✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका अनोळखी प्रदेशात - २

ज
जव्हेरगंज यांनी
Sun, 09/27/2015 - 00:18  ·  लेख
लेख
अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन. एव्हाना त्या टपरीवल्याला काहीतरी बिनसल्याची चाहुल लागली. दुरुनचं त्यानं विचारलं " नवीन दिसताय गावात, कुणाकडं आलाय?". आता आली का पंचाईत, थोडा गडबडलोच. "ते मोहीते नाहीत का, त्या नदीजवळच्या मंदिरापाशी राहतात, त्यांच्याकडेचं" मनाला येईल ते फेकलं. "म्हादबाकडं का?, त्याचं घर तर वरतीकडं ऱ्हायलं, देवळापाशी होळकर राहत्यात" नसती कटकटं. "हा तिकडचं, पाहुणा म्हणुन आलोय, पाय मोकळं करायला ईकडं फाट्यावर आलतो" ही थाप बहुतेक पचली किंवा त्याला कळुन चुकलं असावं की मला त्याच्याशी जास्त काही बोलण्यात स्वारस्व नाही. कारण म्हातारं नुसतं "बरं" म्हणुन आपल्या कामाला लागलं. त्याचे पैसै चुकते करुन शाळेकडे निघालो. रस्त्यावर शुकशुकाट होता. मघाशी बघितलेली शाळेची ईमारत अंधारात गुडुप झाली होती. पायवाटेवरचे दगडधोंडे नीट बघत कसाबसा तिथपर्यंत पोहोचलो. शाळेची ईमारत सरकारी. दगडी बांधकाम. तिन वर्ग. बाहेर मोकळा व्हरांडा. समोरचं माळरान हेच मैदान. तिथुनच मी आलो होतो. आजुबाजूला जाऊन थोडा कानोसा घेतला. सगळीकडं सामसुम होती. दगडी भिंत आणि भव्य खांब यांच्या मधोमध बॅगेवर डोकं ठेऊन थोडावेळ पडलो. पिवळसर दिव्याचा प्रकाश ईथेही येऊन पोहोचला होता. निलगिरीच्या झाडाआडं लपलेलं घर अजुनही अंधुकच दिसत होतं. एक वयस्कर बाई ओट्यावर भांडी घासत होती. बहुदा यांची जेवणं झाली असावीत. एक तरुण स्त्री घासलेली भांडी घरात नेऊन ठेवत होती. एकदोनदा तिने सरळ माझ्याकडे पाहीले. या काळोखात मी तिला दिसणे तसे अवघडचं होते. तरीही मी जरा भिंतीच्या आडोश्याला सरकलो. घाबरतचं एखादा कटाक्ष घराकडे टाकायचो. वयस्कर बाईचं भांडी घासुन आता झालं असावं कारण ती तरुण स्त्री एकटीच बाहेर घुटमळत होती. हीच असावी ती रुपगर्विता जिच्याशी माझे काम होते. जरा ईकडे तिकडे करुन तीही आत गेली. बराच वेळ बाहेर आली नाही. आता मी ही कंटाळलो. नसतं धाडस अंगलट येणार होतं. तसाच पडुन राहीलो. डोळ्यावर झापड येऊ लागली. जबर झोप लागली. किती वेळ गेला कुणास ठाऊक. कोणीतरी मला हलकेच हलवुन उठवत असल्याची जाणीव झाली. " ल...य उशी...र ला...वला... याय...ला" खुप दुरुन कोणीतरी मोठ्यांदा बोलल्यासारखा आवाज. डोळे सताड उघडले तरी परीस्थितीचं भानचं लवकर आलचं नाही. एक तरणीताठी स्त्री समोर दिसत होती. अरे ही तिच की रुपगर्विता. "लय ऊशीर लावला हो यायला, मला वाटलं दुपारीच याल" आता आवाज जवळुन आला खडबडुन जागा झालो. ऊठुन बसत तिला म्हणालो "हो जरा ऊशीरच झालाय, पण तुम्हाला मी ओळखलं नाही". अंधारात तिचा चेहराही पुसटसा. "अहो मीच अंजू, मलाच भेटायला आलायला ना तुम्ही, एक काम करा पाय न वाजवता घरामध्ये या, दरवाजा उघडाच ठेवते" तिचा आवाजही नाजुक, धाप लागल्यासारखा, आतले शब्द बाहेर यायला बघताहेत पण त्यांना ती रोखू पाहतेयं असं काहीसं. "ठिक आहे" माझे उत्तरही तिने ऐकले नसावे. तशीच लगबगीने घराकडं गेली. खरतर एवढ्या अपरात्री एखादी अनोळखी स्त्री आपल्याला घरात बोलावतेय हे जरा विचित्रचं वाटलं. पण तितकचं मोहक ही. जराही पाय न वाजवता मी घरात शिरलो. तिनं दार लावुन घेतलं. माझ्याकडं बघत अगदी लाजल्यासारखं हसली. "बापू आणि माय वर झोपलेत, गच्चीवर, तेव्हा जरा हळु बोला" मी एका खुर्चीवर बसलो. ट्युबलाईटच्या ऊजेडात तिचा चेहरा नीटसा पारखला. खरच ती रुपगर्विता होती. अगदी गावरान सौदर्य. माझ्याकडे अवखळ बघत तीही पलंगावर बसलेली. एकतर या गावातलं वातावरण उगाचचं रहस्यमय वाटत होतं, त्यातुन काळोख्या रात्रीची ही चोरटी भेट, समोर एक लावण्यवती, आणि मीही असा, रोमांचकारी प्रवासाच्या शोधात स्वत:ला झोकुन दिलेला. अशा नाजुक क्षणी तोल जाण्याची दाट शक्यता. "एवढ्या लांबुन आलात, काही आणलयं का माझ्यासाठी?" "हो आणलयं ना" बॅगेतलं भुर्जीपावचं पार्सल तिच्याकडं सोपवलं. मोठ्या ऊत्सुकतेने तिने ते उघडलं. पण भुर्जीपाव बघुन तिचा चेहरा पडला. " हे काय? येडेच आहात तुम्ही, काहीही आणता." मीही जरा ओशाळलोच. अशा रुपगर्वितेला आपण भेट म्हणुन भुर्जीपाव देतोय? छ्या! गपगुमान ते पुन्हा बॅगेत टाकले. "तुम्हाला एक गंमत सांगते, ईथं एक मंदिर आहे, जायचं का?" एवढ्या मध्यरात्री ही मला मंदिरात घेऊन चाललीय. आता यात काय गंमत आहे. ही तर विचित्रपणाची हद्द झाली. पण मीही या प्रवासात स्वत:ला झोकुन द्यायचे ठरवले होते. विशेष म्हणजे जोपर्यंत ही रुपगर्विता सोबत आहे तोपर्यंत हा प्रवास भलताच रोमांचकारी असणार होता. क्रमश: (एका अनोळखी प्रदेशात - १ www.misalpav.com/node/32948 )

Book traversal links for एका अनोळखी प्रदेशात - २

  • ‹ एका अनोळखी प्रदेशात
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कथा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
4443 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

उत्सुकता वाढते आहे. यापूर्वी

उगा काहितरीच
Sun, 09/27/2015 - 00:49 नवीन
उत्सुकता वाढते आहे. यापूर्वी कुठं प्रकाशित झालं होतं का ? लिंक व्यनिने दिली तरी चालेल !
  • Log in or register to post comments

यापूर्वी कुठं प्रकाशित झालं

जव्हेरगंज
Sun, 09/27/2015 - 09:42 नवीन
यापूर्वी कुठं प्रकाशित झालं होतं का ?>>>>>> नाही. कालच टंकलय. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

जव्हेरगंज भौ

बाबा योगिराज
Sun, 09/27/2015 - 01:58 नवीन
मस्त लिहिता. विंटरेष्ट येऊ रायलाय. पुलेशु. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

वा! उत्सुकता वाढतेय!कथेतलं

मांत्रिक
Sun, 09/27/2015 - 06:43 नवीन
वा! उत्सुकता वाढतेय!कथेतलं एकाकीपण, भयगूढता चांगली उभी केलेय.
  • Log in or register to post comments

काही कळेना

सामान्य वाचक
Sun, 09/27/2015 - 09:43 नवीन
काहीतरी गूढ़ आहे हे कळले
  • Log in or register to post comments

पुढचा भाग?

diggi12
Wed, 09/11/2024 - 00:47 नवीन
पुढचा भाग?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा