Skip to main content

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

लेखक यनावाला यांनी शनिवार, 12/12/2015 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता. प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले, " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" " मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. " "कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?" " हो. कुठल्याच देवाला नाही." थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला. " मग मंदिरात कसे आला ?" " तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो." " तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?" "नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो. "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे. "नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो." " देवाला नाही आणि माणसांना का बरे?" "कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." "तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला. "जशी तुमची इच्छा" मी म्हणालो. थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच. तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती. "आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला. बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या, "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल." " आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला. "ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. " "आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले. "खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते." " ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला. " त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?" " सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. " " ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?" " अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या. " चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो. " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या. " आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे. "तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही." " पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला. " ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. " "गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले. " ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा." गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे. .................................................................................

वाचने 108329
प्रतिक्रिया 421

प्रतिक्रिया

In reply to by पिलीयन रायडर

नाय नाय अस्सा नाय करायचं. नास्तिकाला फुकट देताना पावतीबुक घेवुन आला तर कृपया प्रतिसाद पहिल्यापासुन परत सुरु करायचे . ;)

ज्या तेरा लोकांनी देणगीच्या पावत्या फाडल्या त्यापैकी एकालाही आपल्याकडील लाडूचा थोडा तुकडा लेखकास देण्याचे सुचले नाही का?

"एक लाडू की आत्मकथा" लिवा कुन्तरी.. दमामिस्नी बोलावणं धाडा नायतर आत्मुबुवांस्नी मनधरणी करा...

यनावाला सर तुम्हाला ईश्वर ही कन्सेप्टच मुळी कळलेली नाही. तो कशात आहे? तुमच्यात आहे माझ्यात आहे. निष्पाप बालकात आहे पापी माणसात आहे. पतिव्रतेत आहे तर रस्त्यावर उभे राहून गिर्हाईक शोधणार्या वारांगनेत आहे. रस्त्यावर तडफडणार्या रोग्यात आहे तर गाद्यागिरद्यांवर लोळणारा माणसात आहे. बेफिक्र गर्दुल्ल्यात आहे तर संशयी काटेकोर माणसातही आहे. सरळमार्गी मास्तरात आहे तर कुमार्गी चोरट्यातही आहे. भोळसट माणसात आहे तर लबाड कपटी ठकातही आहे. हे सर्व विवेकानंद ग्रंथावलीत लिहिलेलं आहे. वाचा पाहीजे तर एक ते दहा खंड. अजून खूप बोलायचंय पण ते तुम्ही समजू शकत नाही... दुःख त्याचंच आहे.

In reply to by मांत्रिक

जे ज्ञानोबा तुकोबा, नामदास, संत कबीर, संत रोहीदास यांनी अनुभवलं, समजून घेतलं तेच मी मांडतोय. प्रभु येशूनंही तेच सांगितलं. भगवान गौतम बुद्धानं, महावीर जैनानंही तेच सांगितलं. त्याच विभूतींची आण घेऊन सांगतो, हेच सत्य आहे. किती किती प्रेमळ होते हे लोक! जरा वाचा! कुठेही तुमच्यासारखी निगेटीव्हिटी, कटुता, नैराश्य दिसणार नाही. अगदी क्षुद्रातील क्षुद्र व्यक्तीसाठी पण हे महात्मे जीव देऊ शकत होते. तुमच्यासारखे निगेटीव्हिटीने भरलेले नव्हते. तुम्ही पण ते अनुभव करा. किमान प्रभू येशूची ४ गाॅस्पेल तरी वाचा. मग कळेल की खरे आस्तिक कसे असतात. बंद करा आता ही निरर्थक चिखलफेक. तुम्ही उद्याच्या उद्या जरी मृत्यू पावलात(देव करो असे न होवो) तरी लोक तुमचे मुळीच स्मरण करणार नाहीत. ते या महान विभूतींनाच आठवणार. कारण जे बीज त्यांनी पेरलंय ते ईतकं मजबूत सशक्त पेरलंय की कोटी कोटी यनावाला आले तरी ते बीज मरणार नाही तर फुलणारच!!!!!

In reply to by मांत्रिक

बंद करा हे सर्व. लोकांच्या दुःखात तुमचे विचार कुचकामी निरर्थकच आहेत. ते त्यांना काहीही मदत करु शकत नाहीत. विज्ञानाच्या विरोधात इथे कुणीच नाहीये. विज्ञान हा तर प्रत्येकाचा पहिला आश्रय आहे. पण जिथे विज्ञान काहीच करु शकत नाही तिथे दमल्या भागल्या जीवाला ईश्वर हाच आधार आहे. तो आधार तुमच्या भ्रमित विचारांनी दूर केलात तर शिल्लक काहीच नाही राहणार. उरेल ती फक्त निष्फळ वांझोटी हताशा, जी तुमच्या स्वभावात डोकावते.

In reply to by मांत्रिक

प्रभू येशू: अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण मजकडे या. मी तुम्हाला विसावा देईन. द्वारकाधीश कृष्ण: अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् भगवान बुद्ध: अरे देव आहे की नाही याच्याशी तुला काय करायचंय? तू माणसाशी माणसासारखं वागतोस की नाही हे महत्वाचं! बोला यनावाला सर! यातलं काय आश्वासन तुम्ही देता? कोण तुम्हाला जवळ करेल? जेव्हा काळाची निर्मम हाक ऐकू येईल, जेव्हा परिस्थितीचा निर्मम घाला पडेल तेव्हा लोक तुम्हाला नाही तर या महात्म्यांनाच आठवणार आहेत. फुकाचा भ्रम आणि चारदोन दीडशहाण्यांच्या टाळ्या सोडून द्या. कुणीच तुमची आठवण नाहीये ठेवणार.

In reply to by मांत्रिक

खेदाने लिहावं लागतंय की हे आपले काही प्रतिसाद वाचून क्लेश होताहेत. 'बंद करा हे लिहिणं' असं आपण कसं काय लिहू शकता? एक तर हे संस्थळ खासगी मालकीचं आहे. आणि संयत भाषेत, व्यक्तिगत न होता इथे व्यक्त होण्याची मुभा सर्वांना आहे. 'मृत्यूनंतर तुमचे नावही लक्षात राहाणार नाही, तुमची कुणी आठवणही काढणार नाही' ही शापवाणी अत्यंत अनुचित आहे. ह्याला तळतळाट म्हणतात. (यामुळे काही होणार आहे असे अजिबात नाही) आणि आस्तिकांच्या साध्या सोप्या भाषेत, तो स्वतःवरच उलटतो. शिवाय अशी आठवण तर कधीच कुणाची राहात नसते. आस्तिक काय किंवा नास्तिक, सगळे मातीतच जाणार असतात. 'चारदोन दीडशहाणे' अशी बोळवण तुम्ही कशाच्या आधारावर करू शकता? मलाही लेख आवडलेला आहे. आम्ही सर्व 'टाळ्या देणारे' तुमच्या भाषेत दीडशहाणे ठरतो काय? दीडशहाणेपणाचे तुमचे मोजमाप काय आहे? आणि यनावालासाहेब अतिशय संयमी शब्दांत आपला आशय मांडत असताना त्यावर अशा आक्रमक तळतळाटी प्रतिक्रिया याव्यात म्हणजे विरोधकांकडे शांतपणे प्रतिवाद करण्याचे सौजन्य नाही असे म्हणावे का? आणि, जे लोक स्वच्छ, निरलस, निरपेक्ष वृत्तीने समाजात, कुटुंबात वावरत असतात, त्यांच्या बुद्धीला एक वेगळे परिमाण, एक वेगळी मिती(डाय्मेन्शन) लाभत असते. बुद्धीचा वापर समतोलपणाने केल्यामुळे एक वेगळी क्षमता अंगी येते. धोका किंवा संकटे आधीच कळतात, मनुष्यव्यवहार कळतो. हे सगळे 'दैवी' नसते. आणि शेवटी, वैयक्तिक पातळीवर उतरायचे तर यनावालासाहेबांचे सामाजिक वर्तुळ मोठे आहे, त्यांचे अनेक हितचिंतक आहेत. ते आणि त्यांच्यासारखे अनेक आज जे काही करताहेत ते समाजाच्या भल्यासाठी आहे अशी हजारोंची धारणा आहे, आणि त्यांना मूक पाठिंबाही आहे. तुम्ही या सर्वांना दीडशहाणे म्हणून झटकून टाकू शकत नाही, सिम्प्ली बिकॉज़, ते तुमच्या ज्यूरिस्डिक्शनमध्ये नाही. आणि मृत्यूनंतर कुणाचा न्यायनिवाडा करणे तर मुळीच नाही.

In reply to by राही

राहीच्या प्रतिसादाशी सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी ही.

In reply to by राही

@ राहीजिः मला तो अर्थ नक्कीच अपेक्षित नव्हता किंवा मी कुणाला शापवाणी पण देत नाहीये. बोलण्याच्या भरात काही चुकीचा अर्थ निघणारे बोलून गेलो असेन तर त्याबद्दल यनावालांना क्षमस्व. बाकी मी कुठेही त्यांना अरेतुरे केलेलं नाहीये. फक्त बोलण्याच्या भरात असं एखादं चुकीचं वाक्य जाऊ शकतं. मीच नव्हे कुणाकडूनही असं होऊ शकतं. असो, दिलगिरी व्यक्त करून संपादक मंडळास विनंती की खालील प्रतिसाद डिलीट करावाः http://www.misalpav.com/comment/784436#comment-784436

In reply to by राही

@ राहीजिः मला तो अर्थ नक्कीच अपेक्षित नव्हता किंवा मी कुणाला शापवाणी पण देत नाहीये. बोलण्याच्या भरात काही चुकीचा अर्थ निघणारे बोलून गेलो असेन तर त्याबद्दल यनावालांना क्षमस्व. बाकी मी कुठेही त्यांना अरेतुरे केलेलं नाहीये. फक्त बोलण्याच्या भरात असं एखादं चुकीचं वाक्य जाऊ शकतं. मीच नव्हे कुणाकडूनही असं होऊ शकतं. असो, दिलगिरी व्यक्त करून संपादक मंडळास विनंती की खालील प्रतिसाद डिलीट करावाः http://www.misalpav.com/comment/784436#comment-784436

In reply to by मांत्रिक

आणि हो माझ्या सर्व प्रतिसादांचा टोन नक्कीच यनावालांना अपमानित करणारा नाही. पुन्हा एकदा वाचा सर्व नीट. कदाचित एखादा नको असलेला अर्थ डोकावत असेल तर संपादक मंडळास परत विनंती की तो उडवून टाकावा. माझे काही ऑब्जेक्शन नसेल.

In reply to by मांत्रिक

श्री.मांत्रिक यांच्या प्रतिसादांविषयी माझी कोणतीही तक्रार नाही. कोणाविरुद्ध, कोणत्याही कारणासाठी मी कोणाहीकडे कोणतीही तक्रार कधीही केलेली नाही. तेव्हा श्री. मांत्रिक यांनी मला "क्षमस्व" म्हणण्याचे कांहीच कारण नाही.[अवांतर;-- "क्षमस्व" हे क्रियापदरूप आज्ञार्थ द्वि.पु.ए.व. आहे. त्याचा अर्थ "तू (मला) क्षमा कर असा होतो." अनेक व्यक्ती असतील (वाचक,श्रोते इ. ) तर "क्षमध्‍वम्" (आपण सर्वांनी -मला- क्षमा करावी) असे रूप वापरायला हवे. असो. संस्कृत भाषेची आवड म्हणून लिहिले. सर्वठिकाणी "क्षमस्व" असे म्हणण्याची पद्धत आहे. तेव्हा ते ठीकच. शास्त्राद्रूढीर्बलीयसी।] २/ माझ्या मरणाविषयी कोणी काही लिहिले तरी मला त्याचे काहीच वाटत नाही. प्रत्येक सजीवाला मरण अटळ आहे. ती एक नैसर्गिक घटना आहे. मरणाची, मरणासंबंधीच्या शब्दांची( प्रेत, तिरडी, मसण, गोवर्‍या इ.) माणसाला भीती वाटू नये. समाजात अशी भीती रूढ आहे ती अनावश्यक आहे. मला मरणाची यत्किंचितही भीती वाटत नाही. मात्र वेदना, यातना, पराधीनता नको. मरणभयाविषयी एक लेख लिहिला आहे. तो कधीतरी मि.पा.वर टाकीन.

In reply to by यनावाला

धन्यवाद सर... तुम्ही जिंकलात, मी सपशेल हरलो. शांतता आणि स्थिरता हे सद्गुण मी तुमच्यापासून आता शिकण्याचा प्रयत्न करतो. आपले विचार कधीच जुळणार नाहीत. मी एक भाविक आस्तिकच राहणार. कारण माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट काळखंडात या ईश्वरी शक्तीवरील विश्वासानेच, श्रद्धेनेच मला साथ केली. जेव्हां मित्रांनी, नातेवाईकांनी माझी साथ सोडली तेव्हां केवळ जगदंबेच्या विश्वासावरच, श्रद्धेवरच कुणाही माणसाचा आधार नसताना अतिशय मोठी लढाई लढत लढत हळू हळू सर्व त्रासांतून बाहेर आलो. पण असो, एक शांतता व स्थिरता अंगी बाणवलेला मनुष्य म्ह्णून तुमच्याविषयी कायमच आदर राहील. कधीतरी आयुष्यातील काही प्रसंगी मला राग, क्रोध अनावर होईल, तेव्हां तुमचं नाव नक्कीच आठवेल मला. असो सर, आप जियो हजारो साल!!! आपली मैत्री आजपासून! रागाच्या भरात काही बोललो असेन, त्रास दिला असेन तर क्षमा करा. एक खंत नक्कीच व्यक्त करेन, की मी माझी चूक कबूल केली, चुकीचे दिले गेलेले प्रतिसाद डिलीट करण्याची विनंती केली तरी त्याकडे अजिबात लक्ष दिले गेले नाहीये. माझा आयडी बंद करण्याची अनेकवेळा मागणी करुन देखील तेही कॅरी आउट झालेले नाही. या दोन गोष्टींकडे कृपया लक्ष द्यावे ही पुन्हा पुन्हा विनंती.

In reply to by मांत्रिक

प्रभू येशू: अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण मजकडे या. मी तुम्हाला विसावा देईन. द्वारकाधीश कृष्ण: अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् भगवान बुद्ध: अरे देव आहे की नाही याच्याशी तुला काय करायचंय? तू माणसाशी माणसासारखं वागतोस की नाही हे महत्वाचं! बोला यनावाला सर! यातलं काय आश्वासन तुम्ही देता? कोण तुम्हाला जवळ करेल? जेव्हा काळाची निर्मम हाक ऐकू येईल, जेव्हा परिस्थितीचा निर्मम घाला पडेल तेव्हा लोक तुम्हाला नाही तर या महात्म्यांनाच आठवणार आहेत. फुकाचा भ्रम आणि चारदोन दीडशहाण्यांच्या टाळ्या सोडून द्या. कुणीच तुमची आठवण नाहीये ठेवणार.

In reply to by मांत्रिक

प्रभू येशूनं एका वेश्येला दगडमार करणार्या जमावाला रोखलं. भगवान बुद्धाने एका उपाशी वाघाला स्वतःचं मांस खाऊ घातलं. नामया भाकरी चोरुन पळणार्या कुत्र्याला ऊद्देशून म्हणाला "अरे देवा, थोडं तूप पण लाव त्या भाकरीला नाहीतर पोट दुखेल." संत कबीराचा मुलगा गवत कापायला गेला तर गवतावरचे दव पाहून म्हणाला की गवत रडतंय, मी त्याला नाही तोडणार. मला सांगा यनावाला सर! तुमचं विज्ञान हे शिकवेल का? नाही विज्ञान म्हणते मीच सर्वोच्च. मीच दुसर्यावर राज्य करणार. अहो सर, आम्ही विज्ञानाची पण मदत घेतो आणि अध्यात्माची पण. ज्या योगे मानवी जीवन सुखी होईल तो प्रत्येक रस्ता शोधायला हवा हे आम्हाला नक्कीच कळते. पण ते तुम्हाला कळत नाही. कारण तुम्ही तुमचे पर्सनल अजेंडे घेऊन ईश्वरावर थुंकायचा प्रयत्न करताय, की जी थूंक तुमच्याच तोंडावर पडतेय.

In reply to by मांत्रिक

शनी..शनी....विसरलात की हो...!! सगळी पृथ्वीवरचीच उदाहरणं दिलीत ना म्हणून नम्रपणे आठवण करुन द्यायला आले... मी एक अम्बज्ञ...

In reply to by स्वप्नांची राणी

तो तरी काय आहे? ईतरांना छळणार्या व्यक्तींना त्यांच्या खर्या लायकीची जाणीव करुन देणारं ईश्वराचं साधन... असो. बराच राग दिसतोय त्यांच्यावर.. जौ देत. पहिले वरचे प्रश्न वाचा अक्कासाहेब...

In reply to by स्वप्नांची राणी

बाकी स्वराताई. माझे वरचे प्रतिसाद पुन्हा वाचा एकदा. कुठेतरी मानवतेच्या विरोधात लिहिलंय का ते? मग जुनी दुखणी बाहेर काढा!!!

In reply to by स्वप्नांची राणी

ओहो... तर एखादी व्यक्ती अनेक सामान्य जनांच्या भावना दुखावणारे लेखन करते. ते नसते छळवादी...

In reply to by स्वप्नांची राणी

ओहो... तर एखादी व्यक्ती अनेक सामान्य जनांच्या भावना दुखावणारे लेखन करते. ते नसते छळवादी... बाकी वाचणार नाहीच तुम्ही... उत्तरे देणे अवघड तर जाणारेय... चालू द्यात...

मला काही प्रश्न पडले… यनावाला ' आपण बुद्धिवादी विचारांची पेरणी करावी , मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. अश्या वाक्यातुन अहम दाखवत नाहीत का? ते फक्त selected पोस्ट नाच reply का देतात? देवाला नमस्कार करूनही, प्रसाद खाऊनही नास्तिकत्व जपता येत नाही का? मुद्दामहून आपले वेगळेपण दाखवायची गरज असते का, त्यातुन काय साध्य होते ? कधी कधी क्या फ़र्क पडता है अशी भावना ठेवली तर टोकाचा विसंवाद टाळता येतो. त्यासाठी एकमेकांना हवे तेच , आपल्याला अगदीच न पटणारे करायची गरज नसते पण थोडे flexible राहावे. म्हणजे तासनतास मंत्र , पूजा , कर्मकांडे करू नयेत पण २ मिनिटात लावता येणारा दिवा कोणाला तरी बरे वाटावे म्हणून लावावा. सत्य्नारायणाच्या पूजेला गेलोच तर यजमानांना बरे वाटावे म्हणून तीर्थ घ्यावे, नाकारू नये. मंदिरात गेलोच तर दुकानातून मंदिरात सतत गोल गोल फिरणारे फुले , ओटीचे सामान घेण्यापेक्षा अहं न बाळगता एक नमस्कार करावा , देवाला नसेल तर may be निसर्गाला , सृष्टीला . आपण भलेही देव मानत नाही पण या सगळ्याने आपला काहीहि फायदा नुकसान होणार नाहीये. तुमच्या मनात जे आहे ते असतेच ते अश्या वेळेसच मुद्दाम बाहेर येऊ द्यायची काय गरज आहे, त्याने आपण जो देव मानतो त्याच्या भावना दुखावणार ना? मी म्हणते ते अंतिम सत्य असे म्हणल्याने समोरचा काही लगेच मतपरिवर्तन करणार नाही. आणि जरी हे त्याच्यापर्यंत पोहोच्वाय्चेच असेल तरी त्यासाठी मंदिर हि जागा बरोबर नाही जिथे त्याच्या भावना / श्रद्धा गुंतल्या आहेत. नास्तिक असो व आस्तिक तो बदलायचे चान्सेस फार कमी असतात देव / एक शक्ती मानण्यात गैर नाही पण त्याच्या , देव , पुजा ,कर्मकांडे , बुवाबाजी , धर्म या सगळ्यांच्या आहारी जाऊ नये. जे काय असेल ते आपल्या घरात पाळावे, अति तासनतास चालणार्या लोकांना तिष्ठत ठेवणाऱ्या पूजा टाळाव्यात. आपल्या आस्तिक किंवा नास्तिक ते ने लोकांना त्रास होऊ नये. देवापेक्क्षा मला धर्म भयावह वाटतो , देव मनात / घरात ठेवला नाही तर धर्म आपल्याला एकमेकांवर वार करायला रस्त्यावर आणतो हे आपण पाहतो आहेच .

प्रेत यात्रेत (जी शहरांमधून हल्ली दुर्मिळ होत चालली आहे) जो तो ओळखिचा-अनोळखी त्या प्रेताला मनोभावे नमस्कार करताना दिसतो. मला तेही पटत नाही, करावेसे वाटत नाही. पण अशा प्रसंगी कोणाच्या घरी जाण्याची वेळ आली तर, प्रसंग दु:खाचा असतो तिथे वादविवादाचा गदारोळ नको म्हणून, अगदीच नाईलाज झाला तरंच, मी नमस्कार करतो. पण मनाला पटत नाही. श्राद्ध-पक्ष ह्यावरही माझा विश्वास नाही, मी करत नाही. माणूस जिवंत असताना त्याला सर्वतोपरी प्रेम द्यावे, वृद्धांची सेवा करावी, दु:खी करू नये. पण एकदा प्राणज्योत मालवल्यावर ते एक बंद पडलेले मशीन असते त्याची सन्मानाने विल्हेवाट लावावी एव्हढाच विचार असतो. म्हणजे अजिबात भावना नसतात का? तर तसे नाही. भावना जरूर असतात. पण आता तो देवाघरी गेला आहे म्हणून त्याला नमस्कार करावा असे वाटत नाही. मृत्यूपश्चात आत्मा देवाघरी जातो ही संकल्पनाच पटत नाही. आता तर देहदान, अवयवदान असे पुढारलेले विचार समाज मनांत रुजत आहेत. आपल्या देहदानाने डॉक्टरी शिकणार्‍या विद्यार्थ्यांना, एका पूर्ण पोषण झालेल्या, देहातील अवयव अभ्यासता येतात. बेवारस प्रेतांमध्ये, जे सर्वसाधारणपणे फुटपाथ वरील, कुपोषित असे असतात तेथे अवयव बरेचसे बाधित असतात. (असे ऐकले आहे). अवयवदानाने आपल्या मृत्यूपश्चात ७ जणांना आपण 'जीवनदान' देऊ शकतो. आंधळ्यांबद्दल आपण आयुष्यभर सहानुभूती व्यक्त करतो पण त्यांना त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मेल्यावरही, प्रयत्न करीत नाही, नेत्रदान करीत नाही, जे आपल्याला सहज शक्य असते. मेल्यानंतर आपल्या अवयवांचा आपल्याला कांहीच उपयोग नसतो. पण हेच जर अवयवदान केले तर ७ जणांना आपण 'जीवनदान' करीत असतो. विचार करा, ज्याने जन्मभर अंधारच 'पाहिला' आहे त्याला नेत्रदानाने ही सृष्टी, त्याच्या बायका मुलांचे चेहरे, त्याच्या आईवडिलांना पाहता येते. एव्हढी अनमोल संपत्ती आपण आगीत जाळून टाकतो आणि दोन अंधांना, किडणीची गरज असणार्‍यांना, हृदय निकामी होत चाललेल्या रुग्णाला, विविध गरजवंतांना वंचित ठेवतो. काय उपयोग आयुष्यभर देव-देव करण्याचा, लाडू खावा की नाही ह्यावर वाद घालण्याचा. प्रत्येकात इश्वराचा अंश असतो तो ओळखा आणि देवालयाची पायरीही न चढता ईशसेवा करा.

In reply to by प्रभाकर पेठकर

गल्लत होतेय. प्रेताला नमस्कार न करणे आणि देहदान वगैरे या दोन वेगवेगळ्या गोष्टी वाटतात मला. प्रेताला केलेला नमस्कार हा काय फक्त ती व्यक्ती देवाघरी गेली आहे या शब्दश: अर्थातून असतो काय? अंतदर्शन या गोष्टीला काही विशेष अर्थ नसतो का? तो नमस्कार आपल्या त्या माणसाबद्दलच्या आठवणींच्या रूपातील असलेल्या भावना व्यक्त करणारा शेवटचा समोरासमोरील दुवा नसतो का? त्याचा संबंध "तथाकथित निर्बुद्ध आस्तिकांशी" जोडणे योग्य नव्हे. देहदान नेत्रदान वगैरेचा पण आस्तिकतेशि काही संबंध नसावा. या संकल्पनाच (किंवा शोध) मुळी नवीन आहेत आणि त्या रुजायला वेळ लागेल. बाकी देवालयाच्या पायरऱ्या चढूनहि तुम्हाला अभिप्रेत असलेली ईशसेवा करत येतेच की!

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमचे लिखाण संयत वाटले पण सगळेच नाही. माणूस मेल्यानंतर देवाघरी जातो का, नाही. तुम्हीही नास्तिक आहात म्हणजे तुम्ही हे नक्कीच मानत नसालच, मग तरी तेच मनात तेवून प्रेताला नमस्कार करणे का टाळता. (तसेच देवहि मानत नाही मग तो प्रसाद देवाचा नाहीच, मग तो घेणे का टाळता?) ***आपण एखादी गोष्ट मानतच नाही पण मग आपले resoning तेच ( आस्तिकतेला पुरक )कसे राहु शकते ? *** म्हणूच नमस्कार तो देवाघरी गेला म्हणुन नाही करायचा तर आता तो कधीच भेटणार नाही, त्याला shake-hand / आलिंगन देऊ शकणार नाही म्हणुनही करायचा. नसेल करायचा तर नका करू भावना असतीलच त्या त्याच प्रकारे व्यक्त व्हाव्यात असे काही नाही. पण आपण जी कारणे देतो न त्याचा विचार करावा . देहदाना बद्दल चे विचार पेर्फेक्ट्च, आस्तिकता / अती कर्मकांडे करणारे जपणारे कितपत पचवू शकतील माहिती नाही.

वालावरकरसेठ, लेखातील अनुभव आवडला. आपल्यासारखं देव ही संकल्पना नाकारणार्‍याचं धैर्य सर्वांना येवो. बाकी, बिका म्हणाले तसे प्रतिक्रिया संयमित आल्या. धन्स मिपाकर. चर्चा वाद संयमाने चालु राहीला पाहिजे. -दिलीप बिरुटे (यनावालांचा विद्यार्थी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> प्रतिक्रिया संयमित आल्या. कांही अपवाद आहेतच.

खरे तर, हात जोडून केलेला भारतीय नमस्कार = पाश्च्यात्य हस्तांदोलन = कमरेत वाकून केलेल जपानी स्वागत = इत्यादी आहे. या सगळ्या औपचारीक स्वागताच्या / शिष्टाचाराच्या प्रथा आहेत... मनात काहीही भाव असले तरी उपचार म्हणून त्या कराव्या असा संकेत आहे... न केल्यास तो अशिष्टाचार समजला जातो. भारतात नमस्कार करायला शरम / ताठा वाटणारे कित्येक लोक पाश्च्यांत्यांशी हस्तांदोलन करणे किंवा जपानी माणसाबरोबर कमरेत वाकणे याला सुधारीत/सांस्कृतिक व्यवहार (मॉडर्न/सोशल एटिकेट्स) म्हणताना थकत नाहीत हे पाहिले आहे ! :) सद्या टीव्हीवर बर्‍याचदा पाश्च्यात्य देशात भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत नमस्कार करून केले जाते... म्हणजे पाश्च्यात्य लोक नमोंच्या प्रभावाने अविकसित होत आहेत असे म्हणावे काय ? =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हात जोडून केलेला भारतीय नमस्कार आणि वा़कून दुसर्‍याच्या पायांना हाताने स्पर्श करणे यात फरक आहे. हात जोडून केलेला नमस्कारत समानता आहे तर वाकून दुसर्‍याला नमस्कार करणे यार श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद आहे. कारण दोन्हीकडून असा नमस्कार होत नाही एकच जण वाकतो आणि दुसरा आशिर्वाद देतो.

In reply to by मराठी कथालेखक

मला तर वाकुन नमस्कार करायलाही काही प्रॉब्लेम नाही (पायांना हात फक्त आई वडीलांच्याच लावते.. बाकीच्यांना नुसतंच हुतुतु केल्या सारखं करायचं!) आदरणीय व्यक्ति असेल तर अगदी मनापासुन करते मी. काहीवेळा मारुन मुटकुन करावा लागतो.. पण काही लोक आपण एवढे पाया पडतो तर तोंडभरुन आशीर्वाद पण देत नाहीत की साधा हात पण वर करत नाहीत. नुसतंच भलतीकडे पहात बसतात. कशाला अशांच्या पाया पडायचं? शिवाय लोकांना हा इगोच्या प्रश्न वाटतो. एका खोलीत २० जण असतील तर नव्या जोडप्याला कशाला २० वेळा वाकवायचे? पण माणुसकी न दाखवता वाकवलेच जाते. एक सामाईक नमस्कार पद्धत म्हणुन चालुन जायला हवा.

In reply to by मराठी कथालेखक

म्हणूनच मी फक्त "हात जोडून केलेला भारतीय नमस्कार" असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यालाही जुनाट प्रथा म्हणून आक्षेप घेणारे आणि शेकहँड करण्यात काहीतरी मॉडर्न केले असे समजणारे खूप पाहिले आहेत / पाहत आहे. (यात शेकहॅड वाईट आहे असे म्हणणे नाही तर भारतिय नमस्कार जुनाट/अविकसित प्रथा आहे असे समजणे हास्यास्पद आहे हे म्हणणे आहे. गैरसमज नसावा :) )

यनावाला जी आपले तर्कक्रिडा विषयावरचे किमान काही धागे तरी द्यावेत. मजा येइल मिपाकरांना एक नविन मेजवानी मिळेल. धन्यवाद

लोकहो, मला एक प्रश्न पडला आहे. कोणी निराकरण केल्यास बरं पडेल. बशीतल्या काही लोकांनी यनावालांना देवाचा मान राखून प्रसाद घ्यायचा आग्रह केला होता. त्यापैकी काही जणांच्या मनात यनावालांचे भले होवो असा विचार नक्की असणार. हा प्रसाद खाऊन यनावालांच्या मनात निश्चित पालट घडेल अशी आशा त्यांनी बाळगली होती. नेमका असाच आशावाद यनावाला यांनी लेखाच्या समारोपात केला आहे. तर या दोन आशावादांत काही फरक आहे का? हाच तो प्रश्न. जर या दोहोंत फरक नसेल तर यनावालांना देखील आस्तिकच झाले, नाहीका? आ.न., -गा.पै.

देव ही निव्वळ कल्पना आहे तरीही नास्तिक नेहेमी एकटा पडतो. तुमच्या लेखाचं शीर्षकच पाहा : सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक तस्मात, नास्तिकानं इतरांना त्याचे विचार पटवून देण्याचा कधीही प्रयत्न करू नये. त्यातून मनःस्तापाशिवाय काहीही हाती लागत नाही. अर्थात, हा तुमचाही अनुभव असेल. " देव ही कल्पना आहे त्यामुळे तो विषय माझा जीवनातून संपला आहे. तुमच्या देवावरच्या श्रद्धेला माझी हरकत नाही. तद्वत तुम्ही देखिल मला देवाच्या कोणत्याही प्रकरणात ओढू नका" असं अत्यंत हसतमुखानं जाहीर केलं की आपण मोकळे आणि कुणाला कमी लेखण्याचा प्रश्न येत नाही. आयुष्य एकदम सुखाचं होतं.

In reply to by विवेक ठाकूर

विवेक आपली बहुतांशी प्रतिक्रिया पटली. आपण म्हणता तसे ही नास्तिक लोक आहेत.नास्तिकांच्या असंख्य छटा आहेत. कोणत्या परमेश्वराची संकल्पना मी मानत नाही यावर त्या अवलंबून आहे.आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे हे स्वाभाविक उर्मी आहे. पण त्या नादात काही लोक तुम्हाला आमचे विचार पटत नाहीत म्हणजे तुम्ही कसे मूर्ख व अज्ञानी आहात असे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सुचवित असतात. मी http://aisiakshare.com/node/2323#comment-38671 इथे त्याविषयी म्हटले आहेच. मिपावर ही ते वेळे वेळी कॉपी पेस्ट केले आहे. टोकाचे सश्रद्ध व टोकाचे अश्रद्ध असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. जगाकडे फक्त कृष्ण धवल या मिती मधे पहाणारे बहुसंख्य लोक असतात. त्यांना मधला ग्रे एरिया समजत नाही वा मान्य नसतो. खर तर ग्रे सुद्धा नाही तो बहुरंगी छटांचा पट्टा असतो. या पट्टयाला ते 'कुंपणारचे' वा 'कुत्ता ना घर का न घाट का' अशा पद्धतीने हिणवत असतात.हे चालतच रहाणार याला अंत नाही. यातले काही लोक आपल्या प्रतिमामधे इतके अडकत जातात की त्यांचा स्वतःचा जीव देखील तिथे घुसमटायला लागतो.पण त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर प्रतिमाभंजनाची बदनामी वाट्याला येईल या भयाने ग्रासलेले असतात. असो..

In reply to by प्रकाश घाटपांडे

`देव ही मानवी कल्पना आहे' इतकी साधी गोष्ट एकदा पटली की मग कोणत्याही छटेचा प्रश्न उरत नाही. देवच नाही म्हटल्यावर पैसा, वेळ, आणि एनर्जी यांची प्रचंड बचत होते. त्या सर्व गोष्टी मग नवीन काही शिकायला वापरता येतात. आणि वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आपोआप तयार होतो. प्रश्न दुसर्‍याला कमी लेखण्याचा किंवा आपली मतं पटवून देण्याचा नाही कारण ते व्यर्थ आहे आणि त्यातून काही साध्य होत नाही. तुम्हाला लाभलेली मोकळीक आणि तुमचं फुलत जाणारं जीवन पाहून कुणाला पटलं तर ठीक, नाही पटलं तरी फरक पडत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

प्रश्न दुसर्‍याला कमी लेखण्याचा किंवा आपली मतं पटवून देण्याचा नाही कारण ते व्यर्थ आहे आणि त्यातून काही साध्य होत नाही. !!!

In reply to by विवेक ठाकूर

`देव ही मानवी कल्पना आहे' इतकी साधी गोष्ट एकदा पटली की मग कोणत्याही छटेचा प्रश्न उरत नाही.
मला तसे वाटत नाही संदर्भ- http://mr.upakram.org/node/770 असो...
देवच नाही म्हटल्यावर पैसा, वेळ, आणि एनर्जी यांची प्रचंड बचत होते. त्या सर्व गोष्टी मग नवीन काही शिकायला वापरता येतात. आणि वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आपोआप तयार होतो.
इतक सोप नसाव. शतकानु शतके हे गुर्‍हाळ चालू आहे. अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान https://drive.google.com/open?id=0B2X6bSru0D7IelpEbU5RcTRGQTA हे सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात पुस्तकातील प्रकरण वाचनीय आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

बरोबर आहे. पण निदान आपल्यासाठी तरी आपण ते एका क्षणात बंद करू शकतो. आणि खरी सुरूवात तिथून आहे असा माझा तरी अनुभव आहे. बाकी तुमच्या दोन लिंक्सच्या संदर्भात माझे विचार यनावालांना दिलेल्या प्रतिसादात उधृत केलेत.

In reply to by विवेक ठाकूर

@विवेक ठाकुर ......... श्री.विवेक ठाकुर यांनी अगत्यपूर्वक सल्ला दिला आहे. तो तसा योग्य आहे. पण माझी भूमिका वेगळी आहे. मी समाजाशी बांधिलकी मानतो. माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला, थोडी चिकित्सक वृत्ती स्वीकारली तर त्याची अधिक प्रगती होऊ शकते. परिणामी समाज सुधारतो. आज भोळ्या श्रद्धाळूंची आर्थिक लुबाडणूक सर्वत्र चालू आहे. जनसामान्यांना अज्ञानात ठेवले की फसवणे सोपे होते. त्यामुळे प्रसार माध्यमे, धार्मिक उत्सव, प्रकटदिन सोहळे इ. द्वारे सतत अज्ञानाचा उदो-उदो चालू असतो. त्यामुळे जमेल तेवढे जनप्रबोधन करावे असे मला वाटते. काही ना काही सुपरिणाम होतो. विचारांचे बीज कुठेतरी उगवते. असो. अधिक विवरण "माझी भूमिका " या मिपावरील लेखात दिले आहे.)

In reply to by यनावाला

आज भोळ्या श्रद्धाळूंची आर्थिक लुबाडणूक सर्वत्र चालू आहे. जनसामान्यांना अज्ञानात ठेवले की फसवणे सोपे होते. फसवणूकीचं मुख्य कारण फसवलं गेलेल्याचा मोह आहे, मग तो चीटफंड असो की देव. पैसा ही अशी एक गोष्ट आहे की जी लोक जीवापाड जपतात आणि अनिवार्यता किंवा फायदा दिसल्याशिवाय सहजी कुणी सोडत नाही. त्यामुळे `श्रद्धाळूंची आर्थिक लुबाडणूक' त्यांच्या मोहापायी होते. तिरूपतीला या म्हणून बालाजी सांगत नाही, भक्त ठरवतो. मी समाजाशी बांधिलकी मानतो. माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला, थोडी चिकित्सक वृत्ती स्वीकारली तर त्याची अधिक प्रगती होऊ शकते. परिणामी समाज सुधारतो. ....त्यामुळे जमेल तेवढे जनप्रबोधन करावे असे मला वाटते. श्रद्धावानाला श्रद्धेचा फायदा दिसतो त्यामुळेच तर प्रबोधन होत नाही. त्यात प्रबोधन करणार्‍यानं जास्तच लावून धरलं तर श्रद्धावान पिसाळतात आणि असे लोकच नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. तस्मात, आपण एकटे पडतो आणि समाजात `ऑड मॅन' वाटायला लागतो. हा तुमचाही अनुभव असेल. मी समाजाशी बांधिलकी वेगळ्या प्रकारानं मानतो. घरात देव्हारा सुद्धा नसावा असं मला वाटतं कारण एका काल्पनिक गोष्टीपायी बराच उपद्व्याप करावा लागतो. पण मग घरातले इतर एका बाजूला आणि आपण वेगळे पडतो. तस्मात, ते जेंव्हा आरती करतात तेंव्हा मी योगासनं करतो किंवा हेडफोन लावून सिंथ वाजवत बसतो. ज्या वेळी एखाद्याला वाटेल की देवाला हद्दपार करून देखिल हा मजेत आहे आणि देवावर श्रद्धा असून आपल्याला भोग चुकत नाहीत, त्यावेळी कदाचित त्यांना देवाचा फोलपणा कळेल. ते फिटनेससारखं आहे. व्यायाम करावा हे सगळ्यांना माहिती आहे पण फार थोडे लोक तो करतात. कधी तरी एखादा एकदम रसरशीत आणि उत्साही माणूस दिसला की मात्र कुणाच्या मनात फिटनेसची ओढ निर्माण होते आणि तो व्यायामाला लागतो. तद्वत तुम्ही आनंदात राहा आणि जीवन विविध अंगानी फुलवत राहा. एखाद्याला तुमचा वाचलेला वेळ, पैसा आणि उर्जा किती सत्कारणी लागली हे उमजलं तर तो आपसूक तुम्हाला विचारेल, तेंव्हा त्याला सांगा, कारण तिथे प्रबोधनाची शक्यता निर्माण झालेली असेल.

In reply to by विवेक ठाकूर

तद्वत तुम्ही आनंदात राहा आणि जीवन विविध अंगानी फुलवत राहा. एखाद्याला तुमचा वाचलेला वेळ, पैसा आणि उर्जा किती सत्कारणी लागली हे उमजलं तर तो आपसूक तुम्हाला विचारेल, तेंव्हा त्याला सांगा, कारण तिथे प्रबोधनाची शक्यता निर्माण झालेली असेल. हे शंभर टक्के खरं आणि व्यक्तिगत पातळीवर आनंद, समाधान देणारं असलं तरी एक अहंकारी किडा असतो, खुमखुमी असते. नास्तिक म्हणून आस्तिक देवभोळ्या लोकांनी हिणवलेलं असतं, त्याचा बदला घ्यायचा असतो. सुसंस्कारित भाषा, तर्कवाद वैगेरे मोठे मोठे आदरार्थी शब्द वापरून (पण लोकांना वेड्यात काढून) बौद्धिक हुकूमशाहीचा कंड शमवायचा असतो. जे खरे आध्यात्मिक असतात ते ह्या सर्व वादावादीपासून दूर राहून आयुष्य आनंदी बनवतात. मग काही लोक त्यांच्या आनंदाचं रहस्य विचारतात, ते आपले सरळ मनाने सांगतात. ऐकणारे भलते सोयिस्कर अर्थ काढून आचरणात आणतात. तो सच्चिदानंद आपल्याला मिळेल या आशेवर-आडंबरावर आस्तिक-सश्रद्ध म्हणवून घेतात. त्याच्यापुढे जात नवस-बुवाबाजीपर्यंत प्रकरणं जातात. कारण कोणाला मिळालेला आनंद ज्या कशाने मिळाला असेल ते अंधानुकरण करणे मानवी वृत्तीत आहे. ह्यात शिक्षण-संपत्ती वैगेरेचा काहीच संबंध नाही. उदा.:एक विशिष्ट वर्ग पबमध्ये जाऊन आनंद मिळतो असं म्हणतो म्हणून तिकडे आनंद शोधायला जाणारे कमी नाहीत, तो सापडला नाही तरी 'खर्‍या भक्तास दृष्टांत होतो' ह्या चालबाजीने लोक (आपण तो विशिष्ट वर्ग नाही हे नाकारण्यात कमीपणा मानत असल्याने) आपल्यालाही आनंद झाला असे खोटेच ठोकून देतात, पुढे त्यांना तेच खरे वाटायला लागते. नास्तिकच मुळात कमी आहेत, त्यात तुम्ही म्हटल्याप्रमाणे आनंदी राहणारे अतिशय कमी, त्यापेक्षा कायम तलवार हातात घेऊन असणारेच जास्त. त्यामुळे आनंदी नास्तिकाकडे बघून परिवर्तनाची आस जागृत होणे हे अतिअति दुर्मिळ आहे. त्यापेक्षा आनंदी भासणार्‍या आस्तिकाकडे आकर्षित होऊन कंपू बनवून न दिसलेल्या देवाची संगनमताने पूजा करणे (श्रद्धा ठेवणे) जास्त सोपे आणि स्वस्त आहे. तस्मात् ... असो. नेहमीचाच असे हा काथ्याकूट. ना मिळे मिरपूड, ना ही बोरकूट. तावातावाने नास्तिक-आस्तिक, दळतात घेऊन मुद्दे छाटछूट.

In reply to by संदीप डांगे

नेहमीचाच असे हा काथ्याकूट. ना मिळे मिरपूड, ना ही बोरकूट. तावातावाने नास्तिक-आस्तिक, दळतात घेऊन मुद्दे छाटछूट.
वा क्या बात है!

In reply to by विवेक ठाकूर

यनावाला ज्या अवकाशात समाज प्रबोधन करत आहेत ते अवकाश त्यांना कळलं नसावं. ते अवकाश काय आहे तुम्ही त्यांना समजावून सांगा ना.

In reply to by विवेक ठाकूर

मी कधी मधी देवपूजा करत असतो पण देव नावाचा कोणी असेलच तर तो फ़क्त साक्षीदार आहे वादी प्रतिवादी नाही की न्यायाधीश नाही याची जाणीव मनात ठेवूनच. पाच मिनिटात पूजा व् पन्नास मिनिटे चालणे असे माझे अग्रक्रम आहे व् तासभर पुजा करुन अजिबात व्यायाम न करणार्यापेक्षा माझे रि झल्ट्स अधिक चांगले आहेत .

कुणालाही काहीही पटवून देण्याच्या भानगडीत पडू नका! फक्त मनस्ताप होतो. वर खूप लोकांनी हेच सांगितले आहे आणि मी सुद्धा याच पालन करण्याचा प्रयत्न करतोय. सकाळी ट्रेन मधून जाताना मुंब्रा स्टेशन येण्याआधी खाडीमध्ये निर्माल्य टाकण्यासाठी स्पर्धा लागते. माझा नेहमीचा सहप्रवासी हेच करतो. त्याला कितीवेळा सांगून पाहिलं कि बाबा रे, एखाद्या झाडामध्ये टाक, या पाण्यात किती घाण आहे. पण छे, ऐकल तर शप्पथ! शेवटी न राहवून त्याला हे पण सांगितलं कि आपण कामावर जाण्याची वेळ आणि मुंब्र्यातील रहिवाश्यांची प्रातर्विधी उरकण्याची वेळ एकच आहे. हा सगळा मालमसाला याच खाडीत येतो आणि तू तुझ्या देवांचे हारतुरे त्याच पाण्यात टाकतोस, याची तुला काहीच शरम नाही का वाटत? त्या दिवसापुरती त्याला उपरती झाली. पण थोड्याच दिवसात परत हा गाडीच्या दारात हातात निर्माल्याची पिशवी घेऊन उभा.

In reply to by सतीश कुडतरकर

पडिले वळण इंद्रिया सकळा| कळत पण वळत नसते म्हणतात ते हेच.त्याने निर्माल्य जर खाडीत टाकले नाही तर त्याला मानसिक अस्वास्थ्य लाभते म्हणून तो तसे करतो.त्याचा मेंदु त्याला तसे करणे भाग पाडतो. मेंदुतला माणूस ही एक अजब गोष्ट आहे

लोकहो, इथे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे का? यनावालांना आस्तिक का म्हणू नये? जर नास्तिकांनी ठाम दावा केला की देव नाही, तर आस्तिक लोकं त्याच्या उलट म्हणणार. अशा परिस्थितीत नास्तिक अस्तिपक्षी होतात आणि आस्तिक नास्तिपक्षी होतात. म्हणजे युक्तिवाद तेच राहणार ना? केवळ भूमिकांची आदलाबदल होईल. तर मग आस्तिक आणि नास्तिक यांच्यात गुणात्मक भेद काय आहे? यनावालांनी लिहिलंय तो रीतीभेद आहे. २२ प्रवासी एका प्रकारे मुद्दा मांडतात तर यनावाला वेगळ्या प्रकारे मुद्दा मांडतात इतकाच फरक आहे ना? आस्तिकच्या विरुद्धार्थी संज्ञा नास्तिक नसून अज्ञेय असायला पाहिजे. आ.न., -गा.पै.

मला यनावालांचे लेख वाचले की मॅट स्लिक याचा नास्तिकांचे वर्गिकरण करणारा What is atheism? हा लेख आठवतो. त्यात त्याने नास्तिकांचे कट्टर नास्तिक, अज्ञेयवादी, सौम्य नास्तिक आणि लष्करी नास्तिक असे वर्गिकरण केले आहे. लष्करी नास्तिकांबद्दल तो म्हणतो,
Finally, there is a group of atheists that I call militant atheists. They are, fortunately, few in number. They are usually highly insulting and profoundly terse in their comments to theists and particularly Christians. I’ve encountered a few of them, and they are vile, rude, and highly condescending. Their language is full of insults, profanity, and blasphemies. Basically, no meaningful conversation can be held with them.
या अवतरणातील फक्त एक शब्द बदलला की ते यनावालांना तंतोतंत लागू होते. नाही का?

In reply to by म्हसोबा

यातला कुठलाच शब्द यनावालांना लागू होत नाही. ते' हाय्ली इन्सल्टिंग आणि प्रोफाउन्ड्ली टर्स' वगैरे ज्यांनी अतिशय तिखट असे विरोधी प्रतिसाद दिलेत या धाग्यावर, त्यांना मात्र चपखलपणे लागू होतात. यनावाला आपलं म्हणणं ठामपणे पण संयत पणे मांडतात पण काही विरोधक मात्र आक्रस्ताळे आणि वैयक्तिक प्रतिसाद लिहीत आहेत. त्यामुळे या अश्या विरोधकांशी 'मीनिंगफुल कॉनवर्सेशन' होऊ शकत नाही.

In reply to by राही

असहमत! निवडक आणि अनुकूल प्रतिसादांना प्रतिसाद देण्याच्या वृत्तीमुळे मिनिंगफुल कॉनवर्सेशन होऊ शकत नाही. आपल्याला अभिप्रेत असलेले आस्तिक इथे ओतप्रेत भरलेले आहे ह्या गैरसमजातून इथे प्रबोधन चालू आहे असे दिसून येते. इथे विज्ञाननिष्ठ आस्तिकांची (म्हणजे जिथे विज्ञान संपते तिथे त्यांची श्रद्धा सुरु होते) जास्त असावी असे मज पामरास वाटते. एकदोन अयोग्य प्रतिसादांवरून जनरलाइज करणं योग्य नाही.

धाग्याचे काश्मीर होतय! ;) हे देवाचा प्रसाद न घेणे वाचून मला माझ्या ओळखीतल्या काही मुस्लिम आणी ख्रिश्चन लोकांची आठवण झाली. प्रसाद वाटायला कुणी आले, आरतीला बोलवायला आले की हे लोक पळून जातात. त्यांना भीती वाटते, की गणपतीचा प्रसाद खाल्ला तर ते 'बाटतील.' :) :ड बाकी चालूद्या...

In reply to by कवितानागेश

देव ही संकल्पना एका विशिष्ट वर्गाने सोडलेले पिल्लू आहे. दुकानदारी चालू राहण्यासाठी हा आटापिटा चालू आहे. बाकी काही नाही.

यना तुम्ही त्यांची धार्मीक झिंग उतरवली म्हणून ते चिडले. तुमचा बुध्दिप्रामाण्यवाद चांगला आहे,विनम्रता आहे तरीही त्यांना पटले नाही. हि पिढी आता बदलू शकत नाही.आशा पुढील पिढी कडून आहेत एक मुलगा बापाला प्रश्न करतो.. मुलगा: - बाबा मला शाळेत शिकवतात की माणूस अगोदर आदिमानव होता. हे खरे आहे काय ? बाप: - हो बेटा ,पूर्वी माणसे आदिमानव होते. मुलगा: -मग ते अंगावर कपड़े का घालत नसत.? बाप: - नाही बाळ ,माणसांच्या जीवनात हळु -हळु प्रगती झाली. माणसाला थोडे थोडे कळु लागले तेंव्हा तो अगोदर झाडाच्या पानांचे कपड़े घालू लागला मग त्याला जसे जसे कळु लागले तसे तो सूधारत गेला व अनेक शोध लावत गेला. आत्ता जेव्हढे काय आपण पहातो, वापरतो, ते सगळ माणसांनीच निर्माण केले आहे. मुलगा: - बाबा मग देव अगोदर होते की माणसे .? बाबा: - बाळा देव आगोदर होते. देवानेच सृष्टि निर्माण केलीये.. मुलगा: - मग बाबा असे कसे काय हो. त्या देवांच्या फोटोत तर कपड़े , दागिने ,त्रिशूल, सोने ,भाले ,गदा, पैसे, लाडू ,मोदक असे अनेक काय -काय दिसते.? त्या वेळेस दागिने तयार करायला सोनार होता का ? कपड्यांच्या मिल होत्या का ? कपड़े शिवायला टेलर होता का ? भले ,त्रिशूल ,गधे ,तलवारी बनवणारे कारीगर होते काय ? लाडू मोदक बनवनारे हलवाई होते कां ? बाप:- मूर्खा सारखे प्रश्न विचारू नकोस, गप्प बस ! अरे बाळा, ते देव होते. ते काहीही करू शकतात.. मुलगा: - मग आता देव कुठे आहेत बाबा ? बाप: - अरे देव आपल्याच आजुबाजूला आहेत. मुलगा:- काय ? देव आहे इथे ? बाप: - हो बाळा. मुलगा: - मग त्यांना सांगा ना वाघा-हरिणाच्या कातड्याऐवजी प्रगत कपडे घालायला... त्रिशूल भाले गदा तलवारीला आता कोणी भिक घालत नाही, बाबा त्यांना सांगा ना रायफल मशीनगन आणि ऑटोमबॉम्ब जवळ बाळगायला.. (जे सृष्टीचे निर्माते आहेत किंवा ज्यांच्या शापवाणीत एवढी ताकत आहे त्यांना गदा तलवारीची काय गरज बाबा? ते तर दयाळू आणि क्षमाशील आहेत ना..?!!) अजून एक बाबा, त्यांना सांगा ना आपल्या देशातला भ्रष्टाचार मिटवायला, शेतकर्यांच्या समस्या सोडवायला , त्यांची आत्महत्या थांबवायला, 2 वर्षाच्या लहान मुली पासुन 60 वर्षाच्या बाई पर्यंत बलात्कार रोज होतायत. ते थांबवायला. तसेच देवालयातच् कोट्यावधी रुपये साठलेत, ते लोककल्याणा करिता द्यायची बुद्धि त्या मंदिर प्रशासनाला द्यायला सांगा ना बाबा... बाबा: - बाळा मी तुला हात जोड्तो, बस्स कर तूझे प्रश्न. मलाच अजुन कळले नाही. तर मी तूला काय उत्तर देऊ.? मला लहानपणापासून जसा देव दाखविला जसा धर्म शिकविला तसाच मी पूजत आणि पाळत आलोय.. मला तुझे हे सगळे कळते रे.. पण सगळं पाळावं लागतं बाबा.. पटत नसलं तरी गप्प बसावं लागतं.. मुलगा: -- म्हणजे तुम्ही आजपर्यंत तुमच्या बुद्धिचा आणि धैर्याचा वापरच केला नाही. पण बाबा मी तसे करणार नाही. सत्य-असत्य जाणुनच पूढे जाणार. व मला एक खात्री तर पक्की आहे. - या सृष्टीचा निर्माता जसा असेल ते असेल, पण सगळे धर्म आज शिकवताहेत तसा तर तो बिलकुल नाहीये... हे ऐकुंन बापाची मान खाली गेली व मुलाची नजर चुकवू लागले. **** आज कमी प्रमाणात असेल, पण कधी ना कधी पुढील पिढीतील मुले असे प्रश्न तुम्हांला नक्की विचारतील हे लक्षात ठेवा.. मग तेंव्हा मान खाली घालण्यापेक्षा आत्ताच चुक सुधारुन घ्या. सगळे करताहेत म्हणून करू नका, कार्यकारण पटले तरच कोणतीही गोष्ट करा.. स्वतःला प्रश्न विचारा.. पुढची विज्ञाननिष्ठ पिढी ही देशासाठी तयार करा.. देवासाठी नको

In reply to by बाजीगर

बाजीगर, तुमचे प्रश्न वाचले. धर्माविषयी तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ते त्या प्रश्नांतून कळलं. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अन्न म्हणजे सूर्यप्रकाश अधिक विष्ठा. मग लोकं अन्न कशाला खातात? उन्हात वाळवलेली विष्ठा का खात नाहीत? आ.न., -गा.पै.

आस्तिकाना मनाप्रमाणे जगायचा हक्क आहे तसा नास्तिकाना देखिल आहे. फक्त शम्भरात ३ नास्तिक आहेत म्हणुन त्याना त्यान्च्या मनाप्रमाणे जगु न देणे ही झुन्डशाहि झाली. माझ्यामते नास्तीक हा बुद्धीप्रामाण्यवादी असतो, त्याच्या बुद्धीला न पटणार्या गोष्टीना तो तर्काच्या चाचणीवर ठरवतो. लाडु खावा कि न खावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तो खाल्ला नाही म्हणुन बस बिघडली हा तर्क कोणत्या चाचणीवर योग्य ठरतो. प्रत्येक घटनेसाठी काहितरी कारण असते बरोबर आहे, पण ते बहुमताला हवे तेच असते अस नाही... विज्ञानाला सगळे कळाले आहे अस कोण म्हणते.. पण ते समजुन घ्यायची ईच्छा असणे म्हणजे नास्तिक.

In reply to by स्वप्नाचीदुनिया

स्वप्नांची राणी, तुमची नास्तिकाची व्याख्या चुकीची आहे. मला विज्ञानातला कार्यकारणभाव जाणून घ्यायची इच्छा आहे. तरीपण मी स्वत:ला आस्तिक समजतो. आ.न., -गा.पै.