Skip to main content

माहिती हवी -- बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 10/12/2015 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार, काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे. ...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत. ...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत. ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे. ...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर मला त्याच्यासाठी इतर अपारंपारिक शैक्षणिक संधी शोधणे आवश्यक वाटत आहे. मिपाकरांना विनंती, कृपया बारावी(सायन्स) नंतर (अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. (मुलाचा बारावीला A ग्रुप आहे.) तसेच मागे एकदा यासारख्या विषयावर धागा निघाल्याचे आठवते. कुणाकडे त्याची लिंक असल्यास द्यावी.

वाचने 38147
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे.>>>>>>>> म्हणजे कोणती शहरे? मुंबई,पुणे सारख्या शहरातील कॉलेजेस मध्ये तरी जागा रिकाम्या आहेत अशी स्थिती मी फार कमी वेळा पहिली आहे. कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत.>>>>>>>>> दरवर्षी रिकाम्या राहतात नवीन काही नाही. बर्याच राजकारण्यांनी/ शिक्षण सम्राटांनी अशी कॉलेजेस काढलेली असतात ज्यांना कोणी विद्यार्थी मिळत नाही. यामुळे संपूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाची गरज कमी झाली आहे असे नाही. त्यामुळे उगाच एखाद्या बातमीचा बाऊ करू नका, मुलाला किती मार्क मिळतात ते आधी पहा. बाकी मिपावर भरपूर इन्जिनिअर्स आहेत, ते तुम्हाला भरपूर मदत करतील. शुभेच्छा! टीप : माझी माहिती/ अथवा अनुभव हा किमान ७-८ वर्ष जुना आहे, तरी परिस्थितीत फारसा फरक पडला असेल असे वाटत नाही. तरी चार लोकांशी बोलून updated राहा.

In reply to by सस्नेह

मुंबई पुणे नाहीत त्यात. सोलापूर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद इ. असावीत.
मुंबई पण आहे असे दिसते--- http://indianexpress.com/article/cities/mumbai/as-admissions-begin-vaca…

@ स्नेहांकीता - घाबरुन जाऊ नका. चांगल्या कॉलेज मधे जागा मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे आणि पेमेंट सीट साठी डोनेशन पण भरपुर आहे. ह्या सीटा ज्या रिकाम्या रहात आहेत ती कॉलेज खरे तर बंद करण्याच्याच लायकीची आहेत. तसेच चांगल्या, अभ्यासु, कष्टाळु इंजिनियरांना नोकर्‍या पण मिळत आहेत. खरा प्रश्न चांगले इंजिनियर मिळत नाहीत कंपन्यांना हा आहे.

In reply to by सस्नेह

आवड नसेल तर मुलाला इंजीनीअरिंगला ढकलणे त्याला आणि तुम्हाला....दोघांनाही मनस्ताप ठरू शकतो इंजीनीअरिंग पूर्ण करण्यासाठी...चिकाटी / कोडगेपणा / लॉजिकल डोके हव्वेच्च

In reply to by टवाळ कार्टा

इंजीनीअरिंग पूर्ण करण्यासाठी...चिकाटी / कोडगेपणा / लॉजिकल डोके हव्वेच्च
स्वानुभवाने सहमत !

In reply to by सस्नेह

स्वानुभवाने सहमत !
तरीही इलेक्ट्रोनिक्स, मेडिकल इलेक्ट्रोनिक्स या शाखांमध्ये रस आहे का हे पडताळून घ्या. मागची २०-२५ वर्षे जशी आयटीची होती तशी पुढची इंटरनेट ऑफ थिंग्ज ची आहेत असे सध्या मानले जाते.

In reply to by टवाळ कार्टा

इंजीनीअरिंग पूर्ण करण्यासाठी...चिकाटी / कोडगेपणा / लॉजिकल डोके हव्वेच्च
नक्की कुठल्या काळाविषयी हे लिहित आहात? आमच्या छत्रपतींच्या विद्यापीठात एखाद्या विषयातील सर्वात महत्वाची संकल्पना ऑप्शनला टाकूनही पेपर सुटत असे. मग कसले लॉजिकल डोके हवे? चिकाटी भरपूर लागे पण ती अभ्यास करायला नव्हे तर सिनिअरची जर्नल स्पेलिंग मिस्टेकसकट कॉपी करायला :(

In reply to by सस्नेह

मला विचाराल तर, जॉब मिळण्यासाठी मेकॅनिकल बेस्ट १. इंजिनीयरींग कंपनी मधे मिळु शकतात. २. सॉफ्ट्वेयर कंपन्या पण घेतात खूप मेकॅनिकल इंजिनियर. इंजिनीयरीं करताना कोडींग, लँग्वेज वगैरे शिकुन घ्यावे. पण आवड महत्वाची.

In reply to by सस्नेह

जॉब मिळण्याच्या दृष्टीने? आर यु सीरियस? असा प्रश्न आपण विचाराल असं वाटलं नव्हतं ओ कधी. जॉब मिळणं वगैरे कुठल्याही भारी शिक्षणानं शक्य झालं तरी तो टिकवणं किंवा त्यात आनंदानं आयुष्य व्यतीत करणं हे कधी शक्य व्हावं हे आपल्याला ठाऊक असेल. वेगवेगळी अनेक उत्तरं मिळतीलच.

In reply to by सस्नेह

जॉब मिळण्याच्या दृष्टीने कोणती अभियांत्रिकी शाखा घेतलेली चांगली हे सांगू शकाल का
याच विचाराच्या दुष्टचक्रातून भारतीय विद्यार्थी आणि पालक बाहेर येतील तो दिवस भारताच्या इतिहासात प्लॅटिनमच्या अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा होईल :)

पीसीएम ला साठ टक्क्यांवर पडल्यास आयएमयू-सीईटी देऊन मरिन इंजिनिअरिंग एक चांगला पर्याय आहे. शिवाय शिपबिल्डिंग अँड रिपेअर मध्ये पाण्यात न पाठवता देखील जॉब मिळू शकतो.

In reply to by विनटूविन

शिपिंग चे सध्या खुप वाइट दिवस चालले आहेत. मरिन इंजिनियर बणण्यासाठी कमीतकमी १८-२० लाख मोजावे लागताहेत सध्या. आणि परत कम्पिटंसी एक्झाम साठी १-१.५ लाख. फ्लडिंग जास्त असल्याने परत वेटिंग शिपवर चढण्यासाठी, स्पोंसरशिप असणार्या कोलेज मधील विद्यार्थ्यांचे हे हाल आहेत, स्पोंसर न करणार्या कोलेज चे विचारुच नका. बाकी आपली मर्जी. मी लॅटेस्ट माहिती दिलीय. पुढे जाउन फ्लडिंग कमी झाले तर फरक पडू शकतो.

अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. मुलाला अभियांत्रिकी सोडून दुसरे काही करायची तयारी आहे का ते पहा . तसे असेल तर ठीक अन्यथा मुलांच्या डोक्यावर बसून काहीतरी करायला लावायचे आणि त्यात मूल आनंदी होणार नसेल तर सगळे मुसळ केरात. (मुलाला अभियांत्रिकी"च" करायची असेल तर प्रश्न मिटला) आमच्या मामेभावाच्या मुलीने ४ वर्षे अभियांत्रिकी केली आणि बँक ऑफ बरोडा मध्ये नोकरी करते. इंजिनियर का झालीस तर आई वडिलानी घातले म्हणून. मला मुळीच आवड नव्हती आणि नाही. मग आयुष्याची ४ सोनेरी वर्षे फुकट घालवून काय मिळवले? या प्रश्नाचे ना आमच्या भावाकडे उत्तर आहे ना पुतणीकडे.

In reply to by सुबोध खरे

अभियांत्रिकी करायची इच्छा आहे, अट्टाहास नाही. इतर काही रेअर कोर्सेसही करायची तयारी आहे. म्युझिकमधे त्याला गती आहे. पण मुलगा फारसा मेहनती चिकाटीवाला वगैरे नाही. जाता जाता अभ्यास करून ७०-७५ टक्केवाला आहे.

In reply to by सुबोध खरे

आमच्या मामेभावाच्या मुलीने ४ वर्षे अभियांत्रिकी केली आणि बँक ऑफ बरोडा मध्ये नोकरी करते. इंजिनियर का झालीस तर आई वडिलानी घातले म्हणून. मला मुळीच आवड नव्हती आणि नाही. मग आयुष्याची ४ सोनेरी वर्षे फुकट घालवून काय मिळवले? या प्रश्नाचे ना आमच्या भावाकडे उत्तर आहे ना पुतणीकडे.
डॉक्टर साहेब - माझा ह्या कडे बघायचा हा दृष्टीकोन. १. इंजिनीरींग करुन पण बँकेत नोकरी मिळाली आणि करता आली. त्या ऐवजी कॉमर्स करुन इंजिनीयरींग मधे नोकरी मिळाली असती का? आवड असो वा नसो, जर नोकरीच करायची आहे, तर ज्या शिक्षणामुळे जास्तीत जास्त दरवाजे उघडतात ते घ्यावे. इंजिनीयरींग केले तर बँकां मधे, इंजिनीयरींग मधे, सेल्स मार्केटींग मधे आणि शिकवायला / क्लास काढायला संधी मिळते . खरा उत्साही कोणी असेल तर सी.ए सुद्धा करता येते. थोडक्यात इंजिनीयरींग केले तर सर्व दारे उघडी रहातात. तसेही बारावीत कीती कळत असते आपली आवड? २.म्तुमच्या भाचीला आता वाटतय की इंजीनीयरींग उगाच केले, पण ५-१० वर्षानी जाणवेल की त्याचा अप्रत्यक्ष पणे बँकेच्या नोकरीत फायदा झाला.

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद साहेब ज्या मुलीला शास्त्र या विषयातच रस नाही तिला ५-१० च काय आयुष्यभरही असेच वाटेल कि उगाच इंजिनियरिंग केले. जाता जाता -- ज्याला जीवशास्त्रात रस नाही ( असे भरपूर इंजिनियर सापडतील) त्यांना डोक्यावर बसून जर डॉक्टर व्हायला भाग पडले तर? त्याला पुढे असे वाटेल का कि एम बी बी एस च्या ज्ञानाचा फायदा झाला म्हणून? ठाण्याला राहणाऱ्या माझ्या एका वर्गमित्राने आईबापांच्या दबावाखाली इंजिनियरिंग सोडून एम बी बी एस केले पण एम बी बी एस नंतर भूल्शास्त्राच्या पहिल्या वर्षात स्वतःला बेशुद्ध करणारे औषध शिरेतून घेऊन आत्महत्या केली. हि अत्यंत हृदयद्रावक कहाणी परत केंव्हा तरी.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब - तुम्हाला माझ्या बाकीच्या प्रतिसादावरुन ( ह्या धाग्यावरच्या नाही, एकुणातच ) माझे मत लक्षात आलेच असेलच की डॉक्टरकी अजिबात सोप्पी नाही आणि त्याच्या नादी लुंग्या सुंग्यांनी लागुच नये. त्याला आवड पण पाहीजे , हुशारी तर पाहीजेच पाहीजे आणि अजुन पण काही. माझी तुलना शास्त्र, इंजिनियरींग, कॉमर्स वगैरे ह्यांच्यातच. डॉक्टरकी ला नुस्ती हुशारी आणि जीवशास्त्राची आवड नाही पुरेशी. माझ्या सारखी माणसे जी दुसर्‍यांच्या शरीराला ( त्यासुद्धा रोगजर्जर ) हात पण नाही लाऊ शकणार ती दुसर्‍यांच्या जखमा वगैरेंना काय बरे करणार? त्यात डॉक्टर चा पेशा म्हणजे कायम रडकथा ऐकायच्या. कोणी आजारी, कोणी मरतय. कोणाकडे पैसे नाहीत तरी उपचार केले पाहीजेत. कठीण आहे.

In reply to by सुबोध खरे

हे अभियांत्रिकी वाले बँकेत काय पोस्ट वर नोकरी करतात? आय मीन तीथे त्यांच्या शीक्षणाचा कसा उपयोग होतो? मागे एक जण ओळखीत हॉटेल मॅनेजमेंट करुन बँकेत जॉब करत होता.

In reply to by दिपक.कुवेत

हे अभियांत्रिकी वाले बँकेत काय पोस्ट वर नोकरी करतात? आय मीन तीथे त्यांच्या शीक्षणाचा कसा उपयोग होतो?
खूप उपयोग होतो दिपक. अभियांत्रिकी चे शिक्षण माणसाला कुठल्याही नोकरी साठी तयार करते. १. अभियांत्रिकी वाल्यांना ७-८ तास कॉलेज असते, कॉमर्स वाल्यांना ३-४ तास कॉलेज. अभियांत्रिकी वाल्यांना नोकरीच्या ८ तासांची सवय लागते. २. अभियांत्रिकी सबमिशन च्या नावाखाली शेकडो पानांचे रट्टे मारणे, मागच्या वर्षीच्या जर्नल ची कॉपी करणे. हे तर नोकरीत फारच उपयोगी येते. ३. सबमिशन ग्रुप मधे वाटुन घेणे, कोणा कडुन सब्मिशन साठी काय मदत होऊ शकेल ह्याचे भान ठेवून त्याच्यशी मैत्री ठेवणे. ४. मॅथ्स वगैरे ची किचकट गणीते , त्यांचे अ‍ॅप्लिकेशन नक्की काय आहे आणि ते कसे होते हे माहीती नसताना सोडवणे. ५. वायवा आणि सबमिशन च्या मार्कांसाठी प्रोफेसरांच्या गुडबुक मधे कसे रहावे. हे कळते. ह्याची तर नोकरीत फार गरज असते. हे कॉमर्स मधे अभावानीच शिकायला मिळते त्यामुळे अभियांत्रिकी पास झालेला माणुस कुठल्याही नोकरी साठी सर्वात जास्त पात्र असतो,

तुमच्या पोस्टचा पूर्वार्ध जी स्थिती दाखवतो ती अपरिहार्य होती आणि दिसते त्याहूनही भयंकर आहे . यंदा साठ हजार जागा मोकळ्या राहिल्या. यावर मी इथे नुकतेच लिहीले होते. तेव्हा यावर चर्चाही झाली होती. आता तुमच्या मुलासंबंधी: मोठी काळजी करण्याची गरज नाही . अभियांत्रिकीला जाणे जोखमीचे नाही . तो/ ती अभियांत्रिकी कुठल्या कॉलेजात करतो त्यावर अवलंबून आहे . परिश्रमाची तयारी असेल तर अभियांत्रिकीत आजही चांगले करियर करता येते. बहुश्रुत आणि कष्टाळू मुलामुलींना जॉब मिळतोच. आधी छोटा मग हळूहळू मोठा. मग बेकारीचा विचारही येऊ देऊ नये. त्याला आवड असेल त्याच शाखेत करू द्या. परंपरागत डिझाईन क्षेत्रात मर्यादित संधी असल्या तरी अन्य अभियांत्रिकी सेवा क्षेत्रात प्रत्येक शाखेला भरपूर संधी आहेत. आणि वाढताहेत. काही क्षेत्रे दुर्लक्षित आहेत जसे एनर्जी संबंधी काहीही किंवा मेडिया कम्युनिकेशन मध्ये तंत्रज्ञ किंवा सिव्हिल मध्ये व्ह्यल्युअर वगैरे …. तसेच काही वर्षे अनुभव घेऊन स्वतःचा व्यवसाय करणे चांगले. स्वत:चे काही प्रॉडक्ट करणे चांगले. किंवा मग इतर व्यवसाय- जसे अभियांत्रिकी क्षेत्रात विक्री आणि पश्चात सेवा देणे. सध्या तुमच्या आसपास असे व्यावसायिक तुम्ही पहातच असाल. अभियांत्रिकी करायचे नसेल तर यूपीएस्सी वगैरे करून सरकारी नोकरीत जाता येते, किंवा एमेस्सी करून दहा एक वर्षांत जंगी क्लासेस होऊ शकतात! माझ्या एका वर्गमित्राच्या मुलाने ठरवून आयसर ला प्रवेश घेतला. (त्याला आय आय टी मिळत असून ) बाकी अन्य प्रतिसादांच्या प्रतीक्षेत !

In reply to by खेडूत

अत्यंत उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद खेडूत भाऊ. हो, मागे तुमचाच धागा वाचला होता. लिंकसाठी आभार्स ! माझेही स्वतंत्र व्यवसायाला प्राधान्य आहे. सिव्हिलशिवाय इतर कोणत्या अभियांत्रिकी शाखा व्यवसायासाठी उपयुक्त आहेत ?

In reply to by सस्नेह

सिव्हिल ला मुख्य कार्यालयात असलात तर एक जागा अन्यथा विंचवाचं बिरहाड पाठीवर. बाकी सिव्हिल ही सगळ्यात अनसिव्हिलाइज्ड ब्रांच. दस्तूरखुद्द उदाहरण आहेतच. (कोण रे तो लगेच मान डोलावतोय?)

मुलाची आवड खूप महत्वाची. अमूक एका क्षेत्रात जॉब चटकन मिळतो म्हणून ते क्षेत्र निवडणे (म्हणजे खरे तर त्याला ते निवडायला लावणे ) योग्य नाही. जर तो त्या क्षेत्रात स्वत:च्या पुर्ण कुवतीनुसार मेहनत करु शकला नाही तर फार काही यश मिळणार नाहि. त्याउलट जर क्षेत्र त्याच्या आवडीचे असेल तर त्याची कल्पनाशक्ती बहरेल, तो अधिक मेहनत घेईल आणि खूप मोठा होईल पूढे जावून मी असे म्हणतो की तो फक्त जॉब करेल असा विचार का करता ? कदाचित तो स्वतःचा व्यवसाय करु शकतो आणि खूप पुढे जावू शकतो. फक्त त्याला तुम्ही पाठिंबा द्या, वेळ द्या. एक प्रयोग अजून बारावीचे वर्ष चालू आहे, फेब्रुवारी मध्ये संपेल ना ? त्यानंतर त्याच्याकडे वेळ असेल (JEE चा अभ्यास वगळता) या काळात त्याला दहा-वीस हजार (किंवा तुम्हाला योग्य वाटेल तितके) रुपये द्या आणि सांगा "एक-दोन महिने हवा तो व्यवसाय कर, कमावशील ते पैसे तुझे, गमावलेस तरी आम्हाला हरकत नाही. आम्ही गरज पडल्यास जमेल ते मार्गदर्शन करु बाकी मेहनत तूच करायचीस" याने त्याला पुस्तकाबाहेरचे जग कळेल, माणसे कळतील. तुम्ही फक्त तो काही गंभीर चूक (म्हणजे ज्याने त्याचे कोणतेही वैयक्तिक नुकसान होईल अशी ) करणार नाही याकडे फक्त लक्ष द्या.

In reply to by दमामि

काही तज्ञांचे असे म्हणणे आहे की आपले यश हे ८५% सॉफ्ट स्किल्सवर (संवादकौशल्य, नेतृत्वगुण , धडाडी , जोखीम पेलण्याचे कसब ई ) तर १५% हे विषयघन ज्ञानावर अवलंबून असते. यातील टक्केवारीचा आकडा जरी बाजूला ठेवला तरी तेव्हा सॉफ्ट स्किल्सचे महत्व समजून घेणे महत्वाचे आहे. झालेच तर उत्तम आकलनक्षमता असलेली व्यक्ती विविध कौशल्य वा ज्ञान गरजेप्रमाणे सहज आत्मसात करतो. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय करताना "मला इंजिनियरींगमध्ये अकाउंटिग नव्हते त्यामुळे मला नफा तोटा, बॅलन्स शीट कळत नाही" असे ईंजिनियर म्हणत नाहीत आणि कॉमर्स ग्रज्यएट असून इंजिनिअरिंग वर्कशॉप यशस्वीपणे चालवणारे सापडतीलच. तात्पर्य : औपचारिक शिक्षण ही केवळ सुरुवात आहे पुढील प्रवास फक्त त्याआधारेच पार पडेल असे नाही.

१२ वी सायन्स नंतर जर इंजिनियरिंगला जायचं नसेल आणि रस असेल तर मास मिडिया हे चांगलं क्षेत्र आहे. १२वी नंतर ३ वर्षे. शेवटच्या वर्षी Advertising आणि Journalism अशी दोन Specializations आहेत. पुढे MBA in Marketing किंवा या विषयांमधलं पदव्युत्तर शिक्षणही घेता येऊ शकतं. चांगली Colleges - केसी, जयहिंद, सेंट झेवियर्स, रुईया, नॅशनल, सोमैया. १२ वी पहिल्या प्रयत्नात आणि ४५% गुण ही किमान पात्रता आहे. या काॅलेजेसपैकी फक्त झेवियर्सला प्रवेशपरीक्षा आहे. बाकी सगळीकडे निव्वळ १२वी.

In reply to by बोका-ए-आझम

छानच ! मी तुमचा श्रीगणेश लेखमालेतील लेख वाचला आहे. हे क्षेत्र रेअर आहेच. यासाठी स्पेशल स्किल्सची गरज आहे का ? आणि महत्वाचे म्हणजे व्यवसायसंधी कोणत्या ठिकाणी मिळेल ?

In reply to by सस्नेह

कारण talent आणि यश यांचा संबंध असतोच असं नाही. तसं तो Engineering करूनही या क्षेत्रात जाऊ शकतो. १२ वी सायन्स ही Cinematography आणि Sound Recording साठी प्राथमिक अट आहे.

In reply to by सस्नेह

या क्षेत्राचा एक विशेष म्हणजे तुम्ही आधी काहीही केलेलं असेल तरी त्यात जाऊ शकता. तांत्रिक कौशल्याची गरज असतेच. मिपाकर प्रदीप तुम्हाला त्याबद्दल चांगली माहिती देऊ शकतील. Films, Advertising, Content Development, Public Relations, Digital Marketin,, Social Media Consulting ही क्षेत्रं सध्या जोरात आहेत आणि हळूहळू तिथे असलेला प्रशिक्षित मनुष्यबळाविरुद्धचा नकारात्मक विचारही कमी होऊ लागलेला आहे. तुमच्या मुलाला संगीताची आवड असेल तर Engineering नंतर तो Sound Recording, Editing या क्षेत्रांत जाऊ शकतो.

In reply to by बोका-ए-आझम

DAM - डिजिट्ल असेट मॅनेज्मेंट, येत्या काळात video कॉंटेंट प्रचंड प्रमाणात वाढणार आहे, तेव्हा हे कॉंटेंट प्रोसेसिंग आणि आर्काइविंग करण फार आवश्यक आहे. या क्षेत्रात पुढे फार संधी येतील. मी सध्या शिकतोय. भारतात आहेत की नाही काही कल्पना नाही. आंतरजळवर आहेत काही चेक करा.

In reply to by बोका-ए-आझम

बोकाजी - हे क्षेत्र चांगलेच आहे. पण अश्या क्षेत्रात जाण्या साठी त्या क्षेत्राची आवड पाहिजे तरच यशस्वी होता येइल. इंजीनीयरींग चे तसे नसते. आवड नसली तरी नोकरी मिळते आणि नुस्ती मिळत नाही तर ती व्यवस्थित करता येत. Advertising आणि Journalism मधे जर आवड नसली तर झेपेल का?

In reply to by प्रसाद१९७१

Advertising आणि Journalism मधे जर आवड नसली तर झेपेल का?
अशा क्षेत्रांमध्ये काम करायचे तर आवड तर हवीच आणि तेवढाच महत्वाचा म्हणजे त्या क्षेत्रातला कल हवा. Advertising ही एक कलाच झाली. कलेची आवड कितीही असली पण त्या क्षेत्रातला कल नसेल तर कसे काय झेपणार?

In reply to by गॅरी ट्रुमन

पण जाहिरातक्षेत्रातही काही specializations आहेत आणि त्यातल्या काही क्षेत्रात कलेपेक्षा शास्त्रीय आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन (जो engineering मुळे विकसित होऊ शकतो) महत्वाचा आहे. उदाहरणार्थ Media Planning - या क्षेत्रात Statistics, Mathematics या विषयांमधल्या तज्ञ लोकांना संधी आहे. सध्या नव्याने उदयाला येत असलेल्या Analytics आणि Big Data या क्षेत्रातल्या कंपन्या तर इंजिनियर्सना, विशेषतः काँप्युटर इंजिनियर्सना उचलताहेत. म्यू सिग्मा, फ्रॅक्टल या कंपन्या तर आता निदान मुंबईतल्या इंजिनियरिंग विद्यार्थ्यांना टीसीएस आणि इन्फोसिसच्या खालोखाल कँपसमध्ये उचलताहेत. MICA ने या वर्षी त्यांच्या Market Research या specialization मध्ये Analytics हा विषय समाविष्ट केलाय.

१२ वी सायन्स नंतर जर इंजिनियरिंगला जायचं नसेल आणि रस असेल तर मास मिडिया हे चांगलं क्षेत्र आहे. १२वी नंतर ३ वर्षे. शेवटच्या वर्षी Advertising आणि Journalism अशी दोन Specializations आहेत. पुढे MBA in Marketing किंवा या विषयांमधलं पदव्युत्तर शिक्षणही घेता येऊ शकतं. चांगली Colleges - केसी, जयहिंद, सेंट झेवियर्स, रुईया, नॅशनल, सोमैया. १२ वी पहिल्या प्रयत्नात आणि ४५% गुण ही किमान पात्रता आहे. या काॅलेजेसपैकी फक्त झेवियर्सला प्रवेशपरीक्षा आहे. बाकी सगळीकडे निव्वळ १२वी.

मुलाला अभियांत्रिकीची आवड असेल आणि पुढे जाऊन नोकरीच करायची असेल तर बारावी विज्ञान नंतर अभियांत्रि़कीची पदवी हाच उत्तम पर्याय आहे. शिवाय अभियांत्रिकी शिक्षणानंतर व्यवसाय सुरु करण्याचा तसेच पदव्युत्तर शिक्षणाचाही पर्याय असतोच. अभियांत्रिकीच्या रिकाम्या राहणार्‍या जागांचा मुळीच विचार करू नका. या त्याच जागा आहेत ज्या मुळात मंजूरच व्हायला नको होत्या. चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एकेका गुणाची स्पर्धा असते.

In reply to by सतिश गावडे

त्याला फिजिक्सची आवड आहे. नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य. अभियांत्रिकीनंतर व्यवसाय करणाऱ्या एखाद्या यशस्वी उद्योजकाकडे अनुभवासाठी काम करावे असे माझे मत आहे. तशी माहिती असल्यास कृपया व्यनी करावा. :)

In reply to by सस्नेह

तो अभियांत्रिकीला प्रवेश घेईल कि नाही हे अजून निश्चित नसताना आपण त्यापुढे काय हा विचार आत्ता पासूनच करत आहात! एक पालक म्हणून मुलाच भविष्य सुरक्षित वगैरे ठेवण्याचा विचार करणे ठीक आहे पण त्याच्या आयुष्याचा सगळा रोड map आपणच ठरविण्यात काय अर्थ आहे! बारावी म्हणजे फार कळण्यासारख वय नसत (असे मला तरी वाटत) त्यामुळे मी पुढे नोकरी करेन, व्यवसाय करेन हे आत्ता त्याने/तुम्ही ठरवले तरी पुढे ४ वर्षांनी त्याचे व्यक्तिमत्व विकसित होताना कदाचित तो संशोशानाकडे देखील आकर्षित होऊ शकतो किंवा कदाचित एखाद्या नवीन क्षेत्रातली अजून एक पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करू शकतो! त्यामुळे सध्या थोडी अनिश्चितता असू देत त्याच्या आयुष्यात म्हणजे सगळे दरवाजे त्याला खुले राहतील. हळूहळू त्याला स्वतःलाच जाणवेल कि काय करू शकतो ते...

In reply to by शब्दबम्बाळ

बारावी म्हणजे फार समजण्याइतके वय नसते >>>> सहमत ! जर अभियांत्रिकी केली तर चा विचार मी नकळत करत होते. फार पुढचा खरोखर ! लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद :)

१२ वी नंतर परदेशात उच्चशिक्षणासाठी पाठवण्याचा विचार केला आहे का? भारतात ४ वर्ष अभियांत्रिकी करुन प्रत्यक्षात कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज/ हॅन्ड्स ऑन एक्पिरिअन्स फार कमी मिळतो. पण परदेशात बॅचलर्स केले तर जास्त अ‍ॅप्लिकेशन ओरिएंटेड शिक्षण मिळु शकेल असे वाटते. ज्याचा पुढे नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय करण्यात फायदा होईल. किंवा भारतातच बॅचलर्स करतानाच पुढे उच्च शिक्षणाच्या संधी काय आहेत आणि त्याला कशात जास्त गोडी वाटतिये ते बघुन पुढचे निर्णय घेता येतील. श्यक्यतो त्याचा त्यालाच निर्णय घेऊ द्या. त्यालाच वेगवेगळ्या लोकांशी बोलायला सांगा आणि मग त्याने जी काही शोधा शोध केली असेल त्यावर त्याच्याशी चर्चा करा. सगळ्या पर्यायांचा विचार करुन एक प्यु मेट्रिक्स पण करता येईल. ज्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल.

In reply to by इडली डोसा

परदेशात बॅचलर्स करण्यासाठी आवश्यक त्या परिक्षांची तयारी व तितका टॅलंट माझ्या मुलामधे नाही. अर्थात पोस्टच्या वेळी कदाचित परिस्थिती वेगळी असेल. वेगवेगळ्या लोकांशी बोलण्याची कल्पना चांगली आहे. तथापि तितकी मॅच्युरिटी या वयात असणे आणि अशा व्यक्तींनी सहकार्य करणे, हे जरा अवघड आहे. तरीही प्रयत्न करेन. धन्यवाद.

In reply to by पिवळा डांबिस

परदेशात, अ‍ॅक्रिडेटेड युनिव्हर्सिटीमध्ये, बॅचलर्स करायचा खर्च जास्त आहे. पण स्कॉलरशिप्स आणि फायनान्शियल एड प्रोग्रॅम पण उपलब्ध आहेत. एज्युकेशन लोनचा ऑप्शनही आहेच. शिवाय जॉब मिळाल्यावर खर्चावर योग्य नियंत्रण ठेवल्यास एज्युकेशन लोन लवकर फेडण्यास मदत होऊ शकते. तुम्ही पण परदेशात असता ना? याबाबत तुमचे विचार/ निरीक्षण काय आहेत?

स्नेहांकिताजी, थोडे स्वानुभवावर आधारित शब्द: १. आवड नसेल तर अभियांत्रिकाला मुळीच पाठवू नका. नोकरीच्या संधी असल्या तरी स्ट्रगल खूप आहे. आयटीमध्ये १०-११ वर्षांच्या अनुभवानंतर भय वाटावं अशी परिस्थिती आहे. अगदीच कुशाग्र बुद्धिमत्ता, सतत शिकत राहण्याची हौस, परिश्रम घेण्याची तयारी, सतत न थकता धावत राहण्याची ऊर्जा असेल तरच अभियांत्रिकीचा मार्ग त्याला निवडू द्या असे कळकळीने सांगतो. अभियांत्रिकीमध्ये कुठल्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात रस असेल तर मग अजिबात चिंता करू नका. त्याची चिकाटी आणि आवड त्याला जबरदस्त उंचीवर नेतील यात शंका बाळगू नका. २. अभियंत्यांची संख्या अमाप झाल्याने स्पर्धा प्रचंड आहे. हुशार असूनदेखील संधी मिळतीलच याची शाश्वती नाही. आयटीमधून एका ठराविक कालावधीनंतर बाहेर पडणे दुरापास्त होते. नोकरीमध्ये कंटाळा येण्याचे प्रमाण अभियांत्रिकीमध्ये जास्त आहे असे माझे मत आहे. ३. कुठल्या क्षेत्रात रस आहे हे तपासून बघा. सध्या खूप नवनवीन क्षेत्रे उपलब्ध आहेत. वर सांगितल्याप्रमाणे मास मेडिया, फिल्म, ध्वनी अभियांत्रिकी ही चांगली क्षेत्रे आहेत. पत्रकारिता एक चांगले करीअर होऊ शकते. सी ए हा देखील उत्तम पर्याय होऊ शकतो. अर्थात त्यासाठी आकड्यांशी मैत्री हवी. एकदा वयाच्या २२-२३ व्या वर्षी सी ए झाल्यानंतर अमाप म्हणजे अमाप संधी आहेत. नोकरीच्या आणि व्यवसायाच्यादेखील. तुम्ही नोटा मोजता मोजता थकून जाल आणि शेवटी त्या मोजायला तुम्हाला मला बोलवायला लागेल. माझ्या समोर किमान तीन उदाहरणे अशी आहेत म्हणून खात्रीपूर्वक सांगू शकतो. :-) ४. त्याचा कल एकदा तपासून बघा. तो कसा आहे? नोकरीची ऊब त्याला हवीहवीशी वाटेल की खडतर प्रवास त्याच्या व्यक्तिमत्त्वाची एक ओळख आहे? ९ ते ५ काम करून बाकी वेळ छंद जोपासणे, मित्रांसोबत, कुटुंबासोबत वेळ घालवणे त्याला आवडते की हिमतीने नवनवीन गोष्टी तो करण्याचा ध्यास बाळगतो हे बघणे महत्वाचे आहे. म्हणजे एक ध्येय ठरवून त्यामागे धावणारा आणि ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते सायास करणारा जर त्याचा स्वभाव असेल तर मग आवडीचे शिक्षण घेऊन तो यशस्वी होणारच यात शंकाच नको. पण जर त्याचा स्वभाव तसा नसेल (म्हणजे थोडक्यात माझ्यासारखा असेल), तर मग चांगला जॉब मिळवण्याच्या दृष्टीने सेफ शिक्षण घेणे केव्हाही श्रेयस्कर! ५. प्राध्यापक होणे हा पण चांगला पर्याय आहे. भरपूर पगार आणि निवांत वेळ. मग राहिलेल्या वेळात संशोधन करा, छंद व्यावसायिक स्तरावर जोपासा, लिखाण करा, किंवा मस्त जगभर भ्रमंती करा. नेट-सेटचे जाळे भेदावे लागेल हे मात्र खरे. ६. अजून काही क्षेत्रे - अक्चुअरे (इन्शुरन्स पोलीसीज डिझाईन करणे), युजर एक्स्पेरिअन्स (अमाप संधी), प्रोडक्ट डिझाईन, हॉस्पिटल एड्मिनिस्ट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, गेमिंग, फिल्म एडिटिंग, टीव्ही एडिटिंग, होटेल मेनेजमेंट... तुमच्या मुलास अनेकोत्तम शुभेच्छा! आम्हा सर्वांना खात्री आहे त्याचे भविष्य उज्वल असेल! :-)

In reply to by समीरसूर

अतिशय प्रॅक्टिकल प्रतिसादासाठी धन्यवाद, समीरसूरजी. १. प्रथम तर मुलाला फिजिक्स व स्पेस रिसर्चमधे इंटरेस्ट आहे. त्याविषयी एखादी अभियांत्रिकी शाखा माझ्या माहितीत तरी नाही. तुम्ही सांगू शकाल का ? २. स्पर्धा प्रचंड आहे हे दिसते आहेच. मुलगा स्पर्धेबाबत जरा वीकच आहे. ३. आयटीमधे फारसा रस नाही. ४. कल व प्रकृती पाहता आवडीच्या क्षेत्रात नोकरी मिळाली तर रमेल असे वाटते. ५. प्राध्यापक व्हायला नाही म्हणतो. (कदाचित सध्याच्या त्याच्या प्राध्यापकांना पाहून =) ) ६. अक्चुअरे (इन्शुरन्स पोलीसीज डिझाईन करणे), युजर एक्स्पेरिअन्स (अमाप संधी), प्रोडक्ट डिझाईन, हॉस्पिटल एड्मिनिस्ट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, गेमिंग, फिल्म एडिटिंग, टीव्ही एडिटिंग, होटेल मेनेजमेंट...ही क्षेत्रे नवीन आहेत. यांचे शिक्षण कुठे उपलब्ध आहे ?

In reply to by सस्नेह

गणित चांगलं हवं. इंजिनियरिंग करूनही जाता येतं. In fact, तसं गेलं तर बरंच. Actuarial Society of India ही actuaries च्या परीक्षा घेणारी संस्था आहे. ही आणि हीच संस्था actuaries ना सनद देते. NMIMS मध्ये पूर्वी MBA in Actuarial Science नावाचा एक कोर्स होता आणि लोकांचा तो Actuaries ना समकक्ष आहे असा गैरसमज होता. FILM AND VIDEO EDITING साठी FTII आहे पण कुणाला सुचवायची भीती वाटते. तिथल्या कोर्सेसना इंडस्ट्रीत मान्यता असूनही.त्यापेक्षा दुसरा मार्ग म्हणजे एखाद्या संकलकाच्या हाताखाली सहाय्यक म्हणून काम करणे आणि मग अनुभव आल्यावर मग स्वतंत्र काम करणे. शिकायलाही मिळतं आणि जनसंपर्क जो मिडियात अत्यंत आवश्यक आहे, तोही वाढतो.

In reply to by सस्नेह

हे प्रामुख्याने विमाक्षेत्रात काम करतात. Life आणि Non-life असे दोन specializations आहेत. विमाक्षेत्राचे नियंत्रक IRDA च्या नियमांनुसार कोणतीही policy आणि तिचा premium हे actuary ने ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं मुख्य काम म्हणजे विमा कंपनीसाठी risk assessment करणे आणि त्याप्रमाणे आणि सरकारी नियमांमध्ये बसतील अशा गुंतवणुकीच्या संधी शोधणे. उदाहरणार्थ Life मध्ये आजारपण, व्यावसायिक धोके, वजन/उंचीनुसार होऊ शकणारे आजार आणि त्यांच्यावरून आयुष्याला असू शकणारा धोका - अशा अनेक गोष्टींचा विचार होतो. कोणतीही विमा कंपनी जेव्हा एखाद्याचा विमा उतरवते तेव्हा ती जोखीम पत्करत असते. त्या जोखमीचं आर्थिक मूल्य ठरवणं हे actuaries चं मुख्य काम असतं. इथे बघा - http://googleweblight.com/?lite_url=http://www.actuariesindia.org/&ei=v…

In reply to by सस्नेह

एक्चुअरिजची छान माहिती बोका यांच्या प्रतिसादात मिळाली आहेच. ही सनद मिळवणे तसे बर्यापैकी कठीण असते. युजर एक्स्पेरिअन्स - खूप संस्था युजर एक्स्पेरिअन्सचे अभ्यासक्रम घेतात. सिम्बायोसिस, एमआयटी, वगैरे आहेत पुण्यात. अहमदाबादची नेशनल इन्स्टिट्युट ऑफ डिजाईन जबरदस्त आहे. तिथल्या मुलांना ७ ते ४० लाखांपर्यंतची पेकेजेस मिळतात. प्रोडक्ट डिजाईन चे कोर्सेस नेशनल इन्स्टिट्युट ऑफ डिजाईन मध्ये आहेत. तेथे विविध प्रकारचे कोर्सेस आहेत (डिजाईनचे). हॉस्पिटल मेनेजमंट चे कोर्सेस मला वाटतं सिंबायोसिस मध्ये आहेत. बड्या हॉस्पिटल्समध्ये कुशल आणि स्मार्ट लोकांची संपूर्ण डोलारा सांभाळण्यासाठी गरज असतेच. गेमिंग साठी मला डीएसकेंचं इन्स्टिट्युट माहिती आहे. जालावर अधिक माहिती मिळेल. डिजिटल मार्केटिंग चे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. यात कौशल्य, निरीक्षण अधिक महत्वाचे. मुद्रा इन्स्टिट्युट (अहमदाबाद) मध्ये हे कोर्सेस उपलब्ध आहे. मुद्रा हे जबरदस्त इन्स्टिट्युट आहे. प्रवेश सोपा नाही. येथेच आणखी बरेच कोर्सेस आहेत, ते देखील बघता येतील. फिल्म एडिटिंग साठी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्युट आहे. एफटी आय आय आहे. इथे प्रवेश सोपा नाही. पण एफटी चा दरारा जबरदस्त आहे. टीव्ही चे कोर्सेस देखील तेथे उपलब्ध आहेत.

In reply to by समीरसूर

अगदी उपयुक्त आणि स्पेसिफिक माहितीसाठी धन्यवाद. वरील संस्थांच्या साईट्स शोधते.

In reply to by समीरसूर

चा दरारा आहेच हो पण ड्रग्ज हा तिथला फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कोणाला सांगायला धास्ती वाटते. Product Design साठी NID, Ahmedabad ही एकदम मस्त संस्था आहे.

In reply to by सस्नेह

अ‍ॅक्चुअरी- माझी एक मैत्रीण आणि एक मावसभाऊ या दोघांनी या परीक्षा दिलेल्या आहेत. दोघांनीही स्टॅटिस्टिक्स मधे शिक्षण घेतलेलं आहे. दोघंही आता उत्तम जॉब्स करत आहेत. पण मला माहिती काहीच नाही याबद्दल.

आणि उत्तम प्रतिसाद, विशेषतः समीरसूर, टका, बोका, इडली डोसा, सगा, मराठी कथालेखक....इत्यादी....

धागा आणि स्नेहांकितातै चे अभिनंदन एक चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल.. धाग प्रतीसाद पाहून मला "काखेत कळसा आणि गावाला वळसा" याचा प्रत्यय आला. अनुभवसिद्ध मिपाकर असताना लेकाच्या शिक्षणाचे बाबत इकडे तिकडे न धावता इथे आणि इथेच (निवड कल आणि त्यानुसार संधी) मदत होइल हे पाहून धीर वाटला.. नववीतल्या किशोराचा पालक नाखु

-- स्पर्धा प्रचंड आहे हे दिसते आहेच. मुलगा स्पर्धेबाबत जरा वीकच आहे.---------- --परदेशात बॅचलर्स करण्यासाठी आवश्यक त्या परिक्षांची तयारी व तितका टॅलंट माझ्या मुलामधे नाही.---- --पण मुलगा फारसा मेहनती चिकाटीवाला वगैरे नाही. जाता जाता अभ्यास करून ७०-७५ टक्केवाला आहे.---- तुम्ही तुमच्या मुलाबद्दल जरा जास्तच नकारात्मक विचार करत आहात असे वाटते आहे.

In reply to by सिरुसेरि

नाही हो, मी वास्तवदृष्टी आहे. मुलाचे गुण अवगुण चांगले ओळखते. हुशार आहे खराच, पण मेहनती नाही, हेही खरं.

आमच्याकडची परीस्थीती सांगते, आजकाल मुलांना दहावीला ८०-९०% आरामात मिळतात अभ्यास न करणार्‍यांनाही मग ते सायन्स घेतात त्यात ४०-५०% पर्यंतच येतात मग रीझर्वेशनच्या आणि मॅनेजमेंट कोटात पैशाच्या जोरावर ते इंजिनियरींग , एम.बी.बी.एस. , फार्मा अशा शाखेत जातात. लांबच्या कॉलेजेस मधे म्हणजे अकोला, कोल्हापुर वगैरे आणि मग यथावकाश ४ चे ६ वर्षात डीग्र्या घेउन बाहेर पडतात. मग वशीला असेल त्याला चांगली नोकरी मिळते. आमच्या बिल्डींगमधला एक मुलगा हा अ‍ॅवरेज होता , दहावीत प्रिलियमला २ विषयात नापास असुन दहावीत ७६% मिळाले, सायन्स घेतलं १२ वी ला त्याची बहीण कॉलेज मधे शिक्षिका तिने सुपरवायजर्स ची ओळख करुन माझ्या भाउ या वर्गात असेल असे सांगितले, त्या वर्गातल्या सर्व मुलांना कॉपि करायला मिळाली (हे ते लोक स्वतः सांगतात). १२ ला ६२% मिळाले मग गुजराथेत कुठेतरी १८ लाख भरुन बी.डी.एस. ला अ‍ॅडमिशन घेतलय, त्या मुलाचे वडील म्हणतात याने अभ्यास केला नाही केला तरीही डीग्री मिळणार असं कॉलेज शोधलय. आणि मग त्याला लग्नात चांगला हुंडा आणि गाडी मिळेल. सांगण्याचं तात्पर्य हेच की या सगळ्या प्रकारामधे खरी हुशार मुले तशीच राहतात आणि पैशाच्या जोरावर अशी मुले पुढे जातायत. आणि अश्या प्रकाराने इंजिनियर्स च्या संख्येत वाढ होत चालली आहे. बरेचसे घरी बसलेत यालाही हे कारण असावं अस माझं मत. नोकरी शोधताना चांगल्या कंपन्या तुम्ही कुठुन इंजिनियरींग केलय ते पाहतात. ज्याला ड्रॉप लागलेला असतो त्याला नोकरी शोधताना थोडं जड जातं , शक्यतो चांगल्या नावाजलेल्या कंपन्या कॉलेज कॅम्पस इंटरव्यु द्वारेच मुलांची निवड करतात.