Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Anand More on Fri, 02/12/2016 - 17:35
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
लेख
मत
विरंगुळा
ही लेखमाला वाटली, तरी प्रत्यक्षात ३ आणि ४ ऑक्टोबर २०१५ रोजी मंदार काळे ऊर्फ रमताराम आणि माझी फेसबुकवर जे साद प्रतिसाद झाले त्यांची तीन भागातील मालिका आहे. यातील संदर्भ समजून घ्यायचा असेल तर रमतारामांची मिपावर पूर्वी प्रसिद्ध झालेली राशोमोनवरची जंगलवाटांवरचे कवडसे ही आठ भागांची लेखमाला वाचायला हवी. संदर्भ सोडून वाचल्यास कदाचित फक्त पहिला भाग थोडा कठीण जाईल पण किंचित प्रयत्नाने दुसरा आणि तिसरा भाग मात्र समजू शकेल. ------------------------------------- जेंव्हा आपण शिक्षकाच्या खिजगणतीत देखील नसतो तेंव्हा त्यांचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो पण जेंव्हा तो शिक्षक आपण बेसावध असताना अख्ख्या वर्गासमोर एकदम "हां, तू पुढे ये रे, तुला हे माझ्यासाठी करायचे आहे" असे सांगतो तेंव्हा आपली जी काही पाचावर धारण, तंतरणे, बोबडी वळणे, पोटात खड्डा पडणे अश्या शब्दात व्यक्त होण्यासारखी अवस्था होते, तशीच काहीशी अवस्था आज सकाळी मंदार काळेंचे नोटिफिकेशन पाहून मी अनुभवली. नेमका मोकळा वेळ होता आणि बऱ्याच दिवसापासून मनात ठरवून ठेवलेली कामगिरी काळे गुरुजींनी सोपवली म्हणून गांगरलेल्या अवस्थेतही आनंद झाला. आणि राशोमोनच्या मागे लागलो. काही काही गोष्टी जुळून येतात. मी आधीच राशोमोन पाहिलेला असता तर कदाचित तो मला इतका भिडलादेखील नसता. पण माझ्या सुदैवाने मी आधी तुमची लेखमाला वाचली आणि मग चित्रपट यु ट्युबवर पाहिला म्हणून मी त्याला एका वेगळ्या पातळीवर अनुभवू शकलो. कदाचित मी शब्दचित्र समजणारा माणूस असीन आणि तुम्ही अतिशय चांगले शब्दचित्रकार असल्याने चित्रपट पाहताना त्यातील बारकावे, त्यात वापरलेली प्रतीकांची भाषा, दिग्द्शर्काचे चित्रभान आणि पटकथेची रंगत अगदी चटकन समजत होती. एका जाणकार रसिकाकडून एखादा चित्रपट पूर्ण समजून घेऊन मग तो पाहण्याचा माझा हा माझा पहिलाच अनुभव आणि तो कमालीचा आनंददायी होता. हा कल्पनातीत आनंद माझा अगदी हात धरून आग्रहाने भरभरून दिल्याबद्दल तुमचे आभार, अगदी मनापासून आभार. तुमच्या लेखमालेबद्दल बोलायचे झाल्यास मला त्याचे दोन भाग दिसतात. एक म्हणजे तुमचे अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक प्रास्ताविक जे पहिल्या लेखात आहे आणि दुसरा म्हणजे तुम्ही संपूर्ण चित्रपटाचे केलेले वर्णन जे उरलेल्या सात भागात आहे. सत्य निश्चिती / प्रस्थापना लेखमालेचे प्रास्ताविक तुमच्या व्यासंगाची प्रचीती देणारे आहे. एखादी गोष्ट सत्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या तुम्ही पाच पद्धती सांगितल्या आहेत. १) सिद्ध करूच द्यायचे नाही, आणि हे स्वयंसिद्ध आहे म्हणूनच सत्य आहे असेच मांडायचे. २) जे आपण समजतो ते आपल्या मनात नैसर्गिकरीत्या आले म्हणजे ते सत्यच असणार ही समजूत. ३) जे विश्वासार्ह व्यक्तींकडून आले ते सत्य असणारच ही समजूत. ४) जास्तीत जास्त लोक जे मानतात ते सत्य असे लोकशाहीसारखे सत्य. ५) जास्तीत जास्त लोक जे सत्य मानत असतील असा आपला समज असतो ते आपोआपच आपल्याला सत्य वाटू लागते. यात मला अजून एक सांगावेसे वाटते की सर्वसामान्य माणूस त्याच गोष्टीला सत्य म्हणून मान्यता देतो जी त्याला त्याच्या परंपरांच्या सरळ रेषेत ठेवता येते. उदाहरणार्थ सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक दही हंडी उत्सव, सार्वजनिक नवरात्रोत्सव; मान्य करायला आपल्याला प्रेषिताची गरज लागली नाही कारण हे सगळे आपल्या परंपरांच्या सरळ रेषेत होते. हे सत्य चटकन प्रस्थापित होते कारण ते परंपरांच्या सरळ रेषेत असते. परंपरांना छेद देणारी गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यासाठी आपल्याला प्रेषितांची गरज भासते. असे प्रेषित जे केल्या कामाची फळे चाखत नाहीत, बलिदान देतात किंवा मग त्यांच्या कामाला त्यांच्या हयातीतच इतकी प्रचंड फळे येतात की त्यांनी चाखलेली फळे नगण्य वाटू लागतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, मोझेसने त्याच्या हयातीत ज्यू लोकांना इजिप्त मधून बाहेर काढले नसते आणि यहोवाच्या प्रार्थनेत वळवले नसते तर अजून हजारो वर्षे ज्यू लोक इजिप्शियन देवांची पूजा करत गुलामीचे जीवन जगणे सत्य मानत राहिले असते. जर येशूने नवा करार आणला नसता तर ख्रिश्चन जुन्या कराराखाली ज्यू म्हणूनच जगणे सत्य मानून राहिले असते. जर मुहम्मदांनी त्यांच्या हयातीत जेरुसलेमच्या दिशेने प्रार्थना करणे बंद करून मक्केची दिशा पकडली नसती तर आजही मुस्लिम समाज जेरुसलेमच्या दिशेने नमाज अदा करणे आपल्या ईश्वराप्रती समर्पणाची सत्य अभिव्यक्ती आहे असे समजून राहिला असता. किंवा अनेक अरबी टोळ्या काबाच्या देवालयात आपापल्या कुल / टोळी देवतेच्या मूर्तीची पूजा करत राहिल्या असत्या. परंपरांना छेद देणारी गोष्ट प्रेषिताशिवाय गळी उतरवण्याचा प्रयत्न केला की त्या पुन्हा पुन्हा डोके वर काढीत रहातात. मग ती सतीबंदी असो किंवा अस्पृश्यता असो किंवा जाती प्रथा असोत. एका झटक्यात प्रवाहाचे सत्य बदलत नाही, त्यासाठी प्रेषिताचे बलिदान लागते किंवा विजयी संस्कृतीचा पराभूतांवर सर्वंकष विजय लागतो. सत्याचे अन्वेषण / आकलन या प्रस्तावनेत तुम्ही सत्याचे खंडश: प्रकट होणारे आणि अंशात्मक सत्य (या ठिकाणी मला 'अंशतः सत्य' हा शब्द जास्त चपखल वाटतो) असे दोन प्रकार सांगितले आहेत, ते या विषयावर मी आत्तापर्यंत वाचलेले सर्वात परिष्कृत विचार आहेत. सत्याचे अन्वेषण करण्याच्या संदर्भात आपण जी मते मांडली आहेत त्या संदर्भात मला अजून एक सांगावेसे वाटते की, एखाद्या गोष्टीचे आकलन आपल्याला ज्ञानेन्द्रीयांद्वारे होते. म्हणजे ज्ञानेन्द्रीयांद्वारे घटना आपल्याला जाणवतात. ही ज्ञानेंद्रिये सगळ्यांना सारखी असतील याची खात्री नाही. त्यामुळे डोळस, आंधळा, रंगांधळा यांची होणारी फसगत आणि त्यामुळे होणारे सत्याचे अपूर्ण दर्शन हा मुद्दा आपण छान मांडला आहे. त्यापुढे जाऊन मी असे म्हणीन की, जरी आपण सर्व साक्षीदारांना सर्व ज्ञानेंद्रिये सारख्याच क्षमतेची दिली, त्यांची आकलनक्षमता सारखीच असू दिली तर त्या सर्वांना होणारे सत्याचे दर्शन सारखेच असले तरी ते पूर्ण सत्य असेल याची खात्री नाही. कारण ज्ञानेद्रीयांची सत्य ग्रहण करण्याची मर्यादा हा मुद्दा आपण विचारात घेतला नाही. आत्ता या क्षणी माझ्या घरात आम्ही पाच जण नाक, कान, डोळे यांची पूर्ण क्षमता वापरू शकणारे असलो तरीही आम्ही या क्षणी घरात फिरणाऱ्या रेडीओ लहरींना रेडीओ न लावता ऐकू शकत नाही आणि केबल कनेक्शन व टी व्ही शिवाय आम्हाला वेढून टाकणाऱ्या टी व्हीच्या लहरी आम्हाला जाणवत नाहीत. पूर्ण विकसित ज्ञानेंद्रिय असून देखील आम्हा पाचजणांना या लहरींचे सत्य अस्तित्व जाणवत नाही. थोडक्यात आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा हा देखील आपल्याला सत्याचे संपूर्ण स्वरूप समजून घेण्याच्या मार्गातील अडथळा असतो. सत्याचे प्रकटीकरण जी गत ज्ञानेन्द्रीयांची तीच गत कर्मेंद्रियांची. जर जाणवलेच अर्धे मुर्धे, त्यातले आकळलेच अजूनही थोडे मग त्याचे पुन्हा प्रकटीकरण करण्यासाठी वापरायची साधने शब्द, चित्र, शिल्प, नृत्य, अभिनय अशी एकांगी आणि तुटपुंजी तर मग आपल्यासमोर प्रकटलेले सत्य इतरांसमोर जसेच्या तसे प्रकट करण्यात आपण अपयशी ठरलो नाही तरच नवल. वर ते सत्य जर आपल्या स्वतः संबंधी असेल तर मग अहंकार आणि स्व- प्रतिमा प्रेम, जाणवलेल्या सत्यावर आरूढ होतात. समाजाने मानलेल्या आदर्शांप्रमाणेच आपले वागणे होते हे दाखवण्याच्या नादात आपण जे प्रकट करतो ते जाणवलेले सत्य (experienced truth) नसून आपण उत्पादन केलेले सत्य (manufactured truth) असते. जंगल वाटांवरचे कवडसे चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र म्हणजे एकच प्रसंग विविध व्यक्तींच्या दृष्टीकोनातून वेगवेगळा दिसत असताना त्यातले त्या प्रसंगाचे सत्य स्वरूप कोणते मानायचे? हा आहे. आणि मग या मध्यवर्ती सूत्राची, तुम्ही, मला माहित नसलेला बंडखोर हा प्रवचन संग्रह, माझ्या आवडीच्या, जी एंच्या ठिपका, कळसूत्र, विदूषक आणि यात्रिक या कथांबरोबरच ऑस्कर वाईल्डचा डोरायन ग्रे; या विविध संदर्भांबरोबर, केलेली गुंफण तुमच्यातील सृजनशीलतेची साक्ष देणारा आहे. इथे एक प्रश्न येतो की, सृजनशीलता म्हणजे तरी नक्की काय? दोन गोष्टींमधला संबंध चटकन जाणवत नसला तरीही तो उलगडून दाखवणे किंबहुना विस्कळीत, स्वयंपूर्ण गोष्टींना एका सूत्रात गोवून त्यांची एक सुसंगती निर्माण करणे म्हणजेच सृजनशीलता. जेंव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीचे सृजन करीत असतो तेंव्हा प्रत्यक्षात विस्कळीत आणि स्वयंपूर्ण गोष्टींना एकत्र रचत असतो. जितकी आपली रचना मनाला सुसंगत वाटते तितकी ती कृत्रिम न वाटता सत्य वाटू लागते. या अर्थाने सृजन हे देखील एक प्रकारे सत्यापलाप ठरते. परंतू स्वभावतः विसंगत गोष्टींमध्ये सुसंगती मानून त्यात अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची मानवाची प्रवृत्ती नैसर्गिक असल्याने आपण सृजनशीलतेला सत्याचा अपलाप करणारा दुर्गुण न मानता; निरर्थक सत्याला मान्य करण्यासाठी, त्याची दाहकता कमी करण्यासाठी निसर्गाने माणसाला दिलेले वरदान समजूया. या अर्थाने जेंव्हा मी संपूर्ण लेखमालेचे शीर्षक वाचतो तेंव्हा मला खरेच तुमच्या समर्पक शब्दयोजनेने अतिशय आनंद होतो. आपला सत्याला जाणण्याचा प्रवास म्हणजे, जंगलात पडलेल्या पाचोळ्यात जन्म घेऊन त्या पाचोळ्यातच मरण पावणाऱ्या क्षुद्र किड्याने, प्रकाशाच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने तयार झालेल्या कवडश्यांकडे पाहून त्या प्रकाशाचा स्त्रोत कसा असेल याचे आडाखे बांधण्यासारखा आहे. भलेही आपण या सत्यान्वेषणामध्ये असफल होऊ आणि भलेही जी एंच्या यात्रिक मधला न्हावी सॅंचोला सांगत असेल की 'शेवटी अंधारात सगळीच मांजरे काळी'. तरीही प्रकाशात ती कशी दिसत असतील याचा शोध आपण घेतच राहू. मग तो प्रकाश कवडशांच्या रूपात का असेना. क्रमश
  • Log in or register to post comments
  • 40908 views
  • राशोमोन (भाग - २) चित्रपट
  • राशोमोन (भाग - ३) भिक्षू

Book traversal links for राशोमोन (भाग - १) प्रास्ताविक

  • राशोमोन (भाग - २) चित्रपट ›

प्रतिक्रिया

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 02/15/2016 - 15:21

In reply to हायला. मला वाटले पिरातैला तरी by अभ्या..

Permalink

Sarcasm?! ;)

Sarcasm?! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Mon, 02/15/2016 - 15:15

In reply to मोरे.. मला तुमचा लेख खरंच by पिलीयन रायडर

Permalink

हो. ह्या लेखाचा संदर्भ

हो. ह्या लेखाचा संदर्भ लागण्यासाठी ररांचे मूळ लेखन वाचल्याने जास्त मदत होईल कारण हा लेख त्यांच्या मुलाच्या आठ भागांच्या लेखमालेतल्या पहिल्या लेखावरचे माझे विचार आहे. आणि माझे हे तीनही लेख म्हणजे ररांच्या मूळ लेखनावर मी दिलेला प्रतिसाद आहे. त्यामुळे चित्रपट बघणे, ररांचे मूळ लेखन वाचणे आणि मग माझे विचार वाचले तर कदाचित तुम्हाला संदर्भ जवळून जाणवतील. या चित्रपटाचे माझे आणि ररांचे आकलन वेगळे आहे, जे मी दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात मांडले आहे. त्यामुळे या लेखमालेताला हा पहिला भाग सोडून देणे आणि फक्त चित्रपट बघून दुसरा आणि तिसरा भाग वाचणे हा देखील एक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Mon, 02/15/2016 - 15:16

In reply to हो. ह्या लेखाचा संदर्भ by Anand More

Permalink

मूळच्या***

मूळच्या***
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 02/15/2016 - 15:24

In reply to मूळच्या*** by Anand More

Permalink

हो, ते लक्षात आलं की आधी

हो, ते लक्षात आलं की आधी ररांचे लेख वाचावे लागतील. पण मुळात ते ही समजायला इतक्या क्लिष्ट भाषेतलं काही समजायला हवं. तुम्ही कुठल्या तरी प्रतिसादात लिहीलय की लेख दुर्लक्षित राहिला आहे. तुम्हाला कदाचित त्याची काही खंत नसेलही, पण उगाच सांगावं वाटलं की तुमचे लेख आवर्जुन वाचले जातातच. पण किमान मला तरी इतकं Abstract / दुर्बोध (मला चपखल शब्दही सापडत नाहीये!) समजत नाही. किंवा त्यात एवढा रस वाटत नाही. कदाचित बर्‍याच जणांचे तसेच होत असावे. पण तुम्ही लिहीलाय म्हणुन प्रयत्न करायची इच्छा होतेय. थोड्या शांत मनाने प्रयत्न नक्की करेन!
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Mon, 02/15/2016 - 15:51

In reply to हो, ते लक्षात आलं की आधी by पिलीयन रायडर

Permalink

तुमचा प्रतिसाद वाचून मला खरंच

तुमचा प्रतिसाद वाचून मला खरंच Oscar मिळाल्यासारखं वाटतंय. पण "किंवा त्यात एवढा रस वाटत नाही." हे तुमचे वाक्य मला पटते. माझे पण असे अनेकदा होते. एखादे पुस्तक आणून ठेवतो. पहिली काही पाने वाचून रस नाही वाटला तर ठेवून देतो. नंतर पुस्तक परत बोलावते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे लेखनात रस वाटला नाही तर मी दुर्लक्ष न करता विषयाची मनात नोंद करून बाजूला ठेवतो. मग ते यॊग्य वेळी परत बोलावतेच.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Mon, 02/15/2016 - 15:07

Permalink

Abstract कला आणि अंतहीन किंवा

Abstract कला आणि अंतहीन किंवा अनेकांत रचना यांच्याशी कसे जुळायचे हा प्रश्न थोडा कठीण आहे. मी स्वतः abstract कथा, कविता यांच्याशी झटकन एकरूप होऊ शकत नाही. पण अंतहीन किंवा अनेकांत रचनांशी जुळवून घ्यायला मला किंचित सोपे जाते. याचा अर्थ प्रत्येक अंतहीन किंवा अनेकांत रचना मला भावतीलच अशी खात्री मी देऊ शकत नाही. अंतहीन कथा कादंबऱ्या खूप वाचल्या आहेत. त्याची सुरवात झाली ती अनंतमूर्तींच्या संस्कार पासून. मग भैरप्पांच्या अनेक कादंबऱ्या देखील वाचल्या आणि मग हळू हळू सवय होत गेली. पण याचा अर्थ अनंतमूर्तींचे भैरप्पांचे सर्वच साहित्य आवडले असे नाही. पण एखाद्या लेखकाचे सर्वच साहित्य आपल्याला आवडलेच पाहिजे अशी माझी काही अपेक्षा नाही. तसा कुठला करार कलाकार आणि रसिकांमध्ये असतो असे मला वाटत नाही. त्यामुळे कलाकारावर लोकरंजनाचे दडपण राहू नये आणि रसिकांवर कलेने भुरळ घालावी, कलाकाराच्या कीर्तीने नव्हे अश्या मताचा मी आहे. भैरप्पा माझे आवडते लेखक असून त्यांची तीन चार पुस्तके मला अत्यंत सुमार वाटतात आणि ३-४ वर्षापूर्वीचे आवरण तर मला प्रचारकी वाटते. अनंतमूर्तींचे संस्कार प्रचंड आवडून देखील त्यांची बाकीची पुस्तके मला संग्रही ठेवण्यासारखी वाटली नाहीत. आणि माझे दैवत पु. ल. देशपांडे यांनी केलेला Old Man and the Sea चा एका कोळियाने हा अनुवाद फसलेला आहे असे माझे मत आहे. जी ए कुलकर्णी यांची सर्व ग्रंथसंपदा संग्रही असून त्यातील सर्वच कथा मला सारखाच आनंद देतात असे नाही. आणि गो नी दांडेकरांचे अजुनी नाही जागे गोकुळ हे पुस्तक मला त्यांच्या इतर पुस्तकांपुढे सुमार वाटते. पण मी हे देखील मान्य करतो की भैराप्पांची, अनंतमूर्तींची, देशपांडेंची, कुलकर्णींची जी पुस्तके / कथा मला भिडत नाहीत ती कदाचित इतरांना अतीव सौंदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतात. कुरोसावाच्या या चित्रपटाने मला भुरळ घातली याचा अर्थ इतकाच की मी त्याची पुढील कलाकृती बघायला उत्सुक असेन. पण म्हणून ते आवडलीच पाहिजे अशी माझ्यावर कुठली सक्ती नाही. आणि ती नाही आवडली नाही तर कुरोसावाने माझी फसगत केली असेही नाही. जी कलाकृती मला आवडली ती मला ज्या कारणांमुळे आवडली त्याचा कारणांमुळे इतरांना आवडावी असा माझा आग्रह नाही. आणि जी कलाकृती मला आवडणार नाही तिने इतरांना आनंद देऊच नये असेही नाही. एक मात्र खरे की कलेच्या प्रांतात दुर्बोधतेची झूल पांघरून आपली सुमार प्रतिभा लपवणारे अनेक कलाकार असतात. पण तसे ते सर्वच क्षेत्रात असतात. मी वर कुठेतरी सांगितल्याप्रमाणे, मी "गुण गाईन आवडी" अश्या स्वभावाचा असल्याने, माझ्या मते ज्यांनी दुर्बोधतेची झूल पांघरली आहे ते देखील मला न कळू शकणारा एखादा सौंदर्याविष्कार करत असतील असे मानण्यास मी तयार असतो. आणि हो, ररां बद्दल माझे मत तुमच्या त्यांच्या बद्दलच्या मला जाणवलेल्या मतापेक्षा खूपच जास्त अनुकूल आणि उजवे आहे, इतके सांगून मी थांबतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 02/16/2016 - 13:16

In reply to Abstract कला आणि अंतहीन किंवा by Anand More

Permalink

अंतहीन किंवा अनेकांत रचना !

नित्शे या प्रसिद्ध तत्ववेत्त्याचं एक सुरेख वचन आहे : `टू यूज द अदर इज द हायेस्ट इम्मोरॅलिटी' (दुसर्‍याला वापरणं ही सर्वात मोठी अनैतिकता आहे). अंतहीन रचना जर केवळ लेखकाला पडलेले प्रश्न मांडून, उत्तराची प्रामाणिक विचारणा करण्याऐवजी, ते प्रश्नच किती उच्च आहेत आणि शोधा तुम्ही उत्तरं असा आव आणत असेल तर ते `स्वतःच्या मानसिक गुंत्यासाठी दुसर्‍याला वापरणं आहे. राशोमोनच्या संदर्भात तुम्ही याविषयी काय म्हणाल?
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Tue, 02/16/2016 - 15:48

In reply to अंतहीन किंवा अनेकांत रचना ! by विवेक ठाकूर

Permalink

नीत्शे असं पण म्हणाला होता की

नीत्शे असं पण म्हणाला होता की, You have your way. I have my way. As for the right way, the correct way, and the only way, it does not exist. त्यामुळे ररांबद्दल बोलणे आपण थांबवूया. कारण नीत्शे हे पण म्हणाला होता की Anyone who has declared someone else to be an idiot, a bad apple, is annoyed when it turns out in the end that he isn't. त्यामुळे ररा माझ्या अंदाजापेक्षा कमी वाईट किंवा जास्त चांगले निघाले तर मला दु:ख होऊ शकते, आणि मला दु:खी व्हायला आवडत नाही. तो हे पण म्हणाला की, There are no facts, only interpretations. आणि तो हे पण म्हणाला होता की All things are subject to interpretation whichever interpretation prevails at a given time is a function of power and not truth. म्हणजे मी त्याची ही वाकये राशोमोन च्या समर्थनार्थ वापरू शकतो मी तर त्याच्या The surest way to corrupt a youth is to instruct him to hold in higher esteem those who think alike than those who think differently.या अवतरणावर देखील विश्वास ठेवतो त्यामुळे कुरोसावाचे, ररांचे, तुमचे आणि माझे मत वेगळे असू शकते आणि तरीही आपल्यापैकी कोणीही वाईट नाही हे मी जाणून आहे. मला वाटते पहिल्या कमेंटच्या शीर्षकात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ररा इथे नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे आपण थांबवूया. तुम्हाला चित्रपट आवडला नाही त्यावर मी भारंभार लिहून मिपाच्या सर्व्हरवर भार आणला आहे असे तुम्हाला वाटण्याचीही शक्यता आहे. पण सोडलेला बाण, निघालेला शब्द आणि पोस्ट केलेला धागा परत घेता येत नाही त्यामुळे ह्या नकोश्या झालेल्या तीन भागाच्या लेखमालेचे अस्तित्व सहन करा किंवा हिच्याकडे सरळ दुर्लक्ष करा. जमलं तर मी काहीतरी हलकं फुलकं घेऊन येईन. तिथे आपण सगळे मिळून हसूया. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 02/16/2016 - 15:57

In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More

Permalink

मोरेजी.. आपने दिल जीत लिया!!

मोरेजी.. आपने दिल जीत लिया!! खुप आवडला तुमचा हा प्रतिसाद! ही सगळीच अवतरणे विचार करण्याजोगी आहेत..
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 02/16/2016 - 16:51

In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More

Permalink

आणि शिवाय एकदा या जगात आलो की

आणि शिवाय एकदा या जगात आलो की आईच्या दुधापासून ते तिरडीपर्यंत आपण किती जणांचा वापर करतो याचा हिशेब परमेश्र्वराच्या बापालाही शक्य नाही त्यामुळे त्यातून उदभवणारी नैतिकता/अनैतिकता हाच एक मोठा भ्रम आहे..... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by राजाभाउ on Tue, 02/16/2016 - 17:18

In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More

Permalink

___/\___. अतिशय संयत,

___/\___. अतिशय संयत, यथायोग्य प्रतिसाद. मला तुमचे लिखाण आवडत होतेच. पण आता आपण एकदम पंखा झालो तुमचा. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 02/16/2016 - 17:23

In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More

Permalink

आनंद , प्रश्न ररांचा नाही

तुम्ही चर्चा वेगळ्या वळणावर नेली आहे. ज्या अंतहीन कलाविष्काराबद्दल तुम्ही लिहीलंय, त्यात कलाकार रसिकांना वापरतो का ? असा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Tue, 02/16/2016 - 19:47

In reply to आनंद , प्रश्न ररांचा नाही by विवेक ठाकूर

Permalink

विवेक, मला तुमचे प्रतिसाद

विवेक, मला तुमचे प्रतिसाद कुरोसावाची कलाकृती आणि ररांचे लेखन या दोघांवरही मी बोलावे आणि विशेष करून त्यांच्या कलाकृतीच्या आणि लेखमालेच्या फोलपणावर लिहावे अश्या अश्या स्वरूपाचे वाटत होते. परंतु चित्रपट आणि या लेखमाला या दोघांनीही मला आनंद दिलेला असल्याने मला त्यातला फोलपणा जाणवणे अशक्य होते आणि अजूनही अशक्यच आहे. तुम्ही म्हणता ते कलाकाराने रसिकांना वापरणे मला सर्वत्र दिसते. काही वेळा ते मला आवडते आणि काही वेळेला नाही. राशोमोन, मेट्रिक्स यासारख्या चित्रपटात मला ते आवडले तर अजय देवगणचा ओमकारा, नंदिता दासचा फायर किंवा क्रिस्तोफर नोलान चा Inception चित्रपट बघून मला माझी फसगत झाली असे मला वाटले होते. पण मला त्या कलाकृती जास्त भावल्या नाहीत, याचा अर्थ त्या कलाकृतीचा मी जाहीर पणे निषेध करावा असे काही मला वाटले नाही. तुम्हाला राशोमोन न आवडणे मी समजू शकतो आणि म्हणूनच मला राशोमोन आवडणे तुम्हाला समजून घेता येईल ही माझी अपेक्षा अवस्तावी ठरणार नाही याची मला खात्री आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 02/17/2016 - 16:54

In reply to विवेक, मला तुमचे प्रतिसाद by Anand More

Permalink

आनंद,

मला तुमचे प्रतिसाद कुरोसावाची कलाकृती आणि ररांचे लेखन या दोघांवरही मी बोलावे आणि विशेष करून त्यांच्या कलाकृतीच्या आणि लेखमालेच्या फोलपणावर लिहावे अश्या अश्या स्वरूपाचे वाटत होते नाही. एखादी गोष्ट फोल आहे हे ठरवायला मला दुसर्‍याची मदत लागत नाही. तुम्हाला राशोमोन न आवडणे मी समजू शकतो आणि म्हणूनच मला राशोमोन आवडणे तुम्हाला समजून घेता येईल ही माझी अपेक्षा अवस्तावी ठरणार नाही याची मला खात्री आहे मला तत्त्वज्ञानात सुतराम रस नाही. कारण तुम्ही किंवा ररांनी फॅक्ट फाइंडींगचे जे पाच की सहा विकल्प कल्पिले आहेत, तो निव्वळ वेगवेगळ्या संकल्पनांचा खेळ आहे. त्यातून जीवनोपयोगी किंवा ठोस असं काहीही निघू शकत नाही. तुम्ही जरी त्याला `सत्यशोधन' म्हणत असाल तरी, तो केवळ एका गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगल्सनी पाहून केलेला मानसिक टाइमपास आहे. ते, `आध्यात्मिक सत्यशोधन' म्हणजे `फाइंडींग द अब्सोल्यूट' नव्हे. तर तो केवळ फॅक्ट फाइंडींग करता किंवा सगळंच कसं `व्यक्तिगत आहे' आणि म्हणून सगळंच आधांतरी (खरं तर `चूक') आहे, हे दाखवण्याचा आटापिटा आहे. तरीही एक वेगळा अँगल म्हणून तुमचा शेवटचा लेख नक्की वाचीन.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 02/17/2016 - 17:01

In reply to आनंद, by विवेक ठाकूर

Permalink

नाही. एखादी गोष्ट फोल आहे हे

नाही. एखादी गोष्ट फोल आहे हे ठरवायला मला दुसर्‍याची मदत लागत नाही
खरंय...
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Wed, 02/17/2016 - 22:38

In reply to आनंद, by विवेक ठाकूर

Permalink

।।।तुम्ही जरी त्याला

।।।तुम्ही जरी त्याला `सत्यशोधन' म्हणत असाल तरी, तो केवळ एका गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगल्सनी पाहून केलेला मानसिक टाइमपास आहे.।।। मूळ लेखात सत्यशोधन असा उल्लेख किंवा त्यावरची चर्चा नाही. तो शब्द, बोका - ए - आझमच्या प्रतिसादामुळे झालेल्या चर्चेत आला आहे. ती चर्चा मूळ लेखापेक्षा वेगळ्या दिशेने गेली आहे. मूळ लेखात "अन्वेषण / आकलन" असा शब्द असला तरी त्याखाली मांडलेले मुद्दे आकलन या शब्दाच्या अनुशंगानेच आले आहेत. त्यापुढे देखील मी सत्याच्या प्रकटीकरणाबद्दल बोललो आहे. अन्वेषण आणि शोधन यांच्याभोवती माझी मांडणी नाही. मी वर कुठल्या तरी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. पण त्यामागे सत्यशोधन असा कुठला ही हेतू नव्हता तर कुरोसावा नावाच्या माणसाने बनवलेली एक चित्रकृती होती जी त्याने का बनवली त्याचे कारण कुणालाही ठाऊक नसावे, आणि जी मला का आवडली, त्याचे कारण देखील तसेच अज्ञात आहे. तुमच्या तिसरा लेख वाचण्याच्या आश्वासनामुळे मी खरोखरच आनंदी झालो आहे. (आता यापुढचे मी सगळे विनोदाने लिहित आहे. आवडले नसल्यास कृपया सोडून द्या) कारण पहिल्या भागाच्या दैदिप्यमान यशानंतर दुसरा आणि तिसरा भाग म्हणजे अगदीच रया गेलेला बहादूरशहा जफर सारखा शेवटचा नामधारी सम्राट वाटतो आहे. तुमच्या आश्वासनामुळे मी घाबरलो नाही आहे. उलट तुमच्यात मला एक हक्काचा वाचक लाभल्याचे समाधान मिळाले आहे. तुमच्या निरंतर मिळणाऱ्या प्रतिसादांमुळे तिसऱ्या भागाचा धागा देखील आता वर येईल अश्या रोमांचकारी कल्पनांमुळे माझे हृदय थडथडू लागले आहे. आणि मी माझ्या तिसऱ्या लेखाच्या अभ्यासाला लागलो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 02/17/2016 - 23:03

In reply to ।।।तुम्ही जरी त्याला by Anand More

Permalink

मूळ लेखात सत्यशोधन असा उल्लेख किंवा त्यावरची चर्चा नाही ?

सत्य निश्चिती / प्रस्थापना या खाली सर्व ठिकाणी : एखादी गोष्ट सत्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या तुम्ही पाच पद्धती सांगितल्या आहेत..... असाच उल्लेख आहे... पुढे सत्याचे अन्वेषण / आकलन आणि सत्याचे प्रकटीकरण वगैरे आहे. पण तुम्ही म्हणतायं त्याप्रमाणे : माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. असे असेल तर ओके.
  • Log in or register to post comments

Submitted by संपत on Fri, 02/19/2016 - 16:50

In reply to नीत्शे असं पण म्हणाला होता की by Anand More

Permalink

खुप सुन्दर प्रतिसाद. राशोमान

खुप सुन्दर प्रतिसाद. राशोमान बद्दल मतभेद आहेत पण आता तुमचे इतर लेखन वाचणे आले..
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 02/15/2016 - 15:39

Permalink

मुळात ररा नामक जे काही आहे ते

मुळात ररा नामक जे काही आहे ते अतिशय दुर्बोध आहे,... हुछभ्रू
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Mon, 02/15/2016 - 16:35

In reply to मुळात ररा नामक जे काही आहे ते by स्पा

Permalink

हा हा हा…. एकाच वेळी कसले गोड

हा हा हा…. एकाच वेळी कसले गोड आणि तिखट लिहिता हो तुम्ही. अगदी साप भी मरे और लाठी भी न टूटे ची आठवण झाली. असू द्या की. आपल्याला आवडेल तितके घ्यायचे आणि बाकीचे सोडून द्यायचे. आपण कुठे वट सावित्रीचे व्रत करणार आहोत. आणि हो, एकाचा मनमिळावू दुसऱ्याचा हुछभ्रू असू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 02/16/2016 - 23:20

In reply to हा हा हा…. एकाच वेळी कसले गोड by Anand More

Permalink

एकाच वेळी कसले गोड आणि तिखट लिहिता हो तुम्ही.

जमल्यास "स्पा"चा खालील लेख वाचलात तर फार उत्तम http://www.misalpav.com/node/28293 त्यांच्या कॅमेरातून पण असेच बोल येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 02/15/2016 - 17:17

Permalink

लेख आवडला

वाचते आहे. एक गोष्ट अनेकांनी आपाआपल्या दृष्टीकोनातून पाहून मांडावी हेच तर राशोमानमधे आहे ना? मग दुसर्‍याने लिहिलेल्या लिखाणाला शेलकी विशेषणे लावून लोकांना कसला आनंद मिळतो देवजाणे! ररा आजोबा, आतातरी या आणि मौन सोडा. हल्लीच्या अनेक धाग्यांप्रमाणे हा धागाही "जाना था जापान पँहुच गये चीन" झाला आहे. आनंदबुवा ट्यार्पीसाठी खुश व्हा!
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Mon, 02/15/2016 - 17:27

In reply to लेख आवडला by पैसा

Permalink

खरे तर मी पण हेच म्हणणार होतो

खरे तर मी पण हेच म्हणणार होतो.... की एकच गोष्ट कुणाला आनंद देऊन लिहायला प्रवृत्त करते आणि कुणाला ती भंपक वाटते.... हा देखिल राशोमोनचा एक अन्वयार्थ लावता येईल.... आणि ट्यार्पी साठी मी कालच आभार मानले आहेत.... आता तुमचेही मनःपूर्वक आभार
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Mon, 02/15/2016 - 19:23

Permalink

प्रयत्न

करतोय समजून घ्यायचा :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 02/15/2016 - 22:58

Permalink

ररा कुठे गायबलेत? पूर्वी

ररा कुठे गायबलेत? पूर्वी कधीतरी त्यांच्याशी गाठभेट व्हायची एकाच एरीयात राहत असल्याने. असो, यानिमित्ताने मी हा सिनेमा पाहिला. छान आहे सिनेमा.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on गुरुवार, 02/18/2016 - 10:39

Permalink

एकूण उहापोहावरनं माझा पहिल्या प्रतिसादातला मुद्दा योग्य होता

असं दिसतंय. ररांचा प्रतिसाद पुन्हा उधृत करतो : पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल ररांनी शेवटापर्यंत मालिका रेटत नेली आणि वाचकांना, काही तरी फार अनमोल आणि कल्पनेच्या पलिकडचं रहस्य उलगडणार आहे, अशा भ्रमात ठेवलं. आनंदनी इतक्या प्रतिसादांनंतर तरी, हा जो प्रामाणिकपणा दाखवला आहे : माझी ही लेखमाला म्हणजे ढगात प्राणी किंवा आकार शोधण्याचा माझा निरुपद्रवी खेळ आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलेला मानसिक टाईमपासाच मुद्दा मी अगोदरच मान्य केलेला आहे. तो न दाखवणं, याला मी `वाचकांना वापरणं' म्हणतो आणि नित्शे त्यालाच हायेस्ट इम्मॉरॅलिटी म्हणतो. तस्मात, आनंदनी वरच्या प्रतिसादात जे काही तत्वज्ञानाचे उतारे दिलेत ते मुद्याशी असंबधित ठरतात. ररा शेवटी हाइट करतात : कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल म्हणून मी म्हंटलं होतं की कसले घंट्याचे मूलभूत प्रश्न ? आणि त्यांच्या सोडवणूकीचा चित्रपट समजण्याशी काय संबंध! निषेध नोंदवणार्‍यांना आता तरी, शब्दापलिकडे जाऊन, मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on गुरुवार, 02/18/2016 - 12:14

In reply to एकूण उहापोहावरनं माझा पहिल्या प्रतिसादातला मुद्दा योग्य होता by विवेक ठाकूर

Permalink

तुम्हाला माझे विनोद कळतात आणि

तुम्हाला माझे विनोद कळतात आणि आवडतात असे गृहीत धरून मी म्हणेन, "किती लिहिता हो तुम्ही ठाकूर साहेब; आणि ते सुद्धा मागे पिवळा रंगबिंग लावून. कसले मजबूत हात असतील हो तुमचे. शोलेच्या पटकथेत थोडा बदल करून मी लिहीन, ये हाथ मुझे दे दो ठाकूर … आपके हाथ मुझे दे दो ।" अहो मी ढगात प्राणी शोधण्याच्या माझ्या निरर्थक खेळाबद्दल प्रामाणिकपणे इतक्या प्रतिसादानंतर आत्ता नाही, फार आधी म्हणजे दिनांक १४/२/२०१६ रोजी २३:०६ वाजता पोस्ट केलेल्या या प्रतिसादातच बोललो आहे. त्यामुळे मी या चर्चेमध्ये पहिल्यापासूनच प्रामाणिक आहे हे सत्य पुराव्याने शाबीत होते. मी दिनांक १६/०२/२०१६ रोजी १५:४८ वाजता पोस्ट केलेल्या या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ररां बद्दल बोलणे थांबवले आहे. त्यांच्याबद्दलचे माझे मत केवळ ते स्वतःच बदलू शकतात. आणि त्यांच्या बद्दल असलेल्या तुमच्या मताला बदलण्याच्या बाबतीत ते स्वतःदेखील असमर्थ असतील अशी माझी आता खात्री पटली आहे. त्यामुळे तो आधीच संपलेला विषय मी पुन्हा एकदा संपला आहे असे जाहीर करतो. मला कल्पना आहे की, माझे असे एकतर्फी जाहीर करणे तुम्हाला आवडणार नाही. आणि तुम्ही नाही-नाही म्हणत पुन्हा तोच विषय काढाल. पण सध्या मला विनोदी लेखन करण्यास कुठलाच विषय सुचत नाही आहे. (मी अल्प प्रतिभेचा मनुष्य आहे. किंवा कदाचित तुम्ही सर्व आखुडशिंगी, बहुदुधी मिपा कर माझ्या सारख्या लंगड्या गायीचे, "नवीन" म्हणून कौतुक करीत असाल अशी मला दाट शंका आहे) त्यामुळे "माझा सहभाग (लेख व प्रतिक्रिया)" या दुव्यावर टिचकी मारीत राहणे, आणि एक नवीन प्रतिक्रिया आली अशी सूचना मिळाली की अधाश्यासारखे तिथे टिचकी मारून, ती तुमचीच आहे हे पाहून, स्मित हास्य करून, मग ती वाचून, विजयी वीराच्या मुद्रेने, पाताळविजयम मधल्या राक्षसासारखा हसत, मी माझी दीर्घ प्रतिक्रिया लिहित बसतो आहे. मला तर असे वाटू लागले आहे की आपण दोघेही विक्रम वेताळ चा खेळ खेळत आहोत. आता, "विक्रम कोण? आणि वेताळ कोण?", या सत्याच्या बाबतीत आपले दोघांचे आकलन वेगवेगळे असू शकते. त्यावर कोणी नवा कुरोसावा नवा चित्रपट काढू शकतो. त्याबद्दल कोणी नवीन ररा आठ भागांची नवीन लेखमाला लिहू शकतो. त्यावर प्रतिक्रिया म्हणून कोणी नवीन आनंद मोरे आपली तीन भागातील दीर्घ प्रतिक्रिया लिहू शकतो. आणि मग त्यावर कोणी नवीन विवेक ठाकूर साद प्रतिसादांची सरबत्ती चढवू शकतो. ही साखळी अशीच अनेकांत किंवा अंतहीन चालू राहू शकते. आणि याला कुणी ढगात प्राणी शोधण्याचा निरर्थक खेळ असे म्हणू शकतो तर कुणी दुसऱ्याला वापरणारी सर्वात मोठी अनैतिकता देखील म्हणू शकतो. अश्या प्रकारे बाकी मिपाकरांना कायम डब्बल फोडणी घातलेली मिसळ खायला मिळत राहील. मला वाटते आपण दोघे आता मिपाकरांकडून करमणूक कर देखील घेऊ शकतो. बोला करूया का पार्टनरशिप? या सिरीजवरचे माझे इतर दोन लेख तुमची आतुरतेने वाट पहात आहेत. त्या दोनी ल्येकारांकडेबी लक्ष असू द्या वो ठाकूर सायब. लई गुणाची हायती माजी ल्येकरं. मला लई जीव लावलंया बगा त्येंनी. तुमास्नी बी लावतीलाच बगा. आन न्हाय लावला तर म्हारू नगा बरं का त्येस्नी. अजून धाकली हायत. वाईच वाट बगा. ती जरी फुडे थोरली न्हाय जाली तरीबी तुम्ही कनवाळू होशीला आणि माज्या बरूबर गमती कराया येशीला असं माला उगा वाटून ऱ्हायलंया बगा.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on गुरुवार, 02/18/2016 - 12:25

In reply to तुम्हाला माझे विनोद कळतात आणि by Anand More

Permalink

आनंद,

तुमच्या निरागस प्रामाणिकपणाचा चाहता आहेच, ररांबद्दल तुमच्या प्रेमाचाही आदर आहे. तुमचे दोन्ही लेख वाचून, आवडले तर निश्चित प्रतिसाद देईन. एखादा नवा आयाम कळला तर पूर्वग्रहसोडून, मनसोक्त दाद देण्याचा माझाही स्वभाव आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 02/18/2016 - 12:41

In reply to आनंद, by विवेक ठाकूर

Permalink

इस खुशीके मौकेपर पूरे कायनात

इस खुशीके मौकेपर पूरे कायनात मे जश्न मनाया जाये. इत्र के दिप जलाये जाये, पटाखोंकी आतिषबाजीसे फलकमें सैकडो तारोंकी ......................................काय ते करा एकदाचे..............
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 02/18/2016 - 12:54

In reply to इस खुशीके मौकेपर पूरे कायनात by अभ्या..

Permalink

मोरे- ठाकूर गळाभेट झाली ,

मोरे- ठाकूर गळाभेट झाली , भरून पावलो
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 02/18/2016 - 12:58

In reply to मोरे- ठाकूर गळाभेट झाली , by स्पा

Permalink

अगदी अगदी. हिकडून भिंत,

अगदी अगदी. हिकडून भिंत, तिकडून वाघ. पाहायला आज दामले फत्तेलालांपैकी कुणीतरी हवे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on गुरुवार, 02/18/2016 - 13:05

In reply to इस खुशीके मौकेपर पूरे कायनात by अभ्या..

Permalink

अभ्या, ते असं आहे

तेरे हुस्नकी तारीफ़ ना करूं, तो ये नज़र किस काम की, तेरे जलवोंसे रोशन ना हो, तो ये जिंदगी किस काम की |
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 02/18/2016 - 13:11

In reply to अभ्या, ते असं आहे by विवेक ठाकूर

Permalink

वाह ठाकूरसाब. जियो.

वाह ठाकूरसाब. जियो.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on गुरुवार, 02/18/2016 - 13:14

In reply to आनंद, by विवेक ठाकूर

Permalink

धन्यवाद :-) वाट बघतो.

धन्यवाद :-) वाट बघतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 02/18/2016 - 12:53

Permalink

:) गहिवरून आले,ड्वाले पानावले

:) गहिवरून आले,ड्वाले पानावले
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on गुरुवार, 02/18/2016 - 13:14

Permalink

अजि म्यां ब्रह्म पाहिलें

अजि म्यां ब्रह्म पाहिलें
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on गुरुवार, 02/18/2016 - 19:43

In reply to अजि म्यां ब्रह्म पाहिलें by तर्राट जोकर

Permalink

+१

+१ असच वाटत होतं मागे डांगे आणि संक्षींचे प्रतिसाद वाचताना. पण एकदम शेवटी घोळ झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 02/18/2016 - 13:28

Permalink

एक चक्र देऊन टाकलं

आनंद, मिपावरच्या 27000 मेंबर्स ना न जमलेली गोष्ट केल्याबद्दल तुम्हाला एखादे चक्र देऊन टाकले!!
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on गुरुवार, 02/18/2016 - 19:02

In reply to एक चक्र देऊन टाकलं by पैसा

Permalink

त्यासाठी चिकाटीचा संयमी

त्यासाठी चिकाटीचा संयमी गांधीवाद लागतो तै. उगीच नै कै. :) (२७००० मधला एक!)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 02/20/2016 - 00:25

Permalink

चित्रपट पाहिला अगदी कुठलाही

चित्रपट पाहिला अगदी कुठलाही पूर्वग्रह न ठेवता आश्चर्य म्हणजे तितकाच टुकार वाटला
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 02/20/2016 - 13:19

Permalink

स्पा भाऊ किंवा स्पा ताई,

स्पा भाऊ किंवा स्पा ताई, प्रतिसादाबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार. माझ्या लेखनामुळे म्हणा किंवा स्वतःचा पूर्वग्रह कायम ठेवावा अथवा तोडावा या विचाराने म्हणा, पण तुम्ही चित्रपट पाहिलात. तुमचे खरोखर कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. या लेखमालेवरचा प्रतिसाद पहाता कोणी हा चित्रपट पाहील अशी मी आशाच सोडली होती. पण तुम्ही आणि सतीश गावडेंनी चित्रपट पाहिलात. मला उगाच कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. पण सतीशना आवडल्याबद्दल ते मला काही देणार नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला न आवडल्याबद्दल मी तुम्हाला काही नुकसान भरपाई देणार नाही आहे. ;-) मला तर वाटते आहे की मी आता कुरोसावाकडून आणि ररांकडून मार्केटिंग चे पैसे घ्यावेत. ;-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 02/20/2016 - 13:27

In reply to स्पा भाऊ किंवा स्पा ताई, by Anand More

Permalink

आनंदराव नमस्कार.

आनंदराव नमस्कार. आपले लिखाण कसदार आहे, पण आपण जे प्रतिसाद/उपप्रतिसाद देत आहात ते दिवसेंदिवस अधिक कृत्रिम आणि मानभावी होत चालले आहेत असे निरिक्षण नोंदवतो. अस्सल जीवनात कोणी इतका सालस माणूस भेटला नसल्यानही असे वाटू शकते तस्मात क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 02/20/2016 - 13:35

In reply to आनंदराव नमस्कार. by अभ्या..

Permalink

मला भेटा…इतकेच म्हणीन.

मला भेटा…इतकेच म्हणीन.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 02/20/2016 - 13:37

In reply to मला भेटा…इतकेच म्हणीन. by Anand More

Permalink

अवश्य. मला आनंद वाटेल.

अवश्य. मला आनंद वाटेल. तेंव्हा आपण थोडी हलक्या फुलक्या लेखनावर चर्चा करुयात. ;) माझा लेखनातला क्रियेटीव्ह ब्लॉक निघायला मदत झाली त्याने तर जास्त चांगले.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 02/20/2016 - 14:32

In reply to अवश्य. मला आनंद वाटेल. by अभ्या..

Permalink

एकदा वाटलं तुम्हाला खरड किंवा

एकदा वाटलं तुम्हाला खरड किंवा व्यनि पाठवावा. पण मग म्हटलं की तुम्ही लिहिताय, पण तुमच्या सारखे मत असूनही न लिहिणारे अनेक जण असतील कदाचित मिपावर. म्हणून मग इथेच प्रतिसाद द्यायचे ठरवले. या लेखावरचे प्रतिसाद चार प्रकारचे आहेत. १) पुभाप्र किंवा कळले नाही असा प्रांजळ अभिप्राय देणारे प्रतिसाद. मी त्यांना उप प्रतिसाद दिले नाहीत. २) लेख सोडून नवीन मुद्दा मांडून त्यावर चर्चा करणारे. बोका - ए - आझम यांचा प्रतिसाद आणि त्यावरचे प्रतिसाद. त्यालाही मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. ३) लेखाला आणि त्याच्या मागच्या विचाराला समजून घेण्याचा प्रयत्न करणारे प्रतिसाद: सटक यांच्या प्रतिसादावर मी विषयाला आणि प्रतिसादाला साजेशी प्रतिक्रिया दिली आहे असे मला वाटते. ४) लेखाच्या केंद्रस्थानी असलेला कुरोसावाचा चित्रपट, ररांची लेखमाला, आणि स्वतः ररा यांच्याबद्दल पूर्वग्रह असलेले आणि त्यामुळे लेखाच्या मुद्द्यावर काहीही न बोलता तीव्र शब्दांचा उपयोग करून धूळ उडवण्याचा प्रयत्न करणारे. मला एखादी गोष्ट आवडली की मी तिचे तोंड भरून कौतुक करतो. पण आवडली नाही तर मात्र तिच्यातील वैगुण्ये शोधत बसण्याऐवजी तिच्याकडे दुर्लक्ष करून माझे मन दुसरीकडे गुंतवतो. माझ्या अश्या स्वभावामुळे,या चौथ्या प्रकारच्या प्रतिसादांनी, मला सुरवातील थोडा त्रास झाला पण मग मला ते सगळेच एकदम गमतीदार वाटू लागले. आणि मी अश्या प्रतिसादांना साजेसेच प्रतिसाद देऊ लागलो. कुणाला दुखावण्यापेक्षा त्याच्या बोलण्यातील विसंगती हळूचपणे दाखवणे मला जास्त आवडते. त्यामुळे मी वाद घालीत असलो तरी संवाद चालू राहील आणि प्रतिपक्षाला बाहेर निघायला जागा राहील याची काळजी घेतो. समर्थांच्या "तुटे वाद संवाद तो हीतकारी" या वचनावर माझा विश्वास आहे. पण समोरच्याचा मान ठेवून अलगद त्याला आपले म्हणणे मान्य करायला लावणे थोडी कठीण कला आहे. त्यात मी कच्चा असावा. त्यामुळे तुम्हाला माझे असले प्रतिसाद कृत्रिम वाटणे शक्य आहे. आणि हेच प्रतिसाद जास्त असल्यामुळे तुम्हाला, मानभावीपणाचा वास येऊ लागला असेल. त्याही पुढे जाऊन मी असे म्हणीन, की माझ्या लेखनाच्या विषयांबद्दल जर तुमच्यासह इतर कुणाचा काही पूर्वग्रह झालेला दिसतोय. मिपावर मी आधी विनोदी लिखाण टाकले आणि मग थोडे वेगळे लिखाण टाकले त्यामुळे असे झाले असेल. फेसबुकवर याच्या अगदी उलट झाले. कारण तिथे मी कायम गंभीर विषय माझ्या परीने लिहीत होतो. आणि जेंव्हा मी तिथे विनोदी लेखन टाकले तेंव्हा अनेकांना धक्का बसला. माझी reunion ची कथा अनेकांनी स्वानुभव कथन म्हणून वाचली आणि त्यामुळे अनेकांना तिचा शेवट आवडला नाही. खरा स्वानुभव सांगायचे तर मी reunion ला येणार नाही, कारण अश्या कार्यक्रमात मी कानकोन्डला होतो, ते मला आवडत नाहीत, हे त्याच्या आयोजकांना सकारण सांगितले होते. पण मग त्याच्यावर एक कथा चांगली होईल असे मला वाटले. म्हणून मी ती लिहिली. तिचा वेगळा शेवट मी फेसबुकवर टाकला आहे. माझे तुम्हाला एकच सांगणे आहे. मी वेगवेगळे विषय हाताळतो. सगळ्यात मी समर्थपणे लिहू शकणार नाही याची मला खात्री आहे. आणि त्या त्या विषयावर माझे लेखन जरी सकस असले तरी ते प्रत्येकाला आवडेलच याची खात्री नाही. त्यावर कुणी विषयाला धरून साद दिली तर मी देखील तसाच प्रतिसाद देईन. अन्यथा या लेखामुळे मला कृत्रिम आणि मानभावी प्रतिसाद देण्याचा चांगलाच सराव झाला आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 02/20/2016 - 16:11

In reply to एकदा वाटलं तुम्हाला खरड किंवा by Anand More

Permalink

असो. अपली भूमिका कळाली.

असो. अपली भूमिका कळाली. जनातले मनातले यात साहित्यासाठी स्तुतीप्रतिसाद अथवा न आवडल्याची पावती असावी, कारणासहित दिले तर उत्तमच, क्वचित एक्स्ट्रा रेफरन्स द्यावेत कुणी एवढीच अपेक्षा असते. त्यावर समग्र चर्चेसाठी काथ्याकूट आहेच. तिथे धुळवड होउदे अथवा दिवाळी. देणेघेणे नाहीच. मिपावर आधी कुणीतरी म्हणल्याप्रमाणे लेखकाने ललित साहित्य एकदा लिहून झाल्यावर जास्त खुलासेही देऊ नये आणि उपप्रतिसादाची फेस्बुकी लाईनही लावू नये या मताचा मी आहे. आपणास आगामी लेखनासाठी शुभेच्छा. बाकी लेखनसीमा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 02/20/2016 - 14:39

In reply to स्पा भाऊ किंवा स्पा ताई, by Anand More

Permalink

इट्सस फाइन मोरे काका/काकु

इट्सस फाइन मोरे काका/काकु
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 02/20/2016 - 14:45

In reply to इट्सस फाइन मोरे काका/काकु by स्पा

Permalink

फक्त काका. काकू लिहित नाहीत.

फक्त काका. काकू लिहित नाहीत. इतकेच काय पण मी लिहिलेले वाचीत सुद्धा नाहीत. किंबहुना, "इथे माझे डोके खाण्यापेक्षा दुसरा काहीतरी मार्ग शोधा" या त्यांच्या सल्ल्यामुळेच मी इथे आलो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 02/20/2016 - 17:35

In reply to फक्त काका. काकू लिहित नाहीत. by Anand More

Permalink

हा स्पा केवळ शारुक

हा स्पा केवळ शारुक मिथुनआदींचे सुमार चित्रपट बघत असल्याने त्याला अभिजात चित्रपट कळेनासे झालेत असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 02/20/2016 - 17:43

In reply to हा स्पा केवळ शारुक by प्रचेतस

Permalink

शतक पूर्तीसाठी लिहितोय.… बाकी

शतक पूर्तीसाठी लिहितोय.… बाकी प्रत्येकाला त्याची आवड अभिजात वाटू शकते शकते… त्यामुळे स्पा ना शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com