महाभारतातली माधवी
सुर्याची लेकरे मधील एका प्रतिक्रियेत श्री स्वॅप्स यांनी माधवीचा उल्लेख केला. महाभारतातील अनुकंपनीय पात्रांमध्ये त्यांनी माधवीचा उल्लेख केला. त्या अनुषंगाने आलेल्या उत्सुक प्रतिक्रियांमुळे ही जिलबी पाडायची इच्छा झाली. त्यामुळे याचा दोष पुर्णपणे स्वॅप्स यांना द्यावा ;).
****************************************************************************************************
दुराग्रह आणि आत्मप्रौढी हे दोन दुर्गुण एखाद्या माणसाला किती त्रासदायक ठरु शकतात आणि पर्यायाने आपल्या आजुबाजुच्या निष्पाप लोकांना किती त्रास देउ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिचार्या माधवीची कथा. पांडवांना सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीदेखील देणार नाही या अट्टाहासावर ठाम असलेल्या आणि इतरांच्या बळावर प्रौढी मिरवणार्या दुर्योधनाला समजावुन कृष्णाची संधी स्वीकारण्याचा सल्ला देण्यासाठी नारद मुनींनी दुर्योधनाला ही कथा सांगितली.
ही कथा आहे विश्वामित्रांची आणि त्यांचा शिष्य गालव याची. ही कथा आहे ययातीची. पण त्याहुन महत्वाचे म्हणजे ही व्यथा आहे ययातीच्या अप्सरेहुन सुंदर मुलीची माधवीची. ययाती बद्दल जितके अधिक वाचावे तितके तो एक शूर राजा असला तरी एक नालायक पिता होता याची खात्री आपल्याला मनोमन पटत जाते. हा तोच ययाती ज्याने तारुण्य मिळवण्यासाठी आपल्या मुलांच्या भवितव्याची वाट लावली.
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा. वार्धक्याची भिती वाटण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी कारणे होती आणि नेमके हेच ओळखुन शुक्राचार्यांनी त्यांच्या मुलीची उपेक्षा केल्याबद्दल त्याला वार्धक्याचा शाप दिला. गयावया केल्यावर ययातीला उ:शाप मिळाला की तो त्याच्या वार्धक्याची त्याच्या कुठल्याही मुलाच्या तरुणपणाशी अदलाबदल करु इच्छितो. विषयवासनेच्या आहारी गेलेल्या ययातीने १००० वर्षांच्या कालावधीसाठी यदु, तुर्वसु, द्रह्यु, अनु आणि पुरु या आपल्या पाचही पुत्रांकडे तारुण्याची याचना केली. १००० वर्षांत सर्व सुखे उपभोगुन निश्चिंतमनाने निवृत्ती स्वीकारता येइल असे त्या बिचार्याने ठरवले होते.
पहिल्या चार पुत्रांनी पित्याच्या क्षोभाची तमा न बाळगता या असमान आणि अन्य्याय्य मागणीला चक्क नकार दिला. त्यांनी पदोपदी विषयवासना “उपभोगाने शमत नाही तर वाढतच जाते”. “भोग हे यज्ञात आहुतीत पडलेल्या तूपाचे काम करतात आणि विषयवासनांची वन्ही वाढवतच जातात” हे त्या अभाग्याला समजावण्याचे प्रयत्न केले पण सदसद्विवेकबुद्धी गमावलेल्या त्या राजाने उलट त्या चौघांनाच शाप दिले. यदुला शाप मिळाला की त्याचे वंशज कधीही राजे बनु शकणार नाहीत तर तुर्वसुला लवकरच अधोगती होउन निर्वंश होण्याचा शाप मिळाला. द्रह्युला नामधारी राजेपण मिरवण्याचा शाप मिळाला तर अनुकडून आणि त्याच्या वंशजांकडुन यज्ञयाग करण्याचा अधिकार काढुन घेतला गेला. पाचवा पुरु मात्र पहिल्या चार जणांची अवस्था बघुन शहाणा झाला असावा आणि त्याने नम्रपणे पित्याचे वार्धक्य स्वीकारले. त्याला मात्र १००० वर्षांनंतर राज्य मिळाले आणि समृद्ध राज्याचा वारसा देखील.
यदुच्या वंशातच पुढे यादव आणि यादव वंशात कृष्ण जन्मला तर द्रह्युच्या वंशात पुढे भोज आणि त्याच्या वंशात पुढे नामधारी राजे जन्मले ज्यांना कधी कंस / जरासंधांनी खुळ्खुळ्यासारखे स्वार्थासाठी वापरले तर कधी त्यांनी राजे असुनही कृष्ण / बलरामाच्या सावलीत नामधारी बनून राहणे पसंत केले. तुर्वसुचे वंशज नंतर यवन म्हणुन हिणवले गेले तर अनुचे वंशज म्लेंच्छ म्हणुन. पुरुच्या वंशात मात्र पौरव (अथवा कौरव ) जन्माला आले आणि त्याचे वंषज कुरु म्हणुन प्रसिद्ध झाले.
माधवी याच ययातीची मुलगी. ज्या ययातीने स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मुलांच्या आणि वंशाच्या आयुष्याचे आणि भविष्याचे वाट्टोळे केले त्याच ययातीने स्वतःच्या मोठेपणाचा तोरा मिरवण्यासाठी आणि नंतर स्वर्गप्राप्तीसाठी आपल्या मुलीच्या आयुष्याची माती केली. आणि हे सर्व झाले गालव ॠषींच्या दुराग्रही हट्टामुळे.
गालव ऋषी म्हणजे विश्वामित्र ऋषींचे शिष्य. त्यांनी १००० वर्षे (अबबबब) विश्वामित्रांची मनापासून सेवा केली (ही सुद्धा एक उपकथा वेगळी आहेच पण विस्तारभयास्तव इथे देत नाही). त्यामुळे प्रसन्न होउन विश्वामित्रांनी त्यांना सांगितले की तुझे शिक्षण आता पुर्ण झाले तु आता योग्य ठिकाणी जाउन अर्थार्जन, धर्मार्जन कर. परंतु गालव ऋषींना गुरुच्या ऋणांतुन मुक्त झाल्याशिवाय आणि गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणे बरे वाटेना. वास्तविक गालव ॠषी अतिशय गरीब होते आणि त्यांना गुरुदक्षिणा देणे जमणार नाही हे विश्वामित्रांना माहिती असल्याने त्यांनी वारंवार गालव ऋषींना गुरुदक्षिणा नको म्हणुन सांगितले पण गालव ऋषींचा गुरुदक्षिणा देण्याचा अट्टाहास आणि दुराग्रह नडला. ते विश्वामित्रांची पाठ सोडायलाच तयार होइनात. अखेर चिडुन विश्वामित्रांनी त्यांना सांगितले की "एक कान काळा असणारे शशीकिरणांसारख्या दूधी रंगाचे ८०० घोडे मला गुरुदक्षिणा म्हणुन आणुन दे. जा त्वरेने निघ.”
ही असली विचित्र मागणी ऐकुन मात्र गालव ऋषींची पाचावर धारण बसली. ८०० घोडे गुरुदक्षिणा म्हणून द्यायची त्यांची ऐपत नव्हती तिथे ८०० पांढरेशुभ्र घोडे ते देखील एक कान काळा असणारे ते कुठुन आणुन देणार? जगाचा स्वामी तो विष्णु सोडून आपली मदत कुणीच करु शकत नाही याची त्यांना जणू खात्रीच पटली आणि ते चिंताग्रस्त झाले. विष्णु जरी त्यांच्या मदतीला नाही गेला तरी त्या विष्णुचे जे वाहन ते गरुड गालव ऋषींचे मित्र होते. ते नेमके त्यावेळेस तिथुनच चालले होते. त्यांनी गालव ऋषींना मदत करायचे आश्वासन दिले.
मग गरुडानेच गालव ऋषींना सांगितले की समस्त ब्रह्मांडात त्यांची मदत करु शकेल असा एकच राजा आहे आणि तो म्हणजे ययाती. मग गरुडाच्या पाठीवर बसुन गालव ॠषी ययातीकडे गेले. गरुडाने ययातीला विनंती केली की गालव ऋषींना त्याने मदत करावी. पण त्यावेळेस ययातीचा खजिना तर रीता होता. त्याच्याकडे काही असे घोडे नव्हते. पण दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवण्याचा कमीपणा तर पदरी पाडून घ्यायचा नव्हता. स्वतःची कीर्ती तर अबाधित राखायची होती. म्हणुन ययातीने परस्पर गालव ऋषींना सांगितले की "माझी अप्सरेहुन सुंदर कन्या माधवी अजुन अविवाहित आहे. तिच्या सौंदर्यामुळे तिला अनेको राजांकडुनच काय तर देवाधिकांकडुनही मागणी आलेली आहे. तिच्या बदल्यात हुंडा म्हणुन कुठलाही राजा तुला ८०० घोडेच काय तर सगळ्या जगातली संपत्ती तुझ्या पायाशी ओतेल. तु हिलाच घेउन जा आणी हिच्या बदल्यात तुला पाहिजे ते मिळव"
गालव ऋषींना देखील अशी काही भिक्षा मिळवण्यात गैर वाटले नाही. बापाच्या सांगण्यावरुन बिचार्या माधवीची परवड सुरु झाली. एका भोग्य वस्तु सारखी ती गालव ऋषींच्या मागुन निघाली. गालव तिला सगळ्यात आधी अयोध्येच्या इक्श्वाकुकुलीन राजाकडे घेउन गेले. आयोध्यापतीला बिचार्याला मूल नव्हते. माधवीला हमखास मूल होइल असे गालव ऋषींनी सांगताच त्याला आनंदच झाला. पण तिच्या बदल्यात लागणारे ते तसले ८०० घोडे मात्र त्यांच्याकडे नव्हते.
त्या राजाने एखाद्या गुलामाचे करतात त्याप्रमाणे माधवीचे निरीक्षण केले आणि मग गालवांना सांगितले की "या स्त्रीमध्ये जे सहा अवयव उन्नत हवेत तसे हिचे आहेत, जे सात अवयन कमनीय असायला हवेत ते सात अवयव कमनीय आहेत, ज्या ३ जागा खोलगट असायला हव्यात त्या खोलगट आहेत आणि जे पाच अवयव लाल असायला हवेत ते तसेच आहेत. थोडक्यात एक महापराक्रमी पुत्राला जन्म देण्यासाठी जे गुण एखाद्या स्त्रीमध्ये हवेत ते सगळे हिच्यामध्ये आहेत." आता हे सगळे वर्णन करण्यासाठी राजाने माधवीचे किती सूक्ष्म आणि कसे निरीक्षण केले असावे हे वेगळे सांगायला नको. अर्थात राजा मोठा न्यायी आणि दिलदार होता. तो अतिशय उदारपणे गालवांना म्हणाला की असे बघ माझ्याकडे ८०० नसून केवळ २०० च घोडे तुला पाहिजेत तसे आहेत तर तु माधवीला इथेच सोडुन जा. मी तिला फक्त एकच मूल होइपर्यंत इथे ठेउन घेइन आणि मग तु तिला परत घेउन जा. उरलेले ६०० घोडे तु कुठल्याही इतर ३ राजांकडुन वसून कर. हिच्यासाठी २०० घोडे काय कुठलाही राजा देइल. माधवीला प्रत्येक पुत्रप्राप्तीनंतर कौमार्याची परत प्राप्ती होइल असा आशिर्वाद असल्याने गालवांनी या योजनेला संमती दिली. अयोध्येच्या राजाला मग माधवीकडुन वसुमानस नावच्या पुत्राची प्राप्ती झाली.
वसुमानसाच्या जन्मानंतर गालव ॠषी परत माधवीला न्यायला आले. तिला घेउन मग ते काशीनरेश दिवोदासाकडे गेले. या सर्व प्रकरणाची किर्ती दिवोदासाकडे आधीच गेली होती. आणि माधवीसारख्या सुंदर स्त्रीला भोगायला अर्थात तोही आतुर झालाच होता. गालवाला हवे असलेल्या घोड्यांसारखे २०० घोडे त्याच्याकडेही असल्याने गालव माधवीला घेउन त्याच्याकडे येणार याचीही त्याला खात्रीच होती. माधवीपासुन त्यालाही मग पुत्रप्राप्ती झाली. त्यांच्या मुलाचे नाव होते प्रतार्दन.
त्यानंतर गालव ऋषी माधवीला भोज राजा उशिनराकडे घेउन गेले. त्यांच्यापासुन माधवीला सिवी नावाच्या पुत्राची प्राप्ती झाली. मात्र दुर्दैवाने उशिनराकडेही तसले केवळ २०० च घोडे असल्याने एका पुत्राच्या प्राप्तीनंतर त्यानेही माधवीला परत गालवांकडे सुपुर्त केले.
अश्याप्रकारे गालवांकडे ६०० घोडे जमले होते. पण तरीही उरलेले २०० घोडे कुठे मिळतील हे त्यांना उमजेना म्हणुन ते परत गरुडाकडे गेले. गरुडाने त्यांना सांगितले की "उरलेले २०० घोडे मिळवण्याचा प्रयत्न देखील करु नकोस. कारण ते ब्रह्मांडात कुठेही अस्तित्वात नाहित. अश्याप्रकारचे १००० घोडे पुर्वीच्या काळी केवळ वरुणाकडे होते. गाधी नावाच्या एका राजाच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा जेव्हा ऋचिक ऋषींनी बोलुन दाखवली तेव्हा ते घोडे ऋचिकांनी मिळवुन दिल्यास आपल्या मुलीचे लग्न त्यांच्याशी लावुन देण्याची तयारी गाधीने दाखवली. तेव्हा ऋचिकांनी वरुणाच्या यज्ञाचे पौराहित्य करुन हे घोडे त्याच्याकडुन मिळवले आणि गाधींच्या मुलीशी लग्न जमवले. गाधींनी मग हे १००० घोडे दान केले. त्यातले २०० घोडे प्रत्येकी या तीन राजांनी मिळवले आणि उरलेले ४०० घोडे नदीत वाहुन गेले. त्यामुळे पृथ्वीतलावर आता असे केवळ ६०० च घोडे उरले आहेत." वास्तविक विश्वामित्र ऋषी या गाधीचेच पुत्र. म्हणजे एकप्रकारे हे ६०० अश्व एकेकाळी त्यांच्याच मालकीचे होते आणि जगात असे ८०० अश्व अस्तित्वातच नाहित हे त्यांना माहिती असणार आणि गालव त्यांची गुरुदक्षिणा पण कधीच देउ शकणार नाहित हे देखील विश्वामित्रांना माहिती असणार. गालवांच्या आडमुठ्या हट्टीपणाला त्यांनी चांगलाच उतार शोधुन काढला होता.
पण गरुड देखील आपल्या मित्राची प्रतिज्ञा पुर्ण करण्यासाठी झपाटलेला होता. त्याने यातुनही एक मार्ग काढला. गरुड गालवांना म्हणाला की प्रत्येक राजाने एका पुत्राच्या बदल्यात तुला २०० घोडे दिले. याचाच अर्थ असा की या माधवीबरोबर संग करुन मिळवलेला एक पुत्र २०० घोड्यांइतका मौल्यवान आहे. त्यामुळे २०० घोड्यांच्या बदल्यात तु या माधवीलाच विश्वामित्र ऋषींना अर्पण कर. गालव मग ६०० घोडे आणि माधवीला घेउन विश्वामित्र ऋषींकडे गेले. आणि सर्व कथा सांगुन एका पुत्राच्या प्राप्तीसाठी माधवीला गालवांनी अखेर विश्वामित्रांनाच अर्पण केले. तिला बघुन विश्वामित्र देखील गालवांना म्हणाले की "हिला आधीच माझ्याकडे घेउन आला असतास तर मलाच हिच्याकडून ४ पुत्र मिळाले असते. असो. मी माधवीकडुन एका पुत्राची प्राप्ती करुन घेउन. हे ६०० घोडे तु असे कर जवळपासच्या कुरणात चरायला सोडुन दे". थोडक्यात ज्या माधवीने त्या ६०० घोड्यांसाठी इतकी मानखंडना सोसली त्या ६०० घोड्यांचे विश्वामित्रांच्या दृष्टीने काहिच महत्व नव्हते. गालवांच्या नसत्या अट्टाहासापायी माधवीला मात्र चार पुरुषांनी भोगले. यथावकाश माधवीने विश्वामित्रांच्याही मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अष्टक.
वसुमानस पुढील काळात सत्शील आणि धर्माचा रक्षणकर्ता म्हणुन प्रसिद्धी पावला तर सिवी दानशूर म्हणुन आणि प्रतार्दन महापराक्रमी निपजला तर अष्टकाने अनेको यज्ञांचे पुण्य जमविले. अष्टकाच्या जन्मानंतर विश्वामित्रांनी माधवीला गालवांना परत केले तर गालवांनी तिला तिच्या पित्याच्या म्हणजे ययातीच्या हवाली केले.
प्रत्येक पुत्रप्राप्तीनंतर परत कुमारिका झालेल्या माधवीला तिच्या लोकोत्तर सौंदर्यामुळे लग्नाच्या बाजारात मोठीच किंमत असल्याने ययातीने तिचे परत लग्न जमवण्याचा घाट घातला आणि गंगा यमुनेच्या संगमावर तिचे स्वयंवर थाटले. तिथे अनेक नाग, यक्ष आणि गंधर्व जमले होते (माधवीची "किर्ती" एव्हाना सगळीकडे पोचली असावी कारण मोठ्या राजांपैकी कोणी तिथे असल्याचा उल्लेख येत नाही) पण झाल्या प्रकाराला विटलेल्या आणि आपल्या देहाची झाली ती विटंबना पुरेसे झाली असे बहुधा वाटत असलेल्या माधवीने लग्नाच्या ऐवजी वनवासाचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर अनेको वर्षे ती भ्रमिष्टावस्थेत वनांतुन फिरत राहिली आणि तपश्चर्या करत राहिली. पण तिचे भोग लवकर संपले नाहित.
देहाचे सर्व भोग उपभोगुन ययाती यथावकाश स्वर्गात पोचला. पण तिथेही त्याने माती खाल्ली. आपल्या ऐश्वर्याचा आणि सामर्थ्याचा त्याला गर्व झाला. अहंकारातुन त्याने इतर सर्वांना स्वतःपेक्षा कनिष्ठ लेखले परिणामस्वरुपी तू स्वर्गात राहण्याच्या लायकीचा नाही असे म्हणुन इतर सर्वांनी आणि इंद्राने मिळुन त्याला पृथ्वीतलावर ढकलुन दिले. खाली पडत असताना पडायचेच असेल तर जिथे सत्शील माणसे जमली आहेत अश्या ठिकाणी मी पडावे अशी इच्छा ययातीने प्रदर्शित केली. त्याचवेळेस नैमिषारण्यात नेमके माधवीचे चार पुत्र (म्हणजे ययातीची नातवंडेच) एकत्र जमुन यज्ञ करत होती. ययाती त्यांच्यामध्येच जाउन पडला. हिंदी चित्रपटातले सगळे योगायोग एकत्र जमुन यावेत तद्वत नेमकी रानावनातुन फिरणारी माधवी तिथेच आली आणि गालव ऋषीदेखील पोचले. मुलांनी आपल्या आईला ओळखले. ययातीला मात्र नाही. पण माधवीने बापाला ओळखले आणि तिनेच आजा नातवंडाची भेट घडवुन आणली. अनेको वर्षांच्या सदाचरणाने आणि यज्ञाने माधवीच्या चारही मुलांनी अपुर्व पुण्यसंचय केला होता. माधवीनेदेखील पुण्य कमावले होते. आयुष्यभर बापाच्या किर्तीच्या हव्यासापोयी मानखंडना वाट्ञाला आलेल्या त्या राजकुमारीने परत एकदा त्याग करत आपल्या आणि आपल्या चारही मुलांच्या पुण्यसंचयाच्या आधारावर ययातीला परत स्वर्गात पोचवले. गालव ऋषींनीदेखील ययातीने केलेली मदत स्मरुन आपल्या पुण्यातला एक अष्टमांश भाग ययातीला दिला आणि अहंकारामुळे धरतीवर पोचलेला ययाती गर्वहरण होउन परत स्वर्गात पोचला. माधवी तिच्या ललाटी असलेला वनवास भोगण्यासाठी परत वनात गेली.
अश्याप्रकारे गालवांचा अट्टाहासी दुराग्रह आणि ययातीच्या कीर्तीच्या लालसेची अहंकाराची आणि गर्वाची फळे मात्र निष्पाप आणि निरागस माधवीने भोगली.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान लिहिलयं. वाखुसाआ.
हिंदी चित्रपटांच्या निर्बुद्ध
ययाती आज हि जिवंत आहे आणि आता
अरेरे.
याचा 'दोष' घ्यायला मी अर्थातच
पण असा अंदाज करायला या एका
चांगली शंका आहे.
दंडवत स्विकारावा महाराज !
कधीही वाचलं ऐकलं नव्हतं या
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.
नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद
ययाती कामलंपट नव्हताच आणि माधवीही पुण्यश्लोक होती
बाकी ययाती खरेच भोगलोलुप होता
विस्वची कोण? ययातीच्या
विस्वची एक अप्सरा होती.
अरे त्या प्रतिसादाचा फ़क्त
विस्वचीचा उल्लेख उद्योगपर्वात
तेव्हढा मुलांबरोबर वार्धक्य
हा आदिपर्वातला संदर्भ:
ओह्ह. ओके.
खासकरुन "company of young
बोरी प्रतीत असे आलेय बघ.
काटा आला
सुंदर ओळख. राजकन्येच्या सुखी
फार पूर्वी लहानपणी ही गोष्ट
गालव ऋषी हे शारिरीक
माधवी
आपली संस्कृती उदात्तच आहे. पण
ते औपरोधिक असेल रे
मालक कुठुन कुठुन अशा कथा
अप्रसिध्द व्यक्तिंचं पुढे काय
ॠषी आणि मुनि यात नेहमीच गफलत
सहमत. आपण नेहमीच विचारपूर्वक
ययाती बद्दल जितके अधिक वाचावे
महाभारतात माधवीची कथा येते
................... कठीण आहे.
य्ग्झय्टली
ही कथा असो वा सत्य वा काही पण
ही कथा माहीती नव्हती .
ऐक माधवी नावाचं एक पुस्तक
उत्तुंग कल्पनाशक्ती
आपले चित्रमय प्रतिसाद नेहमीच
सदर माधवी ची कथा मा बो वर पण
तुर्वसु आणि अनु
आयोनिया म्हणजे सध्याच्या
अनु
उम्म ते नै सांगता येत. यवन हा
म्लेंच्छ शब्दाचा मूळ अर्थ
हा संदर्भ कुठून मिळाला सांगता
मूळ लेख आणि त्यावरील अनेक