मांगी तुंगी, स्टॅच्यू ऑफ अहिंसा, धर्मवाद, निसर्ग आणि आपण
आपल्या भारत देशाचं एक फार मोठं दुर्दैव आहे. इथे नैतिकाची पूजा करणारे लोक नगण्य आहेत, आणि भौतिकाची पूजा करणारे असंख्य. त्यात इथे पुतळे, स्मारकं यांचं लोकांना व्यसनच आहे असं म्हणायला हवं. त्या मूर्ती, पुतळ्यांकडून लोकं काय आणि कशी प्रेरणा घेतात हा एक प्रश्नच आहे कारण लोकांचं आचरण कुठेच बदलताना दिसत नाही.
अशाच एका पुतळ्याविषयी एक व्यथित करणारी बातमी पाहिली. महाराष्ट्रात नाशिकच्या पुढे सटाणा येथे एक 'मांगी-तुंगी' नावाची जागा आहे. हा एक सुमारे ४४०० फूट उंचीचा पर्वत आहे ज्यावर जायला ४५०० हून अधिक पाय-यांचा मार्ग आहे. इथे वर गुहा आहेत ज्यांमधे जैनपंथीयांच्या आकृती कोरलेल्या असून हे जैन सिद्धक्षेत्र म्हणून मानलं जातं. या ठिकाणाला अद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे. चारही दिशांना पसरलेली सह्याद्रीची शिखरं आहेत. त्यामुळे जैनपंथीयांबरोबरच इतर अनेक पर्यटक, ट्रेकरही इथे येत असतात. या ठिकाणाबद्दल वाचलेली बातमी अशी की या पर्वताचा एक भाग पोखरून तिथे रिशभदेव या जैन देवाचा १०८ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. याविषयीच्या एका कार्यक्रमात तेथील विश्वस्त व्यक्ती सांगत होती की, "ये स्टॅच्यू ऑफ अहिंसा" है. यहां आनेवाले सभी जैन भाविक इसके दर्शन का लाभ पा सकते है. ये अपने आप में एक अनुभूती है" इत्यादी.
एक व्यक्ती म्हणून, एक ट्रेकर म्हणून, मला त्या निसर्गाच्या वैभवाच्या या लचका तोडलेल्या, पोखरलेल्या रूपाने विषण्ण केलं. अनेक प्रश्न पडले. या पुतळ्याच्या उभारणीला मान्यता देणारे स्वतः माननीय मुख्यमंत्री आहेत. त्यांना यात होणारं निसर्गाचं विदृपीकरण दिसलं नाही का? पुढे या पुतळ्याच्या निमित्ताने तिथे उत्सव भरवला जाणार आहे. त्यासाठी रस्त्यांचं रूंदीकरण केलं जाणार आहे, पाण्याची सोय, भक्तांसाठी रहाण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी मंजूर झालेला खर्च ७० कोटी रुपये, टाईम्स ऑफ इंडियात बातमी आहे. रस्ते, पाणी यांची कामं होण्यासाठी या पुतळ्याचं निमित्तच हवं होतं का? ती कामं अशीही व्हायलाच हवी होती; इथेच नाही सगळीकडे.
या पुतळा उभारणीतून नेमकं काय सिद्ध करायचं आहे हाही एक वादाचा मुद्द होऊ शकतो. मांगी तुंगी हे जैन तीर्थ होतं आणि ते कुणीही नाकारलं नव्हतं. मग हा जैन देवतेचा पुतळा बांधण्याचं प्रयोजन काय? त्यासाठी डोंगर पोखरलेला कसा चालला? हे एका प्रकारचं शक्तिप्रदर्शन आहे असं का वाटू नये? आणखी एक गोष्ट अशी की काहीही सोयी सुविधा नसताना ज्या लोकांनी अशा खडतर जागी कोरीवकामं केली, गुहा बांधल्या, त्यांच्यापुढे आज सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जर तुम्ही एखादा पुतळा बांधलात तर त्यात तुमचा मोठेपणा काहीच नाही. पैसे असले की आज हे असं काही करणं सहज शक्य आहे. त्यामुळे यात भक्तीचा भाग कमी आणि इतर सूप्त हेतूचा भाग जास्त आहे, हे जाणवतं.
मुळात, भौतिकाचं कौतुक जास्त असल्याने हे प्रत्येक बाबतीत होत आलंय. मग शिवाजी महाराजांचं स्मारक काय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक काय, सरदार पटेलांचा पुतळा काय किंवा आणि कुणाचं स्मारक काय. या गोष्टीतून काय साध्य होतं हे अनाकलनीय आहे. शिवाजी महाराजांचे विचार घ्यावे, बाबासाहेबांची बुद्धिमत्ता घ्यावी, साधूसंतांची शांतता, संयम व इतर गुणवैशिष्ट्य घ्यावीत; परंतु ते होत नाही. ते फक्त नावापुरतं असतं.
मांगी-तुंगी बद्दलच्या त्या कार्यक्रमात त्या विश्वस्तांनी सांगितलं की आणखी एका डोंगरावर ते अशा प्रकारचा पुतळा बांधणार आहेत. आनंद आहे. यालाही शासन मंजूरी देईलच. सर्वांना खूश ठेवायचं म्हटल्यावर सर्वांना हवे तसे हवे तिथे पुतळे बांधायला द्यायला हवेतच. विकास यालाच तर म्हणतात! पण एक ट्रेकर म्हणून, एक सह्याद्रीत रमणारा म्हणून मला तरी आता त्या ठिकाणी जावंसं वाटणार नाही. कदाचित तो पुतळा बांधणा-यांचा हेतू काही अंशी यातून साध्य होईल.
मिपाकरांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
मी इथे जाऊन आलेलो आहे. परंतु खालील छायाचित्रे जालावरून साभार घेतलेली आहेत.
वाचने
10178
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
अवघड आहे
पुतळे
तुका म्हणे उभे रहावे
अल्पसंख्य आहेत ते
एक व्यक्ती म्हणून, एक ट्रेकर
ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या
In reply to ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या by सायकलस्वार
Absolutely! There is no need
In reply to ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या by सायकलस्वार
अगदी खरे!
हं.
धार्मिकतेत एकप्रकारची
आपल्या देशात धर्म म्हंटलं म्हणजे...........
रोचक आणि तितकाच वादग्रस्त
अवघड आहे...
नक्की कोणते मुख्यमंत्री
In reply to नक्की कोणते मुख्यमंत्री by वाह्यात कार्ट
माफ करा माझं वाक्य पुरेसं
In reply to नक्की कोणते मुख्यमंत्री by वाह्यात कार्ट
मीही तीन एक वर्षापूर्वीच गेलो
ह्म्म..
तुका म्हणे
हे दयाघना
In reply to हे दयाघना by शरद
हाहाहहा
In reply to हे दयाघना by शरद
दाण्ण! जबरी मुद्दा! __/\__
In reply to हे दयाघना by शरद
:)
अवघड आहे
मांगी तुंगी सकाळी ५ वाजता
In reply to मांगी तुंगी सकाळी ५ वाजता by अमरेंद्र बाहुबली
सुंदर वृतांत !