Skip to main content

झोंबाड

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 28/10/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ भरुन आलं हुतं. सोसाट्याचा वारा सुटला हुता. धुळीचे लोट सगळ्या वावरात ऊठत लांबवर पसरत चाललं. आभाळातनं एकेक टिपका पडाय लागला. शेलामायनं गवताचा भारा ऊचलुन गोठ्यात ठिवला. भराभरा धुणं काढुन घरात ठिवलं. "आगं रेडकु तर सोड तेव्हढं" उंबऱ्यापाशी नुसतीच ताटकळलेली रुपी तशी भानावर आली. लगबगीनं जाऊन तिनं रेडकाचं दावं सोडलं. वढत वढत आणुन त्याला गोठ्यात बांधलं. आन पुन्हा ताटकळत तशीच ऊभी राहिली. रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच येतो. पण संध्याकाळच्या वेळेस आला की जोरदार कोसळतो. आणि अशा कातरवेळी तिच्या चित्तवृत्ती जाग्या करुन जातो. कोपऱ्यात धुणं ठेऊन शेलामायनं ऊदबत्ती पेटवली. देव्हाऱ्याच्या पुढं केळात खोचली. हाळदी कुकु लावुन फुलं ऊधळत निवद दाखवला. भक्तिभावानं होत जोडत माथा टेकवला. आभाळ फाटलं तरी शेलामायची रोजची पुजा कधी चुकली नाही. सकाळ संध्याकाळ तिचा पुजेचा कार्यक्रम ठरलेला. रुकडीआयची ती निस्सीम भक्त होती. घराम्हागं शेताच्या तुकड्यात एक छोटसं देऊळही तिनं बांधुन घेतलेलं. गळ्यात कवडीच्या माळा घालुन, सणावाराला परडी घेऊन घरोघरी ती जोगवाही मागायची. चुल पेटवुन शेलामाय धुराड्यात सैपाक करत बसली. रुपीनं काटकुटं ऊचलुन तिच्याम्होरं सरपानाला ठिवलं. तिचं पांढरफटक कपाळ बघुन शेलामायला पुन्हा एकदा कससचं झालं. बाहेर पावसाचा जोर वाढला. कंदिलाच्या मिनमीनत्या ऊजेडात रुपी भिताडाला टेकुन शुन्यात नजर लावुन बसली. अडीत-तीन वर्षाखाली तिचं लगीन झालेलं. पण आठवड्याभरातच नवरा खपलेला. तिला नवऱ्याचा चेहराही नीटसा आठवत नव्हता. त्याला नेमका कोणता रोग होता हे ही तिला नाही समजलं. पण तेव्हापासुन गोऱ्यागोमट्या रुपीचं काळं दिवस सुरु झालेलं. पुढं नुसताच अंधार वाढुन ठेवलेला. तिनं एकटक कुठेतरी बघत बसनं नित्याचचं झालं होतं. "हाय का शेलामाय घरात?" दार ऊघडुन भाऊसाहेब आत आला. तशी रुपीची तंद्री भंगली. "कोण भावसाब हायतं का?, या की" कंदिल ऊचलुन शेलामाय दरवाज्याकडं बघत नीट न्याहाळत म्हणाली. "व्हय मीच हाय, जेवन झालं का रुपे?" "न्हाय आजुन व्हय चय" रुपी खोल आवाजात बोलली. त्याचे तांबरलेले डोळे आणि हातातली बाटली तिच्या नजरेतुन सुटली नाही. भाऊसाहेबनं आत येऊन टावेलानं डोकं पुसलं. दुसऱ्या खोलीत जाऊन कापडं पण बदलली. मग तिथच खाटंवर त्यानं ताणुन दिली. शेलामायनं त्याला 'जेवायचं का?' म्हणुन पण विचारलं नाही. 'येवढ्या रात्री कसं आला?' हे पण विचारलं नाही. रुपीनं पण जास्त विचार केला नाही. भाऊसाहेब हा शेलामायच्या माहेरी नेहमी ऊठबस असणारा महत्वाचा माणुस. आपल्या लग्नाअगोदर ईकडं घरी नेहमी यायचा. नान्याला खेळवत बसायचा, फटफटीवरनं गावात फिरवुन आणायचा. पण आपलं हे असं झाल्यापासुन त्याचं घरी येणं जवळपास बंदच झालं होतं. आज तो बऱ्याच दिवसांतुन आला होता. ते पण येवढ्या रात्री. मुक्काम तर त्यानं आजपर्यंत कधीच केलेला न्हवता. रुपी विचारात हरवली. "जेवुन घी गं पोरे, आन आज पलिकडच्या खुलीत झोप, भावसाब झोपल्यातं खाटंवरं" शेलामायचा सैपाक अजुन झालाही न्हवता. पण रुपीला तिनं गळ घातली. जेवण ऊरकुन रुपीनं माजघरात अंधरुन टाकलं. हे माजघर अगदी छोटसं. तिथं बरच जुनं सामान रेचुन ठेवलेलं. घरात कोणीही पाहुणे आले तर रुपीची ही खोली ठरलेली. एरव्ही ती घरात खाटेवरच झोपायची. मिट्ट अंधारात रुपी पावसाची रिपरीप ऐकत पडली. माजघरातली ईकनं बघुन तिला तिचा बाप आठवायचा. आठ दहा वर्षापुर्वी तिचा बाप वारीला गेला होता. टाळ, मृदुंग आणि किर्तनात त्याचा जीव हरपला. घरी आला तो देवाचा नाद घेऊनच. मग पुन्हा वनवासाला गेला. तिथनं आल्यावर दाढ्या वाढवुन, कपाळावर भगवा लावुन, गळ्यात माळा घालुन गावोगावी फिरत राहिला. मग त्याचं घरी येणं बंदच झालं. रुपीला त्याचाही चेहरा काहीकेल्या आठवेना. बारका भाऊ नान्या घरी असल्यावर तिचा जीव रमायचा. मात्र तोही आता आजोळी गेला होता. नाही म्हणायला तिचा एक वर्गमित्र बाब्या जो पवाराच्या वस्तीत राहायचा तो अधुन मधुन तिचे हालहवाल विचारायचा. एरव्ही तिच्याशी बोलायला कुणीच नसायचं. घरात मायलेकी तरी किती बोलणार. रुपीचे दिवस असे हे मुकाट होत चाललेले. घरात एकटी पडल्यावर भुतकाळातला सारा पट तिच्यासमोर ऊलगडत जायचा. रात्री तिला लवकर झोपही यायची न्हाय. मग जुन्या आठवणींना कुरवाळत ती पडुन राहायची. त्यात तिला मौज ही वाटायची. पण आज येवढ्या पावसात अवेळी आलेला भाऊसाहेब तिच्यासाठी एक भलमोठ्ठं प्रश्नचिन्हं घेऊन आला होता. ऊघड्या दरवाज्यातुन बाहेर कोसळणारा पाऊस बघत ती हा गुंता सोडवत बसली. आधी हा भाऊसाहेब जेव्हा कधी यायचा, तेव्हा ऐण दुपारी दाराला आतुन कडी घालुन घरात झोपायचा. आपल्याला हे नवीन नव्हतं, पण शेलामायही कुठे नजरेस पडत नसायची तेव्हा आपला जीव खालीवर व्हायचा. मग बारक्या नान्याला खेळवत आपण गोठ्यातच बसायचो. ही आठवण खुपच जुनी. म्हणजे शेलामाय आणि भाऊसाहेब यांचं काही शिजत तर नसेल. बाहेर पावसाचा जोर अजुनच वाढला. पण येवढ्या धुवाधार पावसात आणि वाऱ्याच्या घोंघाटात पलिकडच्या खोलीतुन आलेली बांगड्याची किणकीण, हपापलेले श्वास, आणि पायांची धुसमुस तिच्या कानात शिरत गेली. रुपीची रात्र अजुनच गडद होत गेली. शेलामायनं तिला फसवलं होतं. शेलामाय ही एक निब्बर बाई होती. तिचा साजशृंगार बघुन गावकरी तिला नखरेल म्हणत. पण भांडखोर स्वभाव बघुन कोणाची तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची टाप होत नसे. रुपीला आपल्या आईचा अभिमान वाटायचा, पण आज तिनं सगळ्यालाच सुरुंग लावला होता. पलिकडुन येणाऱ्या हपापणाऱ्या श्वासांचा आवाज वाढतच चालला. रुपीच्या रोमारोमात धुंदी चढत गेली. 'सुख' म्हणजे काय हे जिला समजलंही नव्हतं तिच्या बाजुलाच ते ऊपभोगलं जात होतं. शरीरात पेटलेली धग तिला सहन होईना. मग माजघरातनं ऊठुन ती बाहेर मोकळ्या अंगणात आली. गडद अंधारात एका दगडावर बसुन ती चिंब भिजत राहिली. याआधीही जेव्हा जेव्हा तिचं शरीर बंड पुकारायचं, तेव्हा ती पावसात भिजत राहायची. पाऊस तिला आवडायचा, कारण पावसात तिचा निचरा व्हायचा. भान हरपुन रुपी तशीच बसुन राहीली. प्रश्न असा होता की शेलामायनं आजपर्यंत लपवुन ठेवलेलं गुपित आज आपल्यापुढं का फोडलं?. शेलामाय खरचं नखरेल बदनाम बाई होती का? नवरा घरातुन निघुन गेल्यावरही तिचं फारसं बिघडलं न्हवतं. घरामागच्या शेताच्या तुकड्यावरही पाटील नजर लावुन बसला होता. पण उलट तिनंच त्याच्याशी जमीनीचा सौदा सुरु केला. पाटीलही व्यवहार करायला घरी येत राहिला. पण शेलामाय त्याला खेळवत राहिली. शेतीची नांगरणी, पेरणी, खुरपणी सगळं त्याच्याकडुनचं करुन घेतलं. शेतीही ताब्यात राहिली, आणि पाटलासारख्या रांगड्या गड्याला अंगावरही घेत गेली. हा पाटीलही नंतर देशोधडीला लागला. नवरा निघुन गेला म्हणुन शेलामायनं कधी दु:ख नाही केलं. संसाराचं वाटोळं झालं म्हणुन रडत भेकत बसली नाही. कमरेला पदर खोचुन संसाराचा गाडा दिमाखानं ओढत राहिली. गरीबीची कुठलीही धग आपल्या मुलांना जाणवु दिली नाही. पाहिजे तेव्हा नव्या गड्याला जवळ करत गेली, पाहिजे तेव्हा त्यांच्याशी मनासारखं खेळत राहिली. कठोर परीस्थितीत शेलामाय आपल्या मर्जीनं जीवन जगत राहिली. रूपीनं विचार करतचं राहिली. तिच्या बोडक्या जिवनात कुठुनसा येणारा एक अंधुकसा किरण दिसायला लागला. आपण आपल्या वैधव्याचं दु:ख करत किती बसायचं. जीर्ण कापड नेसुन रडत कुजत आयुष्य घालवत लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा किती झेलायच्या. आता या सहानुभूतीवर थुंकायलाच हवे. आपणही आता निलाजरेपणाने जगायलाच हवे. आपल्याही शरीरात आग आहे, आणि ती आपल्या मर्जीनं भागवण्याचा अधिकार आपल्याला आहे. ताठ मानेनं जगत, पाहिजे त्याच्याशी खेळत, मनसोक्त जगण्याची मजा आपणाला अनुभवायलाच हवी. ऊद्याच्या बदनामीला आजची जिंदगी ओवाळुन टाकायलाच हवी. भले कोणी आपणाला नखरेल, चवचाल, बाजिंदी म्हणोत. दु:खी, कमजोर, बिचारी यापेक्षा त्या उपाध्या कधीही बऱ्या. आयुष्यात चढउतार येणारचं, पण म्हणुन आजचा क्षणिक ऊपभोग तरी का सोडायचा. आज शेलामायनं कळत नकळत तिला एक धडा घालुन दिला होता. समोरच्या वस्तीतला बाब्या आशाळभुत नजरेने आपल्याकडे बघतो. त्याच्या नजरा आपल्याला कळतचं नाही असं नाही. भर दुपारी उघड्याबंब शरीराने आपल्याकडे बघत राहतो. ऊद्या दुपारी जेव्हा घरी तो एकटाच असतो, तेव्हा त्याच्याकडे जायलाच हवे. रुपी खुदकन गालात हसली. तिला आयतचं एक माकड खेळवाय भेटणार होतं. पाऊसही आता ऊघडत चालला. पहाटेच्या गारठ्यात तिचा चेहरा टवटवीत झाला. मघापासुन हाताला झोंबणारे जास्वंदाचे एक चिंबाट फुल तिनं हलकेच तोडले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19554
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

मस्तच

कथा आवडली. भाषेवर छान पकड आहे तुमची. मात्र "तिला आयतचं एक माकड खेळवाय भेटणार होतं." हे वाक्य कथेच्या गाभ्याशी विसंगत वाटलं.

कथा अतिशय आवडली. वास्त़आकथाबीज आणि मानवी मनाचे बारकावे अत्यंत प्रांजळपणे टिपलेली कथा. अंगावर येते शेवटी! पण त्यातच तिचे यश आहे.

गावकडलं वातावरण शब्दांनीच जस्सच्या तस्स उभं केलय डिट्टो

आवडली मस्त आहे. शेवटही विसंगत वाटला नाही. असाच असायला हवा होता. तो थोडा विस्तृत पणे लिहिला असता तर कदाचित वाचक तिथे अडखळले नसते. पैजारबुवा,

कथेतली पात्र अगदी आदर्श विचारसरणी असलेली व आदर्श जीवन जगणारी कशी असू शकतात? आता आहे रुपी तशी तर काय करायचं? आपण ज्या समाजात जगतो तिथे असं काही असू शकतं हे स्वीकारण्याची लोकांची मानसिक तयारीच नसते. स्वतःच्याच कोशात गुरफुटून 'असलं काही' अस्तित्वातच नाही, असं शहामृगासारखं म्हणायचं. एकदा कोणत्यातरी धाग्यावर 'इन्सेस्ट'वरून असंच गुर्‍हाळ केलं होतं. ज्या गोष्टी आहेत त्या कितीही चुकीच्या, अयोग्य, वाईट, धक्कादायक, लाजिरवाण्या असल्या तरी अ‍ॅटलीस्ट त्या 'अस्तित्वात' आहेत, हे तरी स्वीकारायला हवं.

In reply to by तुषार काळभोर

ज्या गोष्टी आहेत त्या कितीही चुकीच्या, अयोग्य, वाईट, धक्कादायक, लाजिरवाण्या असल्या तरी अ‍ॅटलीस्ट त्या 'अस्तित्वात' आहेत, हे तरी स्वीकारायला हवं.
जे झेपत नाही त्याचं अस्तित्वही सहन होत नाही हो लोकांना...आणि तरी इतरांना शहाणपण शिकवतात मोठ्या तोंडाने.

In reply to by बॅटमॅन

+१ ... वरुन प्रत्येक गोष्ट ही शाळकरी पाठ्यपुस्तकीय साच्यानुसार आदर्श (काही टाळक्यांनी ज्यांना आदर्श म्हणून मान्यता दिलीय असे) अशीच असावी असा एक अट्टाहास चालतो तो ही तसाच वैताग आणणारा असतो. जव्हेरगंज भौ.. वरती प्रदिप भौंच्या सुचना उल्लेखनीय आहेत बघा त्याला आपलं पण अंशतः अनुमोदन. पण बाकी तुमी ल्हिवत र्‍हावा आसंच.. :)

In reply to by अस्वस्थामा

वाचक म्हणून वाचकांनी सूचना द्याव्यात का? एकदा कथा कविता प्रसिद्ध झाली की त्याचं लेखक कवीनं पुन्हा स्पष्टीकरण देण्याची गरज पडू नये.

मस्तच तुमच्या कथा नेहमी वाचतो . ग्रामीण बाज मस्तच पकडता तुम्ही . फक्त एक सूचना . . कथा तुम्हला हवी तशी तुम्हाला पटेल अशीच तुम्ही लिहिली आहे . दुसऱ्याला पटावी म्हणून नाही . एवढ लक्षात ठेऊन प्रतिसाद कसा द्यायचा ते ठरवा :)

In reply to by अद्द्या

कथा तुम्हला हवी तशी तुम्हाला पटेल अशीच तुम्ही लिहिली आहे . दुसऱ्याला पटावी म्हणून नाही . हे सगळ्या नवकवी आणि लेखकांनी स्वाक्षरी म्हणून चिकटवावे इतक खरं आहे!

In reply to by रातराणी

मिपावर नवकवी आणि लेखांची जर चेष्टा झालीच आहे तर ती व्याकरणाच्या चुकांवरून , किंवा मग अगदीच जीप ला सायकल धडकून तिला पुलावरून खाली पाडवलो छाप कथा असतील तरच. इथे कित्येक नवीन आयडी आहेत ते खूप चांगलं लिहितात . त्यांना त्यांच्या कथा /कवितांसाठी दादच देत आलेत लोक . आणि काही बदल सुचवायचे असतील तर तसं इज्जतीने सांगत आलेत . माझ्यासारख्या ४ वर्षात ३ कथा कश्याबश्या पाडणाऱ्या मुलाला पण लोकांनी कथा विषय आणि आशय न बदलता अजून कशी चांगल्या प्रकारे सांगता आली असती हे सांगितलंय . त्यामुळे मी तसं लिहिलंय

मिपावर कथा टाकल्यानंतर लोक त्यांना कथा जशी वाटेल तसे प्रतिसाद देणारच. कोणी काय प्रतिसाद द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कथा देणार्‍या लेखकांना त्यांच्या कथेवर वाचकांनी चर्चा करणे अपेक्षीत आहे असे वाटले होते म्हणुन प्रतिसाद दिले. वर झालेली कथेवरची चर्चा जर शांत डोक्याने वाचली असेल तर त्यात कुठेही कथेचा शेवट बदलावा अशी अपेक्षा केलेली नाही. तरीही असा समज करुन घेऊन काही प्रतिसाद आले आहेत. सगळ्यांनाच उत्तर देणे शक्य नाही पण कथेवर आलेल्या सगळ्या प्रकारच्या मतांचा आदर केला जावा एवढीच अपेक्षा आहे.

तुमचा या लेखावरचा पहिला प्रतिसाद पाहता. शेवट तुम्हाला अपेक्षित असा झाला नाही. त्याच अनुषंगाने पुढे चर्चा होत राहिली असे मला वाटते. शिवाय लेखातला जो परिच्छेद तुम्ही त्या प्रतिसादात चिकटवून शेवटाबद्दल "अनपेक्षित" अशा आशयाचे मत दिले, माझ्या मते, तिथेच कथेच्या शेवटाबद्दल काही अंशी भाष्य झालेले. शिवाय, आता कथालेखकाने सांगितलेले आहे म्हणून नाही तर, शेवटाचा अर्थ किंवा एकूण कथेचा अर्थ प्रत्येकाला हवा तसा लावता येतो. मी तर रूपी "व्यवहारिक" जगायला शिकली असे म्हणतो. तुमच्या "सगळ्या प्रकारच्या मताचा आदर....", याच्याशी सहमत! धन्यवाद, Sandy

संदीपजी, सर्वप्रथम संयत प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. रुपीचि प्रतिमा तरल , हळुवार भावनाप्रधान अशी ऊभी करताहेत असं वाटल्यामुळे शेवट अनपेक्षित वाटला पण म्हणुन तो बदलावा असं कुठे म्हंट्लं नाहीये. तुम्हाला जशी ती व्यवहारीक वाटाली तशी मला ती व्यभिचाराचा सोयिस्कर मार्ग स्विकारणारी वाटली एवढ्चं.

In reply to by इडली डोसा

इडलीतै अगं माणूस तिथं वेगवेगळ्या प्रवृती आल्या. कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागेल हे आपण खात्रीपूर्वक नाही सांगू शकत. ही तर कथा आहे. कल्पनेतल्या सर्वच गोष्टींना चूक बरोबरच्या चौकटीत ठेवून पाहिलं की त्यातली मजा निघून जाते असं मला वाटतं. त्या क्षणी त्याना रूपी तशी दिसली न जाणो उद्या एखाद्या खंबीर रूपीची कथाही त्याना सुचेल. :)

छान कथा.