Skip to main content

मराठी भाषा दिन २०१६

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 29/01/2016 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मायमराठीच्या गौरवदिनानिमित्त आपण मराठी बोलीभाषा सप्ताह २१-२७ फेब्रुवारी दरम्यान साजरा करत आहोत. दर दहा मैलावर भाषा बदलते म्हणतात. मराठी भाषा तर दर प्रांती वेगळ्या लहेजात बोलली जाते. ऐकायला गोड वाटणाऱ्या आणि शब्दकळेने समृद्ध असणाऱ्या या बोली मराठी साहित्याला नेहमीच आगळा साज चढवत आल्या आहेत. भरुभरुन साहित्याचं देणं देत आल्या आहेत.किंबहुना प्रत्येक विषयातील शब्दाला पर्यायी मराठी शब्द देणे हे बोलीभाषेच्या अभ्यासाने नक्कीच साध्य होऊ शकेल. आणि म्हणूनच बोलीभाषा बोलली गेली पाहिजे,लिहिली गेली पाहिजे आणि वाचलीही. याच उद्देशाने निरनिराळ्या बोलीभाषा अवगत असणाऱ्या मिपाकरांना आपल्या बोलीभाषेत उदा. अहिराणी, वर्‍हाडी, चित्पावनी, मालवणी, कोंकणी, पुणेरी, लातुरी, बेळगावी, तंजावुरी, कोल्हापुरी, मावळी, सोलापुरी इ. मध्ये कथा, कविता, लेख लिहुन पाठवायचे आवाहन करीत आहोत. लेख साहित्य संपादक या आय डी ला १५ फेब्रुवारीपर्यंत व्यनि करायचे आहेत. आपल्या भरघोस आणि उत्साहपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत... -साहित्य संपादक
लेखनविषय:

वाचने 16399
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

आमच्या वर्हाळीचं नाव नाय घेतलं, आमाला वेगळा विदर्भ पाय्जे. ;-) जोक्स अपार्ट. कवितेसाठी गावंडेसायेब हायेत. कथेसाठी बापूसाहेब आहेत. लेख भालेरावसायेब, होबासराव - येकांद इनोदी येउद्या. चिनार भौ, तुमीपन. आजून कोन हाय रे बावा इदर्बाचं, कमांड पाय्जे हां फुल्ल भाशेवर.

In reply to by बोका-ए-आझम

खरेच तो मी नाही हो ताई. ३५ वर्षे पुण्यात रहातोय म्हणजे मी आता पुणेकरच !! हो, पण मी कथा देऊ शकेन :-)

In reply to by संदीप डांगे

राहू द्या. तेवढीच नावं मिळाली व-हाडी भाषेतलं साहित्य मागण्यासाठी! धन्यवाद!

थीम अशी नाही.बोलीभाषेतील कोणताही साहित्य प्रकार चालेल.किंवा भाषेवरील लेख पण चालेल. यशोधरा,तुमच्याकडून कोंकणी/मालवणी भाषेतील काही छानसे लेखन हवेच आहे!

In reply to by बोका-ए-आझम

तुमी लिवा ना राजेहो. तुमचा उल्लेक रायला बावा आमच्या पर्तिसादात. तुमीबी लिवजा कैतरी.

ले़खकांनी लेखातील बोलीभाषेतील टिपीकल शब्दांचे प्रमाण मराठीतील अर्थ सांगीतले तर आम्च्यासारख्यांसाठी जास्त सोयीचे होईल.

In reply to by म्हया बिलंदर

+१

In reply to by सस्नेह

काय सांगतांव काय? तुमान्ला म्हायत नाय? त्या वयभव मांगल्यान् फ्येमस केल्याली भाषा बोलतांव आमी!! ;)

In reply to by सस्नेह

मुद्द्याचं राह्यलं... बाणकोटी/संगमेश्वरी म्हणतात...वर रायगड जिल्ह्यात सुरु होऊन खाली राजापूरपर्यंत थोड्याफार फरकाने ब्राह्मणेतरांत ऐकायला मिळते.

माझी कोणतीच अशी एक भाषा नाही. आई वडील मराठवाड्यातुन आलेले असल्याने त्या बोलीचा प्रभाव आहेच. पण मी पुण्यातच वाढले असल्याने अगदी पुणेरी नसलं तरी पुस्तकी बोलणं आहेच. इथे इतक्या लोकांचं वाचुन वाचुन भरपुर नवे शब्द आणि बोलण्याच्या वेगवेगळ्या पद्धती उचलल्या आहेत. मधुनच त्याही डोकावतात. तसंही मी फार पटकन दुसर्‍याच्या भाषेचा लहेजा उचलते. मग मी काय लिहु? (जसं काय लिहीलंच पाहिजे असा आग्रह करतय कुणी =)) )

In reply to by पिलीयन रायडर

माझी पण कोणतीच अशी एक भाषा नाही. आम्ही मूळ खानदेशी पण पुण्यातच वाढले असल्याने अगदी पुणेरी नसलं तरी पुस्तकी बोलणं आहेच. अहिराणी आवडते पण एक वाक्यही येत नाही. त्यात आम्ही काही वर्षे इंदोर, लखनऊमध्ये राहिल्यामुळे इथे आल्यावर हिंदीतच बोलायचो, मग आमचे मामे-मावस भावंडं आम्हाला हसायचे :) इथे इतक्या (मिपा)लोकांचं वाचून भरपूर नवे शब्द आणि बोलण्याच्या वेगवेगळ्या पद्धती उचलल्या आहेत, मधूनच त्याही डोकावतात. मग मी काय लिहू ;)

चांगला उपक्रम! यानिमित्ताने वेगवेगळ्या बोलीभाषेतल्या कथा वाचायला मिळतील! :) Sandy

शुभेच्छा ! -दिलीप बिरुटे

इदर्भातल्या साऱ्या अवकाली लेकराइच्या इकुन म्या संदीप भाऊ डांगे ह्याईले इनंती करू राहलो की त्याहीनं काही तरी अल्लग जिम्मक लिहाव!!! उमरोतीचे शिरंग भाऊ ह्याइले बी इनंती हाय हे ख़ास बाकी बोक्या भाऊ , मंदार भाऊ, होबासराव कौन लिहू राहले अन कोन आमच्या संग प्रेक्षकाईत बसु राहले ते ते सांगजा हो! अन मनात आलं त सारे लिवसान लेको!! आपुन बी काई लिवतो!

In reply to by बोका-ए-आझम

सॉरी बिरी काय नाय हो सोन्याबापू आणि बोकाभाऊ. तसंबी सध्या इथं मिपावर साधं वाचाले वेळ भेटत नाई, त्यात बोलीभाषेत लेख लिहिण्याएवढी वर्हाडी येत नाही. तुमी लिवा समदे लोक, मले तेवढंच माहेरी आल्यासारखं वाटतं वाचून. वाट बघते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मायं नाव लिवल्याबद्दल धन्यवाद राजेहो. पर काय सांगू तुमाले, वऱ्हाडीमंधी लिवाले गेलो तं चार ओयींच्या पुढे लिवनं मुश्किल होते हो. बाकी तुमच्यासंगं बाकी मंडयी हायेतच जे लिवतील वऱ्हाडीमधून. त्याचा आस्वाद घेनार हायेच.

पुणेरी? मराठीची बोलीभाषा?

बऱ्याच बोलीभाषा एकत्र वाचायला मिळणार

मालवणी/कोकणी भाषेंचां भंडार आमच्याकडे आसां.कंटाळो येय पर्यंत लिहूची आमची तयारी आसां. आमचे लेख मिपावरच्या सगळ्यांक वाचूक समजूक लागले तर आम्ही तेच्या उपरांत आमच्या मालवणी भाषेतच कायमचे लेख,कविता मिपावर लिवत र्‍हंवू. काय समजल्यांत?

मज येते त्या 'पद्ये' बोलीत मज लिहवयाचे हायच. कशें जमेल तशें लिहेन. पण हा तुमचा उपक्रम म्हणटात तो सामका उत्कृष्ट म्हणू येतो हां. बरें दिसले मनास सामके.

In reply to by प्रीत-मोहर

कुठला विभक्तीप्रत्यय बरोबर हे विचारत नव्हतो, तर त्या एकूण शब्दाचाच अर्थ विचारत होतो.

वेगवेगळ्या बोलीभाषा एकत्र वाचायची संधी मिळेल यानिमित्ताने, मिपाच्या सगळ्याच लेखमाला उत्कृष्ट होत आहेत, तसाच हा उपक्रमही खास होणार. अशा विविध उपक्रमांमुळेच मिपा खूप आवडतं :)

अरे वा. मस्त उपक्रम. छान छान कथा, विषेषतः दर्जेदार लघुकथा वाचायल्या मिळाव्यात ह्या अपेक्षेत. लेख किंवा साहित्याच्या संख्या अमर्यादित असल्याने साहित्याचा मोठा खजिना वाचायला मिळेल.

टिंग्या मध्ये मावळी भाषेचा लहेजा खूप सुंदर पकडला आहे. मावळामधले स्थानिक कातकरी किंवा शेतकरी ही भाषा बोलतात. मप्ल , तुप्ल , किंवा गप वले ( गप रे , गप ग !) ढाळं म्हणजे उतार असे बरेच शब्द वेगळे आहेत.

हो.ऐकायला मस्तच वाटतं ते. आहे का कोणी इथे? बर्याच दिवसापूर्वी ऐसीवर याबद्दल चर्चा वाचलेली आठवते.कोणीतरी मिपाकरानीच मावळी भाषेचा नमुना लिहिला होता.धागा शोधायला हवा.

महाराष्ट्र राज्याबाहेरील मराठीच्या बोलीभाषांचाही विचार व्हावा. उदा. तंजावुरी मराठी, बंगळूरी मराठी, इंदूर ग्वाल्हेर इत्यादी भागांतील माळवा प्रांतातील मराठी, बडोद्याची मराठी इत्यादी. तंजावुरी मराठीसाठी सिरुसेरिसाहेब, दिल्लीकर मराठीसाठी विवेक पटाईतसाहेब इत्यादींना आग्रह केला जावा. काय म्हणता? इस्राएलमध्येही मराठीभाषिक बरेच आहेत. तसेच मॉरिशसमध्येही. तिथूनही त्या-त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य असलेल्या मराठीत लेख येणे ही पर्वणीच ठरेल!

खंय गेले मरे सगले? वर्‍हाडी, बाणकोटी, मालवणी, कोंकणी, बेळगावी लोक खंय गेले सगले?