Skip to main content

त्रैराशिक

लेखक सदस्यनाम यांनी रविवार, 26/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर. इथल्या शतशतशब्द कथा वाचून मला पण काही लिहावसं वाटलं. त्यात त्रिशतशब्दकथा असा प्रयोग केलाय. व्याकरणाच्या चुकाबद्दल क्षमस्व. पहिल्या लेखनाचे स्वागत कराल अशी अपेक्षा. ________________________________________________________________________ ह्यालो बोल ग हिरॉईन आयक की रव्या. मला कनाय राव्हल्या भेटला होता. तूच बोंबलत गेली आसचील. आता म्या नाहीना गावात. काय भरोसा नाय तुझा. हा. तू लै शिटीत सवळाच राह्यलास जनू. मी हाय म्हनून नायतर छप्पन्न फिरतेत माझ्यमागं. हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद. ते जौ दे. पह्यले मला सांग किती मरतोस माझ्यावर? म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन. राव्हल्या काय केला ते सांग ऊंडगे आदी. तेचाकडं कनाय तसला आंडराड मोबाईल हाय. फोटो पाटिवता येतेत मन. मग? मग काय. म्या नीट्ट सांगितलं. जेचं माज्यावर सच्चं प्रेम तोच घिऊन दील मला आसला फोन. लै नीच हायस ग टवळे. नेक्स्ट टैम आनतो. ________________________________________________________________________ ह्यालो ह्यालो बोल की आये. एकतर मिस्कॉल करतीस आन कॉल केल्यावर बोलाया काय हुतय. आरं रव्या आयक की. आता म्होरं बोलतीस का ठिवू फोन. मला हापिसाला जायचय. जाशील रं बाळा पण आयक की. ह्ये तुझा बाप काय सुदरंना बग. आता काय केलं? आन ह्यो नंबर कुनाचाय? तेच रं. काल पिऊन कुठं उलथला की दारुपायी इकून आला मोबाईल देव जाणं. मग? तसं नव्हं र बाळा. आता म्होरल्या टायमाला येतुयास न तवा एखांदा आण की डबडा. सादा का आसना पण आण. आये हितं शेहरात लै खर्च आसतेत ग. पुरत नाह्यती माझं मला आन तुम्चं आसलं कायतर. बगू बगू करतो कायतर. ________________________________________________________________________ ह्यलो रव्या बोलो ना सेठ रव्या भाडखाव कामाचं बग आधी. कुठं खपलास तीन दिवस? नाय ना सेठ. हितच हाय ना मंडईत. फुकन्या तितं काय बी मिलनार नाय. स्टेसनवर जा सीधा. पण सेठ दोन पीस तर काढलेत की हितं. अब्बे मी काय बोलतो सुन. तस्ले पीस कोन बी घेत नैत आता. कस्टमरको अँड्रोईड मंगता. पण सेठ पोलीसमामूचं बी भ्या वाटतं. तो पैले माझे उचल परत कर. तेरेसे ज्यादा रिस्क मै ऊठाता इदर. नाय नाय सेठ. जातो स्टेशनवर. हा. और सुन. कमसेकम चार पीस होना मेरेको नये बडेवाले. नई तो सीधा रास्ता मालूम है तेरेको. हा सेठ. आनतो अँड्रोईडच. करतो कायतर आता. ________________________________________________________________________
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8861
प्रतिक्रिया 59

प्रतिक्रिया

जबरी कथा. वेगळ्याच धर्तीची. भाषा लय लय आवडली. तिन्ही कथा वेगवेगळ्या असुनही सांधा एकच आहे. हा प्रयोग आवडला. आणि हो. मिपावर स्वागत.

आयला काय है काय है? फुल टू टैमपास. महापाचकळ. म्हातारीचं वर्णन पन सही अन आयटमचं पण. लिखो और हसाओ. आवडलं रे भावा.

म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन.

खुप आवडली...आंडराड मोबाईल आवडला....!!!

तीन कथांची वीण सुरेख जमलीय. तिस-या कथेतला धक्का एकदम जाणवला.

ही कथा खूप आवडली. त्रिशतशब्दकथेची संकल्पना तर खासंच वाटत आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

नवीन प्रकार आणि कलाटणी पूर्ण !!!!

अगागागा !! ज ब री ही !! काय मस्त बोली हाय राव. पहील्याच कथेत आपन एकद्म तुमचे फॅन झालो बगा !! अजुन येउदे.. आंडराड, फेरेनलवली आवडले हायेत,,,

ही कथा खूप आवडली.

मस्त, जबराट x ३००

उत्तम लेखन. येऊद्या अजून!!

पहिल्याच पदार्पणाला तीन सिक्सर्स! बगा मेल्यांनो, चांगलं लिवलं तर मिपावाले कवतिकच करत्यात. जिलब्या पाडल्या तरच पाक डोक्यावर ओततात.

लिहा लिहा... भरपूर लिहा :)

प्रयोग आवडला. जमलाय. शशक सोबतच लघुकथा छान लिहु शकाल असं वाटतय. शैली छान आहे तुमची.

मस्त जमलंय त्रैराशिक.. भन्नाट प्रयोग. बेरकीपणा आणि गावरान भाषेचा लहेजापण भारी जमलाय. मिपावर स्वागत.. लिहीते रहा..

सर्व प्रतिसादकांचे अन वाचकांचे आभार. नगरीनिरंजन, आदूबाळ, चिगो, तिमा, अतिवास, पैसाताई, स्नेहांकिताताई, प्रचेतस, एक्काकाका, नुलकरसाहेब, बुवा, आदि अन डांगेसाहेबांसारख्या सर्वच साक्षेपी वाचकांचे प्रतिसाद म्हणजे स्पर्धेआधीच बक्षीस मिळाल्यासारखे आहे. ;) सर्वांनाच खूप खूप धन्यवाद. अवांतरः यापुढे शतशब्दकथा लिहिणार नाही. प्रयोग जमलाय असे वाटते पण आता पिलियन रायडर यांच्या मताप्रमाणे नेक्ष्ट मिशन.... लघुकथा. :) स्टे ट्यून्न्न्न्न्न्न्न्ड.

तुमची त्रैराशीक मांडण्याची शैली तूफानच आहे. खूपच आवडली.
मग काय. म्या नीट्ट सांगितलं. जेचं माज्यावर सच्चं प्रेम तोच घिऊन दील मला आसला फोन.
.....हिरॉईन चा कॉनफीड्न्स जबरदस्त आहे....

या निमित्ताने मिपा वर त्रैराशीक कथांची साथ यावी :)

मस्त कथा. त्रैराशिक नाव वाचून गणितावर काही आहे का असं वाटलं होतं. पण ही तर गणित चुकलेल्या माणसाची कथा निघाली. निव्वळ संवादांतून, तेही फोनवरच्या, सगळी पात्रं डोळ्यांसमोर उभी केली. क्या बात है! मस्तच.

तेचाकडं कनाय तसला आंडराड मोबाईल हाय
चुकून कायतरीच वाचलं गेलं.....पण एकूण प्रकार भारीये....

अप्रतिम.............तिन्हिई कथा

हसता हसता हळूच डोळ्यात पाणी आणणारी तीन तुकड्यांची कथा.

मस्त...मजा आली. पुलेशु

लोकांनी सिक्वेल मागितला तर तुम्ही डायरेक्ट ट्रिओलॉजीच घेऊन आले राव... :) मस्त जमलंय. हे पात्र डेव्हलप केलंत तर मस्त सिरीज होऊन जाईल एक.

मस्त..