Skip to main content

मामलेदार मिसळ पंढरी

लेखक मीउमेश यांनी मंगळवार, 09/02/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला. रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते. अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले. पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती. अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला. आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले, मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान? सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??", बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली. क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं. अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय ) त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते". अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास ! मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो आमचे काही अलिखित नियम आहेत रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे, नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे. मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34050
प्रतिक्रिया 209

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

मी जिकडे जातो तिकडची मिसळ हमखास खातोच बर्याच ठिकाणी शहरात, गावा - खेड्यातली मिसळ खाल्ली आहे नाशिक ची मिसळ इतकीशी नाही आवडली

In reply to by मीउमेश

कुठे आणि कधी खाल्ली ते महत्त्वाचे. आजकाल मिसळीच्या नावावर कोणीही सोम्यागोम्या दुकानं टाकायला लागलेत. असे झटके मीही सुरुवातीला खाल्ले. माझेही हेच मत होते. माझा मेहुणा एवढा का तुड तुड उडतो नाशिकच्या मिसळीवर ते मला काही कळेना. नंतर चित्र बदलले! :-)

In reply to by संदीप डांगे

आठवणिंनी मन भरुन आलं. पोटापाण्यासाठी नासिक सुटलं आणि चांगल्या मिसळ पण. कॉलेजात असतांना सकाळी ७ - ७३० ला पण विहार किंवा श्यामसुंदर ला हजेरी लावायचो. नाही तर एच.पी.टी. च्या हिरव्या कँटीनला (२००२-०७) (जिमखान्या जवळ) रतीब लावलेलाच होता. पॉकेट मनी कमी असायमग, मग ३ मिसळ मागऊन त्यात ५ जण तृप्त होईपर्यंत पाव आणि तर्री मागवायचो. आता साधनाच्या चुलिवरच्या मिसळीबद्दल ऐकलंय. बघु कधी जम्तंय ते.

In reply to by संदीप डांगे

नाशिकला विन्जिनीरिन्गला असताना सकाळि तुशार (college road) आणि सन्ध्याकाळी अम्बिका (पन्चवटी)हा ठरलेला कार्यक्रम.

मामलेदार ची मिसळ नंबर १. जगात भारी मामलेदारची मिसळ ठाणेरी! (जगात भारी कोल्हापुरी (अख्खा मसुर) च्या तालावर!)

In reply to by शान्तिप्रिय

मापं हे आमचे खास मित्र असले तरी मामलेदाराची मिसळ तेवढी खास नै. दोनतीन वेळा शनिवार असलेने खायचा योग हुकलेला पण एकदा खाल्लीच. अगदी बोगस म्हणले तरी चालेल. जेवढे कौतुक ऐकले होते त्याच्या १० टक्के सुध्दा भारीपणा आढळला नाही. कोल्हापूरची फडतरे तर लै वेळेला चाखलेली. ती एक वेळ भारी म्हणता येईल. जस्ट २ दिवसापूर्वी पंढरपूरला जाताना सोलापूरच्याच हद्दीत हायवेवर चटणीवाल्या ठेंगीलचीच ही मिसळ. m सोलापूरात तसे मिसळीचे जास्त प्रस्थ नाही. लाईन लावून हॉटेलात थांबणे हे धंदे पुणेमुंबईकरच करु जाणे. त्यामुळे मिसळीचे असे खास ठिकाण सोलापुरात नसले तरी ही मिसळ टेस्ट आणि झणझणीतपणात मामलेदाराच्या कीतीतरी उजवी होती. शिवाय आमचे सोलापुराचे स्पेशल रेट. मग काय....हाणली दाबून प्लस लिटरभर ताक. आहाहाहाहा.

In reply to by अभ्या..

थोडाफार दर्जा बदलला असेल पण मामलेदारला पर्याय नाही... माझ्या मताचा फेरविचार मी करावा असं वाटत असेल तर मला इतर ठिकाणं नेऊन दाखवा.... अवांतर .....आम्ही तुमच्या सोलापूरच्या शेंगाचटणी ,दहीआणि भाकरीवर लय मरतो !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

मापंदादा एक ठिकाण तर वर दाखवलेलं हाय. त्यासाठी मात्र सोलापुरात यावं लागेल. या महिन्यात निमंत्रितांच्या कट्ट्याचा प्लान चालूय. तुम्हीबी या. दुपारी दहीचटणीभाकरी नंतर संध्याकाळी मिसळ खाऊ. कसे?

In reply to by बोका-ए-आझम

नरीबाला हे काय एकलेले नाय ब्वा. आमच्या इथल्या ज्वारीला दगडी शाळू म्हणतात. पांढर्‍या शुभ्र अन पातळ भाकर्‍या होतात एवडे माहीत. आता कडक ५/१० भाकर्‍यांचे पाकीट पण मिळते. महिनाभर टिकते.

In reply to by चांदणे संदीप

घरच्यानी पत्रिकेची अपेक्षा ठेवायची नसती सॅन्डीबाबा. नीट पंगत वाढायला घ्यायची असती. वेगळे सांगायचे का तुला.

मिसळ वर तर्री ओतून घेणे हे अत्यंत शौर्याचे लक्षण आहे....जबरा खरा नाशिककर मग्ग्यानेच मिसळ ओततो .. ह्याचा फायदा घेतलाय सप्तश्रुंगि ला...आन तर्रि आन रे बावा..वेटर कंटाळला होता.

In reply to by होबासराव

हाव, आन पानीपुरी जव्हारनगरचौकातली. आता सोन्याबापुंची राउतवाडी फेमस व्हयेल हाय 'पानीपुरीबाजा'इसाठी.

In reply to by संदीप डांगे

अकोल्यात पानीपुरी ले अजुन एक प्रेमळ शब्द "फुग्गे" (फुगे नाही फुग्गेच) इचीभन काय पोट्टे हात राजेहो तुम्ही!! सायची आता मधुची गिल्ली मिसळ संग छटाकभर कलाकंद कुकुन आना अटीसा!! हट्ट बटे!! बेकार हाय हे!! डांगेब्वा, फुग्गे तर सर्व्यात ख़ास भेटते राजेश्वर मंदिरा म्हावरे, भीकमचंद खंडेलवालच्या कोपर्यावर एक निरानाम कयकला फुगेवाला सकाऊन हुबा राह्यत जाय, पका भाऊ म्हणत त्याले सारे! सायचा वल्ला लसुन अन अदरकचं पानी बनवे! लोकाइले त्याचं एडिक्शन झालतं माणसे सकायटायमाले पैले तोंडी ब्रस धरून तटी येत फुगे खात मंग प्रेशर आलं का घरी पयत जात!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

फुग्गेच! :)) आमी नाय बॉ गेलो कंदी इतल्यादूर. राजेश्वर मंदिराजोळची किर्ती आयकेल हाय फकत.

मिसळ आणी पुण्याचा उल्लेख नाही ? काही कमी प्रसिद्ध ठिकाणे - लोहगावला "राहुल" म्हणून एक हॉटेल आहे. इथली मिसळ एक वेगळंच प्रकरण आहे. केवळ तिखट सॕंपल आणी जाड शेव- पापडी ! सोबत पाव . पहिलाच घास घ्याल अन् नाका तोंडातून पाणी गॕरंटिड! चव प्रत्येकाला आवडेलच असं नाही. पण पट्टीच्या मिसळभोक्त्याला आवडणारच. बाकी इथला चहा पण मस्त असतो. लोहगावातच थोड पुढे एक "तुकाराम" नावाची साधी खानावळ आहे तिथेही मिसळ चांगली असते. पण तेथील वडा सॕंपल मिसळपेक्षा भारी. सांगवीत "निसर्ग"ची एक शाखा आहे गजानन महाराज मंदिराच्या बाजूला तिथली मिसळ पण मस्त आहे. डेक्कन चे "काटाकिर्र" तर प्रसिद्धच आहे. अजूनही भरपूर आहेत वेळ मिळाला की टंकतो.

In reply to by उगा काहितरीच

धानोरीला जकात नाक्याजवळ "साईतिर्थ" या नावाचे एक हॉटेल आहे. इथली मिसळ म्हणजे एका मोठ्या जेवायला असते तशा ताटात असते. त्यात एक मिसळचा बाऊल , एक तर्री कम सॕंपलची वाटी, एक दह्याची छोटी वाटी, पाव ,कांदा वगैरे सरंजाम असतो. चव पण मस्त पाव छान मऊ लुसलुशीत असतात.

In reply to by उगा काहितरीच

पाव छान मऊ लुसलुशीत असतात.
लुसलुशीत ताज्या पावापेक्षा जर्रा कडक झालेले थोडेसे क्रीस्पी कडा असलेले पाव ट्राय करा मिसळीसोबत. ती मज्जा अल्लगच

आयला!! अजुन पुण्यातील काटाकिर्र्,रामनाथ पभ्रुतींची आठवण कोणी काढली नाही या धाग्यावर?? छे: पुर्वीचे मिपा राहीले नाही.

In reply to by भक्त प्रल्हाद

पुण्यातील रामनाथची मिसळ खाल्ली..... हॉटेलमागच्या पायरीवर भर दुपारी पन्नास मिनिटापेक्षा जास्त उभा होतो, मग नंबर लागला. वरच्या मजल्यावर गेल्यावर ऑर्डर दिली पण सगळ्यांनी ऑर्डर दिल्याशिवाय वेटर खाली गेला नाही. मग साधारण दहा मिनिटांनी खालून मिसळ वरती आली. भरीस भर म्हणून. पावांऐवजी ब्रेडच्या स्लाईस समोर आल्या. यावर अजून वरताण म्हणून समोरच्या बोर्डवर कांदा आणि सँपल चे वेगळे पैसे लागतील अशी पाटी होती. पुन्हा पाव मागवले तर ते आलेच नाहीत शेवटी कंटाळून ताक नावाचे पांढरे पाणी पिऊन परतलो. पिंपरीतली दे धक्का रामनाथपेक्षा शंभरपट भारी..

तसा लहान असताना खुप वेळा पुण्याला आलो होतो पण मित्रांसोबत फिरायला काहि तरि ९९ सालि आलो होतो, कोणि सांगत होत जोशिवडा पाव लय फेमस ते टेस्ट केले. गम्मत त राजा तवा झालि जवा एका हाटेलात वडा-शँपल मागवला..तो आला आलुबोंडा अन पांचट पानि घेउन..दोस्तान इचारल अबे ते शँपल का काय हाय ते काउन नाय आनल्..वेटर म्हने हे काय वाटित.. अबे हा त रस्स्सा आहे ते बि बिना तर्रिचा :) नाहि त्यानंतर पुण्यात खुप जागि खरच अकोला छाप (जसे आवडते तसे)शँपल मिळाले..पण हा अनुभव लक्षात राहिला :))

In reply to by होबासराव

अकोला छाप (जसे आवडते तसे)शँपल>> त्याशिवाय गोठ नायी. असंच मनाजोगतं श्याम्पल एकदा वारी हनुमानले खाल्लं बावा. बायको मुंबईची हाय, तिले ते निरा खेड्यातल्या टपरीवरचं आलुबोंडा-रस्सा लयच आवडला बॉ... म्या म्हटलं, हे असली चीज हाय, तुम्ही मुंबैवाले निरा पानी टाकता ज्यात्यात...

In reply to by होबासराव

आमचं एक पोट्ट होतं डाबकी रोड वालं इच्चक सायचं! त्याले पोट्याईनं भरी पाडलं चाल म्हणे बावा तुले फुग्गे चारतो, हा गेला गड़ी, त्या फुग्गेवाल्यानं रगड़ा टाकला गरम फुग्ग्यातनी, दुसऱ्यां फुग्ग्याले गड़ी जोरात चिल्लावला "
भाऊ ते वरन नोका टाकजा फुग्ग्यातनी
" :D :D

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पैल्यांडाव ते वरण पायल्यावर तेबी फुग्यात पायल्यावर काय भावना आल्या असतील राजेहो तुम्ही समजू शकता... मी शब्दात नै सांगू शकत.

मध्यंतरी वाडीला गेलो होतो तेव्हा मुद्दामुन कुरुंदवाडला जाउन एकाट्यांची मिसळ चापुन आलो. :) मामलेदारांच्या मिसळी बरोबर लिंबु मिळत नाही, हा सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे. मागच्या वेळी तर्री मधे तेलाचे प्रमाण भयानक होते,जवळपास तर्री म्हणुन तेलच दिले होते म्हणा ना ! लयं रसभंग झाला आपला. :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch


In reply to by मदनबाण

जवळपास तर्री म्हणुन तेलच दिले होते म्हणा ना !
मबाशेटशी सहमत. त्यामुळे ही मिसळ मनातून उतरली. ठाण्यात आणखीही आहेत. गोखलेही चांगली.

In reply to by गवि

ठाण्यात आणखीही आहेत. गोखलेही चांगली.
प्रत्येक मिपाच्या काय अप्पा वर हेच सांगत असतो कोणीही ऐकेना राव , तिथे पियुष पण भारी मिळते !!! तुमच्याच प्रमाणे गोखले आवडले (थोड अवांतर हेच मत पॉप टेट्स बद्दलही आहे)

In reply to by माझीही शॅम्पेन

तिथे पियुष पण भारी मिळते !!! दादरला पणशीकरांकडे मिळणार्‍या पियुषची आठवण आली रे ! किती काळ लोटला पियुष पिउन... गोखल्यांकडे जावेच लागेल असे दिसते !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch

In reply to by मदनबाण

मामलेदार मिसळ मध्ये तीन प्रकारच्या मिसळ मिळतात १) साधी - यात तेल , तरी बिलकुल नसते २) मिडीयम - थोडा रस्सा थोडी तरी ३) तिखट - जालीम तिखट , तरी तरी तरी

In reply to by मीउमेश

मी पहिल्यांदा गेलो तेव्हा असे तीन अॉप्शन्स आहेत हे कळल्यावर "सर्वात तिखट" अॉप्शन मागितला. तेव्हा चहाच्या बशीत लाल तेल आणि शेव आली. तिखट डज नॉट मीन अॉल तेल. नंतर तिथून जवळच तलावाच्या चौकात पहिल्या मजल्यावर असलेल्या हॉटेलात खाल्ली तीही मामलेदारच्या इथूनच येते असं ऐकलं. खखोदेजा. ती कमी तेलाची आणि रस्सेदार चांगली होती.

In reply to by मदनबाण

अमच्या कुरुंदवाडात जाउन आलात. एकाटेपेक्षा तळ्याच्या जवळ बाजारात मस्त मिसळ मिळते. मसाला वडा खाल्ला का ?

In reply to by मोगा

एकाटेपेक्षा तळ्याच्या जवळ बाजारात मस्त मिसळ मिळते. हे ठि़काण माहित नाही. मसाला वडा खाल्ला का ? नाही, कोणाकडे मिळतो ? एकाटेंच्या जवळ मस्त फिके पेठे मिळण्याचे दुकान आहे, नाव नक्की आठवत नाही, बहुतेक शिंदे असावं.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction


In reply to by स्पा

ह्याला प्रचंड सहमत "इतकी भिकार मिसळ तर मीही घरी बनवू शकतो." अजिबात नाही. इतकी भिकार मिसळ आम्ही कितीही प्रयत्न केला तरी घरी बनवू शकत नाही. आजकाल मामलेदारच्या मिसळीच्या रश्यात झमझमीतपणा नावालाच आणि तेल मात्र भरपूर असते. १९८० ते १९९० पर्यंत मामलेदारची मिसळ मस्त होती.आजकाल मात्र तेलात मिसळ करतात.

आता धागा इतर मिसळींनी हायजॅक केलाच आहे तर मग पुण्यात इन्क्म टॅक्स लेनमधल्या भाडाईत मिसळीचा उल्लेखही झाला पाहिजे. अतिशय दमदार मिसळ. पुणेरी मिसळ (थोड्क्यात बेडेकर) म्हटल्यावर नाकी मुरडणार्‍या ४ -५ पुणेद्वेष्ट्यांना आवडली आहे ही मिसळ आजवर. मला स्वत:ला देखील फार आवडते. पुण्यात कोथरुडला कोथरुड स्टँड जवळ (मनिषा पाणीपुरीची गल्ली) मस्ती मिसळ देखील उत्तम असते. तिथे मिसळीबरोबर गारेगार दहीभात मिळतो (काँबो घेतल्यास) आणि गारेगार काकडी कोशिंबीर असतेच. मिसळ + दही भात + काकडी हा काँबो लय भारी आहे. नुसती मिसळ देखील उत्तम. सिंहगड रोडवर आणि बाणेरला मिळणारी कोल्हापूरची खासबाग मिसळादेखील मस्त. पण नंबर वन नाही. नेवाळे तिखटजाळ असते. सगळीकडुन धुर निघतो. खायला छान वाटते पण अति तिखटपणामुळे ही मिसळ नापास. (चव मात्र चांगली असते तिखट कमी केल्यावर कशी लागेल कोण जाणॅ) काटाकिर्र तर सगळ्यांना माहितीच आहे. सुंदर. टिंबर मार्केट मध्ये महेशची मिसळदेखील सुंदर मिळते. पौड फाट्यावर कोल्हापूर मिसळ सुरु झाली आहे (काळे ब्रदर्स च्या लेनमध्ये. शीलाविहार कॉलनीच्या सुरुवातीला). लोकांना लैच आवडलीय. मला नाही आवडली खास. एकदा ९ ला पोचलो तर याने दुकान उघडले नव्हते म्हणून दुसर्‍यांना १० ल गेलो तर अजुन मिसळ तयार होत होती. खुपच वैतागलो होतो. एनीवे मला स्वतःला खास नाही आवडली. अशीच श्रीकृष्ण, श्री आणी रामनाथची मिसळदेखील नाही आवडत. असो. तरीदेखील अखिल भारतात बेडेकर पेक्षा चांगली मिसळ इतरत्र कुठेही मिळत नाही हे जाताजाता नमूद करु इच्छितो.

In reply to by मृत्युन्जय

सुस गावालगत तापकीर मिसळ सुरु झालीय. ती सुद्धा छान. उपवासाची मिसळ नावाचा नवा आयटम दिसला. पण ट्राय केला नाही. त्याचप्रमाणे एनडीए रोडवर वैष्णवी येथील मिसळ चांगली वाटलीय. पण बेडेकर बेष्ट!

In reply to by मृत्युन्जय

पुण्यात इन्क्म टॅक्स लेनमधल्या भाडाईत मिसळीचा उल्लेखही झाला पाहिजे.
हायला. यह किधर हय? कर्वेरोड एंडला का? (तिथे रस्त्याकडेला एकदोन गाड्या आहेत असं आठवतंय...)

In reply to by मृत्युन्जय

पौड फाट्याजवळ , कीर्ती हार्डवेयर च्या लेन मध्ये . खाऊन बघा . मला आवडली . तिखट पण जळजळीत नाही . बाकी मामलेदारच्या मिसळी बद्दल अनुमोदन , आता नो टेस्ट ओन्ली जळजळाट ….

बर्याच शहरातल्या मिसळ खाल्ल्या आहेत, इथून तिथून सारख्याच असतात, लोक उगाच आपापल्या गावाची लाल करायची म्हणून वर्णन करून लिहितात बाकी काही नाही

In reply to by स्पा

काहीजण गावाची लाल करण्यासाठी लिहितात, काही स्वतःची लाल करण्यासाठी लिहितात. चालायचेच स्पावड्या. विपस्सनेचे कुठवर आले??

In reply to by स्पा

एवढ्या लोकांकडून माहिती घेतली, काय निष्कर्ष निघाला कळू द्या की.. बाकी काय असेल ते असो, मिसळपाव अगदी आवर्जून असं कधी खावं वाटत नाही :)

In reply to by स्पा

उत्तरार्धाशी बाडीस. खरा मिसळभोक्ता विविध ठिकाणच्या मिसळी सारख्याच भक्तिभावाने खातो. व्यक्तिगत आवडनिवड असतेच पण कुठल्या मिसळीला कधी तुच्छतेने कमी लेखत नाही.

In reply to by स्पा

स्पा बुवा बहुसंख्य वेळेस उत्तम खाद्यपदार्थ हे सर्वच शहरात मिळतात. पण ते आपल्या निगडीत असलेल्या आठवणीमुळे जास्त लक्षात राहतात. पुण्यात शिक्षण/ नोकरी मिळून १२ वर्षे काढली. पुण्याच्या कानाकोपर्यात नागपूर पासून कोल्हापूर पर्यंतचे सर्व पदार्थ चांगले आणि वाईट असे दोन्ही मिळाले/ खाल्ले. हेच पदार्थ मुंबईत फिरले तर कुठेना कुठे मिळतातच. तेंव्हा अमुक ठिकाणची मिसळ, तमुक ठिकाणचे पोहे हेच बेष्ट आहेत हे काही सत्य नव्हे. मथुरेचे पेढे, जोधपूरचा मिरची वडा आणि माव्याची कचोरी, लखनौचे काकोरी कबाब किंवा काली मिर्च मुर्ग ( हे सर्व प्रत्यक्ष चाखलेले पदार्थ आहेत) हेच जगात सर्वोत्तम असा काही नसतं.(यातील बहुसंख्य पदार्थ मुंबईत कुठेना कुठे उत्तम दर्जाचे मिळाले) सर्वोत्तम असतात त्या त्याच्या बरोबर निगडीत असणार्या आठवणी. मधुचंद्राच्या दिवशी "आपली"च बायको जगातील सर्वात सुंदर स्त्री असते. आमच्या (होणार्या) बायको बरोबर थंडीत सिंहगडावर खाल्लेली भजी, मटक्यातील घट्ट दही आणि गरम गरम झुणका भाकर जगात सर्वोत्कृष्ट आहेत असे "मला" वाटू शकते. तेंव्हा जिथे जाल तेथे उत्तम पदार्थ मित्र/ मैत्रिणी बरोबर चाखा, मैफिल जमवा म्हणजे ते पदार्थ सर्वोत्कृष्ट असतील.

In reply to by सुबोध खरे

लखनौचे काकोरी कबाब किंवा काली मिर्च मुर्ग ( हे सर्व प्रत्यक्ष चाखलेले पदार्थ आहेत) हाय काय आठवण काढली डॉक् साब!!!

धाग्यावर प्रतिसाद लिहिताना विनोदी प्रतिसाद परन्तु वैयक्तिक टीका न करता लिहावा. पु ल देशपांडे ची पुस्तके वाचलेल्यांना हे शक्य होईल. प्रत्येकाला आपले गाव आणि तेथील खादाडी याबद्दल अभिमान असणे नैसर्गिक आहे.