✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका

र
राजेश घासकडवी यांनी
गुरुवार, 12/03/2015 - 18:57  ·  लेख
लेख
(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे) कधीतरी एखाद्या शांत, स्वच्छ रात्री; शहराच्या प्रकाश प्रदूषणापासून दूर कुठेतरी आकाशात पाहिलं की अक्षरशः अगणित तारे दिसतात. मंदपणे लुकलुकणारे, स्थिर. आणि त्या क्षणात आत्तापर्यंत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक मनुष्यप्राण्याशी आपण जोडले जातो. याच किंवा अशाच आकाशावर त्यांनीही आपले डोळे रोखलेले होते. कोणी तारकांच्या समूहात व्याधांची आणि हरणांची चित्रं पाहिली, कोणी त्यांचा वापर करून जहाजांमधून दर्यावर हुकुमत मिळवत नवीन प्रदेश धुंडाळले, कोणी त्या चांदण्याला कवितेत बांधलं तर कोणी त्यांची निरीक्षणं करून पंचांगं तयार केली, तर बहुतेक इतरांनी जमिनीला पाठ लावल्यावर झोपेच्या अधीन होण्याआधी डोळे भरभरून हे तारे पाहिले. प्रत्येकालाच या अथांग आकाशाने कधी ना कधी मंत्रमुग्ध केलं हे निश्चित. पूर्वी अनेकांची समजूत होती की देवाने माणसाला प्रकाश मिळावा म्हणून चंद्र-सूर्य तयार केले आणि आकाशाचं छप्पर त्यावर बांधलं. त्या छपराला पडलेल्या भोकातून त्या पलिकडचा स्वर्गीय प्रकाशच लुकलुकतो जणू. पण आता आपल्याला माहीत आहे की हे लुकलुकणारे ठिपके म्हणजे आपल्या सूर्यासारखेच तारे आहेत. काही ठिपके तर आपल्या आकाशगंगेप्रमाणे इतर दीर्घिका आहेत. त्यांमध्ये अब्जानुअब्ज तारे आहेत. किती तरी ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे ग्रह आहेत. आणि कुणास ठाऊक, त्यांतल्या अब्जावधी ग्रहांवर आपल्यासारखेच जीवही असतील. हा महाप्रचंड पसारा पाहिल्यावर आपल्याला अनेकदा आपल्या लहानपणाची जाणीव होते. मी, माझं विश्व, माझे त्रास, माझे प्रश्न, माझे आनंद, माझी दुःखं - ही सगळी मला मोठी वाटतात. पण अब्जावधी प्रकाशवर्षांच्या महाप्रचंड विश्वात आपण म्हणजे कःपदार्थ! हा स्वतःच्या क्षुद्रतेचा विचार काहीसा धक्का देणारा असतो. पण त्याच धक्क्यामध्ये आपलं मीपण सांडवून टाकून देण्याची क्षमता आहे. वैज्ञानिक लोक कदाचित विश्व नक्की किती मोठं आहे हे गणितं करून सांगू शकत असतील. पण आपल्या डोळ्यांसाठी ते अनंतच दिसतं. या अनंतात एक क्षणभर का होईना, विलीन होणं हे सुखद असतं. अवकाशाचा आवाका जसा महाप्रचंड आहे तसाच काळाचाही. आपण जन्मतो आणि ऐशी-शंभर वर्षं जगतो. आपल्या आजीआजोबांविषयीची माहिती आपल्याला त्यांच्या तोंडून कळते. त्याआधीचा इतिहास आपण पुस्तकांमधून वाचतो, सिनेमांमधून पाहातो. पण हजार दोन हजार वर्षं मागे जायला लागलं की इतिहासही अंधूक, धूसर व्हायला लागतो. आणि तेही समजण्यासारखं आहे. माणूस ज्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जन्माला आला, त्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे. जगण्यासाठी त्याला काल, परवा, आत्ता, या क्षणी, गेल्या मिनिटात, काय झालं एवढंच जाणून घेणं आवश्यक असतं. एखाद्या गोष्टीचे परिणाम शंभर वर्षांनी काय होतील याची पर्वा करण्याची गरज नसते, उपयोगही नसतो. तसंच शंभर वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी काय झालं ज्यामुळे आजच्या क्षणीचं सत्य समोर दिसतं आहे, हेही समजून घेण्याची गरज नसते. त्यामुळे आपली काळाची जाण ही सेकंद-मिनिट-तासावर अधिक असते. दिवस-महिना-वर्षाच्या गोष्टीही जाणून घेऊ शकतो. पण त्या जाणीवांना तितकी धार नसते. दशकं-शतकं-सहस्रकांची तर बातच सोडा. ताऱ्यांकडे पाहाताना जशी दृष्टी तोकडी पडते, तशीच अतिप्राचीन काळाकडे मागे वळून पाहातानाही आपली जाणीव थिटी पडते. अतिप्राचीन म्हणजे नक्की किती प्राचीन? या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला. पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला. मनुष्याचे जवळचे जातभाई सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर अवतरले. आणि आपला ज्ञात इतिहास आहे काही हजार वर्षांचा. अब्ज, कोटी, लाख, हजार - नुसते कोरडे आकडे बनतात. इतक्या मोठ्या आकड्यांनाही आपल्याला सहजपणे गवसणी घालता येत नाही. एकावर तीनचार पलिकडे शून्यं पडली की 'खूप खूप' पलिकडे समजण्यासाठी आपल्याला गणितं करावी लागतात. त्यापेक्षा आपण एक डोळ्यासमोर प्रतिमा उभी करू. कल्पना करा की तुम्ही दोन्ही हात पसरून उभे आहात. तुमची पसरलेली एक वाव म्हणजे आत्तापर्यंत पृथ्वीवर गेलेला एकंदरीत काळ. तुमच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे पृथ्वीचा जन्म. शून्य वर्ष. आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे आत्ताचा क्षण. या कवेत तुम्ही पृथ्वीचं आख्खं आयुष्य सामावून घेत आहात. या हातावर मनुष्यप्राणी नक्की कुठे आहे? असं विचारणं म्हणजे 'या महाप्रचंड अवकाशात आपण नक्की कुठल्या कणावर आहोत?' असं विचारण्यासारखंच. आपण प्रयत्न करून पाहू. तुमच्या डाव्या हाताच्या मनगटापर्यंत संपूर्ण अंधार आहे. त्या पहिल्या सुमारे पन्नास कोटी वर्षांआधीचं आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला माहीत असलेले सर्व दगड त्यानंतरचे आहेत. तुमचं मनगट आणि कोपर यामध्ये कुठेतरी अगदी साधे, आदीम जीव पृथ्वीवर अवतरले. हे सर्व जीव एकपेशीय होते. आणि पुढच्या काहीशे कोटी वर्षांपर्यंत सगळी जीवसृष्टी एकपेशीयच होती. तुमच्या डाव्या खांद्याच्या आसपास कधीतरी वातावरणात ऑक्सिजनची वाढ व्हायला लागली. आणि त्याचबरोबर एकपेशीय जीवांची सद्दी संपण्याचे दिवस सुरू झाले. पण तरी हे ताबडतोब झालं नाहीच. पृथ्वीच्या आयुष्याचा विचार करताना तसंही 'ताबडतोब' काहीच होत नाही. त्यानंतर शंभरेक कोटी वर्षांनी, तुमच्या डोक्यापलिकडे, उजव्या खांद्याच्या आसपास पृथ्वीला द्विपेशीय जीवांचं दर्शन झालं. एकदा दोन पेशींचे जीव तयार झाल्यानंतर मग पुढच्या उत्क्रांतीने काहीसा 'वेग' पकडलेला दिसतो. उजव्या कोपराच्या थोडं पुढे, म्हणजे पुन्हा साधारण शंभरेक कोटी वर्षांनी आपल्याला आपल्याला काही जटिल जीवांचे पुरावे मिळतात. पण तुम्ही जोपर्यंत मनगटांपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याच जीवाला हाडं, कवच, दात वगैरेंप्रमाणे कठीण भाग तयार झालेले दिसत नाहीत. तसं झाल्यानंतरच अश्मीभूत झालेले जीवनाचे स्पष्ट ठसे आपल्याला सापडतात. मधल्या बोटाची पहिली दोन पेरं म्हणजे डायनोसॉरचा कालखंड. उरलेलं पेर म्हणजे त्यानंतरची साडेसहा कोटी वर्षं. त्यानंतर माणूस कधी आला? सुमारे साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वी मानवाचा मूळ पूर्वज पृथ्वीवर वावरत होता. हा प्राणी दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करत असे. चिंपांझी किंवा गोरिलांप्रमाणे चालताना हाताची मूठ टेकवून चालत असे. त्याच सुमाराला दोन पायांवर चालणारे आणि हाताच्या मुठींचा वापर करत चालणारे चिंपांझी-गोरिलासारखे प्राणी यांच्या वंशवृक्षाच्या फांद्या वेगळ्या झाल्या. त्यानंतर द्विपादांची फांदी ऑस्ट्रॅलोपिथेकस, आणि होमो इरेक्टस, होमो सेपिअन्स अशा पायऱ्यांनी पुढे गेली. आपण पसरलेल्या काळाच्या वावेत हे अंतर किती आहे? सुमारे सत्तर लाख वर्षं म्हणजे आपल्या बोटाच्या पेराचा एक दशांश भाग. त्यानंतर आलेले होमो सेपिअन काही लाख वर्षांपूर्वीचे, साधारण पंधरा दिवस वाढलेल्या, आता कापायला झालेल्या नखाइतकं अंतर व्यापतात. आणि आपल्याला माहीत असलेला लिखित इतिहास? शेतीप्रधान संस्कृतीनंतरचा इतिहासच आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती म्हणून ठाऊक आहे. या संस्कृतीत काय येत नाही! हराप्पा-मोहेंजोदारो, इजिप्तचे पिरॅमिड, बाबिलोनियन सुमेरियन संस्कृती, महाभारत-रामायणांसारखी महाकाव्यं, सिकंदर-पोरसाची लढाई, येशू-बुद्ध-पैगंबरांचे धर्म, चेंगीझ खान-हिटलरसारखे क्रूरकर्मा आणि त्यांची युद्धं सगळं काही येतं. ज्ञात-अज्ञात अशा अब्जावधी लोकांची आयुष्यं, त्यांची सुखं-दुःखं, त्यांनी जीवनाशी दिलेले लढे, त्यांचे लहानमोठे जय-पराजय... अब्जावधी आयांनी आपल्या मुलांना दिलेले जन्म आणि सोसलेल्या वेदना, जोपासलेल्या आशा, त्यांची फळलेली किंवा विझलेली स्वप्नं... एवढा महाप्रचंड आवाका या काळाच्या कवेत कुठे बसतो? तुमच्या किंचित वाढलेल्या नखाकडे पाहा. आता ते नख भिंतीवर थोडं घासा. नखाचे काही कण निश्चितच भिंतीला चिकटले असतील. तुमच्या नखाची लांबी किंचित कमी झाली. काळाच्या कवेच्या तुलनेत मनुष्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची लांबी एवढीच आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या सुमारे एक शतांश! आपल्या आकाशगंगेत दहाहजार कोटी तारे आहेत, अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत... कित्येक ताऱ्यांभोवती ग्रह फिरतात... त्या ग्रहांवरही कदाचित सृष्टी असेल, त्यांच्यातही आपल्यासारखे प्रगत जीव असतील. त्यांचेही इतिहास कदाचित असेच समृद्ध असतील. कदाचित त्यांचेही इतिहास अशाच नखाच्या टोकांवर मावणारे असतील. त्यांनाही त्या नखाच्या टोकावरच्या कणाच्याही कणात आपलं आयुष्य मर्यादित करण्याची सवय असेल. आपण आपलं आयुष्य असं कणात व्यतित करतोच. पण याचा अर्थ असा नाही की तो आपला लहानगा कप्पा सोडून इतर विश्व तपासून पाहूच नये. आपण लहान आहोत, क्षुद्र आहोत म्हणून इतक्या भव्य दिव्यतेकडे डोळे उघडून पाहूच नये असं नाही. किंबहुना या विराट विश्वाकडे पाहून त्यातल्या प्रत्येक कणाच्या वेगळेपणातून आपण थक्क व्हायला हवं. आपल्या मर्यादित कणाच्या मर्यादित अवकाशात डोळ्यांवर झापड लावून बसलो, तर या आनंदाला आपण मुकून जाऊ. कणाकणाने का होईना, पण या विश्वरूपाचं आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करायला हवा. या काळाच्या विशाल कवेत आपला कण सामावून देऊन त्याला आपले हात पसरून मिठी मारायला हवी. (मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)
  • विश्वाचे आर्त - भाग १८ - गुरुत्वीय लहरी
  • विश्वाचे आर्त - भाग १९ - कार्बन डेटिंग
  • विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त
  • विश्वाचे आर्त - भाग २० - उत्क्रांतीचे पुरावे - भूस्तरीय अवशेष
  • विश्वाचे आर्त - भाग ३ - अस्तिस्तोत्र
  • विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर
  • विश्वाचे आर्त - भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी
  • विश्वाचे आर्त - भाग ६ - जंबोजेट दृष्टान्त
  • विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत
  • विश्वाचे आर्त - भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत
  • विश्वाचे आर्त - भाग ९ - अनैसर्गिक निवड
  • विश्वाचे आर्त - भाग १० - नैसर्गिक निवड
  • विश्वाचे आर्त - भाग ११ - सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट
  • विश्वाचे आर्त - भाग १२ - सामाजिक डार्विनवाद
  • विश्वाचे आर्त भाग १३ - 'आहे' आणि 'असावं'
  • विश्वाचे आर्त - भाग १४ - उत्क्रांती आणि हरितक्रांती
  • विश्वाचे आर्त - भाग १५ - १३० दाण्यांची द्रौपदीची थाळी
  • विश्वाचे आर्त - भाग १६ - जीएमओ एक तोंडओळख
  • विश्वाचे आर्त - भाग १७ - डीएनए एक तोंडओळख

Book traversal links for विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका

  • विश्वाचे आर्त - भाग १८ - गुरुत्वीय लहरी ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
48678 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

अस्तित्त्वात प्रक्रिया आहेत, पण वेळ हा भास आहे

विवेक ठाकूर
Fri, 12/04/2015 - 11:29 नवीन
तस्मात, बाहुबलीला पर्वत चढायला काही प्रॉब्लम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

काळ आणि वेळ या भिन्न गोष्टी आहेत.

अर्धवटराव
Sat, 12/05/2015 - 01:50 नवीन
विषय संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/05/2015 - 05:44 नवीन
कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे.
गैरसमज. ५ अब्ज वर्षांपूर्वी आणि ५ अब्ज वर्षांनंतर सूर्य प्रकाशमान नव्हता आणि नसेल. ५ अब्ज वर्षांच्याही काही (लाख, कोटी, अब्ज वर्षं) कोणतातरी तारा मेला तेव्हा जे अणू तयार झाले ते तुमच्या-आमच्या शरीरांत आज आहेत. (उपहास सुरू) ... पण सॉरी. तुम्ही म्हणता म्हणजे बरोबरच असणार. माझीच चूक झाली असणार. पाठ्यपुस्तकांमध्ये, फ्रेड हॉयल ते जॉर्ज गॅमॉपर्यंत, नारळीकरांपासून स्टीफन हॉकिंगपर्यंत, स्थिरस्थिती विश्वरचना मानणारे आणि महास्फोटाचे प्रवक्ते शास्त्रज्ञ जे म्हणतात ते चूकच असणार. तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने काही म्हणता आहात म्हणजे वैज्ञानिक पाया वगैरे असेलच त्याला, ते जे काही आहे ते स्पष्ट करायची गरजच नाही. (उपहास संपला.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

काल हा भास आहे असा मुद्दा आहे

विवेक ठाकूर
Sun, 12/06/2015 - 12:51 नवीन
कारण कालमापन पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास लागणार्‍या भ्रमणावर आधारित आहे. त्यासंदर्भात, सूर्य सदैव प्रकाशमान असल्यानं दिवस-रात्र-दिवस असा भास होतो हे विधान आहे. मूळ प्रक्रियाच भासावर आधारित असल्यानं कालमापन हे भासावर आधारित आहे (तास-मिनीट-सेकंद). मला वाटतं ही फार उघड आणि सहज लक्षात येणारी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

साधारण प्राथमिक इयत्तेत पहीले

कानडाऊ योगेशु
Sat, 12/05/2015 - 04:09 नवीन
साधारण प्राथमिक इयत्तेत पहीले दहा अंक कोणते तर १ ते १० असेच बाय डिफॉल्ट वाटायचे जरी शून्य ही संख्या माहीती होती तरी.(आताही प्रोग्रॅमिंग करताना इन्डेक्स शुन्यापासुन चालु करायचा का एका पासुन ह्यात बर्याच प्रोग्रॅमिंग भाषेत गोंधळ आहे. ते असो.) नंतर साधारण चौथी/पाचवी पर्यंत सगळे अंकगणित हे शून्यापासुन चालु व्हायचे तेव्हा धन ऋण असा प्रकार अजुन अभ्यासक्रमात नव्हता म्हणुन माहीतीही नव्हता. मग माध्यमिक शाळेत शून्याच्या अलिकडचे व पलिकडचे अश्या दोन्ही संख्या असतात हे शिकलो. त्यातही दोन्ही बाजुंकडे इन्फिनिटी असते व नंतर पुढे कॉलेज व तदनंतरच्या शिक्षणात दोन संख्यांमध्येही इन्फिनिटी असते (सिक्वेन्स आणि सिरिज शिकताना) व मग कॉम्प्लेक्स नंबर वगैरे प्रकार समजले. थोडक्यात जिथे काही संपले असे वाटायचे तिथे गणिताच्या बाबतीत तरी त्या ठिकाणी खरोखरच फुल स्टॉप आला असे झाले नाही. ह्या पार्श्वभूमिवर विश्व जेव्हा निर्माण झाले त्याआधी काही नव्हते हे पचायला खरोखरच जड जाते. माझ्या अल्पमतीनुसार विश्वाच्या आधी काहीच अस्तित्वात नव्हते हा वैज्ञानिक बुवाबाजीचा प्रकार वाटतो. थोडक्यात ही एक वैज्ञानिक अंधश्रध्दा वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तर्काला विज्ञान समजणं हीच अंधश्रद्धा.

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/05/2015 - 05:53 नवीन
ह्या पार्श्वभूमिवर विश्व जेव्हा निर्माण झाले त्याआधी काही नव्हते हे पचायला खरोखरच जड जाते.
नाही, विश्व नव्हे, काळ. उणे वस्तुमान असू शकत नाही, गुरुत्वाकर्षण कायम आकर्षण या स्वरूपातच असतं, प्रतिकर्षण नसतं, तसंच काळ कायम पॉझिटिव्ह असतो, काळ = शून्य याच्या आधी काहीही असू शकत नाही. तुम्ही जो तर्क त्यासाठी मांडता तो तर्क म्हणून छाणे, पण विज्ञान म्हणून कामाचा नाही. तर्क म्हणूनच दुसरं उदाहरण देते. एका कपात मी गरम कॉफी ओतली. घुटका घुटका करत पिताना ती थोडी थोडी थंड व्हायला लागली. मगाचच्या घोटाला होती त्यापेक्षा ती जास्त थंड व्हायला लागली. पण आजूबाजूच्या हवेएवढी कॉफी थंड झाल्यानंतर कॉफी आणखी थंड झालीच नाही. त्यापेक्षा बरीच जास्त थंड असणारी पेयं मी पिते, पण ही कॉफी त्यापेक्षा थंड होऊ शकत नाही. तर्क काय (संस्कृत सुभाषितांसारखा) दोन्ही बाजूंनी लावता येतो. म्हणून ते विज्ञान ठरत नाही. काळ उणे असणारच, हे म्हणणं 'शोले'तला गब्बर सिंग आणि बोट तुटका शाहिस्तेखान यांच्या समलिंगी अफेयरचं गॉसिप पसरवण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

कॉफिचे उदाहरण आवडले. पण इथेही

कानडाऊ योगेशु
Sat, 12/05/2015 - 12:03 नवीन
कॉफिचे उदाहरण आवडले. पण इथेही एक गृहितक आहे पिणारा एका जागी स्थिर आहे अथवा त्याचा भवताल स्थिर आहे. आता कल्पना करा कि अवकाशयानात बसुन कॉफि पीत पीत मी सूर्यापासुन दूर जात आहे त्यावेळी कॉफि ही नेहेमीच आधीच्या अवस्थेपेक्षा जास्त थंड वाटेल. ते असो. पण मुळात इथेही हा कन्सेप्ट समजावुन सांगायला मला अनदर फ्रेम ऑफ रेफरन्सची गरज पडली (म्हणजे कॉफी व भवताल.) म्हणजे कॉफि कशापेक्षातरी थंड अथवा तितक्या तापमानाची आहे वगैरे. ह्या तर्कानुसार विश्व होते म्हणजे कशाच्या तरी अगोदर होते अथवा नव्हते म्हणजे दुसरे काहीतरी होते पण विश्व नव्हते असे त्रांगडे होऊन बसते.
काळ उणे असणारच,...
इथे थोडी गफलत होतेय. लहानपणी इसवी सन ही कालमोजमापनाची व्यवस्था प्रथम माहीती झाली तेव्हा असे वाटायचे इ.स. ० पूर्वी काही नव्हतेच का काय. मग नंतर समजले जे आपण सध्या लिहितो २०१५ ते खरेतर इ.स.० नंतर २०१५ असे आहे. (इ.स. पूर्व अमुक अमुक असा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा मनात उगीचच ब्लॅक अँड व्हाईट प्रतिमा उमटतात.). म्हणजे इ.स व्य्वस्था अस्तित्वात आली त्यापूर्वी काळ हा प्रकार नव्हताच का काय? मग हेच लॉजिक सो कॉल्ड विश्वनिर्मीतीच्या झिरो स्टेटला का लावता येऊ नये.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काऊ

विवेक ठाकूर
Sat, 12/05/2015 - 12:33 नवीन
माझ्या अल्पमतीनुसार विश्वाच्या आधी काहीच अस्तित्वात नव्हते हा वैज्ञानिक बुवाबाजीचा प्रकार वाटतो. थोडक्यात ही एक वैज्ञानिक अंधश्रध्दा वाटते. फँटॅस्टिक ! आणि हाच खरा मुद्दायं. अगदि साधी गोष्ट आहे कोणत्याही निर्मिती पूर्वी ज्यात निर्मिती होऊ शकेल असं अवकाश हवं . त्या आवकाशाला तुम्ही स्पेस म्हणा, शांतता म्हणा नाही तर बुद्ध म्हणतो ते शून्य म्हणा किंवा वॉइड म्हणा. उदा. ध्वनी निर्माण होण्यासाठी शांतता हवी, नाहीतर ध्वनी निर्मिती असंभव आहे, मग तो सूक्ष्मातला सूक्ष्म ध्वनी असो की बीग बँग असो. पण लेखकाला तेच मान्य नाही ! त्यामुळे विश्वनिर्मितीपूर्वी काही नव्हते म्हणणे म्हणजे `मूल जन्मण्यापूर्वी काहीच नव्हते (किंवा आईच नव्हती) म्हणण्यासारखं ' आहे. तस्मात ही लेखमाला, तुम्ही यथार्थ शब्दात म्हटल्याप्रमाणे `वैज्ञानिक अंधश्रद्धेवर' उभी आहे. आणि तो एका कपोलकल्पित घटनेचा, काल या मानवी संकल्पनेनं घेतलेला निरर्थक वेध आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

ध्वनी निर्माण होण्यासाठी

बिपिन कार्यकर्ते
Sat, 12/05/2015 - 17:03 नवीन
ध्वनी निर्माण होण्यासाठी शांतता हवी
निर्माण होण्यासाठी की ऐकू येण्यासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

ध्वनि निर्माण होण्यासाठी

संदीप डांगे
Sat, 12/05/2015 - 17:08 नवीन
ध्वनि निर्माण होण्यासाठी माध्यम हवे. ऐकू येण्यासाठी कान पुरेसे आहेत. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हौ डेअर यू?

तुषार काळभोर
Sat, 12/05/2015 - 17:09 नवीन
आँ?? हौ डेअर यु क्वेश्चन हिम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

तीच कॉफी, समांतर उदाहरण.

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 12/06/2015 - 05:49 नवीन
हीच कॉफी समजा बाहेरून ऊर्जा वापरून थंड करत नेली तर -२७३ अं. से (उणे २७३ अं. से) = ० अं. केल्व्हीन या तापमानाखाली थंड होऊ शकणार नाही. तापमान म्हणजे अणू-रेणूंची गती. या तापमानाला अणूरेणूंची हालचाल थांबते. ही हालचाल थांबल्यानंतर आणखी थंड होणं शक्य नाही. ही मानवी मेंदूची किंवा तंत्रज्ञानाची मर्यादा नसून नैसर्गिक मर्यादा आहे. साधारण असंच काहीसं काळाच्या बाबतीत खरं आहे. विश्वाचं प्रसरण सुरू झालं तेव्हाच काळ आणि अवकाश या मिती अस्तित्वात आल्या, जन्मल्या; अवकाश आणि काळ यांच्यापैकी त्याआधी काहीही नव्हतं हे न समजणं ही मेंदूची मर्यादा आहे, विज्ञानाची नाही. तरीही वैज्ञानिक अंधश्रद्धा वगैरे लेबलं लावायला हरकत नाही, पण सात-आठ नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांना आणि या विषयावर संशोधन करणाऱ्या हजारो इतर शास्त्रज्ञांना (या कारणास्तव) अंधश्रद्ध म्हणण्यासाठी तर्कापेक्षा अधिक काही भरीव, ठोस कारण दिलं तर बोलण्याकडे लक्ष देता येईल. एरवी काय प्रथेनुसारच ... चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

इंट्रेस्टींग.

अर्धवटराव
Sun, 12/06/2015 - 10:27 नवीन
हेच कॉफीचं उदाहरण थोडं पुढे वाढवलं तर ??
तापमान म्हणजे अणू-रेणूंची गती. या तापमानाला अणूरेणूंची हालचाल थांबते. ही हालचाल थांबल्यानंतर आणखी थंड होणं शक्य नाही.
जेंव्हा द्रव्याच्या अणुरेणुंची हालचाल थांबते तेंव्हा त्याला आणखी थंड करता येत नाहि. पण त्याचवेळी १) अणु रेणूंची तशी हालचाल करायची क्षमता, शक्यतेचा लय होत नाहि. हालचाल करण्याची अणुरेंणुंची प्रॉपर्टी सदा अबाधीत असते, इर्र्स्पेक्टीव्ह ऑफ तापमान ?? २) द्रव्य त्याच्या मिनीमम फ्रीझींग पॉइंटला आलं, त्याचे अणु इतके आक्रसले कि सगळे अणु एकाच बिंदुमधे सामावले. असं झालं, आणि तरी त्या द्रव्याने आपले परिवर्तनाचे गुणधर्म सोडले नाहि (कारण त्याचाच पुढे स्फोट होऊन प्रसरण झालं?). म्हणजे ते द्रव्य कधि "शुण्य" झालच नाहि ? याचाच अर्थ "काहिच नाहि" मधुन बिग बँग झालच नाहि ? आणि जर ते कधि शुण्य झालं असेल तर त्याचा अर्थ इतकाच आहे कि द्रव्याने आक्रसत जाऊन शुण्य होणे या पलिकडे आपण त्याची अवस्था ट्रॅक करु शकत नाहि ? जर इथे हि चर्चा अप्रस्तुत वाटत असेल ( मुख्य म्हणजे तशी चर्चा काहि उपयोगाची वाटत असेल :) ) तर ख.व. मधे देखील वार्तालाप करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

या प्रतिसादाचाच वेगळा धागा

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 12/07/2015 - 21:44 नवीन
या प्रतिसादाचाच वेगळा धागा काढा. गुर्जी मारायच्या आत रोचक अवांतर इतरत्र नेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

नाही, विश्व नव्हे, काळ. उणे

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/05/2015 - 14:59 नवीन
नाही, विश्व नव्हे, काळ. उणे वस्तुमान असू शकत नाही, गुरुत्वाकर्षण कायम आकर्षण या स्वरूपातच असतं, प्रतिकर्षण नसतं, तसंच काळ कायम पॉझिटिव्ह असतो, काळ = शून्य याच्या आधी काहीही असू शकत नाही. हे म्हणणे म्हणजे मला आता माहीत आहे तेच आस्तित्वात आहे/होते... इतर काहीच नाही असे म्हणण्यासारखे आणि म्हणूनच "अशास्त्रिय" दावा आहे. आजच्या घडीला बिग बँग हा "सिद्धांत" मानवाच्या भूतकाळासंबंध्दीच्या आकलनाची सीमा आहे. म्हणूनच केवळ तो कालमापनासाठी एक अर्बिट्ररी झिरो पॉईंट आहे. "बिग बँग अगोदर काहीच नव्हते" हे शास्त्रज्ञांनी म्हणणे आणि "देवाने विश्व निर्माण केले त्याअगोदर काहीच नव्हते" हे आस्तिकांनी म्हणणे एकाच पठडीतले दावे आहेत, नाही का ? :) असं बघा... १. जर "देवाने विश्व निर्माण केले" हे खरे मानले तर त्याच विधानाने विश्वाआधी देव होता हेच सिद्ध होते... म्हणजे आस्तिकांचा "त्याअगोदर काहीच नव्हते" हा दावा फोल ठरतो. शिवाय, "मग देवाआधी काय होते ?" हा प्रश्नही निर्माण होतो :) त्याच न्यायाने... २. "वस्तुमान आणि उर्जा (मॅटर अँड एनर्जी) एकमेकात रुपांतरीत होऊ शकतात पण दोन्ही एकत्रितपणे कधीच नष्ट होऊ शकत नाहीत किंवा नथिंगनेसमधून निर्माण होऊ शकत नाहीत" हा आजचा मूलभूत शास्त्राधार खरा धरला तर... "अगोदर काहीच नव्हते व त्या नथिंगनेसमधून बिग बँग नंतर सगळे वस्तुमान आणि उर्जा निर्माण झाले" हे त्याच मूलभूत शास्त्राधाराला विपरित व फोल विधान झाले, नाही का ? अजून एक महत्वाचे... शास्त्रिय सत्य हे आहे की "आपल्याला बिग बँग (झाला असलाच तर) त्यागोदर काय होते हे आज माहीत नाही". आजच्या घडीला केवळ बिग बँग पर्यंतच मानवाच्या भूतकालाच्या शास्त्रिय आकलनाची परिसीमा आहे व म्हणूनच केवळ तो सद्याचा "अर्बिट्ररी पॉईंट ऑफ रेफरन्स फॉर मेझरमेंट ऑफ टाईम आहे". पिरियड. भविष्यकालात बिग बँगच्या अगोदर काय होते हे शास्त्रियदृष्ट्या माहीत (सिद्ध) झाले, तर मग काय ? मग एकतर कालमापनाचा अर्बिट्ररी पॉईंट ऑफ रेफरन्स बिग बँगच्या मागे न्यावा लागेल किंवा "इसविसनापूर्वी २१० वर्षे" च्या धर्तीवर "बिगबँगपूर्वी सात दशलक्ष वर्षे" असे म्हणावे लागेल, नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

- बिगबॅंगमध्ये काळाचीच

राजेश घासकडवी
Sat, 12/05/2015 - 15:32 नवीन
- बिगबॅंगमध्ये काळाचीच सुरूवात झाली. त्यामुळे 'त्याआधी' हा शब्दप्रयोगच चुकीचा ठरतो. तो आर्बिट्ररी पॉइंट नाही, अॅब्सोल्यूट पॉइंट आहे.
नथिंगनेसमधून निर्माण होऊ शकत नाहीत" हा आजचा मूलभूत शास्त्राधार खरा धरला तर... "अगोदर काहीच नव्हते व त्या नथिंगनेसमधून बिग बँग नंतर सगळे वस्तुमान आणि उर्जा निर्माण झाले" हे त्याच मूलभूत शास्त्राधाराला विपरित व फोल विधान झाले, नाही का ?
हा आजचा शास्त्राधार आहे असं कोणी सांगितलं? मॅटर आणि अॅंटिमॅटर यांच्या जोड्या आपोआप तयार होऊ शकतात. स्टीफन हॉकिंगने त्याच्या पुस्तकात मांडलेलं मिशिओ काकुने सोप्या शब्दांत समजावून सांगितलेलं आहे. But how can an entire universe come out of nothing? This apparently violates the conservation of matter and energy. But there is a simple answer. Matter, of course, has positive energy. But gravity has negative energy. (For example, you have to add energy to the earth in order to tear it away from the sun. One separated far from the solar system, the earth then has zero gravitational energy. But this means that the original solar system had negative energy.) If you do the math, you find out that the sum total of matter in the universe can cancel against the sum total of negative gravitational energy, yielding a universe with zero (or close to zero) net matter/energy. So, in some sense, universes are for free. It does not take net matter and energy to create entire universes.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वस्तुमान आणि उर्जा (मॅटर अँड

sagarpdy
Sat, 12/05/2015 - 15:57 नवीन
वस्तुमान आणि उर्जा (मॅटर अँड एनर्जी) एकमेकात रुपांतरीत होऊ शकतात पण दोन्ही एकत्रितपणे कधीच नष्ट होऊ शकत नाहीत किंवा नथिंगनेसमधून निर्माण होऊ शकत नाहीत" हा आजचा मूलभूत शास्त्राधार खरा धरला तर... "अगोदर काहीच नव्हते व त्या नथिंगनेसमधून बिग बँग नंतर सगळे वस्तुमान आणि उर्जा निर्माण झाले" हे त्याच मूलभूत शास्त्राधाराला विपरित व फोल विधान झाले, नाही का ?
माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग च्या सिध्दांताप्रमाणे सर्व वस्तुमान व उर्जा एका बिंदूत एकवटले होते, म्हणजेच ते नथिंगनेसमधून निर्माण झाले नव्हते.बिगबँग च्या अगोदर काय होते याविषयी देखील काही थेअरी आहेतच, परंतु त्या सर्वमान्यही नाहीत व त्यांना काही प्रायोगीक आधारही नाही. लिंका मिळाल्या तर नंतर टंकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/05/2015 - 18:20 नवीन
माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग च्या सिध्दांताप्रमाणे सर्व वस्तुमान व उर्जा एका बिंदूत एकवटले होते हा त्या थियरीचा फार महत्वाचा गाभा आहे आणि तोच विवादास्पद आहे !!! डोळे मिटून मान्य करायचे नसेल व शास्त्रिय कारणे हवी असली तर नमुन्यादाखल खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे जरूर आहेत : १. तो बिंदू होता ना ? मग बिग बँग अगोदर काहीच नव्हते हे कसे काय बरे ??? २. त्या "आकारमान नसलेल्या" बिंदूत इतके सगळे "वस्तूमान + उर्जा" कसे सामावले असेल याचे काही सर्वमान्य शास्त्रिय कारण आहे का? आजपर्यंत तरी नाही. ३. मुळात, तो बिंदू तयार कसा झाला ? ४. तो बिंदू तयार होण्याअगोदर काय होते ? आता अजून एक खास महत्वाचे... ५. जर तो बिंदू होता, तर त्याच्या स्फोटाने प्रसरण पावणारे विश्व गोलाकार (स्फेरिकल... बिंदूपासून/मध्यापासून सर्व दशदिशांना समान) प्रसरण पावायला हवे होते... विश्व तसे नाही! याचे विवरण करायला मग दोन पापुद्रे (मेंब्रेन्स) एकमेकावर आदळून त्यांच्या स्फोटाने विश्व प्रसरण पावू लागले असा सिद्धांत व इतर स्पेस-टाईमचे सिद्धांतही पुढे आला. मग त्या पापुद्र्यांचा आणि आकारमान नसलेल्या एकुलत्या एका बिंदूचा संबंध कसा जोडणार ??? महत्वाचे म्हणजे, बिंदू आणि पापुद्रे हे दोन्हीही केवळ "थियरेटिकल फिजिक्स"च्या सद्या मान्य असलेल्या आवाक्यातले व सद्याच्या गणिती समीकरणांच्या आवाक्यातले, कमी-जास्त मान्यताप्राप्त "सिद्धांत" आहेत. पिरियड. ६. अजून या लेखमालेत, "दिसणारी आणि मोजता येणारे वस्तूमान + उर्जा" यांचाच उहापोह आहे... "डार्क मॅटर" पर्यंत ती पोचलेली नाही... अत्युच्च सायन्स फिक्शनच्या तोंडात मारेल इतका रोचक, आकर्षक आणि विस्मयकारक धडा आहे तो ! :) तो धडा मानवाला "कळायला" लागला तर अनेक मान्य सिद्धांत डळमळतील, अनेक कोलमडून पडतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, बुवा. इ इ इ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

या सर्व प्रश्नांना उत्तर

राजेश घासकडवी
Sat, 12/05/2015 - 21:28 नवीन
या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची माझी कुवत नाही. या दुव्यावर अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

या सर्व प्रश्नांना उत्तर

राजेश घासकडवी
Sat, 12/05/2015 - 21:28 नवीन
या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची माझी कुवत नाही. या दुव्यावर अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

लिंकसाठी अनेक धन्यवाद!

संदीप डांगे
Sat, 12/05/2015 - 21:38 नवीन
लिंकसाठी अनेक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

कुठून सुरुवात करावी कळेना ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 12/06/2015 - 06:02 नवीन
विश्वाच्या सुरुवातीच्या १०-४७सेकंदात काय, कसं घडलं याबद्दल अजूनही भौतिकशास्त्राला काहीही समजत नाही. अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका बिंदूत सामावलेली उर्जा-वस्तुमान यांची अवस्था काय होती हे भौतिकशास्त्राला आजतरी समजत नाही. त्यापुढे काय झालं याचा अभ्यास बऱ्यापैकी तपशीलात झाला आणि होत आहे.
"डार्क मॅटर" पर्यंत ती पोचलेली नाही... अत्युच्च सायन्स फिक्शनच्या तोंडात मारेल इतका रोचक, आकर्षक आणि विस्मयकारक धडा आहे तो ! :) तो धडा मानवाला "कळायला" लागला तर अनेक मान्य सिद्धांत डळमळतील, अनेक कोलमडून पडतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, बुवा.
लेखमालेत काय-काय लिहायचं हा निर्णय लेखकाचा आहे. पण डार्क मॅटर - कृष्णपदार्थ हा प्रकार ट्रायकॉर्डर आणि इनर्शियल डँपर-छाप अनाकलनीय वगैरे नाही. याबद्दल बऱ्यापैकी सिद्धांत समोर आलेले आहेत. कृष्णपदार्थ साधारण किती असेल याचा अंदाज निरनिराळ्या खगोलभौतिकी घटना वापरून केले गेले आहेत. आणि त्यांच्यात बऱ्यापैकी एकवाक्यता आहे. अजूनही पुरेसं निदान झालेलं नाही ते डार्क एनर्जी, म्हणजेच वैश्विक स्थिरांकाचं. महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये अजूनही भोकं आहेत. पण ती काळ म्हणजे काय, विश्वाची सुरुवात कशी झाली यात नाहीत. जी भोकं आहेत ती रीआयनायझेशन कधी झालं, दीर्घिकांचं चुंबकीय क्षेत्र आणि मधल्या रिकाम्या भागातलं चुंबकीय क्षेत्र अशा प्रकारचे आहेत. ते फार किचकट तपशील आहेत; मलातरी भौतिकशास्त्रातल्या जड संकल्पनांशिवाय, सोप्या भाषेत ते समजावता येणार नाहीत. (होय, स्वतःच्या शिक्षणाची ही क्षीण जाहिरात आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/06/2015 - 14:57 नवीन
अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका बिंदूत सामावलेली उर्जा-वस्तुमान यांची अवस्था काय होती हे भौतिकशास्त्राला आजतरी समजत नाही. त्यापुढे काय झालं याचा अभ्यास बऱ्यापैकी तपशीलात झाला आणि होत आहे. महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये अजूनही भोकं आहेत. उत्तम ! हे आणि या प्रतिसादातले इतर काही मुद्देच तर बहुतेक प्रतिवादी केव्हापासून मांडत आहेत आणि लेखक त्यांचा प्रतिवाद करत होता ! पण दुसर्‍या एका प्रतिसादात बिग बँग व इतर दावे "अल्टीमेट" / "अ‍ॅबसॉल्युट पॉईंट" वगैरे नाहीत आणि पुढच्या संशोधनाने त्यांच्यात बदल होऊ शकतो हे मानले आहे... लेखात तसा उल्लेख असता किंवा हे अगोदर मानले असते तर मिपाची बरीच बँड्विड्थ वाचली असती. इतकेच. बाय द वे "डार्क मॅटर/एनर्जी" सुद्धा "सच्छिद्र" "थियरी"च आहे. पण त्याबद्दल इथे नको. पुढे काही संबंध आला व गरज पडली तर चर्चा होईलच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

थियरी ही एका स्वेटरसारखी असते

राजेश घासकडवी
Sun, 12/06/2015 - 20:14 नवीन
थियरी ही एका स्वेटरसारखी असते. पुरेशा पुराव्यांच्या लोकरीने ती विणली जाते. आता तयार झालेला स्वेटर अंगावर व्यवस्थित बसतोय, पण त्याच्यात दोनचार भोकं आहेत. हे मान्यच असतं. माझा मुद्दा असा आहे की 'ही थियरी बदलू शकेल' यातून 'हे सर्व साफ चुकीचं आहे असं सिद्ध होऊ शकेल' असा अर्थ प्रतीत होतो. स्वेटरच नाही, नुसतेच लोकरीचे विणलेले पॅचेस आणि व्यवस्थित बसणारा पण दोनचार भोकं असलेला स्वेटर यामध्ये फरक करणं महत्त्वाचं ठरतं. हे लेखन वृत्तपत्रासाठी केल्यामुळे शब्दमर्यादा आलेली आहे. त्यामुळे गोष्टी थोडक्यात सांगाव्या लागतात. एखाद्या विशिष्ट शब्दप्रयोगाबद्दल चर्चा करण्यापेक्षा लेखमालेत येणारा संदेश समजावून घ्यावा ही विनंती. या लेखाचा संदेश असा आहे की 'आपल्या छोट्याशा कणापलिकडे हे जगड्व्याळ विश्व पसरलेलं आहे. ते आपण डोळे भरून पाहून घेऊ.' प्रास्ताविक, पहिला लेख आहे. संपूर्ण लेखमाला वाचून तिच्यात येणाऱ्या संदेशांबद्दल चर्चा व्हावी अशी माझी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

जास्त हेअर स्प्लिटिंग न करता

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/06/2015 - 21:03 नवीन
जास्त हेअर स्प्लिटिंग न करता इतकेच म्हणतो की, "शास्त्रिय लेखात किमान नेमकेपणा (अक्युरसी) असावा आणि वाचकांचा... विषेशतः अनभिज्ञ (लेमॅन) वाचकांचा... गैरसमज होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे." इतकेच. कारण "एखादे शास्त्रिय मत आहे" असा झालेला गैरसमज दूर करणे कठीण असते... त्याहूनही जास्त महत्वाचे म्हणजे ते गैरसमज सर्वसामान्य जीवनासंबंधी असले तर ते धोकादायक ठरू शकतात (जसे या लेखमालेच्या पुढच्या लेखात झाले आहे). तुमचे लेख आवडतात, म्हणुनच वाचतो. मग एखादी गोष्ट फारच खटकली तर सांगितल्याशिवाय राहवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सर जी...

अर्धवटराव
Sun, 12/06/2015 - 10:30 नवीन
१. तो बिंदू होता ना ? मग बिग बँग अगोदर काहीच नव्हते हे कसे काय बरे ??? -- बिंदु होता. फक्त "अगोदर" किंवा "नंतर" का कन्सेप्ट नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

भविष्यकालात बिग बँगच्या अगोदर

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 12/06/2015 - 05:51 नवीन
भविष्यकालात बिग बँगच्या अगोदर काय होते हे शास्त्रियदृष्ट्या माहीत (सिद्ध) झाले, तर मग काय ? मग एकतर कालमापनाचा अर्बिट्ररी पॉईंट ऑफ रेफरन्स बिग बँगच्या मागे न्यावा लागेल किंवा "इसविसनापूर्वी २१० वर्षे" च्या धर्तीवर "बिगबँगपूर्वी सात दशलक्ष वर्षे" असे म्हणावे लागेल, नाही का ?
नाही. महास्फोटाचा सिद्धांत बदलावा लागेल. विश्वाचं वय १३.७ अब्ज वर्षं आहे असं म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हम्म,

नीलमोहर
गुरुवार, 12/03/2015 - 23:20 नवीन
याच्या बरोबर उलट विचाराने माझं डोकं बधीर होतं, जेव्हा हे जग नष्ट होईल तेव्हा काय असेल.. ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

जे काही असायचं ते असेल, पण

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/04/2015 - 06:07 नवीन
जे काही असायचं ते असेल, पण आपण नसू! ;-) बऱ्याच प्रश्नांची उत्तरं लेखमालेत असतील म्हणून टंकाळा करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

बाब्बो.. आता ह्या विचाराने

कानडाऊ योगेशु
Fri, 12/04/2015 - 23:20 नवीन
बाब्बो.. आता ह्या विचाराने पुन्हा एकदा मळमळायला झाले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

या विषयी एकदोन थिअरि वाचल्या

sagarpdy
Fri, 12/04/2015 - 11:28 नवीन
या विषयी एकदोन थिअरि वाचल्या होत्या. पुढील भागांमध्ये याची चर्चा येईल असे वाटते. पु भा प्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

विश्वाचा जन्म चौदा अब्ज

pacificready
Fri, 12/04/2015 - 00:13 नवीन
विश्वाचा जन्म चौदा अब्ज वर्षापूर्वी झाला. मान्य. तो कसा झाला? का झाला? 'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा. नीट समजवा महाराज. अलंकारीक रूपकात्मक भाषा आवडली.
  • Log in or register to post comments

'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा.

अर्धवटराव
Sat, 12/05/2015 - 01:54 नवीन
'काहि नाहि' असं कधिच नसतं. फार तर असं म्ह्णता येईल कि 'काहितरी आहे' यातल्या आपल्याला समजण्याजोग्या आवाक्याबाहेरचं जे आहे ते म्हणजे 'काहि नाहि' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

'काहि नाहि' असं कधिच नसतं.

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/05/2015 - 15:13 नवीन
'काहि नाहि' असं कधिच नसतं. +१ मुळ मुद्दा असा आहे की... आज आवाक्याबाहेर आहे ते उद्या आवाक्यात येऊ शकतं... त्यामुळे किंवा अन्यथाही, आवाक्याबाहेरच्या गोष्टींसंबंधात "काही नाही" ऐवजी "(आज) माहीत नाही" असं म्हटलं तरच ते सत्य व शास्त्रिय वचन होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मला माहिती आहे ते.

pacificready
Sat, 12/05/2015 - 21:54 नवीन
मला माहिती आहे ते. कधीतरी नावाला जागावे ही विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

गुर्जी - तुमचा लेख ललित

प्रसाद१९७१
Fri, 12/04/2015 - 10:29 नवीन
गुर्जी - तुमचा लेख ललित प्रकारात मोडतोय. काहीतरी रीयल माहिती लिहा.
  • Log in or register to post comments

साध्या सोप्या उपमा, रसाळ भाषा

सस्नेह
Fri, 12/04/2015 - 10:31 नवीन
साध्या सोप्या उपमा, रसाळ भाषा आणि रंजक लेख. आधी वाचला तेव्हाही आवडला होता.
  • Log in or register to post comments

सोपी भाषा

राही
Fri, 12/04/2015 - 11:55 नवीन
विश्वनिर्मितीच्या क्लिष्ट संकल्पनांना विदा आणि दुव्यांच्या जंजाळातून बाहेर काढून अलगद समोर पेश केले आहे. आमच्यासारख्या 'ले-पर्सन्स'ना नक्कीच आवडेल आणि आम आदमीला समजेल इतक्या सोप्या तर्‍हेने केलेली मांडणी पाहून कदाचित तज्ज्ञसुद्धा मान डोलावतील.
  • Log in or register to post comments

जर विश्व सतत प्रसरण पावत आहे, तर..

बबन ताम्बे
Fri, 12/04/2015 - 12:06 नवीन
समजा भविष्यात (जवळपास) प्रकाशाच्या वेगाने जाणारी याने प्रुथ्वीवरच्या माणसाने बनवली, तरी सुद्धा दुस-या आकाशगंगेतील ग्रहावर जाणे शक्य होईल का? कारण विश्व तर सतत प्रसरण पावते आहे आणि त्याचा वेग प्रचंड (आपल्या स्केलने) आहे. म्हणजे दोन आकाशगंगांमधील अंतर ही प्रचंड वाढतेय. मग समजा एखाद्या आकाशगंगेतील ग्रहावर जीवसॄष्टी असली, तरी पॄथ्वीवरील माणसाला जाणे शक्य होईल का?
  • Log in or register to post comments

जायचेच कशाला पण तिथे...? इथे

संदीप डांगे
Fri, 12/04/2015 - 12:12 नवीन
जायचेच कशाला पण तिथे...? इथे घातलेत तेवढे गोंधळ पुरेसे नाहीत का? असो. जोक्स अपार्ट. अशी याने बनवणे शक्य नाही. किंवा याने बनवण्याची गरज भासणार नाही. ट्रांसमिशन करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

ओके.

बबन ताम्बे
Fri, 12/04/2015 - 12:22 नवीन
पण हे विश्व असे दूर दूर जाऊन कीती फुगणार आहे ? विश्वाची अनंत पोकळी हे खरेच गुढ आहे आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या बुद्धी पलीकडे आहे. जाऊ दया, तुम्ही म्हणता तसे इथेच आधी भरपूर गोंधळ आहेत. समस्या आहेत, टेंशन आहेत. विश्वाचे गुढ उकलेल तेंव्हा उकलेल. मुलाची कॉलेजची (प्रचंड) फी भरून येतो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लेखात बाकी सगळे सिध्दांत

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/04/2015 - 13:06 नवीन
लेखात बाकी सगळे सिध्दांत (सिध्दांतच आहेत ते) ठीक आहेत... आता ते सद्या सर्वात जास्त विश्वासू असल्याने, ते धरूनच विचार करावा लागतो आहे. पण ते सिध्दांत आहेत नियम (लॉ / अंतिम सत्य) नाहीत. पण ते काळाचं बघा जरा... काळ ही मानवाच्या कल्पनेतून आलेली "संकल्पना" व "एखाद्या घटनेचा प्लेसहोल्डर किंवा दोन घटनांमधिल लिनियर संबंध मोजण्याच्या गरजेपोटी निर्माण केलेले अर्बिट्ररी साधन आहे".. जसे मीटर भौगोलीक अंतरमोजण्याच्या गरजेपोटी, ग्रॅम वजन मोजण्याच्या गरजेपोटी, इ. इ. इ. अश्या अर्बिट्ररी साधनांत एक माणसाने ठवलेले एकक असते. उदा: 1. International Prototype Metre is the distance between two lines on a standard bar composed of an alloy of 90% platinum and 10% iridium, measured at the melting point of ice. 2. Under the International System of Units (via the International Committee for Weights and Measures, or CIPM), since 1967 the second has been defined as the duration of 9192631770 periods of the radiation corresponding to the transition between the two hyperfine levels of the ground state of the caesium 133 atom. अमिबाला किंवा त्या अगोदरच्या नायट्रोजनच्या कणाला काळ ही संकल्पना सुचली नाही किंवा तिची त्यांना गरजही नव्हती. काळ आणि तो मोजणे ही मानवाची गरज आहे. त्याकरिता वर सांगितल्याप्रमाणे एखाद्या घटनेचा प्लेसहोल्डर* किंवा दोन घटनांमधिल लिनियर संबंध ठरविण्याच्या गरजेपोटी मानवाने काल/वेळ ही कल्पिलेली संकल्पना आहे. एक मात्र नक्की, काल/वेळ ही मानवी संकल्पना आस्तित्वात येण्याअगोदर कोणत्या रुपात का होईना हे विश्व होते. कारण, अगदी बिग बँग सुध्दा (झाला असल्यास) नथिंगनेसमध्ये शक्य नाही ना ?! तसेच, हे विश्व मानवानंतरही शिल्लक राहीलच. कारण, सर्व मॅटर व उर्जा मानवाबरोबर एकदम नष्ट होणार नाही. मात्र, काल/वेळ ही संकल्पना मानवाबरोबर नष्ट होईल... अर्थात, तिचा वापर करणारी अजून काही दुसरी प्रजाती निर्माण झाली तर शिल्लक राहीलही... पण तेव्हाही काल/वेळ संकल्पनेच्या रुपातच असेल ! :) === * काल हा प्लेसहोल्डर म्हणुन वापरताना (उदा. ३ डिसेंबर २०१५ या दिवशी सकाळी ९ वाजता अमुक घटना घडली) सुध्दा खरे तर आपण त्या घटनेचा "०१ जानेवारी ०००१ च्या सकाळचा पहिला सेकंद" या अर्बिट्ररी बिंदूशी असलेला संबंध अर्बिट्ररी मापनांने (वर्षे, दिवस, तास, मिनीटे, सेकंद) मोजत असतो !
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सुंदर प्रतिसाद!

संदीप डांगे
Fri, 12/04/2015 - 13:10 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

>>>एक मात्र नक्की, काल/वेळ ही

pacificready
Fri, 12/04/2015 - 13:18 नवीन
>>>एक मात्र नक्की, काल/वेळ ही मानवी संकल्पना आस्तित्वात येण्याअगोदर कोणत्या रुपात का होईना हे विश्व होते. कारण, अगदी बिग बँग सुध्दा (झाला असल्यास) नथिंगनेसमध्ये शक्य नाही ना ?! तसेच, हे विश्व मानवानंतरही शिल्लक राहीलच. कारण, सर्व मॅटर व उर्जा मानवाबरोबर एकदम नष्ट होणार नाही. मात्र, काल/वेळ ही संकल्पना मानवाबरोबर नष्ट होईल... अर्थात, तिचा वापर करणारी अजून काही दुसरी प्रजाती निर्माण झाली तर शिल्लक राहीलही... पण तेव्हाही काल/वेळ संकल्पनेच्या रुपातच असेल ! :) नेमकं! बाकी ऊर्जा कधीही उत्पन्न अथवा नष्ट करता येत नाही तिचं रूपांतरण फ़क्त होतं हां भौतिक शास्त्राचा नियम बिग बँग मानल्यास मोडून पडतो का असा प्रश्न (माझ्या मनात) निर्माण होतो. एका काही नसलेल्या बिन्दुतून विश्व निर्माण होऊ शकतं या गोष्टीवर कसा विश्वास बसावा? लांबी रुंदी उंची खोली नसलेला पण प्रचंड घनतेचा एक बिंदू स्फोट झाला आणि त्यातुन विश्व निर्मिती झाली यावर विश्वास ठेवायचा. कधी तरीच् चालणारं डोकं पण बंद पडतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

जे लोक 'सुरुवात कुठून झाली?'

संदीप डांगे
Fri, 12/04/2015 - 13:40 नवीन
जे लोक 'सुरुवात कुठून झाली?' ह्या बायबली प्रश्नातच अडकून पडले आहेत त्यांना उर्जेचं हे वैशिष्ट्य नाकारावंसं वाटणं सहज आहे. आकाशगंगा एकमेकांपासून दूर जातायत ह्या फॅक्टवर त्यांची बिगबँग थेरी अवलंबून आहे. देवाचं अस्तित्व नाकारणे ह्या एकमेव मोहिमेवर असल्यासारखे बायबल मधे जे लिहिलंय ते खोटं आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा हेच ह्या मोहिमेचं लक्ष्य असल्यासारखं वाटतं. हिंदू तत्त्वज्ञानानुसार विश्वाचं अनादि-अनंतत्त्व मान्य करून त्यादृष्टीने काही शोधण्याचे प्रयत्न झालेत का कधी? माझ्यामते एकदा विश्वाचं हे वैशिष्ट्य मान्य केले की फुकाची संशोधने बंद होऊन माणूस स्वतःवर जास्त फोकस करू लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

एवढा गोंधळ होण्यासारखं काय

sagarpdy
Fri, 12/04/2015 - 14:24 नवीन
एवढा गोंधळ होण्यासारखं काय आहे ते समजेना झालाय !
जसे मीटर भौगोलीक अंतरमोजण्याच्या गरजेपोटी, ग्रॅम वजन (खरे तर वस्तुमान) मोजण्याच्या गरजेपोटी, इ. इ. इ. आहेत तसेच काळ मोजण्यासाठी वर्षे, दिवस, तास, मिनीटे, सेकंद आहेत.
आता जर अंतर, वस्तुमान या मिती असून त्याच्या मापनाची एकके मानवनिर्मित आहेत असे मान्य असेल, तर काळ हि मिती असून एकके मानवनिर्मित आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी. मानव जाती नष्ट झाल्याने जर अंतर/वस्तुमान या मिती संपणार नसतील, तर काळ हि मिती का संपावी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

Observer (निरीक्षक) नसताना

pacificready
Fri, 12/04/2015 - 14:38 नवीन
Observer (निरीक्षक) नसताना त्या गोष्टीचा relevence (असलं काय नसलें काय) राहत नाही. हे म्हणजे 'बघा मी आल्यापासनं बघतोय, इथं ना काही नव्हतं 5 वर्षापूर्वी. आता भसभसा बिल्डिंगा वाढल्यात' सारखं आहे. एका विशाल पटलावर माणूस नावाच्या तथाकथित बुद्धिवादी प्राण्याच्या मेंदूत आलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी 'कुणी गोविन्द घ्या, कुणी गोपाळ घ्या' चालीवर कुणी 'वाय' घ्या कुणी 'झेड' घ्या कुणी 'वायझेड' दोन्ही घ्या कुणी शुन्य घ्या असला काही घोळ आहे. (एक्स आपल्याला बीजगणितात सापडतो. एंगेज आहे ना तो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

relevance नसला तरी अस्तित्व

sagarpdy
Fri, 12/04/2015 - 15:23 नवीन
relevance नसला तरी अस्तित्व नष्ट होत नाही. परंतु या "अस्तित्वाबद्दलच" काही लोकांची शंका दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

'अस्तित्व' हीच तर शंका आहे

संदीप डांगे
Fri, 12/04/2015 - 15:26 नवीन
'अस्तित्व' हीच तर शंका आहे राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

का ? जरी मानवी अस्तीत्व

sagarpdy
Fri, 12/04/2015 - 15:32 नवीन
का ? जरी मानवी अस्तीत्व गुर्जीनी सांगितल्याप्रमाणे नखाएवढेही नाही, तरी दोन हात लांबीचा 'इतिहास' आहेच ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा