✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

झोंबाड

ज
जव्हेरगंज यांनी
Wed, 10/28/2015 - 22:51  ·  लेख
लेख
आभाळ भरुन आलं हुतं. सोसाट्याचा वारा सुटला हुता. धुळीचे लोट सगळ्या वावरात ऊठत लांबवर पसरत चाललं. आभाळातनं एकेक टिपका पडाय लागला. शेलामायनं गवताचा भारा ऊचलुन गोठ्यात ठिवला. भराभरा धुणं काढुन घरात ठिवलं. "आगं रेडकु तर सोड तेव्हढं" उंबऱ्यापाशी नुसतीच ताटकळलेली रुपी तशी भानावर आली. लगबगीनं जाऊन तिनं रेडकाचं दावं सोडलं. वढत वढत आणुन त्याला गोठ्यात बांधलं. आन पुन्हा ताटकळत तशीच ऊभी राहिली. रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच येतो. पण संध्याकाळच्या वेळेस आला की जोरदार कोसळतो. आणि अशा कातरवेळी तिच्या चित्तवृत्ती जाग्या करुन जातो. कोपऱ्यात धुणं ठेऊन शेलामायनं ऊदबत्ती पेटवली. देव्हाऱ्याच्या पुढं केळात खोचली. हाळदी कुकु लावुन फुलं ऊधळत निवद दाखवला. भक्तिभावानं होत जोडत माथा टेकवला. आभाळ फाटलं तरी शेलामायची रोजची पुजा कधी चुकली नाही. सकाळ संध्याकाळ तिचा पुजेचा कार्यक्रम ठरलेला. रुकडीआयची ती निस्सीम भक्त होती. घराम्हागं शेताच्या तुकड्यात एक छोटसं देऊळही तिनं बांधुन घेतलेलं. गळ्यात कवडीच्या माळा घालुन, सणावाराला परडी घेऊन घरोघरी ती जोगवाही मागायची. चुल पेटवुन शेलामाय धुराड्यात सैपाक करत बसली. रुपीनं काटकुटं ऊचलुन तिच्याम्होरं सरपानाला ठिवलं. तिचं पांढरफटक कपाळ बघुन शेलामायला पुन्हा एकदा कससचं झालं. बाहेर पावसाचा जोर वाढला. कंदिलाच्या मिनमीनत्या ऊजेडात रुपी भिताडाला टेकुन शुन्यात नजर लावुन बसली. अडीत-तीन वर्षाखाली तिचं लगीन झालेलं. पण आठवड्याभरातच नवरा खपलेला. तिला नवऱ्याचा चेहराही नीटसा आठवत नव्हता. त्याला नेमका कोणता रोग होता हे ही तिला नाही समजलं. पण तेव्हापासुन गोऱ्यागोमट्या रुपीचं काळं दिवस सुरु झालेलं. पुढं नुसताच अंधार वाढुन ठेवलेला. तिनं एकटक कुठेतरी बघत बसनं नित्याचचं झालं होतं. "हाय का शेलामाय घरात?" दार ऊघडुन भाऊसाहेब आत आला. तशी रुपीची तंद्री भंगली. "कोण भावसाब हायतं का?, या की" कंदिल ऊचलुन शेलामाय दरवाज्याकडं बघत नीट न्याहाळत म्हणाली. "व्हय मीच हाय, जेवन झालं का रुपे?" "न्हाय आजुन व्हय चय" रुपी खोल आवाजात बोलली. त्याचे तांबरलेले डोळे आणि हातातली बाटली तिच्या नजरेतुन सुटली नाही. भाऊसाहेबनं आत येऊन टावेलानं डोकं पुसलं. दुसऱ्या खोलीत जाऊन कापडं पण बदलली. मग तिथच खाटंवर त्यानं ताणुन दिली. शेलामायनं त्याला 'जेवायचं का?' म्हणुन पण विचारलं नाही. 'येवढ्या रात्री कसं आला?' हे पण विचारलं नाही. रुपीनं पण जास्त विचार केला नाही. भाऊसाहेब हा शेलामायच्या माहेरी नेहमी ऊठबस असणारा महत्वाचा माणुस. आपल्या लग्नाअगोदर ईकडं घरी नेहमी यायचा. नान्याला खेळवत बसायचा, फटफटीवरनं गावात फिरवुन आणायचा. पण आपलं हे असं झाल्यापासुन त्याचं घरी येणं जवळपास बंदच झालं होतं. आज तो बऱ्याच दिवसांतुन आला होता. ते पण येवढ्या रात्री. मुक्काम तर त्यानं आजपर्यंत कधीच केलेला न्हवता. रुपी विचारात हरवली. "जेवुन घी गं पोरे, आन आज पलिकडच्या खुलीत झोप, भावसाब झोपल्यातं खाटंवरं" शेलामायचा सैपाक अजुन झालाही न्हवता. पण रुपीला तिनं गळ घातली. जेवण ऊरकुन रुपीनं माजघरात अंधरुन टाकलं. हे माजघर अगदी छोटसं. तिथं बरच जुनं सामान रेचुन ठेवलेलं. घरात कोणीही पाहुणे आले तर रुपीची ही खोली ठरलेली. एरव्ही ती घरात खाटेवरच झोपायची. मिट्ट अंधारात रुपी पावसाची रिपरीप ऐकत पडली. माजघरातली ईकनं बघुन तिला तिचा बाप आठवायचा. आठ दहा वर्षापुर्वी तिचा बाप वारीला गेला होता. टाळ, मृदुंग आणि किर्तनात त्याचा जीव हरपला. घरी आला तो देवाचा नाद घेऊनच. मग पुन्हा वनवासाला गेला. तिथनं आल्यावर दाढ्या वाढवुन, कपाळावर भगवा लावुन, गळ्यात माळा घालुन गावोगावी फिरत राहिला. मग त्याचं घरी येणं बंदच झालं. रुपीला त्याचाही चेहरा काहीकेल्या आठवेना. बारका भाऊ नान्या घरी असल्यावर तिचा जीव रमायचा. मात्र तोही आता आजोळी गेला होता. नाही म्हणायला तिचा एक वर्गमित्र बाब्या जो पवाराच्या वस्तीत राहायचा तो अधुन मधुन तिचे हालहवाल विचारायचा. एरव्ही तिच्याशी बोलायला कुणीच नसायचं. घरात मायलेकी तरी किती बोलणार. रुपीचे दिवस असे हे मुकाट होत चाललेले. घरात एकटी पडल्यावर भुतकाळातला सारा पट तिच्यासमोर ऊलगडत जायचा. रात्री तिला लवकर झोपही यायची न्हाय. मग जुन्या आठवणींना कुरवाळत ती पडुन राहायची. त्यात तिला मौज ही वाटायची. पण आज येवढ्या पावसात अवेळी आलेला भाऊसाहेब तिच्यासाठी एक भलमोठ्ठं प्रश्नचिन्हं घेऊन आला होता. ऊघड्या दरवाज्यातुन बाहेर कोसळणारा पाऊस बघत ती हा गुंता सोडवत बसली. आधी हा भाऊसाहेब जेव्हा कधी यायचा, तेव्हा ऐण दुपारी दाराला आतुन कडी घालुन घरात झोपायचा. आपल्याला हे नवीन नव्हतं, पण शेलामायही कुठे नजरेस पडत नसायची तेव्हा आपला जीव खालीवर व्हायचा. मग बारक्या नान्याला खेळवत आपण गोठ्यातच बसायचो. ही आठवण खुपच जुनी. म्हणजे शेलामाय आणि भाऊसाहेब यांचं काही शिजत तर नसेल. बाहेर पावसाचा जोर अजुनच वाढला. पण येवढ्या धुवाधार पावसात आणि वाऱ्याच्या घोंघाटात पलिकडच्या खोलीतुन आलेली बांगड्याची किणकीण, हपापलेले श्वास, आणि पायांची धुसमुस तिच्या कानात शिरत गेली. रुपीची रात्र अजुनच गडद होत गेली. शेलामायनं तिला फसवलं होतं. शेलामाय ही एक निब्बर बाई होती. तिचा साजशृंगार बघुन गावकरी तिला नखरेल म्हणत. पण भांडखोर स्वभाव बघुन कोणाची तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची टाप होत नसे. रुपीला आपल्या आईचा अभिमान वाटायचा, पण आज तिनं सगळ्यालाच सुरुंग लावला होता. पलिकडुन येणाऱ्या हपापणाऱ्या श्वासांचा आवाज वाढतच चालला. रुपीच्या रोमारोमात धुंदी चढत गेली. 'सुख' म्हणजे काय हे जिला समजलंही नव्हतं तिच्या बाजुलाच ते ऊपभोगलं जात होतं. शरीरात पेटलेली धग तिला सहन होईना. मग माजघरातनं ऊठुन ती बाहेर मोकळ्या अंगणात आली. गडद अंधारात एका दगडावर बसुन ती चिंब भिजत राहिली. याआधीही जेव्हा जेव्हा तिचं शरीर बंड पुकारायचं, तेव्हा ती पावसात भिजत राहायची. पाऊस तिला आवडायचा, कारण पावसात तिचा निचरा व्हायचा. भान हरपुन रुपी तशीच बसुन राहीली. प्रश्न असा होता की शेलामायनं आजपर्यंत लपवुन ठेवलेलं गुपित आज आपल्यापुढं का फोडलं?. शेलामाय खरचं नखरेल बदनाम बाई होती का? नवरा घरातुन निघुन गेल्यावरही तिचं फारसं बिघडलं न्हवतं. घरामागच्या शेताच्या तुकड्यावरही पाटील नजर लावुन बसला होता. पण उलट तिनंच त्याच्याशी जमीनीचा सौदा सुरु केला. पाटीलही व्यवहार करायला घरी येत राहिला. पण शेलामाय त्याला खेळवत राहिली. शेतीची नांगरणी, पेरणी, खुरपणी सगळं त्याच्याकडुनचं करुन घेतलं. शेतीही ताब्यात राहिली, आणि पाटलासारख्या रांगड्या गड्याला अंगावरही घेत गेली. हा पाटीलही नंतर देशोधडीला लागला. नवरा निघुन गेला म्हणुन शेलामायनं कधी दु:ख नाही केलं. संसाराचं वाटोळं झालं म्हणुन रडत भेकत बसली नाही. कमरेला पदर खोचुन संसाराचा गाडा दिमाखानं ओढत राहिली. गरीबीची कुठलीही धग आपल्या मुलांना जाणवु दिली नाही. पाहिजे तेव्हा नव्या गड्याला जवळ करत गेली, पाहिजे तेव्हा त्यांच्याशी मनासारखं खेळत राहिली. कठोर परीस्थितीत शेलामाय आपल्या मर्जीनं जीवन जगत राहिली. रूपीनं विचार करतचं राहिली. तिच्या बोडक्या जिवनात कुठुनसा येणारा एक अंधुकसा किरण दिसायला लागला. आपण आपल्या वैधव्याचं दु:ख करत किती बसायचं. जीर्ण कापड नेसुन रडत कुजत आयुष्य घालवत लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा किती झेलायच्या. आता या सहानुभूतीवर थुंकायलाच हवे. आपणही आता निलाजरेपणाने जगायलाच हवे. आपल्याही शरीरात आग आहे, आणि ती आपल्या मर्जीनं भागवण्याचा अधिकार आपल्याला आहे. ताठ मानेनं जगत, पाहिजे त्याच्याशी खेळत, मनसोक्त जगण्याची मजा आपणाला अनुभवायलाच हवी. ऊद्याच्या बदनामीला आजची जिंदगी ओवाळुन टाकायलाच हवी. भले कोणी आपणाला नखरेल, चवचाल, बाजिंदी म्हणोत. दु:खी, कमजोर, बिचारी यापेक्षा त्या उपाध्या कधीही बऱ्या. आयुष्यात चढउतार येणारचं, पण म्हणुन आजचा क्षणिक ऊपभोग तरी का सोडायचा. आज शेलामायनं कळत नकळत तिला एक धडा घालुन दिला होता. समोरच्या वस्तीतला बाब्या आशाळभुत नजरेने आपल्याकडे बघतो. त्याच्या नजरा आपल्याला कळतचं नाही असं नाही. भर दुपारी उघड्याबंब शरीराने आपल्याकडे बघत राहतो. ऊद्या दुपारी जेव्हा घरी तो एकटाच असतो, तेव्हा त्याच्याकडे जायलाच हवे. रुपी खुदकन गालात हसली. तिला आयतचं एक माकड खेळवाय भेटणार होतं. पाऊसही आता ऊघडत चालला. पहाटेच्या गारठ्यात तिचा चेहरा टवटवीत झाला. मघापासुन हाताला झोंबणारे जास्वंदाचे एक चिंबाट फुल तिनं हलकेच तोडले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
19459 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

एक नंबर भाऊ

आनंद कांबीकर
Wed, 10/28/2015 - 23:17 नवीन
बेसुमार शब्द साठा अन चपलख निवड. बिलकूल एक नंबर.
  • Log in or register to post comments

जबराकुस....

बाबा योगिराज
Wed, 10/28/2015 - 23:43 नवीन
जव्हेर भौ, आवड्यास...
  • Log in or register to post comments

सुंदर .छोटे प्रसंगहि

दिवाकर कुलकर्णी
गुरुवार, 10/29/2015 - 00:25 नवीन
सुंदर .छोटे प्रसंगहि फुलवण्याची अप्रतिम ताक़त .
  • Log in or register to post comments

आवडेश. असंच लिहित जा.

एस
गुरुवार, 10/29/2015 - 00:38 नवीन
आवडेश. असंच लिहित जा.
  • Log in or register to post comments

तुफ्फान जमलीये!!

रातराणी
गुरुवार, 10/29/2015 - 01:19 नवीन
तुफ्फान जमलीये!!
  • Log in or register to post comments

आवडली.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/29/2015 - 01:36 नवीन
औत्सुक्याने ओथंबलेली, उत्कंठावर्धक कथा. रांगडेपणा आड दडलेलं भयाण वास्तव अंगावर येतं. छान जमली आहे कथा.
  • Log in or register to post comments

वा!

निनाद
गुरुवार, 10/29/2015 - 04:09 नवीन
वा मस्त आहे. होत जाणारा बदल खुप छान टिपला आहे...
  • Log in or register to post comments

कथा आवडली. तुमच्या कथांचे

रेवती
गुरुवार, 10/29/2015 - 05:31 नवीन
कथा आवडली. तुमच्या कथांचे पुस्तक होऊ शकेल.
  • Log in or register to post comments

भार्री

चांदणे संदीप
गुरुवार, 10/29/2015 - 06:47 नवीन
लय भार्री! नुमाइशे देख देख बाजारो मे मैने फिर तुम्हीसे हसी उधार ली - Sandy
  • Log in or register to post comments

एकच नंबर जबरदस्त!! ग्रामीण

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/29/2015 - 06:59 नवीन
एकच नंबर जबरदस्त!! ग्रामीण बाज तुमचे शक्तिस्थळ आहे जव्हेरगंज साहेब कसले विलक्षण खुलावता हो तुम्ही हे सगळे प्रचंड चित्रदर्शी लिहिता पुलेशु
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

दमामि
गुरुवार, 10/29/2015 - 07:56 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

जबराट जव्हेरगंज

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/29/2015 - 08:33 नवीन
फक्त या कथेत थोडेथोडे नागरभाषेतले शब्द येत होते ते जरा खटकलं. त्याचं कारण तुमच्या पूर्ण ग्रामीण भाषेतल्या कथापण वाचल्या आहेत आणि त्याही तेवढ्याच मस्त आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

जव्हेरगंज
गुरुवार, 10/29/2015 - 10:05 नवीन
धन्यवाद! नागरभाषेतले शब्द म्हणजे कोणते? गावरान की प्रमाण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

प्रमाण

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/29/2015 - 10:13 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

जव्हेरभाउ

चतुरंग
गुरुवार, 10/29/2015 - 21:42 नवीन
उदा. अशा कातरवेळी तिच्या चित्तवृत्ती जाग्या करुन जातो. यातला चित्तवृत्ती शब्द तुम्ही रंगवलेल्या कथेत भाषेशी आणि पात्राशी एकदम विसंगत वाटतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

येस येस, आलं ध्यानात,

जव्हेरगंज
गुरुवार, 10/29/2015 - 21:54 नवीन
येस येस, आलं ध्यानात, असे अनेक शब्द मुद्दामच टाकले होते. म्हणजे स्पष्ट लिहीण्याकरीता. पॉइंट नोटेड! (मायला , गावरान तर आपला जीव की प्राण हो, म्होरल्या वेळी असणार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

एक्झ्याक्टली!

चतुरंग
गुरुवार, 10/29/2015 - 21:40 नवीन
माझे तेच झाले! सुक्कं ओरपताना अचानक वरणभाताचा घास खाण्यात यावा तसं काहीसं! ;) पण एकूण कथेचा बाज सुंदर. आवडली! (माजी सामिषपटू)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

ओह, असं झालं तर, मला वाटलं

जव्हेरगंज
गुरुवार, 10/29/2015 - 21:47 नवीन
ओह, असं झालं तर, मला वाटलं ग्रामीण शब्द वाचताना अडखळायला येईल. म्हणुन जास्तकरुन प्रमाण शब्द वापरलेत. नेक्स्ट टाईम याचा विचार करतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नको तसं नको

भाकरी
Tue, 11/03/2015 - 00:38 नवीन
जरा अडखळलो तर काय झालं? नाहीच कळला ग्रामीण शब्दाचा अर्थ तर येउन विचारू की तुला! आणि बर्‍याचदा वाक्याच्या संदर्भाने बोध होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

भाकरी तै/भौ बिनधास्त विचारा !

जव्हेरगंज
Tue, 11/03/2015 - 00:53 नवीन
भाकरी तै/भौ बिनधास्त विचारा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाकरी

भन्नाट झालीय कथा.

प्रचेतस
गुरुवार, 10/29/2015 - 09:25 नवीन
भन्नाट झालीय कथा.
  • Log in or register to post comments

भारी!

अनुप ढेरे
गुरुवार, 10/29/2015 - 10:04 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments

मस्त! लिहित रहा.

नाव आडनाव
गुरुवार, 10/29/2015 - 10:16 नवीन
मस्त! लिहित रहा.
  • Log in or register to post comments

जमलीय.

सस्नेह
गुरुवार, 10/29/2015 - 10:43 नवीन
रांगड्या वळणाची सकस कथा.
  • Log in or register to post comments

कथा मस्त आहे.

तुषार काळभोर
गुरुवार, 10/29/2015 - 11:17 नवीन
पण कथेतलं वास्तव अंगावर येतं (तरी प्रत्येकाच्या पचनी पडेलच असे नाही).
  • Log in or register to post comments

जबरदस्त हो जव्हेरभाऊ.

अभ्या..
गुरुवार, 10/29/2015 - 11:43 नवीन
जबरदस्त हो जव्हेरभाऊ. तुमचे अनुभवविश्व जब्रा आहे. मांडायची स्टैल तर अजून अंगावर येणारी. आवडताहेत तुमच्या कथा. डेबायडे प्रगल्भ आणि अशाच ओघवत्या होत जावोत अन आम्हाला अप्रतिम लेखन वाचायची संधी मिळो ही विनंती. (सगळ्या कथांचा बॅकप ठेवा व्यवस्थित. पुढे कामाला येईलच.)
  • Log in or register to post comments

अप्रतिम जमलीय कथा

जगप्रवासी
गुरुवार, 10/29/2015 - 11:47 नवीन
रुपेची तगमग, तिच्या चेहऱ्यावरचे भाव जणू काही डोळ्यासमोर घडल्यासारखे दिसतात
  • Log in or register to post comments

वास्तव असं अंगावर येतं तुमच्या लेखनातून...

माधुरी विनायक
गुरुवार, 10/29/2015 - 12:12 नवीन
अंगावर येणारं अटळ वास्तव नेमक्या शब्दात. तुमचा कथासंग्रह लवकर यावा, शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

खूप वर्षांपूर्वी...

माधुरी विनायक
गुरुवार, 10/29/2015 - 12:15 नवीन
खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर रात्री लागणारा चेखव की कथाए हा कार्यक्रम आवर्जून बघितला जायचा. तशाच प्रकारे तुमच्या कथा वाचतानाच समोर दिसू लागतात.
  • Log in or register to post comments

सशक्त कथा..

चिगो
गुरुवार, 10/29/2015 - 13:04 नवीन
अस्सल गावरान बाजाची सशक्त कथा.. तुमचा शब्दांचा योग्य उपयोग आणि शैली आवडली..
  • Log in or register to post comments

असे किस्से बघितलेत. अगदी एकाच

प्यारे१
गुरुवार, 10/29/2015 - 13:42 नवीन
असे किस्से बघितलेत. अगदी एकाच माणसाबरोबर मायलेकी देखील. कथा म्हणून आवडली.
  • Log in or register to post comments

आजच वाचलेली ही बातमी पण पहा

अभ्या..
गुरुवार, 10/29/2015 - 14:30 नवीन
आजच वाचलेली ही बातमी पण पहा प्यारे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

दोन्ही बाजू वाईटच अभ्या...

प्यारे१
गुरुवार, 10/29/2015 - 14:47 नवीन
दोन्ही बाजू वाईटच अभ्या... (माझ्या) पहिल्या उदाहरणात बापाचं नाकर्तेपण नि दुसर्‍या उदाहरणात (बातमी) पशुत्वाचा कडेलोट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/29/2015 - 14:20 नवीन
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त चित्रण.. येकच नंबर
  • Log in or register to post comments

छान फुलवली आहे. असेच लिहीत

अरुण मनोहर
गुरुवार, 10/29/2015 - 15:11 नवीन
छान फुलवली आहे. असेच लिहीत रहा! फक्त शेवटचे वाक्य रुपीच्या गोष्टीत रचलेल्या व्यक्तीमत्वाशी सुसंगत (निदान मला तरी ) वाटले नाही. आणि ते शेवटाला असल्याने जरा जास्त खटकले. ("तिला आयतचं एक माकड खेळवाय भेटणार होतं.")
  • Log in or register to post comments

+१

पैसा
गुरुवार, 10/29/2015 - 20:29 नवीन
सहमत. कथा छान. शेवट जरा विसंगत वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

म्हणजे , फक्त ते वाक्य आवडलं

जव्हेरगंज
गुरुवार, 10/29/2015 - 21:05 नवीन
म्हणजे , फक्त ते वाक्य आवडलं नाही की शेवटचं आवडला नाही. [बाब्या हा जरी रुपीचे हालहवाल विचारायचा तरी त्याच्यात एक छुपा स्वार्थ होता. उगीच तो तिच्याकडे आशाळतभुत बघत नव्हता. रुपी त्याच्या पुर्ण आहारी न जाता केवळ त्याचा पाहिजे तसा वापर करुन घेणार होती. तिच्या खेळात तो एक माकडच असणार होता.]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

शेवट आवडला

पैसा
गुरुवार, 10/29/2015 - 21:39 नवीन
शेवट तसाच होणार. मात्र ते खेळाचं माकड करावंसं अचानक तिला वाटेल का एवढंच मनात आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

सुंदर कथा !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/29/2015 - 15:16 नवीन
सुंदर कथा ! तुमच्या कथांचा एक संग्रह करून प्रसिद्ध करण्याचे पहा.
  • Log in or register to post comments

+१ कथेला

नाखु
गुरुवार, 10/29/2015 - 15:29 नवीन
+१११ प्रतीसादालाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कथा आवडली.

मार्मिक गोडसे
गुरुवार, 10/29/2015 - 15:24 नवीन
कथा आवडली. झोंबाड शब्दाचा अर्थ काय आहे?
  • Log in or register to post comments

झोंबाड = भांडण , हाणामारी,

जव्हेरगंज
गुरुवार, 10/29/2015 - 18:32 नवीन
झोंबाड = भांडण , हाणामारी, युद्ध ( विचारांचं युद्ध या अर्थाने ) :) धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

+१

चाणक्य
गुरुवार, 10/29/2015 - 17:47 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

चाम्गले ल्हिता की भौ.

विजुभाऊ
गुरुवार, 10/29/2015 - 18:38 नवीन
चाम्गले ल्हिता की भौ. भाषेवरून तुम्ही औरंगाबादकडचे का हो?
  • Log in or register to post comments

अफाट लिहिलंय!

किसन शिंदे
गुरुवार, 10/29/2015 - 20:09 नवीन
अफाट लिहिलंय!
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

अजया
गुरुवार, 10/29/2015 - 21:35 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

बेस्टेस्ट लेखक मिपा हॅज गाॅट!

mystic man
गुरुवार, 10/29/2015 - 21:55 नवीन
बेस्टेस्ट लेखक मिपा हॅज गाॅट!
  • Log in or register to post comments

मस्तच!

आदूबाळ
गुरुवार, 10/29/2015 - 23:34 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

कथा आवडली पण

इडली डोसा
गुरुवार, 10/29/2015 - 23:48 नवीन
कथा आवडली पण व्यभिचाराला ग्लोरीफाय करणारी वाटली. रुपीला फक्त शरीरसुखासाठीच कोणितरी साथिदार हवा असा शेवट या
रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच यायचा. पण संध्याकाळच्याला आला की जोरदार कोसळायचा. मग अशा कातरवेळी तिच्या भावनांचा खेळ करत सुटायचा.
सुरुवातीनंतर अपेक्षीत नव्हता.
  • Log in or register to post comments

कथा आवडली पण व्यभिचाराला

जव्हेरगंज
Fri, 10/30/2015 - 06:49 नवीन
कथा आवडली पण व्यभिचाराला ग्लोरीफाय करणारी वाटली. रुपीला फक्त शरीरसुखासाठीच कोणितरी साथिदार हवा असा शेवट या>>>>>>>>>>> तसं नाहीये. शरीरसुख ही एक गोष्ट झाली. तशा अनेक गोष्टी आहेत. रुपीनं स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी जीवन जगायच ठरवलयं असा शेवट अभिप्रेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा