Skip to main content

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

लेखक यनावाला यांनी शनिवार, 12/12/2015 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता. प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले, " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" " मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. " "कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?" " हो. कुठल्याच देवाला नाही." थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला. " मग मंदिरात कसे आला ?" " तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो." " तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?" "नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो. "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे. "नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो." " देवाला नाही आणि माणसांना का बरे?" "कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." "तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला. "जशी तुमची इच्छा" मी म्हणालो. थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच. तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती. "आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला. बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या, "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल." " आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला. "ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. " "आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले. "खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते." " ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला. " त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?" " सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. " " ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?" " अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या. " चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो. " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या. " आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे. "तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही." " पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला. " ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. " "गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले. " ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा." गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे. .................................................................................

वाचने 108415
प्रतिक्रिया 421

प्रतिक्रिया

In reply to by काळा पहाड

लोक नास्तिक झाले तर अनाचार माजेल ही भीती अनाठायी आहे. थोडी विचारशक्ती, थोडे शिक्षण असेल तर तसे होत नाही. समजा मी दरोडा घातला तर देव काही करणार नाही. पण माझ्या मुलाने तसेच केले आणि तो पकडला गेला तर काय? माझ्या घरी कुणी दरोडा घातला तर मला आवडेल का? मग मी दरोडा का घालायचा? सर्वच लोक चोरी करु लागले तर समाजात जी अंदाधुंदी माजेल ती मला चालेल का? शिवाय पोलिस पकडू शकतात, लोक पकडू शकतात, मारहाण करु शकतात. गुन्हेगार म्हणून पकडलो गेलो तर कुटुंबाचे काय होईल? हे विचार कुठलाही देव धर्म न आणता लोकांना अशा गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करत नाहीत काय? माझा मते करतात. अगदी स्वार्थी आत्मकेंद्रित व्यक्तीलाही हे कळू शकते की चोर्‍यामार्‍या करणे व्यवहार्य नाही त्याकरता धर्माची झापडेच हवीत असे नाही. पूर्वी रोग आजार हे देवाच्या कोपाने होतात असे समजायचे. भूकंप, पूर, दुष्काळ हेही देवाच्या कोपाने होतात असे वाटायचे. त्याची कारणे आज कळली आहेत त्याचप्रमाणे समाजाचे स्वास्थ्य, कायदा, अनुशासन वगैरे देवाच्या कृपेने आहेत असे समजले जाते. पण हाही बागुलबुवा खोटा आहे हे थोडा विचार केला तर समजेल. तस्मात समाजात जगण्याकरता जी नैतिक मूल्ये जपावी लागतात ती धर्मामुळेच मिळतात हे खरे नाही. समाजात जे प्रसिद्ध नास्तिक लोक आहेत त्यापैकी किती लोकांनी बेकायदेशीर धंदे केल्याचे उघडकीस आले आहे? उलट कुठल्यातरी देवाचे, धर्माचे वा बुवाचे परमभक्त हे विविध परीने समाजकंटक असल्याचे आपण बघत नाही काय?

In reply to by हुप्प्या

+१. तुरुंगात असलेल्या लोकांमध्ये नास्तिकांचं प्रमाण जास्त असतं का? नाही. अमेरिकेतल्या तुरुंगात नास्तिक म्हणवणारांचं प्रमाण ०.०७% आहे. म्हणजे नास्तिक लोक पन्नासेक पट कमी गुन्हे करतात. कारण सर्वसाधारण लोकसंख्येत नास्तिक म्हणवणारांचं प्रमाण ३ टक्के आहे.

In reply to by राजेश घासकडवी

शिवाय गुन्ह्यांचं स्वरुपही पाहायला पाहिजे. आमच्या देवाविरुद्ध बोलला म्हणून एखाद्याला कापून काढणे किंवा प्रो-लाईफ म्हणून ॲबॉर्शन क्लीनिकवर गोळ्या झाडणे असे उद्योग नास्तिक लोक करत नाहीत.

In reply to by हुप्प्या

तस्मात समाजात जगण्याकरता जी नैतिक मूल्ये जपावी लागतात ती धर्मामुळेच मिळतात हे खरे नाही. समाजात जे प्रसिद्ध नास्तिक लोक आहेत त्यापैकी किती लोकांनी बेकायदेशीर धंदे केल्याचे उघडकीस आले आहे? उलट कुठल्यातरी देवाचे, धर्माचे वा बुवाचे परमभक्त हे विविध परीने समाजकंटक असल्याचे आपण बघत नाही काय?
नास्तिकांशी वाद घालण्यापूर्वी सर्व आस्तिकांनी ह्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.

In reply to by मार्मिक गोडसे

याच्याशी सहमत पण बहुसंख्य लोक अशा नैतिक मूल्यांचं पालन त्याच्याशी धार्मिक मुद्दे निगडित असले तरच करतील हेही खरं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

@काळा पहाद, बोका-ए-आझम,प्रसाद१९७१ ... " देवा-धर्मामुळे अनैतिकता वाढण्यास मदत होते. प्रत्येक माणसाला सदसद्विवेकबुद्धी असते. चांगले काय वाईट काय, नैतिक काय अनैतिक काय,पाप कोणते पुण्य कोणते हे समजते. वाईट गोष्ट करू नये असेच त्याला त्याची बुद्धी सांगते. पण काम,क्रोध,मद,मत्सर इ.मनोविकार असतात. त्यातील एखाद्याला बळी पडून माणूस दुष्कृत्य करतो. पण त्याची त्याला टोचणी लागते. ती सतत लागून राहिली असती तर त्याने पुन्हा दुष्कृत्य केले नसते. तो पापापासून दूर राहिला असता.पण सदसद्विवेक बुद्धीची ही टोचणी घालवण्याचे, पापक्षालनाचे उपाय धर्मग्रंथांत, साधुसंतांच्या अभंगात आस्तिकांसाठी दिले आहेत. ते नास्तिकांच्या उपयोगाचे नाहीत. "हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे। "नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची।" "अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:।" "तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन्मुक्त हेळामात्रे।" अशी आश्वासने ठायी ठायी आढळतात. त्यामुळे सत्यनारायणाची पूजा घातली,साईबाबांना सोन्याचा मुकुट अर्पण केला,तिरुपतीबालाजीच्या हुंडीत दहाहजार रुपये टाकले की पाप संपले. टोचणी बंद.मग पुन्हा फसवायला, लुबाडायला,भ्रष्टाचार करायला मोकळे.

In reply to by मार्मिक गोडसे

जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली ह्या कम्युनिस्टांनी केल्या आहेत, मग तो लेनिन असो, स्टॅलिन असो, माओ असो का चँग असो. पॉल पॉट सुद्धा नास्तिक च होता म्हणे. अगदी भारतातले माओ-वादी घ्या ना. त्यामुळे नास्तिक सज्जन वगैरे असले कन्क्लुजन पटण्यासारखे नाहीच. आणि एकुणात नास्तिकांची कमी असलेली टक्केवारी बघता वर लिहीलेल्या लोकांनी ( कम्युनिस्ट ) केलेली कत्तल आणि छळवणुक ही स्टॅतिस्टिकली नास्तिकां च्या विरुद्धचा विदा देइल. कदाचित विदा असेही दाखवेल की कम्युनिस्ट, माओवाधी ( म्हणजेच नास्तिक ) ह्यांना कुठलीच बाऊंडरी नसते. आस्तिक, नास्तिक आणि सज्जनता ह्याचा काडीचा संबंध नाही. उगाच काहीतरी तर्क्ट लढवू नका.

In reply to by प्रसाद१९७१

जगातली सर्वात मोठ्ठ्या कत्तली ह्या कम्युनिस्टांनी केल्या आहेत,
तुमच्या प्रतिसादवर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाउ द्या.. हा हाहा. मोठे गमतीदार उदाहरण आहे भौ. याचा अर्थ घ्यायचा झाला तर चंगेझ खान , अकबर , औरंगजेब हिटलर हे कट्टर कम्युनिस्ट होते असेच म्हणावे लागेल

In reply to by प्रसाद१९७१

की ते नास्तिक असतात. प्रत्यक्षात त्यांचाही देव असतोच. फक्त त्याला ते मार्क्सवाद, दास कॅपिटल, डायलेक्टिकल मटेरियालिझम वगैरे नावं देतात. विचारसरणीमुळे जगातल्या सर्वात जास्त कत्तली झाल्या आहेत. देव, धर्म, एखादा इझम - या सगळ्या विचारसरणीच आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

विचारसरणीमुळे जगातल्या सर्वात जास्त कत्तली झाल्या आहेत.
नाही हो बोका. कत्तली स्वार्था मुळे झाल्या आहेत, मग त्या जस्टीफाय करायला विचारसरणी वगैरेंची मदत घ्यायची.

In reply to by काळा पहाड

असहमत. बर्‍याच टोळ्या देवाची पूजा केल्याशिवाय याश दरोड्यास निघत नाही. साईबाबांच्या पेटीत काळा पैश्याचा हिस्सा दान केला की आपले पाप धुतले गेले असे मानतात.

छान लेख! काही वर्षांपूर्वी असाच मंदिराचा अनुभव माझ्या नजरेतून लिहिला होता आणि काही मित्रांना वाचायला दिला पण ते थोडेफार दुखावले गेले. अर्थात, मित्र असल्यामुळे आम्ही निवांतपणे चर्चा करू शकलो. पण अनोळखी लोकांपुढे आपले हे विचार मांडणे मी तरी धाडसाचे समजतो आणि तसे केल्याबद्दल तुमचे अभिनंदन!

तुम्हाला देव ही संकल्पनाच मान्य नाही का तुमचा विरोध कर्मकांडाला आहे? प्रसादाची किंमत कशाला ठरवायची? सगळ्यात उत्तम म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि एखाद्या भिकाऱ्याला द्यायचा. पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची. असं म्हणून की या प्रसादाची किंमत मी X रुपये ठरवली आहे आणि तेवढी रक्कम मी या गरजूला देत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का कोणाची देवावर श्रद्धा असेल तर अडचण काय आहे? कर्मकांडाला आणि अंधश्रद्धांना विरोध असणं समजू शकतो आणि माझा पण आहेच. उत्तर द्याल की नाही माहित नाही कारण या आधीच्या धाग्यांवरसुद्धा तुम्ही फक्त तुमच्यासाठी सोयीस्कर प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

प्रसादाची किंमत कशाला ठरवायची? सगळ्यात उत्तम म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि एखाद्या भिकाऱ्याला द्यायचा. पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची. असं म्हणून की या प्रसादाची किंमत मी X रुपये ठरवली आहे आणि तेवढी रक्कम मी या गरजूला देत आहे.
हे लई आवडले.

In reply to by ट्रेड मार्क

प्रसादाची किंमत कशाला ठरवायची? सगळ्यात उत्तम म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि एखाद्या भिकाऱ्याला द्यायचा. पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची.
अशाने भीक मागण्यासारख्या अनिष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना समर्थन मिळेल असं नाही वाटत?
पावती फाडण्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची
ती पावती न फाडतापण करता येतेच की. उलट अनेक देवस्थानं आपण असं करत असल्याचं सांगतात.

प्रबोधनाचे प्रयत्न छान आहेत. दोन कानांच्यामधे असलेला अवयवय, ज्याला मेंदु म्हणतात, त्याचा योग्य वापर माणसाने केला तर जगातल्या बर्‍याच समस्या सुटतील.

मानवी मनाची जडणघडण अशी आहे की जोपर्यंत माणुस आहे तोपर्यंत आस्तिक व नास्तिक दोन्हीही असतील... आणि त्यातले काही आपल्या मतावर ठाम राहतील. जसे आपण इतर बाबतीत म्हणतो तसेच, "दुमत आहे यावर एकमत (अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री)" या तत्वावर एकमत करून, आपली मते निष्कारण दुसर्‍यावर न लादता, दोन्ही गटांचे एकमेकाशी खेळीमेळीचे संबंध असायला हरकत नसावी. कारण, जेव्हा एक गट दुसर्‍यावर आपली मते लादू लागतो तेव्हाच संघर्ष निर्माण होतो. स्वतः बदलण्याची इच्छा असल्याशिवाय / झाल्याशिवाय दुसरा कोणीही मानवी मनात बदल घडवून आणू शकत नाही. विविधता हा जगाचा स्थायीभाव आहे... मग भौतिक असो, अधिभौतिक असो की पार्मार्थिक असो. कुठल्याही संबंधातल्या एकेरी तत्वज्ञानावर आधारीत जग फारच रुक्ष आणि बेचव बनेल, नाही का ?

दोन कानांच्यामधे असलेला अवयवय, ज्याला मेंदु म्हणतात, त्याचा योग्य वापर माणसाने केला तर जगातल्या बर्‍याच समस्या सुटतील.
अगदी बरोबर. नास्तिक त्याचा योग्य वापर करतात. आस्तिक अशा अवयवात गोळ्या झाडतात.

In reply to by मार्मिक गोडसे

नास्तिक त्याचा योग्य वापर करतात. आस्तिक अशा अवयवात गोळ्या झाडतात.
मेंदुचा योग्य वापर आणि आस्तिक/नास्तिक असणं यांचा संबंध काहि कळला नाहि. फार लांब कशाला.. मिपावरच अनेक उदाहरणं मिळतील दोन्हि बाजुने :) अवांतरः मला प्रथमतः आस्तिक/नास्तिक म्हणजे काय हेच कळत नाहि... सिरीयसली.

ज्या रेट ने हल्ली या विषयावर मिपावर चर्चा {?} होते मिपा चे नाव बदलून "आस्तिक-नास्तिकपाव.कॉम" ठेवायची विनंती मी नीलकांत ला करतो

In reply to by बोका-ए-आझम

सश्रद्द लोकांना एका रांगेत(आस्तीक-धर्मवादी-कर्मकांडी-उपासक-मंत्रजागर्वाले-उपासक-नरबळी-जारण मारण ई) उभे करून "झोडपायचा" पदसिद्द अधिकार मिपावर असताना हे तथाकथीत नास्तीक वेगळी साईट काढण्याचा अपशकून करणार नाहीत. बाकी लोक संपादक पदासाठी नावे सुचवतात थेट संस्थळासाठीच नावे सुचविणारे स्पांडोबा हे खरे सुधारक !!!!! खाल मुंडी नाखुस

देव मंदिरात असता तर मंदिराबाहेर बसून भीक मागन्याची वेळ कोणावर आली नसती. आणि या खोट्या देवावर विश्वास ठेवून जर मी देवाला पूजत बसलो असतो तर माझ्या समाजाला भीक मागायची वेळ आली आसती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुमचा विश्वास नसेल तर इतरांनी तुम्हाला फैलावर घेण्याचे काही कारण नाही. पण जेव्हा तुम्ही आस्तिक लोकांच्या मनातील देवाच्या भितीवर घाला घालायला सुरू करता तेव्हा ते सैरभैर होतात आणि काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत राहत नाहीत. त्यांना तुम्ही त्यांच्या माता-पित्यावर गंभीर आरोप केल्यासारखे वाटू लागते. जे समजा खरेही असेल तरी पटकन मान्य होत नाही. 'देव मानत नाही मग देवाचा लाडू कसा प्रसाद म्हणून घेता' असे ऐकावे लागू नये म्हणून कदाचित तुम्ही तो प्रसाद नाकारला असे वाटत आहे. देवाची भिती हा भयंकर प्रकार आहे. आपल्याकडे मनाच्या शांती साठी किती जण आराधना करतात आणि किती जण भितीपोटी करतात हे पाहणे रोचक ठरेल. टी.व्ही. पाहत माळ ओढणे, भराभर स्त्रोत्र उरकून घेणे, वाघ मागे लागल्या सारख्या प्रदक्षिणा काढणे, प्रसाद मिळावा म्हणून मारामारी करणे/ भांडणे, रस्त्यावरून जाताना बारकेसे देऊळ दिसले तरी हात जोडत जाणे ही काही उदाहरणे. 'देवबाप्पा शिक्षा देईल' आणी 'बुवा आहे तिकडं' इथूनच हे सगळे सुरू होते त्याला कोण काय करणार. आणखी एक गोष्ट, काही स्वतःला नास्तिक म्हणवतात पण देवापुरतेच. ज्याप्रमाणे उत्तर ध्रुव असेल तर दक्षिण असलाच पाहिजे तसेच नसले तर नसलाही पाहिजे. त्याचप्रमाणे जर देव नसेल तर इतर अमानवीय शक्तींचे अस्तित्व पण कायमचे अमान्य करता आले पाहिजे. पण सर्वांनाच हे शक्य होत नाही, गर्भगळीत झाल्यावर देवच आठवतो.

@ यनावाला - तुम्ही जर स्वताचे निरीक्षण केलेत तर तुमच्यात आणि तो जो सर्वात पहील्यांदी तुम्हाला हटकणारा प्रवासी होता त्याच्यात थोडातरी फरक आहे असे वाटते का? "आपण बरोबर आणि बाकीचे येडे" हे महतवाचे साम्य दिसले नाही का? प्रसाद न घेणे वगैरे तर फाजिलपणा आहे. तुमच्या सारख्या नास्तिकांमुळे आमच्या सारख्या नास्तिकांना बट्टा लागतोय. . दुसर्‍यांच्या भावना काही कारण नसताना दुखवणे ही सर्वात साधी गोष्ट आहे तीच तुम्हाला समजत नाहीये. मी जिथे जाईन तिथे प्रसाद खातो आणि नमस्कार करतो किंवा करत नाही. ज्यांना मी नास्तिक आहे हे माहीती आहे त्यांच्यासमोर मला नमस्कार करुन दाखवायची गरज वाटत नाही आणि ज्यांना मी नास्तिक आहे हे माहीती नाही त्यांच्या भावना मी उगाचच दुखवत नाही. गणपतीत आरत्या वगैरे मस्त पैकी म्हणतो ( जर मी तिथे असलो तर, मुद्दामहुन आरतीला जात नाही ). वाचन चांगले असल्याने लोकांना देवादिकांचे दाखले वगैरे देतो, गोष्टी सांगतो. आपण चारलोकात असु तर त्या चार लोकांप्रमाणे वागावे हेच तुम्हाला कळत नाहीये. बिचारे आस्तिक ( हिंदु ) मी नास्तिक आहे माहीती असुन माझ्या बाबत अजिबात दुजाभाव करत नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

यनावाला काही तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणार नाहीत ते मोजक्या लोकांनाच उत्तर देत आहेत :)

यनावाला, मला पटला तुमचा लेख. इथे अनेकांनी मुद्दा मांडला आहे की प्रसाद म्हणुन कशाला, लाडु म्हणुन खा. दुसर्‍यांच्या भावना का दुखवायच्या... वगैरे वगैरे. वरकरणी हे मुद्दे योग्य वाटतातही.. मी स्वतः सुद्धा अशीच वागते. माझा देव आणि कर्मकांड ह्यावर अजिबात विश्वास नसताना सुद्धा मी उगाच चर्चा आणि वाद नकोत म्हणुन पटकन पाया पडते.. प्रसाद खाऊन टाकते. पण ते तिथेच संपतं का? तर नाही... वाद नकोत म्हणुन मी घरात गणपती.. महालक्ष्म्या.. नवरात्र करते. मी भले पायाही पडत नाही. पण वाद नकोत म्हणुन सवाष्ण ब्राह्मण बोलावते. मग उगाच कुणाला कशाला दुखवायचं म्हणुन १६ भाज्या, ७ कोशिंबिरीचा नैवेद्य, आरत्या, वस्त्रमाळा-आरास जे जे म्हणुन असेल ते सगळंच करते. आता ह्यात काय कुणाचं वाईट होतंय का? तर छे.. अजिबात नाही.. म्हणुन मी वर्षानुवर्ष ते करतेच आहे. सवाष्ण म्हणुन खात्यापित्या घरातली बाई येते.. तिला मी गरज नसताना ओटी भरुन, कुंकु लावुन्च पाठवते. उगाच कुणाला कशाला दुखवायचं? मग आता इतकं करतेच आहे तर हळदी कुंकु करण्यात काय प्रॉब्लेम आहे? झालंच तर वाण लुटणे इ होऊ देत की. उगाच वाद नकोत.. आणि इतकं सगळं करुन वर्षातुन एकदा तुळजापुरला जायला आणि पावती फाडायला काय हरकत? गेलोच आहोत म्हणजे दही+केळं वगैरे कुस्करुन जो अभिषेक करतात तो ही करुन टाकु.. आता मला नाही पटत इतक्या सुंदर मुर्तीवर असा अभिषेक करुन तिचे नुकसान करणे. पण बाकीच्यांना पटतं. त्यांच्या श्रद्धेचा मान राखायला हवा, उगाच दुसर्‍याला का दुखवायंच? म्हणुन मी केवळ वाद टाळायला साडी नेसुन तिथे जाउन उभी रहाते. हे असंच चालुच रहातं... ह्या सगळ्यात मी एकदाही देवाच्या पाया पडत नाही.. पडलेच तर माझ्या मनात अगदी काही म्हणजे काहीच भाव नसतात. उगाच आपलं हात जोडायचे. आणि हे सगळं होऊनही मी म्हणे नास्तिक आहे.. आस्तिकांच्या भावनांचा विचार कर करुन आज माझ्या सारख्या नास्तिक व्यक्तिची ही अवस्था आहे.. म्हणुन मला खुप आवडतं जेव्हा कुणी ठामपणे "करणार नाही" म्हणुन उभं रहातं. विचार चुक की बरोबर.. तार्किकदॄष्ट्या योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे.. पण ह्या न त्या कारणाने आपल्या मताप्रमाणे वागायला न मिळणे हा एक मोठाच त्रास असतो. मला वाटतं नास्तिकांनी जे करायचं ते करावं.. आणि आस्तिकांनी स्वतःच्या आणि नास्तिकांच्या.. कुणाच्याच भावना दुखवु नयेत... ज्याला जे वाटतं तो ते करण्यास मोकळा पाहिजे..

In reply to by पिलीयन रायडर

स्वतःच्या तत्त्वांविरुद्ध, केवळ दुसर्‍याच्या भावना जपणे यासाठी किंवा भिडेपायी काही करावे लागणे यासारखी दुसरी कुचंबणा नाही. स्पष्ट आणि ठाम प्रतिसाद खूप आवडला.

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद म्हणुन कशाला, लाडु म्हणुन खा. दुसर्‍यांच्या भावना का दुखवायच्या... वगैरे वगैरे.
अगदी योग्य बोललात पिरा. तो प्रसाद जर मांसाहारी असेल आणि एखाद्या कट्टर शाकाहारी आस्तिकाने तो नाकारला तर ? त्यावेळे " माम्साहार म्हणून कशाला, प्रसाद म्हणून खा. दुसर्‍यांच्या भावना का दुखवायच्या...." हा युक्तीवाद लागू केला तर चालेल का?

In reply to by विजुभाऊ

अहो हे यनावाला स्वता चालत देवळात गेले आणि मग लाडु नको म्हणाले. आधी मुद्दाम जायचे आणि मग लोकांना त्रास द्यायचा, ही कुठली रीत? वेगळी नास्तिकांची टुर करुन जायचे ना.

In reply to by प्रसाद१९७१

लोकांना त्रास दिला की लोकांनी तो करुन घेतला? लोकांना उपद्रव होईल असं वागणं तर नव्हतंच त्यांचं. ह्यात आस्तिक लोकच कंपु करुन नास्तिकाला त्रास देत आहेत. तुम्हाला खायचा तर खा ना, प्रसादच काय, अमृत समजुन खा. ज्याला नाही खायचा त्याला तो काहितरी समजुन का होईना खा.. असा आग्रह कशाला? नास्तिकांची टुर कशी असते बुवा..? तसं डिक्लेअर केलं असतं की नास्तिक लोक क्षमस्व तर नसतेच गेले ना यनावाला. हा प्रतिसाद उपरोधाने लिहीलेला असावा अशी फार इच्छा आहे.. अन्यथा फारच मजेशीर प्रतिसाद आहे तुमचा...

In reply to by पिलीयन रायडर

ह्यात आस्तिक लोकच कंपु करुन नास्तिकाला त्रास देत आहेत.
हा लेख च लिहीला नसता तर कोण कशाला बोलायला आले असते?
नास्तिकांची टुर कशी असते बुवा..?
आता नसते तर मी काय करणार? यनावालांनी पुढाकार घेउन काढावी टुर.

In reply to by प्रसाद१९७१

अहो लेखाबद्दल नाही बोलत आहे हो मी. टुर बद्दल बोलतेय. तिथे अस्तिक लोकांनी मिळुन यनावालांना लाडु का नाही खाल्ला? नमस्कार का नाही केला? अशा विचारणा केल्या. शिवाय "ह्यांना घ्यायलाच नको होतं" इथं पर्यंत बोलले. अणि कुठलीही टुर अस्तिक नास्तिक निष्कर्षावर कशामुळे असावी बरं? यनावालांनी कुठे तक्रार केली आहे की देवळात का नेली म्हणुन टुर? लोकांना प्रॉब्लेम आहे ना इथे त्यांच्या नास्तिकतेशी.. मग त्यांनी काढावी ओन्ली आस्तिक टुर.. हा काय मुद्दाय का? नास्तिकांची टुर... =))

In reply to by प्रसाद१९७१

जर हा प्रतिसाद गांभिर्याने दिला असेल तर या धाग्यावरील सर्वात विनोदी प्रतिसाद ठरावा. आपण कसे "वेगळे नास्तिक" आहोत हे दाखवण्याच्या नादात खुपच भरकटला आहात तुम्ही असे दिसते. :)

In reply to by पिलीयन रायडर

पिरा - तुम्ही जी वर उदाहरणे दिली आहेत ती -आस्तिक नास्तिक वादातुन आली नसुन. टीपीकल भारतीय संस्कृती ची उदाहरणे आहेत ज्या स्त्रीयांना मोकळीक द्यायची नाही, सासूचे किंवा घरातल्या मोठ्यांचे ऐकलेच पाहीजे किंवा सासरी आलीय ना मग आमच्या मताप्रमाणे वागायचे असल्या वृत्तीतुन आली आहे. त्याचा संबंध आस्तिक - नास्तिक शी नसावा, कदाचित सासर नास्तिक असेल आणि सुन आस्तिक असेल तर ह्याच्या उलट अनुभव येतील ( आमच्यात नसते सवाष्ण , हळदीकुंकु वगैरे )

In reply to by प्रसाद१९७१

बरोबर आहे. हा ही मुद्दा आहेच. पण मी म्हणतेय तसा कुणाच्या भावना दुखावायला नको म्हणुन नास्तिक लोकांनाही अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. तेव्हा त्याच्यांही भावना दुखावल्या जातात पण त्या धार्मिक भावनां एवढ्या धारदार नसल्याने लक्षात येत नाहीत. ज्याला जे जे योग्य वाटेल ते ते करु द्यावे. जिथे आपणामुळे लोकांना उपद्रव नसेल तिथे इतरांनाही हरकत घेण्याचे काय कारण? असा तो सोप्पा मुद्दा होता.

In reply to by पिलीयन रायडर

पुरुष जर नास्तिक असेल आणि त्यात सुद्धा उच्च विद्याविभुषित, तर त्याला आस्तिक सासराकडुन असा काही उपद्रव होत नाही. अगदी स्वताच्या घरातही काही उपद्रव होत नाही. उलट झालेच तर त्याच्या नास्तिकतेचे कौतुक होते. बाई च्या बाबतीत ह्याच्या बरोबर उलटे होते. त्यामुळे सरसकट नास्तिक लोकांना मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागत नाहीत, पण नास्तिक "बाई" ला कराव्या लागतात असे मला म्हणायचे होते.

In reply to by प्रसाद१९७१

हो.. आणि मला पटलय ते.. खरंच आहे तसं.. पण आता ते मी माझे उदाहरण म्हणुन दिले आहे. तरीही.. नास्तिकांवर अशी वेळ ह्या न त्या कारणाने येतच असते. नास्तिक स्त्री असणे हे थोडं जास्त कठीण आहे भारतीय समाजात.. पण पुरुषांनाही अनेकदा असं बळंबळं नमस्कार कर आणि लाडु खा प्रकार करावे लागत असतीलच ना.

In reply to by पिलीयन रायडर

नमस्कार कर आणि लाडु खा
पिरा - आपल्या कोणाचे मन राखण्यासाठी केला नमस्कार तर काय त्रास होतो हो. इथे ऑफिस मधे कीती मनाविरुद्ध करावे लागते, ते गपगुमान करतोच ना. मधुमेही माणसाला सुद्धा छोटासा बर्फीचा/पेढ्याचा तुकडा घे कधी निमीत्तानी म्हणुन आग्रह करतोच ना. तोही घेतो. त्रास करुन घेण्यापेक्षा आनंदा नी घ्यावे ते आणि सीमारेखा आखावीच, त्या पलीकडे काही करु नये. पण अगदी मने दुखावतील इतकी छोटी सीमारेखा पण नसावी. रसेल चे हे कोट लक्षात ठेवावे. "I would never die for my beliefs because I might be wrong."

In reply to by प्रसाद१९७१

अहो तोच माझा मुद्दा आहे.. नमस्कार कर आणि लाडु खा पर्यंत रहात असतं तर ठिके. ते तसं होत नाही ना पण. सगळ्यात ओढले जातातच शेवटी. शिवाय जसं खाल्ल्याने काही फरक पडत नाही तसा न खाल्ल्यानेही पडत नाहीच ना. एकेकाला वाटतं आपल्या मतांवरच ठाम रहावं म्हणुन. त्यांनी जर कुणाला अपशब्द वापरले नाहीत किंवा लोक लाडु खाताना "किती हा मुर्खपणा" अशी काही भाषणं ठोकली नाहीत. मग कुणाला का इतका फरक पडावा? इन जनरलच, "कुणाचं नुकसान होत नाही ना? मग काय हरकत करायला?" पासुन ते "उगाच कशाला विषाची परीक्षा पहायची? करुन टाकायचं" इथंवर सगळ्या कारणांनी माणुस लहान सहान कर्मकांडाला शरणच जात असतो. मुद्दा हा केवळ एका नमस्कारापुरता नाहीये. मुद्दा एक विचारधारा सार्वजनिकरित्या मांडण्याचा आहे. ह्या लेखाचे शेवटचे वाक्य तेच आहे ना, की कुणी तरी बुद्धिवादाची कास धरेल. केल्याने काय फरक पडतो ह्याच कॅटेगिरीमध्ये मग मी जी वर सगळी उदाहरणे दिली आहेत ती बसतातच. गौरी- गणपती / नवरात्र, केल्याने काय वाईट होतं? तुळजापुरला गेल्याने काय वाईट होतं? काय फरक पडतो? ट्रिप म्हणुन जा की हवंतर.. मुद्दा हा ह्या सगळ्यालाच "नाही" म्हणण्याचा आहे. आणि मुद्दा "नाही" म्हणु देण्याचाही आहे.

In reply to by पिलीयन रायडर

कुणी तरी बुद्धिवादाची कास धरेल
पिरा - इथेच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. सर्व लेख आणि क्षमा करा पण तुमचा पण रोख नास्तिक पणा म्हणजेच बुद्धीवाद असा थेट आहे. ह्याचाच कॉन्व्हर्स आस्तिकता म्हणजे बुद्धी नसणे असा होतो. तुम्ही किंवा मी, आपल्या विचारांनी नास्तिक असु पण म्हणुन आपल्याला कोणाला निर्बुद्ध ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. यनावाला आपल्या लेखातुन सातत्यानी आस्तिक लोकांना निर्बुद्ध ठरवत असतात हे आक्षेपार्ह आहे. ते अगदी थेट निर्बुद्ध म्हणत नाहीत पण असली वाक्य टाकतात.

In reply to by प्रसाद१९७१

बुद्धिवाद म्हणजेच नास्तिक असणं असं आहे का? मग या प्रतिसादाप्रमाणे जगात फक्त ३% लोक बुद्धी असणारे आहेत!!! पिरा - तुम्ही पण देव आणि कर्मकांड यात गल्लत करता आहात. मी देव मानतो पण म्हणून मी चतुर्थीला गणपतीचा देवळात किंवा त्या त्या वाराप्रमाणे त्या देवळात जात नाही. इतकेच कशाला मी अजून एकदाही शिर्डी, तिरुपती ई ई मोठ्या देवस्थानात गेलो नाहीये. मी एखाद्या देवाचा उपास करत नाही. फक्त घरात देव आहेत त्यांच्या समोर हात जोडतो, सर्व अडचणींमधून मार्ग काढायला मदत, मग ती मानसिक असो किंवा एखादा योग्य माणूस भेटणे, अचानक एखाद्या घटनेने सगळं बदलून जाणे असो, केल्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्याकडे सत्यनारायण वगैरे करत नाहीत, गणपती बसवत नाहीत. आम्ही गणपतीच्या दिवसात उगाच बाहेर देखावे बघायला आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत धक्के खायला जात नाही. कुठे थांबायचं हे आपण ठरवू शकतो. उगाच आधीच श्रीमंत असलेल्या देवस्थानांच्या दान पेट्या अजून भरण्यात काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा मी अनाथाश्रमात मदत देतो. एखादा खरंच अडचणीत असेल तर जमेल तेवढी मदत करतो. कोणाचं माझ्याकडून काही वाईट होणार नाही याची काळजी घेतो. उगाच येता जाता कोणाला मूर्ख आणि निर्बुद्ध म्हणत नाही. गरज नाहीये कि तुम्ही कर्मकांड केली पाहिजेत. नशिबानी आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि आपल्या मर्जीप्रमाणे देव मानणे न मानणे, पूजा कर्मकांडे करणे न करणे या वर फार कठोर नियम नाहीयेत आणि शिक्षा पण नाहीये. यनावाला तर या धाग्यात आईच्या संस्कारांवर पण भाष्य करतात. नेहमीच असं दिसतं की नास्तिक लोक स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठे समजतात. मी तर देवाला मानत नाही मग माझ काय कोण वाकडं करणार आहे ही भावना दिसते. जसे तुम्ही नास्तिक किंवा टोकाचे नास्तिक आहात आहात तसे बाकीचे आस्तिक आणि काही टोकाचे आस्तिक असू शकतात हे मान्य करत नाहीत. मग ते समस्त आस्तिक लोकांना मूर्ख आणि बुद्धी नसलेले समजतात आणि तसं उघडपणे सांगतात सुद्धा.

In reply to by ट्रेड मार्क

प्रतिसाद पटला.
देव आहेत त्यांच्या समोर हात जोडतो, सर्व अडचणींमधून मार्ग काढायला मदत, मग ती मानसिक असो किंवा एखादा योग्य माणूस भेटणे, अचानक एखाद्या घटनेने सगळं बदलून जाणे असो, केल्याबद्दल धन्यवाद देतो.
हे करतोच.

In reply to by ट्रेड मार्क

ज्या प्रमाणे अतिनिर्बुद्ध आस्तिक असतात तसेच यनां सारखे अतिनिर्बुद्ध नास्तिक असतातच , त्यामुळेच असली वादावादी होते . पण सुदैवाने माझ्या आसपास फक्त अशा दोन टोकाचीच माणसे नाहीत . देवाला न मानता माणुसकी हा एकच धर्म मानणारे मित्र आहेत तसेच माणुसकी जपत, आपली सर्व कर्तव्य पार पाडत,मनात देवाला जपणारे सुद्धा आहेत,, आम्ही सर्व एकत्र आनंदात असतो, आणि असली वांझोटी चर्चा करण्यात आमचा वेळ वाया घालवत नाही बाकी चालू द्या शुभेच्छा आहेतच

In reply to by स्पा

ज्जे बात!!!! क्लासच!!! आमची आस्तिकता हीच आहे. माणुसकीचे नियम पाळून इतर कुणाला त्रास होऊ न देता मी माझी श्रद्धा पालन करतो. मी स्वतः कधीच देवळात जाऊन नमस्कार करत नाही. पण नामजप कायम करतो. नेमकं हेच यनावालांना समजेना. उगंच तेच तेच बेचव दळण चालू आहे.

In reply to by स्पा

@ज्या प्रमाणे अतिनिर्बुद्ध आस्तिक असतात तसेच यनां सारखे अतिनिर्बुद्ध नास्तिक असतातच :- http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif सात्त्विक संतापाने चिडलेला पांडू× शांत याssना..,वाला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent010.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

पांडूचं जाऊ द्या. तुमचं बोला. एक पुरोहित ह्या नात्याने तुम्ही आस्तिक आहात का एक धर्मसुधारक ह्या नात्याने तुम्ही नास्तिक आहात का ही नुसतीच अगलतगल आहे?

In reply to by प्रचेतस

काय आहेत याचा बहुअंगाने आणि बहुढंगाने शोध चालू आहे (त्यांचा स्वतःचाही) !!!! सध्या स्पां+धन्या धाग्यावर आल्याचा ते आनंद घेत आहेत.तो घेऊ द्या !!! अखिल मिपा भाव विश्व चाहता संघ व या चिमण्यांनो परत फिरा रे (त्यांना आणा रे) मित्र परिवार संघाच्या पत्रकातून साभार

In reply to by प्रचेतस

@पांडूचं जाऊ द्या. :- ते माझं मी बघीन.. :-/ तू त्यात सोंड नको टाकू ... हत्ती! Llllllluuuu @तुमचं बोला :- हे घ्या! ह्या नंतरही तुम्ही स्वमनोरंजकनिरर्थकआत्मकुंथन करणार आहातच..! ;) हे मला आधीच माहीत असल्यामुळे तुमच्या त्या आगामी कुंथनास शुभेच्छा देऊन ..मी थांबतो.

In reply to by प्रसाद१९७१

पिरा - आपल्या कोणाचे मन राखण्यासाठी केला नमस्कार तर काय त्रास होतो हो.
कोणाचे मन राखण्यासाठी तुम्ही गोमांसाचा अगदी छोटास्सा तुकडा खाल का?

In reply to by पिलीयन रायडर

पण पुरुषांनाही अनेकदा असं बळंबळं नमस्कार कर आणि लाडु खा प्रकार करावे लागत असतीलच ना.
हेच तत्वनिष्ठ पुरुष, रस्त्यावर कोणी गावगुंडानी ह्यांची गाडी ठोकली तरी त्या गावगुंडाच्याच शिव्या आणि मार खातात. तिथे सर्व तत्व वगैरे गुंडाळुन ठेवतात, पण आपल्या माणसांसमोर मोठा आव येतो तत्व्निष्ठेचा. हलके घ्या, पण खरे आहे ना

In reply to by प्रसाद१९७१

एकूण काय प्रसादराव. चिमीत्काराशिवाय नमस्कार नाही. हेच ना? देवाला गरज असेल तर दाखवेल चमत्कार नाहीतर आहेतच फुकट लाडू.

In reply to by प्रसाद१९७१

मुद्दा भरकटतोय किनई...?!! तुमच्यात गावगुंडाना उलट परत शिव्या घालण्याचा किंवा बदडण्याचा दम नाही म्हणुन तुम्ही तुमची सगळीच तत्व गुंडाळुन लोकांची मन राखत फिरा.. असं काहीसं वाटतय का ते!!! असोच.. :)

In reply to by पिलीयन रायडर

तुमच्यात गावगुंडाना उलट परत शिव्या घालण्याचा किंवा बदडण्याचा दम नाही म्हणुन तुम्ही तुमची सगळीच तत्व गुंडाळुन लोकांची मन राखत फिरा.. असं काहीसं वाटतय का ते!!!
असली कसली हो तत्वनिष्ठा :-) जिथे मऊ लागेल तिथे खणायचे असे च झाले ना हे. ऑफिसात बॉस धु म्हणला की धुतिल पण घरी बायको म्हणली देवाला नमस्कार कर तर लगेच तत्वनिष्ठ होतील.

In reply to by प्रसाद१९७१

परत तेच.. जौ द्या. हा मुद्दाच मला मान्य नाही तर काय चर्चा कारायची ह्यावर.. तुम्ही नास्तिक असुन हाण्ताय ना लाडु.. हाणा मग!!

In reply to by पिलीयन रायडर

पिरा, तुझा हा प्रतिसाद खूप आवडला. अगदी शब्दन् शब्द माझ्या मनातला लिहिला आहेस. मला वाटतं या 'भावना जपणार्‍या' नास्तिकांत स्त्रियांचं प्रमाण जास्त असावं. कारणाचा उल्लेख करत बसले तर आस्तिक-नास्तिक वादाला स्त्री-पुरुष वादाचा फाटा फुटेल.

....@ जातवेद श्री.जातवेद म्हणतात,"
'देव मानत नाही मग देवाचा लाडू कसा प्रसाद म्हणून घेता' असे ऐकावे लागू नये म्हणून कदाचित तुम्ही तो प्रसाद नाकारला असे वाटत आहे."
...या प्रसादाच्या लाडवाविषयी अनेक वाचकांचा चुकीचा समज झाला आहे असे दिसते. दर्शनाला आलेल्या प्रत्येकासाठी हा प्रसाद नव्हता. देवस्थानाला देणगी देणार्‍यांसाठी होता. (देणगीची किमान रक्कम मला ठाऊक नाही.) मी देणगी दिली नव्हती तरी माझ्यासाठी लाडू आणला होता. यावरू हेतू समजतो.

In reply to by यनावाला

अहो कदाचित, खाऊदे फुकटचा लाडू. प्रसाद खाल्यावर काहीतरी फरक पडेल बुद्धीत म्हणूनही दिला असेल लाडू पाठवून पैसे न देताही.

यनावालांच्या मतांबद्दल मी काही बोलू इच्छीत नाही, पण त्यांच्या आधीच्या काही लेखांच्या तुलनेत या धाग्यावर मात्र अत्यंत संयत आणि कित्येक तर पाठिंबा दर्शवणार्‍या प्रतिक्रिया आल्या आहेत, हे अत्यंत स्वागतार्ह आहे. धागा उघडताना, मला तर काय रणधुमाळी वाचायला मिळेल अशीच भीती वाटत होती. ती फोल ठरली. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मलाही अगदी अस्सेच वाटले. पिरांच्या उपप्रतिसादात तर 'साय्लेंट मेजॉरिटी का काय ती जागी झालेली दिसतेय' असे वाक्य घातलेही होते. नंतर खोडून टाकले.

नास्तीक आपली नास्तीकता दुसर्‍यांवर लादत नाहीत. मात्र आस्तिक त्यांची आस्तिकता नेहमीच सर्वांवर लादायचा आग्रह धरतात. यनावालांने बस मधील कोणालाही तुम्ही देवदर्शन करू नका हा आग्रह धरला नव्हता. मात्र बसमधील आस्तिकानी यनावालानी प्रसाद घ्यावा असा असा आग्रह धरला/ सुचवले/ भय घातले ज्यावेळेस आस्तिक हा आग्रह सोडतील त्यावेळेस त्यांची आस्तिकतही सम्पलेली असेल.

In reply to by विजुभाऊ

नास्तीक आपली नास्तीकता दुसर्‍यांवर लादत नाहीत. मात्र आस्तिक त्यांची आस्तिकता नेहमीच सर्वांवर लादायचा आग्रह धरतात.
ह्याच्या बरोबर उलटा अनुभव आहे. मिपावरच बघा. यनावाला आस्तिकता म्हणजे कसे बुद्धी नसल्याचे लक्षण आहे हे सारखे सांगत असतात. यनावालांसारखे कुठेही गेले तरी आपले वेगळे पण दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात. मिपावर कधी कोणी आस्तिकाने नास्तिकांच्या मूर्खपणा बद्दल लेख लिहीलेला दाखवुन द्या. एकीकडे धर्म ही वैयक्तीक बाब आहे असे म्हणायचे, हे जर खरे असेल तर नि-धर्म ही सुद्धा वैयक्तीक बाब आहे. ती घरातच ठेऊन यावी.

In reply to by प्रसाद१९७१

यनावाला बाकीच्या लेखांमध्ये काय म्हणतात ते ठाऊक नाही, मी वाचलेले नाहीत त्यांचे लेख. पण मुळात
यनावालांसारखे कुठेही गेले तरी आपले वेगळे पण दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतात.
ह्या वाक्यातुन जनरली लोक नास्तिकाकडे कसे पहात असतील हे समजते. एखाद्या गोष्टीला विरोध करणे म्हणजे वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणे कसे काय होते? म्हणजे एकाअर्थी नास्तिक लोक केवळ गर्दीमध्ये उठुन दिसण्यासाठीच (पब्लिसिटी स्टंट?) हा विरोध करण्याचा प्रकार करतात असे आपल्याला म्हणायचे आहे का? कारण मग तुम्ही चक्क तुमच्या विरोधातल्या विचाराला मान्यच करायला नकार देत आहात. आणि त्या विरोधाला एक वैचारिक अधिष्ठानही असु शकते हे विसरत आहात. नास्तिक लोकांवर आस्तिक लोक लेख लिहीत नाहीत त्याला आम्ही काय करणार? लिहावेत लेख.. अजुन काय बोलणार. निधर्म (?) घरीच ठेवलेला असतो. इथे यनावला लोकांना देवाच्या पाय पडु नकात म्हणुन आग्रह करत नाही आहेत.. लोक त्यांना स्वतःच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणुन अमुक समजुन तमुक करा असला आग्रह करत आहेत. इथे नक्की कोण कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळा ढवळ करत आहे सांगा बरे..

In reply to by पिलीयन रायडर

@
निधर्म (?) घरीच ठेवलेला असतो. इथे यनावला लोकांना देवाच्या पाय पडु नकात म्हणुन आग्रह करत नाही आहेत.. लोक त्यांना स्वतःच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणुन अमुक समजुन तमुक करा असला आग्रह करत आहेत. इथे नक्की कोण कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळा ढवळ करत आहे सांगा बरे..
:--- +++१११ ज्जे ब्बात!

In reply to by पिलीयन रायडर

पिराताई - मी नास्तिक च आहे. पण मला कोणाच्याच धार्मिकते बद्दल काही कॉमेंट कराविशी वाटत नाही. मला मी जास्त अक्कल असलेला वाटत नाही. त्यामुळे मला कोणी मुढतेच्या अंधारात आडकले आहे असे पण वाटत नाही. मला जॅझ, रॉक वगैरे संगीत कळत नाही त्यामुळे आवडत नाही, पण आपली सिनेमातली गाणी , शास्त्रीय संगीत आवडते. कोणाला ह्याच्या बरोबर उलटे वाटत असेल. पण मी रॉक च्या मैफिलीत जाऊन चेहरा वेडावाकडा करणार नाही आणि आमचे शास्त्रीयसंगीत कसे तुमच्या रॉक पेक्षा भारी आहे असले तत्वज्ञान पण तिथल्या रॉक च्या चाहत्यांना ऐकवणार नाही.

In reply to by प्रसाद१९७१

मला नाही कुठे कुणी धार्मिक कमेंट केलेली दिसली हो.. मी परत वाचला लेख तेवढ्या करता.. कुणाची अक्कल काढली आहे असेही वाटले नाही. तुमचे यनावालांशी काही आधीचे देणे घेणे असेल तर मला माहित नाही. पण हा पहिलाच लेख वाचला असल्याने माझ्या मनात तरी काही पुर्वग्रह नाहीत. तेव्हा तुम्ही फक्त ह्या लेखापुरते बोलाल का? ते तेवढं नास्तिक लोक वेगळेपणा दाखवयचा प्रयत्न करत असतात आणि ते धर्म-निधर्म ही वैयक्तिक बाब आहे वरती जे मी लिहीलय.. त्यावरही बोलाल का?