✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अवधूत (भाग-३)

म
मांत्रिक यांनी
गुरुवार, 09/03/2015 - 11:19  ·  लेख
लेख
भाग १, भाग २ नरकचतुर्दशीची पहाट. घरोघरी बायकांची धांदल उडालेली होती. अजूनही गाढ झोपेत असलेल्या पोरासोरांना रट्टे दिले जात होते. नवीन कपडे घालून थोडंसं मिरवायच्या मनःस्थितीत असलेल्या मुली उगाचच पुन्हा पुन्हा अंगणात येऊन परत घरात जात होत्या. बाप्ये लोक मात्र निवांत घोरत पडलेले होते. वातावरणात चांगलाच गारठा होता. काही तरूण मंडळींनी शेकोटी पेटवून गप्पांचा अड्डा जमवलेला होता. थंडीनं हैराण झालेली कुत्री देखील त्यांच्यापासून आदबशीर अंतर ठेवून शेकोटीच्या उबेला सुस्तावली होती. गावाच्या मधोमध असलेल्या विठ्ठल मंदिरात मात्र अंधार होता. त्याच मंदिरात एका कोपर्‍यात तो आईने दिलेल्या शालीत गुरफटून झोपलेला होता. साधारण सूर्योदयाची वेळ झाली असेल. अचानक मंदिराचा लोखंडी दरवाजा करकरत उघडला. देऊळ झाडणारा माणूस आला होता. दरवाजाच्या आवाजानं त्याची झोप मोडली. आपण आत्ता पहात होतो ते स्वप्न की सत्य, हे कळायला त्याला थोडा वेळ लागला. जे काही स्वप्नात पाहिलेलं होतं, त्याचा अर्थ त्याला समजत नव्हता. कुणा तरी माहितगाराला विचारावा हा अर्थ, असा विचार करून आह्निके आटोपण्यासाठी तो बाहेर पडला. गावाबाहेरच्या विहिरीवर स्नान करून त्यानं रानातील शिवमंदिराचा रस्ता पकडला. ऊन आता बर्‍यापैकी तावलं होतं. थोडीशी थंडी आणि थोडा उन्हाचा चटका असं मजेदार वातावरण होतं. त्या मंदिरात नियमित येणारा एक बैरागी अजून असेल तर त्याच्याशी थोडं बोलता येईल या विषयावर, असा त्याचा अंदाज होता. रानात जिकडं तिकडं हळदुलं ऊन सांडलं होतं. सण असल्यामुळे रानात माणसं देखील दिसत नव्हती. कुठेतरी एखाद-दुसरा चुकार पक्षी, बस! मंदिर अगदी हाकेच्या अंतरावर आलं. तसं त्यानं चालण्याचा वेग वाढवला. अगदी प्राचीन काळातील मंदिर. काळ्या दगडात बांधलेलं. थोडंसं मोडकळीला आल्यासारखं दिसणारं. पण तितकंच मनाला भारून टाकणारं. काही ठिकाणी थोडी पडझड देखील झालेली. चिर्‍यांमधील फटीतून हातहात लांब गवताचे तुरे उगवले होते. पावसाळ्यात भिंतीवर धरलेल्या शेवाळाचे आता पोपडे सुटू लागले होते. एक पारव्याचं जोडपं छतावर बसून निवांत ऊन खात होतं. ती शांतता भंग करण्याची त्यांची देखील इच्छा नसावी. शेजारी एक छोटंसं कुंड. केवळ पावसाळ्यातील पाण्यावर भरणारं. दर्शनास आलेल्या लोकांच्या हातपाय धुण्याची सोय म्हणून केलेलं. त्याची चाहूल लागताच दोन-तीन बेडकांनी ‘डुबुक्क’ करून लांब उड्या मारल्या. शेवाळाचा तवंग बाजूला सारून त्याने कुंडातून पाणी काढून हातपाय धुतले. त्या थंड स्पर्शाने त्याला अगदी बरं वाटलं. देवळात प्रवेश करून प्रथम त्याने नंदीला नमस्कार केला. घंटानाद करून अंधार्‍या गाभार्‍यात प्रवेश केला. आत बैरागी रूद्रपाठ करीत बसलेला होता. देवाची छान पूजा केलेली होती. पांढर्‍या भस्माचे पट्टे ओढलेले होते. पिंडीवर थोड्या थोड्या अंतरावर स्वस्तिकाची फुले कल्पकतेने मांडलेली होती. अभिषेक पात्रातून टपटप पाणी पिंडीवर पडत होतं. तिथंच थोडी बेलाची पाने आणि तांदूळ वाहिलेला. नमस्कार करून एका कोपर्‍यात शांतपणे ऐकत बसला. बैराग्याचा पाठ चालूच होता. एका बाजूला तेल माखलेला पितळी दिवा शांतपणे तेवत होता. उदबत्तीतून मंद मंद सुगंधी वलये बाहेर येत होती. आतील हलका अंधार गडद गडद होत गेला. त्याचे डोळे जड झाले. श्वास मंदावला. सार्‍या शरीरातील संवेदना जणू गायब झाल्या. आणि प्रकाशाच्या एका लोळासरशी तो एका उत्तुंग पर्वतशिखरावर पोहोचला. ऊनपावसाचा खेळ चालू होता. सूर्यावरून भराभर काळे मेघ सरकत होते. अंगावर हलक्या हलक्या पर्जन्यधारा पडत होत्या. भन्नाट वेगाने वाहणा-या वा-याने गवतात लाटाच्या लाटा पसरत होत्या. अतर्क्य वेगाने वृक्षवेलींवर मादक सुगंधी फुले उमलत होती, कोमेजत होती. पूर्वी कधी न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज कानात घुमत होते. आकाशातून मोत्यासारखे चमकणारे तारे तडातड तुटून कोसळत होते. विश्वाच्या भयाण काळोख्या पोकळीत ग्रहगोल गरागरा फिरत इतस्ततः फेकले जात होते. त्याची जाणीव, अस्तित्व, अहंकार सारं काही द्रवरूप झालं आणि प्रचंड वेगाने एका प्रपाताचे रूप घेऊन डोंगरमाथ्यावरुन कोसळू लागलं. त्या प्रपाताच्या वाटेत येणारं सारं काही भक्षण करीत तो पुढे पुढे जाऊ लागला… अचानक कुणीतरी दूरवरून जोरजोरात हाका मारू लागलं. संवेदना परत जागेवर येत त्याने हळूहळू डोळे उघडले. त्या पुरातन शिवमंदिरातच होता तो. समोर बैरागी चिंताक्रांत उभा. “अरे, तुला झालं तरी काय? कधीचा हाका मारतोय मी? श्वासदेखील चालत नव्हता. म्हटलं मेलाबिलास की काय भुकेनं?” “तसं नाही काही. झोप आली असावी अचानक.” तो थोडासा खजील होत उत्तरला. “बोल, अचानक का आलास भेटायला?”, बैराग्यानं विचारलं. “मला तुम्हांला एक विचारायचं होतं. आज पहाटे मी एक अद्भुत स्वप्न पाहिलं. साधारण सूर्योदयापूर्वी. एक स्त्री समोरून चालत आली. मी एक लहान बालक होतो. रडत होतो. तिनं मला प्रेमानं जवळ घेतलं आणि पदराखाली घेऊन स्तनपान करवू लागली. त्या दुधाची गोडी खरंच अमृतासारखी होती. इतकं सत्य वाटत होतं ते स्वप्न की, जागा झालो तरी बराच वेळ मला ती अमृताची चव जाणवत होती.” बैराग्याचे डोळे उजळले. “अरे, ते दूध म्हणजे ब्रह्मज्ञान. जे मिळवण्यासाठी लोक जन्मोजन्मी प्रयत्न करतात, ते तुला जगदंबेच्या कृपेनं प्राप्त होणार आहे. पण आता तुला गुरुची खरेच गरज आहे. तू त्र्यंबकेश्वरला एकदा जाऊन ये. तिथे उत्तरेकडील काही शाक्त साधू आलेले आहेत. कुणाशी काही बोलू नकोस. कुणाला काही विचारू नकोस. फक्त जाऊन शांतपणे देवाचं दर्शन घे. जो तुझा खरा गुरु असेल, तो स्वतःच तुला शोधत येईल.” (क्रमशः)

Book traversal links for अवधूत (भाग-३)

  • ‹ अवधूत (भाग-२)
  • Up
  • अवधूत (भाग-४) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
21237 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

सुरेख !! तुम्हाला विलक्षण

स्रुजा
Sun, 09/06/2015 - 09:27 नवीन
सुरेख !! तुम्हाला विलक्षण कसब आहे.. ओघवतं आणि तपशीलवार, माझ्या डोळ्यासमोर तो अख्खा परिसर उभा राहिला कथा वाचता वाचता.. लिहीत राहा.. आणि दुवे मी टाकते या भागांमध्ये.
  • Log in or register to post comments

वा! आवडले. लवकर पुढील भाग

दमामि
गुरुवार, 09/10/2015 - 19:55 नवीन
वा! आवडले. लवकर पुढील भाग येऊद्या.
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलंय. अतिशय

यशोधरा
Fri, 09/11/2015 - 05:05 नवीन
सुरेख लिहिलंय. अतिशय चित्रदर्शी.
  • Log in or register to post comments

एकदम सुरेख अन चित्रदर्शी,

बॅटमॅन
Fri, 09/11/2015 - 12:50 नवीन
एकदम सुरेख अन चित्रदर्शी, पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!!!
  • Log in or register to post comments

मस्त ..

ब़जरबट्टू
Fri, 09/11/2015 - 16:07 नवीन
आवडले.. अजून येऊ द्या,.
  • Log in or register to post comments

द-बाहुबली , तुम्हाला पडलेलं

तुडतुडी
Fri, 09/11/2015 - 18:02 नवीन
द-बाहुबली , तुम्हाला पडलेलं स्वप्न असेल . पण त्याला पडलेलं ते स्वप्न नव्हतं . अध्यात्मिक अनुभव कोणाला सांगू नयेत म्हणून तो स्वप्न पडलं असं म्हणत असावा .
प्रकाशाच्या एका लोळासरशी तो एका उत्तुंग पर्वतशिखरावर पोहोचला. ऊनपावसाचा खेळ चालू होता. सूर्यावरून भराभर काळे मेघ सरकत होते. अंगावर हलक्या हलक्या पर्जन्यधारा पडत होत्या. भन्नाट वेगाने वाहणा-या वा-याने गवतात लाटाच्या लाटा पसरत होत्या. अतर्क्य वेगाने वृक्षवेलींवर मादक सुगंधी फुले उमलत होती, कोमेजत होती. पूर्वी कधी न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज कानात घुमत होते. आकाशातून मोत्यासारखे चमकणारे तारे तडातड तुटून कोसळत होते. विश्वाच्या भयाण काळोख्या पोकळीत ग्रहगोल गरागरा फिरत इतस्ततः फेकले जात होते. त्याची जाणीव, अस्तित्व, अहंकार सारं काही द्रवरूप झालं आणि प्रचंड वेगाने एका प्रपाताचे रूप घेऊन डोंगरमाथ्यावरुन कोसळू लागलं. त्या प्रपाताच्या वाटेत येणारं सारं काही भक्षण करीत तो पुढे पुढे जाऊ लागला…
ह्या वरच्या वर्णनात खूप गहन अर्थ आहे . अगदी असाच अनुभव स्वामी विवेकानंदांना राम्कृशांनी पहिल्या भेटीत करून दिला होता . मुक्तानंदांना नित्यानन्दांनी करून दिला होता .
  • Log in or register to post comments

द-बाहुबली , तुम्हाला पडलेलं

द-बाहुबली
Sat, 09/12/2015 - 14:27 नवीन
द-बाहुबली , तुम्हाला पडलेलं स्वप्न असेल . पण त्याला पडलेलं ते स्वप्न नव्हतं .
चान. वास्तवात पडतात ती स्वप्न. अन कथेत घडतात त्या सत्यघटना... फार रोचक स्पष्टीकरण आहे. आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

सुरेख! पुभाप्र :)

रातराणी
Fri, 09/11/2015 - 23:57 नवीन
सुरेख! पुभाप्र :)
  • Log in or register to post comments

ओघवती भाषाशैली

सत्य धर्म
Sat, 09/12/2015 - 14:51 नवीन
अतिशय सुंदर भाषा मांत्रिक बुवा..............
  • Log in or register to post comments

ओघवती भाषाशैली

सत्य धर्म
Sat, 09/12/2015 - 14:51 नवीन
अतिशय सुंदर भाषा मांत्रिक बुवा..............
  • Log in or register to post comments

आता पुढचा भाग लिहायला २०१६

प्यारे१
Sat, 09/12/2015 - 14:53 नवीन
आता पुढचा भाग लिहायला २०१६ उजडवणार का? द बाहुबलि-चोन्च्लुसिओन पूर्वी येवो म्हणजे मिळवली. -प्यारेनाराज ठाकरे
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

द-बाहुबली
Sat, 09/12/2015 - 15:04 नवीन
लेखकाने त्यांच्या चाहत्यां असे वाट बघायला लावु नये अशी विनंती सर्व चाहत्यांतर्फे मी करतो. बाकी जे कोणी समिक्षागीरी करतील त्यांना फाट्यावर मारा हो असेच म्हणेन. मला तरी बहुसंख्य वाचकांची या कथेचा पुढील भाग वा शेवट समजुन घ्यायची अनाकलनीय तगमग मनाला फार भिडली आहे. व त्यांच्यासाठीच हे माझे सांगणॅ आहे. चाहत्यांना आसुसलेले ठेवणे बरे न्हवे तीकडे दुश्काळ अन इकडे ***. अहो सामांन्यांनी सुखी रहायचे तरी कसे ? एकवेळ कट्टापाने बाहुबलीला का मारले हे समजले नाही तरी चालेल पण अवधुतच्या पुढील भागात काय घडते हे वाचकांना कळणे त्यांचा अधिकार आहे असेच मी मानतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अवधूत. मस्त जमत आहे भट्टी...

सत्य धर्म
Tue, 09/15/2015 - 14:10 नवीन
अवधूत. मस्त जमत आहे भट्टी.........,,,,,,,
  • Log in or register to post comments

एकदम उत्कंठावर्धक!

शित्रेउमेश
Wed, 09/16/2015 - 12:01 नवीन
आता पुढचा लवकर येवु दे...!!!!
  • Log in or register to post comments

मांत्रिक बुवा पुढचा भाग कधी ?

असंका
Wed, 09/16/2015 - 12:19 नवीन
मांत्रिक बुवा पुढचा भाग कधी ????
  • Log in or register to post comments

काही वैयक्तिक कारणे होती

मांत्रिक
Wed, 09/16/2015 - 12:27 नवीन
काही वैयक्तिक कारणे होती त्यामुळे थांबलो होतो, पण येईन लवकरच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

वाचतिये.

रेवती
Tue, 11/24/2015 - 02:53 नवीन
वाचतिये.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर !!

पथिक
Mon, 09/12/2016 - 11:55 नवीन
आणि प्रकाशाच्या एका लोळासरशी तो एका उत्तुंग पर्वतशिखरावर पोहोचला. ऊनपावसाचा खेळ चालू होता. सूर्यावरून भराभर काळे मेघ सरकत होते. अंगावर हलक्या हलक्या पर्जन्यधारा पडत होत्या. भन्नाट वेगाने वाहणा-या वा-याने गवतात लाटाच्या लाटा पसरत होत्या. अतर्क्य वेगाने वृक्षवेलींवर मादक सुगंधी फुले उमलत होती, कोमेजत होती. पूर्वी कधी न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज कानात घुमत होते. आकाशातून मोत्यासारखे चमकणारे तारे तडातड तुटून कोसळत होते. विश्वाच्या भयाण काळोख्या पोकळीत ग्रहगोल गरागरा फिरत इतस्ततः फेकले जात होते.
वर्णन खूप आवडले. एकेक भाग वाचून काढतोय. एक कवी मधुकर केचे यांच्या काही ओळी तुम्हाला आवडतील म्हणून देतोय: दिंडी गेली पुढे अर्ध्यात मी अडे अंतराय वाढे सोबत्यांशी पुढे गेलेल्यांच्या पावलांचे ठसे चेतविती पिसे लंगड्याचे
  • Log in or register to post comments

वा! सुंदर... मूळ कविता व कवी

प्रभास
Mon, 09/12/2016 - 17:07 नवीन
वा! सुंदर... मूळ कविता व कवी यांच्याविषयी माहिती देऊ शकाल थोडक्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पथिक

कवींबद्दल तर काही माहिती नाही

पथिक
Tue, 09/13/2016 - 13:15 नवीन
कवींबद्दल तर काही माहिती नाही.. पण कवितासंग्रहाचं नाव "दिंडी गेली पुढे" असं आहे. बाजारात उपलब्ध पण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा