Skip to main content

"मालवून टाक दीप"

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 29/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ती संध्याकाळ मंतरलेली…। या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे. १) "मालवून टाक दीप" हे गाणे तसे लहानपणापासून कधीमधी ऐकायला येत असे. परंतु त्याचा खोल अर्थ केंव्हा कळला ते असे. आमचे लग्न ठरले होते १९९२. तेंव्हा (होणारी) बायकोचे माहेर पनवेलला. ते खरेदी साठी दागिने बनवण्यासाठी पुण्याला येत असत. असे दोन वेळेस ते ५- ५ दिवस पुण्यात आलेले होते. माझी नोकरी चालू होतीच ए एफ एम सी मध्ये आणि एम डी पण चालू होते. तेंव्हा सोलापूर रोड ला मला दीड खोलीचे क्वार्टर्स मिळालेले होते. चार वाजता मी डिपार्टमेंट मधून सुटत असे. चहा घेऊन तयार होऊन सेंट बिंट मारून तयार होत असे. संध्याकाळ झाली कि बरोबर ५ च्या ठोक्याला मी तिच्या मामांकडे पर्वती पायथ्या जवळ तिला घ्यायला जात असे. पाच ते साडे आठ अशी आमची फिरायची वेळ होती. दिवसा ते खरेदी साठी जात असत. एक दिवस संभाजी पार्क, एक दिवस क्याम्पात, एक दिवस वैशालीत असे आम्ही जात होतो. चौथ्या दिवशी तिला मी माझी ब्रम्ह्चार्याची मठी दाखवायला ए एफ एम सी मध्ये घेऊन आलो.निघताना सासुबाई नी काहीतरी खाऊन जा सांगितले. मी त्यांना म्हणालो आम्ही बाहेरच खाऊ. खोलीत माझ्याकडे दोन महिन्याचा पूर्ण पगार टाकून आणलेली फिलिप्स ची सुंदर म्युझिक सिस्टीम आणि दोन मोठे उंच असे उच्च दर्ज्याचे लाकडी स्पीकर्स खोलीच्या दोन कोपर्यात लावलेले होते.तिला पण संगीताची आवड असल्याने तिने माझा संगीताच्या टेप्स चा संग्रह पाहिला( १००च्या आसपास कॅसेटस होत्या) पेरू गेटाजवळ असलेल्या फ्रेंड्स म्युझिक सर्कल मधून मुद्दाम टेप करून घेतलेली जुनी मराठी आणि हिंदी गाणी हे पाहून ती हरखूनच गेली.सुदैवाने आमची गाण्यांची आवड तंतोतंत जुळली. सप्टेम्बरचे दिवस असल्याने साधारण सहा साडे सहाला अंधार पडायला सुरुवात झाली. मग मी म्युझिक सिस्टीमवर गाणी लावली आणि आम्ही माझ्या बेडवर बसलो. एकमेकांच्या जवळ आलो तेंव्हा हे गाणे लागले. आ करून लता दीदींचा पहिला आलाप ऐकला आणि अंगावर शिरशिरी आली. अशा म्युझिक सिस्टीम वर संध्याकाळची वेळ हवेत पुण्याचा सुखद गारवा आणि मिठीत तुमची नव्या नवतीची चि. सौ. कां. पुढे जवळ जवळ दोन तास आम्ही वेगवेगळी गाणीच ऐकत होतो.लता दीदींची स्वरसम्राज्ञी कि कॅसेट यात कशी काळ नागिणी, मावळत्या दिनकरा इ गाणी अशा ताईंची अष्टपैलू गायिका मधील जिवलगा, समईच्या शुभ्र कळ्या,तरुण आहे रात्र अजुनी, येरे घना, गेले द्यायचे ते राहून अशी एका पाठोपाठ गाणी लागत होती. हे एक ऐकून जाऊया असे करत करत सव्वा आठ वाजले. खायची प्यायची शुद्ध नव्हतीच. सव्वा आठला मला लक्षात आले कि तिला मामांकडे सोडायचे आहे. मग तसेच निघालो आणि साडेआठ ला त्यांच्या घरी पोहोचलो.घरी सोडले इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आणि निघालो मी तिला सोडून निघणार तो सासूबाईनि विचारले काहि खाल्लेत का? मी सरळ सांगितले काहीही खाल्लेले नाही. आता जाऊन जेवणार. त्यांनी जेवायचा आग्रह केला. नाही तरी मेस मध्ये कोणाला जेवायचे होते? पण संकोच असतो ना ? मग तेथे त्यांच्याकडेच जेवलो आणि हवेत तरंगत परत आलो. आजही मालवून टाक दीप गाणे लागले कि मला सप्टेंबरातील ती संध्याकाळ तशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहते. २) यानंतर परत एकदा बर्याच वर्षांनी गोव्याला सरकारी घरात आम्ही (सन २००० च्या) पावसाळ्यात सरकारी घर बदलले अगोदर दोन बेड रूम चे घर होते ते आता मोठे तीन बेडरुमचे घर मिळाले. तेथे मुलांना त्यांची बेडरूम त्यांच्या मनाप्रमाणे सजवून दिली. मुलं शाळेत जाणारी होती. एका रविवारी सकाळपासून गोव्याच्या पाळोले किनार्यावर गेलो होतो. तेथे एक तंबू भाड्याने घेतला. सकाळी सामान तंबूत ठेवून समुद्रात गेलो. जेवून दुपारी आम्ही झोपलो मुले वाळूत खेळत होती. संध्याकाळी कारने घरी परत आलो. रात्री जेवणं होईस्तोवर मुलं पेंगुळलेली झाली होती दुपारी उन्हात खेळण्याचा परिणाम स्पष्ट दिसत होता. त्यांच्या बेडरूम मध्ये गादया घालून दिल्यावर पटकन झोपली. दिवसभर पाण्यात खेळून दमली होती. बाहेर हॉल मध्ये म्युझिक सिस्टीम होती तिथे गालीचा घातलेला होता. मी बायकोला म्हणालो थोडा वेळ गाणी ऐकुया . मग दोन लोड घेतले आम्ही सर्व दिवे बंद करून गालीच्यावर आडवे झालो आणि मी नवीन घेतलेल्या ४.१ ( पाच स्पीकर असलेली) म्युझिक सिस्टीम मध्ये शफल मोड वर गाणी लावली तीन सीडी मधून वेगवेगळ्या क्रमाने गाणी वाजू लागली. एक दोन गाणी होईपर्यंत मूड बनला तोच परत लता दीदींचा आलाप आणि मालवून टाक दीप हे गाणे लागले. सर्व दिवे बंद रात्री साडे दहाला गोव्यासारख्या ठिकाणी चिडीचूप शांतता आणि तुमच्या चारी बाजूला शांतपणे पाझरणारे लता दीदींचे सूर. स्वतःच्या उबदार घरट्यात. बाहेर भुरभुरणारा पाउस. दिवसभर फिरून तृप्त झालेले मन आणि मिठीत तुमची आवडती.यापेक्षा काय हवे. एक एक सूर पाझरत होता आणि मनात खोल उतरत होता. गार गार या हवेत घेउनि मला कवेत मोकळे करून टाक एकवार अंतरंग राजसा किती दिसत लाभला निवांत संग. सुख सुख म्हणतात ते अजून काय असते? ३) २०१५ एप्रिल चा महिना. मी आपल्या बायकोशी कटकट करत होतो कि तू साड्या नेसतच नाहीस. बरेच दिवस झाले रोज तेच तेच ड्रेस घालायचे मग साड्या आणून काय फायदा इ इ. बायको अर्ध मारेथोन धावते. (२१ किमी /३ तासात) एरोबिक्स करते म्हणून सडपातळ आहे. त्यामुळे साडी अजूनही तिला खुलून दिसते. मी आपल्या दवाखान्यात रोज सकाळी साडे आठ वाजता न्याहारी करून जातो. तिचा दवाखाना माझ्या दवाखान्याच्या बाजूच्याच खोलीत आहे. तेंव्हा पेशंट आले तर उत्तम पैसे मिळतात. नाही आले तर वेळ मिळतो गप्पा मारायला. तिची वेळ दहा वाजताची. ती एकतर थर्मास मध्ये कॉफी घेऊन येते. किंवा तिच्या दवाखान्यात कॉफी मेकर आहे त्यात आम्ही बनवतो नाहीतर धंदा मंद असेल तर हॉटेलात बसून कॉफी घेतो. एक वाजता दोघे घरी परत. एक दिवस सोमवार सकाळ -- मी सकाळ पासून रुग्ण बघत बघत कावलो होतो. साडे दहा वाजले होते सकाळपासून दोन तास सतत रुग्ण येतच होते. एवढ्यात तिच्या स्वागत सहायिकेने मला बोलावणे पाठवले, सर म्याडम आल्या आहेत आणि तुम्हाला बोलावत आहेत.मी रुग्ण हातावेगळा केला आणि तीच्या दवाखान्यात दार ढकलून आत गेलो. बघतो तर काय बाईसाहेब झक्क पैकी निळी आणि काळी साडी ( माझ्या चोईसची) साडी त्यावर माचींगचा ब्लाउज गळ्यात मोत्यांची माळ इ इ जामानिमा करून आलेल्या. मी छानपैकी शिटी मारली. बायको लटक्या रागाने म्हणाली अरे हा आपला दवाखाना आहे घर नाही पेशंट काय म्हणतील? . मी म्हणालो पेशंट को मारो गोली. मग काय तिच्या कडे पाहत बसलो. तिने तिच्या छोट्याशा म्युझिक सिस्टम वर गाणी लावली. तर काय गाणे लागले " मालवून टाक दीप" छान पैकी बायको कडे पाहत वातानुकुलीत खोलीत गरम गरम कॉफी चा स्वाद घेत बसलो. आयुष्यात माणसाला आणखी काय हवं असतं?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21806
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

खूप सुंदर लेख. एका सुरेख गाण्या बरोबरच्या आपल्या आठवणी इतक्या अचूक शब्दात वर्णन करणे ही पण एक कला आहे. वा डॉक्टरसाहेब आप तो छा गये। मी मिपा वर नवीन आहे पण आपले सगळे लेख वाचले आहेत आणि तुमचे पंखे तर आम्ही (सर्व मिपा वाचक… स्वतःला आदरार्थी संबोधन नव्हे) आहोतच. या गाण्याबद्दल काय बोलावे सुरेश प्रभू, पं. हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी या गाण्याला दैवी बनवून ठेवले आहे. गाण्याची सर्वच कडवी छान आहेत पण जाताजाता अजून एक कडवं - काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग

In reply to by ट्रेड मार्क

साहेब कवी सुरेश प्रभू नाही तर सुरेश भट आहेत

In reply to by सुबोध खरे

चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद. थोड्यावेळ आधी सुरेश प्रभूंची मुलाखत बघितल्याचा परिणाम झालेला दिसतोय. रेल्वे मंत्र्यांना उगाच यात गोवल्यामुळे विरोधन्काच्या हातात कोलीत मिळू नये आणि एका सुंदर धाग्याचं राजकारण होवू नये अशी प्रामाणिक इच्छा.

महाराष्ट्रात डॉ नट आणि डॉ. लेखक यांची मोठी परंपरा आहे. @डॉ. खरे - तुम्ही छानशी दीर्घकथा / लघुकादंबरी लिहा पाहू वेळात वेळ काढून. अल्वार लेखन आवडले.

In reply to by मनोज श्रीनिवास जोशी

काहीही काय? जोशी साहेब एक डॉक्टरकीची पदवी सोडली तर अशा लोकांच्या जोड्या शेजारी बसायची लायकी नाही आमची. मज पामरासी काय थोर पण पायीची वहाण पायी बरी.

पु .भा. प्र.

सुंदर लिहिलंय. हे गीत माझे अत्यंत आवडते गीत आहे. संपूर्ण गीत असे आहे. मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग राजसा किती दिसात, लाभला निवांत संग त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात हाय तू करू नकोस, एवढयात स्वप्नभंग दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात सावकाश घे टिपून एक एक रूपरंग गार गार या हवेत घेऊनी मला कवेत मोकळे करुन टाक एकवार अंतरंग ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग यातील "बोल रे हळू उठेल" या शेवटच्या ओळीतील "हळू" हा शब्द लताबाईंनी इतका हळूवार गायला आहे की एकदम लाजबाब! _____________________________________________________________________ असेच दुसरे गीत आशाताईंनी गायले आहे. तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ? सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ? उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे ? बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ? उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे ? ______________________________________________________ हे सुद्धा अत्यंत सुंदर शृंगारिक गीत आहे. आशाताईंचा नशीला आवाज आणि अत्यंत अर्थपूर्ण शब्द याने हे गीत नटले आहे. दोन्ही गीतांचा अर्थ बराचसा सारखा आहे, दोन्ही गीतात तीच भावना आहे, दोन्ही गीते हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केली आहेत आणि दोन्ही गीते दोन स्वर्गीय आवाजाची देणगी मिळालेल्या गायिकांनी गाऊन अजरामर केली आहेत.

In reply to by मराठी_माणूस

लिंकबद्दल धन्यवाद! हा लेख पाहिलाच नव्हता. हे गीत आतापर्यंत शृंगारगीत म्हणूनच ऐकलेले आहे आणि ते शृंगारगीत म्हणूनच भावते. कितीही विचार केला तरी हे गीत कारूण्यगीत आहे असे वाटत नाही. एका गीतात मीलनासाठी आतुरलेली प्रेयसी आहे व ती मीलनासाठी प्रियकराला आवाहन करत आहे. दुसर्‍या गीतात मीलनात अतृप्त राहिलेली प्रेयसी प्रियकराची पुन्हा एकदा मीलनासाठी आळवणी करीत आहे.

चांगला आणि संयमित लेख. आहात खरे रसिकराज.

धाग्याचं शतकं झाल्याबद्दल डाक्टरसायबांना प्रिये पहा, रात्रीचा समय सरुन ही ओरिजिनल बालगंधर्वांच्या आवाजातली रेकार्ड, तु तिथं मी या मांडलेकरथेटरनिर्मित शिर्यलचं टायटल साँग आणि पुस्प्गुच्चं देउन करणेत येत आहे. :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पुस्प्गुच असा मूळ पाठ आहे. आतापासनंच पाठभेद व्हायला लागले. छे पूर्वीचं मुपी....आपलं मिपा राह्यलं नाही.

In reply to by सूड

भाषा दर बारा मैलांगणिक बदलते. सिंव्हगड रोड माझ्या घरापासुन १३.५ मैलांवर असल्याने असा फरक घडला असावा.

छान लेख . आधीच तुम्ही हुशार .त्यांत लष्करी शिस्तीमुळे आलेली सुसूत्रता . हे म्हणजे दुधात साखरच .