Skip to main content

शाळेतील गमती जमती

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 21/02/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतील गमती जमती.... यामध्ये आपण शाळेत केलेल्या गमती किंवा स्वतःवर ओढवलेले विनोदी/आठवणीत राहिलेले असे प्रसंग लिहावेत. तसेच लक्षात राहिलेले शि़क्षक/ शिक्षिका..... यावर एक मेल द्वारे आलेली कविता मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय............. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपल नाव लिहायचाय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन नलाखाली हात धरून पानी प्यायचाय, कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का? हा विचार करत रात्री झोपी जायचय, अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. घन्टा व्हायची वाट का असेना मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय, घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय, कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय, कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 99576
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

आमची पण (हजारोंमधील) एक आठवण.. आम्ही साता-याला 'रयत'च्या 'गुरूकुल' प्रकल्पात शिकत होतो. होस्टेल शाळेतच होतं. आमची रात्र अभ्यासिका असायची. या वेळेचा आमचा आवडता खेळ म्हणजे झोपलेल्यांना (खडू मारून) उठवणे. एकदा अशा अभ्यासिकेच्या वेळी ही मारामारी चालू होती. समोर खुर्चीत सर निवांत झोपले होते आणि अचानक एक खडू सरांना लागला. सर दचकून उठले आणि काय झालं ते कळाल्याबरोबर सगळ्यांचे हात बघत सुटले. एका मित्राला सर काय करत आहेत ते कळून त्याने हात पुसायच्या आधी सर तिथे हजर.. त्याचे खडूने पांढरे झालेले हात बघून आम्ही समजलो की हा गेला आता, पण शेवटी आमचाच मित्र!!! B) त्याने अतिशय गरीब तोंड करून आधीच सरांना हातातले खडू दाखवले आणि वर म्हणाला, "सर, मलाच कुणीतरी मारलेत!!" :)) काहीही न बोलता सर परत जाउन झोपले आणि आमचे चेकिंग ही वाचले..आजही त्या मित्राला भेटलो की ही आठवण हमखास निघतेच.. अवांतर : आमच्या मनाच्या हळव्या कोप-याचं परवा लगिन आहे.. :( --चिर्कुट (दहावी 'क')

परवाच हापिसात या 'रम्य' आठवणी निघाल्या होत्या. आमच्या वर्गातल्या पोरांनी एकदा पंख्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. आणि संस्कृतच्या बाईंना काही यायचं नाही म्हणून त्या शिरल्या शिरल्या पंखा सुरू करून दिला. आता गुलाबाच्या पाकळ्या उडवल्या म्हणून काय शिक्षा करायची का? वर्गात झोपा काढायची सवय मला ९-१०वीत लागली असेल. अशीच एकदा आराम करत होते तर आवाज आला, "अदिती, काय चाललं आहे?" मी साळसूदपणे काही सुरू नाही असं नाटक केलं, जे लवकरच उघडं पडलं. अर्थात बाई चांगल्या असल्यामुळे पाच मिनीटांच्या लेक्चरवर काम निभावलं. सगळ्यात हाईट्ट होती ती त्याच संस्कृतच्या बाईंची! त्या नवनीत गाईडमधून सगळं उतरवून द्यायच्या; तर आमच्या वर्गातली एक दोन पोरं गाईडच समोर धरून बसली होती! नेमकं बेंचेसच्या रांगातून फिरताना ते गाईड बाईंना सापड्लं. मग काय महाराजा, गाईडच जप्त! ज्याचं गाईड "पळवलं" होतं तो दोन दिवस शांत होतं; दोन-तीन दिवसांनी पोरांचा दंगा सुरू झाला तर नंतर समजलं. दुसर्‍या एका पोराला याच बाईंनी त्यांच्या लॉकरमधून काहीतरी आणायला सांगितलं, तर त्याला लॉकरमधे दोन गाईड्स सापडली, एक पोराचं आणि एक बाईंचं! शाळेत गाईडवर बंदी, पण या पठ्ठ्याने दोन्ही गाईड्स उचलून आणली! बाईंनी दोन दिवस शिक्षण-संप पुकारला ... आणि नंतर साळसूदपणे गाईड परत केल्यावर म्हणे, "दहावीच्या मुलांचं नुकसान नको असं मुख्याध्यापकांनी सांगितल्यामुळे मी पुन्हा शिकवायला सुरूवात करत आहे." पोरं जी खोखो हसली होती तेव्हा ...! माझ्या "कारकीर्दी"तला उच्चांक हा: आमच्या शाळेत कसलीही स्पर्धा असेल तर लगेच सगळ्यांना ती कंपल्सरी करण्याची वैट्ट सवय! सुंदर चित्र काढणार्‍यांना सक्तिने विज्ञानाच्या परीक्षा द्यायला लावायच्या, माझ्यासारख्या गद्य लोकांना चित्रं काढायला लावायची वगैरे वगैरे! मला चित्रं काढायचा पूर्वीपासूनच कंटाळा, आता जीवशास्त्रात ठीक होतं, नावं-बिवं देता येतात. असंच एक मोठं वादवजा भांडण घरी केलं आणि एका अशाच सक्तीच्या चित्रकलेच्या परीक्षेसाठी शाळेत गेले. रागबिग आला नव्हता, पण दंगा करायची सवय जुनीच! तर परीक्षेला काय काय विषय होते चित्रांचे, एक होता 'रामायणातील एक प्रसंग'. माझी तिरकस खोपडी लगेच विचार करायला लागली ... काय करावं. मग चित्रं काढायला घेतलं, एका तासात संपवलं आणि सायकलवरून आख्खं ठाणं (तेव्हा आमचं ठाणं लहान होतं हो!) उंडारायला बाहेर पडले. घरी आले, बाबांना प्रश्न पडला एवढ्यात कसं काय हिचं चित्रं पूर्ण करून झालं! माझं उत्तर तयार, "अहो बाबा, सोप्पंय! मी 'रामायणातला एक प्रसंग' काढला." बाबा: काय काढला प्रसंग? लहानपणी तुम्हाला दोघांना 'गीत रामायणा'तलं गाणं आहे ना, 'अनुपमेय हो सुरू युद्ध हे ..' त्यातली 'हाणा मारा कापा तोडा' ही ओळ खूप आवडायची. मी: नाही हो, तसलं काही नाही केलं मी! बाबा: (चेहेर्‍यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह) मी: अहो काही नाही! एक झोपडं काढलं, दोन-चार झाडं काढली आणि वर एक लाईन मारली (च्च्च ... जीभ चावत), नाही म्हणजे एक आर्क काढली, तिच्यातून ठिणग्या बाहेर पडत आहेत असं दाखवलं.... बाबा: आणि मग काय सीता आणि रावण .... मी: नाही नाही! वर टीप लिहीली. "राम आणि लक्ष्मण हरणाच्या पाठी गेले आहेत आणि सीतेला रावणाने पळवून नेलं आहे, तेव्हाची झोपडी!" बाबा आणि मी पोट दुखेपर्यंत हसलो. आख्ख्या वर्गासमोर माझी एकदाच पूजा बांधली गेली होती! अदिती

वेळ असला की मी जुने लेख वाचत बसतो. म्हणुन खरडवहीत जुने मी. पा. कार कुठे गेलेत ते लिहले आहे. गेले दोन तास हा लेख वाचत होतो खुपच नॉस्टॅलजिक झालो. आज्च्या मी.पा. च्या नविन सद्स्यांना हा धागां माहित व्हावा आणि त्यांनी काही तरी आप्ल्या शाळेचे लिहावे म्हाणुन हा धागा वर काढतोय. तुम्ही लिहीपर्यंत मी ही काही तरी खरडतोच.

न केलेल्या चुकीसाठी एकदा प्रचंड मार खाल्लाय शाळेत.....बाकीच्या आठवणी एक वेळ विस्मरणात जातील पण ही आठवण नाही....

हाताच्या बोटांमध्ये ४ खडू ठेऊन मग शेक हेंड करायचे आणि मुलगा बोम्बलला की शिकवता शिकवता "ए ओरडतो कशाला?" हि शिक्षा झालीय का कुणाला ?

आमच्या ठाकुर सरांची आठवण झाली....त्यांचा १ डायलॉग होता....................... "सरपाळे, तु जोपर्यंत दहावी पास होत नाहीस तोपर्यंत मी दाढी करणार नाही (स्वतःची)" अक्षर लैच भारी होतं राव त्यांचं

आम्हाला नववी ला मराठी शिकवायला एक म्याडम होत्या . त्यान्ची खासियत म्हणजे धडा किम्वा कविता शिकवताना त्या अगदी बाबामहाराज सातारकरान्प्रमाणे रसाळ प्रवचन करायच्या ! आणि त्या आख्यानात आपल्या घरात घडणार्या घटनान्चा उल्लेख करून भरपुर माल-मसाला टाकलेला असायचा . त्याना आत्मप्रौढी मिरवण्याची भारी हौस! प्रत्येक वर्शी येणार्या विद्यार्थ्याना ''यन्दा आम्ही कार (चारचाकी गाडी ) घेणार'' असे सान्गायच्या . शेवटी वैतागून एका मुलाने त्याना ऊत्तर दिले... बाई ,गेली दहा वर्शे आम्ही ऐकतोय गाडी घेणार म्हणून , साधी बैलगाडी तरी घेणार का या वर्शी? ......मग काय ? तो मुलगा त्या वर्शी मराठीत नापास!!! याच बाईनी कुत्री पाळली होती , त्या बाई वर्गात तासाला येण्यापूर्वी धावत ती कुत्री यायची आणि टेबलाखाली बसायची .....मग काय? कुत्री दिसली रे दिसली की पोरे कल्ला करायची ..... क्षक्षक्ष बाई आल्या रे ! ;)

असेच आम्हाला विज्ञानाला साळसकर सर होते. ते विज्ञान कमी आणि इतर बाताच जास्त मारत बसायचे. कुठल्याही गोष्टीचा संबंध ते आपल्या मित्रांशी लावायचे. माझ्या एका मित्राकडे हे आहे आणि ते आहे. ह्या सगळ्या गोष्टी निव्वळ थापाच असायच्या हे देखील सर्वांना माहिती होते. :) एकदा सौरउर्जेविषयी सांगताना म्हणाले होते, "एकदा मित्राकडे जेवायला गेलो होतो, तेव्हा भात कमी झाला. तिने पटकन सौरकुकर लावला आणि १० मिनीटात भात तयार!" हा १० मिनीटात भात तयार करणारा कुकर खरोखरच सौरकुकर होता की प्रेशरकुकर हे साळसकर सर आणि त्यांचा मित्रच जाणो.

नूमवि... भूगोलाच्या भिडे सरांना " मामा" का म्हणायचे माहीत नाही..पण म्हणायचे. अशाच एका ऑफ तासाला मामा भिडे वर्गासमोरून जात असताना एकाने त्यांना " ए मामा " म्हणून हाक मारली. ते आत आले आणि त्या पोराला यथेच्छ झोडपले... सर वर्गाबाहे निघाले तर दुसर्‍याने " ए काका " म्हणून हाक मारली. सर पुन्हा वळले आणि त्या पोराला धरले.. त्याला मारण्यासाठी हात उचलणार तेव्हढ्यात तो म्हणाला..." सर..सर.. मी काका म्हणालो..मामा नाही म्हणालो.." इतक्या प्रामाणिक कन्फेशननंतरही त्याला सरांनी वेडेवाकडे बडवून काढले.

शाळेतला सर्वात पुचाट विनोद, आपन पेनातलि शाहि संपल्यावर, मित्राला विचारावे ''ए तुज्ह्या जवळ दोन पेन आहेत ?'' मित्र ''आहे ना आपन केविलवाणी नजरेणने म्हनावे ''एक दे ना मला.... आपले मित्र '' दोन पेन आहे रे , पण एक घरि ठेवला आहे. ... आनि मग संधि आणी आपलि वेळ आल्यावर हाच आहेर आपन पुढे करायचा

वाचून शिक्षणावरची वासना अकाली का उडाली त्याचे उत्तर सापडते. पण शाळेतल्या शिक्षकांमध्ये प्रेम आणि आत्मीयता होती म्हणून तेच आठवतात. महाविद्यालयीन "कर्मचारी"(पद्धतीचे शिक्षक)फारसे लक्षात राहत नाहीत.

हा कसा काय राहिला होता? नंतर देवाकडे टवाळखोरीच्या रसायनाची कमतरता पडली होती का काय?

मला भाषण एइकताना अक्षरशः झोप यायची खास करूँ आमच्या मुख्याध्यापकांचे आत्ता इथेच थांबतो काम आहे परत केव्हा तर संदर्भासहित स्पष्टीकरण.

मिपावर पूर्वी असा आणखी एक धागा आला होता. त्यावरील प्रतिक्रिया इथे चोप्य-पस्ते करत आहे. १. आम्ही दहावीत असताना सगळ्यांना क्रिकेट खेळायचे वेड लागले होते.आमची शाळा दुपारची असे.तेव्हा शाळा भरायच्या आधी तासभर, मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर तासभर क्रिकेट खेळणे हा कार्यक्रम असे. त्यासाठी आमच्या वर्गातील गोखले अडनावाचा एक मुलगा बॅट घेऊन येत असे.एकदा आमच्या गणित शिकविणाऱ्या शिक्षिकांनी पोर्शन पुढे न्यायला म्हणून इतर कोणा शिक्षकाकडून तास मागून घेतला.पण तास सुरू होऊन १० मिनिटे होताच त्यांचे गोखल्याकडील बॅटकडे लक्ष गेले.आणि ती बॅट कशाला, कधी खेळता या सगळ्या प्रश्नांची माहिती करून घेऊन तासाचा उरलेला सगळा वेळ ’दहावीच्या वर्षात परीक्षा इतकी जवळ आलेली असताना क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवणे कसे अयोग्य आहे’ यावर त्यांनी लेक्चर दिले.गणिताचा पोर्शन पुढे नेणे बाजूलाच राहिले. दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या खोलीत आमच्या वर्गातील मुले क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवतात यावर चर्चा झाली.त्यानंतर इंग्रजी शिकविणाऱ्या आपटे बाईंनी ताबडतोब गोखल्याकडील बॅट जप्त केली आणि त्याला सांगितले की मार्चमध्ये परीक्षा संपल्यावर येऊन बॅट घेऊन जा आणि तोपर्यंत बॅट अजिबात मिळणार नाही. अजून दोन दिवसांनी गणिताचा तास होता. गोखल्याकडे बॅट नाही हे बघून गणिताच्या बाईंना वाटले असावे की आपल्या लेक्चरचा परिणाम म्हणून त्याने बॅट आणली नाही आणि क्रिकेट खेळणे बंद केले. त्यांनी गोखल्याला विचारले,"काय गोखले, आज बॅट कुठे आहे"? आणि त्यावर गोखल्याची इन्स्टन्ट प्रतिक्रिया होती--"आपटे बाईंनी ढापली". यावर सगळ्या वर्गात जोरदार हशा पिकला हे सांगायलाच नको. २. एकदा मराठी शिकविणाऱ्या बाईंनी ’कलंक मतीचा झडो दुराभिमान सारा गळो’ या ओळी एकाला वाचायला सांगितल्या. त्याने मतीचा ऐवजी ’कलंक मातीचा झडो’ असे म्हटले.बाईंनी परत वाचायला सांगितल्यावरही तो ’कलंक मातीचा झडो’ असेच वाचत होता.त्यावर बाईंनी त्याला विचारले की तुला या ओळी वाचताना काही वेगळे वाटत नाही का? यावर माझ्या मित्राची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती--’त्याच्या मतीचीच माती झाली असल्यामुळे त्याला मतीऐवजी माती असेच दिसत आहे’.

असे आणी शाळा सुटल्याची घंटा झाली रे झाली कि दप्तराचा बंद खांद्यावर अडकवून सुसाट पळत घरी जात असे. एके दिवशी मी त्याच्या दप्तराचे बंद सोडवून बाकाभोवती गुंतवून परत बांधून ठेवले. शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर तो अक्षरशः बाक सोबत ओढुन घेत वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला, मग कुठे त्याला जाणवले की बाक सुद्धा त्याच्याबरोबर येत आहे. ७ वी मध्ये असताना छोट्या डबीमध्ये नीळ आणी लिंबू मिसळून एका कोनाड्यात / कचराकुंडीत लपवून ठेवत असू. नंतर पुर्ण वर्गात दुर्गंधी पसरत असे.

असे आणी शाळा सुटल्याची घंटा झाली रे झाली कि दप्तराचा बंद खांद्यावर अडकवून सुसाट पळत घरी जात असे. एके दिवशी मी त्याच्या दप्तराचे बंद सोडवून बाकाभोवती गुंतवून परत बांधून ठेवले. शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर तो अक्षरशः बाक सोबत ओढुन घेत वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला, मग कुठे त्याला जाणवले की बाक सुद्धा त्याच्याबरोबर येत आहे. ७ वी मध्ये असताना छोट्या डबीमध्ये नीळ आणी लिंबू मिसळून एका कोनाड्यात / कचराकुंडीत लपवून ठेवत असू. नंतर पुर्ण वर्गात दुर्गंधी पसरत असे.