Skip to main content

माझा बसप्रवास

लेखक पैसा यांनी रविवार, 29/08/2010 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.” तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता. आम्ही नेहमी इथे रहाणारे लोक खाजगी बसवाल्यांच्या तावडीत सापडलेले असतो, कारण सरकारी मालकीच्या कदंबा बस फारच कमी आहेत. त्यात अनेक पुढार्‍यांच्या मालकीच्या बस आहेत, ते येन केन प्रकारेण कदंबाच्या बसेस धड चालूच देत नाहीत! ते असो. हे खाजगी बसवाले म्हणजे परमेश्वरासारखेच असतात, अवर्णनीय! कंडक्टरने गणवेष घातला पाहिजे वगैरे नियम आहेत, पण ते कागदावरच. तिकिट मागितलंत, तर “कोणत्या झूमधून आलंय हे?” अशा नजरेनं बघतील. उर्मटपणे वागता येणे हे कंडक्टर होण्यासाठीचं एकमेव क्वालिफिकेशन आहे. ड्रायव्हर ही आणखीच वेगळी जमात आहे. “आपण खरे म्हणजे जेट पायलट असायचे” असा काहीतरी त्यांचा गैरसमज असतो. ८०/९० च्या स्पीडने गाडी चालवणे, अचानक ब्रेक मारून उभी करणे इ. गोष्टीत यांची कर्तबगारी दिसते. महाराष्टृ एस. टी. ला “हात दाखवा, गाडी थांबवा” इ. नवीन घोषणांचा अभिमान असेल, पण गोव्यात ही भानगड नाहीच, कारण हात दाखवताच बस थांबतेच, भले 20 फूट आधी थांबलेली का असेना! त्यामुळे, जेव्हा गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता. गोव्यातल्या या खाजगी बसमध्ये, “२३ बसणारे, ९ उभे राहाणारे” असा बोर्ड असतो, पण उभे रहाणारे निदान ३५ तरी असलेच पाहिजेत, असा या बसवाल्यांचा समज असतो. बस कितीही भरलेली असली, तरी आणखी थोडी जागा आत आहे असा कंडक्टरचा समज असतो, आणि तो आतल्या सर्वांना “जरा दुसर्‍याच्या आणखी जवळ उभा रहा” असा प्रेमळ आग्रह करत असतो. गोव्यातले लोक बिचारे हाडाचे गरीब. ते शक्यतः भांडणं टाळतात. पण मराठी बाणा माझ्या रक्तात मुरलेला. या बस कंडक्टरला उत्तर देतेच, “काय रे, तुझ्या बहिणीला असंच सांगशील का?” यावर न चुकता, प्रतिउत्तर येतेच, “तुला बसमधून यायला कोणी सांगितलं होतं?” मंडळी, गोव्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे, कारण प्रत्येक घरात एक तरी कार असलीच पाहिजे असा अलिखित नियम आहे. अगदी आमच्या बॅंकेतले शिपाईसुद्धा कार बाळगून आहेत. त्याव्यतिरिक्त घरात जेवढे लोक लायसेंस मिळवू शकतात, तेवढ्यांच्या दुचाक्या असल्याच पाहिजेत असा दुसरा नियम आहे. शिवाय शाळेत जाणार्‍या मुलांच्या सायकली असल्याच पाहिजेत, हा जागतिक नियम आहेच. मात्र मला अशी शंका आहे, की या बसवाल्यांच्या जाचाला कंटाळूनच लोक एवढ्या गाड्या बाळगत असावेत. खरा गोंयकार गोव्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत स्कूटर/मोटरसायकलने जातो पण बसने जायचं टाळतो, पण मी काही खरी गोवेकर नव्हे, आणि त्यातून निश्चय केलेला, “न धरी चक्र करी मी” आता नोकरीसाठी रोज फोंड्याहून पणजीला जाणे तर भाग आहे. हे अंतर आहे फक्त ३० कि.मी. म्हणजे गाडीने गेलं तर ३५ मिनिटं. पण खाजगी बसला एक ते दीड तास कितीही वेळ लागू शकतो. म्हणजे असं बघा, मी बसस्टॅंडवर येते. एक बस पणजीला जाणारी उभी असते. कंडक्टर “पणजी, डायरेक पणजी” असं ओरडत असतो. ड्रायव्हर जागच्या जागीच बस पुढे मागे करत असतो. मी बसमध्ये खडकीशेजारची जागा पक़डून एक झोप काढते. हे चित्र १५ मिनिटे असंच रहातं. फक्त मधेच पाठीमागे दुसरी बस आली की दोन्ही कंडक्टरांचं भांडण पेटतं, अगदी हमरीतुमरीवर येऊन. थोड्या वेळात नवीन बसचा कंडक्टरसुद्धा आधीच्या बससाठी प्यासिंजर गोळा करू लागतो! मग बस फुल्ल भरली की पणजीच्या दिशेने रवाना होते. आणखी एक पेश्यालिटी म्हणजे कंडक्टर काही ठराविक ठिकाणी, जसं की रोड जंशन, औद्योगिक वसाहती इ.इ. च्या बस स्टॉपवर बसमधून खाली उतरून प्यासिंजर गोळा करतो! वाटेत थांबत थांबत बस सुशेगाद पणजीला पोचतेदेखील. याला साधारण एक ते सव्वा तास लागतो. आता हे सगळं रोजच घडतं. पण कधी कधी अगदी रोमहर्षक(!!??) प्रसंग घडतात. गेल्याच आठवड्यातली गोष्ट. मी सकाळी साडेनऊच्या सुमारास बसस्टॅंडवर पोचले. सुरूवातीचे सगळे सोपस्कार पार पडून बस पणजीच्या दिशेने कूर्मगतीने चालू लागली. फोंड्याहून साधारण १० एक किलोमीटर्स अंतरावर कुंडई नावाचं गाव आहे. तिथे दुसर्‍या गावाहून येणार्‍या रस्त्याचं जंक्शन आहे. झालं. आमच्या बसचा कंडक्टर तिथे खाली उतरून प्यासिंजरं शोधू लागला. एकीकडे तोंडाने “पणजी, पणजी” चा गजर सुरू होताच. एवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेली. त्याच्या हातात जिवंत खेकड्यांची माळ होती. कंडक्टरच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने ड्रायव्हरबरोबर काहीतरी कानगोष्ट केली, आणि खेकडेवाल्याबरोबर भाव करायला सुरुवात केली. पाचेक मिनिटं झाली, त्यांची बोलणी काही संपेनात. गोव्यात हे भाव करण्याचं प्रकरण् जबरदस्त आहे. देणारा सांगतो,” शंभर”. घेणारा सांगतो, “दहा” शेवटी ३०/४० ला सौदा ठरतो. हे अगदी मोठ्या मोठ्या दिसणार्‍या दुकानांतसुद्धा चालतं. इथे तर काय दोघेही रस्त्यावरचे पटाईत सौदेबाज! मधेच कंडक्टरसाहेब बाजूला फेरी मारून “पणजी, पणजी” ओरडायचं काम करून आले. परत खेकड्यांचा सौदा सुरू झाला. एव्हाना बसमधे उभे असलेले दुर्दैवी जीव चुळबुळ करू लागले. कोणी दबलेल्या स्वरात कंडक्टरच्या आई माईचा उद्धार करू लागले. मी खिडकीतून बाहेर डोकं काढून, कंडक्टरला विचारण्याचा एक क्षीण प्रयत्न केला, ”बाबा आम्ही अकरा वाजेपर्यंत पोहचू ना?” तो कुठला लक्ष देतोय! मी मनाशी विचार करतेय, ही बस आता इथून निघणार कधी? पणजीला पोचणार कधी? त्यात सध्या पाऊसपाण्याचे दिवस! पणजीला बसस्टॅंडसमोर पाण्याचं हे तळं साचलेलं असणार. त्यामुळे सॉलिड ट्राफिक जाम झालेला असणार. वाहतुक पोलीस त्या जामचा अगदी पक्का मुरांबा करण्याच आपलं काम चोख बजावत असणार. या सगळ्या अडचणीमधून बाहेर पडणं आपल्यासारख्या मर्त्य माणसाला काही शक्य नाही. तेव्हा मला ऑफिसात वेळेवर पोचवण्याची जबाबदारी मी “आकाशातल्या बापावर” सोपवून दिली आणि आपण निदान राहिलेली झोप तरी पुरी करावी अशा उद्देशाने आपले डोळे मिटून घेतले!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45736
प्रतिक्रिया 99

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

जाता जाता. बाकी"खानपान" शाकाहारी भोजन सर्वत्र उपलब्ध. माझे सलग ४ महिने वास्तव्य असताना (२०००-०१) साली व नंतर इतर अनेक १०-१२ फेरफटके केले असता स्त्री -पुरुष समानता तसेच कष्टकरी स्त्रीया सर्वत्र आढळल्या. मला तरी कुठेही अप्रिय अनुभव /प्रसंग पाहण्मात नाहीं, दैवकृपेने.

कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता.
ळोळ

बिचारी पै तै!!! प्रथम गोव्याला गेलो होतो ते आठवले "फोण्याहुन बसला का सायबां" असा विलक्षण व्यक्तिगत अदर अन बेदरकार प्रश्न विचारणारा कंडक्टर आठवला

In reply to by अक्षया

गोव्याचं माहिती नाय पण कर्नाटक बसप्रवासाबद्दलही हे तितकेच खरेय. रादर महाराष्ट्र सोडून कुठेही. ;)

नुकताच गोव्याला जाउन आलो मडगाव-पणजी प्रवास कदंबानी केला.कदंबच्या नविन बस चांगल्या आहेत

सुंदर लेख. प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असल्याने लेख जास्त भावला. प्रतिक्रिया द्यायची राहून गेली त्याबद्दल क्षमस्व.

बसप्रवासाला कंडक्टरच्या 'कर्करोगाने' असं ग्रासलं जावं हे बाकी भलतंच मनोरंजक! :) (कर्कांंची माळफुले अजुनि क्दंबात) ;) -कर्करंग

In reply to by चतुरंग

=)) नशिबाने कदंबाचे कंडक्टर चांगले शिस्तीचे असतात. पॉइंट टू पॉईंट कदंबा बसेसमधे तर कंडक्टर नसतातच. हा कर्करोग खाजगी बसगाड्यांनाच! =))

कोकणी - मराठी बोलचालीतली सोपी वाक्ये लवकर द्या. कोकणीतले संवाद का दिले नव्हते? आता ते देऊन २७-२८ फेब्रुवारीच्या बोलीभाषा नवीन मालिकेत द्याच.

In reply to by कंजूस

प्रीमो कोचिंग क्लास धागे आहेत. तरी ही घ्या. हांगा यो - इकडे ये थंय वच - तिकडे जा तुजें नाव कितें - तुझे नाव काय तू खंय रावतां - तू कुठे रहातोस्/रहातेस मात्सो रांव - जरा थांब नुस्त्याक कितलें पयशे - माशाला किती पैसे शीत दी - भात दे आमी पणजें या - आम्ही पणजीला जाऊया. हा, पण गोंयकाराना मराठी छान कळते आणि बरेच जण बोलतात सुद्धा. गोंयकाराना हिंदीपेक्षा मराठी जास्त येते. बाहेरून आलेल्या लोकाना मात्र (भय्ये, नेपाळी, केरळी वगैरे) हिंदी समजते.

मिपावर कानडी, तमिळ,गोय याचे कोचिंग क्लासिज सुरु होतील तर एक उपयुक्त साइट होईल॥ ( मी दमणच्या लेखात गुजराथी वाक्ये दिली आहेत.)

या लेखाच्या रूपाने मिळाला. मजा आली. पण माझा अनुभव मात्र चांगला आहे. चारपाच वर्षांपूर्वी. आमच्या सौ.ला कोणीतरी सांगितले की कोरगावची शांतादुर्गा ही कांदळकरांची शांतादुर्गा. मंदिरावर तसा उल्लेख आहे. मग मापशाला उतरलो. तीसगाव नाका जाणारी बस पकडली. कन्डक्टर सौ.ला कोंकणीत म्हणाला की मावशी कोरगांवला जाणारी बस यायला वेळ आहे. उगीच रस्त्यावर उभे राहण्यापेक्षा नाका आला तरी उतरू नका. बस परत येतांना उतरा. जास्त भाडे नको. त्या दुष्काळी वर्षी नेमका धो धो पाऊस कोसळत होता. येतांना उतरलो. तिथून ४ किमीवर कोरगांव. दुकानात चौकशी केली. बसला अजून ४० मिनिटे होती. एकही रिक्षा नाही. थोड्या वेळाने एक पायलट येऊन उभा राहिला. माणशी साठ रुपये, रिटर्न आणून सोडणार. पाच मिनिटे लागतील. मी तयार झालो. सौल. ला सोडून ये मग मला ने म्हणालो. तर तो म्हणाला दोघांनाही नेतो. दर्शन करा, मी थांबतो. परत आल्यावर सोडतो. त्याच्या अंगावर रेनकोट होता. पाऊस थोडा कमी होऊन भुरभुर झाल्यावर त्याने नेऊन आणून सोडले. फक्त १०० रु. घेतले. घनदाट ढगांमुळे प्रकाश कमी होता पण नाईट व्हीजनवर टाकून प्रचि मस्त निघाली. SHANTADURGA KORGAON धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

गोव्यातील बहुतेक मंदिरे अशी प्रशस्त, शांत आणि बजबजपुरी नसलेली आहेत. (आपण उत्सवाच्या वेळेस गेलो तर कदाचित वेगळे चित्र दिसेल.) शांता दुर्गा (कवळे,फातोर्फा, कुंकळी) नागेशी, मंगेशी किंवा इतर बहुतेक मंदिरे मी उत्सव नसताना पाहिली. त्यामुळे तेथे शांत पवित्र असे प्रसन्न करणारे वातावरण नेहमीच पाहायला मिळाले.

ती शांतादुर्गा आमची नव्हतीच. आमची कांदोळीला. गेल्या वर्षी तिथे गेलो. चारजण होतो म्हणून मग कारने गेलो. मग बहीण आली तिला पण जायचे होते. पग पुन्हा कांदोळीची वारी. मुलाचे लग्न झाल्यावर सुनेच्या निमित्ताने मग पुन्हा एकदा.

लहानपणी ( वोल्वो च्या आधीच काळ) पणजी ला जायचो तेव्हा तेथे राहणाऱ्या भावाचा फार हेवा वाटायचा कारण तेव्हा महाराष्ट्रात फक्त तांबडी यष्टी हि एकमेव , लक्झरी फार कमीच त्यामानाने गोव्यात भरपूर रंगबिरंगी लक्झरी बघायला मिलाळायचा आणि नुकतेच कदमब सुरु झाली होती त्यामुळे त्यागाड्या एकदम नवीन.. त्यामुळे भाऊ फुशारकी मारायचा , गोव्यात अजूनही जुना गोडवा आहे का हो? जुने गुत्ते, सध्या खानावळी का आत जेथे तेथे टुरिष्टांसाठी तंदूर चिकन आणि चिनी च्या गाड्या ? फार वर्षांनी सिंगडावर गेलो होतो आणि तेथील जेवण तसेच मराठ मोळे ठेवले आहे हे पाहून बरं वाटलं पण कॉस्मोपोलिटिन पुण्यातील "क्राऊड" मात्र " idhar तंदुरी मिलेगी क्या ?" हे विचारत फिरत होता आणि कीव आली पामरांची ( मला तंदुरी आवडते पण ते सिंहगडावर भाकरी पिठलं असताना नाही)

एक पैसा ये पैसा दो जैसा है कैसा तीन नहीं कोई ऐसा चार जैसा ये पैसा पाँच ये हो मुसीबत छह ना हो मुसीबत हो मुसीबत ना हो मुसीबत सात आठ नौ दस

हे वाचले नव्हते, मजेदार प्रकरण आहे :-)) BTW लेखिका बऱ्याच दिवसात दिसल्या नाहीत. त्यांनी ही गोवा सिरीज पुढे नेली तर वाचायला मजा येईल.

एव्हाना मुंबईतल्या बशींचे भाडे अर्ध्याने कमी झाल्यामुळे बेस्टीच्या बशींना सुगीचे दिवस आलेत. कंडक्टरला मनसोक्त ओरडून घेता येतं पब्लीकवर...