

जाहीरातीतले ते एक पात्र मराठी अडाणी बाइ आहे .. याचा अर्थ सर्व तशा पोशाखातल्या बायका अडाणी असतात असे त्या जाहीरातदाराला/ कंपनीला म्हणायचय हा तुम्ही काढलेला अर्थ म्हणजे प्रचंड विपर्यास आहे. कै च्या कै !!! आणी याचा निषेध त्या स्टोअर मॅनेजरवर आरडाओरडा करून करणे म्हणजे तर कहर आहे.. या धाग्यावर इतक्या जणांची याला सहमती पाहून तर फारच चक्रावलो !!

In reply to by बाळ सप्रे

एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून सांगायची?
जाहीरातीतले ते एक पात्र मराठी अडाणी बाइ आहे
पण ती बाई अडाणी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी पोशाख सोडला तर इतर काहीच वापरलं नाही. फक्त तसे कपडे घातले की ती अडाणी झाली का?
आणी याचा निषेध त्या स्टोअर मॅनेजरवर आरडाओरडा करून करणे म्हणजे तर कहर आहे.
मी आरडा ओरडा केला म्हणून त्या जाहिराती त्याने काढून टाकल्या.

In reply to by अमृता_जोशी

"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे." "ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.
इथे तर तो नुसतं म्हणतोय. काढून कुठे टाकल्या आहेत जाहिराती?

In reply to by अमृता_जोशी

एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून सांगायची?
बोंबलण्यापेक्षा मुद्देसूद बोला :-)
पण ती बाई अडाणी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी पोशाख सोडला तर इतर काहीच वापरलं नाही. फक्त तसे कपडे घातले की ती अडाणी झाली का?
प्रत्येक वेळा सगळं उघडं करुन सांगायची गरज नसते. "even she can understand " यात ती अडाणी आहे हे आधी ठरलय ..ती अडाणी दाखवण्यासाठी हे कोर्टात सिद्ध करण्याइतके पुरावे देण्याची काहिही गरज वाटत नाही. आणि याचा अर्थ " तशा कपड्यातल्या सगळ्या बायका अडाणी" असा तुम्ही घेताय, जाहिरातदार नाही.
मी आरडा ओरडा केला म्हणून त्या जाहिराती त्याने काढून टाकल्या.
याचा अर्थही तुमचे म्हणणे पटले म्हणून तुम्ही घेत असाल, पण त्याने कामाच्या वेळी कुठे तुमच्याशी निरर्थक वाद घालत बसणार अशा कारणाने केले असण्याची शक्यता जास्त आहे.. :-)

अमृता,हाच आक्षेप मी आमच्या इथल्या स्टार बाजारमध्ये घेतला होता.माझ्या पतीनेही मला पाठिंबा देऊन लेखी तक्रार दाखल करुन ही जाहिरात काढून टाकायला लावली होती.त्यावेळी तिथे हजर असलेल्या बायकांनीही पाठिंबा देऊन त्या तक्रारीवर सह्या केल्या होत्या.

चांगला इस्त्रीचा शर्ट-पॅंट असा पोषाख असुनसुद्धा केवळ शर्ट इन केला नाही म्हणुन मी गावंढळ ठरलो गेलोय कोणे एके काळी....

मॅनेजर वा इनचार्ज काय म्हणाला ते बाजूला ठेवलं तरी जर तिच्या पोशाखावरुन ती बाई अडाणी आहे हे सिध्द होत नसलं तरी ती अडाणी नाही असंही सिद्ध होत नाही ना. आणि मुळात मॉडेल अडाणी आहे कि नाही हे महत्वाचं नाही, तिनं तो रोल केलाय अडाणी असण्याचा. आणी तो साडी घालून केलाय इतकच. नेमका मुद्दा काय आहे ? १) एकही बाई अडाणी नसतेच असं म्हणायच का ?(म्हणजे मुळात बाईला अडाणी का दाखवलं म्हणून वाद आहे का ?) २) की अडाणी बाई साडी नेसत नाही असं म्हणायचं आहे (साडी नेसणारी प्रत्येक बाई अडाणी नसेल, प्रत्येक अडाणी बाई साडी नेसत नसेल, पण म्हणून साडी नेसणारी अडाणी बाई अस्तित्वाच असू शकत नाही असं म्हणायचं का ?) आणि जर हे दोन्ही मुद्दे नसतील तर हा धागा अगदीच निरुद्देश होत नाही का ?

In reply to by मराठी कथालेखक

आणि मुळात मॉडेल अडाणी आहे कि नाही हे महत्वाचं नाही, तिनं तो रोल केलाय अडाणी असण्याचा
आणि अडाणी असण्याच्या रोलसाठी फक्त साडी घातली आणि काही महाराष्ट्रीयन दागिने, बांगड्या घातल्या की झालं; इतर काही करायची गरज नाही.
१) एकही बाई अडाणी नसतेच असं म्हणायच का ?(म्हणजे मुळात बाईला अडाणी का दाखवलं म्हणून वाद आहे का ?)
अजिबात नाही.
की अडाणी बाई साडी नेसत नाही असं म्हणायचं आहे (साडी नेसणारी प्रत्येक बाई अडाणी नसेल, प्रत्येक अडाणी बाई साडी नेसत नसेल, पण म्हणून साडी नेसणारी अडाणी बाई अस्तित्वाच असू शकत नाही असं म्हणायचं का ?) आणि जर हे दोन्ही मुद्दे नसतील तर हा धागा अगदीच निरुद्देश होत नाही का ?
शोर्ट स्कर्ट घालणारी अडाणी बाई अस्तित्वात असेल काय?

In reply to by अमृता_जोशी

करिष्मा आणि करीना कपूर ८ वी पास आहेत. शिक्षण पात्रताच बघायची असेल तर उत्तमोत्तम कपडे घालुन पण त्या कमी शिकलेल्याच आहेत : सर्वसाधारण भाषेत अडाणी. कामवाल्या बायका पण १० वीतुन शाळा सोडलेल्या वगैरे असतात. आणि बौद्धीक पात्रते बद्दल बोलायचं असेल तर प्रत्येकाचा इंटेलेक्ट वेगळा. कामवाल्या बायकांमध्ये व्यावहारीक शहाणपण तुमच्या आमच्या पेक्षा जास्त असतं.

In reply to by अमृता_जोशी

आणि अडाणी असण्याच्या रोलसाठी फक्त साडी घातली आणि काही महाराष्ट्रीयन दागिने, बांगड्या घातल्या की झालं; इतर काही करायची गरज नाही.
इतर काय करणार अजून ?आणि साडी , महाराष्ट्रीयन दागिने घातलेली स्त्री अडाणी असूच शकत नाही असे नाही ना ? मग दाखवली अशी एखादी स्त्री तर काय चुकलं ?
शोर्ट स्कर्ट घालणारी अडाणी बाई अस्तित्वात असेल काय?
असेल की, न असायला काय झालं ? पुढे कुणी तशीही स्त्री (शोर्ट स्कर्ट घालणारी अडाणी) दाखवेल एखाद्या जाहिरातीत वा कलाकृतीत. हरकत नाही.

"पारंपारीक पोषाख केलेली बाई अडाणी असते" असा एक चुकीचा संदेश जातोय त्यातुन असं त्यांच म्हणणं आहे.. असं मला वाटतय !!

मुळात (माझ्या २ वर्षापुर्वीच्या अनुभावरुन सांगत आहे) औरंगाबाद मध्ये रिलायन्स हे स्टार पेक्षा स्वस्त (अगदी Dairy Milk chocolate वर पण छान सूट असते हो.) आणि मस्त (ऐसपैस, बिलिंगला कमी वेळ लागतो, ट्रॉलीतून स्वतः वस्तू उचलून बिलिंगला घेणारा स्टाफ) आहे, त्या आधारावर स्टारमध्ये उगाचच गर्दी करणारे सगळेच माझ्यामते अडाणी असले पाहिजेत :)

In reply to by मराठी कथालेखक

स्टार बाजारात जरा बरं आणि बर्‍याच गोष्टी एकाच ठिकाणी आणि उगाच वाटतं जरा स्वस्त आहेत. मला त्या स्टारबाजारात पाय ठेवावा वाटत नाही. तिथे उगाच किराणा दुकानात आल्याचा फिल येतो. ;) आमच्या प्रोझोन मॉलला खुपच चांगले दिवस आले आहेत. मी आपला विंडो शॉपिंगसाठी हमखास जातो. ;) -दिलीप बिरुटे

इतके सगळ्यांनी लिहिलेच आहे तर माझेही २ पैसे...कोण कसे कपडे घालतो/ते त्यावरूनच लोक त्या व्यक्तीची पारख करतात...ड्रेसकोडवाली जागा असो वा नसो...सगळ्यात नॉर्मल उदाहरण म्हणजे पाखरे ज्या टाईपने वेगवेगळ्या मुलांबरोबर वेगवेगळ्या पध्धतीने वागतात...तस्मात बहुतांश बायकाच कोणी कसे कपडे घातले आहेत त्यावरून त्या व्यक्तीशी कसे वागायचे ठरवतात

'So easy even she can use it' आलिया भट ह्या जाहीरातीसाठी फिट होती.

In reply to by मार्मिक गोडसे

आलिया भट ह्या जाहीरातीसाठी फिट होती
पण आलिया भट्ट साडीमध्ये खूप गोड दिसते (२ States मध्ये) म्हणून तिला साडी नेसवूनच जाहिरात केली तर पुन्हा पंचाईत होईल :)

तुम्ही साडीच काय बोलताय , आमच्या इमारतीत बर्‍याचश्या कामवाल्या बाया ह्या 2 व्हीलर वरुन येतात आणि बहुतेक जणी पंजाबी ड्रेस घालतात , आता बोला :)