Skip to main content

बाजीराव मस्तानी: आमचेही सेन्सॉर!

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 28/12/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, 'बाजीराव मस्तानी' आम्ही आज थेटरमधे जाऊन पाहिला. काही ब्रह्मवृंद या चित्रपटावर खप्पामर्जी असल्याचे जगजाहीर झाल्यामुळे आम्ही हा सिनेमा मुद्दाम एखाद्या स्वघोषित सेन्सॉरबोर्ड मेंबरच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. सिनेमाबद्दल काही ठळक मुद्दे मनात नमूद झाले ते लिहीत आहे. मुद्द्यांचे खास काही वर्गीकरण असे केलेले नाही. 1. सिनेमात बाजीराव, मस्तानी आणि काशी या तिन्ही मुख्य पात्रांना योग्य न्याय दिलेला आहे. किंबहुना काशी जबरदस्त भाव खाऊन जाते. तसेच बाजीरावाची आई, बंधू चिमाजी, छत्रपती शाहू यांचे चरित्रचित्रणही मजबूतपणे केलेले आहे. एक अत्यंत credible family conflict उभा करण्यात आला आहे. 2. "राऊ या कादंबरीवर आधारित" असे पडद्यावर घोषित केलेले आहे. मराठी कादंबरीवर आधारित असलेला हिंदी सिनेमा मला तरी दुसरा आठवत नाही. 3. 'पिंगा' गाण्याला तर्काधारित कल्पनाविलास करून कथारचनेत सुयोग्य स्थान दिलेले आहे. 'मल्हारी' या गाण्याला मात्र फारसा अर्थ किंवा प्रयोजन नसून ते संपूर्णपणे उडवले तरी काहीच फरक पडत नाही. 4. मस्तानीचा आणि तिच्या मुलाचा द्वेष/ विरोध हा पेशवे कुटुंबीयांनी अनेक कारणांमुळे केला. पैकी "पेशवेपदाचा वारसा" किंवा "इस्टेटीतला वाटा" हेही एक होते. पण ते अनुल्लेखाने मारण्यात आले आहे. 5. बुंदेलखंडातील मराठा-बंगश युद्धाची व्यूहरचना दाखवण्याचा प्रयत्न चांगला आहे. 6. मस्तानी बुंदेलखंडातून अनाहूत पाहुणी म्हणून शनिवारवाड्यात दाखल होते, हा सिनेमाचा भाग बखरीमध्ये एका वाक्यात लिहिल्यासारखा एका सीनमध्ये संपतो. दृश्यमाध्यमात तिचा प्रवास दाखवणे गरजेचे होते. 7. शनिवारवाड्यातला धबधबा जरूर पहा!! आता तो लुप्त झाला असावा. (शनिवारवाडाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे ती गोष्ट वेगळी.) 8. मस्तानी आणि काशी या फक्त काही महिन्यांच्या अंतराने बाळंत होतात. पण नंतर नाना आणि शमशेर यांच्या वयात कित्येक वर्षांचे अंतर दिसते. 9. मस्तानीला पेशवे कुटुंबीयांनी राहत्या घरात साध्या नजरकैदेत ठेवले होते. पण सिनेमात तिला साखळदंड घालून तुरुंगात टाकतात. ही कविकल्पना आहे, पण चित्रपटाच्या विशिष्ट रचनेमुळे क्षम्य. 10. बाजीराव हा रांगडा, बेदरकार पण चाणाक्ष योद्धा असा चित्रित केलेला आहे. ते योग्यच म्हणावे लागेल. सिनेमात तो एकदाही सोवळे नेसताना, संध्या-पूजा करताना दिसत नाही. 11. आरसा महालातील सर्व दृश्ये विशेष काळजीपूर्वक पाहिली. पण कुठेही Equipment किंवा crew reflections आढळली नाहीत. हे प्रशंसनीय आहे. (तेवढ्यात मस्तानीचा नाच पहायचा मात्र राहून गेला) *** एकूण पहाता, डोक्यात राख घालून घ्यावी किंवा शेपटाला आग लावून थैमान करावे असे मला या सिनेमात काहीच आढळले नाही. ब्रह्मवृंदाने याकडे लक्ष द्यावे ही विनंती.

वाचने 17398
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by सिरुसेरि

'चक्र' विसरलो होतो. 'महानंदा' नामक हिंदी चित्रपट असल्याची कल्पना नाही. मराठी नाटकांवर मात्र हिंदी चित्रपट झालेले आहेत. अश्रूंची झाली फुले, तो मी नव्हेच अशी अनेक नावे सांगता येतील.

'महानंदा' या हिंदी चित्रपटामध्ये फारुख शेख , श्रीराम लागु , सुलभा देशपांडे हे कलाकार होते . या नावाचा याच मराठी कादंबरीवर आधारित असलेला मराठी सिनेमा गाजला आहे . त्यामधील "मागे उभा मंगेश" हे गाणे लोकप्रिय आहे . "रावसाहेब" हा हिंदी चित्रपट जयवंत दळवी यांच्या "बॅरिस्टर" या नाटकावर आधारीत आहे . व हे नाटक जयवंत दळवी यांच्या "अंधाराच्या पारंब्या" या मराठी कादंबरीवर आधारित आहे . 'चक्र' हा 'चक्र'वरच आधारीत आहे . अमोल पालेकर यांनी जी. ए. कुलकर्णी यांच्या "कैरी" या मराठी कादंबरीवर काढलेला हिंदी सिनेमा गाजला आहे . "दुनिया न माने" हा प्रभातचा हिंदी सिनेमा "कुंकू" या मराठी सिनेमावर तसेच "पण लक्षात कोण घेतो" या ना . ह. आपटे यांच्या या मराठी कादंबरीवर आधारित आहे .

In reply to by सिरुसेरि

कैरी ही मला वाटतं, कादंबरी नसून कथा होती. तसा 'अर्धसत्य'ही पानवलकरांच्या कथेवर आधारित होता. शांतता कोर्ट.., बीवी ओ बीवी, आंटी नं. 1 अशी काही नावेही घेता येतील.

In reply to by सिरुसेरि

मी ना . ह. आपटे यांचा नातू थोडीशी चुकीची दुरुस्ती ""दुनिया न माने" हा प्रभातचा हिंदी सिनेमा "कुंकू" या मराठी सिनेमावर तसेच "पण लक्षात कोण घेतो" या ना . ह. आपटे यांच्या या मराठी कादंबरीवर आधारित आहे " "दुनिया न माने" हा प्रभातचा हिंदी सिनेमा व "कुंकू" या मराठी सिनेमा "न पटणारी गोष्ट" या ना . ह. आपटे यांच्या या मराठी कादंबरीवर आधारित आहे . "पण लक्षात कोण घेतो" हि कादंबरी "ह. ना. आपटे उर्फ हरिभाऊ आपटे यांची आहे. या कादंबरीवर बेतलेला सिंहगड चित्रपटाचे पटकथालेखक माझे आजोबा. यामुळे हा घोळ झाला असावा. धन्यवाद

हा सिनेमा नक्की ना. सं. इनामदार यांच्या राऊ या कादंबरीवर आधारित आहे का?

In reply to by पर्ण

चित्रपटाच्या सुरुवातीला श्रेयनामावलीत तसे स्पष्ट नमूद केले आहे

मल्हारी गाण्यापेक्षा पोवाडा. पिंगा गाण्यात नर्तकी नाचल्या असत्या व काशीबाई व ईतर जणी बघत आहेत दाखवता असते. पहिले बाजीराव इतके रंगेल नसावेत. रणवीरचे बोलणे व देहबोली पहिल्या बाजीरावसारखी असेल वाटत नाही.

In reply to by हेमंत लाटकर

बाजीराव हा नाणावलेला योद्धा होता. त्यामुळे त्याच्या देहबोलीत एक चपळता, गुर्मी आणि आक्रमकपणा असणे तर्काधिष्ठित वाटते. गुलाबाचे फूल धरून लोड-तक्क्याला टेकून बसलेले पेशवे ही काही वास्तववादी प्रतिमा नव्हे. तसेच चित्रपट हे दृश्यमाध्यम आहे. त्यामुळे पात्रे एका जागी बसून राहू शकत नाहीत. दुसरे म्हणजे भारतीय मानसिकतेनुसार एका अभिनेत्रीला महत्वाचे नृत्य दिले गेले आणि दुसरीला मिळाले नाही, तर हिने तिला खाल्ले असे सरळसरळ समजले जाते. व्यावसायिक चित्रपटाला ही सर्व तारतम्ये बाळगावी लागतात. मस्तानीला भव्यदिव्य नाच दिलेले असताना काशीबाई केवळ अंतःपुरातून पहातच राहिल्या, तर सिनेमाचा तोल बिघडतो. दोन नायकांच्या बाबतीतही अशा प्रकारचे, फक्त थोडे निराळे संकेत असतात.

१) अगदी सुरवातीला हिंदुस्थानाचा जो नकाशा दाखवला आहे, त्यात 'अरबी समुद्रा'च्या जागी 'हिंद महासागर' लिहिले होते असे आठवते. त्या काळात अरबी समुद्राचा उल्लेख हिंद महासागर म्हणून होत होता का ? २) संपूर्ण चित्रपटात, पुण्याचा उल्लेख 'पुना' असा होतो. माझ्या मते त्या काळात, 'पुणे' म्हंटले जायचे, 'पुना' हा उच्चार ब्रिटीशांनी रुजवला. (चू.भू.द्या.घ्या.) बाकी संपूर्ण चित्रपट सुंदर आहे, आवडला.

In reply to by सौन्दर्य

माझ्या ऐकण्यात पुण्याचा उल्लेख पुणे असाच ऐकला , किंबहुना पेशवीण बाई असा उल्लेख करतांना न पेक्ष्या ण असा केलेला पाहून बरे वाटले नक्की कोण माहिती नाही पण पुण्याचा उच्चार पेशवाई मधील एक मराठी व्यक्ती रेखा पुणे असाच करते नेमके कोणी पुण्याचा उल्लेख पुने असा केला हे जाणून घ्यायला आवडेल अवांतर टीव्ही वर सेक्लुलर टिपू व अकबर पाहून ज्यांना विरोध व्यक्त करावासा वाटला नाही त्यांना नाचणे व बोलणे ह्यावरून ह्या सिनेमावर टीका करतांना पाहून वाईट वाटले अर्थात ह्या गोष्टी मलाही खटकल्या पण ह्य मुद्याच्या कडे वेगळ्या दृष्टीकोनातू पहिले तर एवढेच म्हणेन कि जिथे कट्यार सारख्या नितांत सुंदर सिनेमाची सहिंता सुद्धा मूळ नाटकाशी प्रतारणा करणारी आहे हे समप्रमाण केले आहे तेथे खलनायक खांसाहेब व आक्रमक सदाशिव हे सुद्धा विकृतीकरण मानले गेले आहे मात्र लोकांना सिनेमा आवडला , बाजीराव मस्तानी भारतात पाहिला, आवडला, सिनेमाचा जमा खर्च करून पाहिला तर जमेच्या बाजू अनेक होत्या शिवरायाचे स्वराज्य सेक्युलर होते म्हणणाऱ्या विचार्जंतांना सिनेमातून चांगलाच बोध मिळेल , एक हिंदू राजा दुसर्या हिंदू राज्यास मदत करायला गेला असे वाक्य किंवा शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची भूमिका व्यवस्थित मांडली आहे. किंबहुना उत्तरेत मराठी लुटारू अशी जी इमेज आहे ती ह्या सिनेमात उत्तरेत जेव्हा मुस्लिम आक्रमण व्हायचे तेव्हा राजपूत स्त्रियांना जोहर करावा लागायचा मात्र मराठांच्या आक्रमण हे हिंदवी पातशाही देशात असावी ह्या हेतूने व्हायचे हा संदेश व्यवस्थित पोहोचवला आहे मूळ कादंबरीत व स्मिता ताई ह्यांच्या राऊ मालिकेत राऊ अभक्ष भक्षण करायचा व किंवा त्यांची आई व पत्नी ह्यांच्या संवादात त्यांच्या वडील सुद्धा शेवटी नाटक शाळेतील एका स्त्रीच्या नादी लागले होते असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र सिनेमातून जादा पथ्थर ........ ह्या संवादातून स्पष्ट होते. सिनेमा रविवारी बर्यापैकी गर्दी खेचून होता मराठी अमराठी प्रेक्षक सिनेमाला आले होते सिनेमा पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. सिनेमाचा सकारात्मक प्रभाव लोकांच्या वर जाणवला.फार पूर्वी वेलेन्तैन डे पेक्ष्या बाजीराव मस्तानी दिवस साजरा करा असे बाळासाहेब म्हणाले होते, ह्या निमिताने राऊ चा धडा शालेय अभ्यासक्रमात विस्ताराने यावा. त्याचप्रमाणे मिपावर राऊ ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे सुरु व्हावे. शनिवार वाडा पाहण्यासाठी भारतातून पर्यटक यावेत त्यासाठी राज्य सरकारने योजना कराव्यात असे मनापासून वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

आमच्या शहरात सोमवारच्या संध्याकाळी थिएटर तीन-चतुर्थांश भरले होते. आमच्याखेरीज मराठी बोलणारे प्रेक्षक एकच आढळले. काही स्थानिक अमेरिकन लोकही प्रेक्षकांत होते. चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर ऐकून धन्य झालो. चित्रपटात चुकांची कमतरता नसली तरी चित्रपट पाहून थोरल्या बाजीरावांच्या कर्तृत्वाबाबत विचार करतच प्रेक्षक थिएटरबाहेर पडतो ही खूपच समाधानाची बाब आहे. हिंदी चित्रपटांच्या टॉलिवूडीकरणाला या चित्रपटाच्या यशाने लगाम लागल्यास खूप आनंद होईल. एक सकारात्मक बातमी - ‘बाजीराव-मस्तानी’मुळं शनिवारवाडा गजबजला.

In reply to by श्रीरंग_जोशी

आम्ही सहकुटुंब 'बाजीराव-मस्तानी' आमच्या येथे (ह्युस्टन) पाहिला. ३०० जणांच्या हॉलमध्ये पडद्याजवळच्या दोन रांगा सोडल्या तर संपूर्ण हॉल भरला होता. सिनेमा पाहायला बहुसंख्य भारतीय होते त्याच बरोबर काही अमेरिकन त्यांच्या भारतीय मित्रांबरोबर आले होते. सिनेमा संपल्यावर टाळ्या इथेही वाजल्या. एकुणात सिनेमा अगदी उत्तम आहे. काही दिवसांपूर्वी एक हिंदी सिनेमा पाहायला गेलो होतो त्यात संपूर्ण हॉलमध्ये फक्त चार जण होते.

10. बाजीराव हा रांगडा, बेदरकार पण चाणाक्ष योद्धा असा चित्रित केलेला आहे. ते योग्यच म्हणावे लागेल. सिनेमात तो एकदाही सोवळे नेसताना, संध्या-पूजा करताना दिसत नाही.
बाकी सर्व चित्रपट पहाणेबल आणि मॅच्युअर पद्धतीनं चित्रीत केलेला वाटला (तुलनात्मक दृष्ट्या). पण बाजीरावात जी एक विक्षिप्त स्ट्रीक जाणवते ती दाखवली नसती तरी चालली असती. बहुधा ती रणबीर नं स्वतः हून टाकली असावी पण रांगडा, बेदरकार व्यक्ती हा प्रत्येक दैनंदिन व्यवहारात आक्रमक असेल असं नाही ना!

चित्रपटात बरेच मराठी कलाकार आहेत ते पाहून छान वाटले..विशेष म्ह्णजे चिमाजीच्या रोल मधे आपला वैभव तत्ववादी खूपच आवडला..