Skip to main content

यु आर लेट यु फुल

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 04/03/2013 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज भेटायचे ठरले होते आपले किनार्‍यावर जरा लवकरच आलो अन् दूर उभा राहिलो . मी नसतांनाचा समुद्र आणि मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू दोघांना बघायचे होते म्हणून . पण तू माझ्या आधीच पोहचली होतीस किनार्‍यावर, समुद्राकडे तोंड करून . मनात म्हटले, यु आर लेट यु फुल! . बेभान वाहणारा खारट वारा तुझ्या कुंतलात अडकून तुला छळत होता वाटले तुझ्या केसांमधून बोटे फिरवून त्याला मोकळे करावे पण इतक्यात तू मानेला एक मोहक झटका देऊन त्याला झटकलेस वाटले... यु आर लेट यु फुल! . तुझ्या पायाखालची वाळू तुझ्या कोमल पाऊलांना चिटकत होती तुला ती हुळहुळ सतावत होती वाटले पुढे होऊन ती झटकून द्यावी पण इतक्यात तू येणार्‍या लाटेत आपले पाऊल हळूवार वरचेवर घुसलळेस वाटले... यु आर लेट यु फुल! . समुद्र जरा रागावलेला वाटला, बहुदा माझ्यावरच तिला वाट पाहायला लावत होतो म्हणून असेल बहुतेक नाही,बहुदा तिच्या डोळ्यातला समुद्र जास्त सुंदर होता, म्हणून कदाचित माहित नाही नक्की काय ते पण त्याच्या लाटा अजूनच उग्रपणे किनार्‍यावर आदळत होत्या . कुठल्याशा अनावर ओढीने मी तुझ्याकडे सरसावलो तुझा हात धरून तुला मागे ओढले मला पाहताच तू लटक्या रागाने ओठांचा लोभस चंबू करत म्हणालीस . यु आर लेट यु फुल!! |- मिसळलेला काव्यप्रेमी -| टिपः हि कविता मी ऑर्कुटवर प्रसिद्ध केली होती, तिथुन उचलुन चेपुवरच्या 'पुण्याला पुणेच म्हणा' नावाच्या ग्रुप ने ती माझे नाव वगळून, मला न विचारता एक पेज बनवून त्यांच्या ग्रुप मध्ये प्रसिद्ध केली होती. त्यामुळे तुम्ही ती आधीच वाचलेली असण्याची शक्यता आहे. तिथे काही हजार लाइक्स आले होते, मला कळल्यावर, मी ती कविता त्या ग्रुपशी भांडून तिथुन काढायला लावली.
काव्यरस

वाचने 34601
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

डिस्क्लेमर : मला काव्यप्रांतातलं शष्प काही कळत नाही हे जगजाहीर आहेच. पण तरीही मताची पिंक टाकण्याचा मोह आवरणं एक मनुक्ष्य म्हणून अशक्य झाले म्हणून पचकत आहे. :) मिक्या, बेट्या, कविता वाचल्यावर राहून राहून संदीप्-सलीलच्या गाण्यांच्या रचना असतात तशी असल्याचा फील येऊन राहिलाय भैय्या! का कोण जाणे, पण संदीप-सलीलच्या "पाऊस असा...." च्या चालीत ही कविता बसेलसं वाटलं :) चुभूदेघे!

पुन्हा एकदा कट्यार काळजात घुसली! गवि, मोदक नि आणखी कुणीतरी ती आणखी आत रुतवली. ते मिक्या कवितासंग्रहाचं कधी डोक्यात घेतंय कुणाला माहिती. अर्थहीन या आयडीचे कविता वर काढल्याबद्दल आभार.

अरे वा इतकी सुंदर कविता. अप्रतिम. गविंप्रमाणेच चांगल्या कवितेला आमचंही ठिगळ.. प्राजक्त सड्यावर तु अस्ताव्यस्त पहुडलेली, ओंजळी भर फुलं तुझ्यावर उधळण्यासाठी हळुवार पावलांनी पुढे झालो, पण तिथेच रेंगाळणार्‍या वार्‍याने जोर केला अन् झाडावरची सगळी फुले तुझ्यावर बरसली, तुझ्या तनुवर विसावलेल्या , त्या फुलांनी हसुन वेडावत मला म्हंटले , यु आर लेट यु फुल!

!!!

कविता वाचली होती, आवडलीही होती, पण प्रतिसाद द्यायला लेट झाला. मिका लिहितोच जीवघेणे. आजकाल मिकाशेठ कुठे गायबलेत कोणजाणे? पैजारबुवा,

कविता करण्याजोग्या अनेक भेटल्या पावसातही अनेक विकल्या पण जेव्हा ती भेटली तेव्हा मी नि:शब्द झालो काहीच न बोलता स्तब्ध झालो भानावर आलो तेव्हा ती निघून गेलेली अाणि उदासवाणा अासमंत मला म्हणाला यू आर लेट यू फूल! - (काव्याळलेला मिसळप्रेमी) बोका

In reply to by बोका-ए-आझम

पावसातही अनेक विकल्या
जेवढ्या भेटल्या त्या सगळ्या का विकल्या? एखादी स्वत:साठी ठेवायची ना. व्याजासकट डबल, ट्रिपल झाली असती आतापर्यंत गुंतवणुक. मराठी माणुस इथेच मार खातो पैजारबुवा

आज पुन्हा पाच वर्षांनी ही कविता वर काढतोय. जे मीपावर नवी आहेत त्यांना वाटायला नको की "यु आर लेट यु फुल " सध्या मिकाभाऊ कुठं गायबलेत कुणास ठाऊक?

In reply to by सनईचौघडा

हा इसम सध्या कविता का बरे लिहीत नाही? लिहित असेल तर इकडे का टाकत नाही? हा प्रश्र्ण मलाही बरेच दिवसांपासून पडला आहे पैजारबुवा,

खूप सुंदर! उशीरा का होईना पण वाचायला मिळाली. धन्यवाद सनईचौघडा, धागा वरती आणल्याबद्दल!

८ - ९ वर्षांनंतरही आपली एखादी कविता आपल्या मित्रांच्या लक्षात राहिलीय ह्याच खरंच खूप समाधान वाटतं. आताशा इतकं तरल सुचत नाही, पण सुचलं तर प्रथम इथेच घेऊन येणार मी.