मी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)
भाग १
भाग २
भाग ३
_________________________________________________
सकाळी अलार्म व्हायच्या आधी उठू लागलो. अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. एक नवीन कारण मिळाले होते. जिमला जाण्यासाठी. घाम गाळण्यासाठी. ट्रेडमिलवर धावण्यासाठी. जास्तीची वजने उचलण्यासाठी. सिट अप्स मारण्यासाठी. Reunion - फुलराणी. जिममधून बाहेर पडून समोरच्या कबुतरखान्याजवळ लावलेल्या अॅक्टीव्हाला किक मारताना जेंव्हा कबुतरे उडायची तेंव्हा मला मी बाहुबली असल्याचा भास होऊ लागला. आणि कानात “धीवरा” गाणे घुमू लागले.
एकता कपूर ने बनवली असावी असे म्हणत मी हिणवत असलेल्या खंडोबाच्या सिरिअल बद्दल मला उगाच ममत्व वाटू लागले. बानूबाई थोड्याश्या फुलराणी सारख्या दिसताहेत असे वाटू लागले. मी जिम मधून आल्यावर जेंव्हा माझी म्हाळसा दार उघडत असे तेंव्हा ती कधीही,
रुसला का मजवरी मल्हारी
रुसला का मजवरी जी
बानू नार आणली घरी मल्हारी
रुसला का मजवरी जी
असे काहीतरी म्हणायला सुरवात करेल असे वाटू लागले.
अजून आपण वयापेक्षा लहान दिसतो, आपले केस अजून सुद्धा रुपेरी न होता आणि मैदान सोडून माघार न घेता टिकून आहेत याचा अभिमान वाटू लागला. आरशासमोर उभे राहून मी कुठल्या कोनातून गोजिरवाणा रविकर वाटू शकतो त्याचा अंदाज घेऊ लागलो. आपण साधारण भारतीय माणसाच्या उंचीला टेकलो पण त्याला ओलांडू शकलो नाही याचा अत्यंत त्रास होऊ लागला. आणि मग मी उंच टाचांचे बूट घेतले. मग नवीन मोजे घेतले. मग नवीन शर्ट आणि मग नवीन जीन्स. सगळी खरेदी करून मी Reunion ची वाट पाहू लागलो. एकंच गाणं सारखं आळवत होतो, 'भेटी लागी जीवा … लागलीसे आस"
अजून Reunion ला चार पाच दिवस होते. मग केस जरा नीट कापून घ्यायचे मनात आले. संध्याकाळी टिप टॉप हेअर कटिंग सलून वाल्याकडे गेलो. गेली जवळपास वीस वर्षे मी इथेच जातो दर महिन्याच्या पीकाची कापणी करून घ्यायाला. तिथे बसल्या बसल्या पेपरामधली शब्दकोडी सोडवून टाकायच्या माझ्या सवयीमुळे तिथल्या मालकाला, संतोषला मागे बक्षीसे देखील मिळाली होती. त्यामुळे त्याला मी फार आवडतो. नेहमी शनिवारी केस कापायला येणारं गिऱ्हाईक असं आडवारी आलेलं पाहून तो खूष झाला. "काय मोरे सर? आज काय विशेष वाटतं?" त्याच्या खुशीमुळे खूष होऊन मी खरे कारण सांगितले. म्हणालो, "अरे, शाळेचं Reunion आहे या रविवारी. जरा चकाचक करूया म्हणून आलो तुझ्याकडे." मग संतोषच्या हातात माझे डोके देऊन मी शांतपणे आरशात माझे हसरे प्रतिबिंब पहात बसलो. आता संतोषच्या कृपेने वळणदार दिसणारे माझे केस, शाळेत असताना मात्र असे नव्हते. भुरभुरे जावळ काढताना काय घोटाळा झाला होता कुणास ठाऊक पण नंतर कायम माझे केस भारतातील असंख्य वेगवेगळ्या संस्थानांप्रमाणे एकमेकांशी फटकून स्वतंत्रपणे उभे रहात होते. आणि माझ्या शाळकरी वयाच्या वेळचे सलूनवाले अगदी बारीक कटिंग करून त्या सर्व केसांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यास मदत करीत होते.
त्यातला एक वृद्ध कारागीर तर अजून लक्षात आहे. त्याला डोळ्यांनी थोडे कमी दिसत असे. त्यामुळे मोठी माणसे त्याच्याकडे जात नसत. आणि आमच्या सारख्या चिल्ल्या पिल्ल्यांची त्याच्याकडे रवानगी होत असे. डोळ्याने अंमळ अधू असलेल्या या कारागिराला मी गेलो की फार चेव चढायचा आणि गेल्या जन्मी "दोन बोके, माकड आणि लोण्याचा गोळा" या गोष्टीतला त्याने केलेल्या माकडाच्या रोलचा कैफ अजून उतरला नसल्यासारखा तो कायम आधी उजवीकडचे कापायचा मग डावीकडचे थोडे जास्त…. मग पुन्हा सारखे करण्यासाठी, थोडे अजून उजवीकडचे… मग पुन्हा डावीकडचे…. असे करता करता साळिंदराच्या काट्याने भरलेले डोके दिसू लागले की तो थांबायचा कारण, अधू दृष्टीमुळे न दिसणारे सत्य त्याच्या हाताला बोचू लागायचे आणि मग तो त्या कैफातून भानावर यायचा.…. त्याचा एक फायदा झाला की एन सी सी च्या शिंपी सरांनी मला केसांसाठी कधी फटके मारले नाहीत.
आता त्या कारागीराच्या तावडीतून सुटलो आहे याचा आनंद होऊन मी स्मितहास्य करीत बसलो असताना संतोष म्हणाला, "मोरे सर, थोडे काळवंडलात. असे गेलात Reunion ला तर चांगले दिसणार नाही. माझं ऐका. फेशिअल आणि ब्लिचिंग करून घ्या. जरा चेहरा फ्रेश वाटेल." मी नाही म्हणणार होतो. पण उदास हसू असलेल्या, कडक इस्त्रीच्या कपड्यातल्या तिचा चेहरा डोळ्यासमोर आला. आणि लग्नाच्या नंतर पंधरा वर्षांनी पुन्हा एकदा फेशिअल आणि ब्लिचिंगचे सोपस्कार करून घ्यायला तयार झालो.दोन तीन तास शेहनाझ हुसेन नावाच्या बाईने स्वतःच्या चेहऱ्यावर न वापरता केवळ जनकल्याणासाठी बनवलेल्या मलमांचा, लेपांचा आणि इतर द्रव्यांचा मारा माझ्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर करून मी सुहास्य वदनाने घरी आलो. फ़ेशिअल चा परिणाम तीन दिवसांनी दिसतो म्हणे. त्यामुळे घरी आल्यावर माझी चेहऱ्याची डागडुजी हिच्या ध्यानात आली नाही आणि मी केजीबी व मोसादच्या चौकशी सत्रातून वाचलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जिम मध्ये गेलो. तेथील सहाय्यकाने आज मापे घेऊया असे सांगितले. मी देखील खूष होऊन तयार झालो. गेल्या दीड एक महिन्याच्या मेहनतीने काय फळ दिले ते जाणण्याची उत्सुकता मला देखील होती. कपडे बदलून मापे द्यायला उभा राहिलो. जिममध्ये घुमणारे "अभी तो पार्टी शुरू हुई है " हे गाणे मला माझ्या मनस्थितीचे निदर्शक वाटले. माझा सहाय्यक आला. मापे घेऊ लागला. नोंदवून ठेऊ लागला. मान, छाती, दंड, फोर आर्मस, मांड्या, पोटऱ्या सगळ्यांची मापे इंच दोन इंचांनी कमी झाली होती. म्हणजे अनावश्यक चरबी जाऊ लागली आहे या कल्पनेने मी खूष झालो.
जिम मध्ये घुमणारे गाणे बदलले. कोरस सुरु झाला. "ओ ओ होय … ओ ओ होय … ओ ओ होय …" बाजीरावाचा भूमिकेतील रणवीर सिंघ गाणे म्हणत नाचू लागला.
बजने दे धड़क धड़क
ढोल ताशे धड़क धड़क
भंडारा झिड़क झिड़क मल्हारी
सहाय्यकाने पोटाचे माप घ्यायला सुरवात केली. त्याचा चेहरा पडला. त्याने वर खाली करून दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा माप घेतले. काहीतरी चुकले आहे ते मला कळले. भंसाळीचे बाजीराव नाचत होते. म्हणत होते,
खड़क तड़क भड़क साली
चटक मटक फटक साली
दुश्मन की देखो जो वाट लावली
वाट लावली
वाट लावली
वाट लावली
सहाय्यक म्हणाला, "सर, काही कळत नाही, पण तुमचे पोट दोन इंच वाढले आहे." त्या वाक्याने मला क्षणार्धात तडिताघात या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवता आला. मी पिंगा गाणे जास्त आपुलकीने पाहिले आणि दिपिकारूपी सांप्रतकालीन मस्तानीकडे आणि प्रियांकाकडे प्रेमपूर्ण नजरेने पाहिले म्हणून मी पेशवाई चा दुश्मन कसा काय झालो? अटकेपार लावायचे झेंडे माझ्या पोटावर का बरे खुपसले गेले असावेत? असे प्रश्न मला पडले. माझे पोट वाढले कसे? याचा विचार करताना सर्व सहाय्यकांचे मत झाले की प्रवेश घेतानाचे वेळी माझी मापे घेण्यात चूक झाली असावी.
आणि मग मी वजन काट्याकडे गेलो. उत्साह तर ओसरालाच होता. मग खांदे पाडून वजन काट्यावर उभा राहिलो. सहाय्यकाचा चेहरा कसनुसा झाला. फक्त शंभर ग्रॅम ने वजन कमी झाले होते. तो गप्पच राहिला. म्हणजे दीड महिने मी केलेल्या अंग मेहनतीचे फळ दोन इंच वाढलेले पोट आणि शंभर ग्रॅम कमी झालेले वजन असे होते तर. आणि ते कमी झालेले वजनदेखील मी आदल्या दिवशीच्या संध्याकाळी कापलेल्या केसांमुळे असावे अशी मला दाट शंका येऊन मी अजूनच दु:खी झालो.भंसाळीचे बाजीराव माझी वाट लावून नाचायचे थांबले होते. आता "ओ तू भाग मिल्खा" हे माझे आवडते गाणे लागले पण माझ्या हरलेल्या मनाला ते उभारी देऊ शकत नव्हते. माझा सहाय्यक पण कान कोंडला झाला होता. शेवटी मीच त्याला म्हणालो, बहुतेक माझ्या हाडांचे वजन जास्त असेल. तो हसला. माझा फक्त चेहरा हसला. मी घरी आलो. शाळेतील मुले "हात पाय काडी अन पोट वाढी" असे चिडवतात म्हणून टिळकांनी व्यायाम करून शरीर कमावले त्याची गोष्ट माहित होती. पण त्यांच्याच नावाच्या शाळेतल्या मी, व्यायाम करून हात पाय काडी अन पोट वाढी करून घेतले हे कळल्याने मी हताश झालो होतो. लोकमान्यांना हे कळले तर "मोरेंचे पोट ठिकाणावर आहे काय?" असा काही नवा अग्रलेख लिहितील अशी शंका येउन त्या उद्विग्न मनस्थितीत्तदेखील मला थोडे हसू आले.
पूजेला बसलो. फ्रीजमधून फुलांचा डबा घेतला. कालच्या फुलांचे निर्माल्य काढले. देवांना अंघोळ घातली. गंध लावले. फुले वाहण्यासाठी डबा उघडला. आणि एकदम मनात विचार आला. कालचे निर्माल्य आणि आजची फुले यात फरक फक्त फ्रीजच्या थंड हवेचा होता. कालच्या निर्माल्यात टाकलेल्या आणि आजच्या हातात असलेल्या दोन्ही प्रकारच्या फुलांचा फुलण्याचा उत्सव कधीच होऊन गेला होता. जेंव्हा ती झाडावर फुलली तेंव्हाच तो जीवनाचा प्रफुल्ल आनंदोत्सव संपूर्ण झाला होता. ज्याक्षणी त्यांना झाडावरून काढले होते त्याक्षणी त्यांचे निर्माल्य झाले होते. जीवनाच्या उत्सवातील त्यांचा फुलण्याचा भाग संपला होता. निर्माल्य झाले होते पण इतरांना आणि कदाचित त्या फुलांना देखील अजून ते कळले नव्हते. पाणी मारत, फ्रीज मध्ये ठेवत त्यांचे ताजेपण टिकवले होते. माझ्या जिम सारखे, माझ्या फेशिअल ब्लिचिंग सारखे कृत्रिम ताजेपण. आपण निर्माल्य झालो आहोत हे न कळलेल्या फुलांचे ताजेपण. मग मला Reunion म्हणजे निर्माल्याने निर्माल्याचा मांडलेला उत्सव वाटू लागला, आणि Reunion ला जायचा मूड पूर्णपणे गेला.
दुपारी निरंजनचा फोन आला. मी येणार आहे त्याची खात्री करून घेण्यासाठी. मी त्याला थातूर मातूर कारण देऊन, नाही येणार म्हणालो. तो चपापला. थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलला. मग तू ये रे असे बोलून त्याने फोन ठेवला. मग थोड्या वेळाने सारंगचा फोन आला. आणि मग अनघाचा मेसेज आला. हे तिघे Reunion च्या कार्यकारी टीमचे सदस्य होते. सगळ्यांनी मला यायला सांगितले. थोडा वैतागलो. पण मग वाटले, की मी कोण इतका लाटसाहेब लागून गेलो आहे की या सर्वांनी इतकी आपुलकी दाखवावी? कशासाठी राबत आहेत हे सगळे? काय वैयक्तिक फायदा त्यांचा यात? निर्माल्य झालो आहोतच पण अजून देवावर वाहून घ्यायचे बाकी आहे. स्वतःच्या नकळत जसे फुललो तसेच योग्य वेळ आली की आपली परवानगी देखील न घेता आपली रवानगी निर्माल्यात करण्यास निसर्ग कुचराई करणार नाही. मग आत्त्ताच कशाला उदास व्हा? आला क्षण आपला, असे वाटू लागले. मन पुन्हा ताळ्यावर येऊ लागले. आणि मी Reunion ला जायला पुन्हा तयार झालो.
क्रमश
Book traversal links for मी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पहिला
आताच चौथा हि भाग वाचला.
आणि दुसरे देखील.
मोरे साहेब
अरे… तुम्हाला माझा विनोद
उत्पन्नाचा स्रोत
अरेच्या... एकंदरीत माझ्या
मोरे साहेब
धन्यवाद. "तुटे वाद संवाद तो
थोडी गंमत केली हो.
+१
>> मी त्याच संदर्भात "मलातर
+++१ :) पु. भा. प्र.
!!!
छान झाला हा पण भाग ! तो
साहेब,...... कसलं लिहिता राव
निर्माल्य! वाचतेय.पुभाप्र.
मस्त लिहीत आहात....
आनंद,
जियो!
मस्त लिहिले आहे एकदम.
वाचतोय. पुभाप्र!
छान
फुलराणीला भेटायची उत्सुकता
तुम्ही आजसुद्धा धक्कादायक
वाचतेय..
दोन तीन तास शेहनाझ हुसेन
छान लिहिलेत!
छान..
डॉ. साहेबांशी १००% सहमत . खरच
खूप खुसखुशीत लिहिलंय.
जे लिहिता ते सुंदरच लिहिता.
असंका? बरं… :-) शक्य आहे.
-)) बरोबर! ओक्के!!
छान लेख!
खुसखुशीत लेख. पाहिला तसा लगेच
झक्कास
मजा आली वाचायला
मस्त ! चारहि भाग आवडले.छानच
मस्त, आवड्यास. और भी आने दो.
असेच लिहीत राहा.
छान लिहिताय
मस्तच ! मजा येतीय वाचताना ..
आवर्जुन वाचत आहेत लेखमाला
मस्त
ऑस्सम !!