एकदा माझी तामिळ मैत्रीण तावातावाने मला सुनवत होती होती...'यू नॉर्थ इंडियन पीपल'...हो, ती अशी हमरीतुमरी वर आली की मला नेहमी यू नॉर्थ इंडीयन्स वगैरे म्हणते न चुकता. आपल्याला कसं कमीतकमी चार दिशा माहीत असतात नं, तशा माझ्या या मैत्रिणीला दोनच दिशा माहिती आहेत. उत्तर आणि दक्षिण. तामीळनाडू, केरळ पासून वरती साधारणपणे हैदराबाद पर्यंत साऊथ इंडिया आणि हैदराबाद च्या वरती सगळा नॉर्थ इंडिया. बाकी महाराष्ट्र, गुजरात तिकडे बंगाल हे असले कॉंप्लिकेशन्स नकोच आपल्याला.
असो. पण तिचा मुद्दा असा होता की आपल्या हिंदी चित्रपटांमधे दक्षिण भारतीय पात्रांना फारच विनोदी दाखवतात. विनोदी म्हणजे छान नाही पण काहीतरी विचित्र. ओढून ताणून यम, यन, वो, पी असे इंग्रजी बोलणारे, बायका कायम कान्जिवरम मधे. केसांमधे भलामोठा गजरा आणि वाक्यावाक्याला अय्ययो असे उद्गार. तिचं म्हणणं एकच की असे का? एखादा तमिळ माणूस नॉर्मल हिंदी बोलतांना का नाही दाखवू शकत तुम्ही लोक ? आमच्या लकबींवर, भाषेवर तुमची विनोद निर्मिती का?
नंतर मी विचार केला तेव्हा जाणवलं की हे अगदी खरंय. म्हणजे मोजके सन्माननीय अपवाद सोडले तर तिचं म्हणणं खरंय. आपल्या हिंदी चित्रपटांमधे आणि हिंदी मालिकांमधे पात्रांचं, प्रसंगांचं फारच स्टिरियो टायपिंग, एक अती सरसकटीकरण होतं.
आता हे बघा, उदाहरणार्थ मराठी बाई ही एकतर कामवाली नाहीतर भाजीवाली नाहीतर कोळीण. ती कशी बोलणार? ' मै बोलती तेरेकू, मेरेको ईतना पैसा मंगता म्हणजे मंगता' अरे....काय...? आणि मराठी पुरूष म्हटला की तो एकतर पोलिस पण तोही कमिशनर नाही - हवालदार. दुसरं म्हणजे एखादा भ्रष्ठ नेता- अमका तमका भाऊ आणि तिसरा प्रकार म्हणजे गॅंग्स्टर. हा तिसरा प्रकार जरा नवीन आहे. थोडाफार राम गोपाल वर्मा च्या सत्या पासून याची बहुतेक सुरूवात झाली असावी.
आता पंजाबी खानदान. या समाजाला प्रचंड ग्लॅमर द्यायचं काम आधी चोप्रा आणि नंतर करण जोहर या मंडळींनी केलं. पण तिथेही अतिशयोक्ती. या लोकांच्या रीतीभाती, खाणं-पिणं, बोलणं याचं अती सिंप्लिफाइड चित्रण. एखादा सरदारजी मिनिटा मिनिटाला मित्राच्या पाठीवर दणादण बुक्के घालणार, गडगडाटी हसणार. मग हा स्वभावाने भयंकर विनोदी, मदतीला तत्पर आणि डोक्याने गरम अशा टाइप चा असणार. त्याची बायको पण तेव्हडीच विनोदी. कानात झुमके, वेणीला जरीचा गोन्डा आणि अधून मधून ' छड्डोजी 'वगैरे म्हणणे मस्ट आहे. हे पब्लिक एरवी घरात व्यवस्थित हिंदी बोलत असते पण मधेच यारा तुस्सी, गड्डी चला रहा हू, चल ओये असे शब्द सटासट वापरणे त्यांच्यासाठी फार आवश्यक गोष्ट आहे.
या घरातली आजी म्हणजे 'बीजी' हे पात्र. या बीजी एकीकडे खानदान की इज़्ज़त का काय ते सांभाळत असतातच पण साइड बाय साइड आपली 'कूल' इमेज सिद्ध करण्याच्या दृष्टीने जरा डान्स फ्लोर वर नाचून बिचून पण घेतात. मग लाडका नात किवा नातू येऊन तिला माय सेक्सी दादी वगैरे म्हणतो. मग बीजी पण त्याला लाडाने ओये खोत्या (का खोते?) म्हणत त्याचा कान पीरगाळतात. हा सीन फक्त चित्रपटात नाही तर आजकाल टीवी वर सुद्धा अगदी कॉमन झालाय.
तिसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे गोवेकर मंडळी. हा तिसरा प्रकार सत्तर, ऐंशी च्या दशकामधे भलताच फॉर्मात होता. चर्चातले शांत वातावरण. मग तिथे छान स्वच्छ इस्रीचा पोशाख केलेले आणि सात्विक हावभाव तोंडावर असलेले धर्मगुरू असतात. ते नेहमी माय चाइल्ड, माय चाइल्ड असे म्हणतात आणि दारात कोणीतरी टाकलेल्या बाळाला नियमीतपणे आसरा देत असतात. आता येते नायिका. ही फार सुंदर आहे. पण त्याचबरोबर गूढ रम्य, उदासरम्य आणि भाविक अशी मल्टिटेलेंटेड सुद्धा आहे. ती कॅण्डल घेऊन चर्च मधे गंभीरपणे बसलेली आहे. तिचा तो भावीक, प्रकाशात उजळलेला चेहरा पाहून हीरो तिच्या अजुन प्रेमात पडतोय ( आठवा--दिलवाले दुल्हनिया, मुझसे दोस्ती करोगे, खामोशी-मनीषा कोइरलाचा).
आणखी एक छानपैकी ' वॉट मॅन ' किंवा 'यू नॉटी बॉय' असे वारंवार म्हणणारी मिसेस डिसूझा असते. ही बाई हमखास आपल्या चित्रपटाच्या हीरोची घरमलकीण असते आणि अधून मधून आठवणीने आपल्या हीरोला घरातून बाहेर काढण्याची धमकी देत असते. ही तोंडाने खूप फटकळ जरी असली तरी मनाने बाय डीफॉल्ट प्रेमळ. काटेरी फणस, नारळासारखी टणक, वरुन कडक आतून मायेचा झरा, वरुन काटे आत पिकलेला गर वगैरे, वगैरे.
हिंदी चित्रपट आणि मालीकांमधे ब्रेकफास्ट हा पण टिपिकल प्रकार. जूस म्हणून ठेवलेले पण शेंदरी रसना नी भरलेले ग्लास, प्लेट मधे असलेली ब्रेड स्लाइसस ची थप्पी आणि बटर. ' चलो बेटा नाश्ता करलो' म्हणताच तो बेटा बसणार आणि ब्रेड बटर खाणार. सोप्पं काम. बरेच वेळा बेटा किवा बेटीला नाश्ता करायला वेळच नाहीये. मग आई बिचारी सो कोल्ड जूस चा ग्लास घेऊन मागे धावणार..'बेटा जूस तो पिलो'.....अगं बाई...रिकम्यापोटी ऑरेंज जूस? अॅसिडिटी नाही का होणार?
दुसरं म्हणजे अल्लड कॉलेज कन्यका येणार आणि ब्रेकफास्ट न करता टेबलवरचं एक सफरचंद घेऊन खात खात पळणार. इथे सफरचंद हे फळ फारच डिमांड मधे आहे. कधीही चिकू, पेरू अशी फळं नाहीच ओन्ली सफरचंद.
अर्थात सरसकट सगळ्याच हिंदी चित्रपटांमधे हे असे स्टिरियोटाइप असतात अस नाहीये. काही अपवाद आहेतच. पण असे अपवाद दुर्दैवाने खूप कमी असतात हे सत्य आहे. हे कबूल आहे की या वरच्या सगळ्या उदाहरणात थोडेफार तथ्य असतेच. नाही असे नाही. पण म्हणून काय आपण त्या इतक्याश्या चौकटीतच राहून विचार करायचा? बरेच गुणी दिग्दर्शक हे स्टिरियो टाइप्स टाळण्याचा प्रयत्न करतात. हे आशादायी आहेच पण आजकाल तर मला असही वाटतं की चित्रपटांच्या पेक्षा जास्तं हा प्रकार हिंदी मालिकांमधून होतो. खरंतर एखादे अस्खलित हिंदी बोलणारे सुब्रमण्यम स्वामी , एखादे पाटील, देशमुख किंवा देशपांडे आडनावाचे बडे उद्योगपती (मला वाटतं अशी एक हिंदी मालिका आहे सध्या) किंवा मग चष्मा लावणारे एखादे डॉ.कर्तारसिंग नावाचे सरदारजी अशी पात्रं दाखवायला काय हरकत आहे?
वाचने
17085
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाघमारे काका ?..
In reply to वाघमारे काकांशी पूर्ण सहमत. by बॅटमॅन
ही जनरेशनची स्टीरिओटायपिंग
In reply to वाघमारे काका ?.. by ए ए वाघमारे
त्याचं असं आहे की काका हे सेफ
In reply to वाघमारे काका ?.. by ए ए वाघमारे
आर्ट( की आर्त) फिल्म काढली
त्या अर्थाने नुकताच आपटलेला
In reply to आर्ट( की आर्त) फिल्म काढली by सुबोध खरे
यात आपल्याला शंका आहे का?
In reply to त्या अर्थाने नुकताच आपटलेला by संदीप डांगे
खरे साहेब, दिलवाले पडण्यामागे
In reply to यात आपल्याला शंका आहे का? by सुबोध खरे
डांगेसाहेब असहिष्णुता हे एक
In reply to खरे साहेब, दिलवाले पडण्यामागे by संदीप डांगे
दिलवाले आपटलाय ?
In reply to त्या अर्थाने नुकताच आपटलेला by संदीप डांगे
असहिष्णूते मुळे हि आर्त फिल्म
दिलवाले आपटल्यावर लै आनंद
प्रश्नच नाही
In reply to दिलवाले आपटल्यावर लै आनंद by प्रदीप साळुंखे
असं काही उत्खनन करून काढलं की
एखादा तमिळ माणूस नॉर्मल हिंदी