✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ?

श
शेखरमोघे यांनी
Mon, 11/23/2015 - 21:52  ·  लेख
लेख
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 शीर्षकच गोन्धळवून टाकणारे वाटते ना ? बरोबर - कारण आता कोणीच सामिष किंवा निरामिष खात नाही (बंगाली सोडून - ते मात्र अजूनही हे शब्द रोजच्या जीवनात वापरतात), आता तर कोणीच "शाकाहारी" किंवा "मांसाहारी" सुद्धा नसतात तर "व्हेज्ज" (बहुशः "प्युव्वर व्हेज्ज") किंवा "नॉन व्हेज्ज"च असतात, कदाचित "शाकाहारी" किंवा "मांसाहारी" असणे हे out of fashion झाले असावे किंवा मांसाहारी न म्हणता "नॉन व्हेज्ज" म्हटल्याने हा महामानव नुकताच आकाशातल्या बापाशी हस्तांदोलन करून आला असावा असा ग्रह करून देणे सोपे जात असावे (बहुशः "प्युव्वर व्हेज्ज" म्हणणारे "असा कसा हा नॉन व्हेज्ज नाही" ही टीका चुकवायला बघत असावेत). असो : मला काही काळ प्रश्न पडला आहे - का बरे "सामिष" या शब्दात काहीतरी "आमिष" सामील केले गेले असावे - जसे मासा गळाला लागण्याकरता लावावे लागते? असे आमिष नसेल तर "सामिष" पदार्थाना थारा न मिळता म्हणून? मला असे वाटायला प्रथम लागले ते साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी - जेव्हां "mad cow' रोग (जो गायी-बैलाना होतो) आणि त्यानंतर Creutzfeldt–Jakob disease (vCJD or nvCJD, जो माणसाना होऊ शकतो) या बद्दलची माहिती पहिल्यांदा माझ्या वाचण्यात आली. प्राण्याना देण्यात येणाऱ्या खाद्यात जर प्राणिज आणि दूषित अन्न (जसे दळलेले वाळवलेले प्राण्यांचे मांस/हाडे/रक्त ज्यातून सगळे सजीव जीवाणू काढले गेलेले नाहीत) मिसळले गेले असेल तर ते सजीव जीवाणू नंतर "विषाणू" मध्ये बदलू शकतात. असे विषाणू गायी-बैलाना "वेडे" (म्हणून mad cow हे रोगाचे नाव - ज्याला वैज्ञानिक नाव आहे Bovine Spongiform Encephalopathy) करू शकतात म्हणजेच अशा "आजारी" झालेल्या गायी-बैलाना हळू हळू स्वतःचे जीवन चालू ठेवण्यास जरूर असणारे खाणे पिणे देखील न जमता काहीतरी लहानशा कारणानेही ती उधळतात, बिथरतात, धडपडतात आणि काहीही व्यवस्थित करणे जमत न राहील्याने खंगून मरतात. अशा रोगाने बाधित गायी-बैलांचे मांस माणसांच्या खाण्यात आल्यास त्यांना Creutzfeldt–Jakob disease (vCJD or nvCJD) होऊ शकतो ज्यामध्ये माणसांची देखील परिस्थिती "mad cow" सारखी होऊन त्यातून फक्त मृत्यूनेच सुटका शक्य होते. अमेरिकेत गायी बैलांच्या खाण्यातील प्रथिने वाढवण्याकरता सोयाबीन, शेंगदाणा असे वनस्पतीजन्य पदार्थ उपलब्ध असल्याने प्राणिज पदार्थ फारसे वापरले जात नसत. युरोपात, विशेषतः इंग्लंडमध्ये तसे नसल्याने, ही समस्या तेथे गंभीर होती. जरी या रोगाने जगभरात ५०० पेक्षा कमी माणसे मृत्युमुखी पडली तरी हा रोग आटोक्यात आणण्याकरता इंग्लंडमधील mad cow आजाराची लागण झाल्याची शंका असलेल्या सुमारे ५ लाख गायी-बैलाना आणि इतर जगातील सुमारे तेव्हढ्याच गायी-बैलाना मारून त्यांचे मांस आणि सर्व अवयव जाळून टाकावे लागले. या रोगांना कारणीभूत असणारे विषाणू हे "virus" असावेत का एखाद्या तऱ्हेचे प्रथिन की ज्यामुळे मेंदूच्या क्रियेत उलथापालथ होऊ शकते, हे निश्चित होऊ न शकल्याने काही काळ "गायी बैलांचे मांस खाणे टाळा" असाच फक्त उपाय Creutzfeldt–Jakob disease टाळण्याकरता उपलब्ध होता. आता प्रगत देशातले कायदेकानू काटेकोरपणे जनावरांच्या खाद्यान्नात प्राणिज पदार्थांचे प्रमाण किती असावे हे ठरवतात आणि त्याची अंमलबजावणी करतात आणि म्हणून गायी बैलांच्या मांसाचा पुरवठा करणारे त्यांच्या "माला"ची खात्री देतात. पण असे काटेकोर कायदेकानू आणि त्यांची अंमल बजावणी नसलेल्या इतर देशातल्या गायी बैलांच्या मांसाबद्दल काय खात्री धरावी? त्या आधी १९५६ सालापासून जपानमधल्या मिनामाता या बंदरातल्या रहिवाशांना (मुख्यतः मासेमारी करणारे कोळी) आणि विशेषतः तेथील वाढत्या वयाच्या मुलामुलीना तसेच अनेक घरगुती जनावरांना (जसे मांजरे किंवा कुत्री, जी माणसांचे उरलेले अन्न खातात), हातापायातील संवेदना जाणे, हातापायाची बोटे वाकडी होऊन चालता फिरता न येणे अशी सुरवात होत शेवटी जगायला लागणाऱ्या अनेक हालचाली करता न येण्याने मृत्यू अशा अनेक अनाकलनीय तक्रारींने अनेक वर्षे ग्रासले होते. या तक्रारींचे कारण शोधताना लक्षात आले की त्यांच्या खाण्यात आलेल्या सागरी अन्नपदार्थात (मासे, कालवे, खेकडे इ. इ.) कारखान्यांतून समुद्राच्या पाण्यात सोडलेल्या उत्सर्गातून समुद्रात आलेला पारा साठलेला असे आणि असा त्यांच्या खाण्यात - अति सूक्ष्म प्रमाणात - आलेला पारा त्याना होणाऱ्या सर्व त्रासाचे मूळ होते. सुमारे ३० वर्षे चाललेल्या संशोधनानंतर या सर्व प्रकाराचे मूळ चिसो नांवाच्या कंपनीच्या कारखान्यातून पारा असलेल्या द्रव्यांच्या समुद्रात होणाऱ्या उत्सर्गात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा कारखाना बंद करण्यात आला. "mercury poisoning" हा एक नवा शब्द जो शब्दकोषात त्यानंतर आला त्याचा अर्थ कदाचित "मानवाने रत्नाकरावर केलेल्या अत्याचारांचे उट्टे काढण्याचा समुद्राने केलेला प्रयत्न" म्हणून देणे उचित ठरेल. इतरत्र अशा रोगाचा अजून तरी प्रादुर्भाव झाल्याचे आढळलेले नाही. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतल्या हडसन नदीत दिसून आला - जनरल इलेक्ट्रिक या कंपनीने नदीत सोडलेल्या Polychlorinated Biphenyls (PCB) या कर्करोगजनक रसायनाचा लहान माशांच्या शरीरात प्रादुर्भाव झाल्यावर हे मासे खाणाऱ्या मोठ्या माशांच्या शरीरातही हे रसायन जमा होत राहिल्याचे आढळून येऊ लागले. त्यामुळे हडसन नदीत सुमारे ३०० मैलाच्या टापूत मासेमारीला बंदी घालण्यात आली आणि नदीच्या पाण्याची सफाई करण्याचे अत्यंत खर्चिक काम अजूनही चालू आहे. अमेरिकेतल्या इतर अनेक नद्यात आढळात आलेले लिंगभेदरहित/द्विलिंगी (hermaphrodite) बेडूक किंवा मासे अशा घातकी रसायनांच्या परिणामाने झाले असावेत. अमेरिकेतील उदाहरणे देण्याचे कारण एव्हढेच की इतरत्र अशा अनैसर्गिक चमत्कृतींचा फारसा अभ्यास आणि पाठपुरावा केला जात नाही आणि त्यामुळे असेच इतरत्रही घडत असल्यास त्याबद्दलची माहिती सहजी मिळत नाही. मुंबई किंवा इतर तत्सम दाट लोकवस्ती, जहाजांची ये-जा आणि कारखान्यांचा उत्सर्ग असलेल्या शहरांजवळच्या समुद्रात ज्या ज्या वस्तू, रसायने, कचरा, जहाजातून गळणारे तेल आणि मानवी सांडपाणी/ मैला इ. इ. फेकले जाते त्यांचा तिथल्या समुद्री जीवांवर काय परिणाम होतो, त्या पाण्यातले कुठले घातक भाग अशा सागरी जीवांच्या शरीरात साठून राहू शकतात आणि त्यानंतर अशा "बाधित" जीवांना आपल्या उदरात नियमित आश्रय देणाऱ्या "नॉन व्हेज्ज" महात्म्यांवर त्या सगळ्या समुद्री कचऱ्याचा दीर्घकाळचा परिणाम काय असू शकतो हे कोणीही संकलित करत नसल्याने सध्यातरी गूढच आहे. त्याचप्रमाणे नदीकाठच्या दाट लोकवस्ती आणि कारखान्यांचा उत्सर्ग असलेल्या पाण्यात जी रसायने, कचरा आणि मानवी सांडपाणी/ मैला इ. इ. फेकले जाते त्यांचा तिथल्या नदीच्या पाण्यातल्या जीवांवर (की जे माणसाच्या अन्नसाखळीचा भाग होऊ शकतात) काय परिणाम होतो हे देखील तपासण्याची जरूर आहे. . थोडाबहुत हाच प्रकार मानवी नियंत्रणाखाली वाढवल्या जाणाऱ्या इतर "नॉन व्हेज्ज" कच्च्या मालाच्या बाबतीत होतो. मागणीप्रमाणे जिवंत/ "fresh" सोललेल्या कोंबड्या विकणाऱ्या दुकानांच्या जवळपासची कोंबड्यांची खुराडी जर रस्त्यालगत कुठे असली तर तिथून जाताना काही मिनिटे आजूबाजूच्या वातावरणातल्या उडत्या पिसांच्या आणि पांढऱ्या, पिवळ्या आणि तांबड्या अशा विविध रंगाच्या आणि वासाच्या भुकटीच्या वर्षावात नाक बंद करून पुढे वाट काढावी लागत असतानासुद्धा तिथे असलेली गिऱ्हाईकांची गर्दी बघून "नॉन व्हेज्ज" खाणारे लोक निधड्या छातीचे असतात कां (स्वतःच्या तसेच घरच्या इतरांच्या) जीवावर उदार असतात हे मला ठरवता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय कुक्कुट पुराण आणखीनच घोळ घालते - तज्ञाना अजून हे ठरवता आलेले नाही की मागच्या काही वर्षांत कोंबडीचा आकार सतत का वाढतो आहे ? चांगल्या पैदाशीमुळे का वेगवेगळी औषधे (जसे antibiotics आणि growth hormones) वापरल्यामुळे? जगातल्या वाढत्या hormones शी संबंधित आजारांचा/समस्यांचा (जसे मुली ९ -१० व्या वर्षीच वयात येणे) अशा "औषधीयुक्त" कोंबड्या आहारात असण्याशी काही संबंध आहे का? माझ्या एका आशियाई देशातल्या वास्तव्यात एकदा शहरातल्या मंडईवर देखरेख करणाऱ्या विभागाच्या लक्षात आले की सोललेल्या कोंबड्या विकणाऱ्या दुकानांत विकायला असलेल्या कोंबड्यांना formalin (जे मयत व्यक्तीचे शरीर दफ़नाच्या वेळेपर्यंत टिकवण्याकरता वापरले जाते) टोचून "चिरयौवना" (विकल्या जाईपर्यंत) ठेवले जात होते. त्यावर बराच आरडाओरडा झाला तरी अशा चिरयौवना कोंबड्या ओळखण्याची सहज सोपी पध्दत न मिळाल्यामुळे विकायला असलेल्या सर्व कोंबड्या जप्त करून त्यांची तपासणी केल्याखेरीज कोंबड्यांना formalin टोचल्याचे सिद्ध करणे शक्य नव्हते. बिरबलाच्या तोडीच्या कुणातरी महात्म्याच्या लक्षात एक युक्ती आली - ज्या कोंबड्यांना formalin टोचण्यात आलेले असे त्यांच्या जवळपास सुद्धा माशा फिरकत नसत मात्र ज्या कोंबड्या अशा "दिखाऊ" तयार केलेल्या नसत त्यांच्यावर मात्र माशा घोंघावत. विकत घेणारे मात्र धर्मसंकटात - formalin ने सजवलेली (आणि सुजवलेली - कारण जितके हे द्रव्य टोचले गेलेले असेल तितके कोंबडीचे वजनही वाढले) कोंबडी घ्यावी का माशा घोंघावणारी? मानवी नियंत्रणाखाली वाढवल्या जाणाऱ्या ("aquaculture") कोळंबी, वेगवेगळ्या तऱ्हेचे मासे अशा जलचरांच्या बाबतीत तर प्रश्न आणखीनच जटिल होतो कारण या बंदिस्त पाण्यात वाढवल्या जाणाऱ्या जातीना त्यांच्या स्वास्थ्याकरता खाद्यातून प्रतिजैविके (antibiotics) दिली जातात. या प्रतिजैविकांची मात्रा कायद्याने कितीही नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी प्रत्यक्षात (खर्च कमी करण्याकरता) ही मात्रा जरूरीपेक्षा कमी असेल तर अशा जलचरांना त्यांच्या शरीरांत वाढणाऱ्या salmonella सारख्या सूक्ष्म जीवांना (micro-organisms) रोखणे कठीण होते आणि मग असे सूक्ष्म जीव या जलचरांच्या माध्यमातून मानवी शरीरातही प्रवेश मिळवू शकतात. पण गंमत ही की ही मात्रा जरूरीपेक्षा जास्त किंवा कमी कशीही असेल तरी अशा जलचरांच्या शरीरांत वाढणाऱ्या सूक्ष्म जीवांना विविध प्रतिजैविकांची इतकी सवय होऊ शकते की असे सूक्ष्म जीव मग बऱ्याच प्रतीजैविकाना दाद देत नाहीत. असे सूक्ष्म जीव व्यवस्थित शिजवल्याने जरी नाश पावत असले तरी शिजवण्याआधी "normal" (म्हणजे ज्यांना प्रतिजैविके मारू शकतात) किंवा प्रतिजैविकाना दाद न देणाऱ्या अशा कुठल्याही तऱ्हेच्या सूक्ष्म जीवांचा उपसर्ग माणसाना होऊ शकतो. मर्यादित प्रमाणात झालेला "normal" सूक्ष्म जीवांचा उपसर्ग औषधोपचाराने बरा होऊ शकला तरी जास्त गंभीर उपसर्ग जीवावर बेतू शकतो. प्रतिजैविकाना दाद न देणाऱ्या सूक्ष्म जीवांचा उपसर्ग झालेल्या माणसाना जरूर असेल तेव्हां प्रतिजैवके लागू न पडण्याचा (जसे इतर जीवावरच्या दुखण्यात) आणि त्यामुळे मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. अशा super (प्रतिजैविकाना दाद न देणाऱ्या) सूक्ष्म जीवांचे अजाणते उत्पादक या रूपांत कांही व्यक्ती इतरांकरता धोकादायक ठरू शकतात . अशीच समस्या जनावरांना त्यांच्या स्वास्थ्याकरता खाद्यातून प्रतिजैविके जेव्हां दिली जातात तेव्हांही उद्भवते. "जीवो जीवस्य जीवनम" हा जीवन नियम ज्या काळांत लिहिला गेला त्यानंतर ज्ञानात बरीच भर पडली आहे. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या पेशींची रचना वेगवेगळी असल्याने आता हे लक्षात येते की वनस्पती सहसा बाहेरच्या सूक्ष्म जीवांना अवास्तव वाढू देण्याइतपत जीवनाधार देऊ शकत नाहीत (जर कीड लागलीच तर ती त्या वनस्पतीला संपवून टाकते आणि त्या नंतर तिला दुसरे "घर" बघावे लागते) पण प्राणी अनेक सूक्ष्म जीवांना "बाळगून" राहू शकत असल्याने अनेक निरुपद्रवी सूक्ष्म जीवांना त्यांचे "घर" बनलेल्या प्राण्याच्या आधाराने फोफावता येते किंवा उपद्रवी स्वरूपात बदलताही येते. असा प्राणी मग ज्याचे भक्ष्य बनेल त्याच्या पेशीना असे आगंतुक जर काबूत ठेवता आले नाहीत तर "शिकार करने को आये, शिकार हो के चले" असा प्रकार होतो. त्यामुळे जरी वनस्पतींवर कीटकनाशकाची वगैरे फवारणी झालेली असेल, त्या घाणेरड्या पाण्यात वाढवलेल्या असल्या किंवा जरी त्यांना कीड लागलेली असली तरी स्वच्छ धुवून, व्यवस्थित चिरून खराब दिसणारा/वाटणारा भाग काढून टाकून नीट शिजवलेले वनस्पतीजन्य अन्नपदार्थ सहसा धोकादायक ठरत नाहीत. पण असेच उपाय केल्यावरही प्राणिज पदार्थांची खात्री बाळगता येणे कठीण ठरते. तेव्हा आज काय बरे खावे - सामिष का निरामिष या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. कुठलाच जैविक धोका पत्करायचा नसेल तर (स्वच्छ धुतलेला) पुठ्ठा किंवा गवतच बरे ! ! जिज्ञासूनी जास्त माहिती करता पहावे : https://www.uaex.edu/publications/pdf/FSA-8007.pdf http://envirocancer.cornell.edu/factsheet/diet/fs37.hormones.cfm http://www.petaindia.com/issues/animals-used-for-food/vegetarian-vegan-starter-kit-2/chickens/ https://www.aspca.org/fight-cruelty/farm-animal-cruelty/chicken-faq https://thetruthaboutag.wordpress.com/2014/11/13/the-truth-about-hormone-free-chickens https://thetruthaboutag.wordpress.com/2014/12/29/the-truth-about-antibiotics-in-chickens https://en.wikipedia.org/wiki/Bovine_spongiform_encephalopathy http://www.eoearth.org/view/article/154624/ https://en.wikipedia.org/wiki/Minamata_disease http://www.petaindia.com/issues/animals-used-for-food/vegetarian-vegan-starter-kit-2/deadly-poisons-sea/ http://cspinet.org/foodsafety/riskymeat.html http://www.globalmeatnews.com/Industry-Markets/Indian-poultry-farmers-continue-use-of-growth-promoters-despite-official-ban http://www.dailymail.co.uk/news/article-2388444/How-drugs-pumped-supermarket-chickens-pose-terrifying-threat-health.html http://www.huffingtonpost.com/2011/01/31/hormones-in-food-should-y_n_815385.html?ir=India&adsSiteOverride=in http://articles.mercola.com/sites/articles/archive/2008/11/29/you-need-to-know-this-if-you-eat-tyson-chicken.aspx http://www.reuters.com/article/2014/07/17/us-money-chicken-organic-idUSKBN0FM24Q20140717 http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:I7IfPr8YmrIJ:www.cseindia.org/userfiles/Antibiotics%2520in%2520Chicken_Lab%2520Report_Final%252029%2520July.pdf+&cd=19&hl=en&ct=clnk&gl=in https://en.wikipedia.org/wiki/Bovine_spongiform_encephalopathy http://www.nytimes.com/2015/10/29/science/though-labeled-wild-that-serving-of-salmon-may-be-farmed-or-faux.html?_r=0 https://en.wikipedia.org/wiki/Pollution_of_the_Hudson_River http://www.petaindia.com/issues/animals-used-for-food/vegetarian-vegan-starter-kit-2/dark-truth-behind-milk-myth/ http://cspinet.org/foodsafety/abr.html http://cspinet.org/new/pdf/outbreaks_antibiotic_resistance_in_foodborne_pathogens_2013.pdf http://cspinet.org/reports/chemcuisine.htm https://en.wikipedia.org/wiki/Salmonellosis https://www.aspca.org/fight-cruelty/farm-animal-cruelty/factory-farmed-chicken-issues-and-alternatives http://edition.cnn.com/2015/11/04/health/california-crab-warning/index.html?iid=ob_article_organicsidebar_expansion&iref=obnetwork https://www.facebook.com/gary.yourofsky/videos/897708256951090/?fref=nf http://www.fao.org/3/a-a0282e.pdf (क्रमशः)

Book traversal links for अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ?

  • ‹ अन्नदाता सुखी भव भाग ५ - नव विचार
  • Up
  • अन्नदाता सुखी भव (क्रमशः) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
25338 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

मोघेसाहेब,

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/26/2015 - 02:17 नवीन
मोघेसाहेब, या मालिकेतले तुमचे अगोदरचे लेख ऐतिहासिक/शास्त्रिय सत्यांवर आधारलेले होते. आवडलेही. मात्र या लेखात अनेक दाव्यांत शास्त्रीय गडबड झालेली आहे. विषेशतः खालील मुद्दे लक्ष देण्यायोग्य आहेत... १. जीवाणू-विषाणूंच्या व्याख्या व त्यासंबंधीचे दावे शास्त्रीय नाहीत. २. फॉर्मॅलीनचा वास इतका उग्र (पंजंट) असतो की त्याचा उपयोग माणसांनी खाण्यासाठी मारलेल्या कोंबड्यांत करण्यासंबंधी तुम्ही दिलेल्या दुव्याच्या वार्ताहराचा नक्की काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. ३. mercury poisoning फार प्राचीन कालापासून माहित आहे. आधुनिक शास्त्रालाही त्याची ओळख जपानी उदाहरणाच्या फार अगोदरपासून आहे. ४. पाण्यात / जमिनीत असलेल्या रासायनिक तत्वे प्राणी व वनस्पती या दोन्हीही प्रकारच्या जीवांत जातात आणि त्यांना खाणार्‍या माणसांना त्यापासून धोका होऊ शकतो... यात मांसाहारी / शाकाहारी यांच्यामध्ये फार फरक करता येत नाही. तसेच वनस्पतीने शोषलेली रासायनीक तत्वे अथवा तिच्यातील जीवाणू-विषाणू वनस्पतीचा एखादा भाग कापून दूर होत नाहीत. ५. अन्नतील जंतूंच्या बाबतीत म्हणायचे झाले तर मांस शिजवल्यावर (विषेशतः भारतात तर मांस उत्तम शिजवल्याशिवाय) त्यातले बहुतेक सर्व जंतू व विषाणू (बर्ड फ्लू चेही) मरतात व रोगकारक राहत नाहीत. मात्र अनेक शाकाहारी पदार्थ (फळे, भाज्या, इ) कच्च्या स्वरूपात नेहमीच खाल्ल्या जातात. त्यामुळे जंतूंमुळे होणाया अन्न्संसर्गाचे प्रमाण शाकाहारी पदार्थांत जास्त असून शकते. मात्र काही जंतूंनी तयार केलेले विषारी पदार्थ शिजवून नष्ट होत नाहीत व त्यापासून विषबाधा होऊ शकते. ६. "जीवो जीवस्य जीवनम" ने सुरु होणर्‍या पॅराग्राफमध्ये लिहिलेले दावे शास्त्रिय नाहीत, कारण... (अ) उत्तम परजीवी तोच जो आपल्या पालक जीवाचे आयुष्य धोक्यात आणत नाही. अश्या तर्‍हेने पालक जीव जास्त वेळ जिवंत राहिल्याने परजिवीही जास्त वेळ जिवंत राहतो व पालक जीवाच्या जीवावर मजा करू शकतो ! जे परजीवी आपल्या पालक जीवांना लवकर मारतात किंवा खूप त्रास देतात त्यांना एकतर पालक जीव मेल्यामुळे अथवा पालक जीवाने उपाय केल्याने दुसरा पालक जीव शोधत फिरावे लागते. (आ) वरचे ४. मध्ये दिलेले कारण, इत्यादी. असो. या मालिकेतले तुमचे अगोदरचे लेख बर्‍यापैकी ऐतिहासिक/शास्त्रिय सत्यांवर आधारलेले होते. आवडलेही. आताही तुमच्या हेतुबद्दल अजिबात संशय नाही पण संदर्भ शोधताना त्यांच्या सबळतेची व विश्वासार्हतेची खात्री केली असतीत तर ह्या लेखाचा विषयही एका उत्तम लेखाचे कारण बनून तुमच्या एकंदर मालिकेत शोभून दिसला असता. तसा तो नाही याचे सखेद आश्चर्य आहे. हा प्रतिसाद केवळ मानवी अन्नासारख्या अत्यंत महत्वाच्या व रोजच्या आयुष्याशी संबंधीत विषयाबद्दल गैरसमज टाळावे यासाठीच लिहिला आहे.
  • Log in or register to post comments

१. जीवाणू-विषाणु : कदाचित

शेखरमोघे
गुरुवार, 11/26/2015 - 22:40 नवीन
१. जीवाणू-विषाणु : कदाचित standard/consistent परिभाषा न वापरल्याचा परिणाम म्हणून गोन्धळ झाला आणि वाढला. विस्तारित अर्थ "हानिकारक सूक्ष्म जीव" असा घेतल्याने हा गोंधळ कमी/दूर व्हावा. २. कोम्बड्यात टोचलेले फॉर्मॅलीन : गैरसमज ? मी २००६ मध्ये जकार्ता, इंडोनेशियामध्ये प्रत्यक्ष अनुभवलेली घटना-शृंखला अशी होती : बऱ्याच wet markets (मी ज्या करता मंडई हा शब्द वापरला आहे, या जागा - भारतातील अनुभवावर जाऊ नका - बऱ्याच स्वच्छ असतात - मध्ये जी जिवंत/सोललेली कोंबडी विकतात, त्याकरता शीतपेट्या वापरत नाहीत, कारण त्यांच्याकडे फारसा "माल" फार वेळ साठवला जात नाही) वर Public Health Dept /पोलिस यांनी धाड घालून "for violation of food safety" कोंबड्या जप्त केल्यावर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यानुसार या कोंबड्यांमध्ये "formalin" असल्यामुळे त्या विकण्यावर निर्बंध असल्याबद्दल कळले. फॉर्मालीन नसल्याचे कसे ओळखावे हा नुस्खा street level local talks मधून मिळाला. बरेच (including most expatriates) मग super markets कडे वळले आणि wet markets मध्ये कोंबड्या खरिदणारे एकदम कमी झाल्याने काही काळ त्यांना हा धंदा बंद ठेवावा लागला. अर्थात गाडी काही महिन्यांनी काही प्रमाणात मूळ पदावर आलीच पण पुन्हा फॉर्मालीन वापारले जाऊ लागले का हे कळणार नाही. हा माझा कल्पनेचा खेळ किंवा गैरसमजूत असे काही नाही हे पुढील बातम्यात दिसेलच (एक ऑस्ट्रेलियात प्रकाशित आणि दुसरी जकार्तातील expatriate forum मधील) http://www.smh.com.au/news/World/Formaldehyde-food-scare-in-Indonesia/2006/01/09/1136771495164.html http://www.livinginindonesiaforum.org/showthread.php/20017-Formaldehyde-use-as-food-preservative मी आधी दिलेल्या २०११ मधल्या इंडोनेशियातील बातमीत "असे जे आधी व्हायचे, ते पुन्हा होते आहे" अशा स्वरूपात ती बातमी दिली आहे. आणखीही एका इंडोनेशियन "local" आणि "natural" कोंबड्या विकणाऱ्या कंपनीने "इतर लोक काय करतात" याची माहिती देताना "असे होते" या प्रकारातही ही माहिती दिली आहे (इंग्रजी यथातथाच असले तरी मतितार्थ लक्षात येईल) http://natural-poultry.com/en/frozen-chicken-more-safe/ इण्डोनेशियातील एका विश्वविद्यालयाने केलेला एक study दिलेला आहे http://faperta.unsoed.ac.id/content/studi-kandungan-formalin-pada-daging-ayam-segar-di-pasar-kliwon-kabupaten-temanggung या स्थळी (स्थानिक भाषेत, पण abstract इंग्रजीत दिला आहे), ज्यात दिसले की The results of the study showed that 21 samples (63.6%) out of 33 samples of chicken meat which sold in the Kliwon market Temanggung positive contain formaldehyde 10.003 to 20.202 ppm (mg / L). इतर देशांबद्दल फॉर्मालीनचा वापर होण्याच्या संदर्भात अशीच माहिती इथे दिली आहे आशिया खंड आणि वेगवेगळे अन्न पदार्थ ज्यात कोम्बडीही आहे:http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2007/06/16/AR2007061600535.html नायजेरिया व आजूबाजूचे आफ्रिकन देश: http://osesistalking.blogspot.in/2013/11/formalin-problem-with-frozen.html "ASEAN देशांत असे होते" या संदर्भात फॉर्मालीनच्या अवैध आणि धोकादायक उपयोगाबद्दल माहिती इथे दिली आहे (FAO हा माहितीस्रोत जगन्मान्य असावा). http://www.fao.org/docrep/015/i2448e/i2448e00.pdf (pages 4, 12 & 13) आनंदी गोपाळरावाना (आणि इतर काहीना देखील) "हे शक्यच कसे आहे?" असे वाटत असले तरी "हे असे होऊ शकते" किंवा "झालेही असेल" हे खळखळ करत का होईना पण मान्य व्हायला हरकत नसावी, मी स्वतः डॉक्टर नसलॊ तरी. ३. mercury poisoning : जरी mercury poisoning प्राचीन कालापासून माहित असले तरी "मिनामाता" इथे १९५६ पासून पासून होत असलेले "रोग" एका अन्न- साखळीत (समुद्राच्या पाण्यात कारखान्यातील उत्सर्ग सोडला जाणे, त्यातील पारा असलेली द्रव्ये माशांच्या खाण्यात येणे आणि नंतर ते मासे माणसांच्या खाण्यात येणे) नकळत झालेल्या पाऱ्याच्या प्रवेशामुळे होत असल्याचे नक्की कळायला काही वर्षे लागली. १९५९ साली काही नुकसान भरपाई मिळण्याच्या शक्यतेमुळे उपाय शोधण्याबद्दल चाललेली चळवळ मन्दावली. १९६५ मध्ये निईगाता प्रांतात "शोवा डेङ्को"च्या कारखान्याजवळ पुन्हा तसाच प्रकार होऊ लागल्यावर स्थानिक दबावामुळे "काही तरी करायला हवे" असे म्हणत कोर्टात गेलेल्या लोकाना चिसो कंपनीकडून नुकसान भरपाई १९७३ साली तर शोवा डेङ्को कंपनीकडून नुकसान भरपाई १९७१ साली मिळण्याकरता कोर्टाने निर्णय दिले. या जपानी उदाहरणातून दिसेल की एक तर असे जिथे होईल तिथे लोकांना होणारा त्रास आणि त्याचे मूळ कारण यांचा संबंध प्रस्थापित करणे कठिण असेल आणि त्यानंतर असा उपद्रव थांबणे (आणि त्या करता काहीतरी शिक्षा होणे आणि/किंवा नुकसान भरपाई द्यावी लागणे) याला आणखीनच वेळ लागेल आणि तोपर्यंत समुद्राचे आणि लोकांच्या जीवनातले "प्रदूषण" आणि त्या अनुषंगाने होणारे आजार आणि मृत्यू चालूच रहातील. तर मुद्दा हा की समस्येची जाणीव/ज्ञान कितीही अगोदरपासून असले तरी समस्येचे निराकरण होईपर्यंत जो वेळ लागेल त्या काळात अनेकांचे जीवन (आणि जेवण) धोक्यात येऊ शकते आणि जितक्या नवीन रसायनांची समुद्रातल्या (आधीच असलेल्या) कचऱ्यात भर पडेल तितके असलेले ज्ञान तोकडे ठरत जाईल. ४. पाण्यात / जमिनीत असलेल्या रासायनिक तत्वे प्राणी व वनस्पती या दोन्हीही प्रकारच्या जीवांत जातात आणि त्यांना खाणार्‍या माणसांना त्यापासून धोका होऊ शकतो हे जरी मान्य असले तरी प्राणी व वनस्पती या दोघांच्या tolerance मध्ये फरक असल्याने त्यांना खाणार्‍या माणसांना हे लक्षात ठेवायला हवे की प्राणी वनस्पतीपेक्षा जास्त प्रमाणात रासायनिक तत्वे "बाळगून" असू शकेल. ५. उत्तम परजीवी तोच जो आपल्या पालक जीवाचे आयुष्य धोक्यात आणत नाही. अश्या तर्‍हेने पालक जीव जास्त वेळ जिवंत राहिल्याने परजिवीही जास्त वेळ जिवंत राहतो व पालक जीवाच्या जीवावर मजा करू शकतो ! जे परजीवी आपल्या पालक जीवांना लवकर मारतात किंवा खूप त्रास देतात त्यांना एकतर पालक जीव मेल्यामुळे अथवा पालक जीवाने उपाय केल्याने दुसरा पालक जीव शोधत फिरावे लागते. हे तत्व बरोबर असले तरी जोपर्यंत host जिवंत आहे तोपर्यंतच लागू पडेल. जर व्यवस्थित काम करणारी शीतपेटी उपलब्ध नसेल तर प्राणी कापून साफ-बीफ केल्यानंतर सहा तास शीतपेटीखेरीज राहिलेले प्राणिज अन्न आणि वनस्पती कापून साफ-बीफ केल्यावर सहा तास शीतपेटीबाहेर राहिलेले वनस्पतिजन्य अन्न या दोन्हीपैकी कशात जास्त हानिकारक सूक्ष्म जीव असतील? हीच तुलना आठ तासानंतर कशी होईल? दहा तासानंतर? उन्हाळ्याच्या दिवसात ? ६. काही काही प्रतिसादात "हाय, उस कम्बख्त ने कभी पी ही नही और फिर लगा है… (इथे अगदी "उंट पर से शेळ्या हाकने" पासून " हमें सिखाने" पर्यंत आपल्या पसंतीचा मजकूर टाका)" असा ध्वनी आहे. मी स्वतः साधारण १९७२ ते १९९२ पर्यंत आशिया खंडात काम करताना आणि फिरताना मुंबई पासून टोकिओ पर्यंतच्या अनेक उत्तमोत्तम ठिकाणी अनेक आशियाई आणि पाश्चिमात्य तऱ्हेचे आणि घरगुती किंवा ढाब्यापासून पंचतारांकित दर्जाचे सामिष अन्न खाल्लेले आहे. काही कारणाने जेव्हां ताटात येण्याआधीच्या काही टप्प्यांत आपले अन्न कसे असते ते वेगवेगळ्या देशात "देखल्या डोळा" पाहण्याची वेळ आली तेव्हां माझी ताटातल्या अन्नाकडे बघण्याची आणि त्याचा विचार करण्याची दृष्टी बदलत गेली. पुनः लिहावेसे वाटते आहे - शेवटी "पसंद अपनी अपनी". हे चांगले किंवा ते वाईट असे मुळीच काही नसते.
  • Log in or register to post comments

च्यायला...

अर्धवटराव
Fri, 11/27/2015 - 03:20 नवीन
चक्क संयत टाइपचा प्रतिसाद ?? ते हि लिंका बिंका देऊन ?? तुमच्यापर्यंत असहिष्णुता पोचली नाई वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

लिंकाना बळी!

साती
Fri, 11/27/2015 - 12:21 नवीन
लिंकाना बळी पडू नका हो. या लिंका म्हणजे असा प्रकार आहे- १.एम्बाल्मिंग करायला फॉर्मॅलिन वापरतात २. मीटमध्ये १० पार्ट पर मिलीयन (!)फॉर्मॅलिन सापडले ३. म्हणून कोंबडी एंबाल्मिंग केलीय असे म्हणणे म्हंजे- १. मला दोन डोळे आहेत. (चार पाच लिंका) २. गाढवाला दोन डोळे आहेत.(चार पाच लिंका) ३. मी गाढव आहे. बरं तिथे कोंबड्या इतक्या फटाफट विकतात की माल जास्तवेळ उरतच नाही. मग एंबाल्मिंगची गरज काय म्हणे? एंबाल्मिंग केल्यावर किती प्रमाणात फॉर्मॅलिन सापडू शकतं म्हणे? एंबाल्मिंग केलेलं मांस खाल्लं तर किती वेळ खाणारा जीवंत राहिल म्हणे. १० ते २० पार्ट पर मिलीयन एवढं फॉर्मॅलिन स्लॉटर हाऊस फ्यूमिगेट (निर्जंतुक करताना) रहात असेल. ते आपल्या स्वस्थ्यासाठीच निर्जंतुक करतात. एका ठराविक मात्रेपेक्षा जास्त फॉर्मॅकिन सापडणं एकवेळ फ्युमिगेशनच्या फॉर्मॅलिनचे अंधुकसे ट्रेसेस म्हणू शकतो आपण. (एक ग्लास सफरचंदाच्या ज्यूसमधून किती फॉर्मॅल्डिहाईड मिळतं ते गुगलून पहाणे) पण कोंबड्याच एंबाल्मिंग केलेत म्हणणे म्हणजे का हि ही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

बिनतोड. फॉर्मॅलिन म्हटल्यावर

गवि
Fri, 11/27/2015 - 12:49 नवीन
बिनतोड. फॉर्मॅलिन म्हटल्यावर ते खाणारे लोक जिवंत कितीवेळ राहतील हाच विचार आला होता. शिवाय ते फॉर्मॅलिन जे लॅबमधे येतं त्यात फॉर्माल्डिहाईड+मिथेनॉलही असतं असं वाटतं. पण बायॉलॉजी विषय सोडलेला असल्याने जास्ती केमिकल शंका काढल्या नव्हत्या. मुळात जे काही टोचलं ते जगात सर्वत्र कॉमन आहे का? हाही प्रश्न आहेच. शिवाय पेटा, फार्म अशा क्रौर्यवाल्या लिंक्सही दिल्या आहेत. त्यामुळे शाकाहाराकडे वळवण्याचा उद्देश लिखाणात आहे हे दिसतं आहे. ते स्पोर्टिंगली मान्य केल्यास मुळात त्यात काही अयोग्य नाहीच. पण लेखकाने साफ इन्कार केल्याने पडदा पाडून पुढील उत्तम लेखमालेची वाट पाहू...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

प्राणी वनस्पतीपेक्षा जास्त

संदीप डांगे
Fri, 11/27/2015 - 02:23 नवीन
प्राणी वनस्पतीपेक्षा जास्त प्रमाणात रासायनिक तत्वे "बाळगून" असू शकेल. हे कसे, ते सांगू शकाल का..?
  • Log in or register to post comments

लेख आणि प्रतिसाद...

मुक्त विहारि
Fri, 11/27/2015 - 09:19 नवीन
दोन्ही उत्तम. वाखूसा
  • Log in or register to post comments

१. मी म्हणतो की जगातल्या काही

शेखरमोघे
Fri, 11/27/2015 - 16:31 नवीन
१. मी म्हणतो की जगातल्या काही बाजारात विकायला ठेवलेल्या सोललेल्या कोम्बड्यात फॉर्मालिन असल्याच्या सन्शय आल्याने त्या बाजारातून हटवल्या गेल्या. २. FAO आणि इतर अनेक सन्स्था/व्यक्ती म्हणतात की जगातल्या अनेक बाजारात विकायला ठेवलेल्या सोललेल्या कोम्बड्यात फॉर्मालिन असल्याच्या सन्शय अनेक वेळा आम्हाला आलेला आहे, तेव्हा तुम्ही जेव्हा सोललेल्या कोम्बड्या विकत घ्याल तेव्हा त्यात फॉर्मालिन नसल्याची तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने खात्री करून घ्या. ३. काही लोकाना वाटते " अस कधी कुठ होत का? जगात कुठेही होत असल तरी आमच्याकडे नाही होत. आमचा कोम्बडेवाला ना, अग्गद्दी छ्छान आहे, तो कध्धी कध्धी अस्स मुळ्ळिच करणार नाही, इतकी वर्ष आम्ही त्याच्याकडे नाक, कान, डोळे आणि तोन्ड बन्द करून खरेदी केली ते गेले कुठेच. आमची अगदी जाम खात्री आहे की तो कध्धी कध्धी कध्धी अस्स मुळ्ळिच करणार नाही, तो वाटल तर अगदी गळ्ळ्याच्ची शप्पथ्थ सुध्धा घेइल". ४. मी येव्हढेच म्हणेन "अरे वा, फार छान".
  • Log in or register to post comments

संशय!

साती
Fri, 11/27/2015 - 17:04 नवीन
तुम्ही आता म्हणता सोललेल्या कोंबडीत फॉर्मॅलिन असण्याचा संशय आहे. असं म्हणतात. खात्री नाही. टेस्ट करावी. तुम्ही लेखात म्हणालात फॉर्मॅलिनने एम्बाल्म करून कोंबड्या चिरयौवना ठेवल्या जातात इतकेच नव्हे तर त्यांचे वजनही वाढवले जाते. आम्ही आता म्हणतो, ' अरे वा, फारच छान!' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

इथे तुम्हाला कोंबडी उद्योगात

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/28/2015 - 19:02 नवीन
इथे तुम्हाला कोंबडी उद्योगात फॉर्मॅलिन (फॉर्मॅल्डिहाईड) कसे आणि किती वापरायला परवानगी आहे त्याचा सबळ व शास्त्रिय पुरावा दिसेल : FORMALDEHYDE IN POULTRY FEED त्यातला कोंबडीच्या शरीरात तडक जाऊ शकेल असे फॉर्मॅलीन कसे जाऊ शकते याबद्दलचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे : "The U.S. Food and Drug Administration have amended their regulations to provide for the use of formaldehyde (37% aqueous solution) at the rate of 2.5 kg. per ton of feed as an antimicrobial feed additive for maintaining complete poultry feeds salmonella negative for up to 14 days." या फॉर्मॅलिनचे रासायनिक परिक्षेत सापडणारे पण धोकादायक प्रमाणात नसणारे अत्यंत कमी अंश कोंबड्यांच्या मांसात असू शकतात. मात्र, मांस टिकवायला (म्हणजे सगळे जंतू मारून शरीर टिकवायला) जेवढ्या प्रमाणात फॉर्मॅलिन लागते ते नक्कीच कोंबडीला व ते मांस खाणार्‍या माणसाच्या जीवाला घातक ठरू शकते. त्याशिवाय, तेवढ्या परिणामात फॉर्मॅलिनचा अत्यंत तीव्र वास त्याची सवय नसलेल्या माणसाला (पर्यायाने गिर्‍हाईकाला) जवळ उभे राहणे केवळ अशक्य करेल. त्यामुळे तशी कोंबडी विकले जाणे अशक्य आहे. हे केवळ शास्त्रिय सत्यच म्हणून नव्हे तर मानवी शरीराचे डिसेक्शन करण्याच्या दीड वर्षांच्या अनुभवाने खात्रीने सांगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

शंका

कवितानागेश
Sun, 11/29/2015 - 13:12 नवीन
फोर्मलिन मध्ये कुठलीही डेड बॉडी बुडवून ठेवतात तेंव्हा भयानक वास येत असतो हे अनुभवले आहेच. पण ते रूम टेम्परेचर ला. फ्रीझ केल्यावरही वास शिल्लक राहतो का? शिवाय फोर्मलिन मध्ये बुडवने आणि ते इंजेक्ट करणे या २ वेगळ्या गोष्टी आहेत. इंजेक्ट केल्यावर आणि फ्रीझ केल्यावर कदाचित वास येत नसेल. एक शंका म्हणून विचारतेय.
  • Log in or register to post comments

फॉर्मॅलिन शिरेतून टोचून ते

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/29/2015 - 13:29 नवीन
फॉर्मॅलिन शिरेतून टोचून ते शरीरभर पसरवणे हे शरीरांतर्गत जंतूंनी कुजण्याची प्रक्रिया सुरू करू नये यासाठी आवश्यक असते. हे नेहमीच करतात, पण व्यक्ती / प्राणी मृत होऊन बराच वेळ झाल्यावर आणि रक्तवाहिन्यांतले रक्त साकळल्यानंतर त्याची परिणामकारकता (मृत्युनंतर झालेल्या वेळेवर अवलंबून) बरीच कमी ते शून्य होते. मृत शरीर / अवयव दोन एक दिवसांपेक्षा जास्त दिवस राखून ठेवायचे असतील तरच ते फॉर्मॅलिनच्या द्रावणात बुडवून ठेवतात... उदा: कायदेशीर (मेडिकोलिगल) कारणे, वैद्यकीय महाविद्यालयातील डिसेक्शन / इतर शिक्षण, इ. या सर्व प्रकारात कमी-जास्त पण सर्वसामान्य माणसाच्या नाकाला चांगलाच झोंबेल असा वास येतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

फॉर्मालिन …… पुढे चालू (च)

शेखरमोघे
Mon, 08/21/2017 - 11:30 नवीन
फॉर्मालिन …… पुढे चालू (च) मी लिहिलेले लिखाण आणि त्यावरच्या प्रतिक्रिया पुन्हा अभ्यासल्यावर वाटले की माझ्या लिहिण्याचा अनेकांनी (त्यात डॉक्टर आणि डॉक्टरीणबाई आहेत) असा अर्थ लावलेला दिसतो आहे. १. कोणीतरी मूर्ख कोंबडीविके, सोललेल्या कोबड्या घेतात आणि विकण्या आधी बादलीभर फॉर्मालिनमध्ये बुचकळत बुचकळत त्या कोंबड्यांची अवस्था cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे त्यासारखी करून टाकतात. २. हे मूर्ख कोंबडीविके त्यानंतर अशी कोंबड्यासारखीच वाटणारी cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे, ते विकत घेणारी भोट माणसे भेटतील आणि हा "माल" विकत घेतील अशी वाट बसतात. ३. या मूर्ख कोंबडीविक्याना अशी भोट गिऱ्हाईके मिळतात देखील आणि अशी कोंबड्यासारखीच वाटणारी cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे अशा वस्तू ते कोंबडी म्हणून बिनबोभाट विकत घेतात. मी लिहिलेले लिखाण आणि त्यावरची टिप्पणी वाचल्यावर असा मतितार्थ लक्षात यायला हवा. १. कोणीही मूर्ख नसतो - ना कोंबडीविके ना विकत घेणारे. जिथे कोम्बडीविक्याला refrigeration ची मदत नसते आणि सोललेल्या कोबड्या काही तास विकल्या न जाण्याची धास्ती असते, तेव्हां त्याला त्याचे होणारे नुकसान टाळण्याकरता "काही तरी" करण्याची जरूर वाटते. त्याने खरोखरच बादलीभर फॉर्मालिनमध्ये बुचकळत बुचकळत त्या कोंबड्यांची अवस्था cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे त्यासारखी करून टाकली आणि त्यामुळे कोंबड्या indefinitely टिकवल्या तर त्या कोणीच घेणार नाही हे त्याला नक्की माहीत असते. त्याला फक्त preservative वापरून त्याचा "माल" विकण्यासारख्या अवस्थेत काही तास ठेवण्याची तजवीज करायची असते. २. हे कोम्बडीविके अशी तजवीज करण्याकरता फॉर्मालिन वापरून जॆ काही करतात ( म्हणजे काय/ कसे याबद्दलचा माझा शोध चालू, संपल्यावर details देईन) ते त्यांच्याकडच्या unrefrigerated विकाऊ कोंबड्या साधारण इतर कोंबड्यासारख्याच वाटतील आणि विकत घेणारी माणसे फ़सतील इतपतच असते. ३. या तऱ्हेची फसवणूक चालते (कधी कधी न जमल्याने उजेडातही येते) हा इशारा मी दिलेल्या वेगवेगळ्या स्रोतात आहे. "मिपा" हा मंच कोण मूर्ख आणि कोण गाढव या शोधाकरता नसून आपले अनुभव आणि विचार यांची देवाण घेवाण करण्याकरता आहे अशी माझी धारणा आहे. पुढील संदर्भ आणखी अशाच तऱ्हेची माहिती देतात - आखिर पसंद अपनी अपनी. https://en.wikipedia.org/wiki/Roxarsone http://womansenergy.com/fda-finally-proved-that-the-chicken-meat-contains-arsenic-that-causes-cancer/?t=ha https://www.bloomberg.com/news/articles/2017-07-20/poultry-farms-in-india-resemble-superbug-reservoirs-study-finds काही काळ स्थगित असलेली "अन्नदाता सुखी भव" ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा बेत आहे - कालोद्भवाणि पुष्पाणि समर्पयामि I
  • Log in or register to post comments

फॉर्मालिन …… पुढे चालू (च)

शेखरमोघे
Mon, 08/21/2017 - 11:30 नवीन
फॉर्मालिन …… पुढे चालू (च) मी लिहिलेले लिखाण आणि त्यावरच्या प्रतिक्रिया पुन्हा अभ्यासल्यावर वाटले की माझ्या लिहिण्याचा अनेकांनी (त्यात डॉक्टर आणि डॉक्टरीणबाई आहेत) असा अर्थ लावलेला दिसतो आहे. १. कोणीतरी मूर्ख कोंबडीविके, सोललेल्या कोबड्या घेतात आणि विकण्या आधी बादलीभर फॉर्मालिनमध्ये बुचकळत बुचकळत त्या कोंबड्यांची अवस्था cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे त्यासारखी करून टाकतात. २. हे मूर्ख कोंबडीविके त्यानंतर अशी कोंबड्यासारखीच वाटणारी cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे, ते विकत घेणारी भोट माणसे भेटतील आणि हा "माल" विकत घेतील अशी वाट बसतात. ३. या मूर्ख कोंबडीविक्याना अशी भोट गिऱ्हाईके मिळतात देखील आणि अशी कोंबड्यासारखीच वाटणारी cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे अशा वस्तू ते कोंबडी म्हणून बिनबोभाट विकत घेतात. मी लिहिलेले लिखाण आणि त्यावरची टिप्पणी वाचल्यावर असा मतितार्थ लक्षात यायला हवा. १. कोणीही मूर्ख नसतो - ना कोंबडीविके ना विकत घेणारे. जिथे कोम्बडीविक्याला refrigeration ची मदत नसते आणि सोललेल्या कोबड्या काही तास विकल्या न जाण्याची धास्ती असते, तेव्हां त्याला त्याचे होणारे नुकसान टाळण्याकरता "काही तरी" करण्याची जरूर वाटते. त्याने खरोखरच बादलीभर फॉर्मालिनमध्ये बुचकळत बुचकळत त्या कोंबड्यांची अवस्था cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे त्यासारखी करून टाकली आणि त्यामुळे कोंबड्या indefinitely टिकवल्या तर त्या कोणीच घेणार नाही हे त्याला नक्की माहीत असते. त्याला फक्त preservative वापरून त्याचा "माल" विकण्यासारख्या अवस्थेत काही तास ठेवण्याची तजवीज करायची असते. २. हे कोम्बडीविके अशी तजवीज करण्याकरता फॉर्मालिन वापरून जॆ काही करतात ( म्हणजे काय/ कसे याबद्दलचा माझा शोध चालू, संपल्यावर details देईन) ते त्यांच्याकडच्या unrefrigerated विकाऊ कोंबड्या साधारण इतर कोंबड्यासारख्याच वाटतील आणि विकत घेणारी माणसे फ़सतील इतपतच असते. ३. या तऱ्हेची फसवणूक चालते (कधी कधी न जमल्याने उजेडातही येते) हा इशारा मी दिलेल्या वेगवेगळ्या स्रोतात आहे. "मिपा" हा मंच कोण मूर्ख आणि कोण गाढव या शोधाकरता नसून आपले अनुभव आणि विचार यांची देवाण घेवाण करण्याकरता आहे अशी माझी धारणा आहे. पुढील संदर्भ आणखी अशाच तऱ्हेची माहिती देतात - आखिर पसंद अपनी अपनी. https://en.wikipedia.org/wiki/Roxarsone http://womansenergy.com/fda-finally-proved-that-the-chicken-meat-contains-arsenic-that-causes-cancer/?t=ha https://www.bloomberg.com/news/articles/2017-07-20/poultry-farms-in-india-resemble-superbug-reservoirs-study-finds काही काळ स्थगित असलेली "अन्नदाता सुखी भव" ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा बेत आहे - कालोद्भवाणि पुष्पाणि समर्पयामि I
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा