Skip to main content

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

लेखक यनावाला यांनी शनिवार, 12/12/2015 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता. प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले, " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" " मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. " "कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?" " हो. कुठल्याच देवाला नाही." थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला. " मग मंदिरात कसे आला ?" " तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो." " तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?" "नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो. "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे. "नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो." " देवाला नाही आणि माणसांना का बरे?" "कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." "तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला. "जशी तुमची इच्छा" मी म्हणालो. थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच. तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती. "आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला. बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या, "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल." " आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला. "ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. " "आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले. "खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते." " ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला. " त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?" " सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. " " ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?" " अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या. " चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो. " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या. " आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे. "तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही." " पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला. " ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. " "गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले. " ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा." गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे. .................................................................................

वाचने 108329
प्रतिक्रिया 421

प्रतिक्रिया

>>>>आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? ह्यावर भले भले सुशिक्षित(?) सुद्धा विचार करू इच्छित नाहीत. 'आमची श्रद्धा आहे' म्हणायचे आणि चर्चेकडे पाठ फिरवायची. हे खरं पाहता त्वचा बचाव धोरण असतं. सर्व श्रद्धेच्या पोटी कांही न कांही 'भिती' दडलेली असते. आणि वरील विचार पटले तरी त्यावर कृती करण्यास मन धजावत नाही. कारण पोथ्यापुराणातून, भक्तमंडळींकडून 'सर्वनाशाची' अशी भिती घातलेली असते की, 'जाऊ दे नं. थोडक्याकरता देवाला नाराज करून त्याचा रोष का पत्करावा?' असा विचार असतो आणि अंधश्रद्धा पुढे चालू राहते. ती तशी चालू राहण्यात सर्व देवालयांच्या विश्वस्तांचं 'हित' दडलेलं असतं. पोथ्यापुराणं माणसांनीच लिहीलेली आहेत. ईश स्तुती करताना, लोकांना भक्ती मार्गावर 'खेचण्यासाठी' अशा पोथी लेखकांनी चमत्कारांचा आणि अद्भुताचा एव्हढा आधार घेतला की आपण वास्तवापासून दूर जातो आहोत हेच ते विसरून गेले. साईबाबांच्या पोथीतही 'जो जो मज भजे जैशा जैशा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी' असे वाक्य आहे. म्हणजे भक्ताचा भक्तीभाव पाहून त्याला त्याचे फळ देणे ही सौदेबाजी आहे. हे पोथी लेखक विसरतो. देवालाही मानवाच्या पातळीवर आणून मानवाचे सर्व राग, लोभ, सौदेबाजी हे दुर्गूण देवांना चिकटवून ह्या पोथी लेखकांनी देवालाच बदनाम केले आहे. मनोभावे दोन हात आणि मस्तक जोडून तुमची भक्ती व्यक्त होऊ शकते. पण आख्ख आयुष्य फकीरावस्थेत व्यतित केलेल्या साई बाबांना सोन्याचे सिंहासन आणि चांदीची आरास केली जाते. सिद्धीविनायकाचा कळस सोन्याचा केला जातो. दर्शनरांगेत उभे राहायचे नसेल तर ज्यादा चार्ज भरून पुढे थेट देवाच्या चरणाशी जाण्याची सोय होते. अशा वेळी इतर गरीब भाविकांचा हक्क, अग्रक्रम डावलून आपण पुण्य कमवत नाही तर 'पाप' करतो आहोत हे स्वार्थी भक्तांच्या ध्यानात येत नाही किंवा त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जाते. वार्षिक ३५० करोड कमविण्यार्‍या साईस्थानाच्या बाहेर कचरा, सांडपाणी, खड्डे आणि व्यावसायिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ह्या सर्व वास्तवाकडे डोळेझाक करून भाविक(?) साईचरणी भरभरून दान अर्पण करून आपली मनोकामना पुरी करायची विनंती साई मुर्ती पुढे करत असतात. म्हणजे आपले काम व्हावे म्हणून एक प्रकारची लाच देवाला अर्पण केली जाते आणि त्यालाच भक्तीभाव म्हणून मिरवलं जातं. असो. ह्या विषयावर लिहावं तेव्हढं कमीच आहे. आणि 'आमची श्रद्धा आहे' दर्जाच्या भक्तांवर सुतराम परीणाम होत नाही हे दुर्दैवं आहे.

जर मूर्ती शिल्प म्हणून पाहू शकता तर प्रसाद लाडू म्हणून का खाऊ शकत नाही? राहिला प्रश्न पावतीपुस्तकाचा. देणगी द्यायला नम्रपणे नकार देणं सहज शक्य होतं. (मुळात तशी त्यांची अपेक्षा होती का हा प्रश्नच आहे, कारण तेरा पावत्या आगोदरच फाडल्या गेल्या होत्या ना?)

In reply to by आदूबाळ

येवढं सोपं जमलं असतं तर लेख लिहून तुणतुणं वाजवायची गरज पडली नसती. बाकी फादर फ्रान्सिस दिब्रिटोंनी लेख लिहीला होता की प्रधानमास्तर जे आयुष्यभर नास्तिक राहीले ते शेवटच्या भेटीत फादरना म्हटले 'फादर मला येशूकडे घेऊन चल'. शरद जोशी उत्तरायुष्यात अध्यात्माकडे वळलो अशी कबुली देतात. बाकी ज्यांचा विश्वास नाही त्यांना चालूदे म्हणावे. चालुदे यनावालासर.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

शरद जोशी उत्तरायुष्यात अध्यात्माकडे वळलो अशी कबुली देतात. बाकी ज्यांचा विश्वास नाही त्यांना चालूदे म्हणावे.
मंग उत्तरायुष्यात वळा आत्ताच वळू नका असे म्हणणारे भेटतीलच. :) प्रधान मास्तरांनी आयुष्याच्या उत्तरार्धात साधना दिवाळी अंकात एक लेख लिहिला होता. त्यात त्यांच्या सश्रद्ध आस्तिक विचाराची छटा दिसत होती. त्यावर आमचा अंनिसतला कडवा नास्तिक मित्राने प्रधान मास्तर ही शेवटी कच्च मडकच निघाल अशा आशयाच खाजगीत वक्तव्य केल. प्रधान मास्तर हे काही अस्तिक व श्रद्धाळू लोकांचा उपहास करणारे कधीही नव्हते. ते सहृदयी विवेकवादी नास्तिक होते असे फार तर म्हणता येईल. खर तर विवेकवादी चिकित्सक माणूस हा आपले विचार सातत्याने तपासत असतो. आयुष्याच्या प्रवासात त्यात काही बदल करावेसे वाटले तर करीत असतो. हा बद्ल म्हणजे काही पराभव वा गुन्हा नव्हे.पण आयुष्याच्या उत्तरार्धात तुलनेने प्रगल्भता आलेली असते म्हणून त्याला विशेष मह्त्व आहे. आयुष्याच्या पुर्वार्धात अस्तिक व सश्रद्ध असलेली माणसे उत्तरार्धात नास्तिक व अश्रद्ध झालेली दिसू शकतात. माझ्या मते अशा बाबी या मेंदुतील जैवरासायनिक बदल आहेत.

यनावाला..तुमचे सगळे लेख खूप आवडलेत! तुमची पुस्तकेही वाचलीत... समाज प्रबोधनाचे कार्य म्हणजे thankless आणि neverending job. त्यातून तुम्ही लिहिता तो विषय म्हणजे प्राणाशीच् गाठ!! पण लिहित रहा pls....hats off Sir..!!!

In reply to by प्रचेतस

मी ही माझ्या दोन प्रचंड सश्रद्ध मित्रांसोबत पुन्याभोवतीच्या शंभर किमी परिघातील कितीतरी मंदिरे अशीच मुर्तीला नमस्कार न करता, प्रसाद न घेता पाहिली आहेत. अगदी व्यवस्थित दर्शनाच्या रांगेत उभे राहून. पण मला खात्री आहे, मी त्यांच्यासोबत असताना चुकून कधी गाड़ी बंद पडली तर ते मला दोष देणार नाहीत. सश्रद्ध असले तरी ते अडाणभोट नाहीत. :)

लेख छानच! मला वाटते ह्युमन ट्रॅफिकिंग (वेश्या व गुलामविक्री) नंतरची सगळ्यात मोठी "इंडस्ट्री" आहे ही आणि आस्तिक लोक त्याचे निष्ठावान ग्राहक. एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीशी पंगा घेणे धोकादायक आहे यनावालांना माहित असेलच.

In reply to by नगरीनिरंजन

मला वाटते ह्युमन ट्रॅफिकिंग (वेश्या व गुलामविक्री) नंतरची सगळ्यात मोठी "इंडस्ट्री" आहे ही
इथे
मला वाटते ह्युमन ट्रॅफिकिंग (वेश्या व गुलामविक्री) आधीची आदिम सगळ्यात मोठी मोनोपोलीस्टिक "इंडस्ट्री" आहे ही
यनावाला यांचा हा लेखं आवडला.

आपल्या अशा विचारांना सुरूवात कशी झाली याचं कुतूहल आहे. त्याबद्दल काही सांगाल का?

लेख आवडला. पण एकूण कोणाशी वाद घालत बसण्यात काही पॉइंट नसतो. आपले डोके खराब करून घ्यायचे. त्यापेक्षा मी प्रसाद लाडू म्हणून खाऊन टाकते आणि वर्गणीसुद्धा देते ११ रुपये. काय फरक पडणार आहे? आपला वेळ आणि मनःशांती महत्त्वाची. तसेही दुसर्‍यांना कशाला दुखवायचे? त्यांची मते जन्मात बदलत नाहीत. राहू देत त्यांनाही सुखात.

In reply to by पैसा

प्रतिसाद एक नंबर... कोणीही आपली मतं अशीच बदलत नाही. प्रचिती आल्याशिवाय. म्हणजे देव असल्याची वा नसल्याचीही...

In reply to by पैसा

अशीही एक शक्यता आहे पैतै की त्यांनी आधी हुमण किंवा तत्सम गोंयच्या पाककृती जर रेमटवल्या असतील तर लाडवांनी ती तोंडाची चव खराब करण्याची त्यांची इच्छा नसेल. उद्या तांबडा-पांढरा ओरपल्यावर साक्षात महालक्ष्मीने जरी प्रसाद म्हणून लाडू दिला तर आपण खाऊ का? मी तरी नाही खाणार!

नास्तिक असूनही तो लाडू तुम्हांला "प्रसादाचा" लाडू म्हणून नाकारावासा वाटतो, ह्याचेच खरे तर नवल वाटते आहे!

In reply to by यशोधरा

@ आदूबाळ आणि यशोधरा ... तो लाडू प्रसादाचा होता म्हणून नाकारला असे नव्हे. लाडूचे काही मूल्य (किंमत) असते. ते न देता लाडू खाणे योग्य नाही म्हणून खाल्ला नाही. तसेच लाडू विनामूल्य स्वीकारल्यावर मिंधेपणा आला असता. नंतर पुढे केलेले पावती पुस्तक नको नको म्हणणे शोभले नसते. समाजात वावरताना काही आचरणतत्त्वे,पथ्ये, सर्वांनी पाळावी. मात्र आपल्या विचारसरणीला मुरड घालू नये असे मला वाटते.

In reply to by यनावाला

तुमच्या विचारसरणीवर ठाम अस्ल्याबद्दल कौतुक आहे. पण
लाडूचे काही मूल्य (किंमत) असते
हे वाचून देव या अकाऊंटचे ऑडिट लैच भयानक असणार यात शंका नाही.

In reply to by यनावाला

लाडूचे काही मूल्य (किंमत) असते. ते न देता लाडू खाणे योग्य नाही म्हणून खाल्ला नाही. तसेच लाडू विनामूल्य स्वीकारल्यावर मिंधेपणा आला असता. नंतर पुढे केलेले पावती पुस्तक नको नको म्हणणे शोभले नसते.
लाडूची किंम्मत म्हणून पावती फाडायची. देवाला देणगी म्हणून नव्हे.

In reply to by यशोधरा

त्यांना देव या संकल्पनेचं अस्तित्व मान्य नाही त्यामुळे आपले पैसे हे त्यासाठी वापरले जावेत अशी त्यांची इच्छा नाहीये. जरी त्यांनी लाडवाची किंमत म्हणून पावती फाडली तरी तो लाडू देऊन पावती फाडणारा देवाच्याच नावाने ती फाडणार. त्यापेक्षा त्या फंदातच पडायला नको म्हणून त्यांनी प्रसाद घेतलाच नाही. न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी!

In reply to by बोका-ए-आझम

आपण एखाद्या वस्तूचं मूल्य म्हणून पैसे मोजतो तेव्हा त्या पैशाचं अखेरीस काय होतं याची चिंता पैसे मोजणारा करायला लागला की संपलंच की हो. समजा, मी रिक्षातून स्टेशनपासून घरापर्यंत आलो आणि शंभर रुपये दिले. त्यातल्या नफ्यातून रिक्षावाल्याने दारू प्यायली आणि बायकोला मारलं, तर ती माझी चूक कशी असू शकेल? यासाठी रिक्षाच टाळणं हा उपाय नाही.

In reply to by आदूबाळ

रिक्शावाला काय करु शकेल याचं मी भाकित करु शकत नाही पण देवस्थानच्या नावाने जर पावती फाडली असेल तर ते पैसे देवस्थानाकडेच जाणार आहेत हे उघड आहे. तुमचं उदाहरण ग्राह्य झालं असतं, जर या माणसाने देवस्थानाच्या नावे देणगी घेतली असती पण पावती दिली नसती तर. पण लेखात पावताइ दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. In fact, तुमचं म्हणणं मान्य केलं तर taxpayer's money is wasted असं आपण कोणीही म्हणू शकणार नाही. त्या पैशाचं काय होतंय याची चिंता ही करावीच लागते. हवाला व्यवहार करणारेही हेच समर्थन देतील मग.

In reply to by यशोधरा

जसे श्रध्दाळू लोक त्यांचि श्रध्दा जपतात त्याचप्रमाणे नास्तिक मनुष्य नास्तिकता जपण्यासाठी लाडू (प्रसाद) नाकारु शकतो. राहिले मंदिरात जाण्याबद्दल, अनेकदा मंदिरे ही स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना त्यामुळे मंदिरात जाण्याची उत्सुकता नास्तिक माणसालापण असू शकते. मी सुध्दा नास्तिक आहे, पण काही वेळा एखाद्या मंदिराबद्दल कुतुहल वाटल्यास आत जातो. मुर्तीला नमस्कार मात्र करत नाही. तुम्ही लिहलेला किस्सा खूप जुना आहे, आता मला तरी माझ्याबरोबरचे लोक (मित्र, नातेवाईक) नमस्कार कर म्हणुन आग्रह करत नाहीत. तरी मंदिरात जास्त गर्दी असताना जाणे टाळतो कारण इतर अनेक (अनोळखी) भाविक असतील आणि मी नमस्कार न केल्याने 'भावना दुखावल्याचा' कांगावा कुणी सुरु केला तर उगाच वातावरण बिघडेल. बाकी मी माणसांनाही नमस्कार (पायांना स्पर्श करुन वगैरे) करीत नाही. कारण एक माणूस दुसर्‍यापेक्षा इतका उच्च असावा की दुसर्‍याने त्याच्या पायांना स्पर्श करावा ही कल्पना मला मान्य नाही.

In reply to by मराठी कथालेखक

बाकी मी माणसांनाही नमस्कार (पायांना स्पर्श करुन वगैरे) करीत नाही. कारण एक माणूस दुसर्‍यापेक्षा इतका उच्च असावा की दुसर्‍याने त्याच्या पायांना स्पर्श करावा ही कल्पना मला मान्य नाही.
"अहंकाराचा वारा | न लागो माझिया चित्ता|" म्हणून नमस्कार करायचा असतो. दुसरा मोठा आहे म्हणून नव्हे.

In reply to by आदूबाळ

"अहंकाराचा वारा | न लागो माझिया चित्ता|" म्हणून नमस्कार करायचा असतो. दुसरा मोठा आहे म्हणून नव्हे.
हे वचन मला माहित नव्हते. पण एक शंका आहे ज्याला वाकून नमस्कार करत राहतो त्याचा अहंकार वाढत नसेल का ? घरातील सगळ्यात वयस्कर व्यक्तीने स्वतःचा अहंकार कमी करायला काय करावे ? तसेच "माझ्यात खूप अहंकार भरलेला आहे आणि तो मला कमी करायचाय आणि त्याकरिता मी समोरच्या व्यक्तीला (इथे सहसा ती वयाने मोठीच असावी लागते हं .. काही अपवाद असतील म्हणून 'सहसा' शब्द वापरला, असो.) मी वाकून नमस्कार करणार आहे" इतकी जाणिव असलेल्याच्या मनात खरंच अहंकार असेल का ? आणि स्वत:च्या अहंकाराची जाणिवच नसलेल्याने केवळ सवय वा सोपस्कार म्हणून दुसर्‍या व्यक्तीस नमस्कार केल्याने त्याचा/तिचा अहंकार कमी होईल का ? गमतीखातर एक Prescription बनवावेसे वाटले Dr xxxx xxxx , Consulting Psychiatrist Diagnosis : नॉर्मल रेंज पेक्षा जास्त अहंकार Rx ५ लोकांना खाली वाकून नमस्कार १ - १ x १५ दिवस

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

वा़कून नमस्कार केल्याने अहंकाराचा वारा लागत नाही असंही ओवीत म्हंटल आहे का ?(मला पुर्ण ओवी माहित नसल्याने विचारत आहे) आणि तसं नसेल तर नमस्कार करण्याचा आणि ओवीचा काहीच संबंध नाही

In reply to by मराठी कथालेखक

आमच्या घरात कोणीही (अगदी २ वर्षाच्या बालकानेही) नमस्कार केला तरी वाकून प्रतीनमस्कार करायची पद्धत आहे. आणि यामागे आपल्या मनात अहंकार उत्पन्न होऊ नये हेच कारण आहे असे शिकविले गेले आहे. एका अत्यंत थोर आणि व्यासंगी प्रवचनकारांना खूप जवळून बघण्याचा योग अनेक वर्षे आलेला आहे. ते ही प्रत्येक पाया पडणार्‍याला उलटा नमस्कार करत. मिलिट्रीतही एखाद्या ऑफ़िसरला एखाद्या साध्या सैनिकाने सलाम केला तर प्रतीसलाम करणे सक्तीचे आहे. प्रत्यक्ष व्यवहारात तसे होतेच होते, आणि न झाले तर कमीत कमी कोणत्या न कोणत्या कृतीने दखल घेऊन प्रतीसलाम केला जातोच. तसे न झाले तर बहुधा तो फ़ाउल धरतात. त्यावर कारवाईही होते बहुधा, किंवा होऊ शकते. मूळात हा सगळाच विषय अगदी घट्ट, हार्ड ऍंड फ़ास्ट असा नाही. त्यामुळे, एका ज्ञानशास्त्रातले घट्ट (आणि समान परिस्थितीत सर्वकाळी समान परिणाम देणारे) नियम अगदी तस्सेच्या तस्से इथे लागू व्हावेत असे मानणे, हे ही गंमतीशीरच. म्हणूनच ... चालू द्या.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

"एकमेका लागतील पायी रे" ही तर अगदी पूर्वापार चालत आलेली वारकरी परंपरा आहे. कुणी लहान नाही कुणी मोठे नाही.सगळे विठुमाऊलीची लेकरे.! (विठ्ठलाला माऊली म्हणुन संबोधणे हे कशाचे लक्षण म्हणावे. आस्तिकतेचे ना नास्तिकतेचे!)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आमच्या घरात कोणीही (अगदी २ वर्षाच्या बालकानेही) नमस्कार केला तरी वाकून प्रतीनमस्कार करायची पद्धत आहे.
हे ठीक वाटते, निदान समानता आहे. बाकी पायाशी वाकावे की हस्तांदोलन करावे की गळाभेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न

In reply to by मराठी कथालेखक

विनम्रता आणी अहंकार याची लाश्कारातील एक कहाणी. पिथोरागढ च्या आसपास लष्कराची एक तुकडी गस्त कम ट्रेकिंग्साठी गेली असताना वाट चुकली फिरत असताना एका गुहेशेजारी एक साधू फक्त एक धोतर नेसून उघडा उन्हात तप करीत असलेला पहिला तेंव्हा त्यातील दोन अधीकार्यानी आपसात इंग्रजीत चर्चा केली एक म्हणाला या साधूला विचारावे का? दुसरा म्हणाला हा अनाडी आहे याला काय कळणार आहे? साधूने त्यांचा आवाज ऐकून डोळे उघडले आणी इंग्रजीत विचारले कि तुम्हाला काय पाहिजे. हे दोघे अधिकारी अवाक झाले आणी त्यांनी साधूला रस्ता विचारला. साधूने रस्ता सांगितला. त्यावर त्या दुसर्या अधिकार्याला स्वस्थ बसवेना. त्याने विचारले साधू "महाराज" तुम्ही शिकलेले आहात काय. त्यावर साधू महाराजांनी त्यांना शुद्ध हिंदीत सांगितले. हां थोडासा पढे है! किती ते विचारल्यावर म्हणाले बनारस हिंदू विश्वविद्यालयसे पी एच डी कि है फिजिक्स में. आता त्या दोनही अधिकार्यांनी तोंडात बोट घातले. दुसर्याने परत विचारले कि आप यहां क्या कर रहे हो? त्यावर ते साधू महाराज म्हणाले कि फिजिक्स मी कुछ प्रश्नोंके उत्तर नाही मिल राहे थे इसलिये निसर्ग के सान्निध्य बैठके चिंतन कर रहे थे. आता दोन्ही अधिकारी साधू महाराजांच्या पाया पडले. विद्या विनयेन शोभते. आणि माणसाचा अहंकार दुसर्याला ओळखण्यात कमी पडतो.

In reply to by मराठी कथालेखक

नमस्कार करणं (किंवा कोणतीही गोष्ट) जाणिवेच्या पातळीवरून नेणिवेच्या पातळीवर गेलं की ते स्वभावात आणि वर्तणुकीत हार्ड कोड होतं. त्यालाच संस्कार म्हणतात. उदा. चुकून कोणाला पाय लागला तर आपण नमस्कार करतो. ही प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून होत असली तरी त्या कृतीतून आपण स्वतःलाच असं सांगत असतो की बाबा रे हे चुकून झालं, मुद्दाम लाथ मारायचा हेतू नव्हता. एखाद्या वेळी ही कृती करायची राहून गेली की चुटपुट लागते. मोठ्या व्यक्तींना वाकून नमस्कार करण्यातही हेच लॉजिक आहे. ताठ कणा हे स्वप्रतिमा मोठी असल्याचं लक्षण मानलं जातं. ताठरपणा, मोडेन पण वाकणार नाही, ...मोडला नाही कणा, bending someone to his/her own will वगैरे सहज आठवलेली उदाहरणं. तर आपला कणाही कोणासमोर वाकतो, किंबहुना आपण राजीखुषीने वाकवतो हे आपल्या स्वप्रतिमेला काही नॉच खाली आणतं. आणि वैयक्तिकरीत्या मला ते मोलाचं वाटतं.

मस्त लिहिलेत! आवडेश. सगळेच एवढे बुद्धीवादी नसतात हो. प्रत्येकाला कोणीतरी लागतो. कोणाला देव, कोणाला दैव ज्योतिषी, तर कुणाला तर्कवाद! तेव्हा, आपल्याला शुभेच्छा! बाकी देवाबाबत म्हणाल, तर एवढेच सांगू शकेल, की प्रचिती कधीतरी येतेच! तुमची कदाचित यायची असेल :)

टवाळकी सहन करून अनेकानी चिकाटीने प्रबोधनाचे कार्य केल्याचे इतिहास सांगतो.आपल्याला देखील तो सनातन विकार (?) झाला आहे असे दिसते. असो आपल्या कार्यात आमची शुभेछ्छा आहे. पण आस्तिकता , अंधश्रद्धा ई त्रिकाळ रहाणार आहेत या निषकर्षाला मी आलोय. याचेच कारण या जगात जो पर्यन्त भीति व कृतज्ञता या दोन भावना आहेत तो पर्यन्त देवच बरेवाईट करू शकतो हा समज घट्ट्च रहाणार. १९९१ नंतर भारतात ऐहिक प्रगति झालेली मी पहातो त्यातील काहीचा भोगही घेतो साम्यवाद अनैसर्गिक आहे हे समजते तरीही मी साम्यवादी आहे. तसे या आस्तिकांचे असते. कळते ते सारे पण वळत काही नाही. खालील दोन मजेशीर वाक्य लिहून प्रतिसाद सम्पवितो. १. देव आहे का जगात माझे उत्तर आहे १०० टक्के नाही पण देवाची लीला मात्र १००० टक्के आहेच ! २. ज्या देवाने मला त्याचे अस्तित्वच नाकारायला लावले त्याचा मी आभारी आहे.

In reply to by चौकटराजा

आलात, कसे आहात??? आधीच्या प्रतिसादातील आमचं आवडीच अवतरण कुठेय...ते गल्लतवालं १. देव आहे का जगात माझे उत्तर आहे १०० टक्के नाही पण देवाची लीला मात्र १००० टक्के आहेच ! २. ज्या देवाने देवाच्या ठेकेदारांनी/व्यावसायीकांनी मला त्याचे अस्तित्वच नाकारायला लावले त्यांचा मी आभारी आहे.(माझा दर्शनाच्या रांगेत उभे राहण्याचा आणि प्रवास खर्च वाचवला) आजतगायत तिरूपती/मथुरा आणि गेल्या १० वर्षात शिर्डी येथे न गेलेला पण घरच्या देवाला नियमीत नमस्कार करणारा नाखु देव देवळात नाही हे या अतिश्रीमंत संस्थानांनी मला शिकविले,देव उत्स्वात नाही हे मला नवरात्र्/गणेश उत्सवाने शिकवले. परंतु देव आहे याबाबतचा संभ्रम होता. तो अगदी शालेय वयापासून वेळोवेळी मदत करणार्या ज्ञात अज्ञात हितचिंतकांकडून, शिक्षकांकडून मिळालेल्या मोलाच्या मार्गदर्शनाने आणि सध्या बहुआयामी + बहुरंगी मित्रांच्या धीराने प्रोत्साहनाने अगदी दूर झाला आणि देव फक्त माणसातच आहे याबद्दल नि:शंक झालो

In reply to by नाखु

खाली एकाने साम्यवादी व नास्तिक यान्ची गल्लत केली आहे . प्रत्यक्षता: साम्यवादी बहुदा नास्तिक असतात हे खरे पण ते एक बहुशः नैसर्गिक सत्य म्हणून स्वीकारता येणार नाही. रूढार्थाने काही व्याख्या अशा करता येतील. देव - या विश्वाचा कारभार सहेतुकपणे चालविणारा कोणीतरी . आस्तिक- असा सहेतुकपणे चालविणारा नियंता मानवाप्रमाणेच मंगल अमंगलाच्या कल्पना बाळगून आहे व त्याचीच कृपा आपल्यावर असावी असे वाटणारे लोक. ( सगुण परमतत्व) अस्तिक नास्तिकाच्या मधले.- देव दिसला नाही तरी तो असू शकेल असे मानणारे सबब असलाच तर तो प्रसन्न व्हावा म्हणून धडपडणारे. नास्तिक- असा सहेतुकपणे जग चालविणारा कोणीही नाही. जग्॑ हे एक परस्परावलंबी संरचना आहे. तिला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर तिने मांडलेले स्प्ष्ट नियम पाळले पाहिजेत असे मानणारे लोक. हटवादी नास्तिक - यात देवळात काय जायचे? दगडाला काय नमस्कार करायचा ? पूजा कशाला करायची? असा पराकोटीचा व्यवहारवाद पाळणारे लोक. अध्यात्मवादी - नेहमीच्या अर्थाने - गुरू, अनुग्रह, जप, साधना, सप्ताह, पोथीवाचन, मंत्रजागर, संप्रदाय, पुनर्जन्म, ई त रमणारे कर्मकांडवादी- पूजा,कुळाचार, व्रतवैकल्ये, उद्यापने, उपासतापास, भोजने, पितरशान्ती, ई गोष्टी आदराने भीतीने वा आवडीने करणारे. वेगळा अध्यात्मवाद - बाह्य शक्ती उदा देव गुरू ई ई च्या कृपेच्या शोधात निघण्यापेक्षा आतल्या अवाजाच्या जवळ जाणे मी इथे कशासाठी आलो. त्यात कितपत गुंतायचे ? ममत्वाच्या लफड्यात कितपत पडायचे मी स्वतः ला कसे बघायचे व बोधायचे याचा अभ्यास .

In reply to by नाखु

पट्वुनी सांगा आम्हाला देव आम्ही म्हणावे कुणाला ? या दगडाला, की त्या स्वर्णमूर्तीला नेमका कसा तो, आहे का तुम्ही पाहिला भेटला कधी आहे का तो तुम्हाला....? देव दगडात असे की मुर्तीत वसे आहे का माहित, रूप तयाचे कसे ? उगीच का मग सजविता देव्हार्याला ? देव म्हणजे आहेत कुणी ते ? स्वप्न एक खुळचट मृत कल्पनेचे प्रत्यक्ष दिसेना म्हणुनी पटेना मनाला .... असेल जर तो या जगती यावे तयाने या नजरेपुढती साद असे ही आमची त्या दैवाला असता मनी खरी भक्तिभावना करावी माणूसकीची आराधना जिंका माणूसकीला, देव माना मानवतेला.....

लेख नेहमीप्रमाणेच आवडला. आपली भूमिका परखडपणे मांडण्याच्या तुमच्या धैर्याला व चिकाटीला सलाम! मलाही असे काही अनुभव आले आहेत.

मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले.
हा प्रकार हजम झाला नाही. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही असे म्हणणे याचाच अर्थ--- १) देव अस्तित्वात आहे २) आणि प्रसाद म्हणून जे काही तुमच्या समोर आले असेल (फळ, खडीसाखर, शिरा इत्यादी) ते ’देवाचे’ आहे असे तुम्हाला वाटते असा त्याचा अर्थ झाला नाही का? जो काही प्रसाद मिळाला असेल तो आवडत नसेल म्हणून खाल्ला नाही तर ते समजू शकतो. पण तो ’देवाचा प्रसाद’ म्हणून न खाणे हे काही हजम झाले नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

@गॅरी ट्रुमन देव अस्तित्वात आहे. अनेक देव अस्तित्वात आहेत . पण ते आस्तिकांच्या मनात. मागे डॉ.श्रीराम लागू म्हणाले होते की देवाला रिटायर करा. तेव्हा काही जणांनी वाचकपत्रे लिहिली की डॉक्टर देवाचे अस्तित्व मानतात. त्यावर डॉ.लागूंनी उत्तर दिले होते की ९०%+ लोकांच्या मनात काल्पनिक देव ठाण मांडून बसला आहे. त्याला रिटायर करायला हवे.... आता कमी झाली पण पूर्वी भुते-खेते होती. त्यांचे वसतिस्थानसुद्धा लोकांचे मनच. 2/प्रसादाच्या लाडवाविषयींचे स्पष्टीकरण यशोधरा यांच्या प्रतिसादाच्या संदर्भात लिहिले आहे.

आस्तिक असो वा नास्तिक, मला लाडवाचा मोह कधी सुटणार नाही. तसाही अकरा रुपयाला एक लाडु, हा रास्तच भाव झाला. तिरुपतीचे लाडु कधीही मिळाले तर मी ते आवडीने खातोच.

किती तो तर्कशास्त्र ,तत्त्वज्ञानाचा कीस पाडतात आस्तीक लोक! आणि पुढच्या बाकावरचे नास्तीक.मी यांना नेहमी सांगतो प्रसाद देणाय्रा देवावर माझी अढळ श्रद्धा आहे.सत्यनारायणाचे बोलावणे असेल तर अगोदरच सांगतो मला शिरा बशिभर लागतो आणि तो ते देतातही.प्रसाद खाण्यात थोडासुद्धा मागे हटत नाही त्यामुळे सर्वांचे आशिर्वाद मिळतात.पोथीतही लिहिलं आहे प्रसाद खातो त्याचं भ लं होतं.तो छप्पन भोग घेणारा ठाकुरजी फारच चांगला अगदी दही पोह्यापासून बासुंदी,खीर आणि गराडू चाटसुद्धा खातो.अगदी बॅटमॅनच्या शब्दात सांगायचं तर देव तुमचं भलं करो ही मनोमन इच्छा नास्तीकच व्यक्त करतात.आमच्या दिव्याखालीही उजेडच पडतो.

In reply to by कंजूस

एक नंबर प्रतिसाद ! आस्तिक नास्तिक तावतावाने भांडत आहेत आणि कंजूस मात्र बशीभर शिरा किंवा छप्पन भोग खाऊन पोटावर हात फिरवित मजा बघत आहेत असे दृश्य डोळ्यासमोर आले ! ;) :)

सर्व प्रतिसाददात्या सदस्यांना मन:पूर्वक धन्यवाद ! श्री.प्रभाकर पेठकर यांच्या विस्तृत प्रदिसादात त्यांनी उत्कृष्ट विश्लेषण केले आहे. ते म्हणतात
,"अंधश्रद्धा पुढे चालू राहते. ती तशी चालू राहण्यात सर्व देवालयांच्या विश्वस्तांचं 'हित' दडलेलं असतं."
हे अगदी खरे आहे. अशा हितसंबंधी लबाडांमुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक बिकट झाले आहे.श्री.पेठकर यांची लेखनशैली उत्तम आहे. त्यांनी प्रबोधनपर लेख लिहिल्यास वाचकांवर त्यांचा सुपरिणाम होईल. (कदाचित् ते लिहितही असतील. मला कल्पना नाही.)

In reply to by यनावाला

मिसळपाव वर १-२ लेख लिहीले आहेत. भक्तीमार्गातील अडथळे हा २०१४च्या गणेशलेखमालेतील लेख लेटेस्ट म्हणावा लागेल. इतरेजनांचे जाऊदे पण माझ्या स्वतःच्या पत्नीच्या परमश्रद्धाळू स्वभावाला मी बदलू शकलो नाही ह्याचे फार वैषम्य वाटते. पण तिच्या बरोबर मी देवळात जातो. गर्दी नसेल तर आतही जातो. पण नमस्काराला हात जुळत नाहीत. ती प्रसाद आणून कणभर मला देते. (मला मधुमेहामुळे गोड वर्ज्य आहे). मी खातो. तिथे एखादा देणगीचे पुस्तक घेऊन कोणी बसला असेल तर मी देणगीही देतो. हे सर्व मी तिला आवडतं म्हणून, तिचे मन राखण्यासाठी करतो. पण वेळोवेळी तर्किक वादही घालत असतो. असो. ह्या आस्तिकांचे विचार आपण बदलू शकत नाही. पण वरचेवर चर्चाकरून, उदाहरणे देऊन, एखाद्याच्या डोक्यात, त्याच्या मनाविरुद्ध का होईना, विचारांचे बीज रुजले तर त्याचा त्यालाच फायदा होईल ह्या विचाराने माझे विचार मांडत असतो. असो.

बाकी ते सत्यनारायनाच्या पुजेचं म्हणाल तर ते धर्मसुधारनेचं एक प्रभावी माध्यम आहे असं कुणीसं म्हटलं आहे. ;)

In reply to by सतिश गावडे

आहो..चूक चूक...आपल्याला नेमकं उलट ऐकू आलेलं आहे. त्यांनी ते धर्मसुधारनेचं एक प्रभावी माध्यम आहे.. असं म्हणलेलं नसून त्या(मूळच्या शोषक) माध्यमातून (त्याला बदलवून..) प्रभावी(पणे) धर्मसुधारणा करता येते.. असं म्हटलेलं आहे..

In reply to by अत्रुप्त आत्मा

म्हणजे परंपरागत पुरोहीत यजमानांचे "शोषण"करतात आणि "धर्मसुधारक"पुरोहीत ते करत नाहीत असे आहे का?

In reply to by सतिश गावडे

होय..होय.. "धर्मसुधारक"पुरोहीत ते करत नाहीत हे अगदी बरोब्बर . .. परंपरागत पुरोहीत काय करतात? ते त्यांचे त्यांनाच जाऊन विचारा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

होय..होय.. "धर्मसुधारक"पुरोहीत ते करत नाहीत हे अगदी बरोब्बर . ..
हे परंपरागत पुरोहितांकडून होणारे शोषण कोणत्या प्रकारचे असते यावर काही प्रकाश टाकू शकाल का?

In reply to by सतिश गावडे

इथे भरपूरवेळा सांगून झालेलं आहे..तिच तिच चर्चा वारंवार करण निरर्थक आहे..म्हणून मी इथे सांगणार नाही.

तुम्ही म्हणता ते शंभर टक्के सत्य आहे. पण जर सर्वच जण नास्तिक झाले तर समाजात जो अनाचार माजेल, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात की डॉ. लागू घेणार आहेत? धर्म ही अफूची गोळी हे खरंच आहे. पण समाज त्यामुळेच एका तरी शक्तीच्या धाकात राहून दरोडे घालत नाही हे काय कमी आहे? इथे साधं हात धुवून जेवावं, रस्त्यात थुंकू नये, शिंकताना समोर रुमाल धरावा वगैरे गोष्टी समाज पाळत नाही. त्याला सारासार विवेक करण्याएवढी अक्कल आहे असा तुमचा समज असेल तर तुमच्यासारखे हुशार तुम्हीच.